Sunday 14 January 2018

चंदनवाडीकडे


 मी उठून आजूबाजूला बघू लागलो माझी बॅग दिसली नाही. समोर बघितलं ..डावीकडे  उजवीकडे शेजारी बघितलं.. पण बॅग नव्हती!

मागे वळून बघितलं आणि!

 हुश्श !बॅगवती डोक्याच्या मागे शांतपणे बसली होती. बॅग मी उशाशी ठेवली होती . आणि मी शेजारी आणि समोर बघत होतो.
“उशाशी बॅगळसा आणि तंबूला वळसा !”


माझ्या जीवात जीव आला . काही सेकन्ड्ससाठी छातीत श्वास अडकला होता. आय रिअली हॅड हार्ट इन माय माउथ!

मनगटावरील घड्याळ आपल्या दोन काट्यानी  सात वाजून पंधरा मिनिटे झाली दाखवत होते.
उशीर झाला होता. मी साडेसातला निघण्याचं ठरवलं होतं. तंबूतील इतर तिघेजण तेव्हाही झोपलेच होते. पण त्यांच्याकडे यात्रेचा बराच अनुभव होता. ते निश्चिंत लोक होते.

मला उठल्यापासूनच बरं वाटत नव्हतं. डोकं, शरीर जड झालेलं..खूप अस्वस्थ वाटत होतं. सगळयात त्रासदायक म्हणजे घसा खूप दुखत होता. आणि अजून तर यात्रा सुरूही झाली नव्हती.

थंडी खूप होती. मी बाहेर जाऊन प्रथम फ्रेश झालो. पाण्याची व्यवस्था छान होती. खूपसारे पोर्टेबल टॉयलेट्स होते. मला तेव्हा दिसलं की माझ्या तंबूच्या मागेच शौचालयाची ओळीने चाळ आहे. किती ती काळजी माझ्या पोटाची तंबुवाल्याला, देवाला बरे! सगळे लोक चंदनवाडीला जाणाऱ्या मार्गाने निघाले होते. मला उशीर झाला होता. याची किंमत नंतर चुकवावी लागेल याची कल्पना नव्हती तेव्हा मला!

मी मुखमार्जन आटोपलं, 'दशमद्वारमार्जन' मात्र केलं नाही. सिस्टम एकंदरीतच बिघडलं होतं.
पण मला सगळ्यात जास्त काळजी होती ती घश्याची. त्यामुळे मी काहीच खाऊ गिळू शकत नव्हतो.
तंबूत येऊन मी प्रथम घरून आणलेला 'आलेपाक' तीन चमचे खाल्ला. त्याने अंगात आतून गरमीही आली. बॅग उचलून निघालो. आतले तिघे जण तेव्हाही झोपलेच होते.

आदल्या दिवशीच जिथे लॉकररूममध्ये मोठी सॅक ठेवली होती तिथूनच जायचं होतं.
 लाऊडस्पीकरवरून सतत सूचना सुरू होत्या.
रस्त्यात फुलांनी डवरलेली गुलाबाची खूप झाडे होती. जवळील मेडिकल सर्टिफिकेट आणि अमरनाथ श्राइन बोर्डाकडून मिळालेला परवाना, जो मिळवायला मला काय काय 'जुगाड' करावा लागला तो असा सार्वजनिक मी नाही करू शकत, तो परवाना चेकिंग पोस्ट वर दाखवावा लागला. आणि तिथून बाहेर पडलो. मागे पहलगामचं तंबूस्तान राहीलं. "बचेंगे तो फिर मिलेंगे" मनात म्हणून मी समोर चालू लागलो.

थोड्याचवेळात लिडर नदी काठी डांबरी रोडवर आलो. तिथून प्रत्येकी शंभर रुपये घेऊन चंदनवाडीपर्यंत काश्मिरी लोकांच्या गाड्या सोडत होत्या. खरी चालण्याची  यात्रा चंदनवाडीपासूनच सूरु होते.

  सर्वजण आपापल्या समूहात आले असल्याने त्यांना प्रथम प्राधान्य मिळत होतं. मी एकटा असल्याने मला 'सिंगल' सीटसाठी खूप अडचण येऊ लागली. अर्धा तास गेला पण एकाही गाडीत एक सीट रिकामी मिळत नव्हती. वेळ भराभर जात होता. साडेनऊ वाजायला आलेत.


तेवड्यात एक गंमत झाली. काही संन्यासी साधू लोकांनी, त्यांच्याजवळ पैसे नाही म्हणून कोणी त्यांना गाडीत घेत नव्हते , म्हणून ते रस्त्यावर आडवे झोपलेत , रस्ता अडवून धरला. शेवटी पोलीसांनी मध्ये पडून  त्यांना उठवलं आणि एक गाडीवाल्याने बसवून त्यांना घेऊन गेला.
मीसुद्धा  रस्त्यावर आडवा झोपू का मला कोणी गाडीत घेत नाही म्हणून विचार केला! " निषेध निषेध ! ओरडू का! " अरे कोणी जागा देता का रे जागा !या तुफानाला! हे तुफान आता थकलंय! पोट बिघडलेल्या अवस्थेने गळंलंय!
आवो कुछ तुफानी करते है! असं वाटून गेलं. पण पोलीस पार्श्वभागावर लाठीप्रहार करतील ही जाणीव झाल्याने मी विचार सोडून दिला.

तेवढ्यात एका चालकाने मला आवाज दिला, त्याच्या गाडीत एक जागा रिकामी होती.
 आमचा रथ चंदनवाडीकडे , लीडरनदीच्या साक्षीने दौडू लागला. शब्द अपुरे पडतात असं अप्रतिम , सुंदर सृष्टीसौंदर्य दिसू लागलं. चंदनवाडीला जाताना उंचावर वळवळणाचा रस्त्याने जात होतो. खाली खळाळत लिडर, वर निळंशार आकाश, उंचच हिमालय पर्वताची शिखरे, त्यावर घनदाट देवदारचं जंगल.
मध्ये पुन्हा एकदा तपासणी झाली. चंदनवाडीला पाऊणतासात पोहचलो. प्रचंड गर्दी. मी रांगेत उभा राहिलो. ती शेवटची आणि महत्वाची तपासणी रांग होती. चंदनवाडीलाही तंबू आणि लंगर दिसलेत.
तेवढ्यात एक लाठी विकणारा छोटा मुलगा दिसला. दोन हातात दोन जाड्या देवदारच्या लाठ्या विकत घेतल्या.
 तपासणी होऊन बाहेर आलो. आता शड्डू मांड ठोकण्याची वेळ आली होती. अभि तो पार्टी सुरू हुई थी!


अमरनाथयात्रा का खास आणि वेगळी आहे याचं पुन्हा एकदा दर्शन झालं. अनेक लोक हातात फ्रुटी, चॉकलेट्स , टॉफिज, बिस्किटचं पाकिटं आणून देत होते. कोणी अॅपल ज्यूसची बाटली आणून दिली.  लंगरमध्ये गरम जेवण, न्याहारी सगळं मिळत होतं.  एक ठिकाणी मला "बनारसी पान" चंही लंगर दिसला.
चहा , कॉफी, सरबते  सगळ्यांची सरबराई होती. आपण फक्त तिथे जाऊन हवं ते घ्यायचं . हे सर्व देताना कुठलाही वागण्यात कोरडेपणा, किंवा तुसडेपणा दिसत नव्हता, तथापि अत्यन्त अर्जवतेने ते बोलावत होते, खाण्यास आवाहन करत होते.
कलियुगातील कर्ण अमरनाथ यात्रेत दिसत होते.
मी त्या सगळयांना मनोमन नमस्कार केला आणि पूढे चालू लागलो.
सगळ्यात मोठं उभं उंचंच उंच संकट, टास्क, चॅलेंज पुढे उभं ठाकलं होतं. त्याचं नाव म्हणजे "पिस्सु टॉप". अमरनाथ यात्रेत जे दरवर्षी मृत्यू होतात त्यात दोन ठिकाणी सगळ्यात जास्त मृत्यू होतात, एक पिस्सु टॉप, दुसरा शेषनाग.
पिस्सु टॉपच्या खडतरपणाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. मी जन्मभर कधीही विसरणार नाही असा अनुभव पिस्सु टॉपने दिला.

Saturday 13 January 2018

ब्लॅक होल..संक्रांत स्पेशल

काळ्या रंगासारखा प्रामाणीक रंग नाही. इतर रंगासारखे  काळा रंग आपले इतर ‘रंग’ दाखवत नाही. विविध 'शेड्स'मध्ये स्वतःला प्रदर्शित करून गोंधळ निर्माण करत नाही. लालमध्ये केशरी, डार्क लाल, फिकट लाल, गुलाबी , निळ्यामध्ये आकाशी निळा, गर्द निळा, मोरपंखी फिरोजा निळा असा पसारा तो मांडत नाही. हिरव्याचंही तेच. फिकट हिरवा..पोपटी हिरवा, बॉटल ग्रीन , शेवाळी..

काळा मात्र आतही काळा बाहेरूनही काळा. आहे ते असं आहे स्वीकारा नाही तर पूढे जा. मी स्वतःत बदल करणार नाही. तुम्हाला सोयीस्कर  हव्यातश्या विविध छटा देणार नाही.

