Sunday 30 December 2018

"आईने मला जीवनावर प्रेम करायला शिकवले" - सचिन पिळगावकर"






“आईने मला जीवनावर प्रेम करायला शिकवले! ती माझं आराध्य आहे! तिच्यामुळे मी जीवनावर समरसून प्रेम करतो!” सचिन पिळगावकर म्हणालेत.

“सचिनचे वडील गेल्यावर त्याने शिक्षण पूर्ण न करता स्वतः घराची आर्थिक जबाबदारी स्वीकारली, संपूर्ण घराला स्वतःच्या मेहनतीने चालवले! 23 वर्षाचा मुलगा मनाने परिपक्व झाला होता!”
चेहऱ्यावर सात्विकता, स्पष्टपणे जाणवेल असं उत्साही, प्रफुल्लित व्यक्तिमत्व असलेल्या सचिन पिळगावकरांच्या आई
उत्साहाने, प्रेमाने सचिनजींबद्दल सांगत होत्या. सचिन पिळगावकरांचा नवा चित्रपट “लव यु जिंदगी” येतोय त्याबद्दल त्या बोलत होत्या. त्यांनी सचिनजींच्या व्यक्तिमत्त्वातील  प्रेक्षकांना, बाहेरील व्यक्तींना माहित नसलेले अनेक पैलू सहजपणे सांगितले. “हा माझा मार्ग एकला” चित्रपटासाठी बाळ सचिनला मिळालेला राष्ट्रीय अवॉर्ड, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना जवळ घेऊन स्वतःच्या जॅकेटवरील गुलाबाचं फूल काढून बाल सचिनच्या  शेरवानीत लावले तो क्षण त्यांच्या जीवनातील एक सर्वोत्तम क्षण होता असे त्या म्हणाल्यात. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच “लव यु जिंदगी”चा अनुभव देणारा तो क्षण होता.
सचिन लहानपणापासून त्यांच्याशी खूप जवळ होता. ते भावनिक नातं अजूनही तितकंच कायम आहे असे त्या म्हणाल्यात. तो माझी खूप काळजी घेतो, कधी मी बाहेरून आली असता माझ्यासाठी सँडविच किंवा इतर काही पदार्थ करतो. लहानपणीही मला कायम तो कामात मदत करायचा. भांडी घासून द्यायचा. त्याला नको म्हटलं तरीही , “हो फक्त इतकं करतो आणि खेळायला जातो!” म्हणायाचा. त्याला कळत असायचं आपली आई एकटी काम करतेय! सचिनजींच्या आई सचिनजींचे एकेक पैलू उलगडून सांगत होत्या.
सिनेमात करत असलेली प्रत्येक भूमिका सचिन आईला अजूनही सांगतात.
सचिन आजही इतके टवटवीत, प्रेमाने ओथंबून, संपूर्णपणे जीवन जगणारे कसे आहेत, त्यामागील रहस्य काय हे विचारल्यावर आई म्हणाल्यात “त्याच्यावर सगळ्यांनी केलेलं प्रेम! त्याला घरून प्रचंड प्रेम मिळालेलं आहे, कायम मिळतं. त्याला त्याच्या बायको सुप्रियाकडून, बहिणीकडून, मुलगी श्रियाकडून, प्रचंड प्रेम मिळालंय. त्याच्यावर त्याच्या प्रत्येक दिग्दर्शकाने प्रेम केलंय. यामुळे तो कायमच प्रेमाने ओथंबून असतो. म्हणूनच त्याचं जीवनावर प्रेम आहे. तो समरस होऊन जगतो. घरातसुद्धा प्रत्येक कामात पुढे असतो. त्याच्यात एक लहान मूल स्पष्टपणे वास करतं. आणि त्याने त्याला कायम जपलंय. या सगळ्या कारणामुळे तो सगळयांवर प्रेम करतो, सगळ्यांना मदत करतो.
आई पुढे म्हणाल्यात की सचिन घरांत खूप सुंदर नातेसंबंध , त्यांच्यातील प्रेम, खेळकरपणा टिकवून ठेवतो. तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो तितकंच त्याचं सुप्रियावरही प्रेम आहे! तितकंच प्रेम आणि जबरदस्त बॉंडिंग श्रियासोबतही त्याचं आहे! बहिणीसोबत तर त्याचं नातं विलक्षण सुंदर, प्रेमाचं आहे. तो कोणालाही नाराज करत नाही. त्याच्यामुळे घरातील संपूर्ण नाती एकजूट आहेत.

लव यु जिंदगी चित्रपट बघितल्यावर काय वाटलं, चित्रपट कसा  वाटला विचारल्यावर त्या म्हणाल्या की आजवर त्यांनी सचिनचे कित्येक चित्रपट बघितले. लव यु जिंदगी सिनेमाही त्यांना तितकाच आवडला. चित्रपटातील दोन्ही पात्रे त्याने सुंदर साकारली आहे म्हणाल्यात.

आईच्या शेजारी बसलेली सचिन पिळगावकरांची धाकटी बहीण, त्यांनीही सचिनबद्दल त्या दोघ्या बहीण भावांच्या नात्याबद्दल सांगितलं. यांतून सचिनजींचे वेगळे पैलू कळले, त्यांच्यातील माणुसकी, समंजसपणा कळला.
तुमचं आणि सचिनजींचं नातं कसं आहे विचारलं असता त्या म्हणाल्या “वडील आणि मुलीप्रमाणे नातं आहे!” तेव्हा सचिनजींच्या आई म्हणाल्या, “देव आहे हिच्यासाठी तिचा भाऊ म्हणजे! पान हलत नाही भावशिवाय तिचं!”
त्यांच्या बहिणीनेही  सांगितलं की सचिन संपूर्णपणे फॅमिली मॅन आहे. कायम उत्साहात असतो. घरांत प्रत्येक गोष्टीत त्याचं लक्ष असतं. ती पर्फेक्ट करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्या हसत सांगू लागल्या की सचिनला काही गिफ्ट मिळालं की पहिले ते आईकडे आणून देतो जेणेकरून कोणी ते प्रथम उघडू नये, त्यालाच पहिल्यांदा बॉक्स उघडायचा असतो. अत्यंत गोड व्यक्ती आहे. जीवन समरसून जगतो. स्वतःवर प्रेम करतो. स्वतःच्या मनाला आवडेल तसं जगतो, तसे कपडे घालतो कारण त्याला त्यात आनंद मिळत असतो. आई त्याचं दैवत आहे! दोघेही एकमेकांसाठी भावनिकदृष्ट्या प्रचंड जवळ आहेत.

सचिनजींच्या बहिणीला त्यांच्या आयुष्यातील लव यु जिंदगी म्हणावसा, जाणीव करून देणारा क्षण विचारला असता, किंवा सर्वोत्तम क्षण जेव्हा आयुष्यावर प्रेम उफाळून आलं, विचारलं असता, त्या म्हणाल्या जीवनावर प्रेमापेक्षा आपल्या कुटुंबाचा अभिमान वाटावा असा एक क्षण त्यांना तीव्रतेने आठवतो. त्या म्हणाल्या त्यांना भावाचा आणि आईचा एक संवाद आठवतो. त्यावेळी त्या लहान होत्या त्यामुळे त्या संवादाची खोली त्यांना त्यावेळी तितकी कळली नाही पण काही काळाने मात्र आजतागायत त्याचं महत्व आणि कुटुंबाचा त्यांना अभिमान वाटतो. बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा सचिन यांचा आर्थिकदृष्ट्या काहीसा वाईट काळ सुरू होता, तेव्हा एका निर्मात्याने त्यांना चित्रपटातील भूमिकेसाठी त्या काळातील  एक मोठी रक्कम दिली होती. पण काही दिवसांनी त्या निर्मात्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तेव्हा खोलीत सचिन आईला म्हणत होते, “मला त्यांनी चित्रपटासाठी पैसे दिले आहेत. पण आज ते हयात नाही. त्यामुळे चित्रपटही आता तयार होणार नाही. म्हणून त्यांनी मला दिलेले पैसे त्यांच्या कुटुंबीयांना परत करायला हवेत. तुला काय वाटतं?”
आईने तात्काळ ‘हो’ म्हंटलं, आणि त्यांचे पैसे त्यांना परत करायला सांगितले.  या घटनेमुळे त्या म्हणाल्यात की मला खूप अभिमान वाटतो आमच्या कुटुंबाचा! आमच्या कुटुंबातील संस्कारांचा हा भाग आहे.

सचिन पिळगावकरांच्या बहिणीलाही “लव यु जिंदगी” चित्रपट खूप आवडला. त्या म्हणाल्या, मी जशी अपेक्षा केली होती त्याहून पटीने चित्रपट छान झाला आहे. त्यांनी दिग्दर्शक मनोज सावंत यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं. शिवाय लेखकांनी चित्रपट खूप चांगल्या प्रकारे लिहिलाय, संवादलेखन सुरेख जमलंय म्हणाल्यात.

सुप्रिया पिळगावकरांना सचिनजींच्या जिंदादील स्वभावाच्या मागचं कारण विचारलं असता त्या म्हणाल्या तो आधीपासूनच तसा आहे. यात त्यांचं स्वतःचं काहीही योगदान नाही. उलट सचिनमुळे मलाच खूप शिकायला मिळतं, त्याचा  उत्साह बघता आपल्यातच उत्साह संचारतो.
नवरा म्हणून त्याने कायम स्वातंत्र्य दिलं. घरातील प्रत्येक सदस्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलंय म्हणाल्यात. त्यांनाही लव यु जिंदगी चित्रपटाबद्दल खूप उत्कंठा आहे म्हणाल्या.

सचिन पिळगावकर नेहमीप्रमाणे उत्साहात होते. बॅडमिंटन खेळायला जात असताना त्यांनाही चित्रपटसंबंधी काही प्रश्न विचारले.
हा चित्रपट करताना, अनिरुद्ध दातेची भूमिका साकारताना त्यांना काय वाटलं, अनिरुद्ध दाते आणि त्यांच्यात साम्य वाटलं का, भूमिका करताना वेगळी तयारी करावी लागली का विचारल्यावर सचिनजींनी निवांत सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत.
“अनिरुद्ध बाळकृष्ण दाते”चं पहिलं रूप साकारताना नक्कीच तयारी करावी लागली. त्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची असुरक्षितता आहे, अश्यावेळी त्याचं चालणं, हातवारे, बोलणं यावर मला काम करावं लागलं. पण ‘अनि’ ची भूमिका करताना मात्र मला काहीही वेगळी तयारी करावी लागली नाही कारण मी तसाच आहे, मी तसाच जीवनावर प्रचंड प्रेम करतो. दिलखुलास जगतो.
त्यांच्या आयुष्यातील लव यु जिंदगी क्षण कोणता विचारल्यावर त्यांनी अनेक क्षणांना उजळणी दिली. पहिला चित्रपट, मिळालेला पहिला नकार, नॅशनल अवॉर्ड, सुप्रियासोबत विवाह, श्रियाचा जन्म हे सारे त्यांचे लव यु जिंदगी क्षण म्हणजे जीवनावर प्रेम करायला लावणारे क्षण सांगितले.

लव यु जिंदगी चित्रपट त्यांच्या कारकिर्दीत, आयुष्यात एक महत्वाचा  चित्रपट नक्कीच असणार असे ते म्हणाले.
दिग्दर्शक मनोज सावंत यांचा पहिलाच चित्रपट आहे, तुमचा त्यांच्याशी कसा मेळ साधला गेला विचारलं असता, त्यांनी सांगितलं की ते मनोज सावंतला दहा वर्षांपासून ओळखतात. त्यांच्यात केमिस्ट्री बऱ्याच वर्षांपासून आहे. एकापेक्षा एक एक कार्यक्रमाचे मनोज सावंत दिग्दर्शक होते. मनोज सावंतबद्दल त्यांचं मत फार छान आहे हे जाणवलं. ते म्हणालेत, “मी मनोजला अधिकाराने काहीही सांगू शकतो पण ते ऑफ द सेट. सेटवर मी डिरेक्टर्स ऍक्टर असतो!”

मोठे कलाकार साधारणतः मोठया बॅनरचा चित्रपट करायला बघतात, लव यु जिंदगी चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडे हे पहिल्यांदाच चित्रपटाची निर्मिती करताहेत. तेव्हा या सिनेमाला तुम्ही कसे तयार झालात विचारल्यावर सचिन पिळगावकर म्हणालेत “प्रत्येक बॅनर हे कधीतरी नवखंच असतं. चित्रपट निर्मात्याची नियत काय आहे, तो कोणत्या भावनेने चित्रपट बनवतोय हे माझ्यासाठी महत्वाचं असतं. सचिन बामगुडे ही खूप चांगली व्यक्ती आहे. त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये उज्जवल भविष्य आहे!”

हा सिनेमा प्रेक्षकांनी का बघावा विचारलं असता सचिन पिळगावकर म्हणालेत, जो आयुष्यावर प्रेम करतो, ज्याला जीवनावर प्रेम करायचंय, काही करायचं राहून गेलं असं वाटतंय त्यांनी हा सिनेमा बघावा. जे जिंदादील लोक आहेत, जे स्वतःवर प्रेम करतात, ज्यांना स्वतःवर प्रेम करायचंय त्यांनी हा सिनेमा बघावा. ज्यांना स्वच्छ कौटुंबिक करमणूक हवी आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे.




- अभिजित पानसे

Thursday 6 December 2018

महादेव की कसम

दुसरा भाग


“ये कहानी थी मेरी..
लेकीन हमारा शरीर था जो हमे छोड चुका था!
लेकीन इस दिल मे आग अब भी बाकी थी!
हम उठ सकते थे! बोल सकते थे!
अबे कोई तो आवाज दे के रोख लो
आज भी ये लडकी हां बोल दे तो महादेव की कसम अब भी वापस आ जाये!
पर नही अब साला मूड नही
आखे मूंद लेने मे ही भलाई है!
पर उठेंगे कही उसी गंगा किनारे डमरू बजाने को उसी बनारस के गलियो में दौडने कों.. किसीं झोया के प्यार मे फिर से पड जाने को”

१३ जून २०१३ला डेहराडूनला पीवीआर चित्रपटगृहात ‘रांझना’ बघताना शेवटच्या या ओळी ऐकताना भावनिक झालो होतो. १७ जून त्या दिवशी हेच वाक्य मनाच्या पृष्ठभागावर येत होते. मी चिंब भिजलेलो , थंडीत एका ठिकाणी पडलो होतो. आजूबाजूला जंगल. लोकांचा आक्रांत कानी पडत होता. ग्लानीत जात होतो. कदाचित ती शेवटची वेळ असावी असं जाणवत होतं. डोळ्यासमोर सगळा भूतकाळ येत होता. तेवढ्यात एक  नेहमीचा आवाज ऐकू आला.  नोकियाच्या विंडो फोन चा तो आवाज होता.

