Friday 17 November 2017

माझे कमोड चे प्रयोग

#माझे_कमोडचे_प्रयोग*

कूठली नवी मशीन,वस्तू आणली असता किंवा बाहेर ठिकाणी उपयोग करताना "हाऊ टु युज" माहिती दिली असते. द्यायलाच हवी.नाहीतर लोकांची किती अडचण होते.पण मग #कमोड या  बेसिक गोष्टींसाठी असलेल्या मशीन किंवा वस्तू चं माहिती पत्रक का नसावं?

#हागणदारीयुक्त गावातून लहानपणी ज्यांनी अनेकदा दोस्त मित्रांसोबत ,खुले आसमान के निचे निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या हाकेला "ओ" दिलं आणि पुढे कट्टर स्वदेशी बाण्यामुळे कमोड वगरे चे इंग्रजाळलेपणा न करता
 "स्वदेशी सीट टु शीट "अंगिकारलं त्यांची अश्यावेळी किती अडचण होऊ शकते!

 बहोत बहोत सालो पहले की बात है! पहिल्यांदाच एका स्टार हॉटेलमध्ये जेवायला मित्र मैत्रिणींसोबत गेलो होतो.सगळे पदार्थ समोर आल्यावर वदनी कवळ घेता करणारच तर एकदम पोटात #मुरडा आरडाओरडा करू लागला!!
ही तर साक्षात निसर्गाची हाक!आणि आम्ही तर निसर्गावर प्रेम करणारे प्राणी!निसर्गाच्या हाकेचा अनादर कसा करणार!

निसर्गाचा अपमान केल्यास तो कोपतो आणि मग लोकांची चड्डी पिवळी आणि "जड" होते हा अनुभव आम्ही बालपणी अंगणवाडी,बालवाडी, शाळकरी जीवनात इतर मुलांच्या अनुभवावरून "याची नाकी याची डोळा"  घेतला होता.म्हणून आम्ही कसनुकसं हसून मित्र मंडळांना येतोच लवकर म्हणून सांगून तात्काळ आवेगाने स्वच्छतागृहाकडे धाव घेतली.कारण जास्त वेळ वेग धारण करणं अशक्य होतं!

 एकदाचं ते आलय दिसलं.आत शिरलो तर दहा बाय दहा ची खोलीचं जणू!आत काय काय वस्तू मांडल्या होत्या!कित्येक नळ, वायरी, भांडी कुंडी, ..काही कळेच ना!पण मी  ते सारं शौचालय वस्तु प्रदर्शनी बघण्याच्या मनस्थितीत आणि पोटस्थितीत नव्हतोच!

श्या ! माणसाने कसं बेसिक गोष्टी स्पष्ट ठेवाव्या..शौचालयात मनुष्य नेमकं काय करायला येतो ! उकिडवं बसायला दोन फुटरेस्ट्स असावेत..खाली भगदाड असावं, उजव्या हाताला पाणी असावं!संपलं!

पण नाही !आपण उगाच "बेसिक" गोष्टी कॉम्प्लिकेट करून ठेवतो! जिभेचे चोचले पुरवणं ठीक पण हे काय 'ढुं' चे चोचले पुरवणं!

 समोर एक क्रीम कलरचा, झाकण बंद थोडा कुयरीच्या आकारासारखा ओव्हल शेपचा गुळगुळीत डबा होता!इकडे पोटावर दाब वाढत होता
तो गुळगुळीत डबा त्याच क्रीम कलरच्या जाड्या पाईपने खाली पक्का रोवला होता.

मुलगा आपल्या प्रेयसीला एखादं रत्न  भेट देताना जश्या छोटया कुपीतून देतो.आणि ती हलकेच त्या कुपीचं वरचं झाकण उघडते तसं मी समोरील  मोठ्या कुपीच्या आकाराच्या डब्यावरील झाकण वरती केलं!!आणि काय आश्चर्य!आत एक मोठं भगदाड होतं!खाली पाण्याने अर्ध भरलं होतं.