स्वतः पूर्णपणे स्वीकारलेला,  रंगाची, विश्वाच्या अंतिम सत्याची जाणीव झालेला असा काळा ..#ब्लॅककलर. बालकाप्रमाणे खरा. आतून बाहेरन एकाच रंगात!

 काळा रंग अत्यन्त शक्तीवान. याच्यापुढे कोणाचंही चालत नाही.
 या काळ्या रंगापुढे कोणत्याही रंगांचं चालत नाही.
इतर सर्व रंगावर इतर कोणताही रंग फासला जाऊ शकतो. ज्याच्यावर फासला गेला त्याचे नामोनिशाण उरत नाही.
पण काळा रंग! हुकुमी बादशहा! याच्यापुढे सर्व रंग नतमस्तक!
सर्व रंग याच्यापुढे थरथर कापतात.  कोणत्याही रंगावर हा आरूढ झाला की पुन्हा त्यावर कोणताही रंग चढू  शकत नाही.
काळा रंग म्हणजे अश्वमेध ! एकदा याची पताका कोणत्याही रंग साम्राज्यावर फिरली की पुन्हा इतर कोणताही रंग 'काळ्यावर' उमटू शकत नाही.

काळा रंग म्हणजे वरवरून कडक स्मशानवैरागी. कोणत्याही  धर्माचा हा मांडलिक नाही.  इतर रंगांना वेठीस धरले, इतर रंगानी विविध धर्मांचं मांडलिकत्व स्विकारले. काळा रंग मात्र एकला चलो रे! स्वतःच अनभिषिक्त सम्राट!

काळ आणि काळा रंग हेच अंतिम सत्य.
काळ्या रंगाच्या काळाच्या मागे लागून तुकाराम, नरहरी सोनार काळात एकरूप झालेत. अजूनही हा काळा सहस्त्र वर्षांपासून लोकांना आपल्याकडे आकर्षित करतोय. आषाढातील काळ्या ढगांमुळे शेतकरी आनंदित होतो.
असा हा काळा रंग चिरंतन ! ब्लॅक होल! पुन्हा यातून सुटका नाही.

#Blackisin

-अभिजित दिलीप पानसे

Thursday 11 January 2018

अश्विन 300 *

2011चा वर्ल्ड कप भारताने जिंकला खरा पण त्यानंतर  भारतीय कसोटी क्रिकेटसाठी दोन वर्षांसाठी काळ खडतर गेला.  बॉलिंग कक्ष कमजोर पडला होता. प्रमुख स्पिनर हरभजनसिंग जवळपास संपला होता, झहीर खान दुखापती ग्रस्त राहिला. फिरकीपटूपैकी प्रज्ञान ओझा, अमित मिश्रा सतत आत बाहेर होत होते. रवींद्र जडेजाचं कसोटी क्रिकेटमध्ये नामोनिशाण नव्हतं. अश्यावेळी आला नवोदित गोलंदाज चेन्नईचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन! 2011 च्या दिवाळीत वेस्ट इंडिजची टीम भारतीय दौऱ्यावर आली. त्यात प्रथमच आपलं कसोटी क्रिकेटचं नारळ वाढवलं रवी चंद्रन अश्विनने.
स्वप्नातीत वाटावं असा त्याने खेळ केला तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेत !
सगळ्यात जास्त विकेट्स आणि शिवाय हरभजनसिंग ला आपले
कसोटीमधील प्रथम शतक  करायला दहा वर्षे लागलेत तिथे या ऑफ स्पिनरने आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत दोन शतके हाणलीत आणि सगळ्यात जास्त विकेट्स घेतल्या आणि "मॅन ऑफ द सिरीज" झाला.

विमान ..फ्लाईट आकाशात उडताना छोटी मुलं डोळे भरून बघतात तसा टीव्हीवर बघताना सुद्धा डोळ्यांचे पारणे फिटतील अशी ऑफस्पिनरचा बॉलला फ्लाईट  ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर लाईन आणि अचूक "गूड लेग्थ" टप्पा   टीव्हीवर बघतानासुद्धा डोळ्यांचे पारणे फिटायचे. पण 2013 ते 015 याकाळात तो अगदीच नकारात्मक गोलंदाज बनला! बॅट्समनच्या पायावर , लेग स्टंप वर गोलंदाजी करू लागला. बॉलमधील फ्लाईट विमान आकाशातून सरळ धावपट्टीवर धावू लागलं. बॅट्समनच्या डोळ्यांच्या पातळीच्या वरचा बॉल आता  बॅट्समनच्या उदराच्या पातळीवर येऊ लागला. त्याची नकारात्मक बॉलिंग बघून त्याची अक्षरशः चीड येऊ लागली. तो टीममध्ये नको आता वाटू लागलं. जी नकारात्मक, सुरक्षणात्मक गोलंदाजी  हरभजनसिंगने करिअरच्या शेवटी करायला सुरुवात केली होती ती रवी अश्विनने अगदी दोन वर्षातच सुरवात केली. हरभजनसिंग त्याच्या याच डिफेनसिव्ह बॉलिंगमुळे संपला तो अश्विन पहिल्या दोन वर्षांतच संपतोय असं वाटलं.
अश्विन चा कुमार गौरव, रॉय होणार असं वाटू लागलं. वन मुव्ही वंडर ऍक्टरप्रमाणे हा वन इअर क्रिकेटर होता असं वाटलं.पण 2016 पासून त्याने स्वतःमध्ये खूप बदल केलेत, आत्मपरीक्षण केलं. मेहनत केली आणि अति 'वेरायटीज' च्या मागे लागण्यापेक्षा त्याने पारंपरिक ऑफ स्पिनवर लक्ष केंद्रित केलं.
मधल्या काळात 'दुसरा' या जालीम अस्त्रावर आयसीसीची कडवी दृष्टी पडल्याने त्या अस्त्राला हद्दपार केले होते. या जालीम अस्त्राने सकलेन मुश्ताक,  थलैवा मुथैय्याला रणकर्कश केलं होतं, ज्या 'दुसरा ' अस्त्रामुळे मोहम्मद हाफिज अजेय बनला होता त्या अस्त्रालाला आयसीसीने रद्दबातल केले. त्यामुळे " कॅरम बॉल'' वर या मूळ मेंडिसास्त्रावरच अवलंबून झालेल्या अश्विनने पारंपरिक ऑफस्पिन वर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आणि पुढील दोन वर्षात तीन साल का भुला अश्विन 2016 वर्षाच्या  शाम को फिरसे लौट आया!

आज अश्विन जबरदस्त गोलंदाज बनला आहे.  गेल्या वर्षभरात त्याने ऐंशीच्या वर विकेट्स घेतल्यात.
आजच त्याने नागपुरात लंकेविरुद्ध 300 तीनशे टेस्ट विकेट्स पूर्ण केलेत,  जो एक अत्यन्त महत्वाचा टप्पा कोणत्याही बॉलरच्या करिअरमध्ये असतो.


अश्विन बद्दल मी नेहमी म्हणतो की हा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन व्हायला हवा. तो एक अत्यन्त "थॉट प्रोसेस" थ्रू जाणार , 'थिंकिंग' खेळाडू आहे. एक अस्सल दाक्षिणात्य खेळाडू नेहमीच कॅप्टन म्हणून मला आवडतो. दिल्लीच्या आणि दाक्षिणात्य खेळाडूंच्या मानसिकतेत थोडा फरक असतो. कॅप्टन असताना तो स्पष्ट जाणवतो.

अश्विन हा कर्णधार म्हणून खूप यशस्वी होऊ शकतो हे मला मनापासून वाटतं. ऑन एकंदरीतच भारतीय मानसिकता, वर्गातील हुशार मुलाला कॅप्टन , मॉनिटर बनवायची असते; त्यामुळे नेहमी टीममधील रन्स काढणाऱ्या बॅट्समनलाच कॅप्टन बनवलं जातं.
महेंद्र धोनीवेळी परिस्थितीकारणामुळे तसं केलं नसल्याने भारताला जबरदस्त कर्णधार मिळाला.
पण  रवी अश्विन कॅप्टन होण्याची शक्यता कमी आहे कारण चाहल आणि कुलदीप दोन उत्कृष्ट स्पिनर्स भारतीय टीममध्ये आले आहेत. त्यामुळे अश्विनची संघात वर्णी लागेलच असे नाही. पण कधीतरी अश्विनला कॅप्टनशिप करताना बघायची इच्छा आहे.

पुढील महिन्यात भारतीय टीम खडतर दक्षिण आफ्रिकेत जातेय तिथे त्याची कसोटी लागेल यात शंका नाही. पण किमान तो आता 'बेसिक' गोष्टी नीट करतोय ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे!
अभिनंदन रवीचंद्रन अश्विन!

*ये दिवार टुटती क्यू नही *



"ये दिवार टुटती क्यू नही!"

शाळेत असताना मी सचिन भक्त होतो, मैदानावर सतत वैतागलेला जग्गुदादा श्रीनाथ माझा आवडता भारतीय खेळाडू होता..गांगुलीचे ऑफ ड्राईव्हज आवडायचे, आपला तो अज्ज्या आगरकर दुसऱ्याचा तो #अजहरमहमूद असल्याने  अजितभाऊ आवडायचे.. यांचे स्टिकर्स मी मिळवायचो आणि शाळेतील पुस्तकाच्या हलक्या ब्राऊन कागदावर चिकटवायचो.