ते पाच दिवस

“ओह शीट!  ओहह माय...गॉड!” मित्राची जोरदार किंचाळी ऐकू आली.
“ जितू ये देख क्या मिला है!” पुढच्या क्षणाला तो दबक्या आवाजात  दोन मोठ्या दगडांमध्ये झुडुपात बघत मला उद्देशून ओरडला. त्याला त्याच्या आवाजावर नियंत्रण ठेवणं जड गेलं.  मी तेव्हा आधीच वेगळ्या मनस्थितीत होतो, वरवर उत्साह आनंद दाखवत होतो पण आतून एक विचित्र अस्वस्थता अनुभवत होतो. त्यामागे कारण ही तसंच होतं. मी काही अंतरावर त्याच्या मागे होतो , सेलफोनने आजूबाजूचे फोटोज काढत होतो. त्याची दबक्या आवाजातील किंचाळी, हांक ऐकल्यावर मी तिकडे वळलो. त्याने जे दाखवलं , मला जे दिसलं ते डोळे विस्फारणारं होतं. पण मनात कुठेतरी त्याचा अंदाज होताच की कदाचित असलं काहीतरी दिसू शकेल.
तो एक मनुष्याचा हाडाचा सापळा होता. कवटी जागेवर आणि छातीच्या फांसळ्या  होत्या. शेजारी हाताचे हाडं विलग होऊन पडले होते. आम्ही तेव्हा ‘रामबाड्या’च्या जवळ नदी जवळून आडमार्गाने जाणाऱ्या जंगलातून जात होतो. रामाबाडा. केदारनाथपासून सात कीमी अलिकडील एक छोटं गाव. खरंतर रामबाडा हे गाव  आज अस्तित्वात नाही. पण पूर्वी होतं. १७ जून २०१३ पर्यंत तीनशे दुकांनाचं , शेकडो लोकांचं ते गाव होतं. आणि मी ते बघितलेलं होतं.
“वन्स अपॉन ए टाईम देअर वॉज ए रामबाडा हिअर” असं आज म्हणावं लागेल.  ज्याचं समूळ अस्तित्व नष्ट झालं ‘त्या’ दिवशी. मला ते बघताना प्रचंड गलबलून आलं, भावनांचा विचित्र आगडोंब उसळून आला , कानांत जोरजोरात किंकाळ्या, वेदनांनी भरलेले आवाज, हांका ऐकू येऊ लागल्या. माझा जीव गुदमरू लागला. मळमळायला लागलं. मी सरळ परत निघालो. आम्ही होतो तेथून केदारनाथ सात किमी होतं. गौरीकुंडापासून जवळपास आठ किमी दूर आम्ही आलो होतो. मी म्हणालो मी इथे थांबू शकत नाही! मला जायचे नाही केदारनाथला! मित्राला खूप आश्चर्य वाटलं. तो गोंधळला. कारण त्याला कारण माहिती नव्हतं. मी म्हंटलं की आय एम रिअली सॉरी बट आय कान्ट बी हिअर नाव!
लेट्स गो बॅक! तो विचारू लागला की अचानक काय झालं! एक हाडाचा सापळा दिसला म्हणून इतकं काय विचार करतोय नकारात्मक!

मी म्हणालो, की मी नाही सांगितली एक गोष्ट तुला इथे येण्यापूर्वी ! मला वाटलं होतं की मला काही अडचण येणार नाही पण मला खूप अस्वस्थ वाटतयं. मी परत जातो सोनप्रयागला. तुम्ही लोक जा केदारनाथला ! दर्शनाला! मला दर्शन ही घ्यायचं नाही! त्या शंकराचं तोंड ही बघायचं नाही! मी वेगळ्या कारणासाठी आलो होतो इथे! पण मला शक्य नाही वाटत आता!

तोवर बाकी दोघेजण आलेत. पलीकडील रस्त्यावरून आवाज दिला. आम्ही दगडातून ,गवतातुन चालत रस्त्यावर आलो. जवळपास कोणीही पोलीस किंवा इतर कोणी केदारनाथ संबंधित अधिकारी दिसला नाही. त्यांना त्या सापळ्याबद्दल सांगणं गरजेचं होतं. मी एकटा परत निघालो. दुपारचे अडीच वाजले होते. मला त्यांच्या ट्रिपचा मूड खराब करायचा नव्हता म्हणून मी त्यांना तुम्ही पूढे जायला सांगितलं. मी सोनप्रयागला वाट बघतो तुम्ही पुढे जा. दोन दिवसांनी किंवा उद्या या! मला गौरीकुंड गावीही थांबायचं नव्हतं. कारण ती जागा ही मला अस्वस्थ करित होती. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटत होतं की मी परत जाण्याबद्दल बोलतोय.
“ तुला ऍक्युट माऊंटन सिकनेसचा त्रास होतोय का! अनुरागने मला विचारलं. त्याला वाटत होतं की समुद्रसपाटीपासून जास्त उंचावर गेल्यास बऱ्याचदा श्वासोच्छ्वास करताना त्रास होऊ शकतो किंवा छातीमध्ये दुखणं, डोकं जड होणं असे तात्पुरते आजार, त्रास उदभवू शकतात. एक महत्वाचा ऍक्युट मोउंटन सिकनेस लक्षण म्हणजे मानसिकरित्या चिडचिडेपणा किंवा मूडीपणा निर्माण होतो. त्याला वाटलं मला असाच काही त्रास होतोय. पण मी कित्येकदा हिमालयात उंचावर गेलोय. कित्येकदा एकट्याने प्रवास केलाय, अमरनाथला प्रचंड ऍक्युट मोऊंटन सिकनेसचा त्रास झाला होता. पण रामबाडाला तसा काहीही त्रास मला होत नव्हता. मी पूर्णपणे शारीरिकरित्या तंदुरुस्त होतो. मला अस्वस्थता जाणवत होती ती मानसिक. आणि ती ही अत्यंत तीव्रतेने.

मी परत जात  असतानाच उद्वेगाने एका शिळेवर बसलो. डोकं हाताने दाबून धरलं. मित्र सोबत होते.
मी म्हणालो , “मी मागच्या वर्षी येथे आलो होतो! केदारनाथचा प्रलय मी स्वतः अनुभवला आहे! मी जिवंत राहिलो हे एक आश्चर्य आहे. त्या चार दिवसांत मी शेकडो लोकांना मरताना बघितलं. वाहून जाताना, चिखलात दबून मरताना, भुकेने तडफडून मरताना बघितलं!

त्या वेळी १९ जून २०१३ ला मी ठरवलं होतं मी पुन्हा या जागी येईल. मी केदारनाथला येईन या रुद्राला जाब विचारायला! काय चूक होती त्या हजारो भक्तांची , लोकांची जे त्या 4 दिवसांत मेलेत! केदारनाथच्या प्रलयात वाहून गेलेत! शंकरा का तू तुझा तिसरा डोळा उघडलास!





Friday 14 September 2018



"संपुर्ण़ भारतीयांसाठी एक अविस्मरणीय गणपती विसर्जन आणि क्रिकेट दिन"

दसरा आला की बँगलोरची श्रीनाथ कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध केलेले सिमोल्लंघन आठवतं. महाशिवरात्रीला सचिनने ०३ वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरूद्ध केलेले रूद्रतांडव आठवते..पण दरवर्षी गणपतीच्या दिवसात आणि विसर्जनाच्या दिवशी आठवतो तो संपुर्ण भारतवासीयांच्या मनात कोरला गेलेला २४ सप्टेंबर २००७ चा दिवस.
पहिल्या वहिल्या ट्वेंटी ट्वेंटी प भारत वि.पाकिस्तान सुपर डुपर फायनल!!
 उत्साहाची आणि उत्सवाची परिसिमा !

पण टुर्नामेंट सुरू होण्यापुर्वी परिस्थिती पुर्णपणे वेगळी विरूद्ध होती.संपुर्ण भारतीय क्रिकेट प्रेमी आणि भारतीय क्रिकेट नैराश्याच्या ,विषण्णतेच्या गडद छायेतुन चाललं होतं.क्रिकेट मध्ये  निरूत्साहाचं दमट जड वातावरण होतं.

भारतासाठी आजवरचा सर्वात वाइट विंडीजमध्ये ०७ चा वर्ल्ड कप झाला होता.राहुल द्रविडने कँप्टन्सीचा राजीनामा दिला होता.
ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटबद्दल भारतीय क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू अजाण होते.तोवर फक्त न्युझिलंड व इतर इंग्लिश टीम्स ट्वेंटी क्रिकेट खेळु लागले होते.
भारतीय खेळाडुंचं अपयश आणि क्रिकेटप्रेंमींची नाराजी बघता खुद्द बिसिसिआयने सचिन राहुल गांगुली त्रयीला या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यापासुन रोखले होते.त्यामुळे गांगुली व सचिनचा अहंकार दुखावला होता.
नवे तरूण चेहरे ,अननुभवी नवा कँप्टन महेंद्रसिंग धोनीसोबत आफ्रिकेत पाठवल होते.

८३ च्या वर्ल्ड कप सारखीच परिस्थिती होती की कोणालाही या टीम कडुन कुठलिही अपेक्षा नव्हती!औपचारिकता म्हणुन आणि पुन्हा हारण्यासाठीच वर्ल्ड कपमध्ये गेले होते.

पण बघता बघता गोष्टी बदलत गेल्या! सुखकर्ता दुखहर्ता  गणपतीने जणू चमत्कार केला !१४ तारखेला घराघरात गणपती स्थानापन्न झाले.

इकडे गणपतीचीे  प्राणप्रतिष्ठा झाली तसे गणपतीने भारतीय टीममध्ये  प्राण फुंकले.

चौदा तारखेलाच रात्री पाकड्यांविरूद्ध भारताने  "शुट आउट अॅट डरबन" करुन  3/0 ने हरवुन विजयाचा श्रीगणेशा केला.

पण  "द्वितीए ग्रासे मक्षिकापात:" झाला! शुभ्र सुंदर चविष्ट उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवुन खाण्यास सुरवात करणार तर त्यात दुर्वेच्या जागी केस निघावा तसं पुढच्या मँचमध्ये  Blackcaps न्युझिलंडने भारताला हरवलं.

देशभर  दासरामाचा वाट पाहे सजणा आर्ततेने आरती सुरू झाली. फळिवरी वंदना म्हणत  फळिवरुन उतरलेली  वंदना पुन्हा फळिवर जाउन बसली. दिपक जोशी नमोस्तुते प्रार्थना करू लागले.

गणपती प्रसन्न झाले . "नथिंग टु फिअर व्हेन आय अॅम् हिअर "म्हणाले.
पुढे सलग दोन दिवस इंग्लंड आणि साउथ आफ्रिके विरूद्ध भारताने यश मिळवले.आफ्रिका नेहमी प्रमाणे सोप्या सामन्यात #चोक झाली.आणि भारत सेमिफायनलमध्ये धडकला तो ह्युज जाएन्ट ऑस्ट्रेलियाविरूद्ध! बावीस सप्टेंबरच्या रात्री पुन्हा एकदा  युवि ने राज्य करत ऑस्ट्रेलियाला हरवले.

आणि संपुर्ण क्रिकेट जगाला कल्पनातित  क्रिकेट मेजवानी मिळण्याची पुर्व व्यवस्था झाली.कारण तिकडे पाकिस्तान फायनलला आधीच पोहचला होता.

वर्ल्डकप फायनल तेही भारत वि. पाकिस्तान !!!याहुन अधिक थरारक काय असणार होतं!!

संपुर्ण देशात गणपतीची प्रार्थना ..यdnya सुरू होते. सिद्धिविनायकापासुन पुणे..टेकडीचा गणपती येथे पुजा प्रार्थना सुरू होती.दोन दिवस न्युज चँनल्स फक्त फायनलबद्दल चर्चा करत होते.

आणि आदल्या रात्री एक वाईट बातमी कळली! विरेंद्रसेहवाग जखमी झाल्याने फायनल खेळु शकणार नाही!!!!
संपुर्ण देशासाठी तो प्रचंड धक्का होता!

पाकिस्तानची टीम कँप्टन आफ्रिदी सकट फुल फॉर्ममध्ये होती.उमर गुल सकट विचित्र अक्शन असलेला सोहेल तनवीर जबरदस्त बॉलिंग करत होते.पेस बँटरी स्ट्रॉंग होती.

गणपती विसर्जनाचे ते दिवस होते.मी तेव्हा एका नातेवाईकांकडे गेलो होतो.त्यांच्याकडे त्याच दिवशी संध्याकाळी गणपती विसर्जन होत.त्यामुळे आम्ही पोट्टेसोट्टे काळजीत होतो की मँच मिस होणार का!!

पण सर्वानुमती ठरलं  आधी विसर्जन पाकिस्तानचं मग बाप्पाच्या मुर्तीचं!!!!!

दुपारी मित्राकडे गणपतीचं जेवायला गेलो घाईगडबडीत गिळलं  आणि परत निघालो तोवर मँच वॉज ऑन!

सेहवागच्या जागी इरफान पठानचा भाऊ  युसूफपठाण खेळतोय कळलं.पहिल्यांदाच भारताच्या टीममध्ये दोन सख्खे भाउ खेळताना पाहत होतो.

भारताची बँटिंग सुरू होती. रस्त्यात पान टपरीवर पहिला ओवर पाहिला.मोहम्मद हफिज अंगावर धावुन आला.हाच तो हाफिज  विणामलिकचा पहिला पिठ्ठु! ज्याच्या भरवशावर ती भारतात सेलेब बनली.

ओवरच्या दुसऱ्याच बॉलवर; तोवर एकही बॉल न खेळलेला पठाण रन आउट होता अगदी थोडक्यात वाचला!पुढे त्याच ओवरमध्ये हापिजला स्ट्रेट प्रेक्षकांमध्ये पठाणने उडवलं.पहिलीच मँच खेळणारा युसूफ पठाण आमच्यासाठी हिरो बनला!!!

