Sunday 31 December 2017

आणि त्या क्षणी 2018 चा सूर्योदय झाला होता.





आणि 2018 चा सुर्योदय झाला होता..

आई-बाबांच्या विरोधाला न जुमानता मी काल थर्टीफर्स्टच्या पार्टीला मित्रांसोबत गेलो.
पण या ओल्ड जनरेशनला आमचं सेलिब्रेशन कळतच कुठे?

बाबांच्या हुकुमाप्रमाणे नाखुषीनेच रात्री लवकर घरी आलो व झोपलो.

पहाटेच्या सुमारास मला एक स्वप्न पडले...

मी घनघोर रात्री काळोखात....

नाही! कदाचीत तोही पहाटेचा काळोख असावा!!
एका अरण्यात मी एकटाच फिरत होतो.
मनात भितीचा लवलेशही नव्हता.
चंद्राच्या दुधाळ प्रकाशात मी आपल्याच मस्तीत धुंदीत रानवाटा पालथ्या घालत होतो. मनसोक्त एकटाच  हिंडत होतो.

आणि...तेवढ्यात

अचानक मागून एक खर्जातला पुरूषी आवाज आला!

''व्हेअर आर यु रोमिंग यंग मँन?''

मी दचकुन मागे वळलो.

थोड्या अंतरावरून एक  पांढुरकी आकृती माझ्या रोखानेच पुढे येत होती.

माझ्या पोटात भितीचा गोळा उठला.

ती आकृती माझ्या दृष्ट्रीपथात आली.

एक वय झालेला वृद्ध,जरीकाठी धोतर, शुभ्र कुर्ता,चेहऱ्यावर म्हातारपणीच्या सुरकुत्या पण, तरीही तेजस्वी मुखमंडल होतं.पिकलेले केस आयुष्यातील सर्व अनुभवांचे साक्षी होते.डोळ्यांमध्ये आयुष्याची आपली संपुर्ण कारकीर्द यशस्वी झाल्याचे अपूर्व समाधान झळकत होते.

मी स्वत:ला काही क्षण हरवुन बसलो.

''काय यंग मँन!!''
कुठे भटकतोय इकडे? नवीन वर्षाचे स्वागत करायचे सोडुन तू एकटा इकडे काय करतोय?''
जवळ येत त्यांनी प्रेमळपणे विचारले.

त्यांच्या प्रश्नाने मी एकदम भानावर आलो. मनातील मघाची भिती आता नाहिशी झाली होती. आणि नेहमीप्रमाणे मला पुन्हा तारूण्याच्या आणि इतर अभिमानाने घेरले. त्यामुळे मनात त्या वृद्धाबद्दल नाराजीचा भाव आला.
मनात म्हटलं मघ्येच हा म्हातारा कशाला भेटला? पण आश्चर्य वाटले. हा वृद्ध माणुस आमच्या पिढीसारखाच बोलतोय!

चल चालुया सोबत थोडा वेळ!'' तो वृद्ध म्हणाला आणि मी नाराजीनेच त्यांच्यासोबत निघालोसुद्धा.

मनात म्हटलं'' शिट यार हा म्हातारा मध्येच कशाला भेटला! फार बोअर करणार!आमची पिढी तुमची पिढी, न्यु यिअर की गुढीपाडवा..यावर लेक्चर देणार!

मी मुद्दामच खोटं हसत खोचकपणे विचारलं, "काय ओल्डी! इतक्या रात्री! जंगलात! भिती वगैरे नाही वाटत?''

मघाच्याच प्रसन्न मुद्रेने ते बोलले,'' अरे मित्रा रात्रीचंच जंगल बघण्यात मजा असते ना!
पहाटेच्या या गडद काळोखानंतरच सूर्योदय होतो ना! आणि आम्हा म्हाताऱ्यांना कसली भिती!
हे बोलतानाही त्यांच्या मुखावरील पुर्णत्वास जाणारं शांत स्मित कायम होतं.

मी उपहासाने पुन्हा म्हटलं,''हे ओल्डी मला वाटतं तुमच्या घरची सगळी मंडळी, नातवंडे सगळेजणं न्यु इअर सेलिब्रेशनमध्ये बिजी असतील! तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही इकडे रागारागाने किंवा दु:खाने फिरायला आलात की काय?''

ते मोकळे हसले, ''अरे बेटा मी निरपेक्ष आहे. मी कधीच कुणाकडुनही दुखावलो जात नाही!
आणि तुला कोणी सांगितलं मला हे न्यु यिअरचे सेलिब्रेशन आवडत नाही! हे आय एम अे मार्डन ग्रँडपा बेटा! अँड आय डोन्ट बिलीव्ह इन जनरेशन गॅप !'' आणि दिलखुलास हसलेत.

त्यांचं ते मोकळं स्वच्छ हास्य निष्पक्ष बोलणं ऐकुन माझी नाराजी कुठल्या कुठे पळुन गेली आणि मला माझ्याच वागणुकीची लाज वाटु लागली.

जंगलात कुठेही न थांबता आम्ही  भटकत होतो. त्या गडद शांततेत खाली पडलेल्या  झाडांच्या असंख्य वाळलेल्या पानांतुन चालताना होणारा आवाज कानाला सुखावत होता.

आमच्या गप्पा अगदी मस्त रंगल्या होत्या.

मला हे आजोबा अगदीतरूण विचारांचे वाटले. ते अगदी मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते. शब्दात अवजडता नव्हती. आम्ही अनेक विषयांवर गप्पा केल्या.
अगदी  017 मधील भारतीय क्रिकेट टीमचं यश, येणारा दक्षिण आफ्रिका दौरा ते पद्मावती चित्रपटाच्या वादापर्यंत,  पर्यंत..शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या तर भारत पाकिस्तान संबंध..उत्तर कोरिया ते अमेरीका..

पण त्यांच्या प्रत्येक उत्तरात,बोलण्यात मला तटस्थपणा, त्रयस्थपणा जाणवत होता.कुठलाही विचार मत ते थोपवत नव्हते.जणुकाही फक्त द्रष्ट्याच्या भुमिकेत होते.

शेवटी ते म्हणाले,''बेटा हा तर काळाचा महिमा आहे! वी आर बाउंड टु चेंज विथ द टाईम फाॅर बेटर!''

त्यांना नवीन वर्षाच्या त्यांच्या काही संकल्पांबद्दल विचारले असता म्हणाले,'' मी कधीच कोणताही संकल्प करत नसतो.फक्त त्या त्या क्षणात पूर्णपणे जगतो..राहतो.!
आणि कुणास ठाउक कदाचित पुढच्या वर्षी मी राहणार देखिल नाही!''

त्यांच्या या शेवटच्या वाक्याने माहित नाही का मला एकदम  गलबलुन आलं...असं कुठलं नातं आमच्यात निर्माण होत होतं!!

जंगलातुन फिरता फिरता आम्ही आता एका माळरानावर आलो.

''मग कसं गेलं वर्ष 2017?'' आजोबांनी विचारलं.

''खुप वाईट गेलं हो हे वर्ष! सगळीकडे अपयशी ठरलो!तसंही मला ज्योतिषांनी सांगितलच होतं की हे 2017 वर्ष माझ्यासाठी वाईटच जाणार!

त्या आजोबांनी तडक उत्तर दिलं,' "कुठलंही वर्ष कधीच कोणासाठीही वाईट नसतं!काळ काय कोण्या ज्योतिष्याच्या अंकांच्या आज्ञेत आहे काय?
काळावर कोणाचंही आधिपत्य नसतं! तो स्वत: त्याचा अनभिषिक्त सम्राट असतो! ज्योतिषी,अंकशास्त्री भलेही आपल्या अंकाची वजाबाकी-बेरीज,आराखडे काढुन वर्षफल सांगत असेल पण, 'कर्म तर तुमच्या हातात असतं ना!ते तुम्ही करता योग्य केलं का? करता का? ते योग्य केलं तर प्रत्येक वर्ष चांगलच जाणार! त्यामुळे वर्षाला चांगलं वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे?
ते तर माझ्यासारखच निरपेक्ष असतं!''
शेवटलं वाक्य ते जरा मिश्कीलतेने हसुन म्हणाले.

पुन्हा पुढे म्हणाले ''न्यु ईअरचं सेलिब्रेशन आटोपल्यावर तुम्ही थोडं आत्मचिंतन करा! मी यावर्षी कोणत्या चुका केल्यात आणि निर्णय घ्या की, या पुन्हा होणार नाहीत!स्टाॅप ब्लेमिंग अदर्स अँन्ड बी रेडी टु टेक रिस्पाॅन्सिबिलिटीज आॅफ युअर ओन अॅक्शन्स!''

आम्हा चालतच होतो. ते आजोबा कुठेही न थांबता चालतच होते. समोर हिमाच्छदित पर्वत शिखरं चंद्राच्या प्रकाशात अस्पष्ट चमकत होती. नक्कीच  हिमालय असावा. खुप सुंदर दृश्य होतं.

 ते पुढे बोलु लागले, "मला तुमच्या पिढीवर पूर्ण विश्वास आहे! पण तुम्ही म्हणता मागचे वर्ष किती सहज निघुन गेले कळलेच नाही!
अरे कसं कळणार?
तुम्ही इतके सहज दिवस वाया घालवता!दिवसा दिवसांनीच वर्ष बनतं. दर वर्षी केलेले संकल्प सहज विसरता! पण काळ कधी थांबतो का! तुम्हाला कळतही नाही!मुठीतुन वाळु जशी अलगद निसटते,  तसे दिवस जातात आणि शेवटी उरतात त्या कडु गोड आठवणी!

पण आम्हाला गेल्या वर्षाशी काही देणं घेणं नसतं उत्सुकता असते फक्त पुढील वर्षाच्या स्वागताची!
शेवटी मावळत्या सूर्याला कोण नमस्कार करतं?"

जवळुन एक अरूंद नदी खळखळाट करत वाहत होती. माझ्या डोक्यातही आता विचारांचा जबरदस्त प्रवाह वाहत होता.ते आजोबा नदीकडे बोट दाखवत म्हणाले, "आपणही या नदीसारखं वाहतं असावं! कारण जिथे पाणी साचतं तेथे शेवाळ साचतं!''

त्यांच्या प्रत्येक वाक्याने माझ्या मनात अनेक तरंग उमटत होते. प्रथमच मी एका योग्य दिशेने विचार करत होतो.

चंद्र पश्चिमेकडे कलत होता.एका छोट्या लाकडी पुलावरुन आम्ही नदी ओलांडुन पुढे गेलो होतो.कानावर खळखळाट अजुनही येत होता.बर्फाच्छदीत डोंगरंही आता  जवळ आली होती.

''मी त्या आजोबांना माझ्या दु:खाचं कारण सांगितलं. एका अत्यंत जवळच्या नातेवाईकाचा आणि काही जवळच्या नात्यांचा मृत्यु झालेल्याचं सांगितलं.

तेव्हा त्यांनी खाली गळुन पडलेल्या झाडांच्या पानांवरुन सृष्टीचा ''उत्पत्ती स्थिती आणि लय'' हा सिद्धांत समजाउन सांगितला. प्रत्येक  गोष्ट ही काळाच्या उदरात गडप होणारच! 'क्षणभंगुरत्व' एन्जाॅय करायला सांगितलं.वर्तमान क्षण हेच खरा जीवन असत सांगितलं.

पहाट आता संपत आली होती.तेजस्वी शुक्रतारा पश्चिम क्षितीजाकडे कलला होता.

बऱ्याच वेळापासुन आम्ही एक शब्दही न बोलता चालत होतो. नदीचा खळखळाटहीआता ऐकु येत नव्हता. मी पुर्ण अंतर्मुख झालो होतो. डोक्यातील विचारांचे थैमान आता शांत होत होते.
त्या आजोबांच्या सोबतच्या प्रवासाच्या सुरवातीपासुन तर आतापर्यंत माझ्यात आमुलाग्र बदल होत होता.तारूण्याचा अवास्तवी अभिमान आणि इतर काही न्यूनगंड, पूर्वग्रह केव्हाच गळुन पडले होते. मला हे सगळं नवीन भासत होतं. त्या आजोबांबद्दल मला आता विलक्षण प्रेम वाटत होते. असं वाटत होतं हा प्रवास कधी संपुच नये.

समोर पुर्वेकडे एक विशाल दरी पसरली होती.
ते आजोबा अचानक त्या दिशेने चालु लागले.
माझी मुद्रा प्रश्नार्थक झाली.ते अगदी कड्याच्या टोकाजवळ उभे राहुन माझ्याकडे वळले व म्हणाले,
''बेटा आपला प्रवास येथपर्यंतच होता! तु आता परत जा!''

मला त्यांच्या विरहाची कल्पनाही सोसवत नव्हती आणि माझ्या भावनांचा बांध फुटला. अश्रुंचा प्रवाह पापण्यांचा अडसर झुगारत गालांवर ओघळला.

आणि मी माझ्या मनातील 'तो' प्रश्न त्यांना विचारला.

''आजोबा तुम्ही कोण आहात?''

त्यांनी मंद स्मित केलं व बोलले, ''बेटा, तु अजुन मला ओळखलं नाहीस?
अरे मी आहे वर्ष 2017!
 आणि मला तर गेलच पाहिजे!
काही क्षणात सुर्योदय होणार आहे! नवीन वर्ष जन्माला येणार आहे!

हे सगळं अटळ असतानाही मी त्यांना ''न जाण्याबद्दल'' विनवु लागलो तेव्हा ते म्हणाले, "अरे मला विसरा..मी जातो आहे..पण मी तेव्हाही होतो आणि नंतरही राहील..! फक्त माझे  रूप आणि नाव बदलत राहतील..कारण मी तर अनादी..अनंत आहे..!
आणि बेटा, तुमच्या नवीन वर्षाच्या जल्लोषात मला आता जागा कुठे आहे? मी गेल्यावर माझी साधी आठवणही राहणार नाही.
म्हटलं ना सगळा काळाचा महिमा!