पण स्टिकर्स मिळाले नाहीत तर फक्त एका खेळाडूचे वर्तमानपत्रातील कृष्णधवल फोटो कापून मी नोटबुकमध्ये लावायचो तो फक्त राहुल द्रविड.
 बहुतेक सर्व नोटबुक्समध्ये आतमध्येही
राहुल #जॅमीचे वर्तमानपत्रातील कापलेले फोटोज चिकटवलेले असत.

तो जेव्हा आला तेव्हा त्याचं खेळण्याचं तंत्र वेगळं वाटायचं. त्याची बॅट तिसऱ्या, चवथ्या स्लिपमधून यायची. बघतानाही ते वेगळंच वाटायचं. खेळताना बॅटने तो एक अर्धचक्रच काढायचा.

आणि त्याकाळी क्रिकेटमधील मी कॉपी मास्टर असल्याने, जे क्रिकेटर्स आवडायचे त्यांच्या बॅटींग आणि बॉलिंग ऍक्शनची कॉपी ग्राउंडवर करायचो.

जग्गु दादा श्रीनाथची ऍक्शन, अजित आगरकरची , दुदुदुडू धावत नाजूक बॉलिंग करणाऱ्या गांगुलीच्या बॉलिंग ऍक्शन कॉपीही करायचो.
पण बॅटिंगमध्ये (फक्त ऍक्शनची) कॉपी करायचो ती राहुल द्रविडचीच! त्याची ती तिसऱ्या स्लीपमधून येणारी अर्धवर्तुळ निर्माण करत येणारी बॅट , मी ही तसाच बॅट फिरवत बॅटींग करण्याचा प्रयत्न करायचो. मित्रांनाही हे माहिती असायचं मी हे मुद्दाम करतोय.

मॅचमध्ये नियमितपणे पहिला ओव्हर टाकणारा फास्ट बॉलर आणि ओपनिंग बॅट्समन असण्याचा रेकॉर्ड मनोज प्रभाकर आणि माझ्याच नावाने आहे. 😛😎
शेवटी कॅप्टनही मीच होतो.

राहुल द्रविडकडे एक बॅट्समन म्हणून फार कमी स्ट्रोक्स होते

पण त्याचा खास गुण म्हणजे त्याला त्याच्या मर्यादा माहिती होत्या. त्याच मर्यादेत तो खेळला.
टेस्टमध्ये आपला "ऑफ स्टंप" नक्की कुठे आहे हे त्याच्याइतकं कुणाला माहिती नसेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राहुल द्रविडचं पहिलं वहिलं टेस्ट शतक, पाकिस्तानविरुद्ध पहिली वनडे सेंच्युरी बघता आली. याचा आनंद आहे.

त्याच्यावर स्लो खेळण्यावरून टीका नेहमीच व्हायची. पण याच राहुल द्रविडने न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून फास्टेस्ट हाफ सेंच्युरी मारलीये.

द्रविडकडे आकर्षक स्ट्रोक्स नव्हते. पण त्याचा पूल शॉट खूप आकर्षक वाटायचा. सचिन तेंडुलकरच्या पूल हूक शॉट्समध्ये एक राजेशाही थाट असायचा.
सौरव गांगुली जेव्हा हुक पूल मारण्याचा अट्टाहास करायचा तेव्हा वाटायचं ,"राहू दे रे दादू ये तेरे बस की बात नही है!"
लक्ष्मण च्या पूलमध्ये अजहरुद्दीन झळकायचा.
 राहुल द्रविडचा पूल खास वाटायचा, आकर्षक आणि सुरक्षित वाटायचा.
आज विराट कोहली टेस्टमध्ये जेव्हा पुल मारतो तेव्हा ते  राहुल द्रविडचं अगदी सेकंड व्हर्जन वाटतं.

जुन्या खेळाडूंची महानता सांगताना सध्याच्या खेळाडूंची टीका केली जाते, हे सर्वसामान्य आहे, पण मला हे बिलकुलच पटत नाही. आधीपेक्षाही आज भारतीय टीम बॅलन्स्ड आहे. पण राहुल द्रविडची सगळ्यात जास्त आठवण येते ती सध्याचे "स्लिप फिल्डर्स" बघताना!
#शिखरधवनला स्लिप्समध्ये फिल्डिंग करताना बघणे, कॅच सोडल्यावर फिदीफिदी हसताना बघणे याहून  गलिच्छ दृष्य होऊ शकत नाही. पण सध्या तेच दिसतंय.

राहुल द्रविडचं स्लिप्समधील योगदान हाच एक स्वतंत्र विषय आहे. अनिल कुंभलेला त्याच्या फ्लिपर आणि टॉप स्पिन नंतर राहुल द्रविडनेच जास्त विकेट्स मिळवून दिल्या असतील.

राहुल द्रविडच्या शेवटच्या वनडे सामन्यात कॅप्टन धोनीने  शेवटच्या ओव्हर्समध्ये कप्तानी त्याला दिली होती. तो एक भावनिक क्षण होता.

 द्रविडच्या भल्या मोठ्या जोड्यांमध्ये सध्या माझा आवडता पूजारा पाय टाकण्याचा प्रयत्न करतोय. पण ते सोपं नाही.

" ये दिवार टुटती क्यू नही!" विरोधी टीमला असे म्हणायला लावणाऱ्या रडकुंडीला आणणाऱ्या राहुल द्रविडला हॅपीवाला बर्थडे!

-अभिजित दिलीप पानसे

केपटाऊन मधून निघाले सेंच्युरिअनमध्ये पडले



कॉकटेलमध्ये दीपिका पदुकोणने दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या बिच वर बिकिनी शॉट देऊन केपटाऊन आणि पडद्यावरील वातावरण गरम केलं होतं; आणि तिथूनच, कॉकटेलपासूनच दीपिका पदुकोण ही " दि दीपिका पदुकोण" बनण्याची सुरवात झाली होती. केपटाऊन..कॉकटेलपासून तिची कारकीर्द पूर्णपणे बदलली आणि पुढे मोठी स्टार होत गेली.
 थिंग्स चेंज्ड फॉर हर फ्रॉम केपटाऊन!
अगदी याच केपटाऊनपासून हार्दिक पांड्याचं करिअर बदलतंय ..वा बदलू शकतं असं दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून वाटायला लागलंय.
पण याशिवाय भारताचं नशीब, कामगिरी आणि निकालसुद्धा याच केपटाऊनपासून यावेळीतरी बदलेल असं वाटत होतं पण ती शक्यता सामन्याच्या तिसऱ्या आणि औपचारिकरित्या चवथ्या दिवशीच केपटाऊनच्या टणक आणि (सध्या पाणी नसलेल्या)रुक्ष मातीत मिसळली.

तसा भारत हा क्रिकेटमध्ये फार लकी ''विजिटर' असतो, तो ज्या देशात खेळायला जातो (तिथे पैश्याचा ओघ वाढवतो या वाक्यातील 'माहितीमूल्य' आता संपले आहे.) त्या टीममधील किमान दोनएक खेळाडूंना स्टार बनवतो, किंवा कोणाचं बुडतं करिअरतरी सावरून देतो.

पण यावर्षी भारतीय टीमचे भाग्योदयकारक चरण कमल केपटाऊनमध्ये पडताच आणखी एक गोष्ट घडली! दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन भागात काही वर्षांपासून पाऊस नीट न झाल्याने तिथे दुष्काळ पडला आहे. पाण्याची खूप टंचाई आहे म्हणतात. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा नैसर्गिक झरे शोधून तेथील पाणी घरी आणावे लागतय.. त्यामुळे म्हशीसारखे (इथे तांत्रिकदृष्ट्या रेडा म्हणावे लागेल) पाण्यात (पूलमध्ये) तासनतास बुडायला आवडत असलेल्या भारतीय टीमला फक्त दोन मिनीटातच अंघोळ 'उरकायला' लावण्याची, चिमणीची अंघोळ करण्याची सूचना दिल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून दिली गेली होती. 
पण सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केपटाऊनमध्ये प्रचंड पाऊस झाला! ही आहे आमच्या भारतीय टीमची लकी चरणकमले.

भारत पहिला कसोटी समान तीन दिवसात हरलाय. आता पूढील सामना आहे तो, भारतीय टीमला खेळण्यास नेहमीच अत्यन्त कठीण असलेल्या 'सेंच्युरिअन'मध्ये.
जगातील फास्टेस्ट क्रिकेट पिच म्हणून ऑस्ट्रेलियातील "पर्थ पिच" ओळखल्या जातं, पण त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरिअनचा नंबर लागण्यास हरकत नाही. भारत आजवर सेंच्युरिअनला कसोटी जिंकला नाही.
त्यामुळे आगीतून फुफाट्यात तशी केपटाऊनमधून सेंच्युरिनमध्ये अशी अवस्था होण्याची 'शक्यता' आहे.

विराट कोहलीने "इन फॉर्म" असलेल्या रोहित शर्माला राहाणेऎवजी पहिल्या खेळाडूत स्थान दिले हा एक जुगार होता, जो उलटला. रोहित शर्माकडे मुळात ''कसोटी सामन्यात'' खेळण्याचं तंत्रच मजबुत नाही. त्याचा "फ्रंट फूट" नेहमी त्याला सतावतो. तो कसोटी सामन्यातील लंबी रेस का घोडा नाही, विशेषत्वे भारतीय उपखंडाबाहेर.
रोहित शर्मा आणि युवराज सिंगमध्ये इथे साम्य आहे. दोघेही मजबूत वनडे , टी ट्वेन्टी क्रिकेट खेळाडू पण उपखंडाबाहेर कसोटीमध्ये अपयशी.
वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सिक्सर्सच्या गाड्या उडवणारा रोहित शेट्टी असतो पण टेस्टमध्ये त्याचा फ्लॉप ऍक्टर रोहित रॉय होतो.