पण त्याचीही विकेट गेली. गौतमगंभीर एक बाजु लढवत होता.१२ बॉल्समध्ये पन्नास काढणारा युवराज सिंग मात्र फायनलमध्ये पुर्णपणे आउट ऑफ टच भासत होता.सतराव्या ओवरपर्यंत रनरेट
खुप नव्हताच.

 सेट झालेल्या युवीची आतातरी फटकेबाजी सुरू होइल असं वाटत असतानाच काल्पनिक  लॉ ऑफ अँवरेजेसने युवराजचा घात केला!त्याच ओवरमध्ये उमर गुलने युविच्या जागी आलेल्या धोनीवर  बिमर फेकला!दुसऱ्या बॉलवर धोनीचेही स्टंप्स उडालेत!

गौतम गंभीरने संरक्षण आणि अटॅकचं सुरेख मिश्रण करत शेवटपर्यंत एक टोक सांभाळत भारताच्या वीस ओवर्समध्ये 157 धावा लावल्या.

मध्यांतर झाला.सगळ्यांच्या मनात एकच धाकधुक !फुल फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानसमोर इतके कमी रन्स भारत वाचवु शकेल का?पुन्हा एकदा 83चा वर्ल्ड कप होइल का?

पंधरा मिनिटांच्या ब्रेकमध्ये आम्ही संध्याकाळची गणपतीची आरती 'उरकली'.

मनात मागणं एकच!माझ्या..आमच्या..सर्व देशवासीयांच्या....
गणपतीच्या गंभीर डोळ्यांमध्येही आम्हाला काळजी दिसली.आपल्याला आपल्याच भावनांचं प्रतिबिंब दिसत असतं.

पाकिस्तानची बँटिंग सुरू झाली.रूद्रप्रतापने सुरवातीलाच बळी मिळवला.इरफान पठाणने विकेट्स काढल्यात आणि आमचा जिवात जीव आला

पण मँच सतत दोन्ही बाजुने कलत होती.एकवेळ खात्री झाली की आता भारत जिंकणार!
आणि तसा वयस्कर पण नवोदित खेळाडु पाकिस्तानचा  बमन इराणी मिसबाह उल हकने मँच पलटवण्यास सुरवात केली!

अठरा एकोणीस ओवर्समध्ये गोलंदाजांना फोडुन काढले! हरभजनच्या एक ओवरमध्ये 3 सिक्स मारत शेवटच्या ओवरला फक्त 13 रन्स शिल्लक ठेवलेत.

मिसबाह हकचा त्यावेळचा अवतार बघता तो हे रन्स अगदी सहज काढेल हे स्पष्ट होतं.पण भारताची जबरदस्त जमेची बाजु ही होती की पाकिस्तानची फक्त एकच विकेट शिल्लक होती.

पण शेवटचा ओवर कोण टाकणार!! मिसबाह मांजराच्या गळ्यात घंटा कोण अडकवणार!

प्रमुख वेगवान बॉलर्सचे ओवर्स संपले होते.प्रमुख आणि अनुभवी बॉलर हरभजनचा एक ओवर शिल्लक होता.

पण मोठं घर 'पोकळवासा हे हरभजनच्या रूपात दिसलं.

त्याने शेवटचा ओवर टाकण्यास नकार दिला.धोनीने बॉल अनुभव नसलेल्या जोगिंदरशर्माला दिला.

लिमिटेड सोर्सेचा योग्य उपयोग हे धोनीने दाखवुन दिले ते जोगिंदर शर्माला त्याने जे शेवटचा ओवर सुरू करण्यापुर्वी सांगितले त्यावरून!!!

धोनीने त्याला म्हटलं "तु जितका टेन्शनमध्ये आहेस तितकाच पुढचा बँटस्मनसुद्धा आहे!बिनधास्त बॉलिंग कर!"

संपुर्ण देशभरातील सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत..

शर्माचा पहिला बॉल वाइड टेन्शनमध्ये वाढ!
पुढचा डॉट बॉल . आणि त्यानंतरच्या बॉलवर मिसबाहने सिक्स ठोकला.
पाकिस्तानला जिंकायला फक्त 6 रन्स हवे होते तेही चार बॉल्समध्ये!
मिसबाह ते सहज काढु शकत होता.

आपण मँच हारलोय  जवळपास सगळ्यांची खात्री झाली होती.

अब सब कुछ भगवानके हात मे अशी आम्हा सगळ्यांची अवस्था!
बाप्पाची प्रार्थना केली.
आमची दृष्टी टिव्हीच्या स्क्रिनकडे..हॉलमधल्या गणपतीचीही दृष्टी टिव्हीकडेच!

जोगिंदर शर्मा तिसरा बॉल टाकायला धावु लागला ..आम्ही आपलेच येउ घातलेले मरण आपल्या थंड नजरेने पाहावे तसे पाहु लागलो.बॉल टाकला..मिसबाह लेग स्टंप वरून ऑफ स्टंपच्याही बाहेर जात किपरच्या डोक्यावरून मारण्यासाठी त्याने #स्कुप केला..बॉल हवेत उंच..अशावेळी टिव्ही स्क्रिनवर बॉल किती अंतराने दुर गेला आहे कळत नाही.तेव्हाही कळलं नाही.सर्वांना वाटलं बॉल बाउंड्रीजवळ गेलाय सिक्स किंवा फोर आहे..आपण फायनल हारलोय!!!

बॉल हवेत उंचीचा परमोच्च बिंदु  गाठत खाली येउ लागला होता..

आणि जसा खाली आला तसे दोन हात दिसलेत..तो श्रीशांत होता.बॉलने उंची तर गाठली पण अंतर नाही!!!

मिसबाह आउट बोल्ड जोगिंदर शर्मा कॉट श्रीशांत!!

पाकिस्तान ऑल आउट ऑन
 152.

भारताने वर्ल्डकप जिंकला होता.

सगळे जोरदार घसा फाटेल अशे ओरडलेत गणपती बाप्पा मोरया!!

सगळीकडे जल्लोष सुरू होता..

आमचीही त्यानंतर विसर्जनाची मिरवणुक निघाली..सगळीकडे विजयाचा जल्लोष..ढोल ताषे...
कुठे वडा पाव कुठे उसाचा रस दुकानदार फ्रीमध्ये वाटत होते..

तिकडे लांब केसांच्या महेंद्रसिंग धोनीच्या हातात वर्ल्ड कप इकडे रस्त्यावरील प्रत्येकाच्या हातात गणपतीची मुर्ती होती!
पण जणु काही तोच वर्ल्ड कप आहे असेच वाटत होते!!

गणपतीबाप्पाने संपुर्ण दहा जिवसात आणि परत जाताना विजयाचा कप भारतीयांना आशिर्वाद रूपात दिला होता.

"गणपती निघाले गावाला वर्ल्ड कप मिळाला आम्हाला!!!
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!

- अभिजित पानसे

Sunday 9 September 2018

गणेश तत्व आणि मूर्ती

एका मैत्रिणीने आणि तिच्या मुलाने मिळून ही गणपती मूर्ती केली आहे. मागच्या वर्षीच्याच विसर्जित गणपतीच्या मूर्तीच्या मातीपासूनच त्यांनी केली. ही गोष्ट मला फार आवडली.

आपला गणपती आपल्याच घरात विसर्जित. बाहेरील नैसर्गिक जलस्रोतांना खराब करण्याचा अधिकार कोणाला नाही.

लहानपणी मुलांना घरी मोठ्या आकाराच्या गणपतीच्या मुर्ती आणण्याचं फार आकर्षण असतं. पूर्वी तर फार असायचं. शाळेतील मित्रांमध्ये तो प्रेस्टिज इश्यू असायचा.

वाहत्या पाण्यातच मूर्त्यांचं विसर्जन करायला हवं वगैरे.. या कट्टरवादी गोष्टी लॉजिकली कधीच पटल्या नाहीत. अगदी पर्यावरणसंबंधित गोष्टी थोडयावेळासाठी बाजूला ठेवल्या तरीही धार्मिक ‘टेक्निकल’ गोष्टींनुसारही पटत नाही.

मूर्तीला घरात आणून गणेश चतुर्थीला स्वतःच्या हृदयावर डावा हात ठेवून आणि गणेश ‘मूर्तीच्या’ हृदयाच्या जागी उजवा हात ठेवून प्राणप्रतिष्ठा केली जाते. (पिंडी ते ब्रह्मांडी हे इथे स्पष्टपणे कळतं.)  त्यानंतरच त्या गणेश मूर्तीमध्ये 'गणेशतत्व' प्रकट होऊन ती मूर्ती गणपतीचं रूप होते. असा भाव निर्माण होतो.

त्यामुळे गणेश तत्व, प्राण शक्ती ही मूर्तीचा आकार, रंग, मूर्ती आकर्षक की कमी आकर्षक या टेक्निकल गोष्टींना Irrespective असते. मग उपासनेच्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने मूर्ती छोटी की मोठी हा प्रश्नच राहत नाही.

कट्टर लोक वाहत्या पाण्यातच गणपती मूर्तीचं विसर्जन करायचं म्हणतात. तेही पटत नाही. एकतर  धार्मिक गोष्टी, घरचा गणपती ही वैयक्तिक बाब असते, नैसर्गिक जल स्रोत खराब करण्याचा अधिकार कोणालाच नाही.

पण भारतासारख्या कमी लोकसंख्या असलेल्या, शिस्तप्रिय, सामाजिक, पर्यावरण बांधिलकी असलेल्या ‘शांत’ देशात सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पणजोबाची मानतात. ते असो.
बंद’ असो की ‘चालू’ असो सगळं तोडफोड करायलाच हात शिवशिवतात.

गणपती मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन करणे धार्मिक टेक्निकल गोष्टीनुसारही पटत नाही.

कारण दीड, पाच, दहा दिवस गणपती पूजल्यावर शेवटच्या दिवशी अक्षता टाकून “#पुनरागमनायंचं’ म्हटल्यावर मूर्तीला हलवलं की त्यातून गणेशतत्व निघून जातं. निघून गेलं हाच समज , भाव असतो. मग पुन्हा गणपतीपासून ती गणपतीची मातीची ‘मूर्ती’ उरते. आता ती मातीची मूर्ती पाण्यात कशीही विसर्जित केली तरीही तिचा अपमान वगैरे होत नाही. वा मूर्तीला वाहत्या स्रोतात किंवा मोठ्या नैसर्गिक जलस्रोतांतच विसर्जित केली पाहिजे हा मुद्दाच संपतो. धार्मिक टेक्निकल गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी लॉजिकली पटत नाही. कारण मूर्तीत प्राणतत्व, गणेशतत्व त्यावेळी नसतंच.
विसर्जन 'गणपतीचं'  करत नसतो , गणेश 'मूर्तीचं' करत असतो.

मातीचा , मातीच्या मूर्तीचा फक्त ‘आधार’ घेऊन दहा दिवसांत ते चराचरात व्याप्त गणेश तत्व, ऊर्जा त्यात प्राणप्रतिष्ठेद्वारे ‘अॅक्टिव्हेट’ होते, त्यात संचारते , पुनरागमनायंचं म्हणून अक्षता टाकल्या की ती ऊर्जा मूर्तीतून निघून जाते.

बाजारात शेकडो गणपतीच्या मुर्त्या ठेवल्या असतात, त्यावेळी त्या मूर्त्याना कोणीही नमस्कार करत नाही. कारण त्यावेळी ती फक्त ‘मूर्ती’ असते. ‘गणपती’ नसतो.

विकत घेतानाही आपण गणपतीच्या ‘मुर्ती’चा भाव विचारतो, मूर्ती विकत घेतो. ‘गणपती’  विकत घेत नाही.

सार्वजनिक गणपतीच्या मोठ्या मूर्तींनाही रस्त्यावरून मंडपात  नेताना नमस्कार करत नाही, कारण त्यांची ‘प्राणप्रतिष्ठा’ झाली नसते.

मूर्ती, माती फक्त ‘कॅरिअरचं’ काम करत असते.  मग त्या मूर्तीतून गणपती बॉसच निघून गेलेत की उरते ती फक्त माती, मातीची मूर्ती. ती कुठेही विसर्जित करता येते. पण आजच्या काळात वाढती लोकसंख्या, कमी  आणि प्रदूषीत होत चाललेले जलस्रोत बघता घरातच मूर्तीचं विसर्जन करणं सर्वोत्तम उपाय. शिवाय ती माती कुंडीत टाकल्यास त्या पार्थिव गणपतीचा घरातच एकप्रकारे सहवास आहे ही भावनाही होऊ शकते.

या मैत्रणीने तर त्याच मातीची मूर्ती केली. हाही एक सुंदर भाव निर्माण करतो. Coz at d end its only about energy n feelings.

- Abhijeet Panse

Saturday 8 September 2018

एलजीबीटीक्यू, 377,



   मागच्या वर्षी लोकप्रभामधील लेख वाचून  मुंबईतील एका मुलाचा  फोन आला होता. त्याने सांगितलं  लोकप्रभा ऑफिसमध्ये फोन करून माझा नंबर घेतला. त्याने सांगितलं की त्याने एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. तिला कुठलातरी अवॉर्डही मिळाला आहे. ती शॉर्टफिल्म,  LGBT ग्रुपमधून त्याने फेस्टिव्हलला पाठवली होती. शॉर्ट फिल्म समलैंगिकता या विषयावर केली आहे.
तो स्वतः LGBT ग्रुपमध्ये येतो.

सुरवातीला मला हा मित्राचा प्रॅंक वाटला. म्हणून तत्कालीन उपसंपादक चैताली जोशीला विचारून पक्कं केलं की खरंच त्याने फोन करून माझा नंबर घेतला होता.

त्याच्याशी बोलून खूप छान वाटलं होतं. सगळ्यात विशेष गोष्ट ही होती की त्याच्या आईने स्वतः त्याला ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात खूप मदत केली. शिवाय त्याच्या आईनेही त्यात काम करून एक बाजू मांडली आहे.