पण बेटा मला विसरा पण मी काय शिकवले ते विसरू नका..!

जा तु आता..तुम्हा सगळ्यांच्या सर्व कटु आठवणी मी घेउन जातोय!''

माझ्या डोळ्यातुन सतत अश्रु वाहत होते. मी त्यांना शेवटची एक विनंती केली त्यांना नमस्कार करू देण्याची!

त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवलं. त्यांनी माझ्या डोक्यावर वात्सल्याचा हात ठेवला.
मला आशिर्वाद मिळाला होता...प्रत्यक्ष काळाचा..!

क्षणभर सारं स्तब्ध वाटलं..

मी डोळे उघडले...
समोर कोणीच नव्हतं.
फक्त उरली होती जाणीव त्यांच्या स्पर्शाची!

मी पुन्हा गहिवरलो.
मला एकदम त्यांचे शब्द आठवले.
''आली जरी कष्ट दशा अपार
न टाकिसी धैर्य तथापि थोर
केला जरी पोत बळेच खाली
ज्वाळा तरी त्या वरती उफाळे''

 समोर दरीच्या मागे पर्वतापलिकडे केशरी लाल सूर्यबिंब उगवत होते...

माझ्या अश्रुंनी भरलेल्या डोळ्यातुन सोनेरी किरणे चमकत होती.

2018 चा सुर्योदय झाला होता....



-अभिजित दिलीप पानसे

(माझा मूळ लेख 2008 जानेवारी ,लोकसत्ता)
*व्हेंटिलेटर*

बारा वर्षांपूर्वी कोमावस्थेत गेलेल्या मराठी चित्रपट सृष्टीने पुन्हा एकदा " 'श्वास' घेतला आणि जवळपास मृतावस्थेतुनच मराठी चित्रपटात चैतन्य आलं. जोवर 'नागराज मंजुळे', 'उमेश कुलकर्णी', 'राजेश मापुस्कर' सारखे दिग्दर्शक आहेत.तोवर पुन्हा मराठी चित्रपट सृष्टीला #व्हेंटिलेटर लागण्याची काळजी नाही.मराठी चित्रपट #सैराट करत राहतील!

व्हेंटिलेटर अप्रतिम चित्रपट!!! चित्रपटाचा शेवट ज्याप्रकारे केला तो अगदी क्लास दिग्दर्शकच करू शकतो!




थर्टी फस्ट पार्टी आणि उपवासाचा गोंधळ! सो मेसी!

आज
चहा टपरीवर कानावर पडलं एक जण म्हणत होता की उद्या त्याचा सोमवारचा उपास असल्याने आज रविवारी 31 डिसेंबर च्या पार्टीला रात्री बारा पर्यंतच दारू पिणार तो!

त्यामुळे काही वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवला. तेव्हा 31dec #गुरुवारी होता.
माझ्या एका मित्राने त्याला उपास असल्याने रात्री येताना घरून साबुदाण्याची खिचडी आणली होती. आणि सर्व जण चिकन हादडत असताना तो दुसऱ्या खोलीत जाउन खिचडी खात होता !

पण जसे रात्रीचे बारा वाजले तसा ''हा संपला गुरूवारचा उपास! ''हर्षोन्मादाने आरोळी ठोकत सव्वा बाराला त्याने कोंबडीच्या मांडीचे लचके तोडायला सुरवात केली!!

कारण याआधीच तो दुसऱ्या खोलीतुन
 ''माझ्यासाठी चिकन ठेवा बे! संपवू नका!!
'' हे साबुदाण्याची खिचडी खाताना सतत ओरडत होता!

यावरून तेव्हा हसायलाही येत होतं पण हा मुर्खपणा आहे हेही कळत होतं.

कारण कशाला इतका घोळ करायचा!
आता उपासाचा उपचार आहे हिंदु शास्त्रानुसार !
थर्टी फस्ट आहे हा इंग्रजी वर्षानुसार!
इंग्रजी दिवस सुरू होतो रात्री बारा वाजता! तर हिंदू शास्त्रानुसार नवा दिवस ,रात्री बारा वाजता नाही तर   दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयाला सुरू होतो !
मग तेव्हाच उपवास संपतो असा अर्थ होतो!

आता लोकांचे उपास काही रेल्वेचं वेळापत्रक नाही!रात्री बाराला संपण्यासाठी!
दिवस बदलण्यासाठी!!

शेवटी अस्सल आणि अट्टल खाण्याऱ्यांनी घड्याळाच्या काट्यांची तमा बाळगायचीच
कशाला मग!!

"खाण्याऱ्याने खात जावे..पिण्याऱ्याने पीत जावे...खाता पिता..बाटलीच्या 'बुडाला उर्ध्व' करावे!"

"BOTTOM UP"!

-अभिजित पानसे🤓

Saturday 30 December 2017

लगे रहो आनंद भाई


एप्रिल लोकप्रभा 2017

खोल समुद्रातील हिमनगाच्या वरील दृश्य छोट्या भागावरून त्याची खोली रुंदी , त्याचा आवाका ठरवू नये. नाहीतर त्याचा टायटॅनिक होतो. हिमनगाचा वरील टोक , भाग जितका दिसतो त्याहून कित्येक पटीने तो खाली मुळात प्रचंड मोठा असतो. अगदी हेच उदाहरण क्रिकेटर्स ,चित्रपट कलाकार यांच्यासंबंधीही दिसून येतं. विद्या बालन सुरवातीला टीव्ही सिरियल्स, म्युजीक अल्बम्स मध्ये काम करायची. पण तिचं कौशल्य त्याहून प्रचंड होतं हे तिने दाखवून दिलं.
तसंच आनंद तिवारी हे नाव लोकांमध्ये तितकं परिचित नाही. पण तो ही जणू एक हिमखंडच आहे. त्याला आजवर चित्रपटांमध्ये
छोट्या भूमिका ,जाहिराती करताना बघितलय. पण त्याचं टॅलेंट , पोटेन्शिअल तितकंच मर्यादित नाही हे आता कळतंय.

तो एक उच्च प्रतीचा आजच्या काळातील भाषेचा , बदलती मानसिकता , परिस्थिती , टेक्नॉलॉजीचा प्रचंड वाढलेला वापर ,त्याचा मनोव्यापारांवर, नात्यांवर , नात्यातील खोली , संवादावर होणाऱ्या परिणामांची जाणीव असलेला लेखक , दिग्दर्शक आहे. अभिनेता म्हणून तो उत्स्फूर्त आहेच.

वेब सीरिज च्या जगात "आनंद तिवारी" हे एक खूप सन्माननीय नाव आहे. आनंद तिवारीने वाय फिल्म्स ची लोकप्रिय वेब सीरीज " बँग बाजा बारात" दिग्दर्शित  केली आहे. ही सीरिज लोकप्रिय झाली ते त्यातील बदललेल्या नात्याचे परिमाण ,संवाद ,उडालेला गोंधळ याचे अचूक चित्रण केल्यामुळे . याचे क्रेडिट सुमित व्यास आणि आनंद तिवारीला जातं. या दोघांनी मिळून ती
सीरिज लिहिली आहे. पण तिचे दिग्दर्शन मात्र आनंद तिवारीने केलंय.

 "ऑफिशियल चुक्यागिरी" ही सुद्धा अशीच एक लोकप्रिय वेब सीरिज .या सीरिज चा निर्मातासुद्धा आनंद तिवारी आहे.
शिवाय त्याने या नेट सीरिज मध्ये अभिनयसुद्धा केला आहे. गणेश हे कॉर्परेट जगतातील हायपर, खडूस अधिकाऱ्याचे मराठी पात्र  खूप चांगले वठवले आहे.

आनंद तिवारी हा मूळचा रंगभूमीवरचा कलाकार आहे.
 रंगभूमीचा कलाकार हा अस्सल टेस्ट प्लेयर सारखा असतो. उच्च टेस्ट प्लेयर हा परिपूर्ण असतो. तो क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात यशस्वी होऊ शकतो.कारण त्याचे बेसिक्स पक्के असतात. त्याच प्रकारे रंगभूमीचा कलाकाराला अभिनय,  दिग्दर्शन ,लेखनादी सर्व पैलूंचे आघाडींचे बऱ्यापैकी ज्ञान असते. तो अभिनयाच्या सर्व प्रकारात छाप सोडू शकतो.आनंद तिवारी हा तर मुरलेला स्टेज कलाकार! त्याला "लॅम्प पोस्ट "या विख्यात नाटकासाठी अवॉर्ड ही मिळालेला आहे. तसेच "वन ऑन वन "या प्रसिद्ध नाटकासाठीही तो ओळखला जातो.

गो गोवा गॉन चित्रपटातील त्याचं सॉफ्टवेअर इंजिनीअरचं साधंनिरागस पात्र अगदी अप्रतिमरित्या त्याने रंगवलं आहे. उत्स्फूर्त शाब्दिक विनोदामुळे ते एक मनाला भावणारं पात्र त्याने साकारलं आहे.
उडान ,काईट्स या चित्रपटांमध्येही त्याच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

गो गोवा नंतर मला सगळ्यात जास्त तो आव
डला दीबाकर बॅनर्जीच्या डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटातील त्याची अजित बॅनर्जी च्या भूमिकेत!! तत्कालीन बंगाली माणसाची भूमिका त्याने सुशांतसिंग राजपूत सोबत अप्रतिमरित्या साकारली आहे.

आनंद तिवारीचा जन्म माटुंगा ला डॉक्टरांची पार्श्वभूमी असलेल्या सर्व साधारण घरात झाला. अभिनयाची आवड असल्याने तो शाळा कॉलेज मध्ये नाटकात काम करू लागला. गणपती , देवी नवरात्रातातील नाटकांमध्ये तो लहानपणी काम करायचा.शिवाजी मंदिर ही त्याची कर्मभूमी आणि प्रायोगिक भूमी होती.
तो अभिनयातच नाही तर दिग्दर्शनामध्येही स्वतःला चाचपत होता. 2012 च्या  तरल भावनेला स्पर्श करणारा , भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या चित्रपटाचे नाव त्यात नक्की असेल असा अत्यंत सुंदर कलाकृती असलेला 'बर्फी' या चित्रपटाचा तो अनुराग बासू चा सहाय्यक दिग्दर्शक होता.

पुढे त्याने सई परांजपे फिल्म्स सोबत ही दिग्दर्शनचे काम केलेत. आणि सर्व बाजुंनी , पैलूंनी तो परिपूर्ण होत गेला.

आज तो वेब सीरिज या उभारत्या
आंतरजालीय विश्वात स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय.
"पर्मनंट रूममेट्स " या अत्यंत लोकप्रिय वेब सीरिज मध्ये सुमित व्यासने साकारलेल्या मिकेश चौधरीच्या पात्राच्या 'तिवारी ' नावाच्या मित्राचे  नाव तोंडी असतं. जो मुळात संपूर्ण सिरीजमध्ये दिसत नाही.तो तिवारी म्हणजे जणू हा आनंद तिवारीच असावा!! 
सुमित व्यास आणि आनंद तिवारी हे दोघेही अत्यंत चांगले मित्र आहेत. दोघेही सोबत तसेच एकमेकांच्या कलाकृतीत लिखाण, दिग्दर्शन , अभिनय ही करतात.  आनंद च्या "बँग बाजा बारात सीरिज " मध्ये  सुमित व्यास ने डीजे चा न ओळखू येणारी अशी अगदी छोटी भूमिका केली आहे. तसेच आनंद तिवारीच्याच न ओळखू ओळखू येणारी अशी अगदी छोटी भूमिका केली आहे. तसेच आनंद तिवारीच्याच ऑफिशियल चुक्यागिरी या नेट सीरिजमध्ये कॉर्परेट क्षेत्रातील फक्त आवाज ऐकू येणारा ,ड्रोन च्या माध्यमाद्वारे संवाद साधणाऱ्या बॉस ची भूमिका केली आहे.

सुमित व्यासने काम केलेल्या 'नेबर्स' या शॉर्ट फिल्म ची निर्मिती , दिग्दर्शन आनंद तिवारीने केलंय . शिवाय " हेअर कट" या वेगळ्या आणि चांगल्या शॉर्ट फिल्मचेही दिग्दर्शन त्याचेच आहे.

"सेक्स चॅट विथ पप्पू न पापा " वेगळ्या वेब सीरिजमध्येही आनंद तिवारीने काम केलंय.

एक निरागस चेहऱ्याचा, गोड हास्य असलेला, समंजस व्यक्ती असलेला हा अभिनेता , दिग्दर्शक ,लेखक वेब सीरिज क्षेत्रामध्ये चांगल्या कामाची भर घालतोय!!!

सो लगे रहो आनंद भाई!!

डेली बेली व्हर्जन 2

डेल्ही बेली नेट व्हर्जन 2

इन्ट्रो- उपदेशपर, संदेशपर नसलेली अस्सल आणि अट्टल दिल्लीचं महाविद्यालयीन, विद्यापीठातील वातावरण दर्शवणारी, डेल्ही बेली चित्रपटाशी साम्य असलेली ही वेब सीरिज आहे.

 महाविद्यालयीन मित्रांची मैत्री महाविद्यालायतील आयुष्य, विद्यापीठाचं वातावरण, तेथील विद्यार्थी निवडणुका... विद्यापीठातील राजकारण, वसतिगृहातील घडणाऱ्या मजेदारपासून विध्वंसक गोष्टी... राजकीय प्रकरणं... प्रेम  प्रकरणं... कॉलेजातील नेतेगिरी... हे सर्व काही चित्रपटांमधून बघितलंय.

या मूळ विषयात दिल्ली आणि प्रतिकात्मक दिल्ली विद्यापीठ असेल तर मग ती कलाकृती एकूणच मनोरंजक, रसदार, रंगतदार आणि कसदार होते. दिल्लीमध्ये  कॉलेज, विद्यापीठ आणि तेथील विद्यार्थी संघटना, मोर्चे, संप नेत्यांचा प्रभाव हा इतर शहरांतील विद्यार्थी राजकारणापेक्षा जास्त आणि प्रभावी असतो.

या विषयाच्या आणि दिल्लीच्या एकदंर पार्श्वभूमीवर तीन मित्रांच्या महाविद्यालयीन आयुष्यावर आणि ते सुरु करत असलेल्या एका पार्ट-टाइम व्यवसायावर हलकी फुलकी  एक कथा रचून लोकप्रिय सीरिजची निर्मिती 'स्कुपहूप' या युट्यूब चॅनलने केली आहे. ती म्हणजे 'बेक्ड'!

रात्री अपरात्री भूक लागणे ही गोष्ट घरापासून दूर परगावी राहणाऱ्या विद्यार्थी, तरुण मंडळींसाठी किती मोठा  यक्षप्रश्न असतो हे त्यांनाच माहिती! जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे. अश्यावेळी कोणतीही उपाहारगृहे, होम डिलिवरी काहीही उपलब्ध नसतं.

रात्री बेरात्रीच्या या भुक्कडांसाठी, भुकेचं क्रेविंग शांत करण्यासाठी तीन मित्र एक बिजनेस सुरु करतात. फक्त रात्रीच अन्नाची होम डिलिव्हरी!

मोहम्मद हारिस मध्यमवर्गीय घरातील साधा सभ्य भाबडा संस्कारी मुलगा हा कानपुरहुन दिल्लीला शिकायला येतो. हॉस्टेलला जागा न मिळाल्याने पेईंग गेस्ट्स् म्हणून आधीपासून दोन विद्यार्थी रहात असलेल्या खोलीत राहायला येतो.

ते दोन म्हणजे ऑनी आणि बॉडी हे अगदी मुरलेले दिल्लीकर झालेले असतात. तेव्हा सुरवातीला हॅरीसची थोडी खिचाई केल्यावर मात्र  एका रात्री उपाशी पोटी  "दिल्ली के ठग'वर विश्वास टाकल्यामुळे अकस्मात एका अडचणीत सापडल्यावर तिघांमध्ये मैत्री होते! त्याच रात्री त्यांना कल्पना सुचते ती रात्रीची खाण्याची होम डिलिव्हरी करण्याचं ‘स्टार्ट अप' सुरु करण्याची! हॅरिस हा उत्तम कूक असतो!

या पार्ट-टाइम व्यवसायाच्या साऱ्या धावपळीच्या पार्श्वभूमीवर कॉलेजमधील विविध विद्यार्थी संघटनेचं राजकारण... हॅरिसला आवडत असलेली लारा नावाची नेतेगिरी करणारी, बोल्ड बिनधास्त असलेली मुलगी, शिवाय दुसऱ्या मुलीशी त्यांचं सुरु असलेलं एक प्रेमाचं नातं... रूममेट्स ऑनीचं स्वतःचं एक सिक्रेट, बॉडीची दिल्लीत रहायची कसरत सुरु असते.

बेक्ड ही वेब सीरिज "डेल्ही बेली" या तुफान लोकप्रिय आणि थोडा वादग्रस्त झालेल्या चित्रपटापासून प्रेरित आहे हे स्पष्ट जाणवतं.

तीन मित्रांचा ग्रुप हा नेहमीच चांगला वाटतो. थ्री एडियट्स पासून चित्रपटांमध्ये तीन मित्रांचा ट्रेंड सूरु झालाय. यातही हे तीन मित्र सीरिजला वेगळा टच देतात.

हॅरिस हा एक समजूतदार, चांगला, सुसंस्कारी विद्यार्थी असतो त्याची भूमिका प्रणय मनचंदा या नवोदित अभिनेत्याने अप्रतिम रंगवली आहे. त्याच्या शिवाय ही भूमिका कल्पना करणेही अशक्य वाटते इतका तो, त्याचा निरागस चेहरा, हावभाव यांचा ताळमेळ जमलाय.

ऑनीची भूमिकाही शंतनू आनम या नवोदित अभिनेत्याने केली आहे. जाडा, दिल्लीत मुरलेला, ग्रुपचा मेंदू, काहीसा लीडर असलेली त्याची भूमिका अगदी मस्त निभावली आहे.

बॉडीची भूमिका मानिक पपनेजा याने केली आहे. कोणत्याही प्रकारे तो नवोदित अननुभवी अभिनेता वाटत नाही. इतके तिघांनीही आपापल्या भूमिका सुरेख उभ्या केल्या आहेत.

क्रिती विज ही लारा ब्रारा  बोल्ड आणि बिनधास्त "दिल्ली की लडकी" वाटलीये.

सिजन पहिला हिट झाल्यावर दुसराही सिजन आला आणि लोकप्रिय झाला! यात दिल्लीचे वातावरण, सामाजिक राजकीय स्थिती, दिल्लीतील फसवेगिरी, ठगगिरी यांचंही प्रतिबिंब दिसतं. त्यामुळे सीरिज रंजक, रंगतदार झालेली आहे.

दिल्लीतील तरुणांमध्ये असलेलं ड्रग्सची क्रेजही दिसून  येतं. एकूण दहा नेटीसोड्स असलेली ही सीरिज आहे. सिनेमटोग्राफी, संवाद, दिग्दर्शन, अभिनय सर्व जमलंय.

स्कुपहूपची वेब सीरिज पूर्णतः तरुणांची आजची मानसिकता, भाषा, विचारपद्धती लक्षात ठेउनच तयार केलेली आहे. पण कुठे कुठे त्याचा अतिशोयक्तपणा झालेलाही वाटतो.

एक चांगली लोकप्रिय, उगाच कुठले उपदेश व काही साध्य करण्यासाठीचा झगडा नसलेली ही मोकळी ढाकळी नेट सीरिज आहे.

सो एन्जॉय बेक्ड सीरिज विथ बेक्ड टोस्ट अँड टी! अँड चिलॅक्स!!

छोरा गंगा किनारे वाला

"छोरा गंगा किनारे वाला"

कॉलेजमध्ये माझ्या वर्गात सोलापूरचा नितीन नावाचा एक मुलगा होता. अभिनयाची खुप आवड. आणि त्याहूनही नजरेत स्पष्ट भरणारा त्याचा उत्साह. नाटक, स्किट्स म्हटले की नेहमीच सगळयांच्या समोर, आणि नाटक, अभिनय याच्याशी गंध नसलेल्यांनाही सोबत घेऊन स्वतः नाटक स्किट्स बसवणारा.उत्तम नेतृत्व गुण, लिखाण ही करायचा. पण तो सतत म्हणायचा किंवा त्याच्या मनात एक गोष्ट पक्की बसली होती की त्याचा चेहरा ,दिसणं हे चांगलं नाही.
 मी त्याला नेहमी म्हणायचो की दिसणं हे महत्त्वाचं नाहीच आहे !इथे टॅलेंट असणं महत्वाचं! पुढे तो इतर अगणित फक्त कॉलेजकालीन कलाकारांपैकी एक होत होत आपला इतरांप्रमाणे वेगळा करिअर मार्ग अवलंबवला. असे अनेक गुणी कलाकार पाण्याच्या बुडबुडयांप्रमाणे कॉलेजमधील काही काळ तयार होतात आणि पोटासाठी मग मुळ प्रवाहातील सुरक्षित करिअर करत आयुष्य घालवतात.
जे चूक नक्कीच नाही.
पण ज्या दिवशी मी यू ट्यूबवर एका कलाकाराला बघितलं मला खात्री पटली कि मी जे माझ्या मित्राला सांगायचो ते बरोबर होतं.कि दिसणं , लुक्स महत्वाचे नसतात. कौशल्य महत्वाचं.

अभिनय, दिग्दर्शन, लेखन यासंबंधीत असलेल्या मूळ प्रवाहापासून इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टी , टीव्ही कलाकार इत्यादी सर्व कालाकारांपैकी सगळ्यात जास्त माझ्या मनात आदर असेल, चाहता असेल तर या कलाकाराचा!
तो  म्हणजे "दीपक कुमार मिश्रा".

हे नाव आज परिचित नाही. चित्रपटसृष्टीतील स्टारडम , कळपगिरी, घराणेशाहीमुळे अनेक खरे हाडाचे कलाकार समोर येत नाहीत.
त्यांच्याबद्दल काहीतरी लिहिणे म्हणून हा लेखप्रपंच!

 पर्मनंट रूममेट्स बघितल्यावर ,बघताना आवडतो लक्षात राहतात ते सुमित व्यास आणि निधी सिंग. म्हणजे तानिया आणि मिकेश. पण या सगळ्यांमध्ये मनाला भावतो तो भाबडा बराचसा मूर्ख वाटणारा प्रॉपर्टी एजन्ट आणि कॅब ड्रायवर पुरुषोत्तम.
पहिल्या भागात त्यांची भूमिका सहज एक सहकलाकाराची वाटते. तो कुठल्याही दृष्टीने महत्वाचा कलाकार  वाटत नाही. पण पहिला संपूर्ण सिजन आणि दुसराही सिजन त्याने आपल्या सहज अभिनयाने मजा आणलीये. हा त्याचा सहज अभिनय इतका सहज , नैसर्गिक आहे की तो खरोखरच एक मूर्ख व्यक्ती वाटायला लागतो.
कुठलाही चित्रपट असो वा आवडती कलाकृती मी ती संपल्यावर दाखवली जाणारी नावे नेहमी बघतो. प्रत्येक नेटिसोड नंतर ''रिटन बाय आणि कधीतरी डिरेक्टेड बाय दीपक कुमार मिश्रा " दिसायचं.
मी सहज एकदा दीपक कुमार मिश्रा नावाची माहिती सर्वज्ञानी निर्गुण निराकार अश्या 'गुगलेश्वर' देवास विचारली तेव्हा दिसलं की पुरुषोत्तमची भूमिका करणाराच दीपक कुमार मिश्रा आहे आणि त्यानेच रूममेट्स ची कथा ,पठकथा लिहिली आहे. शिवाय इतर अनेक अव्वल दर्जाचे विडंबन व्हिडीओज लिहिलेत, दिग्दर्शन केलंय. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आणि माझ्या मनात त्याच्यविषयी फार आदर आणि कौतुक दाटलं. एक अतिशय सर्व साधारण रूप, विरळ केस , दातांमध्ये फट उंची अगदीच सरासरीपेक्षा कमी. पण हा कलाकार आपल्या  गुण, कौशल्यामुळे , निरीक्षणशक्तीमुळे इतकं अव्वल दर्जाचं काम करतो.

पण हा धक्का इथेच थांबला नाही. एक मोठा धक्का मिळण्याचं अजून बाकी होतं.
मी जेव्हा दिपककुमार मिश्राची माहिती गुगळेश्वराकडून मिळवत गेलो.तेव्हा अजून एक मोठा धक्का बसला. पदार्थ विज्ञानात शारिरीक फोर्स 'न्यूटन' मध्ये मोजतात. पण मानसिक धक्क्याचं परिमाण अजून कोणी शास्त्रज्ञाने किंवा मनोरोगतज्ञाने सांगितलं नाही.
नाहीतर मी नक्कीच त्या परिमाणासह धक्क्याचं स्वरूप सांगितलं असतं.
इथे मी न्यूटन, शास्त्रज्ञ हे शब्द का वापरले आहेत हे पुढे कळेलच.

आपल्याला ज्या गोष्टीत मनापासून आवड आहे त्यातच करिअर करावं , आपलं पॅशन असावं , आपल्या टर्म्स वर आयुष्य ,करिअर करणे वगैरे अनेक चित्रपटांमधून याचं उदात्तीकरण करून दाखवलंय.पण हे मूळ आयुष्यात जमणे म्हणजे शिवधनुष्य उचलणे होय. हा फार मोठा जुगार असतो. पण हा डाव खेळला दीपक मिश्राने. आणि तो जिंकतो आहे.
जी अत्यन्त धक्कादायक ,आश्चर्यकारक , कौतुकास्पद गोष्ट त्याच्याबद्दल कळली ती म्हणजे हा दीपक कुमार मिश्रा आयआयटी मुंबई मधून अभियंता झाला आहे. तो अमेरीके संबंधित एरोस्पेस रिसर्च आणि डेवलपमेंटचं काम करीत होता. गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती.

वाराणसी या शिवनगरीत त्याचा जन्म झाला. तिथे त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आणि बारावीनंतर आयआयटी मुंबईत त्याने कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर  प्रवेश मिळवला. उच्च प्रकारची नोकरीही मिळवली.
पण कॉलेजमध्ये असतानाच तो जहाल किडा त्याला चावलाच. एकदा की हा किडा चावला की मग याच्या संसर्गावर इलाज नसतो. या अभिनयाच्या , कलेच्या  किड्याला 'सुलेमानी किडा'ही म्हणतात. या सुलेमानी किड्याचं आणि दीपक शर्माचं जवळचं नातं आहे.