 हाच रोहित शर्मा 2011 वर्ल्ड कपच्या काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत, मालिकेतील एकाही सामन्यात दोन आकडी रन्सही काढू शकला नव्हता.  तेव्हाही त्याचा फ्रंट फूट त्याला त्रास देत होता. त्यामुळे तो बोल्ड वा एलबीडब्ल्यू होत राहतो.
 दक्षिण आफ्रिकेत त्याचा खेळ कधीच बहरला नाही. असो, तो आता भुतकाळ आहे. तेव्हाचा रोहित शर्मा आणि आजचा 'रॉहिट' शर्मा खूप वेगळा आहे, मोठा खेळाडू बनला आहे. पण तरीही त्याला सरळ कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या चार वेगवान तोफांच्या तोंडी देणे त्याच्यासाठीच अन्यायकारक आहे. वर्षभर भारतात क्रिकेट हंगाम असताना त्याला पूर्ण संधी दिली गेली नाही, तिथे पाचव्या सहाव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे, आणि इतर खेळाडुंना खेळवलं गेलं आणि आता सरळ आफ्रिकेच्या वेगवान मैदानमुलूख चार तोफेंच्या समोर टाकलंय.

अजिंक्य रहाणेने यापूर्वी विदेशात नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः  2014 मधील लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवर, जेथे क्रिकेट पिच कोणती आणि ग्राउंड कोणतं हेही ओळखता येत नव्हतं, कारण दोन्ही इतकं हिरवंगार होतं. तेथे हात भर बॉल स्विंग होत असताना, इतर सर्व खेळाडू अपयशी ठरल्यावर अजिंक्य रहाणेने शतक ठोकलं होतं Iआणि भारताने तो सामना जिंकला होता. तेव्हापासून त्याने विश्वास आणि आदर कमावला.

 मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अजिंक्य राहणेचं पाहिलं कसोटी शतक काही धावानी हुकलं होतं. त्या खेळीत भारताकडून बाद होणारा तो शेवटचा गडी होता. त्याचे ऑस्ट्रेलियामध्येही शतक आहे. त्यामुळे सध्या जरी तो फॉर्ममध्ये नाही, तरी त्याची ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लड येथील कामगिरी बघता तो कसोटी सामन्यात पुन्हा फॉर्म मिळवू शकतो असं वाटतं. कारण किमान रोहित शर्मापेक्षा अजिंक्य राहाणेकडे योग्य कसोटी तंत्र आहे. शिवाय योग्य संधी न मिळाल्याची खंत आणि आपणच पाच किंवा सहा जागेवर योग्य असल्याची खुमखुमी राहाणेत आता दाटली असल्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे तो खेळताना शर्थ करेल. हेच संघाला अपेक्षित असतं.
 किमान रहाणेला खेळवणं हा एक कागदावरतरी योग्य निर्णय वाटतो. पण रोहित शर्माला काढून अजिंक्य रहाणेला "प्लेयिंग इलेव्हन"मध्ये संधी  विराट कोहली देईल याची शक्यता कमी वाटते. कारण महेंद्रसिंग धोनीप्रमाणे तो ही प्लेयिंग इलेव्हनमध्ये जास्त बदल करत नाही.

पण सद्यस्थितीत टेस्टमध्ये कमकुवत तंत्र असलेला रोहित शर्मा आणि कमकुवत फलंदाज असलेला रिद्धीमान साहा हे दोघे मिळून एक फलंदाज बनतात. या दोघांपेक्षाही विदेशात रवीचंद्रन अश्विन कोणत्याही दिवशी कधीही चांगला फलंदाज ठरतो. त्याच्याकडे योग्य तंत्र आहे. हलके हात आहेत.

याशिवाय एका कसोटी सामन्यात एक महत्वाच्या बाजूकडे विराट कोहलीने लक्ष देणे अति आवश्यक आहे , ती म्हणजे "स्लिप फिल्डर्स"
शिखर धवनला स्लिपमधून काढून त्याजागी मुरली विजय किंवा रवी अश्विनला ठेवण्याची त्याला गरज आहे. नाहीतर धवन साहेब अश्याच कॅचेस सोडत राहतील.
शिवाय शिखर धवनच्या जागी के एल राहुलला संघात घेणं योग्य ठरेल का हाही निर्णय कॅप्टन कोहलीला घ्यायचाय.
 हा दौरा त्याच्यासाठी कठीण असणारच आहे.

शनिवारपासून सुरू होणाऱ्या  दुसऱ्या कठीण कसोटी सामन्यासाठी भारताला शुभेच्छा.
ही कसोटी सोपी नसणार. कारण आगीतून जाऊन फुफाट्यात पडल्याप्रमाणे भारत केपटाऊनमधून सेंच्युरिनमध्ये पडतोय..जातोय.
पण 2008 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मंकी गेट प्रकरण झाल्यावर भारताने जगातील सगळ्यात वेगवान पर्थ पिचवर ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. त्यामुळे भारताने सेंच्युरिअन कसोटीसाठी त्यातून प्रेरणा घायला हरकत नाही.
अब रण है सेंच्युरिअन में! गरज आहे ती रन्स ची!

-अभिजित पानसे

Monday 8 January 2018

पुन्हा तेच!

आमचा हार्दिक पटेल जसा 'पाटीदार' समाजाचा प्रमुख आहे तसे भारतीय क्रिकेट टीममध्ये 'पाटादार'  समाजाचे लोक आहेत. रोहित शर्मा पाटा पिचवरील जाफरानाबादी गाय शहाणी! उपखंडाबाहेर भाकड !

मुळातच तंत्र अचूक नाही. त्यात फक्त 'रेप्युटेशन' वर जाऊन अजिंक्य रहाणेला बसवून शर्माजीला घेतलं. 

 "गब्बर धवने" मिशिवाले, पाटा पिचवर मांड शड्डू ठोकणारे ! मिशीला पीळ वगैरे देणारे! बाहेर त्यांच्या तलवार मिशीचा बाक, पीळ जाऊन ती चायनीज मिशी..खाली लटकते.

यांच्यापेक्षा के एल राहुलला संधी मिळावी असं वाटतेय आता. राहुल चांगला फलंदाज आहे म्हणून नाही, तर शिखर धवनमध्ये ते विदेशात कसोटी सामन्यात लागणारं तंत्र आणि गांभीर्य नाही म्हणून त्याच्यापेक्षा राहुल बरा, किमान तो शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करेन.

साबा करीम, समीर दिघे, (पार्थिव) छोटा पटेल यांच्या लायनीत बसणारे रिद्धीमान साहा. साहापेक्षा नयन मोंगिया चांगला फलंदाज होता हा प्रश्न पडावा अशी त्याची मुळात कमकुवत फलंदाजी.

"विजय भौ " भारतात इतके 'अॅक्रॉस' खेळत नाहीत, आफ्रिकेत येऊन प्रत्येक बॉल अॅक्रॉस, कैची खेळताय!
सामन्यात पाच ओव्हर्समध्ये तीनदा आऊट झालेत.
दोनदा आऊट दिल्यावर रिव्ह्यूज ने वाचवलं.

हे पाटादार लोक आपल्याच पाटा पिचवर बॅटा उंचावून प्रेक्षकांना दाखवतात आणि पिचवर थोडं  ज्यूस, गवत असलं की पाट्या टाकत तंबूत परतात.

भारतीय टीमच्या नशिबाने 'स्टेनगन' (डेल स्टेन जखमी होऊन मैदानाबाहेर गेला) बंद पडली असताना जिंकण्याची सुवर्ण संधी गमावली.

पुनः नेहमीप्रमाणे इतिहास रचता रचता इति ऱ्हास झाला.

- चिडलेला आणि नाराज अभिजित पानसे

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका , कसोटी मालिका, आफ्रिका दौरा, 2018

8 जानेवारी, 2018

Saturday 6 January 2018

नमस्ते बिच



7 जानेवारी 2018, सकाळ -सप्तरंग

नमस्ते योगा!

दर दोन मिनिटानंतर "कसं असतं ना...!" अशा वाक्याने सुरवात करणे, अगदी ठराविक टीव्ही सिरिअलबाज, साचेबद्ध भाषा बोलणे, प्रेक्षकांच्या अंगावर "क्लोज अप्स"चे धाड धाड आवाज करणारे बॉम्ब गोळे फेकून त्यांच्या नेत्र आणि मनाला विदीर्ण करणे, सासूचे चार दिवसच सांगून ते हजारांच्याही पलीकडे नेणे, किंवा अगदी चावुन चावुन चोथा झालेल्या विषयांवरील टीव्ही मालिकांची शिक्षा देणे या सर्व कारणांमुळे घरातील तरुण मंडळीसकट आता बुद्धिवादी, चाणाक्ष लोकांचं त्यांच्या घरातच दररोज संध्याकाळी 6 ते 10 मानसिक शोषण होतं. पण सांगणार कुणाला, करणार काय! अश्यावेळी चार तास आपापले चलदूरध्वनी काढून सोशीअल साईट्स वर रमणे हा एक पर्याय या सोशिक बुद्धिवादी मंडळीकडे असतो.

टीव्ही मालिकांच्या रुक्ष, एकसुरी रखरखीत वाळवंटाच्या गावात 'लगान' मधील गावकऱ्याप्रमाणे आम्ही मंडळी आकाशाकडे डोळे लावून होतो..

"जब जब धरतीपे पाप का आतंक बढा तब उसे खतम करने जाते है त्रिदेव!" (नव्वदच्या दशकात नसिरुद्दीन शहाच्या व्हॉइस-ओव्हर मध्ये समस्त मानव जातीला दिलेला विश्वास शेवटी खरा ठरला.)

टीव्ही मालिकेच्या शुष्क वाळवंटात आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आम्हा हेल्दी मनोरंजन आवडणाऱ्या गावकऱ्यांसाठी "घनन घनन घन..बदलिया बरसे.." करून इंटरनेटरुपी ,युट्युब रुपी ऍप रुपी वरुणदेव.. धावून आला.

हो ते आलेत..त्यांनी पाहिलं..(आम्हीही त्यांना पाहिलं) आणि ते जिंकलेत..जिंकताहेत. त्या लाईफ सेवर गोष्टीच नाव म्हणजे "वेब सिरीज"!!!!

टीव्ही वा चित्रपटात संवादाचा भाषेचा स्तर वापरताना, दृश्य दाखवताना सेन्सर बोर्डाची  टांगती कात्री डोईवर सतत असते. त्यामुळे मनाप्रमाणे हवं ते (आणि प्रेक्षकानाही हवंच असतं ते) दाखवता, बघता येत नाही.

म्हणून नेहमीप्रमाणे साचेबद्ध संवाद, चोथा झालेले विषय, "आणि कसं असतं ना.." "तू पहिले शांत हो..." असे सतत वाक्य अंगावर टाकावी लागतात. जे चाणाक्ष प्रेक्षकांच्या अंगावर येतात, डोक्यात जातात. पण वेब सिरीज या "यू ट्यूब" वर किंवा त्यांच्या 'अॅप'वर असल्या कारणाने तिथे सेन्सर ची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्यांचा फकफकाट याला काही उगाच चाळणी नसते.
हे सारे पदार्थ वेबसिरीजच्या ताटात मोकळेपणाने वाढलेले असतात. प्रेक्षक त्याचा मनापासून आस्वाद घेतात.

आणि आजच्या इंटरनेट पिढीचं (यात तरुण, वृद्ध, नवी जुनी पिढी असा भेदभाव नाही) हे वाक्यच आहे "गूगल हमारी माता है और यू ट्यूब हमारा पिता!"

शिवाय पाच मिनिटाच्या एपिसोड नंतर दहा मिनिटांचा ब्रेक, जाहिराती हा मनःस्ताप वेब सिरीज मध्ये नसतो.

इथे सासूचे चार दिवस चार हजार ना होता खरंच चार ते पाचच असतात. त्यामुळे थोडक्यात मजा होते.आणि अति परिचयात अवज्ञा टळते. वेब सिरिझचे जास्तीत जास्त 5 ते 7 एपिसोड्स असतात.

पण या सगळ्यात सगळ्यात जमेची बाजू म्हणजे निरनिराळे, नाजूक, जड विषयांना हात घालून सिरीज तयार केली जाते. जे प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच हात घालतात, स्पर्श करतात.

यामुळे वेब सिरीज चं प्रस्थ, क्रेज वाढतेय.

भारतात हिंदी आणि आता प्रादेशिक भाषेत वेब सिरीज निर्मिती होण्यापूर्वीच काही वर्षांपासूनच विदेशात वेब सिरीजचं प्रस्थ आणि त्याचा चाहता वर्ग तयार झालाय.
अनेक प्रसिद्ध , सुपरहिट लोकप्रिय इंग्लिश वेबसिरीज भारतातही लोकप्रिय आहेत.
यातील काही वेब सिरीजचे 'सिजन्स' काही वर्षांपासून सुरू आहेत. या सिरीज बघताना  कधी वेळ जातो कळत नाही, आणि कधी सिजन संपतो जाणवतही नाही. आणि सिजन संपल्यावर मनात  एक प्रकारची पोकळी निर्माण होते, आता काय करायचे ! पुढील सिजन कधी येणार! हे "सिजनल फ्रुट" पुन्हा कधी खायला मिळणार!

पण काही सिरीज या 'सिजनल' नसतात. चार ते पाच एपिसोडस् मध्ये संपतात. या सिरीज ही लोकप्रिय आहेत याचे म्हणजे कारण त्यांची वाट बघत बसावे लागत नाही.

"नमस्ते बिच" ही अशीच एक अगदी शॉर्ट वेब सिरीज आहे. मुख्य म्हणजे या वेब सिरीजला भारतीय स्पर्श आहे.

सध्या आध्यात्मचा सिजन सुरू आहे. आध्यात्म हे 'एन्डोर्स' केल्या जातंय अगदी उचभ्रू वर्गीयांमध्ये ते पाश्चिमात्य देशातही.
"स्पिरिचुली लिबरटेड" असणं, 'ऑरा' , स्पिरीच्युअॅलिटी, एनर्जी, वाईब्स, ग्रॅटीट्यूड असे जड शब्द वापरणे, ऋषिकेश वा हिमालयातील एखाद्या 'योगा' (योग नाही) आश्रमात जाणे हे आजचे उचभ्रू लोकांचे, तरुण लोकांत  'ट्रेंडी' आहे.
अश्यातच
जिमपेक्षा 'योगा' क्लासला जाणे हे स्पिरिचुअल वगैरे मानल्या जातं.

ज्या प्रकारे भारतात पाश्चिमात्य वातावरण , प्रभाव आहे म्हंटलं जातं, उथळ पाण्याला खळखळाट असलेले  सतत तो प्रभाव मुद्दाम दाखवत असतात. त्यामागे अट्टहास असतो. तसंच विदेशातही भारतीय 'योगा' आणि 'आयुर्वेदा'चा प्रभाव आहे. तिथेही ते जरा 'स्टँडर्ड' , 'कूल' 'स्पिरिचुअल' मानलं जातं. आणि तिथेही ते शो ऑफचं साधन आहे.

 ही वेब सिरीज त्यावरच आहे. एक अमेरिकन मुलगी, '  'सबिन' ही लॉस अँजेलीसला स्थायिक व्हायला येते. तिथे ती एका योग क्लासमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करते. पण जिमला गेल्यावर, मॅकडॉनल्ड , गोवा ट्रिपला गेलं की सोशिअल मीडियावर फोटो टाकलेच पाहिजे, तथापि बरेचदा फोटो टाकता यावेत म्हणूनच तिथे जातात, त्याचप्रकारे त्या योग क्लासमध्येही फक्त शो ऑफ, पब्लिसिटी यालाच महत्व असतं . तिला सुरवातीलाच तिचे इन्स्टाग्रामवर 'फॉलोअर्स' किती आहेत, विचारलं जातं.
अरे हो, फेसबुक, ट्विटर हे जरा आता आऊटडेटेड मानलं जातं; सध्या 'इन्स्टाग्राम' इज "न्यू कूल"!

इथून तिचा "योगा टीचर" म्हणून काम सुरू होतं. सुरवातीला तिला स्पर्धक म्हणून कोणी मनाने स्वीकारत नाही , तीसुद्धा प्रथम नवी असल्याने अवघडते, प्रामाणिक काम करते.
तेथील व्यवस्थापनातील मुलींवर भारतीय योगा, अध्यात्माचा प्रभाव असल्याने त्या पेटीवर ( हार्मोनियम) हरे राधे राधे ...शाम" गात असतात .
नवं अध्यात्मिक व्यक्तींमध्ये जो उथळपणा, तोंडी जे शब्द असतात, ते तेथील योगा क्लासमध्ये काम करणाऱ्या मुलींमध्येही असतो, त्यामुळे सतत तोंडात, 'थँक्यू '  म्हणण्याऐवजी 'ग्रॅटीट्युड' हा शब्द असतो. ही मुळातच संपूर्णपणे विनोदी आणि विडंबन सिरीज असल्याने बघताना मजा येते.

एक दिवस तिच्याच क्लासमध्ये शिकणारा विद्यार्थी च तिच्याकडून शिकून स्वतःचा  योगा आणि 'प्राणायामा' कोचिंग क्लास काढतो .

मनुष्य कितीही नव्या ट्रेंड्स गोष्टींमध्ये स्वतःला कूल म्हणून  घ्यायला गुंतू लागला , तरीही ताण आल्यावर तो मुळात जसा आहे तेच बाहेर येतं. अध्यात्मचा बुरखा जास्त वेळ पांघरता येत नाही. अंगावरची खोळ एक दिवस पडतेच.
त्याचप्रमाणे एक दिवस ती ड्रग्स घेते.

भारतात चायनीज पदार्थ फार लोकप्रिय आहेत. पण ते अस्सल चायनीज पदार्थ नाही तर 'भारतीय' चायनीज पदार्थ असतात. त्याचप्रकारे भारतीय योग शिकवताना स्वतःसुद्धा परिपूर्ण नसल्याने प्राणायामाच्या , शवासनाऐवजी भलतंच शिकवते, पण तेथील विद्यार्थी लोकांना ते आवडतं . आणि त्या दिवसापासून तिचेही इन्स्टाग्रामवर 'फॉलोवर्स' वाढतात.  ती ही स्वतःचे योगा करतानाचे फोटोज  इन्स्टाग्रामवर टाकते.याच साठी केला होता अट्टाहास!