त्याचं नाव आठवत नाही. त्याचा नंबरही आता नाही. पण आज समलैंगिकता हा अपराध नाही हे 377 कलम सुप्रीम कोर्टाने रद्द करून ‘नैसर्गिक’ LGBTना खूप दिलासा दिला आहे. त्यामुळे आज त्याची आठवण झाली.

तो जिथे कुठे असेल त्याच्यासहित
सर्व नैसर्गिक लेस्बियन्स, गे, बायदेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स लोकांचे अभिनंदन.

आता त्यांना अटक होण्याची भीती राहणार नाही. .ते  उघडपणे समाजात वावरू शकतील शिवाय आपले नाते उघडपणे सांगू शकतील. फक्त याचा दुरुपयोग लैंगिक शोषणात होऊ नये ही आशा. कोर्टाने शिशुंसोबत आणि प्राण्यांसोबत केलेले लैंगिक व्यवहार हे अपराध ठरवले आहेत. हे अत्यंत योग्य.

सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक जजमेंट दिलंय. प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी भारताचा एक सकारात्मक अभिनंदनीय पुरोगामी निर्णय.

- Abhijeet Panse

गुदबाय रुद्रप्रताप सिंग, धोनीचा पक्षपातीपणा, धोनीचा दोस्त

"गुडबाय रुद्रप्रतापस्विंग"
  "गोड कटू आठवणी" "धोनीचा दोस्त"  "धोनीचा पक्षपातीपणा"

टिपिकल उत्तर प्रदेशी बॉलर, खूप वेगवान नाही पण ‘मनगटा’च्या जोरावर हवेत स्विंग करणारा ,योग्य सीमवर टाकून  सीमही करणारा बॉलर. प्रवीण कुमार, आर पी सिंग, भुवनेश्वर कुमार युपी स्विंग बॉलिंगचा एक विशेष वारसा चालवणारे भैय्याबॉलर्स.

उत्तर प्रदेशी बॉलर्स नैसर्गिक स्विंग कसे करू शकतात हा एक चर्चेचा विषय राहिलाय. मेरठला बॉलची फॅक्टरी आहे, त्यांना आधीपासूनच शाळा कॉलेजपासूनच नवा कोरा एस.जी. टेस्ट बॉल खेळायला मिळतो हे एक कारण असं मानतात.

प्रवीण कुमार आणि आर पी सिंग हे मागे पुढे भारतीय टीममध्ये खेळत राहिले.

आर पी सिंग म्हटलं की आठवतो 2007 , 20-20वर्ल्डकप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मॅच, साऊथ आफ्रिकेला त्याने अक्षरशः त्यांच्याच जमीनीवर वर्ल्डकपमधून बाहेर केले होते.
पाकिस्तान विरुद्धची फायनलमध्येही चांगली बॉलिंग केली.
त्याआधी पाकिस्तान दौऱ्यावर केलेला रुद्रप्रताप! कॅप्टन धोनीच्या टीमने साकारलेल्या 07च्या विश्वविजयात तो भागीदार होता.

एका पाकिस्तान विरुद्ध मालिकेत रुद्रप्रतापने तीन वेळा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डही मिळवला होता.

भारताचे अनेक अविस्मरणीय विजय, क्षणांचा तो भागीदार, साक्षीदार राहिला.

भारताने 2007 मध्ये इंग्लंड टूर, कॅप्टन राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली मालिका विजयाचा तोही महत्वपूर्ण भागीदार होता.

2011 इंग्लंड टूर! एक वाईट आठवण.

नेहमीप्रमाणे चार वर्षांनी जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीम गेल्यावर पहिल्याच टेस्टमॅचमध्ये पहिल्या काही ओव्हरमध्येच #झहीरखान ने घाण केली.

तो मुळातच अनफिट असताना झहीर खानने ते बीसीसीआय, निवड समितीपासून लपवुन ठेवलं, तसाच तो खेळायला गेला. तेव्हा #योयोटेस्ट नव्हती ना.
 ही वाईट खोड झहीर खानमध्ये कायम होती. त्याआधीही सर्वच 90s चे प्लेयर्स तसे करायचे. झहीर खान  मोठ्या महत्वाच्या दौऱ्यातील पहिल्याच टेस्टमध्ये बॉलिंग डिपार्टमेंट कमकुवत असताना दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मॅचमध्येच मैदान सोडून गेला. त्याला चालू असलेला ओव्हरसुद्धा पूर्ण करता आला नाही.

लेकीन कहाणी में ट्विस्ट अभि बाकी था! इथून कॅप्टन धोनीचे कारनामे सुरू झाले.

ती टेस्ट वाईटरीत्या हरल्यावर झहीर खान हुझुर भारतात परत गेले. आणि त्यांच्या जागी बोलवल्या गेलं आर पी सिंगला. आर पी सिंग हा मुळात त्या काळात पूर्णपणे फॉर्म हरवलेला, बॉलिंग स्पीड अत्यंत कमी झालेला एक सामान्य बॉलर झालेला होता. त्याला भारतातून इंग्लंडमध्ये मालिकेत बोलवावं असा कुठलाही त्याचा फॉर्म नव्हता.

तरीही त्याला इंग्लंड टूरला बोलावण्यात आले कारण होते #धोनीसोबतची_मैत्री.

भारतीय उपखंडात क्रिकेटमध्ये कॅप्टनस हे आपापल्या मित्रांना कायम संधी देण्यासाठी, कॅप्टनपदाचा दुरूपयोग करण्यासाठी , पक्षपाती वागण्यासाठी प्रसिद्ध असतातच. महेंद्र सिंग धोनी याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे.

चौथ्या टेस्टमध्ये आर पी ला संधी देण्यात आली. पहिला ओव्हर त्यालाच देण्यात आला. #सरइयनबोथमने कमेंट्री करताना म्हटलं होतं, मी आजवरचा बघितलेला सगळ्यात वाईट ओपनर टेस्ट बॉलर आणि ओपनिंग ओव्हर्स. सुनील गावस्करांनीही आर पी सिंगच्या टीममधील एन्ट्रीवरून खूप टीका केली. पण "आले धोनीयाच्या मना तेथे काही कुणाचे चालेना"!

त्या काळात तर धोनी बेफाम हुकूमशहा झालेला होता.  जे कोहली सध्या झालाय. फक्त कोहली एक्सप्रेसिव्ह आहे म्हणून तो लोकांना डोळ्यांत खुपतो. धोनी मात्र कोल्डकिलर कॅप्टन होता. मनमानी, पक्षपातीपणा तोही करायचा.

अत्यंत सुमार बॉलिंग करून आर पी सिंग ला मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नाही. धोनीच्या दोस्ताची आर पी सिंगची ती शेवटची मॅच ठरली.

त्या मॅचनंतर भारतीय मीडियासोबतच इंग्लिश  मीडियाने भारतीय टीम, विशेषतः झहीर खानवर , भारतीय क्रिकेटपटूंच्या  स्वार्थी वृत्तीवर उघडपणे खूप टीका केली होती.

शेवटच्या टेस्टमध्ये आर पी सिंगच्या समावेशामुळे , आणि त्याच्या सुमार  आणि अनफिट बॉलिंगमुळे पुनः टीका झाली. भारत चारही टेस्ट हरला.

भारतीय संघाचे पानिपत त्या दौऱ्यात झाले. शिवाय कॅप्टनचा पक्षपातीपणा पुनः उघडा पडला.

रुद्रप्रताप सिंगने एकेकाळी भारतीय टीममध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याच्यामुळे अनेक अविस्मरणीय विजय भारतने  साकारले. पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये जाऊन हरवले.

आर पी सिंगने आज क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
त्या सुखद आठवणीसोबत रुद्रप्रताप सिंग स्विंगला अलविदा!

- Abhijeet Panse

आशा भोसले, ढुंढता हूं यहा..


ताकदीचा कलावंत कधी कधी छोटी भूमिका स्वीकारूनही संपूर्ण कलाकृतीवर आपली छाप सोडतो. तसं “जाने जा ढुंढता फिर रहा...मैं यहा से वहा.." हे गाणं किशोर कुमारचं आहे. यात आशा भोसले यांनी आलाप देऊन साथ दिली आहे. एकंच कडवं गायलंय.  हे गाणं आशा भोसलेंचं एक विशेष गाणं वाटतं. या गाण्यात त्यांनी वेगळा आवाज.. आलाप लावलाय, वेगळा  खर्ज लावलाय. खर्जात्मक आवाजाने 'हमिंग' चा फील येतो. ज्यामुळे तो नेजल खर्ज भासतो. मुळात नेजल नाही.
खर्ज आणि नेजल व्हॉइस या दोन ध्रुवावरील दोन गोष्टी.

 किशोर कुमारने नेहमीप्रमाणे गाणं सहज गायलं आहेच पण वेगळ्या खर्जातील साथ आशा भोसलेंनी देऊन संपूर्ण गाणं वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

आशा भोसलेंनी , VIBGYOR , सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. पण हे जुनं गाणं मला वेगळं वाटतं.



- Abhijeet Panse

Monday 3 September 2018

कृष्ण triology of आध्यात्म.




कृष्ण म्हणजे रोमँस, कृष्ण म्हणजे सखा, प्रेमाचं प्रतीक, खोडकर हे जास्त प्राचिलीत आहे. पण कृष्णाची कर्तव्य कठोर भूमिका झाकोळते. कृष्ण हा अध्यात्माचं संपूर्ण इन्स्टिट्यूट आहे.
भक्तिमार्ग, कर्म मार्ग, ज्ञानमार्ग असे तीन आध्यात्मिक मार्ग जे म्हणतात, हे तिन्ही श्रीकृष्णापासून सुरू होतात, कृष्णात येउन मिसळतात.

ज्ञान मार्ग:- “मृत्य म्हणजे शरीर बदल फक्त..” “हे विश्व माझ्यात आहे मीच या विश्वात आहे..” हे त्याने अर्जुनाला सांगितलं.
अर्जुनाला रणांगणावर विराट दर्शन देऊन मी जे दिसतो ते शरीर म्हणजेच मी नाही, मी संपूर्ण विश्व आहे. जीवन आणि मृत्यू दोन्ही माझेच रूप आहेत. हे समजावून सांगून अर्जुनाला ‘ज्ञान’ दिलं.

कर्म मार्ग:- अर्जुन त्याच्या नातेवाईकांना मारण्यासाठी मानसिकरित्या दुबळा, इमोशनल झाला असता त्याला युद्ध करणे हेच तुझं कर्तव्य आहे. रिझल्ट डजंट मॅटर, सांगितलं. त्याला त्याच्या कर्माची जाणीव करून दिली.

भक्ती मार्ग:-  कृष्ण भक्तीबद्दल बोलण्याची काहीही गरज नाही. भक्तीमार्गाचा महास्रोत आहे तो. राधा, मीरा अनेक संत कृष्णभक्त प्रसिद्ध आहेत.
पण एक प्रसंग मला विशेष आवडतो कृष्ण चरित्रातील. उद्धव आणि राधेचा.

उद्धव हा महाज्ञानी होता. सत्य म्हणजे काय हे त्याला कळत असे. श्रीकृष्ण म्हणजे काय प्रकरण आहे हे त्याला ज्ञानाच्या अनुषंगाने कळलं होतं. श्रीकृष्ण हे निराकार ईश्वरी रूप आहे , शरीर नाही. हे ज्ञान त्याला होतं.

पण त्याच्यात भक्ती नव्हती. प्रेम नव्हते. भक्ती मार्गाला उद्धव कमी लेखात असे. सगुण रूप, नामस्मरण वगैरे हे अज्ञानी लोकांचं काम आहे असा त्याचा विश्वास होता.
 त्यामुळे त्याच्यात कोरड्या ज्ञानाचा अहंकार वाढला होता. श्रीकृष्णालाही त्याची कल्पना होती.

एकदा कृष्ण महालात म्लान चेहऱ्याने दुःखी होऊन बसला होता. उध्दवाने त्याला  कारण विचारलं असता, म्हणाला, की मला वृंदावनातील गोपींची, नंदची, राधेची आठवण येतेय. म्हणून मी दुःखी झालोय.

कृष्णाचं उत्तर ऐकून उद्धव आश्चर्यचकित झाला. कृष्ण जो साक्षात ईश्वर, त्याला मुळात कोणाची आठवण, ‘अटॅचमेंट” कशाला वाटायला हवी. कारण मूळ ज्ञान हे आहे की सर्वजण आत्मा, चैतन्य आहे. बाकी सगळी माया आहे. खोटं आहे.
भावना, प्रेम , विरह हे चूक अज्ञानी लोकांचं काम हे तो कृष्णाला सांगू लागतो.
उद्धव कृष्णाला समजावतो की तुम्हीच ईश्वर आहात, मग या मायेला का फसता आहात!?

ते ऐकून कृष्ण म्हणाला की धन्यवाद उद्धवा मला सत्याची  जाणीव करून दिल्याबद्दल. पण आता हेच ज्ञान तू वृंदावनात जाऊन गोपीकांनाही सांग. त्यांनाही सत्य कळू दे. डिटॅचमेंटचं महत्व समजू दे. तेही माझ्या विरहात तळमळत आहेत. त्यांना सत्य,  ज्ञान दे.

गावातील अडाणी, भोळ्या अज्ञानी गोपिकांना समजवून सांगणे काय कठीण म्हणून  उद्धव रथात बसून तोऱ्यात वृंदावनात जातो.

 वृंदावन जेथे भक्ती मातीमातीत, फुलात, पानात , हवेत ओथंबून वाहते. ( सध्या मात्र तेथे फक्त ढोंगीपणा, फसवेगिरी वाहते, धर्माच्या नावाने ब्लॅकमेलिंग चालते.) तेथे गेल्यापासून त्याला विचित्र अनुभव येऊ लागतात. त्याला त्रास होऊ लागतो.  कारण त्याच्याकडे कोरडं ज्ञान तर असतं पण कृष्णाच्या  ईश्वराच्या भक्तीचा , प्रेमाचा ओलावा नसतो.

वृंदावनात गोपिका कृष्ण विरहात तळमळत, दुःखी असतात. जेव्हा गोपिका कृष्णाबद्दल विचारतात, तो कसा आहे, तो आमची आठवण करतो का..
उद्धव त्यांना सांगतो तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही त्याला अजूनही तुमचा गोकुळातील कान्हा समजताहात. त्याला शरीर समजत आहात.
तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे. त्याला कोणता आकार नाही, शरीर नाही, नाम् नाही. तो अजन्मा आहे. त्यानेच सांगितलं तुम्हाला की त्याला विसरून जा. तो कधीच परत गोकुळात येणार नाही. त्याच्या मोहात अडकून, प्रेम, भक्ती, आसक्ती सोडून ज्ञानी व्हा.

