Thursday 28 December 2017

नर्मदेत दिवे..तो माणूस..



दुपारचा महाप्रसाद घेउन गाव कसं आहे ते पाहायला गेलो तेव्हा एका रस्त्यात एक गोरा फॉरेनर दिसला. मला खुप आश्चर्य वाटलं कारण विदेशींना ऋषिकेश बनारस इ. ग्लॅमराइज्ड भारतीय धार्मिक स्थळांचे आकर्षण असतं.मग या आदिवासी भागात हा कसा काय याचं आश्चर्य वाटलं.

त्याच्याशी बोलल्यावर कळलं की त्याचं नाव अँड्र्यू सिम्पसन. तो ऑस्ट्रेलियन होता. त्याने सांगितलं की तो ट्रेकर आहे.आजवर तो अमेरिकेत 10000 किमी चालला आहे.
त्याला भारतात हिमालयात चालायच होतं.त्याच्या इंग्लंडमधील मथुरा दास नावाच्या मित्राने  त्याला नर्मदा परिक्रमेबद्दल सांगितलं.

तो ट्रेकर जे बोलला ते मला स्पष्ट अस्पष्ट काहीसं त्याच्याच शब्दात आठवतं तो म्हणाला होता ''आय बिलॉन्ग टु नो रिलीजन बट स्टिल आय फेल्ट एनर्जी अँड पॉवर ऑफ नर्मदाजी व्हेन आय बेद इन हर अँड सीट ऑन द बँक ऑफ नर्मदाजी!!'' याबद्दल मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्यांची भावना श्रद्धा असते म्हणुन त्यांनी असं म्हणणं..उचित वाटलं असतं. पण इथे हा असं बोलतोय!!

त्याने सांगितलं की त्याला आता वेळ नसल्याने तो परत जातोय पण पुन्हा तो परत येऊन परिक्रमा पूर्ण करणार आहे.त्याने त्याचा मेल आयडी ही दिला होता.

मी काही पुस्तकात तसंच  ''सौ प्रतिभाताई चितळे'' यांनीही नर्मदेत दिवे सोडण्याबद्दल बरंच सांगितलं आहे.
मलाही ते आठवुन खुप इच्छा झाली की पहिल्यांदाच आलोय तर आपण पण नर्मदेत दिवे सोडावेत.
अग्निबद्दल तर मला विशेष आकर्षण आहे. निरंजन, पणती, यज्ञातील , होमातील अग्नी, मशिदीतील जळणारा गोवऱ्यावरील ऊद, मंदिरातील राळ, उदबत्ती, धूप प्रचंड आवडतं..लहानपणी नदीत दिवे सोडलेले बघायचो तेव्हाही विलक्षण आनंद व्हायचा, दिवे प्रवाहसोबत तरंगत हळुवारपणे वाहत जाताना बघून..
खूप इच्छा झाली दिवे सोडावेत नर्मदेत!
पण माझ्याकडे काहीही नव्हतं, कोणत्याही तयारीशिवाय मी गेलो होतो.
पण गावात दुकानात काहीतरी नक्की विकत मिळेलच असं वाटलं.

म्हणून पुन्हा परत गावात फिरलो पण अगदी छोटं खेडेगाव. ठरावीक दुकानं ते हायवेपाशी!
 गावात छोट्या घरात किंवा झोपडीत चिप्स, खरमुरे, कुरकुरे टांगलेले असायचे म्हणुन त्याला दुकान म्हणायचं.
मी प्रवाहात सोडायला दिवे मिळतील का सगळीकडे विचारलं पण कुठेच काहीही मिळालं नाही कोणी म्हटलं की फुलवाती मिळतील पण त्याचा उपयोग काहीच नव्हता मला. सगळे म्हणायचे की दिवे लोक घरूनच आणतात, तयारीने येतात.
माझा विमोड झाला, मी परत खोलीत आलो. खूप वाईट वाटत होतं. इच्छा अपुर्ण राहिली म्हणून. पुन्हा कधी येता येणार माहिती नव्हतं.