वाह मला हर्षवायू झाला!मुलीने कुपी उघडून तिला त्यात हिरा मिळावा आणि प्रीय व्यक्ती प्रपोज करतोय कळून दोन्ही हात गालावर ठेऊन  "ओह माय गॉड! म्हणावं , तसा मला माझा #खजिना सापडल्याचा आनंद झाला होता.

पण श्या इतकं मोठं महागडं हॉटेल पण इथेही बेटी पाण्याची कंजुषी!ते कमोड चं भांडं पाण्याने अर्धवटच भरून ठेवलंय.

 माझी आपली समजूत होती की गावात घरी जसं बाथरूम मध्ये टाक्यातुन लोटीने पाणी घेतो तसं या छोट्या कमोडच्या टाक्यातून पाणी घायचं आणि धुवायचं...

पण उकिडवं बसून  पाय ठेवायला त्या दोन शुभ्र फुट रेस्ट, स्वदेशी सीट,त्यांचं छोटंसं भगदाड दिसत नव्हतच!

म्हटलं काहीतरी चुकतंय आपलं!!उत्तर समोरच आहे पण नेमकं कळत नाहीये!

मी पोट आवळून धरलेल्या अवस्थेत इकडे तिकडे "हाउ टू युज' काही चित्राद्वारे लिहिलय का भिरभिर पाहू लागलो!पण कुठेच काही नाही!

आणि एकदम डोक्यात प्रकाश पेटला एकदा मित्रांसोबत लपून इंग्रजी पिक्चर पाहताना त्यात एक माणूस असाच या मोठया भांड्यावर , स्टूल वर बसतात तसा बसून पेपर वाचत होता!

हां!!असं आहे तर!!आणि हळूच घाबरत चाचरत अंदाज घेत एकदाचा मी कसातरी त्यावर स्थानापन्न झालो!

आणि एकदम तो थंड गुळगुळीत स्पर्श  झाला! अंग शहारलं!

श्या आपला स्वदेशी बाणा च किती सुटसुटीत आणि स्वच्छ असतो असा काही स्पर्शज्ञान तर होत नाही त्यात!!

पण त्यावेळी ते महत्वाचं नव्हतंच!आता इतका वेळचा रोखून धरलेला वेग आवेग मोकळा करणं गरजेचं होतं.

बाजीगर मध्ये शाहरुख खान 'क्लायमॅक्स' ला म्हणतो "इतने सालो से रोखा हुआ जो बांध था..वह बांध आज तुमने तोड दिया है मदन चोप्रा !अब सैलाब आयेगा!!"
आणि माझीही अगदी तशीच अवस्था ..मी रोखून धरलेले सारे मनाचे ,दशम द्वाराचे बंध मोकळे केले..आणि सैलाब..तुफान सुरु झालं.....

स्वर्गसुख काय ते म्हणतात ते हेच! आहाहा। या शांतीला कसलीच उपमा नाही!
त्यावेळी माझ्यासाठी विश्व ,जगताची जाणीव पुर्णपणे संपली होती.फक्त सर्वांग ..मन व्यापुन टाकणारी खोल व्यापुन टाकणारी पवित्र शांती उरली होती.कोणाबद्दल राग लोभ नव्हता.षड् रिपुंपासुन मी मुक्त झालो होतो.त्या 'हलके'पणाच्या जाणीवेला उपमा नाही.

मी फक्त दोन हात गालावर ठेउन डोळे बंद करुन ती असीम शांतता अनुभवत होतो.कोणाशी बोलावं वाटत नव्हतं. कोणाहीसोबत 'गुफ्तगू' करण्याची इच्छा नव्हती.  विरक्त झालो होतो. रिक्त झालो होतो! मनुष्य येतोही रिक्त हस्ते जातोही रिक्त हस्ते. त्याचप्रमाणे येतोही रिक्त पोटाने त्यामुळे जावेही रिक्त पोटाने!  तिथे बसून मी फिलॉसॉफरही झालो होतो.