हे सगळं (कोरडं) ज्ञान ऐकून त्या गावातील, साध्या गोपिका त्यालाच मूर्खात काढतात, “नको तुझं काही ज्ञान. तो आमचा कान्हाच आहे. आमच्या मनात त्याच्याविषयी अपार प्रेम आहे!”

गोपिका उद्धवाला राधेकडे घेऊन जातात. राधाही विरहात तळमळत , दुःखी बसली असते. सगळ्यात कृष्णाला शोधत असते. कृष्ण कधी येईल प्रत्येकाला विचारत असते. उद्धव राधेलाही तेच ज्ञानाच्या सत्य गोष्टी सांगतो. कृष्णाचं मूळ रूप समजावून सांगतो. परब्रह्म फक्त शरीरूपी दिसतंय  ते खोटं आहे. कृष्णाला मनुष्य शरीर समजून हे कृष्णाबद्दलचं ; त्याच्या लीला आठवून , प्रेम, आसक्ती, विरह मूर्खपणा आहे. तो सगळीकडे आहे तत्वरुपात. शरीराने फक्त मथुरेला आहे.

राधा म्हणते कृष्ण कायम आमच्या सोबत शरीर रूपानेही असतो. आमचं प्रेम हीच भक्ती आहे. तो मुळात कधीच आमच्यापासून दूर नसतो.
उद्धव त्यावर म्हणतो की कृष्ण शरीररुपाने जवळ असणं ही फक्त तुमची मनोकल्पना आहे. भास आहे विरहात तळमळणाऱ्या अज्ञानी व्यक्तीचा.

राधा उद्धवाला म्हणते “तू आमच्या कृष्ण प्रेमाला मनोकल्पना समजतोय! तुला बघायचंय कृष्ण आत्ताही इथेच आहे?”

त्या क्षणाला श्रीकृष्ण राधेजवळ अवतीर्ण  होतो.
उद्धव आश्चर्यचकित होतो. तो कृष्णाला स्पर्श करून बघतो.  तो भास नसतो. कृष्णाचा स्पर्श तो अनुभवतो.
तो कृष्णाला पुन्हा पुन्हा स्पर्श करून भास नसल्याचं निश्चित करतो.
कृष्णाचा त्याला स्पर्श होत राहतो.
  कृष्ण आणि राधा त्याच्याकडे बघून स्मित करत असतात.

"कृष्णा तू मथुरेत शरीररूपाने असताना इथे कसा!" विचारल्यावर कृष्ण सांगतो, मी सांगितलं ना मी फक्त भक्तीने पकडल्या जातो. जेथे प्रेम , भक्ती तेथे मी असतोच. येतोच. कृष्ण अंतर्धान पावतो.

त्या क्षणाला उद्धवातील अहंकार संपतो. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.  त्याच्यात भक्ती प्रेम जागृत होतं. राधा गोपिकांबद्दल , त्यांच्या अपार कृष्णप्रेमाबद्दल आदर जागृत होतो. भक्तीची शक्ती कळते. उद्धव त्या क्षणापासून “राधे राधे” करत “राधे कृष्ण” म्हणत भक्तीत न्हाहून , नामस्मरण करतच पायी गोकुळातून मथुरेला येतो. शरीराची, कपड्यांची शुद्ध नसते. धुळीत मातीत माखलेला, मुखी “राधे कृष्ण” “राधे राधे” प्रेमाने, भक्तीत नामस्मरण सुरू असतं.
उध्दवतील अहंकार संपला असतो.

मुळात उद्धव , राधा- गोपी, अर्जुन हे सगळे आपापल्या मार्गावर योग्य असतात. उद्धव महाज्ञानी होता. पण माझाच योग्य मार्ग आणि इतरांचा अध्यात्मिक मार्ग चुकीचा हा अहंकार त्याच्यात होतो. त्यामुळे त्याला भक्ती मार्गाचंही श्रेष्ठत्व समजण्यासाठी हे सगळं घडवतो.
हेच आजच्या काळात धर्माबद्दल होतं आहे. माझाच धर्म श्रेष्ठ दुसऱ्याचा छोटा. आपल्या धर्माशी अतिलिप्त अनहेल्दी अटॅचमेंट होऊन इतरांचा राग. इथूनच थिंग्स स्टार्ट टू गो रॉंग.

“#योगमार्ग” हा ही एक स्वतंत्र वेगळा रस्ता. पूर्वी योगी या मार्गानेही ईश्वरी तत्व प्राप्त करून घ्यायला योगसाधना करायचे.
 “पिंडी ते ब्रह्मांडी” हे यांचं तत्व. हा मार्गही कृष्णापासून सुरू होतो, त्यातच मिळतो.
बालकृष्णाने लोणी खाल्लं म्हणून यशोदा कृष्णाला मुख उघडायला सांगते , तेव्हा त्याच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांड दर्शन तिला होतं.
जे बाहेर आहे तेच आत आहे, आतीलच बाहेर आहे. “पिंडी ते ब्रह्मांडी”.

ज्ञान, कर्म, भक्ती, योग सर्व अध्यात्मिक मार्ग यांचा संबंध आणि अधिष्ठान कृष्ण आहे. म्हणून तो खास आहे. संपूर्ण आहे.

कृष्णाच्या बाबतीत ‘#नामस्मरण’ हा शब्द मला विशेष आवडतो. या शब्दात सगळं काही येतं. ‘नाम’ म्हणजे भक्ती येते. ‘स्म’ म्हणजे अहं ब्रह्मास्मि, म्हणजे मीच ईश्वर आहे, हे ‘ज्ञान’ही येतं. ‘रण’ म्हणजे युद्धभूमी. जिथे कर्म योग सांगितला. प्रॅक्टिकल आयुष्यही ‘रण’.
कृष्ण हा म्हणून मला संपूर्ण वाटतो.

- Abhijeet Panse

गुड बाय हँडसम कूक

GoodbyeHandsomeCook

जेव्हा जेव्हा श्री श्री सचिन तेंडुलकर यांच्या शतकांच्या रेकॉर्ड्सवर विदेशी संकट आलं, वादळ घोंघावू लागलं, आमच्यासारखे तेंडुलकरभगत नर्व्हस नाईन्टीजमध्ये गेलेत. पण दरवेळी ते विदेशी वादळ कुंपणावरच शमलं. आणि आम्ही हुश्श केलं.


सचिनच्या वन डे शतकांवर #संगकाराचं डावखोरं संकट आलं होतं पण ते वर्ल्डकपमध्येच थबकलं. त्यापूर्वी पॉंटिंग पंटरचंही संकट दूर झालं.

तेंडुलकरचा सगळ्यात जास्त टेस्ट शतकांच्या  रेकॉर्डची डिश अॅलिस्टर कूक शिजवणार हे जवळपास पक्कं होतं दोन वर्षांपूर्वी. कारण इंग्लंड टेस्ट क्रिकेट जास्त खेळतं. पण अचानक त्याचा फॉर्म खराब झाला आणि तो अपयशी होत गेला.
श्री श्री  सचिन तेंडुलकरच्या सगळ्यात जास्त शतके, रन्स वर फक्त विराट कोहलीचा हक्क आहे. वही उसे तोडगा फोडेगा. चुण चुण के बदला लेगा!

आज असंच एक सचिन तेंडुलकरच्या सगळ्यात जास्त कसोटी शतकांवरील इंग्लिश वादळ आधीच शमलं. अॅलिस्टर कुकने संन्याचा निर्णय घेतला.

आपला पहिला सामना नागपूरला खेळत असताना , “विल यु मॅरी मी” “अॅलिस्टर आय लव यु” असे बोर्ड घेऊन मुली स्टँड्समध्ये होत्या. क्रिकेटमधील एक सगळ्यात हँडसम खेळाडू. सुरवातीला तर तो आणखीच किलर दिसायचा.
 
अस्सल  कसोटी, पारंपरिक बॅटिंग शैलीचा खेळाडू. एक जेंटलमन प्लेयर.

मागच्या इंग्लंड दौऱ्यात पहिल्या कसोटीतील खेळपट्टी भारतीय पाटा खेळपट्टीला कॉम्प्लेक्स देत होती, अशा सिमेंट,  #डेडरबर शेवटच्या दिवशी अॅलिस्टर कूकने मजा म्हणून बॉलिंग करत काही निवृत्त इंग्लिश बॉलर्सची  ‘मिमिक्री’ केली होती. ते सगळं हलक्याफुलक्या वातावरणात होतं. कारण मॅच ड्रॉ होणार होती. शिवाय कॅप्टन तोच होता.

तिसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेचा जबरदस्त कॅच पकडल्यावर देखील त्याची बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरील वेगळं हास्यभाव बघता त्याचा आत्मविश्वास आता संपला असून अॅलिस्टर कूक आता क्रिकेटमध्ये काही महिन्यांचा पाहुणा आहे असं वाटून गेलं होतं.
तेच झालं.

कसोटी क्रिकेटमधील एक मोठं नाव निवृत्त होतंय. यामागे कारण भारतीय बॉलर्स आहेत. भारताविरुद्ध चार कसोटीत संपूर्णपणे अपयशी ठरल्याने शेवटी त्याने पुढील पाचव्या कसोटीत संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
अभिनंदन इंडियन बॉलर्सचेसुद्धा.

ग्रेट चॅम्प अॅलिस्टर कूक!

- Abhijeet Panse

भारत की छोरे छोरिया

जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेचे सुप काल वाजले. दर चार वर्षांनी होणारी ही बहूक्रीडा स्पर्धा आहे. आशियाई स्पर्धा ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या खालोखाल मानली जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पाल्य समिती “आशिया ऑलिम्पिक समिती” हीच या स्पर्धेचे आयोजन करत असते.

2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर या मोठ्या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी होईल यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भारतीय खेळाडूंनी निराश केले नाही. या आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 69 पदकांची कमाई केली.

यात भारताने 15 वेळा सुवर्ण लुटले, 24वेळा भारताची चांदी झाली तर 30 वेळा भारताच्या हाती कांस्य आले. प्रथमच 1951 पासून सुरू झालेल्या या आशियाई स्पर्धेच्या इतिहासात आजवरील आशियाई स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.


या स्पर्धेतून भारताला काही नवीन चांगले खेळाडू मिळाले ज्यांच्याकडे येत्या ऑलिम्पिक्समध्ये आशेने बघता येईल.


बजरंग पुनियाने भारताकडून सुवर्णपदकाचं श्रीफळ वाढवलं. त्यानंतर , म्हारी  छोरीया छोरो से कम है के म्हणणारे महावीर फोगट यांच्या घराण्यातील छोरी विनेश फोगटने पंच्याहत्तर सेकंदात अक्षरशः मगरीप्रमाणे आपल्या विरोधी खेळाडूला फिरवून बाहेर नेले आणि ती फायनल्समध्ये प्रवेशली. फायनल्समध्ये तिने संघर्ष करून ‘सोनं’ जिंकलं. आणि भारताची आशियाई स्पर्धेतील पहिली ‘सोनपरी’ बनली. आपल्या चुलत बहिणींप्रमाणे तिनेही देशाचे नाव ‘सुवर्णाक्षरांनी’ कोरलं. महावीर फोगट हे तिचे काका आणि गुरू.


महाराष्ट्रकन्या राही सरनौबतही सोनपरी बनली. तिने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक मिळवले.

रिले या खेळात भारताची कामगिरी चांगली झाली. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भारतीय अॅथलिट्सनी आश्चर्यकारक कामगिरी केली. धावपटू जीन्सन जॉन्सनने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत बाजी मारून ‘सुवर्ण’संधी साधली.  तो गोल्डन बॉय ठरला.


भारताच्या महिला रिले संघाने रिले दौड स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकवले. या सोनेरी यशात हिमा दास, पूवम्मा राजू माचेतीरा, सरिता लक्ष्मीबाई गायकवाड यांचा समावेश होता. हिमा दासने याच स्पर्धेत दोन रौप्यपदक पटकावले होते. तिने या आशियाई स्पर्धेत एकूण तीन पदक मिळवलेत.


यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके पटकावण्याचा मान भारतीय पथकातील अॅथलेटिक्स संघाच्या खेळाडूंना मिळाला. भारताने अॅथलेटिक्समध्ये सात सुवर्ण, दहा रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.

यानंतर नेमबाजीत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. नेमबाजीत दोन सुवर्ण, चार रौप्य, तीन कांस्यपदक मिळवलीत.


भारताने रोविंगमध्येही एक सुवर्णपदक मिळवलं. शिवाय टेनिसमध्येही एक गोल्ड मिळवलं..


बॉक्सिंगमध्ये भारताची कामगिरी यथातथाच राहिली. विकास कृष्णनने सेमिफायनलसाठी शारीरिकरित्या फिट नसल्याचे सांगून त्याचे सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळवण्याची संधी गेली. सोनं गेलं चांदीही गेली हाती कांस्य आले. उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या बॉक्सरशी लढताना त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती.

अमित पांघळने भारताकडून बॉक्सिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.


स्क्वॅशमध्ये महिला संघाने चांगली कामगिरी केली. ज्योत्स्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लीकलने पदके कमावलीत.


कुराश या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात समस्त भारतीय क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधले ते पिंकी बलहारने. तिने रौप्यपदक मिळवले.


थाळीफेक क्रीडाप्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सीमा पुनियाने मिळालेल्या रकमेतून केरळ पूरग्रस्तां मदत करून आपली सामजिक बांधिलकीही जपली.


गोळाफेक स्पर्धेत भारताचा ताजींदर सिंग तूरने गोळा फेकून सुवर्णपदक मिळवून महाविक्रम केला.


शूटिंगमध्ये सौरभ चौधरी हा मुलगा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. एअर पिस्तुलने त्याने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक गळ्यात घातले.

भाला फेकमध्ये नीरज चोप्राने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.


या आशियाई स्पर्धेत नौकायन स्पर्धेत भारताने तीन पदकांची कमाई केली. एक रौप्य तर दोन कांस्य. वर्षा गौतम, श्वेता शेर्वेगर या जोडीने रौप्यकमाल केली. तर वरुण ठक्कर आणि चेंगप्पा केलापांडा या जोडीने कांस्य मिळवले.