त्याने नोकरी सोडली आणि अभिनय ,दिग्दर्शन क्षेत्रात स्वतःला पडताळून पाहण्यास सज्ज झाला.अनेकांनी त्याला त्याच्याकडे चौकटीबद्ध चेहरा , शरीरयष्टी नसल्याचं सांगितलं. चूक करतोय सांगितलं. तरीही त्याने हिमतीने नोकरी सोडली. पण स्वतः त्यालाही त्याच्या दिसण्याबद्दल वास्तवाची कल्पना होती.त्यामुळे दीपक मिश्राने मागील दरवाज्यातून प्रवेश करण्याचं ठरवलं. कॉलेज काळात अनेक नाटकं लिहिली आणि दिग्दर्शित त्याने केली होती. राष्ट्रीय स्तरावरील नाट्यस्पर्धेत , कार्यशाळांमध्ये भाग घेतला होता. कौशल्यगुण तर प्रचंड होते गरज होती संधीची. लवकरच त्याला संधी मिळाली ओम शांती ओम या चित्रपटात सहदिग्दर्शन करण्याची.
पुढे हॅपी न्यू इअर चित्रपटमध्ये ही त्याने सहदिग्दर्शक म्हणून काम केले. अनुराग कश्यपने मात्र त्याच्यातील कौशल्य ओळखलं. त्याला पाठिंबा दिला.पुढे तो टीव्हीएफ या वेब सीरिज, व्हिडीओज निर्माती कंपनीचा अविभाज्य भाग बनला!

सुलेमानी किडा नावाचा त्याने स्वतः लिहिलेलाआणि दिग्दर्शित केलेला  एक चित्रपट आहे.

'लगे रहो शेट्टी भाई" या अप्रतिम अश्या विडंबन व्हिडीओ मध्ये त्याने 'न्यूटन' चा रोल केला आहे. लगे रहो मुन्नाभाईमध्ये दिलीप प्रभावळारांनी गांधीजीची जशी भूमिका केली त्याच धर्तीवर रोहित शेट्टीवरील हा विडंबन व्हिडीओ आहे ज्यात त्याने शास्त्रज्ञ न्यूटनची अप्रतिम जबरदस्त विडंबनात्मक भूमिका केली आहे.
"मेकिंग ऑफ ब्रेकिंग न्यूज" हा असाच एक न्यूज चॅनल्स वरील विडंबन व्हिडीओ. यात त्याने राज आर्यन नावाच्या पत्रकाराची भूमिका केली आहे. " अटॅक ऑफ झोंबहेन्स" या रक्षाबंधनावरील गंमतीशीर व्हिडिओत त्याने काम केलंय. हे सर्व व्हिडीओज आजवर  बघितलेले सर्वोत्तम, अप्रतिम विडंबन व्हिडीओज आहे हे मी खात्रीशीर सांगू शकतो.

थ्री इडिट्स मध्ये आमीर खान, माधवन, शर्मन जोशी ,करीना कपूर इत्यादी बडे कलाकार असतानाही ओमी वैद्य चतुर रामलिंगमच्या भूमिकेत भाव खाऊन गेला.त्याचप्रकारे रुममेट्स मध्ये सुमित व्यास आणि निधी सिंगच्या अवतीभोवती असलेल्या कहाणीमध्ये पुरुषोत्तम म्हणजे दीपककुमार शर्मा आवडून जातो.

गंगा किनारच्या या कलाकाराचे कौतुक करावे तितके कमी. कुठलाही न्यूनगंड न बाळगता स्वतःवरील विश्वास बुद्धीमत्ता, जबरदस्त निरीक्षण शक्ती, या भरोवश्यावर तो एक परिपूर्ण कलाकार झाला आहे.

विवाहित स्त्री की मन की बात

 *विवाहित स्त्रीची मन की बात*

मे 2017, लोकप्रभा

डायरी ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट असते. म्हणजे एकेकाळी होती. डायरीत स्वतःच्या मनातील प्रामाणिक भाव, विचार, संकल्प, मूळ स्वभाव सर्व उतरत असतो. डायरी ही जणू आपल्या दाटलेल्या भावनांचं ,विचारांचं 'व्हेन्ट' असतं. नकारात्मक भावनांचं प्रदूषण बाहेर काढणारी मनःरुपी घराची चिमणी असते. मानस शास्त्रीय एक सिद्धांत वा एक अनुभव असा आहे की मनातील भावना ,विचार एकदा कागदावर उतरवले की पुन्हा ते मनात प्रकट होत नाहीत.त्यामुळे मनोरोगतज्ञ , सायकोलॉजिस्ट सांगतात की नको असलेल्या विचारांचा खूप त्रास होत असल्यास , त्यांचा बंदोबस्त करावयाचा असल्यास ते विचार कागदावर ..डायरीत लिहून काढा म्हणजे ते पुनः मनात येत नाहीत. आणि हा अनुभव, प्रयोग करून बघितल्यास नकीच हा मानसशास्त्रीय प्रमेय सप्रमाण पटेल. जणू आपले वैचारिक प्रदूषण , भाव भावनांचं वादळ डायरीचा कागद शोषून घेतो.सगळं बाहेर पडतं. पुन्हा आत शिरत नाही. यामूळे एक फायदा होतो की आपल्या मनात ज्या नात्याविषयी , व्यक्तीविषयी काही अश्या भावना असल्यास ज्या आपण त्या व्यक्तीला सांगू शकत नाही कारण त्यामुळे नातं बिघडू शकतं पण मनात ठेवल्यास आपलेच मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं अशी परिस्थिती असल्यास डायरीत लिहिणे हा सर्वोत्तम उपाय असतो.
नातं ही टिकून राहतं.आणि व्यक्तीच्या  मनातील भार ही हलका होतो. कारण आपल्या मनातील भाव, विचार कोणाला तरी सांगणे , 'जज' न करता संकल्पना न बनवता कोणी आपलं ऐकून घेणे ही प्रत्येकाची मूळ मानसिक गरज असते.  व्यक्ती नसल्यास डायरीत लिहिल्या जातं. डायरी जणू मन कि बात असते.

पण आता डायरी ची जागा  सोशिअल मीडियाने घेतल्याने सगळेच बहि:मुख् झाल्याने आपल्या गोष्टी ही सोशिअल साईट्स रुपी डायरीत लिहिली जाते.
आणि एकेकाळी कोणी आपली डायरी वाचली की चिडून "माझी  डायरीला माझ्या परवानगीशिवाय कोणी हात लावला?" असे विचारणारे आज सोशिअल मीडियावर "किती लोकांनी आपलं वयक्तिक माहिती ,लिखाण वाचावं म्हणूं आर्जवं करतात आणि 'लाईक्स चे अंगठे " मोजतात.
कालाय तस्मै नमः!

पण मुद्दा हाच की डायरीची जागा कागदापासून , सोशिअल मीडिया पर्यंत गेली आहे ते स्वतः स्टेज वर लोकांना आपल्या वैयक्तिक गोष्टी विनोदी ढंगाने सांगून स्टॅन्ड अप कॉमेडी करणे ही झाली आहे.

 तेव्हा डायरी ही "मन की बात" असते. प्रत्येकाला आपल्या मन की कोणाला तरी सांगायची असते. विवाहित स्त्रीला तर मग बरेच सांगायचं असू शकतं ना!!
तर अशीच आहे ही एका वैवाहिक स्त्रीची मन की बात, "मॅरीड वूमन्स डायरी" !

डायरी या विषयावरील प्रस्तावना जरा गंभीर झाली पण ही स्त्रीच्या दिल की बात ची वेब सीरिज मात्र बिलकुलही गंभीर किंवा  जड नाही.खूप टवटवीत , विनोदी ढंगात्मक, हलकीफुलकीच आहे.

हातात माईक घेऊन समोर प्रेक्षक आहेत असे गृहीत धरून वा दाखवून शाब्दिक विनोदात, कोट्यात आयुष्यातील घडामोडी सांगणे   अश्या प्रकारे काही इंग्लिश कार्यक्रम पूर्वी झालेले आहेत.या ढंगावरच ही वेब सीरिज आहे.

श्वेता नावाची सुंदर ,तरुण स्टॅन्ड अप कोमेडीयन असलेली बायको आपल्या नवऱ्याबद्दल , त्यांच्यातील रोजचे प्रसंग, घडामोडी , तिच्या मनातील त्याच्याविषयीचा भाव , कधी गंमतीचा राग , कंटाळा, सासू च्या गोष्टी, संसाराबद्दल च्या गोष्टी ती  काल्पनिक प्रेक्षकांसमोर सांगताना दाखवली आहे. सोबत मागून रेकॉर्डेड लाफ्टर  जोडीला असतंच.

तिचा नवरा ऋषी हा अल्लड , खूप जबाबदारी ना घेणारा असा, नेहमीच रोमँटिक मूड मध्ये असलेला आणि कधी आपल्या प्रेमामुळे तिला भंडावून सोडणाराअसतो.

असेच छोटे छोटे भाग या सीरिज चे आहेत.

अंडेश , टूथब्रश , सिक्रेट अफेअर , लेझी स्पर्म हे काही मजेदार नेटिसोड या सिरीमध्ये आहेत.

श्वेता करिअरला महत्व देणारी आधुनिक स्त्री असते तर ऋषीला कुटुंब वाढवायच असतंम्हणून तो तिच्या मागे लागतो तो भाग मस्त आहे.त्याला टाळायला श्वेता एक युक्ती करते.ती त्याला अजून तो वडिलांची जबाबदारी पेलण्यास तयार नाही हे त्याला  पटवून देण्याचा प्रयत्न करते तेही मस्त झालंय आणि तरीही तो मागे लागल्यावर त्याला एक अंडं देते आणि त्या अंड्याला बाळ म्हणून एक आठवडा वागवण्याचं चॅलेंज देते. जर तो यशस्वी झाला तरच आपण कुटुंब वाढवू अशी शर्थ ठेऊन ती तात्पुरता मार्ग काढते.
तेव्हापासून तो त्या अंड्याची बाळासारखी काळजी घेऊ लागतो. आणि त्याचं नाव ठेवतो 'अंडेश' ! हा वेबिसोड खूप विनोदी जमलंय.

या सीरिज ची खरी जान, कणा आहे ती श्वेता म्हणजे सुझाना मुखर्जी. यात जेव्हा सुझाना मुखर्जी या अभिनेत्रीला बघितलं तेव्हा खूप आश्चर्यचकित झालो कारण तिला यापुर्वी काही सिनेमांमध्ये बघितलं होतं. तेव्हा तिच्यात इतका सहज भाव अभिनय आणि विनोदबुद्धी असेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. ती एम टीव्ही रोडीज मध्येही काही भागांसाठी स्पर्धक म्हणून होती. पण 'मॅरिड वूमन्स डायरी " ही सीरिज जणू तीचासाठीच बनली आहे असं वाटतं.


दिसायला अत्यंत सुंदर ,आकर्षक , मादक नितळ कांतीचा चेहरा , आणि तितकाच अचूक भाव दाखवणारा भावदर्शी चेहरा आणि अभिनय .उत्स्फूर्त आणि योग्य संवादफेक .आणि या साऱ्यास अगदी चेरी ऑन द केक अशी विनोदबुद्धी. यामुळे ती अगदी या सीरिजला स्वतःच्या खांद्यावर एकटी पेलते. सुझाना मुखर्जीला बघणे म्हणजे डोळयांना मेजवानी आहे हे ही सीरिज बघताना हमखास पटेल.
जन्माने ती अर्धी  युक्रेनिअन आणि अर्धी बंगाली आहे. दोन्ही तत्वांतील जणू सर्वोत्तम घेऊन ती बनली आहे असं वाटतं. नितळ चमकदार कांती आणि चेहऱ्याची बंगाली ठेवण याचा सर्वोत्तम मेळ तिच्यात आहे.
ही सीरिज बघताना तिच्यासारखी अभिनेत्री सिनेसृष्टीत अजून चमकली कशी नाही आश्चर्यही वाटतं.

अर्धी विदेशी असून तिची हिंदीवरची कमांड अप्रतिम आहे.तिची कतरीना कैफ झालेली नाही.

ही वेब सिरीज एका 'निरोध' तयार करणाऱ्या कंपनीने स्पॉन्सर केली आहे.त्यामुळे हलकीशी बोल्ड वाटु शकते.
सम्पूर्ण सीरिज ही आधुनिकरित्या मांडलेली आहे.
यातील गंमतीजमती काही नविन नाही या विषयावर बरंच बघितल्या गेलं आहे. पण या सिरीजची ट्रीटमेंट अगदी टवटवीत आहे. आणि सर्वोत्तम गोष्ट म्हणजे यात सुझाना मुखर्जी आहे.

एक हलकी फुलकी ,मनोरंजन करणारी थोडी पाश्चिमात्य धाटणीची ही विवाहित स्त्रीची मन कि बात असलेली वेब सीरिज आवर्जुन बघायला हरकत नाही.

शब्द मैत्री

अशाच एका क्षणी
आले आगंतुक कोणी
संवाद अगदी साधा
भासली ओळख जुनी

हातात त्याच्या जादू
लिहीतो बावनकशी
शब्दांचे खेळ सारे
सांगड घाली अनुभवाशी

लेखणी ने त्याच्या
जुळतात अनेक नाती
त्याच्या मैत्रीची भाग्यरेषा
उठली माझ्या हाती 

कविता

सकाळी चहा पिताना जेंव्हा पाऊस बघत
होते तेंव्हा वाटल कि पावसाला सुद्धा काही
भावना असतील, त्याला पण आनंद होत असेल, हेच विचार कवितेत बांधण्याचा केलेला छोटासा प्रयत्न

आजचा दिवस माझा या विचाराने च
मी खूप खुश होत आहे,
बरसून साऱ्या धरतीवर
मनसोक्त बागडत आहे...

मेघाच्या उदरातून बाहेर येताना
ऊर त्याचे भरून येत असेल,
त्याने डोळ्यात साठवलेले पाणी
माझ्या वाटे मोकळे होत असेल...