 नशिबाने ,प्रसंगावधाने  "पेस्टनकाकांप्रमाणे" माझाही "गंपती बाप्पा मोरया" होता होता थोडक्यात वाचला!
  मोठ्या संकटातुन पार पडल्याने जीव भांड्यात पडतो.तसंच काही योग्य गोष्टी योग्य वेळी योग्य त्याच कमोडच्या भांड्यात पडल्याने माझाही जीव भांड्यात पडला!!

महत्वाची अर्धी मोहीमच फत्ते झाली होती.अजून "उत्तर क्रिया " करण्याचं महत्वाची कामगिरी पूर्ण करायची होती!कारण उघडपणे इथे काहीच सापडत नव्हतं.

मग मी जरा आजूबाजूला बघू लागलो!स्थानापन्न अवस्थेतच.शेजारी लँडलाईन फोनच्या स्प्रिंग वायरी प्रमाणे एक धातूची स्प्रिंग वायर होती आणि त्याला जोडून एक सच्छिद्र बोंडूक होतं . समोर कागदाच्या गुंडाळ्या ठेवल्या होत्या.लोकांना त्यावर महत्वाच्या गोष्टी लिहिण्यासाठी ते कागद असावेत!! तितकंच वेळ जायला मदत.पण शेजारी पेन ही ठेवावा ना!पाठीमागे एक प्लास्टिक चं सतत आवाज करणारं डबडं होतं.

चुकून त्याला लागलेली एक कळ माझ्याकडून दाबल्या गेली आणि मी ज्या गुलाबी गुळगुळीत भांड्यावर डब्यावर बसलो होतो त्यातून, पावसाळ्यात टेकडीवरून  चहू बाजूने पाण्याचे झरे वाहतात तसे आत एकदम चार बाजूने माझ्या खाली जोरात आवाज करत पाण्याचे प्रवाह सुरु झालेत!वरचं डबडं आणखीनच जोराने आवाज करू लागलं!तसा मी तश्याच अवस्थेत किंचाळून उठलो!

पण काहीही जीवावर बेतणारं धोका नाही हे जाणवल्यावर मी पुन्हा आपले निस्स:रण कर्म आटोपले!

एकंदर वातावरण 'शाकाल'च्या अड्ड्यासारखे होते.कधी कोणती कळ दाबल्यावर काहीतरी वेगळंच काही उघडायाचं बाहेर यायचं.

नेमकी माझ्याकडून पुन्हा काय कुठली कळ, बटन दाबल्या गेलं कोणास ठाऊक आणि पुढे जे घडलं ते कधी विसरणार नाही!

प्रचंड वेगाने "टोकदार " पाण्याचा प्रवाह खालून आला आणि माझ्या नाजूक भागावर आघात करू लागला!मी किंचाळलोच!
एक मोठा भयंकर प्रसंग माझ्यावर गुदरला होता!

नंतर काही वर्षांनी कळलं त्याला पाण्याच्या प्रवाहाला "जेट" म्हणतात!
अरे जेट हा विमान प्रकार असतो!आणि तुम्ही लोकांनी त्या जेट ला शौचालयातील गोष्टीच नाव दिलंत!

त्या "जेट ने थेट" माझ्या नाजूक भागावर हल्ला केला!दिवसभर नाजूक भाग हुळहुळत राहिला!
लोकांना वेगळा जेटलॅग होतो आणि मला वेगळाच #जेटलॅग झाला होता!

शेवटी एकदाचा मी स्वच्छ होऊन  शाकालच्या त्या अड्डयातून सही सलामत बाहेर पडलो! म्हटलं पुन्हा असल्या भयंकर गोष्टींच्या भानगडीत पडायचं नाही! "ढु सलामत तो कमोड पचास!"

कसलं काय ते तुमचे कमोड वगैरे! नुसते "ढु चे चोचले" आमची "देशी सीट टु शिट" सर्वोत्तम!