हर्षिता तोमरने एक कांस्यपदक मिळवले.


दुभत्या म्हशीला टोणगा तसा भारताने कबड्डी आणि हॉकीमध्ये टोणगा मिळाला. कायम सुवर्णपदक मिळवणाऱ्या कबड्डीसंघाने यावर्षी सुवर्णपदकाची गवसणी घातली नाही. पुरुष आणि महिला दोन्ही कबड्डी संघाला सुवर्णस्पर्श झाला नाही.


स्वप्ना बर्मन ही हेप्टॉथ्लॉन प्रकारात सोनपरी बनली. तिने या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला. स्वप्ना बर्मनच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. या अडचणीसहित तीने आत्मविश्वासाने स्पर्धेत कामगिरी करून सुवर्ण मिळवलं. हेप्टॉथ्लॉन खेळा प्रकारात धावणे, फेकी, उड्या आदि सात प्रकारच्या खेळाचा समावेश असतो, त्यामुळे सातही खेळांचा सराव करावा लागतो. त्यामुळे स्वप्ना बर्मनची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद ठरते.


पीव्ही सिंधू अंतिम सामन्यात जिंकून सुवर्णपदक मिळवू शकली नाही, पण तिने रौप्यपदक मिळवून पहिली भारतीय महिला जिने आशियाई खेळात रौप्यपदक मिळवलं हा मान पटकावला.


ज्यूडो आणि सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अपयशी ठरली. पण ब्रीज या खेळात भारतीय खेळाडूंनी पदके कमावलीत.


या प्रकारे संमिश्र कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी या वर्षीची आशियाई स्पर्धा गाजवली. अपेक्षेप्रमाणे चीन या स्पर्धातालिकेत सर्वोच्च राहिला. त्या खालोखाल जपान तर नंतर दक्षिण कोरिया. भारत पदकांच्या तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. चीन , जपान या देशात लहानपणापासून खेळाडू , अॅथलिट्स घडवले जातात. तिथे खेळ संस्कृती खूप खोलवर रुजली आहे. भारतात मूळचे इन्फ्रास्ट्रक्चरच तितके पूरक नाही. तरीही भारतीय खेळाडूंनी या आशियाई स्पर्धेत आजतागायतच्या एशियन स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली.

जिथे आजकाल “बिग बॉस” , दस का दम सारख्या टुकार टीव्ही ‘शोज’ ला ‘खेळ’ संबोधून खऱ्या खेळाचा, खेळाडूंचा नकळत अपमान होतो. तिथे अथक मेहनत करून जिद्दीने खेळणाऱ्या , देशाचं आणि स्वतःचं नाव मोठं करणाऱ्या  या खेळाडूंचे मनापासून हार्दिक अभिनंदन.

Monday 27 August 2018

शिवलिंग की shiva's ling

*शिवलिंग*

आऊटसोर्स्ड नावाच्या एका इंडो इंग्लिश मुव्हीमध्ये, त्यातील नायक भारतात आला असताना शंकराची पिंडी मंदिरात दिसते, तो आयेशा धारकर या अभिनेत्रीला विचारतो , हे काय आहे. ती त्याला सांगते “इट्स डॅट मेल पार्ट!” त्यानंतर बरंचसं एक्स्प्लेन करते की शिवाचं मेल पार्ट म्हणजे शिवलिंग, देवीची योनी यांपासून शिवलिंग बनतं. आणि त्याची पूजा केली जाते वगैरे.

ही संपूर्ण चुकीची माहिती, दृष्टिकोन आहे.  बाहेरीलच नाही तर कित्येक भारतीय लोकांनाही हेच वाटतं शिवलिंग हे  गुप्तांग आहे आणि त्याची पूजा केली जाते.

हा संपूर्ण गैरसमज आहे. शिवलिंग म्हणजे शिवाचं लिंग नाही.

'लिंग' हा संस्कृत शब्द आहे. बरेच संस्कृत आणि मराठी/हिंदी सारखे असतात. पण त्या शब्दांचे दोन वेगळे अर्थ  असतात. एक मूळ अर्थ, एक बोलीभाषेतील.

लिंग ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ 'प्रतीक' होतो. शिवलिंग हे शिवाचे प्रतीक म्हणून पुजले जाते. चिन्ह म्हणून संबोधले जाते.

अध्यात्मिक विश्वास असा आहे  की ही सृष्टी शिव शक्तीतून उत्पन्न झाली आहे म्हणून त्याचं रूप शिवलिंग. असा मूळ 'भाव' आहे.  पण उत्पन्न होण्याचा biological  reproductionशी सोयीस्कर अर्थ जोडून शिवलिंगाला गुप्तांग म्हणून संबोधित केल्या जाऊ लागलं. हीच माहिती सगळ्यांना खरी वाटते.

शिव लिंग हे 'ज्योती'च्या आकारावरून निर्माण झालंय. कुठंतरी ऐकलं, वाचलं होतं की पूर्वी ऋषी मुनी लोक दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करून त्याद्वारे सृष्टी, जीवन रहस्य मिळवण्याचे प्रयत्न करीत. ज्योतीवर ध्यान करीत.

जे खरेही वाटतं. कारण कुठल्याही गोष्टीवर लक्ष म्हणजे काँशिअस माईंड केंद्रित केल्यास सबकाँशिअस माईंड अंतर्मन अॅक्टिव्हेट होतं. तेव्हा अनेक विविध गोष्टी  ‘क्लिक’ होतात.

पाउलो कोएल्होच्या “द अॅल्केमिस्ट”मध्ये ही वाळवंटात अॅल्केमिस्ट त्या मुलाला सांगतो, वाळूच्या एका कणावरजरी पूर्ण लक्ष केंद्रित केलंस तरी तुला अनेक  गोष्टी कळतील.

वैश्विक दृष्टी ठेऊन विचार केला तर देशी विदेशी अनेक गोष्टीत साधर्म्य आढळतं. सिक्रेट पुस्तकातील पॉईंट्स, श्रीपादवल्लभ या मूळच्या तेलुगू पुस्तकातही दिसतात.

कारण सत्य हे सत्य असतंच. एक अधिक एक बरोबर दोन , हे भारतात ही होतील , उत्तर दक्षिण ध्रुवावरही होतील.

पूर्वी लोक दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करीत ईश्वर समजून, शिव समजून. पण ज्योती सतत हलत असल्याने त्यांनी शिव म्हणून ज्योती आकाराचं पार्थिव पिंड केली. त्यावर लक्ष केंद्रित करू लागले. तिथून शंकराची पूजा शिवलिंग म्हणजे शिवाचं ‘चिन्ह’ ‘प्रतीक’ म्हणून पूजलं जाऊ लागलं.  त्याचा शिवाच्या ‘लिंगाशी’   काहीही संबंध नाही. फक्त शब्दाचे अर्थ चुकीचे घेतले जातात.

पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग म्हणताना, संबोधताना यात ‘लिंग’ हे ‘गुप्तांग’ म्हणून घेतल्या जात नाही. ते प्रतीक वा चिन्ह म्हणून समजल्या जातं. तेच शिवलिंग संबंधित आहे.

योनी म्हणजे स्त्रीचं गुप्तांग म्हणून इथे अभिप्रेत नसतं. संस्कृतमध्ये निरनिराळ्या जीवसृष्टीला योनी म्हटलं जातं. मनुष्य योनी, वानर योनी, कुक्कुट योनी……

त्यामुळे शिवलिंग पूजा म्हणजे शिवाच्या गुप्तांग समजून पूजा केली जाते हा पूर्णपणे गैरसमज आहे. जो खूप जणांचा असतो. विदेशात ही हाच अर्थ घेतला जातो. कारण भारतात बहुतेकांना तेच वाटतं.

आसाममध्ये #कामाख्या मंदिरात योनी पूजा केली जाते. ती गुप्तांगाची पूजा आहे. तो विषय वेगळा हा वेगळा.

शिवलिंग म्हणजे निर् - आकार, निर्गुण शिवतत्वाची ‘मॅटर’ रुपात 'पूजा' करायला तयार केलेला एक आकार, जो दिव्याच्या ज्योतीवरून प्रेरित आहे.

 शिवलिंग हे ज्योतिर्मय आहे.
सत्यम शिवम् सुंदरम्!

- Abhijeet Panse

गूगल डॉन डूडल

GoogleDONDoodle

त्यांना म्हातारवयात पत्रकाराने विचारलं असता, आजच्या काळात तुम्ही क्रिकेट खेळत असता तर काय सरासरी असती तुमची? म्हाताऱ्यानं उत्तर दिलं , चाळीस ते पंचेचाळीस.
पत्रकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "इतकी कमी या काळात खेळला असतात तर! "

तो म्हातारा म्हणाला , वयाच्या सत्तरीत इतकी सरासरी नक्कीच वाईट नाही.

ज्या खेळाडूच्या बॅटिंग अॅवरेजच्या नंबर्सवरून ऑस्ट्रेलियाच्या एका रेडीओ वाहिनीची फ्रिक्वेन्सी ठेवण्यात आली.

तो आउट होत नाही म्हणून त्याला जखमी करण्यासाठी इंग्लंडच्या कॅप्टनने त्याच्या बॉलर्सला त्याच्या अंगावर बेछूट बॉलिंग करायला फर्मावलं. त्या काळात आजच्या काळातील बॅट्समनला गोंजारणारे कुठलेही नियम नव्हते. ती अंगावर लाल इंग्लिश बॉम्बगोळे टाकणारी मालिका “बॉडी लाईन” सिरीज म्हणून इतिहासात अजरामर झाली.

ज्याचा उजवा हात जखमी झाल्याने तो बॅटिंग करू शकणार नाही, हे माहिती असूनही ;  ‘तो’ उजवा हात जखमी असताना , डाव्या हातात बॅट घेऊन मैदानात उतरून आपल्याला हरवेल या भीतीमुळे इंग्लिश कॅप्टन घाबरायचा.

जो आउट झाल्यावर इंग्लिश लोक त्याला ‘बास्टर्ड’ म्हणून राग करायचे.

त्या सगळ्या तिरस्कारात त्या माणसाला त्याच्या महानतेची पावती त्याला मिळत राहिली.

आज त्यांचा वाढदिवस. गूगल ने आज त्यांना मानवंदना म्हणून #गूगलडूडल ठेवलाय.

तो महामानव अतिमानव यतीमानव सर डॉनल्ड ब्रॅडमन!

यांच्यावर कितीही लिहिलं तरी कमीच आहे.  इच्छुकांनी "श्री शिरीष कणेकर द ग्रेट" यांना फॉलो करावे. ही सगळी माहिती लहानपणी त्यांचे लेख वाचूनच आठवली आहे.

- Abhijeet Panse

Friday 24 August 2018

भारत की छोरी छोरिया किसिसे कम है के!

म्हारी छोरी छोरीयोंसे कम हैं के! दंगल चित्रपटात महावीर फोगट यांची भूमिका करत असलेल्या आमीर खानने म्हटलेलं हे प्रसिद्ध वाक्य आहे. गीता बबिताला समाजाच्या , पारंपरिक मानसिकतेच्या विरुद्ध जाऊन महावीर फोगट यांनी मुलींना कुस्तीचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. संपूर्ण घराणंच हे खेळात, कुस्तीला वाहिलं आहे. देशाला अनेक मानसन्मान मिळवून दिला आहे.
महावीर फोगट यांची पुतणी आणि गीता बबिता यांची चुलत बहीण विनेश फोगटही आता आपल्या घराण्याचा वारसा पूढे चालवत आहे.  

विनेश फोगट हिने सध्या जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ स्पर्धेत भारताला फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले.
तिने फायनलमध्ये जपानच्या युकी इरी ला  या खेळाडूला हरवून सुवर्णपदक मिळवले. या सोबत ती प्रथम महिला खेळाडू ठरली जिने आशियाई खेळात भारतासाठी सुवर्णपदक मिळवले.

फायनलपूर्वी तिचा सामना झाला उजबेकिस्तानच्या महिला पेहलवान खेळाडू सोबत. तिचं नावाचा प्रत्येकाने स्वतःला जमेल तसा उच्चार करावा.

हा सामना अद्भुत होता. या सामन्यात विनेश फोगटची कला, शक्ती, तांत्रिक प्रभुत्व याचं संपूर्ण प्रदर्शन झालं. पिवळ्या रंगाचं अॅथलिट वेषात खेळताना फक्त पंच्याहत्तर सेकंदात तिने सेमिफायनलमध्ये उजबेकिस्तानच्या खेळाडूला हरवले. सुरवातीचे काही सेकंद अंदाज घेत, योग्य संरक्षण आणि आक्रमण ती करत होती. पण साठ सेकंदानंतर तिला संधी मिळाली जबरदस्त आक्रमण करायला. कुठलाही कुस्तीवीर आपले पाय प्रथम वाचवत असतो विरोधी कुस्तीवीरापासून, कारण एकदा विरोधी खेळाडूच्या पायाची पकड मिळाली की सामन्यावरची पकड घट्ट होते.

विनेश फोगटला सामना सुरू झाल्यावर एक मिनिटानंतर ती नामी संधी मिळाली. आणि अक्षरशः नागीण जशी दुसऱ्या नागिणीला अंगाला गुंडाळून पराजित करेल अश्या स्थितीत येऊन, नियमांना धरून,  तिने विरोधी खेळाडूला आडवं पडून, फिरवून पिवळ्या वर्तुळाच्या बाहेर नेले. मगर जशी आपल्या भक्ष्याला धरून , भक्ष्य विरोध करत असताना त्याला धरून उताणी आणि पालथी होत फिरवते तसं विनेश फोगटने उझबेकिस्तानच्या खेळाडूला फिरवून बाहेर नेले. तिच्या या डावाला विरोधी खेळाडूकडे काहीही उत्तर नव्हते. अद्भुत खेळून अगदी सहजरित्या; सामना सुरू होऊन पंच्याहत्तर सेकंदात विनेश फोगट फायनलमध्ये प्रवेशली होती.