तू माझी वाट बघतेस तेंव्हा वाटत
माझ्या पेक्षा महत्वाच काहीच नाही,
कोसळताना प्रेमानी बघतेस तेंव्हा वाटत
माझ्या पेक्षा सुंदर या जगात कोणीच नाही...

माझे चार थेंब हातावर घेऊन
चेहऱ्या वरून फ़िरवतोस तेंव्हा वाटत,
कित्येक महिन्यांनी भेटलेला
आपुलकी दाखवणारा तूच खरा दोस्त...

भिजून जा, हो ओला चिंब
माझ्या प्रेमाच्या वर्षावातून,
चार महिन्यांची सोबत आपली
साठवून ठेव आठवणीतून...

माझे इथले काम झाल्यावर
मला परत जाव लागेल,
असे क्षण बरोबर न्यायचेत कि
तुला भेटायला मला परत यावच लागेल...

- अभिजित पानसे

अन्नासाठी दाही दिशा


*अन्नासाठी दाही दिशा*


त्या राजाने जनतेचे प्रश्न ऐकायला दररोजप्रमाणे दरबार भरवला होता.जिर्ण मळक्या कपड्यातला एक वृद्ध भिकारी थरथरत्या हाताने काठी टेकवत दरबारात राजापुढे आला आणि अन्नाची याचना करू लागला.

राजाच्या लक्षात आलं की हा भिकारी काही दिवसांपासुन दररोज अन्न मागायला येतोय.
राजा कुत्सितपणे त्या भिकाऱ्याला म्हणाला ;
 "रोज रोज असं भोजन मागायला तुला जराही लाज वाटत नाही ?

तो भिकारी शुन्य भावनेने राजाकडे बघत बोलु लागला; "राजा लाज ही मनात असते.आणि मन हे #ह्रदयात असतं.
'ह्रदय' हे 'पोटाच्या' वर असतं.
आणि पोटात अग्नी असतो.
दरवेळी तुझ्याकडुन अन्न घेताना माझं ह्रदय लाजेने भरून जातं.म्हणुन मी ठरवतो पुन्हा तुझ्याकडे अन्नाची याचना करायची नाही!
पण काही वेळाने माझ्या पोटातील #जठराग्नी पेटुन उठतो.स्वाभाविकपणे अग्नीच्या ज्वाळा या #वरच्याच दिशेने जातात.
त्यामुळे पोटातील पेटलेला अग्नी माझ्या ह्रदयातील लाजेला जाळुन टाकतो.आणि मी निर्लज्ज होउन पुन्हा तुझ्याकडे अन्नाची याचना करत येतो.

त्या वृद्ध भिकाऱ्याचे हे शब्द ऐकुन राजा गदगदुन गेला. आणि राज्यातील सर्व परावलंबी वृद्धांना दररोज भोजन देण्याचं आणि राजवाड्यापासुन संपुर्ण राज्यात कुठेही अन्नाची नासाडी झाल्यास दंड करण्याचे फर्मान काढले.

(International Food Day)
आंतराष्ट्रीय अन्न दिवस निमित्ताने)

-अभिजित दिलीप पानसे

चलो दिल्ली (चलो बुलावा आया है भाग 1)

'चलो बुलावा आया है''
(वैष्णवी देवी प्रवास वर्णन) भाग1



"हाँ सीट अवेलेबल है!"असं तत्काळ रिजर्वेशनच्या खिडकीमागच्या एका रेल्वे कर्मचाराने रुक्षतेने म्हटले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

देवाच्या पुढ्यात दानपेटीत पैसे टाकावे इतक्या अदबीने मी टिकीटाचे पैसे खिडकीतून त्याच्या समोर ठेवले.

आणि त्याने दिल्लीचं  तिकीट माझ्या पुढ्यात भिरकावलं.

हे सरकारी कर्मचारी कागद पत्र..तिकीटांसारख्या तुच्छ गोष्टी आपल्यासारख्या तुच्छ लोकांच्या हाती वगैरे देत नसतात.भिरकवण्याचा त्यांना आदेशच असतो बहुदा किंवा तो त्यांच्या ट्रेनिंगचाच एक भाग असावा.

लागलेली लॉटरी कोणी जितक्यांदा तपासणार नाही तितक्यांदा मी ते तिकीट तपासलं.तारीख -वेळ -बर्थ- बोगी सगळं काही. तिकीटावरील कुठल्यातरी फोन कंपनीची जाहीरातही मी त्या आनंदात दोन तीनदा  वाचून काढली.
आनंदच तितका झाला होता ना!

सकाळी साडेनऊ वाजता झोपेत असताना दुर्लक्ष करूनही फोन सतत शहारू लागला तेव्हा इच्छा नसतानाही उचलल्यावर काही मिनीटाच्या Anurag सोबतच्या संवादानंतर मी ताडकन लाथेने सर्वांगावरील गरम ब्लँकेटचे आवरणे दुर करीत रेल्वे स्टेशन गाठले होते.आणि कुठल्याही एजंटाशिवाय स्वतः रांगेत लागुन शक्यता फारच कमी असताना दिल्लीचे टिकीट मिळवले होते.

आजवर उत्तरेकडे नाशिकच्या पलिकडे न गेलेलो मी आयुष्यात  पहिल्यांदाच देशाच्या राजधानीत पाऊल ठेवणार होतो!

पण फक्त हेच कारण नव्हतं त्या आनंदामागे.मी आधीच ठरवलं होतं अनुरागला दिल्लीला भेटायला गेलोच तर वैष्णोदेवीला जायचंच दर्शनाला! बरीच ओळखीची मंडळी जाऊन आली होती.

एरवीही मला कोणी ओळखी अनोळखी वैष्णो देवीला जाऊन आल्याचं भेटलं तर मी शरीराचे सहस्रकर्ण करून त्यांचं प्रवास वर्णन ऐकायचो.मनानेच शाब्दिक दर्शन घ्यायचो.पण आता प्रथमच याची देही याची डोळा दर्शनाची संधी आली होती.
लेकिन दिल्ली अभी दुर थी!!

दुसऱ्या दिवशी फलाट क्रमांक १ वर आलेल्या अग्नीरथाचं मी माप ओलांडलं आणि आमचा रथ उत्तरेकडे कूच करता झाला.

माझी आवडती साईड लोअर सीट मिळाल्याने आनंदात मी खिडकीतुन पळती झाडे पाहु लागलो.

थोड्याच वेळात भारताचे फुफ्फुसं असलेले मध्यप्रदेशचे जंगलं;पाठीमागे रेलुन खिडकीतुन येणारा वारा चेहऱ्यावर घेत डोळे बारीक करत;बघताना आजुबाजुच्या वातावरणापासुन अलुफ होत एका  Equilibrium मध्ये गेलो होतो.

संध्याकाळी पावणे सहाला रेल्वे होशंगाबाद नावाच्या स्टेशनावर थांबली आणि मला ह्या गावाचं नाव खूपदा ऐकल्या-वाचल्यासारखं जाणवू लागलं.
आणि एकदम डोक्यात प्रकाश पडला.

की 'नर्मदा परिक्रमेच्या' पुस्तकांमध्ये मी ह्या गावाबद्दल वाचलय.आणि बर्थवर आळसावलेलो पसरलेलो मी उत्साहाने सरसावून बसलो.

मनात एकदम उत्कट अष्टसात्विक भाव दाटून आले.

ज्या नर्मदा दर्शनासाठी मी तळमळत होतो परिक्रमेवरील पुस्तकं वाचल्यापासुन; त्या नर्मदा माईचं दर्शन काहीही कल्पना नसताना होणार या विचारानेच!!

 गाडीने स्टेशन सोडलं. पण कुठलंच चिन्ह दिसेना. मी समोर दृष्टी जाईल तितकं लांब पाहू लागलो.

आणि अचानक जलप्रवाह दुरून दिसू लागला.आणि हळूहळू नर्मदामाईच्या संपूर्ण विशाल पात्राला आमचा अग्निरथ वर पुलावरून ओलांडु लागला.

 '#नर्मदेहर' म्हणत मी शरीराचे सहस्रनयन करत नर्मदादर्शन करत होतो.

सूर्यास्तसमयीच्या केशरी सूर्याच्या साक्षीने खाली नर्मदेचा विशाल प्रवाह पश्चिमेकडे सागराच्या दिशेने वाहत होता.

खाली दूरवर हातात काठी घेतलेला एक वृद्ध नदीच्या तिराने चालताना दिसला. मला गो.नि.दांडेकरांची 'कोणा एकाची भ्रमणगाथा' आठवली.

नर्मदादर्शनाने खूप सुखावलेल्या माझ्या मनाला;आयुष्यात पुढे नर्मदा परिक्रमा करण्याच्या माझ्य  संकल्पाची मला आठवण झाली.

काहीवेळाने भोपाळ आलं. रात्री उशीरा कधीतरी ग्वाल्हेर येऊन गेलं.पहाटे जाग आली तर गाडी आग्रा स्टेशनात थांबलेली दिसली.मला एकदम औरंग्याचा दरबार तिथला मिर्झा राजे,आणि शिवाजी महाराजांनी दाखवलेला तेजस्वी बाणा आठवला.
The great Escape in the world म्हणुन गौरवण्यात यावं ती शिवाजी महाराजांची आग्रयातुन सुटका आठवली.त्यावेळी माझा
'हरी तात्या' झाला होता.

पहाटे पाचला मथुरेला गाडी थांबली. स्टेशन पूर्ण शांत होतं. श्रीकृष्णाच्या भूमीत आल्याचा खूप आनंद होत होता.

 फेब्रुवारीचा पहिला आठवडा असल्याने ब्लँकेटच्या स्वेटरच्या आवरणालाही भेदून थंडी पार हाडापर्यंत जात होती.

 हळूहळू झुंजुमुंजू लागलं. आणि दिल्ली शहराच्या खुणा दिसू लागल्या.
संपूर्ण रस्त्यावर दाट धुकं पसरलं होतं. दिल्लीनं नेहमीप्रमाणे दाट धुक्याची जाड शाल पांघरली होती.

देशातील सर्वात प्रदुषित शहर असलेलं शहर म्हणजे  आपल्या भौतिक प्रगतीची दुसरी काळी बाजू. त्यामुळे दिल्लीत एकवेळ नारळ आणि हापुस पिकेल पण दिल्लीतून आकाश कधीच निळं दिसणार नाही.

गाडी न्यु दिल्ली स्टेशनवर प्रवेशती झाली.आणि मी माझी सखी सोबतिण 'रक सॅक'ला अलगद उचलुन तिला पाठीवर घेत ' इंद्रप्रस्थाच्या'च्या भुमीवर पहिलं पाउल ठेवलं.
आणि जीवाची दिल्ली करण्यास सज्ज झालो...

-अभिजित पानसे

तिकीट हाती आले (चलो बुलावा आया है भाग 2)

*चलो बुलावा आया है
वैष्णवीदेवी प्रवास वर्णन भाग 2*

माझ्या सखीला-रक सॅकला उचलुन पाठीवर घेत दिल्लीच्या भुमीवर पहिलं पाउल ठेवलं.
आणि  ''जिवाची दिल्ली'' करण्यास सज्ज झालो.

अनुराग घ्यायला येणार होता. तो येईपर्यंत मी दिल्ली मेट्रो स्टेशनला पोहोचुन नेहमीप्रमाणे आजुबाजुचं निरीक्षण करू लागलाे. हे शहर अनेक गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे. हे बातम्यांमधून कळत असतं.
त्याचा संबंध आजुबाजुच्या वातावरणात दृश्यात काही मिळतो का हे शोधण्याचा बालिश प्रयत्न करू लागलो.

एकदाचा अनुराग आला.भेटण्याच्या आनंदात एकमेकांना अभक्ष शिव्यांचे आदान प्रदान..मिठ्या मारणाचा सोहळा पार पडला आणि आम्ही 'रोहिणीला' जायला निघालो.

मेट्रोच्या पहिल्याच भेटीत प्रेमात पडलो. पण लोक मात्र मख्ख चेहऱ्याने प्रवास करताना दिसलेत. यामानाने मुंबईची लोकल खूप जिवंत वाटते. मुंबई स्पिरीटच ते!
त्यावेळी फक्त दिल्ली कोलकात्यामध्येच मेट्रो ट्रेन होती.

फक्त फेब्रुवारी महिन्यातच राष्ट्रपती भवनातील गार्डन सामान्य नागरीकांसाठी खुलं असल्यामुळे अनुरागचा तिकडे जाण्याचा बेत होता.
पण हे गार्डन, उद्यानात जायचं म्हटलं की एरवीही माझ्या चेहऱ्यावर आठ्या उमटतात.म्हैसुरचं वृंदावन गार्डन असो वा काश्मीरचे मुघल उद्याने मला कंटाळाच येतो.

म्युझियम्स,किल्ले,लेणी,किंवा ऐतिहासीक वास्तु,मग ते सुस्थितीत असो वा भग्नावस्थेत,तेथे मी तासनतास एकटा रमु शकतो.वेगळ्याच विश्वात जातो.

त्यामुळे मी अनुरागपुढे पुराना किल्ला,लाल किल्ला कुतुब मिनारची यादी समोर ठेवली.

हे ऐकताच त्याने मला गच्चीवर नेलं आणि तिथे गेल्यावर मी जोरदार ओरडलोच..

कारण त्याच्या गच्चीवरुन समोर दुर कुतूब मिनार दिसत होता.

मी कितीतरी वेळ ते दृश्य पाहत राहिलो.

त्या दिवशी अनुरागसोबत कुतूब मिनार..लाल किल्ला..चांदनी चौक..लोटस टेंपल बघुन  आलो.आणि दुसऱ्या दिवशी जम्मूचं रिजर्वेशन तत्काळमध्ये करण्याचं ठरलं.