अश्याप्रकारे प्रथम "उदरभरण नोहे जाणिजे  यज्ञकर्म "म्हणून जिभेचे चोचले पूर्ण केल्यावर लोक ढु चे चोचले करतात.
मी मात्र त्या दिवशी प्रथम "उदर निस्सारण नोहे जाणिजे ढु कर्म" करून उदरभरण करायला बाहेर पडलो!
एकदाचा!!
एकदाचा!

-अभिजीत पानसे

Tuesday 14 November 2017

'He' too



                             * 'He' Too *

नुकताच बारावीच्या प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यामुळे निनाद कॉलेजमधील ऍडमिशनच्या प्रक्रियेत गुंग होता. सहा फूट उंच, मिसरूड फुटलेला फुटबॉलपटू असल्याने शारीरिकरित्या तगडा आक्रमक होता.  रविवार असल्याने सकाळी खेळून आल्यावर त्याने बाईक बिल्डिंगच्या त्याच्या पार्किंग भागात लावली.
 समोरच्या गार्डनमध्ये सोसायटीतील मुलं फुटबॉल , प्लास्टिक बॅट ने क्रिकेट खेळत होती. त्यांच्यातील
 भांडणामुळे , रडण्यामुळे त्याचं लक्ष तिकडे गेलं आणि त्याला धक्काच बसला. सोसायटीतील चवथीतील अंबरने आऊट झाला म्हणून चिडून चक्क बॉलिंग करणाऱ्याला मुलाला "मधलं बोट" दाखवलं.

ते बघून निनादला हसू आलं, वाईट ही वाटलं, आश्चर्यही वाटलं. कुठून शिकतात ही छोटी मुलं ही भाषा आणि या 'हस्तमुद्रा'!

तेवढ्यात त्याचं लक्ष एकटाच मोठी चॉकलेट कॅडबरी खात बसलेला अनयकडे गेलं. त्याची आई लहान मुलांना चॉकलेट्स देण्याच्या विरुद्ध असलेली निनादला माहिती होतं.
त्याला आठवलं तीन दिवसांपूर्वीही अनय मोठं चॉकलेट खाताना बिल्डिंगबाहेर दिसला होता.

थंडीत घरात जाण्याऐवजी थोडं ऊन खावं म्हणून निनाद सहज अनयजवळ बाकड्यावर जाऊन बसला. निनादला बघताच अनय काहीसा दचकला. तो अनयशी गंमतीने गप्पा करू लागला. कॅडबरी कोणी दिली हेही विचारलं. तेवढ्यात निनादला मित्राचा फोन आल्याने तो फोनवर बोलत त्याच्या घरी गेला.

दुपारी जेवण झालं..झोपला..संध्याकाळी  हातात कॉलेजचे प्रोस्पेक्ट्स चाळताना दुपारी अंतर्मनात शिरलेला विचार अचानक त्या शांत क्षणाला मनाच्या पृष्ठभागावर तरंगला.
 त्याला आठवलं दुपारी अनयशी बोलताना तो अस्वस्थ तर वाटला शिवाय तो सतत त्याच्या गुप्तांगाला स्पर्श करत होता.

निनाद खाली पार्कमध्ये गेला . तिथे मुलं खेळत होती, काही मोठी माणसे चालत होती. वृद्ध लोक बाकड्यावर बसले होते .

काही छोटी मुले घसरगुंडीवर घसरत होते. मात्र अनय उकिडवे बसून हातातील छोट्या काडीने गवत उकरून मातीशी खेळत होता.
निनादही त्याच्याजवळ बसुन गंमतीने गप्पागोष्टी करू लागला.
सहज विचारल्या सारखे वाटावे अश्या पद्धतीने त्याने विचारले ,"तुला सकळी चॉकलेट कोणी दिलं होतं?"

"साहिल दादाने!" अनयने एक क्षण थांबून खाली बघतच बोटाने गवत उपटून काढत उत्तर दिले.

हा कोण? कुठे राहतो?