प्रधानमंत्री मोदींनी आंतरराष्ट्रीय "योगा दिन" सुरू करण्यात पुढाकार घेतल्यानंतर जगभरात योगाचं ग्लॅमर आणखी वाढलंय. त्या धर्तीवर भारतीय स्पर्श असलेली प्राणायामा, सूर्य नमस्कार वगैरे असलेली ही ''नमस्ते बिच" ही इंग्लिश वेबसिरीज बघण्यात मजा येते.

ही सिरीज यातील प्रमुख पात्र 'सबिन',  म्हणजे समर चेसंट या अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखिकेनेच लिहिली आहे. ती या पात्रासाठी योग्यच वाटते.

या सिरीजमधील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे यातील लिखाण, संवाद. अगदी मस्त विडंबन जमलंय. लेखिकेची निरीक्षणशक्ती यात दिसून येते.

या वेबसिरीजची एक वेगळी आणि माझ्यासाठी आवडती बाजू म्हणजे ही अगदी छोटी सिरीज आहे. अर्धा तासात संपूर्ण सिरीज बघून होते. इतर सिरीजप्रमाणे पुढील सिजन्सची वाट बघावी लागत नाही, शिवाय अगदी छोटे भाग आहेत.
एक गंमतीदार, हलकीफुलकी ही भारतीय स्पर्श असलेली वेबसिरीज आहे.

Friday 5 January 2018

ट्रिपलिंग

अभिजीत दिलीप पानसे.


तीन सिब्लिंग्सची रोड ट्रीप 'ट्रिपलिंग'

"रोड ट्रिप" म्हटलं की डोळ्यासमोर येतो झोया अख्तर चा “जिंदगी ना मिलेगी दोबारा"... कोणाला फरहान अख्तरचा "दिल चाहता है" ही आठवेल..

या दोन्ही चित्रपटांमध्ये एक साम्य आहे की यात रोड ट्रिप ही मित्रांसोबत केली जाते.

मुळातच ट्रिप म्हटलं की मित्रांसोबतच जाऊन धम्माल करण्याची गोष्ट, किंवा बऱ्याच वर्षांनी कब के बिछडे हुये हम आज यहा आके मिले.." रियुनिअन करून जुन्या आठवणी ताज्या करणे, वा जुने काही मतभेद दूर करून नवे बॉण्ड्स स्थापित करणे हे आपल्या मानसिक सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट असतं किंवा तसंच आपलं मानसिक प्रोग्रामिंग झालेलं असतं. पण कधी विचार केलाय का किंवा आयडिया सुचलीये का की फक्त आपल्या सख्ख्या भावंडांसोबतच रोड ट्रिप जाण्याची!!!

बालपण ते किशोरवयापर्यंत आई बाबांच्या छत्राखाली असल्यामुळे तेव्हा मुलं, भावंडं ही फक्त "रिसिविंग एन्ड" लाच असतात.त्यावेळची सोबत फिरण्याची, सहलीची मजा  वेगळी असते.पण जसे जसे मोठे होतात तसे विचार वेगळे, मित्र मैत्रिणी वेगळे वेगळे होतात .स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार होतं.. अहंकार वाढतो.आणि भावंडांसोबतचा संवाद ,संवादाची खोली कमी होते.

त्यामुळे सख्या भावंडांसोबत म्हणजे 'सिबलिंग'सोबत रोड ट्रिप हि कल्पनाच कोणी करत नाही.
यावरच प्रफुल व्यासने 'ट्रिपलिंग' नावाची वेब सिरीज ची स्क्रिप्ट लिहिली.

परिस्थितीमुळे घडलेल्या तीन भावंडांची ,सिब्लिंग्सच्या रोड ट्रिपची गोष्ट म्हणजे 'ट्रिपलिंग'!
पर्मनंट रूममेट्स नंतर प्रफुल व्यासची ही दुसरी वेब सिरीज.ट्रिपलिंगला नेटीजन्सने पूर्णतः स्वीकारलं.

चंदन ,चंचल आणि चितवन असे हे दोन भाऊ आणि एक बहिण या ट्रिपलिंगच्या रोड ट्रिप ची ही गोष्ट.

चंदन म्हणजे प्रफुल व्यास हा मोठा, वय आणि परिस्थितीमुळे शांत समजूतदार,विदेशात नोकरी करणारा तिथल्याच त्याच्या एका मुलीसोबत लग्न केलेला आणि ती त्याला 'चिट' करतेय हे कळल्यावर तिच्याविरुद्ध विश्वासघाटाची तक्रार करून घटस्फोट मागितल्यावर तेथील कायद्यानुसार त्याला तिच्याकडून 'पोटगी' मिळाल्यावर दुःख हलकं करण्यासाठी आपल्या छोट्या सख्या भावाला चितवन ला भेटायला मुंबईत येतो.

चितवन हा स्वतःच अत्यंत किचकट आयुष्य असलेला,अनेक फ्रॉड्स करणारा, "हू केअर्स" वृत्ती असलेला, मजा मस्ती आपल्याच विश्वात मस्त आणि अनेक कारणांमुळे त्रस्त असलेला स्टुडिओमध्ये 'डीजे' असतो.

चंदन प्रथम त्याला भेटायला त्याच्या स्टुडिओत जातो तिथे खूपे दारू पिऊन तिथेच पडतो.त्याचा भाऊ चितवन  त्याला त्याच्या घरी न नेता रात्रभर गाडीत झोपवतो.

दुसऱ्या दिवशी जाग येते तेव्हा मुंबईबाहेर तो गुजरात हायवेवर वडोदरा जवळ थांबलेले दिसतात. चितवनने गाडीच्या इन्स्टॉलमेंटचे पैसे न भरल्यामुळे बँकेचा ससेमिरा टाळण्यासाठी तो पळून जात असतो.

यामुळे चिडलेला समंजस चंदन त्याला समजावतो. पण शेवटी ते बहिणीला भेटायला, चंचलला भेटायला तिच्या सासरी जोधपूरला जायचं ठरवतात.

चंचल जोधपुरच्या 'रॉयल' कुटुंबाची एकमेव सून असते. चंचल 'प्रेग्नन्ट' असल्यामुळे त्या निमित्त असलेल्या समारंभामुळे त्यांची किल्लास्वरूप हवेली  सजली असते. नंतर ती दोघांना सांगते की ती प्रेग्नन्सीचं फक्त नाटक करते आहे.

चंचल चा नवरा प्रणव तिथला राजा असतो.

आदित्य रॉय कपूर चा भाऊ कुणाल रॉय कपूर हा मुळातच एक चांगला अभिनेता आहे. येऊ जवानी है दिवानी, डेल्ही बेली चित्रपटातील त्याच्या विनोदी भूमिका फार लोकप्रिय झाल्या आहेतच. त्याने साकारलेला राजस्थानी राजा,चंचलचा नवरा ही भावतो.

इकडे चंदन आणि बहीण चंचलही तिच्या आयुष्यात असमाधानी, दुःखी असते.

काही नकारात्मक घटनांमुळे ते तिघेही जोधपुरहून रात्री उशिरा निघतात.आणि मग सुरु होते त्यांची रोड ट्रिप. सिब्लिंग्सची रोड ट्रिप 'ट्रिपलिंग'.

प्रवासात अनेक विनोदाचे प्रसंग, अडचणी, भांडणे करीत भावनिकरित्या जवळ येत करीत शेवटी त्यांच्या आई बाबांकडे मनालीला जाऊन पोहचतात.

त्यांच्या वडिलांची भूमिका कुमुद मिश्रा आणि आईची भूमिका शेरनाज पटेल या परिपाकव अभिनेत्यांनी केली आहे. तिन्ही मुलांपेक्षा त्यांचे आई वडील अगदी वेगळ्या स्वभाव, विचारांचे, व्यक्तिमत्वाचे असतात. तिन्ही मुलं आपल्याला आयुष्यात असमाधानी, अडचणीत, ताणामध्ये असतात. तर आई वडील अगदी सर्वार्थाने आनंदी, 'कूल', सकारात्मक विचारांचे, आयुष्य खऱ्या अर्थाने जगणारे असतात.

"रोड ट्रिप "ही संकल्पना त्यांच्या वडिलांनी पूर्वीपासून घरात रुजवली असते.

अगदी कुठलीही तयारी,आखणी न करता वर्षातून एकदा कुटुंबासोबत (चंदन, चंचल ,चितवन लहान असताना) रोड ट्रिप ला जात असत.

आई बाबांना भेटल्यावर, संवाद झाल्यावर विचारसरणीत अगदी छोटा बदल झाल्यावर मात्र तिघेही शांत होतात. तिघांनाही आपापले मार्ग मिळतात.

मानवी गागृ या वेब सिरीज मध्ये काम करणाऱ्या गुणी अभिनेत्रीने चंचलची भूमिका अगदी रास्त निभावली आहे. अभिषेक पराशर हा ही पूर्णतः नवोदित अभिनेता. त्याने चितवन अगदी योग्य साकारला आहे.