 संध्याकाळचे 5 वाजले होते मी नर्मदा किनारी खाली गेलो. प्रथमच याची देही याची डोळा दर्शन घेत होतो. सरळ पाण्यात पाय कसा टाकावा!! कारण ती तर नर्मदा मैय्या असते परिक्रमावासीं ची! तिथल्या सर्व लोकांची! मी परिक्रमावासी नव्हतो, पण भाव आणि आदर दाटला होता.
अश्यावेळी श्रद्धा उचंबळून येते म्हणुन मी प्रवाहाला प्रथम नमस्कार केला. मनापासुन धन्यवाद म्हटलं. हाताने पाणी घेऊन डोळ्यांना लावलं मग आत उतरलो.
थोड्यावेळाने बाहेर येऊन काठावर पायरीवर बसलो.

एव्हाना सूर्य पश्चिम क्षितिजाकडे कलत होता. आकाशात केशरी रंग दाटला होता. मी हा विचार करत होतो याक्षणी दिवे सोडले असते तर किती सुंदर आणि प्रसन्न वाटलं असतं. मागुन एक माणूस आला माझ्या शेजारीच त्याची नायलॉन ची पिशवी ठेऊन नर्मदेत एक बुडी मारून क्षणात बाहेर आला आणि हात कोरडे करून पिशवीतून सामान बाहेर काढलं त्यात छोटे छोटे द्रोण होते आणि फुलवाती होत्या. प्रत्येक द्रोणात एकेक फुलवात ठेऊन ती पेटवू लागला. मला प्रचंड आनंद झाला!!

मला खुप इच्छा झाली विचारण्याची की मी यातील काही दिवे सोडु शकतो का? पण मला अवघडल्यासारखं वाटत होतं मी कसं म्हणावं त्याला! थोडं अवघडुन शेवटी विचारलच तर तो म्हणाला ''हां जी बिलकुल!उसमे क्या पुछ ने की बात है समझो आपके लिए ही लाए है!''

सांगु शकत नाही किती आनंद झाला मला!!मी त्यातील अर्धे दिवे सोडले. बाकी त्याने.
मी त्यांना म्हटलं की तुम्ही पैसे घ्या याचे! पण मी इथे तीन दिवस आहे तोवर तुम्ही रोज आणु शकाल का!

 त्याने पैसे घ्यायला स्पष्ट नकार दिला म्हणाला ''जब तक आप हो हम रोज आपके लिए दिए लाते रहेंगे..!
त्यांनी सांगितलं की जवळच्याच एका खेड्यात राहतात.
                                                        (हाच तो दिवे आणणारा माणूस)

 मी किती तरी वेळ किनाऱ्यावर बसायचो. किनाऱ्यावर भयंकर डास असायचे.त्याकाळात डेंग्युची साथ प्रचंड होती.म्हणुन मी अंगाला ओडोमाॅस फासुन किनाऱ्यावर भरपुर वेळ बसायचो..
पलीकडे दुर प्रसिद्ध शूलपाणेश्वराचं जंगल आणि पर्वत दिसायचे.

प्रवाहात सोडलेले दिवे शांतपणे खुप वेळ तेवत राहायचे. दोन महाभूतांचं ते निकट ते निकट सानिध्य खूप सात्विक आनंद देऊन जायचं.
 सूर्यास्त व्हायचा..त्या सांजवेळी अंधारात पाण्यातील दिवे तेवत राहायचे आणि वर चंद्रकोर प्रकाशित व्हायची..ते दृश्य खुप आवडायचं. तेवढ्यात पलिकडच्या तिरावरील एका खेड्यातील मंदीरात आरती सुरू व्हायची. ढोल वाजायचा..ते ऐकायला खूप मस्त वाटायचं. तो ढोल आणि आरती संपली की या तीरावरील वर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या समाधी मंदीरात आरती सुरू व्हायची.ती संपली की त्याच्या वरील दत्त मंदिरातील आरती सुरू व्हायची.मग ''अघोरकष्टोद्धरण स्तोत्र'' म्हटलं जायचं.
रात्री 9 नंतर सर्व सामसुम व्हायचं.

तो माझा तिथला पहिला दिवस होता.त्यामुळे मला तिथली रात्रीच्या जेवणाची वेळ माहिती नव्हती.त्या संबंधीत एक अनुभव आला.
दुसऱ्या दिवशी नाशिकचे परिक्रमावासी नवरा बायको भेटलेत त्यांचा अनुभव न विसरण्यासारखाच!!

(अंतीम भाग पुढे.)

-अभिजित दिलीप पानसे.

No comments:

Post a Comment