"त्या बिल्डिंगमध्ये!" समोरील इमारतीकडे बोट दाखवत बोलला.

तुझी त्याच्याशी कशी ओळख झाली? तो का देतो तुला इतके चॉकलेट्स नेहमी?

"अनय काही बोलला नाही.
तुझ्या आई बाबांना सांगू का तू बाहेर चॉकलेट्स खातो ?"

"नाही नाही प्लिज नको सांगू  आईला!"

"मग मला सांग नीट सगळं!"

अनय काही बोलला नाही. त्याच्या निरागस चेहऱ्यावरील ताण , गोंधळ ..सांगावं की नाही सांगावं ..कसं कोणत्या शब्दात सांगावं ..हा सारा गोंधळ जाणवत होता.

निनाद ने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर देत सगळं सांग मी कोणाला नाही सांगणार म्हणत त्याला हळूहळू बोलतं केलं.

त्यानंतर अनयने जे सांगितलं त्याची त्याला थोडी कल्पना आली होती. पण त्या गोष्टीची तीव्रता इतकी असेल याचा विचार केला नव्हता.

"साहिल दादा बाईकवर फिरवून आणतो!

त्याच्या घरीही नेतो..

पण..
 तो माझ्या सुसूला हात लावतो. .

निनाद चा चेहरा कठोर झाला होता ते ऐकताना.
"अजून काही करतो का तो?"

...तो...हो...तो त्याच्या सुसूलाही हात लावायला लावतो मला ! मला नाही आवडत तरी कधीकधी तो जबरदस्ती करतो! मला घाण वाटतं ..कारण थोड्यावेळाने माझा हात चिकट होतो..

मग तो जाताना मला आवडणारे चॉकलेट्स, आईसक्रीम देतो. .

अनयला बोलतं केल्यावर त्याचं सगळं बोलणं ऐकून साहिलचा संताप संताप होत होता.

"आणखी काही केलं नाही ना त्याने तुला?"

" त्याने माझ्या शी करण्याच्या जागेलाही टच केलं..तिथे दुखतं आता!

निनादच्या आता संतापाचा ज्वालामुखी फुटला होता.
स्वतःवर नियंत्रण ठेवत तो अनयशी बोलला,
"मी बोलतो त्या साहिलशी ! पण तू पुन्हा त्याच्याशी बोलू नकोस..काही झालं तरी त्याच्याकडे यानंतर जायचं नाही! कळलं ?"

"नाही नाही तू प्लिज मी तुला सांगितलं हे त्याला सांगू नकोस! पहिले तो प्रेमाने बोलायचा माझ्याशी पण आता कधीकधी तो मला रागावतो! कोणाला सांगू नकोस नाहीतर मारेन म्हणतो!"

"बरं त्याच्याशिवाय आणखी कोणी तुला काही चॉकलेट आईस्क्रीम देतं का..हे सगळं करायला लावतं का?"

"नाही फक्त साहिल दादाच!"

निनादने अनयला धीर देऊन घरी पाठवले.
आणि आपल्या फुटबॉल टीममधील मित्रांना फोन करून ताबडतोब बोलावलं.

रात्री नऊ वाजता, त्या इमारतीमधील फ्लॅटमध्ये  तिघे जणं नोकरीनिमित्त वर्षभरापासून राहायला आले होते त्यात घुसले. साहिलला त्यांनी लाथाबुक्क्याने तुडवला. त्याच्या मित्रांनाही त्याच्या सगळ्या काळ्या कृत्याबद्दल सांगितलं. पोलीस कम्प्लेंट करतो म्हटल्यावर साहिल गयावया करू लागला.
"भडव्या पुनः या सोसायटीमध्ये किंवा कोणत्या लहान मुलांसोबत दिसला तर कापून टाकेन! तुला नाही तुझ्या ****!

 रात्रीतून त्याला जागा सोडायला सांगितली.

 मित्रांनी निनादला विचारलं तुला कसं कळलं हे!

