Wednesday, 27 December 2017

कुतुब मिनारवरील गणपती

*कुतुब मिनार चा विध्वंसीत गणपती*
एक धक्कादायक अनुभव( किमान माझ्यासाठीतरी)

इतर देशावर आपलं राज्य स्थापन करताना तेथील सांस्कृतिक , धार्मिक वास्तू नष्ट करत जाण्याला कोणी चुकीचं समजतात तर काही त्याला प्रक्रियेचा भाग म्हणतात.

संपूर्ण भारतात डोळसपणाने पाहिलं तर दिसेल आणि लवचिक विचारांनी अवलोकन केलं तर हे स्वीकारावच लागेल की आक्रमकांनी आणि नंतर त्याच राज्यकर्त्यांनी या अनेक जागा हिंदू धार्मिक स्थळांना नष्ट करून तिथेच  वास्तू उभारण्यात आले आहे. त्यावर आपापल्या धर्मातील काही वचन कोरले.

पण अनेक वर्षे एकच रंग असलेल्या भिंतीला दुसरा रंग फासला तरी काही काळाने आधीचा मूळ रंग कुठून तरी पृष्ठभागावर येतो.

संपूर्ण देशात असे अनेक विध्वंसित वास्तु दिसतात. ते बघताना लोक कधी तटस्थपणे , कधी हळहळत बघतात.  पण कधी जगविख्यात वास्तू बघताना , खरेतर फक्त सेल्फीज, ग्रुप फोटोज काढताना कित्येक गोष्टीकडे, मूळ रंग बाहेर आलेला याकडे साफ दुर्लक्ष होतं. आणि अनावधानाने त्या आधीच्या इतिहासाची पायमल्ली, अपमान करत जातात. तुडवत जातात.

मी 'कुतुबमिनार' बघायला भावासोबत गेलो होतो.मिनार आणि कॅम्पसचा भाग जबरदस्त सुंदर वाटला. अक्षरश: फोटोग्राफी पॅराडाईझ!
मी तर पूर्णतः हरवून गेलो ते सारं बघताना आणि त्याचं कौतुक करताना!

तिथला सुप्रसिद्ध #लोहस्तंभ बघतांना समोर लक्ष गेलं तेव्हा एक दोन यंग मुलं बुटांना लागलेली माती जवळच्या कलाकुसरच्या पुरातन शिल्पकामातुन वेगळी झालेल्या एका शिळे ला पुसत होते.
हे फक्त आपल्याकडेच होउ शकतं.ते पाहुन मित्राला म्हणालो हे बघ ते **** काय करताय!

थोडया वेळात सर्व परिसर , कुटूंब मिनारची सुंदर वास्तुकला बघत तिथे पोहोचलो.आजूबाजूचं इतकं अप्रतिम काम आहे की खालील त्याच बांधकामापासुन वेगळ्या झालेल्या 'त्या' शिळे कडे कोणाचंही सहसा लक्ष जात नव्हतं.जात नाही.लोकं त्यावर बसत होते.त्यावर उभे राहुन फोटोज काढत होते.

मला तो भाग दिसला तसा प्रचंड आश्चर्याचा सुखद आणि दुःखद धक्का बसला!
कारण स्पष्टपणे त्यावर 'गणपती' कोरलेला दिसत होता!

पण माझा 'देऊळ' मधील औदुंबरावरील ओरखड्यांमध्ये दत्त बघणारा भाबडा गावकरी होऊ नये म्हणून मी अनुरागला ला जोरात आवाज दिला कारण त्याला असल्या गोष्टीत ,सोशिअल थिंग्स, पुरातन वास्तुकला, यात काहीही रस नसल्याने आणि त्याचा आस्तिकता वगैरे शी दूरदूर संबंध नसल्याने मी त्याला बोलावलं.
 तो एका जापनिज मुलीशी बोलण्यात मग्न होता.
तो आल्यावर त्याला दाखवलं तर तोही आश्चर्यचकित होउन उद्गारला " **  हा तर गणपती आहे!इथे कसा काय?"

मग मी आजुबाजुला नीट लक्षपुर्वक बघु लागलो तर आजुबाजुला कित्येक खांबांवर हिंदु मंदिरांवर असते तसं कार्विंग्स..कलाकुसर शिल्पकला दिसु लागली.

आणखी धक्का बसला त्याच खांबावर एक कंबरेवर हात असलेलं  पांडुरंगाचं शिल्प दिसलं.
पण दक्षिणेतला विठ्ठल इथे उत्तरेकडे कसा! हा प्रश्न पडला.तेव्हा क्लीक झालं की हे विठ्ठलाचं नाही तर नरसिंहाचं आहे.मांडीवर झिज झालेला हिरण्यकश्यपु दिसतो.

कारण पुर्वी मंदीरांमध्ये 'दशावतरांचे' शिल्प कोरलेले असायचे.

मला कुतुब मिनारासम्बंधीची ही बाजू बिलकुलही माहिती नव्हती.सर्वप्रमाणेच मीही या मिनारला मुघलांची कलासक्ती आणि देण समजयचो. किंबहूना ती आहेच. पण हा मिनार हिंदू वास्तू विध्वंसित करून निर्माण केला आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे तो मोठा धक्का होता.

नंतर माहिती शोधली तेव्हा कळलं कुतुबुद्दीन ऐबकने आणि त्याच्या नंतरच्या पिढीने;कुतूब मिनार आहे तेथिल २७ हिंदु आणि जैन मंदिरांचा विध्वंस केला आणि तिथे हा मिनार उभारला.

मुघल राज्यकर्त्यांचा हा विध्वंस किंवा स्ट्रेटजी संपुर्ण भारतात दिसते.अगदी नागपुरजवळील छोटंसं गणपतीचं ठिकाण आदासा तिथेही कित्येक मुर्ती धडापासुन खंडीत केलेल्या दिसतात.मथुरेतील राजस्थानी लाल दगडांचं अप्रतिम सहा मजली मंदीराचा औरंगजेबाने विध्वंस केला होता. जे आताही बघण्यासारखं आहे. त्यावरून आधी ते किती सुंदर असेल याची कल्पना करता येते.

हे फोटोज विद्वेष पसरवायला नाही तर खरा इतिहास आणि भारतीय पुरातन संपन्न वास्तुकला, लिगसी लोकांपर्यंत पोहचावी आणि समजावी यासाठी.

जेव्हा मी अनुरागला हे सगळं कुतूब मिनारासहित सांगितलं तेव्हा त्याच्यासारखा फक्त गॅजेटफ्रिक ही  आश्चर्यचकित होउन बोलला "साला माहिती नव्हतं बे हे !या नंतर कधी कोणासोबत कुतूब मिनारला आलो तर हे गणेश कार्विंग नक्की दाखवीन! **** इतर मित्रांनाही सांगतो!

भारतीय पुरातन वास्तुकला,ग्रंथालये हे खूप अद्वितीय होते.आक्रमकांनी, राज्यकर्त्यांनी त्याचा सतत फक्त देशभर विध्वंस केला. हे अश्यावेळी दिसून येतं. मग एकतर तटस्थपणे फक्त बघता येतं किंवा हळहळता येतं.

पण दुर्लक्ष केल्यामुळे , फोटोज मध्ये गुंग असल्यामुळे मात्र त्या शिळेवरील दुर्लक्षित गणपतीला मात्र लोक पायाने तुडवतात. बसतात, शु लेस बांधतात. याकडे तटस्थपणे बघायचं , हळहळ व्यक्त करायची की दुर्लक्ष करून समोर जायचं ही ज्याची त्याची विचार प्रक्रिया.

-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment