Wednesday 14 February 2018

हीच ती वेळ हाच तो क्षण"

त्यालाही ती आवडायची. ती ही त्याला हळूहळू लक्षात घ्यायला लागली. लवकरच तिलाही तो आवडायला लागला होता. शेवटी मागच्यावर्षी त्याने तिला औपचारिकरित्या प्रपोज केलंच. बरेच हिंदी चित्रपट बघितल्याने तिनेही गालावर दोन हात ठेवून सरप्राईजड झाल्यासारखं “ओह माय गॉड!” वाले भाव देऊन ‘हो’ म्हटलं होतं.
‘अशावेळी’ दोघांनाही किस करायचं होतं पण त्यांना प्रायव्हसी  मिळाली नव्हती.

आणि हेच त्याच्या महादुःखाचं कारण होतं. प्रायव्हसी न मिळणे!
वर्ष झालं पण दोघेही आपापल्या कामात, आणि मित्र आणि लोकांच्या गराड्यात !
 आजवर एकांत मिळाला नसल्याने दोघेही, विशेषतः तो वैतागला होता.

14 फेब्रुवारीला ती बऱ्याच महिन्यांसाठी शहराबाहेर जाणार होती. म्हणून दोघांनीही ठरवून तेरा फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे च्या आदल्या दिवशी सुटी घेऊन बाहेर भेटायचं ठरवलं.

 आज त्याने तिला ‘किस’ करण्याचा चंग बांधलाच होता! सोशिअल मीडिया अपडेट्सवरून आज “किस डे” आहे हे कळलं होतं.
वाह आज छान इंग्लिश मुहूर्तही आहे तर! तो स्वतःशीच खुष होता.
तिचीही ‘ना’ नसणारच होती.
“पण किस करणार कुठे?” हा प्रश्न त्याला नेहमीप्रमाणे सतावत होता.

संपूर्ण दिवस आज सोबत घालवायचा ठरवलं होतं.
त्याने क्लुप्ती लढवली, मुव्ही हॉलमध्ये तिला किस करता येईल म्हणून मुव्ही बघायचं ठरवलं! त्याने दुपारी तिला तिच्या बिल्डिंगखालून तिला पिक अप केलं. वर तिच्या मैत्रिणी फ्लॅटमेट्स असल्याने वर जाण्यात काहीच अर्थ नव्हता.

ती खाली आली. तीने नवा हेअरकट केला होता. कॅजुअल्समध्येही ती नेहमीप्रमाणे आकर्षक दिसत होती.
ते मॉलच्या पार्किंगमध्ये पोहचले. त्याने बाईक मुद्दाम बेसमेंटला पार्किंगच्या भागात अगदी शेवटी एका मोठ्या पिलरच्या मागे लावली. तो सतत संधीच्या शोधात होताच.
ती चेहऱ्यावरील स्कार्फ काढत असताना त्याने आजूबाजूला  सगळीकडे दृष्टी फिरवली. कोणीही दिसलं नाही. हीच ती वेळ हाच तो क्षण! तो तिच्या जवळ गेला. तिलाही ते अगदी अनपेक्षित होतं. तो तिला किस करणार तर …
“कौन है उधर पिछे! इतना टाईम क्यू लग रहा है पार्किंग मे!”

“हा बस चाबी गिर गयी थी! जा ही रहे है!”

तिथल्या सिक्युरिटीगार्ड ने त्याचं “मिशन चुंबन” काही पूर्ण होऊ दिलं नाही.
ती ही या सगळ्या मजेदार प्रकारामुळे हसत होती.

ते वरच्या मजल्यावर मुव्ही हॉलपाशी पोहचले. बस हीच ती जागा! जी अजरामर होणार आठवणीत! प्रथम चुंबन स्थळ!
कुठल्या तरी फ्लॉप मुव्हीचं तिकीट काढायचं त्याने ठरवलं होतंच.
पण सर्व चित्रपट याच आठवड्यात रिलीज झालेले.

“टू कॉर्नर सीट्स प्लिज !” त्याने काचेपलीकडील नेव्ही ब्ल्यू कॅप घातलेल्या मुलाला सांगितलं.
“सॉरी टॉपमोस्ट कॉर्नर सीट्स आर नॉट अवेलेबल!” ओन्ली एट मिडल सीट्स आर अवेलेबल!

अरेरे हे काय! ही संधीही जाते काय! बघू आत जाऊन तर!
पण काम-देवाचं नाव घेऊन त्याने उपलब्ध सीट्सपैकी दोन सीट्स बुक केल्यात.

आत संपूर्ण हॉल भरला होता. ते आपल्या सीट्स वर जाऊन बसलेत. हॉलमधील दिवे हळूहळू धूसर होत काळोखाची चादर पसरली. शेजारच्या आणि मागच्या जागेवर कोणीही नव्हतं. त्याला खूप आनंद झाला. तिलाही झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ती मात्र नॉर्मल होती.

 तितक्यात एक घोळका आला. एक मोठं कुटुंब आलं. त्यात काही वृद्ध बायका माणसेही होती. ते त्यांच्या मागे पुढे रिकाम्या आसनावर जाऊन बसलेत.
त्याचा पुन्हा हिरमोड झाला.

पण तिचं अगदी निकटचं सानिध्य अनुभवताना तो रोमांचित झाला होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. बस आता वाट बघायची होती नेमक्या क्षणाची!
लोक चित्रपट बघण्यात गुंग असताना ,हीच ती वेळ हाच तो क्षण , तो तिच्या अगदी निकट पोहचला. त्याने हळूच मागे वळून बघितलं तर मागे दोन म्हातारे भिंगाच्या चष्म्यातून एकटक समोर याच्याकडेच बघत होते.
तो एकदम शरमून बाजूला झाला.
संपूर्ण चित्रपट त्याने चरफडत त्या दोन मागच्या आजोबांसोबत आणि शेजारच्या सतत आवाज करणारया चिल्लर पार्टी मुलांसोबतच बघितला.

एकदाचा रटाळ चित्रपट सम्पला. दोघे बाहेर आलेत. मग मॉलमध्ये गप्पा, इकडे तिकडे फिरून झालं पण त्याला प्रायव्हसी काही केल्या मिळत नव्हती. त्याचं लक्ष बाकी कश्यातच नव्हतं. तिची घरी परत जायची वेळ आली.
सगळ्यात वरच्या मजल्यावरून खाली जाताना येताना त्याच्या डोक्यात एक अजून अनप्रॅक्टिकल आयडिया सुचली. कॅप्सूल लिफ्ट ऐवजी त्याने नॉर्मल लिफ्टने खाली जायचं ठरवलं.

आह वाह संपूर्ण लिफ्ट रिकामी! आत ते दोघेच!
त्याने ‘G’ च्या लाल बटणावर दाब दिला. लिफ्ट खाली जाऊ लागली.
“बस साठ सेकंदस है तुम्हारे पास , इस साठ सेकन्ड्स में अगर तुमने किस कर लिया तो ये साठ सेकंदस जिंदगी भर तुमहें याद रहेंगे! “तो स्वतःला मनातल्या मनात बजावू लागला. ती मात्र त्याच्या या क्लुप्तीपासून अनभिज्ञ होती.
हीच ती वेळ हाच...
 त्याने तिला हळूच जवळ घेण्याचा प्रयत्न केला . तिने सरळ त्याला दूर केलं. “अरे काहीही काय सीसीटीव्ही कॅमेरा असतो लिफ्टमध्ये! ती विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात आठवत नाही का!

 ”हम्म.. त्यांचं त्या जाहिरातपासून सेटिंग जमलं..पण आपलं सेटिंग कधी जमणार!”
तो चरफडत स्वतःशी बोलत दूर झाला.

ते बाईकवरून तिच्या बिल्डिंगजवळ पोहचले. तो प्रवासभर नाराज होता. खाली बिल्डींगपाशी अंधार होता. झाडे वृक्षांमुळे ते जरा आडोश्यात उभे राहिलेत. त्याला पुन्हा संधी मिळाल्याची, हाच तो क्षण हीच ती वेळ असल्याची भावना झाली. “वृक्षवल्ली खरंच सोयरे असतात तरुण लोकांचे नाही! !” त्याने कामदेवाचं स्मरण करून तिच्या जवळ गेला.
तेवढ्यात एक माणूस बाईक थांबवून तिथे फोन वर बोलत राहिला.

त्याची शेवटची आशाही धुळीस मिळाली.
“या देशात कोणी शांत चित्ताने एक किसही नाही करू शकत का!”

तिला तितक्यात एक फोन आला. तो नाराजीने तिला बाय म्हणत जाऊ लागला. त्याची नाराजी, दुःख तिला कळत होतं.
तिचं फोन वर एक मिनिट बोलणं झाल्यावर, चेहऱ्यावर आणि डोळ्यात खट्याळ भाव आणत म्हणाली, “आज फ्लॅटमेट्स बाहेर गेले आहेत ट्रिपला! आज रात्री कोणीही नसणार वर! तू आज रात्री राहू शकतोस! आत्ता तिचाच फोन होता!”

शेवटच्या क्षणाला मरणाऱ्याच्या तोंडी अमृत पडावं आणि तो पुन्हा टवटवीत व्हावा अशी त्याची अवस्था झाली.
त्याने हवेत जोरदार उडी मारली त्याने! उडी मारून हवेत मागे पायाला पाय लावण्याचा हिरोची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला . पण जमले नाही. पायात पाय अडकून आपटायचा राहिला. पण आता त्याची कसलीच तक्रार नव्हती.
मिशन चुंबन आज शांतपणे, पूर्ण प्रायव्हसीमध्ये पूर्ण होणार होतं.

त्याला हॉलमध्ये बसवून ती तिच्या खोलीत गेली. आता त्याला घाईगडबड नव्हती संपूर्ण रात्र त्यांचीच होती! ती काही वेळाने बाहेर आली.
तिने गुडघ्यापर्यंत वन पिस घातलं होतं. केस ओलसर होते. हलकंसं लिपस्टिक लावलं होतं.
ती अत्यंत मादक दिसत होती.
त्याने तिला जवळ ओढलं. तिच्या मानेजवळील परफ्युमचा सुगंध त्याच्या गात्रा गात्रांना, संपूर्ण संवेदनांना पुलकित..जागृत करून गेला.

तो आणखी  तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा त्याने दोन्ही हाताने हलकंसा धरून तिला किस करण्यासाठी सावधान झाला! हो हो हीच ती वेळ हाच तो क्षण!

तिने त्याला दूर केलं.
“ यु गॉट प्रोटेक्षन नो?”

“भुकेला मागतो एक किस आणि देव देतो..” अशी त्याची मनातल्या मनात अवस्था झाली.

तो अगदी चेहऱ्यावर स्वतःबद्दल अभिमानाचे भाव आणून तिच्या दोन्ही खांद्याना दोन हाताने पकडत म्हणाला,
“ तु माझा हा मोबाईल बघितलास?  सहा महिने झालेत अजून त्याचं स्क्रीनकव्हर मी काढलं नाही! मी कधी हेल्मेटशिवाय गाडी चालवताना तुला दिसलो का?  नवी बाईक घेतली तेव्हा कित्येक दिवस तिचं कव्हर काढलं नव्हतं! मित्र त्याला काँडम कव्हर म्हणायचे..बाईकला व्हर्जिन बाईक म्हणायचे!  अगं प्रोटेक्शनशिवाय तर मी काहीच करत नाही! प्रोटेक्शन इज मस्ट!
रुबाबात पॅन्टच्या खिशातून त्याने प्रोटेक्शनचं पाकीट काढलं! तिला दाखवलं!

“ओह्हो”! ‘क्या बात है!”
तिनेच त्याला ओढून आपल्या खोलीत घेऊन गेली. त्याला बेडवर ढकललं. ती त्याच्या संपूर्णपणे जवळ आली..पुन्हा एकदा त्याच्या संवेदना जागृत झाल्यात..जोरदार उफाळून आल्यात..त्याला किस करण्यासाठी ती त्याच्या अगदी निकट आली.. बस्स हीच ती वेळ हाच तो क्षण!
ती त्याला किस करणार तितक्यात..
त्याने तिला थांबवलं..
“एक मिनिट! तू आज मला दुपारी भेटायच्या आधी काय खाल्लं होतं? तू जेवली होतीस का?”

“किती रे काळजी करतो माझी!
हो मी तेव्हा घरून फिश आणि चिकन करी खाऊन आले होते! आय एम फुल नाव!
त्याच्या ओठांवर बोट ठेऊन म्हणाली ,
“नाव डोन्ट टॉक ..जस्ट एन्जॉय धिस मोमेंट! वि हॅव ओन्ली वन नाईट फॉर अ लॉंग टाईम!”

त्याला किस करण्यासाठी त्याच्या चेहरा घट्ट तिने पकडला..कोणत्याही क्षणी त्याच्या आयुष्यातील त्याचं पाहिलं किस होणार होतं. दुष्काळ संपला होता. घनन घनन घन गिर जाये बदरा..पार्श्वसंगीत सुरू होतं.
आणि त्याने तिला त्याच क्षणी बाजूला केले . तो उठून बसला.

“काय तू आज चिकन खाल्लंस!
आज महाशिवरात्रीचा मला उपास आहे! मी तुला किस नाही करू शकत! माझा उपास मोडेल ना!
जातो मी! जय शंभो! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
बाय!

आणि तो तडक निघून गेला. तीला काही कळेनासं होऊन ती बघत राहिली!
 आज दुसऱ्यांदा शंकराने कामदेवाला भस्म केलं होतं.

समाप्त.

#किसडे #महाशिवरात्रीपेशल.
१३ फेब्रुवारी 018

-Abhijeet Panse

No comments:

Post a Comment