कोणाला हाताला सहा बोटं असतात,वर्तमानपत्रात कधी दुतोंडी साप वगैरे जन्माला आलेला दिसतो.

तसंच मला कधी कधी तिव्रतेने वाटतं की विधात्याने माझ्या पोटात मला दोन तीन जठरं का नाही दिलीत!!

अशीच भावना मला चांदनी चौकात पराठा गल्लीतुन आणि इतर भागात फिरताना झाली होती.

  सकाळ आली ती अनुरागच्या तब्येतीचं दुखणं घेऊन आली. त्यामुळे त्याचं येणं रद्द झालं.
 मला मात्र मनात एकटं जाण्याच्या विचारानं हुरहुर जाणवू लागली.

जम्मू काश्मीर म्हटल्यावर डोळ्यांसमोर आतंकवादी कारवायाच येऊ लागल्या. पण घरून निघतानाच मनाशी निश्चय केला होता वैष्णो देवीला जायचेच.

 सकाळी १० ते १२ पर्यंत सुरू असणाऱ्या तत्काळ साठी लोक पहाटेपासून रांगेत लागतात. आणि आम्ही दुपारी साडे अकरा वाजता स्टेशनला जायला घराचा उंबरठा ओलांडला.

१२ फलाटं ओलांडून पहाडगंज भागाकडील तत्काळचं ऑफीस खूप प्रयत्नांती एकदाचं सापडलं.

आत वेळ संपल्याने तिथे कोणतीच रांग नव्हती. आत पोहोंचल्यावर कळलं की मी xerox copy विसरलोय.

मग पहाडगंजचं जंग जंग पछाडल्यावर एकदाची xerox copy काढली.

 पुन्हा ऑफीसात आलो तर जवळचा पेन हरवलेला..!!

 मग कोणी पेन देता का हो पेन..या वेंधळ्या पेंद्याला पेन देता का विचारत
 शेवटी एकदाचा फॉर्म भरून झाल्यावर तो द्यावा तर 'लंच टाइम हो गया' म्हणत तो गिळायला निघून गेला.

तेव्हा निराशेने मी जायचचं रद्द केलं. आणि जवळच्या कॅनॉट प्लेसला जायला आम्ही निघणार होतो.

 पण थोड्याच वेळात तो अधिकारी आला आणि नकार ऐकण्यासाठीच मी खिडकीपाशी जाऊन भरलेला फॉर्म उदास मनाने आत ढकलला.

मनात म्हटलं आज जर तिकीट मिळालं नाही तर वैष्णो देवीचीच इच्छा नाही की मी दर्शनाला यावं. तसंही देवीची  इच्छा असली तरच जाता येतं असं म्हणतात.
 अशी स्वतःची खोटी अयशस्वी समजूत काढू लागलो.
आणि दुसऱ्या दिवशी परतीचं तिकीट काढायला लवकर येण्याचं ठरवलं.

आता रेल्वे अधिकारी दुपारी 2 वाजता फॉर्मवर 'तत्काळ' बघितल्यावर अंगावर खेकसणार याची खात्री होती.

 एवढ्यात त्या खिडकीच्या पलीकडुन अधिकाऱ्याच्या मुखातून तीन शब्दसुमनं सांडलीत आणि मी ती माझ्या कर्णांजलीत अलगद झेलली -'एकही बचा है!'

मला आश्चर्याचा मोठा धक्का होता तो धक्का!!

खिडकीतून एक गोंडस तिकीट बाहेर आलं.ते पाहून अनुरागलाही खूप आश्चर्य वाटलं! आणि मी आनंदाने  उद्गारलो "चलो बुलावा आया है माताने बुलाया है!"

(क्रमशः)

Friday 29 December 2017

"सिंग इज क्वीन"

निधीन धिन धिन धिन धा"


'लोकप्रभा'http://www.loksatta.com/vishesha-news/permanent-roommates-1387407/ ,एप्रिल 2017

काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मैत्रीणीला मी "पर्मनंट रूममेट्स"चा पहिला भाग आज बघणार असं सांगितलं तेव्हा ती म्हणाली की तिने ती  सीरिज बघितली आहे. त्यातला हिरो चांगला आहे पण हिरोईन नाही तिला आवडली.
मी तेव्हा पर्मनंट रूममेट्स बघायला सुरवात ही केली नव्हती. आणि त्याआधीच त्यातील जी कोणती ही प्रमुख अभिनेत्री होती ती काही चांगली नाही ही मनात कुठेतरी संकल्पना निर्माण झाली होती.

रात्री दहा वाजता सहज पंधरा वीस मिनिटं वेळ घालवावा म्हणून मी सीरिज बघणं सुरु केलं. जेव्हा मी लॅपटॉप बंद केला त्यावेळी पहाटेचे पाच वाजत होते. मी दोन्ही सिजन संमोहित झाल्याप्रमाणे बघून संपवले. इतके ते 'इररेजिस्टेबल' होते.आहेत. आणि पहाटेच त्या मैत्रिणीला तीन चार लाल रागीट चेहऱ्याचे इमोटिकॉन्स पाठवून मेसेज केला की पुन्हा असले चुकीचे अभिप्राय मला देऊ नकोस. तुला अभिनयाची ,कलेची जाण नाही!

रूममेंट्सच्या पहिल्या नेटीसोडच्या पहिल्याच दृश्यात एक अभिनेत्री आहे. पहिले दहा मिनिटं तिच्यात काहीही वेगळं वाटत नाही. इतर सर्व "गर्ल अॅट नेक्स्ट डोअर" अभिनेत्रीप्रमाणे तीसुद्धा वाटते. दिसायला काही विलक्षण सुंदर , वा ठराविक हिंदी चित्रपटातील हिरॉईन्सप्रमाणे साचेबद्ध ग्लॅम डॉल नाही. उलट काहीशी बेढब वाटते.
पण अकराव्या मिनिटाला ती प्रेमात पाडते! आणि मग सतत प्रेम करायलाच लावते . तिच्यातील अभिनय क्षमता , आवाजावरील नियंत्रण , भूमिका पूर्णपणे समजून समरस होणे , प्रचंड आत्मविश्वास या सर्व कौशल्यामुळे ती जबरदस्त छाप सोडते. तानिया नावाचं पात्र हे प्रचंड लोकप्रिय झालं ते या अभिनेत्रीमुळेच!

या अभिनेत्रीचं नाव काय आहे हे जाणून घेण्यास मी अधीर झालो होतो त्यामुळे मी दुसरा भाग बघत असतानाच मध्ये थांबून त्या अभिनेत्रीचं नाव काय हे बघितलं. आणि तेव्हा कळलं की तिचं नाव  "निधी सिंग".

 ही निधी सिंग प्राण आहे पर्मनंट रूममेट्स चा!
अगदीच सरासरी उंची, थोडे कुरळे केस , फुगीर गाल (चबी चिक्स) पण मस्त काळे डोळे, मादक ओठ.  पंजाबी ,दिल्लीची छाप असलेला चेहरा .. दिसण्यात सुरवातीला सर्वसाधारण वाटते. पण जेव्हा ती अभिनय करू लागते तेव्हा तिचा सर्वोत्तम आविष्कार  साकारतो. तिचा तिचा आत्मविश्वास तिची सर्वोत्तम बाजू आहे.

प.रु. मधील तानियाची भूमिका तिला मिळण्यापूर्वी तिने काही व्हिडीओज मध्ये काम केलं . "एव्हरी गर्ल इन डेल्ही" असे काही छोटे व्हिडीओज वायरल झालेत.

अहमदाबादला निधी सिंगचा जन्म झाला.तिथेच ती शिकली. पण अभिनयाचा रुपेरी किड्याने तिला मृदू दंश केलाच. परंतु एकदम अभिनय क्षेत्रात अंधपणे उडी मारून संघर्ष न करता तिने प्रथम जाहिरात क्षेत्रात काम केले. त्या कामात यश मिळवले. हळूहळू मॉडेलिंग करू लागली. कर्मधर्मसंयोगाने तीची "टीव्हीएफ" या वेब निर्मिती हाउसच्या कास्टिंग डायरेक्टर "निधी बिष्ट" सोबत झाली. जणू ते विधीलिखितच होतं.
कारण निधी बिष्ट ही हाडाची कास्टिंग डिरेक्टर आहे. त्या दिल्लीच्या निधीमुळे या अहमदाबादच्या निधीचा प्रवेश टीव्हीएफ मध्ये झाला.

तिथे प्रथम केआयडी या सीआयडी सिरीयलवरील  विडंबन व्हिडीओ मध्ये तिने सहाय्यक भूमिका केली. मेन्स वर्ल्ड, पिचर्स या वेब सीरिजमध्ये अगदीच छोटया भूमिका केल्या. आणि त्यानंतर ऑडिशन्स दिल्यावर  तिला मिळाली पर्मनंट रूममेट्स मधील तानियाची भूमिका!
सिंगच्या अभिनयात प्रचंड खोली आणि समृद्धता आहे.पण सगळ्यात सकारत्मक शक्तीकेंद्र म्हणजे तिचा 'आवाज' आणि त्यावरील तिचं नियंत्रण. तिच्या शब्दफेकीचं जे 'फिनिशिंग' आहे ते क्लास आहे! तिच्या आवाजाला जे दिल्लीचं टोन आहे आणि ज्या प्रकारे ती त्याचा उपयोग योग्यवेळी करते ते अगदी वाहह आहे!
पर्मनंट रूममेट्स मध्ये तिने या टोनिंग चा उपयोग अगदी मस्त केलाय! तिचा संवाद, शब्दफेक ऐकत राहावसं वाटतं.

रूममेट्स मधील पहिल्या सिजनमधील शेवटच्या भागातील सुरवातीचा रेस्टरंट मधील सिनमधला भूमिकेनुसार तिचा थकलेला स्ट्रेस्ड  तेलकट चेहरा ,तिचा अभिनय, डोळ्यांची भाषा , चेहऱ्यावरील भाव, शब्दफेक , खर्जातील आवाज म्हणजे ट्रीट आहे! वाढदिवसाची कॅसेट पाहतानाचा सिन, दुसऱ्या सिजन मधील असरानी आणि सासूशी बोलतानाचा सिन, आणि दोन्ही सिजनच्या शेवटच्या भागातील तिचे  संपूर्ण दृश्य हे मेजवानी आहे अभिनयाची !

तिचा खर्जातील आवाज काढण्याची हातोटी, आणि वेळ पडल्यास तितकाच विरुद्ध पातळ आवाजात ही ती शब्दफेक करते त्यावरून ती एक परिपूर्ण अभिनेत्री आहे हे निर्विवाद सत्य आहे.
ती गोपाल दत्तबरोबर हिंदी नाटकही करते आहे. तानियाच्या भूमीकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाली त्यामुळे सध्या ती चित्रपटही करते आहे. फक्त त्यात तीने इतर बेबीडॉल भूमिका न करता चांगल्या भूमिका कराव्यात ही अपेक्षा आहे.

येत्या काळात निधी सिंग हे ताकदीच्या अभिनेत्रींनमधील एक नाव असेल यात शंका किंचितही नाही!!

निधी सिंग यु रॉक!!

Thursday 28 December 2017

नर्मदातिराकडे ,गरुडेश्वरकडे वाटचाल मुंबई- बरोडा ..नर्मदे हर


गरूडेश्वर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची पुण्यतिथी

आज वासुदेवानंद सरस्वती महाराजांची पुण्यतिथी.
दत्त संप्रदायात वासुदेवानंद स्वामींचं स्थान किती महत्वाचं आहे हे महाराष्ट्रीय,गुजराती,कन्नड,तेलगु दत्त भक्तांना इ. सर्वांनाच माहिती आहे.

2013 मध्ये मी पहिल्यांदा टेंब्ये स्वामींचं मराठी संक्षिप्त चरित्र वाचलं होतं.तेव्हापासुन त्यांचं जन्मगाव असलेलं सावंतवाडीजवळ माणगावला आणि समाधीस्थान गरूडेश्वर येथे जाण्याची खुप इच्छा होती.

ते त्यांचं समाधीचं शंभरावं वर्ष होतं.गरूडेश्वर येथील संस्थानाने 11 कोटी मंत्रजप संकल्प केला होता.त्यामुळे सर्व दत्तक्षेत्री, कारंजा लाड,नृसिंह वाडी,पिठापुर....क्षेत्री रोजचा ''दिगंबरा...श्रीपादवल्लभ..चा जप सुरू होता.

त्यावर्षी काहीही कल्पना नसताना अचानक माणगावला जाता आलं होतं.पण त्याही पुर्वीपासुन #गरूडेश्वरला जाण्याची इच्छा खुप होती.

 कारण गरुडेश्वर हे नर्मदा परिक्रमेतलं महत्वाचं तीर्थस्थान आहे.त्याबद्दल पुस्तकांमधुन कितीतरी वाचलं होतं.

पुढे कधी जमेल माहिती नव्हतं म्हणून त्या दिवशी रात्रीतुन ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं!ते डिसेंबर 2014 होतं.

सकाळी डेक्कन ने मुंबईला पोहचलो जो मित्र येणार होता त्याचं जमलं नाही. मग मी वडोदरा च वेटिंगचं तिकीट काढलं. ट्रेन रात्री उशीराची होती म्हणुन मग टिटवाळ्याचा गणपती आणि खुप दिवसांपासुन बघण्याची इच्छा असलेलं स्थापत्य शिल्पाचा अप्रतिम नमुना असलेलं अंबरनाथाचं शंकराचं मंदिर बघितलं.

