Friday 8 September 2017

मेसेंजर

2007 मध्ये मी पहिल्यांदा मुंबईला मित्रासोबत सिद्धिविनायकला गेलो होतो. प्रचंड गर्दीत रांगेत उभं राहून आत गेल्यावर मला वेगळंच चित्र दिसलं. लोक गणपतीचं दर्शन घेऊन समोर जात आणखी मोठ्या एका रांगेत लागत होते.कारण आत अजून एक मोठी रांग होती. ती होती समोरच्या मोठ्या उंदीरा समोर.

प्रत्येकजण त्या उंदिराच्या कानात काहीतरी कुजबुजत होतं. त्यासाठी मोठी रांग होती. मी हा असला प्रकार पहिल्यांदाच बघत होतो. त्याची गंमत पाहत होतो. नंतर तेथील एकंदर लोकांच्या बोलण्यावरून कळलं की आपली इच्छा उंदिरांची कानात सांगितली की ती गणपतीला पोहचते . असंच काहीतरी. मी हा असला प्रकार जन्मात त्यापूर्वी बघितला नव्हता. म्हणून मला पहिले लोक गंमत म्हणून तसं करताय असं वाटत होतं.
किंवा फोटो काढण्यासाठी मजा म्हणून पोज देत असतील पण तसं काहीही नव्हतं.

  लोक आत यायचे सिद्धीविनायकाकडे बघून नमस्कार करायचे आणि ताबडतोब घाईघाईने उंदिरापुढील रांगेत लागायचे. मला पहिले ती फक्त गंमत,मजा  वाटत होती.

 नंतर त्यांच्या त्या कृतीतील त्यांचं गांभीर्य बघून तो मूर्खपणा वाटत गेला. मित्र म्हणला हसत ,"चलतो का तिकडे लायनीत! "मी 'हया' करून बाहेर निघालो.

दोनेक वर्षांनी 09 मध्ये परत एकदा सहज सिद्धिविनायकला गेलो . यावेळी न्यूज चॅनलमध्ये काम करणारी एक खूप हुशार ,इंटलेक्च्युअल , रॅशनलिस्ट, समजन्स एक मैत्रीण सोबत होती.
सिद्धिविनायकला नेहमीप्रमाणे गर्दी होती. आत गेलो नमस्कार केला पण यावेळी अजून एक वेगळं चित्र होतं.

 लोक रांगेत गर्दी करून आत यायचे. आणि गणपतीच्या मूर्तीला नमस्कार करून उंदिराच्या  रांगेत लागायचे.  पण यावेळी दोन रांगा होत्या. कारण तेथे दोन मोठाले उंदीर होते. एक आधीचा. आणि दुसरा अमिताभ आणि जया बच्चनने काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायकाला दिलेला दुसरा मोठा मूषक होता. त्यामुळे तेथे दोन रांगा लागल्या होत्या. मला त्या विचित्रपणावर, मूर्खपणावर हसू येत होतं.

वाटलं, या आधीच्या #सिनिअर_उंदीराने त्याच्या जॉबचं, वर्कलोड कमी केल्याबद्दल अमिताभला थँकू म्हटलं असेल का! एक सबऑर्डीनेट दिल्याबद्दल.
त्याचा मेसेंजरच्या कामाचा भार कमी केल्याबद्दल.

पण एक #उंदिरांच्या आकाराची धातूची निर्जीव वस्तू ठेवली म्हणुन आपल्या इच्छा तो आता गणपती पर्यंत पोहचवणार म्हणून लोक वेड्यासारखे तिथे आपल्या इच्छा सांगत उंदराच्या कानात कुबुजत होते!!
आणि हे ते सहज 'गंमत' म्हणून करत नव्हते तर गंभीरपणे कारण आत दोन पोलीस फक्त त्या रांगांना नियंत्रित करायला होते. गर्दी विनायकसमोर जास्त नव्हती पण दोन उंदिरांसमोर होती. त्यांची घाई गडबड होत होती की प्रत्येकाला उंदिरांच्या कानात बोलण्याची संधी मिळावी म्हणून. याचा अर्थ ते सहज मजा म्हणून ते रांगेत नव्हते तर गंभीरपणे ते तसा विश्वास(?) टाकून कुजबुजत होते.

मी पुन्हा जवळ जाऊन तो प्रकार गंमतीने बघू लागलो तेव्हा  उंदिराच्या कानात बोलण्याचा नंबर लागलेल्या एका बाईने मूषकच्या एका कानावर हात ठेवत ती बोलत असताना मागची बाई तिला मधेच टोकत बोलली, " अगं त्याचा दुसऱ्या कानावर हात ठेवून त्याचा पलीकडचा कान बंद कर नाहीतर या कानातून सांगितलेली इच्छा त्या दुसऱ्या कानातून बाहेर चालली जाईल! "
मग त्या बाईने मूषक मेसेंजरचा पलिकडचा कान हाताने बंद केला आणि अलिकडच्या कानात कुजबुत राहिली काहीवेळ.
मी हा प्रकार बघून कपाळावर हात मारून घेतला.

आम्ही त्यावेळी त्या मनोवृत्तीची टवाळी केली.
त्यावेळी एक पैलू लक्षात आला की लोक देवाची मूर्ती , मंदिरे म्हणजे इछपूर्तीची एटीएम मशीन समजतात का..फक्त तेव्हढ्यासाठीच जातात का!

आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी देव नावाची संकल्पना असो, विश्वास। असो व ऊर्जा असो , तिच्यापर्यंत आपली भावना, इच्छा पोहचावी म्हणून मधल्या 'मेसेंजर' ची गरज लागतेच कशाला!

इतकंच आहे तर प्रत्यक्ष गणपतीची मूर्ती समोर असताना आपल्याला त्या उंदीराची या गॉडस मेसेंजर ची गरज लागतेच कशाला!
याच मनोवृत्तीचा उपयोग मग "गॉडस मेसेंजर" स्वतःला म्हणवून घेत गुर्मीत सारखे, आसाराम , नाईक सारखे मेसेंजर लोक लाखो लोकांना फसवतात.

आणि एक गंमत मला वाटली मी मैत्रिणीला विचारलं की हा अमिताभ बचन ने दिलेला काही दिवसांपूर्वीच दिलेल्या ज्युनिअर उंदिराचं मेसेज कनवेयिंग चं ट्रेनिंग आटोपलं ही का इतक्या लवकर! त्याला सिनियर उंदीरने ट्रेनिंग दिलं असेल का!?

-Abhijeet Panse