"मला तू  तुझ्या लहानपणी तुझ्या कोण्या नातेवाईकाने तुझं लैंगिक शोषण केलं होतं सांगितलं होतं ना! शिवाय आणखी एक दोन मित्रांनी त्यांच्याबद्दल ,त्यांच्या मित्रांचेही असेच ओळखीच्या लोकांनी, भावाच्या मित्रांनी ,  सोसायटीत मोठया मुलांसोबत खेळणाऱ्या मुलांपैकी कोणी असली छळवणूक केल्याची उदाहरणे सांगितली होती म्हणून मला संशय आला!

निनादने त्याच्या एका समजुतदार मैत्रिणीलाही बोलावून घेतलं . तिला थोडक्यात सगळी परिस्थिती समजावून सांगून ते सर्व मित्र अनयच्या घरी गेलेत.
 त्याच्या आई बाबांना समोर बसवून प्रथम आम्ही जे काही सांगणार आहोत ते शांतपणे समजून घ्या म्हणालेत.
अनयमध्ये काही बदल त्यांना जाणवला का विचारल्यावर त्याच्या आईने सांगितलं की हो आजकाल अनय सतत घाबरायचा.अस्वस्थ वाटायचा..शी ला जायला टाळाटाळ करायचा.. शी धुताना तेथील स्पर्शानेही अस्वस्थ व्हायचा..नीट बसायचा नाही तो !
 तेव्हा निनाद आणि मित्रांनी त्याच्या आईबाबांना सगळा वृत्तांत सांगितला.

ते ऐकून त्याची आई रडू लागली.
वडिलांनी चिडून पोलिसात तक्रार करायची ठरवलं.

"मुलांसोबत ही असं होऊ शकतं यावर विश्वास ठेववत नाही हो!अनय ची आई रडत बोलली.

"ताई हा खूप जणांचा गैरसमज आहे की फक्त मुलींचंच लहानपणी शोषण केलं जातं मुलांचं नाही! विकृत लोक कोणतंच लिंग पाळत नाहीत!
लहान वयात कित्येक मुलांचं त्याच्या काका, मामाने, भावाच्या मित्राने, कुल्फी बर्फगोळा विकणारे., वॉचमनने.. अगदी ट्युशनच्या शिक्षकानेही लैंगिक शोषण केल्याच्याही घटना घडल्या आहेत.

"Me too" नावाने स्त्रिया , मुली सोशिअल मीडियावर लैंगिक शोषणाचे आपापले वाईट अनुभव सांगतात. पण मुलं कधीच त्यांचे हे बालपण नासावणारे वाईट अनुभव सांगत नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांना याबद्दल कल्पना नाही!

मैत्रीण म्हणाली , "ताई यासाठीच आईने आपल्या मुलांना स्पर्शाची पारख शिकवावी. योग्य आणि अयोग्य स्पर्श ओळखणे शिकवावं. आणि आजची लहान मुलं खूप हुशार आहेत, त्यांना नीट समजावून सांगितलं की त्यांना सगळं समजतं! एक उपजत सेन्स मुलांच्यात असतोच योग्य स्पर्श ओळखण्याचा! आपण फक्त त्यांना त्यांच्या भाषेत नीट सूचना देऊन त्या सेन्सला ऍक्टिवेट करावे"

"बरेचदा परिसरातील मोठ्या मुलांसोबत लहान मुलं खेळतात. काहीवेळा हेच वयाहून मोठी असलेली बाहेरची मुलं लहान मुलांना बिघडवतात..किंवा त्यांचा असा छळ, शोषण करतात! म्हणूंन आई वडिलांनी मुलगा कोणासोबत जास्त वेळ घालवतोय..खेळतोय याकडे लक्ष  ठेवावं.."

अनयची आई ते सगळं ऐकून ओक्साबोक्शी रडू लागली. वडील चिडून पोलिसात तक्रार करण्याची तयारी करू लागलेत. अनय शाळेतील होमवर्क करण्यात गुंग होता.

-अभिजीत पानसे