 रात्री कल्याणला ट्रेन मध्ये एका डब्यात शिरलो.संपूर्ण डबा संपूर्ण भरलेला होता. त्यामुळे मी आधीच दरवाज्यापाशी जाऊन बसलो.रात्र तेवढी काढायची होती.थोड्या वेळात एक पन्नाशीतला,पांढरा कुर्ता पायजमा घातलेला सर्व बाजुने सुटलेल्या देहाचा माणूसही शेजारी येऊन बसला.

 तो त्याच्या साडीच्या व्यापराबद्दल, तसंच बांद्रा वरून जाणाऱ्या ट्रेन ने गेलो असतो तर जागा मिळाली असती वगैरे सांगत होता.मी फक्त ऐकण्याच्या भूमिकेत होतो.
 मी एरवीही फार जास्त बोलण्याच्या बाबतीत दगड आहेच. त्यात त्या दिवशी तर दिवसभरामुळे खूप थकलो होतोच.त्यातल्या त्यात खाली स्थानापन्न झाल्याने व शौचालयाचे निकट सानिध्य असल्याने आधीच कसंतरी वाटत होतं.

तो माणूस मात्र बिनधास्तपणे आपल्या बॅगेची उशी करून पाय पसरून तिथेच खाली झोपला.
मला अश्या मोकळ्या लोकांचा हेवा वाटतो मला तर नवीन ठिकाणी मऊ गादीवरही झोप लागत नाही.

सेल मधलं चैतन्य संध्याकाळीच संपल्याने तो निर्विकल्प समाधीत गेला होता.अश्यावेळी मग माझ्यासाठी पाउलो कोयेल्हो Paulo Coelho नेहमीप्रमाणे धावून आला आणि अगणित वेळा पारायण करूनही दरवेळी नवं काहीतरी गवसणारं "द अलकेमिस्ट" पुस्तक काढलं.

रात्रभर जागणं गरजेचंच होतं कारण पहाटेच बडोदा येणार होतं.झोप लागली तर सरळ अहमदाबादलाच पोहचलो असतो.

 कोणीतरी खांद्या हलवत आहे जाणवलं आणि
आणि काही ''...छे...नथी..'' शब्द कानावर पडलेत. दोन तीन लोकं सामानासकट उभे होते.
बडोदा आलेलं होतं.

मला बसल्या बसल्याच बॅगेवर डोक टेकवल्या स्थितीत झोप लागली होती.
Paulo Coelho, आणि सँटियागो त्याच्या मेंढ्यांसकट शेजारीच खाली पडले होते. त्याला उचलुन बॅगेत भरला.उजवीकडचं पांढऱ्या कपड्यातलं अजस्त्र धूड दरवाजा अडवून झोपलेलंच होतं. त्यांनी त्यालाही गुजरागी हिंदीत उठवलं आणि रस्ता मोकळा झाला.थंडी भरपूर होती.

 प्रथमच गुजरातमध्ये आलो होतो.
महाराष्ट्राशी जवळचा संबंध असलेलं सांस्कृतीक बडोदा शहर.#गायकवाड_राजेंचं शहर.
प्रेक्षणीय राजवाडा असलेलं...

 तिथून बस स्टॅन्डला आलो.

 गुजरातच्या डेव्हलपमेंट बद्दल खरी खोटी ऐकीव वाचिक माहितीच आजवर होती.ती पहिल्यांदा पाहत होतो.
बडोद्याच बस स्टँड हे  ''बस स्टँड'' वाटतच नव्हतं.

 स्वच्छ शुभ्र इमारत. ठिकठिकाणी मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, बसण्याची व्यवस्थाही वेगळीच होती.
आजवर पाहिलेलं सर्वोत्तम बस स्थानक हेच!

सगळ्यात जास्त आवडलेली आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे;
 आपल्याकडे बसच्या जागेचं आरक्षण करण्याच्या दोन पद्धती असतात.एक ऑफिशयल आणि दुसरी बसच्या खिडकीतुन रूमाल किंवा बॅग टाकून संपुर्ण सीटचे आरक्षण करणे.

तिथे मात्र एक कर्मचारी खास लोकांच्या चढण्याच्या देखरेखीसाठी होता. बस लागे पर्यंत कोणालाही फलाटाच्या काठवरही येऊ देत नव्हता.ही गोष्ट विशेष आवडली.

 साडेसहाला सरदार सरोवर डॅम ला जाणारी बस आली.
तिकडे बसचा दरवाजा बसच्या मधोमध होता.बस सुरू झाली आणि थोड्याच वेळात माझंही "म्हैस " मधल्या रत्नागिरी-मुंबई बसमधल्या प्रवास्यांसारखं नाही नाही नाही हो हो हो
 सुरु झालं कारण रात्रभर झोप झाली नव्हतीच.

साडेदहाला अहमदाबाद हायवे वरील एका छोट्या गावी बस थांबली. तेच गरुडेश्वर होतं.

प्रथमच नर्मदा नदीचं जवळुन दर्शन..स्नान करणार होतो..टेंबे स्वामींचं..त्यांच्या जवळ नेहमी असलेली छोटी दत्त मुर्ती..यांचं दर्शन करणार होतो म्हणुन आनंदी होतो.

तिथल्या छोटेखानी संस्थानात पोहोचलो.मला राहायला एक साधी खोली मिळाली.खोलीत पाठीवरची सॅक टाकुन कधी स्मामींच्या समाधी दर्शनाला आणि नर्मदा किनारी जातो असे झाले.

त्या तीन दिवसातील तिथलं वातावरण,परिक्रमावासींच येणं जाणं..आणि नाशिकच्या पवार आडनाव असलेल्या शिक्षक असलेल्या परिक्रमावासी नवरा बायकोंनी सांगितलेला त्यांचा अनुभव कधीच विसरणार नाही.




-अभिजित पानसे

नर्मदेत दिवे..तो माणूस..



दुपारचा महाप्रसाद घेउन गाव कसं आहे ते पाहायला गेलो तेव्हा एका रस्त्यात एक गोरा फॉरेनर दिसला. मला खुप आश्चर्य वाटलं कारण विदेशींना ऋषिकेश बनारस इ. ग्लॅमराइज्ड भारतीय धार्मिक स्थळांचे आकर्षण असतं.मग या आदिवासी भागात हा कसा काय याचं आश्चर्य वाटलं.

त्याच्याशी बोलल्यावर कळलं की त्याचं नाव अँड्र्यू सिम्पसन. तो ऑस्ट्रेलियन होता. त्याने सांगितलं की तो ट्रेकर आहे.आजवर तो अमेरिकेत 10000 किमी चालला आहे.
त्याला भारतात हिमालयात चालायच होतं.त्याच्या इंग्लंडमधील मथुरा दास नावाच्या मित्राने  त्याला नर्मदा परिक्रमेबद्दल सांगितलं.

तो ट्रेकर जे बोलला ते मला स्पष्ट अस्पष्ट काहीसं त्याच्याच शब्दात आठवतं तो म्हणाला होता ''आय बिलॉन्ग टु नो रिलीजन बट स्टिल आय फेल्ट एनर्जी अँड पॉवर ऑफ नर्मदाजी व्हेन आय बेद इन हर अँड सीट ऑन द बँक ऑफ नर्मदाजी!!'' याबद्दल मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्यांची भावना श्रद्धा असते म्हणुन त्यांनी असं म्हणणं..उचित वाटलं असतं. पण इथे हा असं बोलतोय!!

त्याने सांगितलं की त्याला आता वेळ नसल्याने तो परत जातोय पण पुन्हा तो परत येऊन परिक्रमा पूर्ण करणार आहे.त्याने त्याचा मेल आयडी ही दिला होता.

मी काही पुस्तकात तसंच  ''सौ प्रतिभाताई चितळे'' यांनीही नर्मदेत दिवे सोडण्याबद्दल बरंच सांगितलं आहे.
मलाही ते आठवुन खुप इच्छा झाली की पहिल्यांदाच आलोय तर आपण पण नर्मदेत दिवे सोडावेत.
अग्निबद्दल तर मला विशेष आकर्षण आहे. निरंजन, पणती, यज्ञातील , होमातील अग्नी, मशिदीतील जळणारा गोवऱ्यावरील ऊद, मंदिरातील राळ, उदबत्ती, धूप प्रचंड आवडतं..लहानपणी नदीत दिवे सोडलेले बघायचो तेव्हाही विलक्षण आनंद व्हायचा, दिवे प्रवाहसोबत तरंगत हळुवारपणे वाहत जाताना बघून..
खूप इच्छा झाली दिवे सोडावेत नर्मदेत!
पण माझ्याकडे काहीही नव्हतं, कोणत्याही तयारीशिवाय मी गेलो होतो.
पण गावात दुकानात काहीतरी नक्की विकत मिळेलच असं वाटलं.

म्हणून पुन्हा परत गावात फिरलो पण अगदी छोटं खेडेगाव. ठरावीक दुकानं ते हायवेपाशी!
 गावात छोट्या घरात किंवा झोपडीत चिप्स, खरमुरे, कुरकुरे टांगलेले असायचे म्हणुन त्याला दुकान म्हणायचं.
मी प्रवाहात सोडायला दिवे मिळतील का सगळीकडे विचारलं पण कुठेच काहीही मिळालं नाही कोणी म्हटलं की फुलवाती मिळतील पण त्याचा उपयोग काहीच नव्हता मला. सगळे म्हणायचे की दिवे लोक घरूनच आणतात, तयारीने येतात.
माझा विमोड झाला, मी परत खोलीत आलो. खूप वाईट वाटत होतं. इच्छा अपुर्ण राहिली म्हणून. पुन्हा कधी येता येणार माहिती नव्हतं.

 संध्याकाळचे 5 वाजले होते मी नर्मदा किनारी खाली गेलो. प्रथमच याची देही याची डोळा दर्शन घेत होतो. सरळ पाण्यात पाय कसा टाकावा!! कारण ती तर नर्मदा मैय्या असते परिक्रमावासीं ची! तिथल्या सर्व लोकांची! मी परिक्रमावासी नव्हतो, पण भाव आणि आदर दाटला होता.
अश्यावेळी श्रद्धा उचंबळून येते म्हणुन मी प्रवाहाला प्रथम नमस्कार केला. मनापासुन धन्यवाद म्हटलं. हाताने पाणी घेऊन डोळ्यांना लावलं मग आत उतरलो.
थोड्यावेळाने बाहेर येऊन काठावर पायरीवर बसलो.

एव्हाना सूर्य पश्चिम क्षितिजाकडे कलत होता. आकाशात केशरी रंग दाटला होता. मी हा विचार करत होतो याक्षणी दिवे सोडले असते तर किती सुंदर आणि प्रसन्न वाटलं असतं. मागुन एक माणूस आला माझ्या शेजारीच त्याची नायलॉन ची पिशवी ठेऊन नर्मदेत एक बुडी मारून क्षणात बाहेर आला आणि हात कोरडे करून पिशवीतून सामान बाहेर काढलं त्यात छोटे छोटे द्रोण होते आणि फुलवाती होत्या. प्रत्येक द्रोणात एकेक फुलवात ठेऊन ती पेटवू लागला. मला प्रचंड आनंद झाला!!

मला खुप इच्छा झाली विचारण्याची की मी यातील काही दिवे सोडु शकतो का? पण मला अवघडल्यासारखं वाटत होतं मी कसं म्हणावं त्याला! थोडं अवघडुन शेवटी विचारलच तर तो म्हणाला ''हां जी बिलकुल!उसमे क्या पुछ ने की बात है समझो आपके लिए ही लाए है!''

सांगु शकत नाही किती आनंद झाला मला!!मी त्यातील अर्धे दिवे सोडले. बाकी त्याने.
मी त्यांना म्हटलं की तुम्ही पैसे घ्या याचे! पण मी इथे तीन दिवस आहे तोवर तुम्ही रोज आणु शकाल का!

 त्याने पैसे घ्यायला स्पष्ट नकार दिला म्हणाला ''जब तक आप हो हम रोज आपके लिए दिए लाते रहेंगे..!
त्यांनी सांगितलं की जवळच्याच एका खेड्यात राहतात.
                                                        (हाच तो दिवे आणणारा माणूस)

 मी किती तरी वेळ किनाऱ्यावर बसायचो. किनाऱ्यावर भयंकर डास असायचे.त्याकाळात डेंग्युची साथ प्रचंड होती.म्हणुन मी अंगाला ओडोमाॅस फासुन किनाऱ्यावर भरपुर वेळ बसायचो..
पलीकडे दुर प्रसिद्ध शूलपाणेश्वराचं जंगल आणि पर्वत दिसायचे.

प्रवाहात सोडलेले दिवे शांतपणे खुप वेळ तेवत राहायचे. दोन महाभूतांचं ते निकट ते निकट सानिध्य खूप सात्विक आनंद देऊन जायचं.
 सूर्यास्त व्हायचा..त्या सांजवेळी अंधारात पाण्यातील दिवे तेवत राहायचे आणि वर चंद्रकोर प्रकाशित व्हायची..ते दृश्य खुप आवडायचं. तेवढ्यात पलिकडच्या तिरावरील एका खेड्यातील मंदीरात आरती सुरू व्हायची. ढोल वाजायचा..ते ऐकायला खूप मस्त वाटायचं. तो ढोल आणि आरती संपली की या तीरावरील वर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या समाधी मंदीरात आरती सुरू व्हायची.ती संपली की त्याच्या वरील दत्त मंदिरातील आरती सुरू व्हायची.मग ''अघोरकष्टोद्धरण स्तोत्र'' म्हटलं जायचं.
रात्री 9 नंतर सर्व सामसुम व्हायचं.

तो माझा तिथला पहिला दिवस होता.त्यामुळे मला तिथली रात्रीच्या जेवणाची वेळ माहिती नव्हती.त्या संबंधीत एक अनुभव आला.
दुसऱ्या दिवशी नाशिकचे परिक्रमावासी नवरा बायको भेटलेत त्यांचा अनुभव न विसरण्यासारखाच!!

