Monday 25 December 2017

कर्मा इज बिच

कर्माचा सिद्धांत सांगतो वाईट कर्मांची शि्क्षा ही मिळतेच.पुर्व जन्मी वा या जन्मी केलेल्या पापांचं फळ हे भोगावच लागतं.

मी याचा अनुभव काल घेतला.
माझ्या या आणि मागच्या जन्मांच्या पापांची शिक्षा मला काल मिळाली.ती शिक्षा म्हणजे मुळात आणखी एक स्वतंत्र पापच होतं.

आपण केलेले पुण्य कर्म आपल्याच मुखाने वदल्यास पुण्य कमी होतं असं म्हणतात.तसंच आपल्या पापांची जाहीर कबुलीमुळे पाप कमी होतं असाही समज आहे.म्हणुनच मी माझ्या #पापाची जाहीर कबुली देण्याची हिंमत करतोय.

मला माझीच लाज वाटतेय इतकं घृणास्पद कर्म केल्याबद्दल!!

मी काल रात्री 'ते' पाहिलं.
आजतागायत मी कधिही 'ते' पाहिलं नव्हतं.
आजवर ज्याचा कट्टर विरोधक, तिरस्कर्ता होतो.ते कृत्य माझ्याहातुन झालं.

तरूण मंडळीच नाही तर आजकाल आबालवृद्धदेखिल 'ते'पाहायचे.पाहतात..हे ऐकुन होतो.ते त्याच्याबद्दलचे कसले कसले तिखट मीठ लावुन वर्णनं करायचे.पण मी आजवर माझ्या मनाचा संयम ढळु दिला नव्हता.

पण काल रात्री...माझ्याकडुन ते अक्षम्य पाप घडले.
मी काल ''होणार सुन मी...''चा काही भाग  बघितला.

 कुठे फेडणार मी हे पाप??

धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक पापांचं व त्यावरील प्रायश्चित्तांचं वर्णन आहे पण या पापाच्या निरसणाला देहांत प्रायश्चित्तच तर नसणार ना!या विचाराने माझा सध्या थरकाप उडाला आहे!

कोणत्या तोंडाने जाउ मी वर देवासमोर?
ते गुप्ता अंकल;चित्रगुप्त यमाचे  लेखणिक; माझ्या नावाच्या फाईलीत हे पाप लिहितीलच!!

माझे भविष्यातील नातवंडे भविष्यात मला यावरून किती टाकुन बोलतील ''शी~आजोबा तुम्ही टिव्ही सिरीयल बघायचे!!''

माझा भविष्यातील मुलगा;समाजाने त्याच्या हातावर  गोंदवायच्या पुर्वी तोच रागारागाने स्वत:च स्वत:च्या हातावर गोंदवुन घेईल''मेरे बापने  होणार सुन मी त्या घरची का एक एपिसोड देखा था!''

''मनाचा संयम पाळा टिव्ही सिरीयल्स टाळा''

हे माझे सुत्र मीच काल पाळले नाही  आणि आजवर जपलेले माझे ''पावित्र्य'' काल 'भंग' झाले.
आता कोण होणार सुन आमच्या घरची?

-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment