Monday, 18 December 2017

थँक्यू नेहराजी!!!!💐

भारतीय क्रिकेटमधील "सोनू सूद" आणि ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधील 'बिल्ला' नावाचा गुंडा या  दोघांचंही साम्य असलेला टिपिकल दिल्लीचा ,मनमोकळा क्रिकेटर आशिष नेहरा आज रिटायर्ड झाला.
 सचिन तेंडुलकर बद्दल बोललं जायचं की त्याला स्वतःलाही माहिती नाही त्याच्या शरीरात खेळासंबंधीत किती इंज्युरीज आहेत. तश्याच असंख्य जखमा शरीरात बाळगणारा आशिष नेहराजी क्रिकेटमधील सर्व प्रकारातुन निवृत्त झालेत.

अठरा वर्ष वा त्याहून जास्त खेळणाऱ्या अगदी मोजक्या खेळाडूंपैकी तो एक आहे.

दक्षिण आफ्रिकेतील 2003 च्या गाजलेल्या वर्ल्डकप मध्ये इंग्लडविरुद्ध सचिन तेंडुलकरने अँडी कॅडिकच्या शॉर्ट बॉलवर अद्वितीय , डोळ्यांचे पारणे फेडणारा स्टेडियमबाहेर सिक्सर हाणला खरा पण त्यानंतर तो लवकर आऊट झाल्यावर भारतीय संघाने इंग्लन्डसमोर फारसं मोठं लक्ष ठेवलं नाही.

भारत हा अत्यन्त महत्वाचा सामना हरणार का अशीच कुशंका, शक्यता सगळयांना होती. शिवाय भारताचा बॉलिंग अटॅक फारसा पक्का नव्हता.निवृत्ती घेऊनही कॅप्टन सौरव गांगुलीच्या विनंतीखातर वर्ल्डकप खेळणारा शाकाहारी कर्नाटकी म्हातारा वाघ जवागल श्रीनाथ सोडल्यास दोन डावखरे तरुण झहीर खान आणि आशिष नेहरा हे प्रथमच आपला वर्ल्डकप खेळत होते. त्यामुळे भारताची गोलंदाजीची बाजू कमकुवत होती. शिवाय राहुल द्रविड हा कामचलाऊ विकेट किपर होता.

तो सामना दक्षिण आफ्रिकेत "डे-नाईट" सामना असल्याने भारताचा डाव संपेपर्यंत भारतात रात्र झाली होती. बहुतेकजण भारत हा महत्वाचा सामना हारणार याच विचारात झोपी गेलेत.
भारताकडून आपला प्रथमच वर्ल्डकप खेळणारा एक डावखोरा बॉलर होता, आशिष नेहरा.
त्याच्याकडून कोणालाही जास्त अपेक्षा नव्हत्याच. त्यात त्याचा पायाचा घोटा मुरगळलेला. बर्फाने शेकून त्याने बॉलिंग केली आणि दणका दाखवला. सुरवातीलाच विकेट्स घेत इंग्लडची परिस्थिती अत्यन्त बिकट केली. भारताने तो सामना अगदी सहज जिंकला. आशिष नेहराने सहा विकेट्स घेऊन सामनावीर झाला होता.

क्रिकेटमध्ये पार्टनरशीप नेहमीच महत्वाची असते. पण पार्टनरशीप ही बहुतेकवेळा फलंदाजीसंबंधित बघितली जाते. पण गोलंदाजीतही पार्टनरशीप ही अत्यन्त महत्वाची असते. एक गोलंदाज एका बाजूने अचूक गोलंदाजी करून धावा रोखून फलंदाजावरील ताण वाढवतो. आणि दुसरा गोलंदाज त्याचा फायदा घेत विकेट घेतो.
पण यात एक बॉलर नेहमी 'अनसंग' म्हणजे उजेडात येत नाही.
आशिष नेहराने जवागल श्रीनाथ, अजित आगरकर, आणि बराच काळ झहीर खान सोबत , पुढे मुनाफ पटेल,प्रवीण कुमार मग भुवनेश्वर कुमार आणि आता जसप्रीत बुमराहसोबतही बॉलिंग पार्टनरशिप केली.
यात तो सुरवातीला अननुभवी , नंतर प्रमुख आणि आता अनुभवी मेंटॉर बॉलर म्हणून बॉलिंग केली.
पण तरीही म्हणावं तसा तो खूप  यशस्वी होऊ शकला नाही कारण त्याचं सतत जखमी होणं आणि टीमच्या आत बाहेर होत राहणे. तरीही आशिष नेहरा हा भारताचा महत्वाचा बॉलर म्हणून कायम ओळखला जाईल.

 आशिष नेहराला बॉलिंगसाठीच नाही तर त्याच्या काही छोट्या पण महत्वपूर्ण बॅटिंग खेळींसाठीही ओळखलं जातं . 2003 मध्ये वर्ल्डकप पूर्वी भारतीय टीम न्यूझिलंडच्या दौऱ्यावर गेली. अत्यन्त कठीण असा हा दौरा ठरला. कडक थंडी, बोचरे वारे त्यात न्यूझीलंडची बॉल प्रचंड स्विंग आणि सिम होणारी परिस्थिती.
एका एकदिवसीय सामन्यात भारतापुढे अवघे 200 धावांचं लक्ष होतं. सेहवागने शतक ठोकून विजयश्री अगदी गळ्यापर्यंत आणलेली होती. पण भारताचा डाव गडगडला. विजयश्रीच्या हाराऐवजी हरण्याचा फास गळ्याभोवती आवळू लागला.