(अंतीम भाग पुढे.)

-अभिजित दिलीप पानसे.

प्र.से. मोदी जा.रा. पवार भेट जणू हरिहर भेटच जणू! 😜😜😛




नरेंद्र शरद भेट जणू हरीहर भेट

13 नोव्हेंबर 2016

आज कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे "हरीहर भेटीचा" दिवस. आज शंकर आणि विष्णू  त्यांच्या रोजच्या डेली हेक्टिक शेड्युल, ऊप्स सध्या स्केड्युल म्हणण्याचं "फ्याशन" आहे; तर आपल्या ;प्रार्थनेच्या फायली रिसिव्ह करणं,त्या चेक करून काहींवर सह्या करून त्या स्यांक्शन करणं,काही स्टँड बाय ठेवणं,तर बऱ्याच रिजेक्ट करणं इ. 24/7 बिझी हेक्टिक स्केड्युल  मधून आज वेळ काढून शंकर आणि विष्णू एकमेकास गळाभेट करतात!
 त्यांच्या मैत्रीला आज इतकं  इतकं उधाण येतं की आजच्या दिवशी शंकराला तुळस आणि विष्णूला "बेलपत्र" वाहिल्या जातं.
एकमेकास हॅंडशेक करू अवघे धरू सुपंथ !

आज नरेंद्र भाई मोदी द लॉयन आणि पवार साहेब ,द पावर हाऊस आज आपल्या याच मुहूर्तावर भेटलेत!😉😛
 "मी शरदरावांकडून राजकारण शिकलो इति नरेंद्र भाई मोदी,प.पु.प्र.
"मोदींनी पाचशे आणि हजार च्या नोटा रद्द करून योग्य केलं.मोदी देशाकरिता चोवीस तास काम करतात!इति मोठे सायेब जाणता अजाणता राज्जा!!!

हे म्हणजे फेसबुकीय संप्रदायाप्रमाणे झालं,"एकमेकांस लाईक करू अवघे धरू सुपंथ"

"बराबर छे ना शरद भाय!आव एक सेल्फी आपडु छे!!"

"अगदी बरोबर नरेंद्र भौ!! बरं आपलं ते राष्ट्रपती पदाचं बघा की आता !"

(Tek it on the light "Pink NOTE"😛)

-अभिजित पानसे

नर्मदे हर "तुज आहे तुजपाशी..तिसरा भाग

गरूडेश्वर नर्मदेहर
प्रवास वर्णन तिसरा भाग

रात्रीच्या आरतीला मी हजर राहिलो.रात्रीच्या जेवणाची सशुल्क व्यवस्था असते हे वाचलं होतं.पण नंतर कळलं की फक्त दुपारीच महाप्रसाद असतो.रात्री फक्त परिक्रमावासींसाठीच जेवणाची व्यवस्था असते.

रात्री साडे नऊ वाजता त्या खेडेगावात मला खायला कुठे काय मिळणार होतं!!
2 अडीच किमी हायवेपर्यंत जाण्याचा कंटाळा आला होता. आणि तिथेही सर्व सामसुम झालंच असणार होतं!!

जवळपास काही मिळतं का शोधलं.एक म्हातारी  टेंभ्याच्या प्रकाशात खरमुरे कुरकुरे असलेलं काही समान आवरत आपली दुकानाची झोपडी मोठा निळा प्लास्टिकचा कापड टाकुन बंद करत होती.  तिच्याकडून मी 3 4 कुरकुरेचे पाकिटं घेउन परत आलो.

पोटातील ओरडणारे कावळे कावकाव करत एकमेकांवर तुटून  पडले होते.आपापल्या चोचींनी माझ्या जठरावर प्रहार करत होते.

मनात तेव्हा विचार आला की लोकं तर फार म्हणतात की नर्मदा माता तिच्या किनाऱ्यावर राहिलेल्याला कधी उपाशी ठेवत नाही.
रात्री एका व्यक्तीशी फोनवर बोललो तेव्हाही तिला मी हेच म्हणालो.

उपाशी पोटी रात्रभर झोप लागणं अशक्यच त्यामुळे वाचत बसलो.दर एक तासाने मंदिराच्या बाहेर एक तिथला कर्मचारी घंटा वाजवायचा. जितके वाजले असतील तितका घंटानाद करायचा.रात्रभर मी त घंटानाद ऐकलेत.खूप मस्त वाटायचं शांत गंभीर रात्री तो घंटानाद ऐकताना!

सकाळी सुर्योदयावेळी खाली घाटावर गेलो. गावातील बरेच लहान मुलं अंघोळीला पोहायला अाली होती.मी खाली किनाऱ्यावर उतरून प्रवाहाच्या काठाकाठाने बराच दुर चालत गेलो.किनाऱ्याकाठचा सूर्योदय पूर्णपणे अनुभवला.

पाण्याचे बदलणारे रंग बघितलेत. सूर्योदयापूर्वी च्या अंधुक प्रकाशात राखाडी दिसणार प्रवाह उदयासोबत केशरी होताना व जसजसा सूर्य वर येत गेला सूर्याचं सोनेरी प्रतिबिंब नर्मदेत दिसू लागलं. सूर्य सुद्धा प्रातःकाळी नर्मदा स्नान करायला नर्मदेत उतरला होता.त्याच्या तेजाने नर्मदा माई झळाळून निघाली होती.
(नर्मदा घाट, गरुडेश्वर, प्रातःकाळी)
मी परत घाटावर आलो. काही म्हातारे परिक्रमवासी घाटावर पायरीवर बसून त्यांची पूजा करत होते.त्यांचा तो नियमच असतो याबद्दल सौ प्रतिभाताई चितळे यांनी बरंच सांगितलं आहे.
त्या वृद्ध परिक्रमावासींनी सांगतीलं की ते मध्य प्रदेशातील एका खेड्याचे रहिवासअसुन 2 महिन्यापूर्वी परिक्रमेला निघालेय. त्यांच्यात एक म्हातारा होता त्यांची गुडघेदुखी प्रचंड होती इतकी होती तो एका वर्षापासुन उभाही राहू शकायचा नाही!! हे लोकं परिक्रमा ला निघालेत म्हणुन ह्यानेही म्हटलं मरायचं आहे आता तर पलंगावर झिझुन मारण्यापेक्षा नर्मदा किनाऱ्यावर मरू. म्हणुन हा यांच्यासोबत आला.हे तिघं जण त्याला घ्यायला तयार नव्हते.पण एकाच गावातील असल्याने नंतर कबुल झालेत.

तो म्हातारा उभा न राहता अंग घासत एक महिना जसा जमेल तितकं अंतर पार केलं पुढे हळुहळु त्यांच्यात सुधारणा होऊ लागली.आता तो म्हातारा माणूस झपझप चालू शकतो हे त्या दोघांनी आणि नंतर त्यांनी स्वतः सांगतीलं.
या मागे काहीही रॅशनल कारण असेल पण तेव्हा विचार आला कि श्रद्धा पक्की असेल तर कसे अनुभव येतात लोकांना!! (त्यांचा फोटो खाली आहे.)


सकाळी सकाळी असं काही ऐकल्यावर फ्रेश मूड मध्ये वर खोलीत गेलो.माझी खोली मंदिर कॅम्पस च्या थोडी बाहेर होती अगदी साध्या टिनाच्या छप्पर असलेल्या 4 खोल्या होत्या.त्यातील एक.समोर छोटं अंगण त्यात मोठं कडूलिंबाचं झाड, समोर  एक मंदीर.
मी त्या मंदिरात तीन दिवस गेलोही नाही पण शंकराचं असावं वाटायचं कारण छोटा नंदी बाहेरून दिसायचा.

मी अंघोळ करून दत्त मंदिरात गेलो.याच दत्त मंदिरात टेम्ब्ये स्वामी च्या पूजेतील आणि तेव्हा त्यांच्या सतत सोबत असणारी अंगठयाच्या अाकाराइतकी दत्त मूर्ती ठेवली आहे.हीच मूर्ती एकदा  उमरेडला  वैनगंगेत पडली असता टेम्ब स्वामींनी शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता,
करूणात्रिपदी रचली होती.

परत निघायचा आदल्या दिवशी त्या मंदिराच्या प्रमुख
पूजाऱ्यांना विनंती केल्यावर त्यांनी त्या दत्त मूर्तीचं दर्शन करवलं होतं.
मी मग खाली स्वामींच्या समाधी मंदिरात गेलो डोक्यात विचार सुरू होतंच टेन्शन होतंच की रोज 3 रात्री मी काय खाणार!!
मेन रोड वरून थंड तेलकट कचोरी,फाफडा वगरे प्रकार मी रोज रात्री खाऊ शकणार नाही.

पारायणाचे अध्याय वाचुन उठलो तर समाधी मंदिरातील पुजाऱ्यांनी आवाज देऊन थांबवलं आणि सांगितलं आज  गिरनार के काश्मिरीबापु और उनके अहमदाबाद जामनगर से लोग गाडीसे परिक्रमा के लिये जाने वाले है! यहां तीन दिन के लिये रहने आने वाले है तो अगले तीन दिन रातको सभी परिक्रमावसी और यहां पारायण करने के लिये आए हुये सबको खाना के लिये बुलाया है! तो आप रोज उधर ही रात को खाना खाने जाना!!पहले वो नारेश्वरसे जाने वाले थे लेकिन सुबह ही फोन आया था की यहाॅ से परिक्रमा शुरू करने वाले है!''

मला खुप आनंद झाला पण अवघडलोही असं मी कुठेही जेवायला कसं  जाणार!मी तर सख्ख्या नातेवाईकांकडेही स्वत:हुन खायला न मागणारा आहे.

थोड्याच वेळात खूप सारे वाहनं येऊ लागलेत.

दिवसभर तिथे अधुन मधुन फटाके किंवा ब्लास्टिंगसारखे मोठे आवाज यायचे.नंतर कळलं की  सरदार सरोवर डॅमच्या बांधकामासाठी खडक फोडण्यासाठी ब्लास्टस होताहेत.

संध्याकाळी पुन्हा सुर्यास्ता समयी तो माणूस आला.नर्मदेत दिवे सोडले मग वर आरतीला गेलो तेव्हा तिथे बरेच लोक होते. आरतीनंतर अनेकांनी जेवायला चलण्याचा आग्रह केला.
मी गेलो राजस्थानी जेवण्याचा थाट होता.दाल_बाटी,पोळ्या इतर भाज्या,गुळाचा खडा,ताक,नंतर मसाला दूध.असं अत्यंत चविष्ट अन्न होतं.विचार केला काल उपाशी रात्री झोपलो आणि आज हा थाट आणि एकदम मला माझंच आदल्या रात्रीचं वाक्य आठवलं की लोक तर फार म्हणतात नर्मदा मैय्या कोणाला उपाशी ठेवत नाही. अंगावर रोमांच दाटले.पुढचे तीन रात्री रोज वेगवेगळे चविष्ट पक्वान्न खाल्लेत.मी ज्या जिवशी सकाळी परत निघालो त्याच दिवशी तेही निुघुन गेलेत.

''गरुडेश्वर हे एक पूर्ण पॅकेजच आहे''असंच मी नेहमी म्हणतो. ते प्रमुख नर्मदास्थान आहे ते वासुदेवानंद सरस्वतींचं समधीस्थान आहे.प्रमुख दत्तक्षेत्रही आहे तसंच तिथे मुळात गरुडेश्वर आणि इतर दोन पुरातन शिव मंदीरेही आहेत. त्यामुळेच त्या स्थानाचं नाव गरुडेश्वर आहे.
जसं शेगाव चं मूळ नाव शिवगाव होतं कारण तेथील मोटेंचं  पुरातन शिव मंदिर. पुढे #गजानन_महाराज तिथे आल्यानंतर त्यांच्यामुळे शेगाव ओळखल्या जाऊ लागलं.तसेच गरुडेश्वर हे  नाव व पहिली ओळख मुळात तिथल्या तीन शिवमंदिरांमुळे.पुढे वासुदेवानंद सरस्वती स्वामीनी तिथे समाधी घेतल्याने त्यांच्यामुळे गरूडेश्वर ओळखु जाऊ लागलं. मी ते तीन मंदिर शोधायचं ठरवलं 1 गरुडेश्वर 2 नर्मदेश्वर 3 कपालेश्वर.

यातील नर्मदेश्वर घाटावर खाली जातानाच डावीकडे पायऱ्यांना लागुनच आहे ते मी रोजच बघायचो.

गरूडेश्वराचं मंदीर विचारत 2 किमी दुर पायवाटेने गेलो.मंदीराच्या बाहेर नर्मदेतील बाणलिंगे ठेवली होती.आता उरलं होतं फक्त करोटेश्वर. लोकांना विचारल्यावर म्हणायचे ते मंदीर गावातच दत्त मंदिरापाशी आहे.मला खुप शोधुनही काही सापडलं नाही.

शेवटी खोलीत परत आलो.पलंगावर लेटलो होतो.आणि डोक्यात एकदम एक विचार विजेसारखा चमकुन गेला.मी वेगाने दरवाजा उघडुन बाहेर आलो आणि अंगणातील त्या समोरच्या मंदिराकडे गेलो.वर बघितलं कमानीवर नाव लिहिलं होतं ''करोटेश्वर''.

चार दिवस मी त्या मंदिरापासुन पाच पावलांवर राहत होतो पण मी लक्ष दिलं नाही.खरंच बरेचदा प्रश्नांची उत्तरे..शोधत असलेल्या गोष्टी..हवा असलेला खजिना आपल्या जवळपासच असतो पण आपण "द अॅल्केमिस्ट" मधील 'सँतियागो' सारखं तो दुरवर शोधत राहतो.