ख्रिश्चन लोकांत मृत्यूनंतर वा नंतर पुण्यतिथीला मेणबत्ती लावली जाते. फुलांचा गुच्छ ठेवला जातो, आवडीचा पदार्थ केला जातो. तसंच हिंदू धर्मात मृत्यूनंतर श्राद्ध केलं जातं. दोन्ही मध्ये ‘ग्रॅटिट्यूड’ कृतज्ञता, गेलेल्या पूर्वजांची आठवण हा भाव असतो. हिंदु धर्म पुनर्जन्म मानत असल्याने श्राद्ध हा विधी मानतात. त्यामुळे श्रध्देने लोक श्राद्ध करतात.
गया हे बिहारमधील स्थान यासाठी प्रसिद्ध आहे.
मे महिन्यातील दुसऱ्या रविवारला “मदर्स डे” हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो. आषाढ अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, हा हिंदू संस्कृतीमधील मातृदिन मानला जातो.
त्या निमित्ताने.
गया या स्थानाला ‘पितृगया’ म्हंटलं जातं.
येथे सर्वसाधारणपणे सर्व पितरांचं श्राद्ध केलं जातं. पण गुजरातमधील ‘ सिद्धपुर’ नावाचं ऐतिहासिक ठिकाण हे खास मातृ श्राद्धासाठी ओळखलं जातं. या ठिकाणाला ‘मातृगया’ म्हणतात.
हिंदू संस्कृतीमध्ये मातेला विशिष्ट वेगळं स्थान दिलंय हेही यातून कळतं.
अहमदाबादपासून तीन तासांवर, राजस्थान- उदयपूरकडे जाणाऱ्या सुंदर, चार पदरी हायवेवर हे गाव आहे. मुंबईहुन दिल्लीला रेल्वेने जातानाही हे सिध्दपुर स्थानक लागले होते. संपूर्ण गावात मुघलकालीन अवशेष आढळतात. येथे बिंदू सरोवर नावाचं छोटा तलाव आहे. पूर्वी या गावाजवळून ‘सरस्वती’ नदीचा प्रवाह वाहायचा. काळाच्या ओघात आणि मानवी चुकांमुळे नदी नष्ट झाली.
ऋग्वेदात या सिद्धपुरचा, मातृगयेचा , तेथे मातृ उपकराप्रित्यर्थ केले जाणाऱ्या श्राद्धाचा, स्थान महात्म्य, सरस्वती नदीचाउल्लेख आढळतो असे तेथील लोक म्हणतात.
संपूर्ण भारतात फक्त विशेषतः मातेच्या श्राद्ध करण्यासाठी हे स्थान आहे. असं म्हटल्या जातं.
कार्तिक महिन्यात येथे मातृ श्राद्धाचे महत्व असते.
कपिल मुनींनी त्यांच्या मातेस या ठिकाणी सरस्वती किनारी #सांख्य_दर्शन सांगितले तद्नंतर त्यांच्या मातेस मोक्षप्राप्ती झाली असे मानतात. परशुरामानेही रेणुकामातेप्रित्यर्थ मातृहत्या दोषपरिहारार्थ येथे मातृश्राद्ध केले होते म्हणतात.
सिध्दपुर हे मुघलकालीन गाव. गावात मध्ययुगीन भारताची , मुघलकालीन वास्तुकला अजूनही दिसून येते. गावात अनेक ‘हवेली’ आहेत.
Archeological Survey of India ASI यांच्या अखत्यारीत येथील दोन वास्तू येतात. एक महादेवाचे रुद्र महालया मंदिर आणि एक जामी मशीद.
दोन्ही अप्रतिम वास्तू आहेत. सुंदर लाकडी नक्षीकाम असलेले स्थापत्य जागोजागी दिसते.
गुजरातमधील ‘स्मशाने’ हा एक स्वतंत्र विषय आहे. लोक संध्याकाळी फिरायला जातात येथील स्मशानभूमीत. इतके सुंदर , बागांनी, कारंजी यांनी सुशोभित केलेलं असतात.
सिध्दपुर येथील स्मशानाचे सुद्धा प्रयाग, वाराणसी , उज्जयिनी येथील स्मशानांचे जे महत्व मानले जाते तसे आहे .
असे हे खास मातृश्राद्धासाठी महत्व असलेले एकमेव स्थान. भारतातील एक आगळेवेगळे स्थान.
अहमदाबादहुन सिध्दपुरला जाताना मेहसाणा हे प्रसिद्ध शहरही लागतं. सिध्दपुरहुन काही किमी उत्तरेकडे पालमपूर हे गुजरात आणि राजस्थान सीमेरेषेजवळील शहर लागतं. इथून पुढे अरावली पर्वतरांगाही दिसतात. माऊंट अबू हे स्थानही जवळच.
क्या रखा है घर में मे कुछ दिन तो गुजारो नदी किनारे परबतो में!
- अभिजित पानसे
No comments:
Post a Comment