जोधपूरहून अपरात्री निघाल्यावर वाळवंटात रस्ता चुकल्यामुळे एका ठिकाणी थांबून तिथे "बॉनफायर' करीत तिघेही 15 वर्षनंतर पाहिल्यांदा नीट संवाद साधतात. तो भाग या वेब सिरीजचा सर्वोत्तम भाग आहे.

मनालीला पोहचल्यावर चंदन त्याच्या वडिलांशी रात्री बाल्कनीमध्ये संवाद करताना तो म्हणतो की त्याला थंडी वाजते आहे तेव्हा आता बोलणं थांबूयात. तेव्हा त्याचे वडील त्याला इतकंच म्हणतात "तो शॉल ओढलो ना!" शॉल अंगावर घेऊन चंदन वडिलांना म्हणतो की किती सोपा उपाय होता ना यावर!"

असे मनाला स्पर्श करणारे, विचार करायला लावणारे काही दृश्य.. क्षण ट्रिपलिंग या वेब सिरीजमध्ये आहेत.

यातील भूमिका इतक्या प्रभावी लिहिल्या आहेत की आपल्याला आपला लहान भावात कुठेतरी चितवन दिसू लागतो,बहिणीत चंचल सापडते.

प्रफुल व्यास या गुणी अभिनेत्याने या वेब सिरीजमध्येही कमाल केली आहे. 'रूममेट्स'मधील बावळट प्रेमी आणि 'ट्रिपलिंग'मधील समंजस, परिपक्व माणूस अप्रतिमरित्या साकारला आहे.
शिवाय ट्रिपलिंग या वेबसिरीजचं लिखाणही त्याने केलंय.

एक सकारात्मक विषय, वेगळी संकल्पना घेऊन त्याला पूर्णतः आजच्या भाषाशैलीत मांडून मनाला स्पर्श करणारे संवाद, दृश्य असलेली विनोदाचे आवरण असलेली ही तीन सिब्लिंग्सची 'ट्रिपलिंग' वेब सिरीज 'हिट' झालेली आहे.

बिष्ट प्लिज

वकील ते कास्टिंग डिरेक्टर - अभिजीत पानसे.
इन्ट्रो- वेब सीरिज च्या डिजिटल जगात आज निधी बिश्त हे महत्त्वाचं नाव बनलंय.

ते म्हणतात इंटरनेट इज फुल ऑफ इंटलीजन्ट पिपल स्टक इन डिफ्रंट जॉब!

थ्री इडीएट्स मध्येही बाबा रनछोडदासांनी आपली मूळ आवड ,आपले पॅशन आणि आपले करिअर यावर ज्ञानामृत दिले आहे.

पण प्रत्येकातच ही हिम्मत नसते.हातचं सरळ साधं करिअर, नोकरी सोडून आतल्या उर्मी ला बाहेर येऊ देऊन तिचा पाठलाग करत आपला रस्ता स्वतः तयार करणे हे चित्रपटात बघायला  छान वाटतं पण प्रत्यक्षात करताना मात्र पाय लटपटतात.

पण कधी नियती, तर कधी कितीही दमन केलं तरी उफाळून येणारी आतील उर्मी, कधी परिस्थिती ही त्या व्यक्तीला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात आणते. आणि ती व्यक्ती त्या क्षेत्रात मोलाची भर टाकते.

अशीच गोष्ट आहे निधी बिष्तची!

वेब सीरिज या क्षेत्रात आज निधी बिश्त हे महत्वाचे नाव आहे.

पर्मनंट रूममेट्स, पिचर्स , उम्रीका यावेब सीरिजची कास्टिंग डिटेक्टर आणि त्यात काम कारणारी असलेली ही निधी बिश्त!

कास्टिंग डिटेक्टर चे काम म्हणजे एकप्रकारे थॅंकलेस जॉब असतो.त्यांचं काम प्रेक्षकांच्या लक्षातही येत नाही !पण कास्टिंग डिरेक्टर ने योग्य कास्टिंग केलं असेल तरच ती मालिका, चित्रपट आणि त्यातील पत्रे हृदयाला भिडतात.खरे वाटतात. महाभारत आणि रामायण हे एकेकाळीविक्रमी लोकप्रिय झालेले दुरदर्शनवरील कार्यक्रम ,यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे या महामालिकांमधील कास्टिंग!यातील प्रत्येक पात्र हे जणू ती भूमिका साकारणारा एक वाटतो असे सर्व म्हणतात.हेच काम असतं कास्टिंग डायरेक्टरचं. निधी बिश्तने पर्मनंट रूममेट्स मध्ये निधी सिंग, आणि प्रफुल व्यासचे प्रमुख रोलसाठी कास्टिंग केले आणि आज ते पात्र त्यांची ओळख बनलंय. ' पिचर्स 'या उत्तम कलाकृती असलेल्या वेब सीरिजमधील प्रत्येक पात्र जणू त्या त्या अभिनेत्या अभिनेत्रीसाठीच तयार केले आहे असे वाटते.हे सर्व श्रेय जातं कास्टिंग डायरेक्टर निधी बिश्तला!

कास्टिंग डायरेक्टरकडे एक अंतःप्रेरणा हवी असते. निधीला जणू हे ईश्वरी वरदान लाभलेय. ती म्हणते मी जेव्हा संहिता वाचून काढते तेव्हा त्याक्षणी मला आतून प्रेरणा, इंस्टीनक्ट्स मिळतात की ही भुमिका कोण योग्य रीतीने करू शकेल!

पण पूर्वी ही मुलगी दिल्लीला वकिली पेशात होती.एक सर्वसामान्य शुभ्र कॉलर नोकरी,आयुष्य जगत होती.दिल्लीला वकिलीचे शिक्षण घेऊन एक वर्ष दिल्ली हायकोर्टात नोकरी करताना आतील अभिनयाची उर्मी मात्र तिला शांत बसू देत नव्हती.

वकिली करताना तिने अभिनयाचा एक सप्ताहाच्या शेवटी दोन दिवस असणारा कोर्स केला.आणि तिचे हिंदी नाट्यरंगमंचावर आगमन झाले. नाट्य प्रयोग करताना तिला तिचे सुप्तगुण समजू लागलेत. नवनव्या कल्पना तिला सुचू लागल्यात, त्यावर ती काम करू लागली.

नाट्यभूमीवर काम करताना तिला तिच्यातील अभिनेत्री गवसली.

आवाजावर ,शब्दांवर, संवादावर  प्रचंड नियंत्रण असलेल्या या मुलीला , तिची अभियानाचे प्रचंड आवड,प्रेम पाहून या क्षेत्रात येण्याचे सुचवलेही.

एक दिवस तिने निर्णय घेतला आणि सामान भरून मुंबईकडे प्रस्थान केले.रेल्वेच्या आवाजापेक्षा मनात चाललेल्या वैचारिक वादळाचा,आंदोलनाचा गदारोळ जास्त होता.

मुंबईला आल्यावर मात्र तिला सगळीकडे नकार मिळू लागला.तिचा चेहरा गोल प्रकारात मोडत असल्याचे कारण सांगून तिला प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी अपात्र ठरवू लागलेत.पण ती तग धरून राहिली.पुढे तिची ओळख "टीव्हीएफ या वेब सिरीज कंपनी चे संस्थापक 'अरुणाभ कुमार"शी झाली आणि तिथून ती टीव्हीएफ या वेब सिरीज निर्मिती मधील ब्रँड असलेल्या निर्मिती  चॅनलची प्रमुख घटक झाली.निधी बिश्त ने सुपरहिट सीरिज पर्मनंट रूममेट्स ,ट्रिपलिंग मध्ये काम ही केलं आहे. "माँ के हात की सिगारेट" , " कॉलर नैना" हे  विडंबनात्मक व्हिडीओज आणि तिची एकता कपूर ची भूमिका नेटिझन्सला प्रचंड आवडली आहे. आता अनुष्का शर्मा च्या फिलोरी या चित्रपटातही तिची भूमिका आहे. 

वेब सीरिज सारख्या डिजिटल , चित्रपटसारख्या व्यवहारी माध्यमांत काम करतानाही तिचे रंगभूमीवरील प्रेम कायम आहे.स्वतःची नाट्य कंपनी असावी त्यात नवोदित कलाकारांना संधी मिळावी हे तिचं स्वप्नही तिने पूर्ण केलंय.तिचे नाट्य रंगमंचावर मनापासून प्रेम असल्याने तिची आज स्वतःची "न्यू ब्रेन थिएटर वोक्स" ही कम्पनी सुरु केली आहे.आजच्या पिढीची स्वतःचा रस्ता स्वतः बनवणारी ही मुलगी निधी बिश्त सर्व तरुणांसाठी प्रेरणा आहे.

एका कोळीयाने



एका ‘कोळी’याने
दर दोन मिनिटानंतर "कसं असतं ना...!" अशा वाक्याने सुरवात करणे, अगदी ठराविक टीव्ही सिरिअलबाज साचेबद्ध भाषा बोलणे, प्रेक्षकांच्या अंगावर "क्लोज अप्स"चे धाड धाड आवाज करणारे बॉम्ब गोळे फेकून त्यांच्या नेत्र आणि मनाला विदीर्ण करणे, सासूचे चार दिवसच सांगून ते हजारांच्याही पलीकडे नेणे,किंवा अगदी चावुन चावुन चोथा झालेल्या विषयांवरील टीव्ही मालिका या सर्व कारणांमुळे घरातील तरुण मंडळीचं त्यांच्या घरातच दररोज संध्याकाळी 6 ते 10 मानसिक शोषण  होतं. पण सांगणार कुणाला, करणार काय! अश्यावेळी चार तास आपापले चलदूरध्वनी काढून सोशीअल साईट्स वर रमणे हा एक पर्याय सोशिक तरुण मंडळीकडे असतो.