दोन तासांनी तिची लढत होती जपानच्या खेळाडूशी. ही लढत होती फायनल्स. सुवर्णपदकासाठी.  
हा सामना फार चुरशीचा झाला. जपानची खेळाडूसुद्धा निष्णात कुस्तीवीर होती. निळ्या वेषात विनेश खेळत होती.
सुरवातीला आक्रमण करत विनेश फोगटने चार गुण मिळवलेत. पण त्यानंतर आपली आघाडी  कायम राहावी म्हणून तिने सतत संरक्षक पवित्रा अंगिकारला. पंचाच्या ते लक्षात आल्याने त्यांनी खेळ ऍक्टिव्ह टाईम मध्ये टाकला. जे विनेशच्या विरुद्ध जाण्याची शक्यता जास्त होती. जो खेळाडू मुद्दाम संरक्षक खेळत असेल तर पंच सामना तीस सेकंदासाठी  ऍक्टिव्ह टाईममध्ये टाकतात. यांत त्या खेळाडूला तीस सेकंदात एक गुण तरी मिळवावा लागतो , नाहीतर एक गुण विरुद्ध खेळाडूला दिला जातो. शेवटी तेच झालं. विनेश फोगटने गरजेपेक्षा जास्त संरक्षक पद्धतीने खेळल्याने पंचांनी सामना ऍक्टिव्हेट टाईममध्ये टाकल्यावर जपानच्या खेळाडूने विनेशला एक गुण मिळवू दिला नाही. परिणामी एक गुण जपानच्या खेळाडूला बहाल करण्यात आला. गुण तेव्हा चार - एक होते. तीन गुणांनी विनेश फोगट समोर होती.

शेवटच्या काही सेकंदात पुन्हा विनेशने अप्रतिम  जबरदस्त डिफेन्सचं प्रदर्शन केलं आणि आपली आघाडी कायम राखली. शेवटच्या सहा सेकंदात पुन्हा तांत्रिकदृष्ट्या दोन गुण मिळवले आणि सहा- दोन गुणांनी फायनल्स जिंकले. त्या क्षणाला ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली जिने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. भारताचा ध्वज फडकला. भारताचे राष्ट्रगीत वाजले.

काटक , अस्सल अॅथलिट शरीर , चांगली उंची, ही विनेश फोगटचे जमेची बाजू आहे. आपल्या चुलत बहिणींप्रमाणे तीनेही आता सुवर्णपदक मिळवले आहे. यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने चांगली कामगिरी केली होती.

आशियाई खेळ स्पर्धेत भारताकडे सध्या चार सुवर्णपदक आहेत. कबड्डीमध्ये भारताला कोरियाकडून एक गुणांनी हार पत्करावी लागली. साक्षी मलिकही  खूप लढून शेवटी हरली. तिचा अतिआत्मविश्वास अंगाशी आला हे तिचे सामने बघताना जाणवले.
कोल्हापूरच्या राही सरनौबतने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. बजरंग पुनियाने प्रथम सुवर्णपदक मिळवून दिले. सोळा वर्षीय सौरभ चौधरीने शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवले.
एकंदर भारतीय अॅथलिट्स आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत. येत्या काही दिवसांत पदकांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय खेळाडू छोरी और छोरिया किसिसे कम नही है!

Thursday 16 August 2018

अजित वाडेकर सुनील, गावस्कर , गॅरी सोबर्स

अजित वाडेकर,  सुनील गावस्कर, गॅरी सोबर्स , 1971 , खास आठवण.

सुनील गावस्कर नावाचा एक तरुण मुलगा प्रथमच वेस्ट इंडिजच्या टूरला गेला होता. तोवर त्याने एकही टेस्ट मॅच खेळली नव्हती. कॅप्टन होते अजित वाडेकर.

पहिली टेस्ट मॅच किंगस्टन येथे सुरू झाली. पण पहिला संपूर्ण दिवस किंगस्टन येथे पावसाने धुमाकूळ घातला. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मध्ये कायम हा त्रास असतोच.  टॉससुद्धा न होता पहिला दिवस संपूर्ण वाया गेला. असा एकही वेस्टइंडिज , इंग्लिश दौरा झालेला नाही ज्यात पावसाने खेळखंडोबा केला नाही.

दुसऱ्या दिवशी टॉस  झाला. भारताची पहिल्यांदा बॅटिंग सुरू केली. भारतीय इनिंग संपल्यावर वेस्टइंडिजची बॅटिंग सुरू झाली. वेस्टइंडिज टीम भारतापेक्षा 170 रन्स कमी काढून ऑल आऊट झालेत. सर्व आपापल्या ड्रेसिंग रूममध्ये परतले.

साहजिकच दुसरी इनिंग भारत सुरू करणार यामुळे वेस्टइंडिज टीम ड्रेसिंग रूममध्ये निवांत उघड्या अंगाने शीतपेये पीत बसली होती. भारतीय ड्रेसिंग रूममध्येही भारतीय ओपनर्स दुसरी इनिंग सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये वेगाने ड्रेसिंग रूममध्ये परतले होते. त्यांची तयारी सुरू होती.

पण कॅप्टन  अजित वाडेकर यांचा वेगळी आखणी होती. त्यांनी सुनील गावस्कर यांना बोलावले. सुनील गावस्कर यांची कारकीर्दही तेव्हा सुरू व्हायची होती. त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काहीही ओळख नव्हती. त्या टेस्टमध्ये ते खेळत नव्हते.

अजित वाडेकर यांनी सुनील गावस्कर यांना वेस्टइंडिज ड्रेसिंग रूममध्ये जायला सांगून “भारताने वेस्टइंडिजला फॉलो ऑन देण्याचा निर्णय घेतलाय” हे सांगायला  सांगितले.

सुनील गावस्कर विंडीज रूममध्ये गेले असता सर्व खेळाडू धिप्पाड, उघड्या अंगाने बसलेले. समोर खुर्चीत क्रिकेटचे देवाधिदेव महादेव गॅरी सोबर्स बसलेले होते. सुनील गावस्कर ज्यांनी तोवर एकही मॅच खेळली नव्हती त्यांनी #कॅप्टनगॅरीसोबर्सला घाबरत नम्रतेने सांगितलं सर u wud follow on!

तेव्हा गॅरी सोबर्स गावस्करांवर खेकसलेत , फॉलो ऑन कसं काय शक्य? कारण विंडीज 170 रन्सने मागे होतं. आणि टेस्ट मॅचमध्ये फॉलो ऑन लादण्यासाठी विरुद्ध पक्षाचे किमान 200 रन्स कमी असावे लागतात.

नवोदित, अननुभवी सुनील गावस्कर घाबरून गॅरी सोबर्सपुढे काहीही न बोलता ड्रेसिंग रूममध्ये परत आलेत.

“आपने कभी देखा है 70s के वेस्ट इंडिज का ड्रेसिंग रूम, शर्ट निकालके बैठे हुये छे फिट के खिलाडी….
मैं तो भाग निकला वहा सें! काही दिवसांपूर्वी गावस्कर ही आठवण सांगताना म्हणाले होते.

सुनील गावस्कर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये परत आल्यावर  कॅप्टन अजित वाडेकरांना भेटून गॅरी सोबर्स काय म्हणालेत ते सांगितलं .
"फॉलो ऑन द्यायला 200 किंवा जास्त रन्सने मागे असावं लागतं, वेस्टइंडिज 170 रन्स ने मागे होतं."

ते ऐकून  पाहुण्या भारतीय टीमचे स्कीपर अजित वाडेकर यजमान विंडीज ड्रेसिंगरूममध्ये गेलेत. गॅरी सोबर्सला म्हणालेत फॉलो ऑन देण्यासाठी 200 रन्सने पूढे असावेत हा नियम आहे, पण जर मॅचचा पहिला सम्पूर्ण दिवस पावसाने वाया गेला असेल तर फॉलो ऑन विरुद्ध टीमचे 150 रन्स कमी असताना देता येतो.

हा खेळाचा तांत्रिक नियम कॅप्टन  अजित वाडेकर यांनी कॅप्टन गॅरी सोबर्स या अत्यंत मोठं नाव असलेल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वास समजावून सांगितला.
आणि वेस्टइंडिज ने निमूटपणे दुसऱ्या इनिंगमध्ये ‘फॉलो’ केलं.

हे सौंदर्य आहे टेस्ट क्रिकेटचं . बारीक नियम, तांत्रिक गोष्टी. सगळ्या प्रकारे ‘कसोटी’ लागते.

जो छुपा नियम गॅरी सोबर्स यांना माहिती नव्हता तो भारतीय कॅप्टन अजित वाडेकर यांना नीट माहिती होता. आणि तो त्यांनी प्रसंगावधान राखून वापरलासुद्धा.
किंगस्टनची ती कसोटी विंडीजने प्रयत्नांती अनिर्णित राखली.

 पुढची कसोटी होती पोर्ट ऑफ स्पेनला.
या सामन्यात एक मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली पहिली मॅच खेळला.

अजित वाडेकरांनी विंडीज रूममध्ये ज्याला पाठवलं होतं तो पाच फूट पाच इंची उंची असलेला लिटल मॅन सुनील गावस्कर.  त्याने विंडीज माऱ्यासमोर दोन्ही इनिंगमध्ये साठच्या वर रन्स काढलेत. दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद राहून शेवटचा विजयी रन त्याने काढला. आणि भारताने पहिला विजय साकारला विंडीज भूमीवर. कॅप्टन होते #अजितवाडेकर.

त्याच कसोटी मालिकेत त्या लिटल मॅनने वेस्टइंडिज भूमीवर वेस्टइंडिजच्या भेदक माऱ्यापुढे शतके काढलीत. त्यात एक डबल सेंच्युरीही होती. आपल्या पहिल्याच मालिकेत नेत्रदीपक कामगिरी केली त्या लिटल मॅनने. पुढे त्याला “लिटल मास्टर सुनील गावस्कर” म्हणू लागले.

ती वेस्टइंडिजमधील मालिका भारताने जिंकली. भारताने पहिली मालिका जिंकली विदेशी भूमीवर. बिग जायंट विंडीजविरुद्ध. कॅप्टन होते अजित वाडेकर.

दोन महिन्यांनी भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली. भारतीय टीमने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्येही मालिका जिंकली.
विजयी होऊन परतताना दिल्ली विमानतळावर पंतप्रधान इंदिरा गांधी स्वागत करायला आल्या होत्या.

भारताचा पहिला ओव्हर्सिज विजय नवाब पतौडींच्या नेतृत्वात झाला न्यूझीलंडविरुद्ध. त्यातही अजित वाडेकर यांचा बॅट्समन म्हणून मोठा वाटा होता.

पूर्णपणे डावखोरे खेळाडू, त्या काळातील आक्रमक बॅट्समन.
भारतीय टीमचे कॅप्टन, कोच, मॅनेजर , निवड समितीचे अध्यक्ष अशी भूमिका पाडणारे अजित वाडेकर.

जेव्हा क्रिकेट बघणं सुरू केलं तेव्हा अजहर कॅप्टन आणि मॅनेजर / कोच अजित वाडेकर असं वाचायला मिळायचं.

भारतीय क्रिकेट टीमचा विदेशातील मालिका विजयाचा आगाज करणाऱ्या अजित वाडेकरांना श्रद्धांजली.

-  Abhijeet Panse

Saturday 11 August 2018

सिद्धपूर, मातृश्राद्ध, गुजरात, सरस्वती नदी , साईड लोवर विंडो सीट

ख्रिश्चन लोकांत मृत्यूनंतर वा नंतर पुण्यतिथीला मेणबत्ती लावली जाते. फुलांचा गुच्छ ठेवला जातो, आवडीचा पदार्थ केला जातो. तसंच हिंदू धर्मात मृत्यूनंतर श्राद्ध केलं जातं. दोन्ही मध्ये ‘ग्रॅटिट्यूड’ कृतज्ञता, गेलेल्या पूर्वजांची आठवण हा भाव असतो. हिंदु धर्म पुनर्जन्म मानत असल्याने श्राद्ध हा विधी मानतात.  त्यामुळे श्रध्देने लोक श्राद्ध करतात.
गया हे बिहारमधील स्थान यासाठी प्रसिद्ध आहे.

मे महिन्यातील दुसऱ्या रविवारला “मदर्स डे” हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो. आषाढ अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, हा हिंदू संस्कृतीमधील मातृदिन मानला जातो.
त्या निमित्ताने.

गया या स्थानाला ‘पितृगया’ म्हंटलं जातं.
येथे सर्वसाधारणपणे सर्व पितरांचं श्राद्ध केलं जातं. पण गुजरातमधील ‘ सिद्धपुर’ नावाचं ऐतिहासिक ठिकाण हे खास मातृ श्राद्धासाठी ओळखलं जातं. या ठिकाणाला ‘मातृगया’ म्हणतात.
हिंदू संस्कृतीमध्ये मातेला विशिष्ट वेगळं स्थान दिलंय हेही यातून कळतं.

अहमदाबादपासून तीन तासांवर, राजस्थान- उदयपूरकडे जाणाऱ्या सुंदर, चार पदरी हायवेवर हे गाव आहे. मुंबईहुन दिल्लीला रेल्वेने  जातानाही हे सिध्दपुर स्थानक लागले होते. संपूर्ण गावात मुघलकालीन अवशेष आढळतात. येथे बिंदू सरोवर नावाचं छोटा तलाव आहे. पूर्वी या गावाजवळून ‘सरस्वती’ नदीचा प्रवाह वाहायचा. काळाच्या ओघात आणि मानवी चुकांमुळे नदी नष्ट झाली.

ऋग्वेदात या सिद्धपुरचा, मातृगयेचा , तेथे मातृ उपकराप्रित्यर्थ केले जाणाऱ्या श्राद्धाचा, स्थान महात्म्य,  सरस्वती नदीचाउल्लेख आढळतो असे तेथील लोक म्हणतात.
संपूर्ण भारतात फक्त विशेषतः मातेच्या श्राद्ध करण्यासाठी हे स्थान आहे. असं म्हटल्या जातं.
कार्तिक महिन्यात येथे मातृ श्राद्धाचे महत्व असते.
कपिल मुनींनी त्यांच्या मातेस या ठिकाणी सरस्वती किनारी  #सांख्य_दर्शन सांगितले तद्नंतर त्यांच्या मातेस मोक्षप्राप्ती झाली असे मानतात. परशुरामानेही रेणुकामातेप्रित्यर्थ मातृहत्या दोषपरिहारार्थ येथे मातृश्राद्ध केले होते म्हणतात.