 सेहवाग,युवराजसिंग, कैफ, संजय बांगर, झहीर खान लागोपाठ आऊट होत गेलेत आणि भारताची शेवटची विकेट उरली . जिंकायला तीन बॉल्स मध्ये दोन धावा आवश्यक , किवी-ब्लॅक कॅप्स पूर्णपणे फॉर्ममध्ये. तेव्हा अकराव्या क्रमांकावर शेवटचा खेळाडू आशिष नेहरा उतरला. श्रीनाथने जागेवरच मारलेल्या बॉलवर डेंजर एन्ड कडे नेहराने धावत एक कठीण रन घेतला. आणि पुढच्या बॉलवर चौकार हाणला . भारत नेहराच्या त्या शॉटमुळे जिंकला.

2002 मध्ये भारत इंग्लन्ड दौऱ्यावर गेला असता लॉर्ड्सवर अजित आगरकरने शतक ठोकण्याचा विक्रम केला. तेव्हा त्या शतकात आशिष नेहराचाही मोलाचा वाटा आहे. भारताचे नऊ विकेट्स गेल्या होत्या. अकराव्या क्रमांकावर आलेल्या आशिष नेहराने सुरक्षित खेळत अजित आगरकरला लॉर्ड्सवरील मानाचे शतक पूर्ण करू दिले. आणि त्यानंतर अँड्र्यू फ्लिंटटॉफला स्टेडियमबाहेर सिक्सर हाणला.

नेहरामध्ये दिल्लीचे  सर्व गुण आहेत. सतत तोंडात शिव्या असतात हे टीव्हीवरही दिसून आलंय.
पाकिस्तानविरुद्धच्या एक सामन्यात महेंद्रसिंग धोनी किपर आणि राहुल द्रविड स्लिपमध्ये असताना सोपी कॅच सोडली म्हणून दोघांनाही उद्देशून दिलेली शिवी टीव्हीवरही ऐकू आली होती.
आयपीएल मध्ये दिली डेअरडेविल्सकडून बॉलिंग करताना किपर दिनेश कार्तिकने कॅच सोडल्यावर मोठ्या आवाजात त्याला चिडून #चादरमोद म्हणत शिवी हासडली होती.

आशिष नेहरा ला आता सर्वजण 'नेहराजी' म्हणून हाक मारतात.तो एक रोल मॉडेल आहे. वयाच्या या  टप्प्यावरही तो अत्यन्त मेहनत करून फिट आहे. आजही तो 140किमी वेगाने बॉलिंग करण्याची क्षमता राखतो.
मागच्या 20 वर्ल्डकपमध्ये, मागच्या इंग्लन्डविरुद्ध च्या 20- 20 मध्ये जबरदस्त कामगिरी केली.

डावखोऱ्या नेहराची बॉलिंग ऍक्शन बॉलिंगचा बादशहा वसीम अक्रमप्रमाणे साधी सरळ नव्हती की डावखोऱ्या झहीर खानसारखी दिलखेचक नव्हती. त्याची शैली काहीशी सदोष होतीच त्यामुळे शरीरावर अतिरीक्त ताण येत राहिला. परीणामी सतत जखमी होत टीममधून आत बाहेर होत राहिला.

एकेकाळी "बाल विराट कोहलीला" स्वहस्ते पारितोषिक देणारा आशिष नेहरा आज विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये खेळतोय. हे फक्त त्याच्या जबरदस्त इच्छा शक्तीमुळेच.

आजच्या न्यूझीलंड विरुद्धच्या 16 व्या ओव्हरमध्ये फिल्डिंग करताना एक खासच फिल्डिंग नेहराने केली. वेगाने जाणारा बॉल पायाने अडवत तो बॉल बाउन्स होत तो न वाकता त्याच्या हातात आला. ते बघून कोहली सकट संपूर्ण मैदानात टाळ्यांचा आवाज झाला.
मॅच मधला तो एक सर्वोत्तम क्षण होता.

भारताचा डाव आटोपल्यावर सेहवागने नेहराचा इंटरव्ह्यू घेताना त्यांच्या आठवणी जाग्या गेल्यात. बोलून झाल्यावर आशिष नेहराने विरेंद्र सेहवागला मिठी मारली. तेव्हा एक क्षण आत गलबललं. 1999 पासूनचा भारताचा तत्कालीन सुवर्णकाळ तेव्हाचं क्रिकेट यांतीळ शेवटचा दुवा आज क्रिकेट मधून अलविदा करतोय.

 आज फेअरवेल मॅच मध्ये प्रथमच भारताने न्यूझीलंडला 20-20 मॅच मध्ये हरवलं. हे बेस्ट गिफ्ट नेहराने टीमला आणि टीमने नेहराला दिलं.

आशिष नेहरा जरी कित्येक वेळा कमनशिबी राहिला तरीही मैदानात निवृत्ती घेण्याचं नशीब त्याला लाभलं. जे राहुल द्रविड, विव्हिएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, झहीर खानच्या या मोठ्या खेळाडूंच्या नशिबात नव्हतं.

#Thankkkku_NEHARAJIII

-अभिजित पानसे
-Abhijeet Panse

No comments:

Post a Comment