टीव्ही मालिकांच्या रुक्ष, एकसुरी रखरखीत वाळवंटाच्या गावात 'लगान' मधील गावकऱ्याप्रमाणे आम्ही तरुण मंडळी आकाशाकडे डोळे लावून होतो..

"जब जब धरतीपे पाप का आतंक बढा तब उसे खतम करने जाते है त्रिदेव!" (नव्वदच्या दशकात नसिरुद्दीन शहाच्या व्हॉइस-ओव्हर मध्ये समस्त मानव जातीला दिलेला विश्वास शेवटी खरा ठरला. 

टीव्ही मालिकेच्या शुष्क वाळवंटात आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आम्हा तरुण गावकऱ्यासाठी "घनन घनन घन...करून वरुणदेव धावून आला.

हो ते आलेत..त्यांनी पाहिलं..(आम्हीही त्यांना पाहिलं) आणि ते जिंकलेत..जिंकताहेत. त्या लाईफ सेवर गोष्टीच नाव म्हणजे "वेब सिरीज"!!!!

टीव्ही वा चित्रपटात संवादाचा भाषेचा स्तर वापरताना, दृश्य दाखवताना सेन्सर बोर्डाची  टांगती कात्री डोईवर सतत असते. त्यामुळे मनाप्रमाणे हवं ते (आणि प्रेक्षकानाही हवंच असतं ते) दाखवता, बघता येत नाही.

म्हणून नेहमीप्रमाणे साचेबद्ध संवाद, चोथा झालेले विषय, "आणि कसं असतं ना.." असे सतत वाक्य अंगावर टाकावी लागतात. जे तरुण प्रेक्षकांच्या अंगावर येतात, डोक्यात जातात. पण वेब सिरीज या "यू ट्यूब" वर किंवा त्यांच्या 'अॅप'वर असल्या कारणाने तिथे सेन्सर ची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्यांचा फकफकाट या पासून 'पहलाज' ..परहेज करावा लागत नाही. हे सारं पदार्थ वेबसिरीजमध्ये मोकळेपणानं वाढलेलं असतं प्रेक्षक त्याचा मनापासून आस्वाद घेतात.
आणि आजच्या तरुण पिढीचं हे वाक्यच आहे "गूगल हमारी माता है और यू ट्यूब हमारा पिता!"

शिवाय पाच मिनिटाच्या एपिसोड नंतर दहा मिनिटांचा ब्रेक, जाहिराती हा मनःस्ताप वेब सिरीज मध्ये नसतो.

इथे सासूचे चार दिवस चार हजार ना होता खरंच चार ते पाचच असतात. त्यामुळे थोडक्यात मजा होते.आणि अति परिचयात अवज्ञा टळते. वेब सिरिझचे जास्तीत जास्त 5 ते 7 एपिसोड्स असतात.

पण या सगळ्यात सगळ्यात जमेची बाजू म्हणजे निरनिराळे, नाजूक, जड विषयांना हात घालून सिरीज तयार केली जाते. जे प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच हात घालतात, स्पर्श करतात.

यामुळे वेब सिरीज चं प्रस्थ, क्रेज वाढतेय.

पर्मनंट रूममेट्स, लिटल थिंग्स, ट्रिपलिंग, लव बाईट्स, आयेशा हे काही हिट आणि लोकप्रिय सिरीज आहेत.

"पर्मनंट रूममेट्स" ही सर्वार्थाने लोकप्रिय, हृदयाला स्पर्श करणारी, मनापासून हसवणारी, विचार करायला लावणारी सिरीज आहे.

बिस्वपती सरकार याने पर्मनंट रूममेट्स चा पहिला सिझन लिहिला. बंगाल हे साहित्य, कला, विचारवंत यासाठी शतकांपासून प्रसिद्ध आहेच. शुजित सरकार दिवाकर बॅनर्जी, सुजॉय घोष इत्यादी उच्च स्तरीय बंगाली दिगदर्शक प्रसिद्ध आहेतच.

आता हा पर्मनंट रुमेंट्स लिहिणारा आणखी एक हुशार, आजच्या काळातील बंगाली लेखक.

प्रफुल व्यास  हिंदी रंगभूमीशी जोडलेला अभिनेत्याला आजवर काही चित्रपटात छोट्या भूमिका करताना पाहिलं आहे. त्यात त्याचं खरं अभिनय कौशल्य कधी दिसलंच नाही. पण प.रु.मधून मात्र त्याला मनसोक्त, मोकळेप्रमाणे स्वतःच कौशल्य दाखवता आलं. त्याच्याकडे असलेली जबरदस्त अभिनयाची जाण, शरीराची भाषा, विनोदाचं टायमिंग हे सारं या सिरीज मधून दाखवता आलं. कोणीही प्रेमात पडेल असा अभिनय.. भूमिका त्याने साकारली आहे.

निधी सिंग ही आजवर यु ट्यूब वर छोटे छोटे व्हिडीओजमध्ये काम करायची. तिची स्वतःची अशी खास ओळख नव्हतीच.

पण तिने पर्मनंट रुमेंट्स मध्ये साकारलेली भूमिका तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते.

प्रचंड अभिनय क्षमता, आवाजावर पूर्ण नियंत्रण, संवाद, शब्दफेक अगदी आजच्या काळातील भूमिकेसाठी योग्य ..या सिरीजमुळे निधी सिंग राष्ट्रीय स्तरावर स्टार झाली आहे.

तिने नुकतेच दोन चित्रपट स्वीकारले असून एकाचं शूटिंगसुद्धा आटोपलं आहे.

पर्मनंट रुमेंट्स ही गोष्ट आहे एका तरुण जोडप्याची जे तीन वर्षांपासून "लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहेत आणि त्यापूर्वी 15 दिवसच सोबत घालवले आहेत. मिकेश चौधरी आणि तानिया नागपाल असे हे दोघे.

मिकेश हा बराचसा बावळट, मनाने अत्यंत  चांगला, त्याच्या नोकरीच्या कामात हुशार असलेला, सतत ऑन लाईन शॉपिंग करत असलेला आणि त्यात फसणारा, अमेरिकेत तीन वर्षे नोकरीसाठी राहिलेला तरुण मुलगा असतो जो भारतात, मुंबईत तानियाला सरप्राईज म्हणून एक महिना लवकर येऊन, सरळ विमानतळावरून तानियाच्या फ्लॅटवर जातो आणि तिला सरळ लग्नासाठी प्रपोज करतो.

तानिया म्हणजे निधी सिंग ही व्यावहारिक, काहीशी तापट, नात्यात गोंधळ उडालेली आणि संपूर्ण दोष मिकेश ला देणारी, लग्नाचा निर्णय घेताना प्रचंड गोंधळात पडलेली आणि त्याचं नैराश्य राग मिकेशवरच काढणारी तरीही नात्याचं महत्व जाणणारी ही मुलगी. निधी सिंगने अप्रतिम रंगवली आहे.

यांच्यासोबत इतर पात्रे रंगावणारे कलाकारही तितकेच जबरदस्त ताकदीचे आहेत. प्रत्येक एपिसोड हा पूर्णतः वेगळा विषयावर, संवाद अगदी सहज, आजच्या काळातील आणि आवडणारे.
कुठलीही ठराविक "स्लॅपस्टिक कॉमेडी" न करता नैसर्गिकपणे परिस्थितीजन्य आणि शाब्दिक विनोद.. सर्व भावभावनांचा अंतर्भाव असलेली ही वेब सिरीज. पहिला सिजन खूप लोकप्रिय झाल्यावर दुसरा सीझन आला यात चित्रपटात अनेक चांगल्या भूमिका करणारा दर्शन जरीवाला, असरानी सुद्धा आहे.

असरानीने त्याच्या तारुण्यानंतर एक आजवरची  चांगली भूमिका केली आहे.

एक विघ्नसंतोषी ,खवट म्हातारा असरानीने अप्रतिम रंगवला आहे.

आणि या संपूर्ण सिरीजमध्ये विनोदी आणि अप्रतिम भूमिका काम केलंय ते पूर्णतः नवोदित कलाकार दीपक कुमार मिश्रा याने.

थ्री एडिट्स मध्ये आमिर खान, आर माधवन बड्या अभिनेत्यांसमोर पाहिल्यादाच काम करणारा ओमी वैद्य जसा मनाला भावून गेला.. आणि भाव खाऊन गेला अगदी तसाच हा दीपक मिश्रा सपोर्टींग रोलमध्ये असलेला भाव खाऊन जातो.आवडतो.

वेब सिरीज बघताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते की प्रचंड टॅलेंट असलेले कलाकार आपल्याकडे आहेत. आणि जे आता स्वतःचा मार्ग स्वतः तयार करून त्यावर मार्गक्रमण करीत यशस्वी होताहेत.

आणि इथेच इंटरनेट सिरीज वेगळं प्लॅटफॉर्म ठरतं.

आणि ते प्रेक्षकांनाही भावतं.

म्हणून येत्या काळात वेबसिरीजची क्रेज वाढणार हे नक्की.