सिध्दपुर हे मुघलकालीन गाव. गावात मध्ययुगीन भारताची , मुघलकालीन वास्तुकला अजूनही दिसून येते. गावात अनेक  ‘हवेली’ आहेत.
Archeological Survey of India ASI यांच्या अखत्यारीत येथील दोन वास्तू येतात. एक महादेवाचे रुद्र महालया मंदिर आणि एक जामी मशीद.
दोन्ही अप्रतिम वास्तू आहेत. सुंदर लाकडी नक्षीकाम असलेले स्थापत्य जागोजागी दिसते.

गुजरातमधील ‘स्मशाने’ हा एक स्वतंत्र विषय आहे. लोक संध्याकाळी फिरायला जातात येथील स्मशानभूमीत. इतके सुंदर , बागांनी, कारंजी यांनी सुशोभित केलेलं असतात.
सिध्दपुर येथील स्मशानाचे सुद्धा प्रयाग, वाराणसी , उज्जयिनी येथील स्मशानांचे जे महत्व मानले जाते तसे आहे .
असे हे खास मातृश्राद्धासाठी महत्व असलेले एकमेव स्थान. भारतातील एक आगळेवेगळे स्थान.

अहमदाबादहुन सिध्दपुरला जाताना मेहसाणा हे प्रसिद्ध शहरही लागतं. सिध्दपुरहुन काही किमी उत्तरेकडे पालमपूर हे  गुजरात आणि राजस्थान सीमेरेषेजवळील शहर लागतं. इथून पुढे अरावली पर्वतरांगाही दिसतात. माऊंट अबू हे स्थानही जवळच.

क्या रखा है घर में मे कुछ दिन तो गुजारो नदी किनारे परबतो में!

- अभिजित पानसे



Friday 3 August 2018

ओन्ली किशोर बाकी शोर

अमर अकबर अँथनीमधील परदा है परदा “ ऋषी कपूरवरील हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आहे. पण गाण्यात अमिताभ बच्चन  म्हणजे अँथनी हा “तो अकबर तेरा नाम नही है!” उठून एक लाईन म्हणणार हे दिग्दर्शकाने वेळेवरती केलेलं इम्प्रेवायजेशन होतं.
पण त्यामुळे अमिताभ बच्चनची ती ओळ कोण गाणार हा प्रश्न पडला संगीत दिग्दर्शकांना पडला.

सुपरस्टार असलेल्या अमिताभ बच्चनला फक्त किशोर कुमार यांचाच आवाज लागायचा.  पण मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्यात मीडियाने निर्माण केलेली स्पर्धा असा तो काळ असताना, संपूर्ण आणि हिट होणारं गाणं मोहम्मद रफी गात असताना किशोर कुमार यांना फक्त एक ओळ गायला कसं सांगणार!
आधीच ते त्यांच्या मनस्वीपणासाठी- व्हिमजिकल वृत्तीसाठी प्रसिद्ध असताना कोण धोका पत्करेल. अहंकार दुखावून नाराज होऊन पुन्हा आपल्यासोबत काम करायलाच नाही म्हणतील ही भीती संगीतकारांना होती.


तेव्हा लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी मोहम्मद रफी यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती केली की तुम्ही। स्वतः किशोर कुमारला ही ओळ गायला सांगा.

निर्गवी मोहम्मद रफी तयार झालेत. ते किशोर कुमार यांना भेटलेत.
एका मोठ्या गायकाने दुसऱ्या मोठ्या गायकाला मैत्रीपूर्ण विनंती केली, की ही ओळ तुम्ही गावी अशी माझी इच्छा आहे.
किशोर कुमारने ताबडतोब म्हटलं हा क्यू नही मैं जरूर गाउंगा!
ऋषी कपूर गात असतो “तो तो तो…”अमिताभ बच्चन चालू कवालीत गाण्यात उठून म्हणतो  “अकबर तेरा नाम नही है!” ही ओळ किशोर कुमार यांनी गायलेली आहे.

संपूर्ण गाणं मोहम्मद रफी यांचं फक्त ती ओळ किशोर कुमार यांची . परदा है परदा” सिंगर मध्ये फक्त मोहम्मद रफी यांचंच नाव अजूनही दिसतं.
ही आठवण लक्ष्मीकांत/ पॅरेलाल यांनी रेडीओवर इंटरव्ह्यूमध्ये सांगताना ऐकली होती.


जुन्या पिढ्या कायम , मोहम्मद रफी की किशोर कुमार यांत विभागलेली होत्या. आताही आहे.
मोहम्मद रफी यांचा स्वर्गीय सुफी आवाज, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण, शिकून तयार झालेला मनाला आनंद देणारा आवाज..
तर किशोर कुमार यांचं रॉ , पारंपरिक नसलेलला, ठराविक मानदंडास छेद देणारा सोल सुदिंग व्हाईस..


देवानंद , मग  सुपरस्टार राजेश खन्ना त्यानंतर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कायम आवाज देणारे किशोर गांगुली.
किशोर कुमार यांच्या अवजाची खासियत  म्हणजे ते जेव्हा देवानंद साठी गायचे तेव्हा देवानंदच पडद्यावर  गातोय असं वाटतं, राजेश खन्नावेळी स्वतः काकाच ते गाणं गातो आहे असं वाटतं आणि “ द अमिताभ बच्चन” ला प्ले बॅक देताना वाटतं की अमिताभच गातोय.
अभिनय, गायन, दिग्दर्शन .. ऑलराउंडर किशोर कुमार.

बाकी सब शोर लिसन टू ओन्ली किशोर!

  • Abhijeet panse

Tuesday 31 July 2018

रोहतांग पास बोगदा , पाऊल पडते पुढे

#रोहतांगपासबोगदा

मागच्या वर्षी अमरनाथवेळी पहलगामला तंबूत डोळे मिटून विश्रांती घेत पडलो असताना शेजारी बरेचसे गोरखपूरचे लोक होते. ते तेथील माओवाद, नेपाळमध्ये भारतीयांचा काय रोल असतो यावरही बोलत होते. जीएसटीला, नोटबंदीला कोणी चांगलं म्हणत होतं तर कोणी चुकीचं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विषय त्यांच्यात निघाला.  एकंदर सगळ्यांच्या तोंडी एक वाक्य बरेचदा ऐकू येत  होतं “मोदी बहोत जोशीला बंदा है!”

चंदीगडचा एक माणूसही तंबूत होता. तो एकटा आला होता. तोही त्यात बोलण्यात सामील झाला. स्लिम, कमी उंचीचा , फ्रेंच कट एकंदर व्यक्तिमत्वावरून , बोलण्यावरून तो शहरी आणि आधुनिक वाटत होता. तो सांगत होता “सच में मोदी बहोत जोशीला बंदा है! अभि अगले साल दो साल मे चायना और पाकिस्तान की बहोत जलाने वाला है! मनाली से लेह जाने के लिये सुरंग बन रही है! मैं जादा अभि इस बारे मे नही बता सकता ..लेकीन दो तीन सालो मे साल भर रोड से लेह, आर्मी के ट्रक्स  सियाचीन ग्लेशियर के ओर जा पायेंगे! " त्याला लोकांनी विचारल्यावर म्हणाला की तो स्वतः त्या टीमचा भाग आहे.

त्याने तेव्हा सांगितलेल्या एका बोगद्याबद्दल काल न्यूज चॅनलवर बघितलं. रोहतांग पास बोगदा.
मनाली ते लाहोल स्पिती वॅलीत जायलाच रोड ने सहा तास लागतात. शिवाय रोहतांग पास वर्षातुन तीन ते चार महिनेच उघडा असतो. वर्षभर बर्फामुळे , वादळामुळे तो बंद असतो. त्यामुळे लेहला नोव्हेंबर ते जुलै पर्यंत फक्त विमान मार्गानेच जाता येतं. एकप्रकारे आठ ते नऊ महिने एक महत्वाचा भाग देशापासून तुटला असतो. तेथील स्थानिक लोक,  मेंढीपाळ लोकांनाही कुठेही जाता येत नाहीत. आठ , नऊ महिन्याची खाद्यसामुग्री जमा करून ठेवावी लागते. त्यांना खूप अडचणी येतात.

पण आता जवळपास पूर्ण तयार झालेला हा नवा बोगदा देशाची , वाहतुकीची समीकरणे बदलवणार आहे. बातम्यात दाखवल्याप्रमाणे हा बोगदा विशेष आहे . आजवरचा वेगळा आहे. कारण या बोगद्यात दोन मजले आहेत. साडे आठ किमीच्या पीर पंजाल हिमालयाच्या उत्तर पूर्व भागातील,  मनाली आणि स्पिती वॅलीला जोडणाऱ्या या बोगद्यामुळे जिथे सहा तास लागतात तिथे आता फक्त एक तास लागणार आहे. शिवाय अपघात होण्याची शक्यता पूर्णपणे कमी. त्याशिवाय वर्षभर रोडप्रवास सुरु असेल.

वरच्या मजल्यातून लोकांना पायी जाता येईल. यात मेंढीपाळ लोक शेळ्या मेंढ्यांसकट तेथून जाऊ शकतील. तर खालून वाहने जाऊ शकतील. हिमाचल प्रदेशला आणि स्पिती वॅलीला , लडाखला जोडणारा हा विलक्षण बोगदा नागरी संस्कृतीसाठी खूप लाभकारक होणार आहे.

पण याखेरीज आणखी सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सियाचीनकडे जाणारा हा मार्ग कायम खुला राहील. अक्साई चीनकडे जाणारा हा मार्ग, या बोगद्यामुळे वाहतूक खूप सुलभ झाल्याने चीनचा चडफड होणार. कारण युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसामुग्री , खाद्यसामुग्री पोहचणेच सगळ्यात महत्वाचे असते. चीनने तिबेट, पाकिस्तानमध्ये सीमारेषेजवळपास सैन्याला सहज वाहतूक करता यावी म्हणूनच रस्त्यांवर निवेश केला आहे.

1999च्या कारगिल युद्धात लेहला जोडणारा एकमेव हायवेवर पाकिस्तानने नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले होते. पण भारतीय सैनिकांनी शौर्याने हायवे राखला होता. त्यामुळे लेहचा संपर्क आणि तो भाग देशात राहिला. असे महत्व आहे या दोन हायवेंचे.

थोडक्यात सोपी शब्दात सांगायचे तर भारतातून लडाख, सियाचीनला दोन मार्गाने जाता येतं. हिमाचल प्रदेश-मनालीतून ‘रोहतांग’ पास ओलांडून आणि काश्मीर सोनमर्गने- ‘झोझिला’ पासमार्गे. पण या दोन्ही दैत्य पासमार्गे त्यांच्या परवानगीने जाणं सोपी नसतं. कारण तेथे कायम अपघाताची , ट्राफिक जॅमची, वादळाची हिमवर्षावाची भीती असते. पण येत्या वर्षापासून मनालीमार्गे लेहला जाताना रोहतांग पासमार्गे न जाता या बोगद्यातून सहज जाता येईल. सहा तास वाचतील.

शिवाय या रोहतांग बोगद्याशिवाय आता “झोझिला पासला” बायपास करणारा बोगदाही तयार होतो आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने लेह आता वर्षभर जोडलं जाणार आहे. यामुळे नागरी आणि सरंक्षणसंबंधित अनेक समीकरणे बदलतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महेंद्रसिंग धोनीसारखा ‘#फिनिशर’ चा रोल निभावताय. ओपनरने सुरू केलेलं काम धोनी फिनिश करतो तसे आधीच्या सरकारने सुरू केलेले काम नरेंद्र मोदी तडीस नेताय. 2010 मध्ये या बोगद्याचं काम सुरू झालं होतं. यापूर्वी मागच्या वर्षी “नाशरी बोगद्याचं” मोदींनी उद्घाटन केलं. त्याचाही शिलान्यास युपीए गव्हर्नमेंटने केला होता.

या नाशरी बोगद्यातून मी गेलो आहे. काश्मीर खोऱ्याला जोडणारा हा भारतातील सगळ्यात लांब हा बोगदा आहे. आतून दर पाचशे मीटरवर टेलिफोन व्यवस्था, फर्स्ट एड व्यवस्था, शिवाय संपूर्ण बोगद्यात स्वच्छ शुद्ध हवा आत येत राहील याची व्यवस्था केली आहे. मागच्या वर्षी हा बोगदा सुरू होण्यापूर्वी , काश्मीर खोऱ्याला जोडणारा जुना #जवाहरबोगदा होता. हा बोगदा खूप अरुंद, आत प्रकाश व्यवस्था नसलेला, शिवाय आत हवा येण्याची व्यवस्था नसलेला आहे. या बोगद्यातून जाताना काही वयस्कर, वृद्ध प्रवाश्यांना श्वासाचा त्रास , छातीवर दडपण , घाबरल्याची अवस्था झाली होती. कारण बोगदा खूप लांब आहे.
त्यामुळे नवे बोगदे तयार होणे खूप आवश्यक आहे.

त्या माणसाने सांगितल्यानुसार , मोदी यांनी स्वतःच्या सरकारात काही स्वतः लडाखला जोडणाऱ्या, चीनच्या अगदी जवळून जाणाऱ्या तीन मोठ्या बोगद्याची हायवे , प्रकल्पाची सुरवात केली आहे. ज्यामुळे चीनची चरफड होणार आहे.. अनेक अभियंते, शेकडो कामगार दिवसरात्र रस्ते आणि बोगदे बनवण्यासाठी राबताहेत. प्रवासात हे स्पष्टपणे दिसून येतं.

“मोदी बहोत जोशीला बंदा है पाकिस्तान और चायना के पाससे वो और बडे रस्ते बना रहा है! हे त्या माणसाचं वाक्य होतं. हे जर खरं असेल तर नक्कीच येत्या काही वर्षांत खूप समीकरणे बदतील.

आणि हे किती सकारात्मक आहे की आज मोदी सरकार वाहतूकीसंबंधित, संरक्षणसंबंधित नवे देशहितकारक प्रकल्प सुरू करताय, काही वर्षांनी दुसरे कोणते सरकार ते पूर्ण करतील. देश असाच पूढे जात राहील.

“सरकारे आते रहेगी जाती रहेगी , लेकीन देश रहना चाहीये….! “

Abhijeet Panse