Saturday, 23 December 2017

आयपीएल फायनलवरून बावळट राडा

हो मी खूप गांभीर्याने आजच्या आयपीएल फायनल मध्ये पुणे किंवा मुंबई ला सपोर्ट करणार आहे कारण प्रत्येक खेळाडू त्यांना मिळणाऱ्या धन राशीचा अर्धा भाग महाराष्ट्रातील जल शिवार योजनेसाठी, रस्ते दुरुस्ती, पाटबंधारे विभागाला देणार आहेत.

मुंबई इंडियन्स चे खेळाडू मिठी नदी स्वच्छतेसाठी आणि येऊ घातलेल्या पावसाळ्यात आपल्या लाडक्या शहरवासीयांना त्रास नको म्हणून नाले, गटारे सफाई साठी रक्कम देऊन "करून दाखवलं" म्हणणार आहेत.

पुणे जायंट्स खेळाडू पुण्यात मेट्रो आलीच पाहिजे चे नारे देत सरकारी कामकाज पाहता स्वतः कमावलेल्या रक्कमेतून मेट्रो निधी उभारणार आहेत.
हे सगळं ते करणार आहेत कारण
कारण दोन्ही टीमच्या विदेशी खेळाडू आणि इतरही OMS खेळाडू पैश्यांसाठी खेळत नसून मराठी माणसाच्या #जाज्वल्य अभिमानाठी खेळताहेत. माहिनाभर मराठी मातीत खेळून " छाती ला माती" लावून , मराठी संस्कृतीचा अभ्यास केला आहे ते पूर्णतः मराठमोळे झाले आहेत.

 राखीव दिवसात स्टीव्ह स्मिथ आदी विदेशी खेळाडू पुण्यात ज्ञान प्रबोधिनीत जात. वसंत व्याखान मालेतील सर्व व्याख्याने त्यांनी ऐकलीत.
स्टीव्ह स्मिथ , डु प्लेसिस , मिचेल मार्श यांना आळंदीमध्ये गोपीचंदन लावून ,वासुदेवाच्या वेशात टाळ वाजवत बघितल्या गेलंय.

'मुंबईचा' पोलार्ड तर रात्री मुंबईत पायी फिरून आपल्या मुम्बैवासीयांचे दुःख जाणून घेतो आणि तिथल्या तिथे आर्थिक मदतही करतो. हां कधी तो फोरस रोडवर दिसतो पण तिथे तो फक्त मसाला पान खायला जातो. असं म्हण्टात.

 स्टीव्ह स्मिथ ने मराठी आपली प्रथम भाषा मानायला लागले आहेत आणि ऑस्ट्रेलियात सिडनी आणि मेलबर्नमध्ये मराठीचा प्रचार ,प्रसार करण्यासाठी मराठी संस्कृती केंद्र उघडणार आहे. तसेच प्रमाण मराठी भाषेचा प्रसार करणार आहे.

इतकच नाहीतर स्टीव्ह स्मिथने आणि केरन पोलार्ड यांनी पुणे , मुंबई कचेरीत ऍफेडेवीट करून आपापले नावं बदलून अनुक्रमे " सतीश् सोनारे " आणि "किरणराव पोलार्डेकर ही नावे वापरायला सुरवात केली आहे.

किरणराव पोलार्डेकर चाही वेस्ट इंडिजमध्ये "मराठी सांस्कृतिक मंडळ " काढण्याचा मानस आहे पण वेस्ट इंडिजच्या जमैका की त्रिनिनाद कोणत्या बेटावर मराठी भाषा केंद्र उघडावे या गोंधळात आहे. लवकरच तो ; मागील महिन्यात एका मराठी वर्तमानपत्रात गाजलेल्या प्रमाण मराठी भाषेवरील लेखाला आणि स्टीव्ह स्मिथ उर्फ श्री सतीश सोनारे यांना प्रत्युत्तर देणार आहे.

सर्व विदेशी खेळाडूंना चुलीवरील मटन, कोंबडी वडे इतके आवडले की मराठी आचाऱ्याला ते सोबत नेणार आहेत. यानंतर चुलीवरील बर्गर , चुलीवरीलपिझ्झा, पास्ता त्यांना खाण्याची इच्छा आहे.

सर्व विदेशी खेळाडूं सकाळी उठून तुकाराम महाराजांचे अभंग गातात , मुंबईचे खेळाडू पसायदान म्हणतात.

डुप्लेसिस आणि मार्शची मोबाईल कॉलर ट्यून " मराठी पाऊल पडते पुढे"..'' वेडात वीर दौडले एकसाथ.."
तर मिचेल जॉन्सन ची " जय जय महाराष्ट्र माझा..." ही आहे . लासीथमलिंगा ने मात्र खास "अजय अतुल" कडून  " रम्य ही स्वर्गाहुनी मुंबा...." हे गाणं रेकॉर्ड करून घेतले आहे. तीच त्याची कॉलर ट्यून आहे.

शिवाय सतीश सोनारे पूर्वाश्रमीचे स्टीव्ह स्मिथ प्रत्येक वेळी टॉस नंतर, मॅच सुरु होताना मैदानावर प्रेझेन्टेशन मध्ये, जय शिवाजी जय भवानीची आरोळी देतात!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजची फायनल मुंबई इंडियन्स चे सर्व खेळाडू 'मुंबईचा डबेवाल्याच्या " पेहरावात खेळणार आहे.

सतीश सोनारे aka स्टीव्ह स्मिथ यांनीही "पुणेरी पगडी" घालून खेळण्याचा हट्ट केला पण काही सामाजिक संघटनांनी यात सतीश सोनारेंचा ब्राह्मणी कावा असल्याचे सांगून विरोध केल्यावर तो रद्द केला .शिवाय पुणेरी पगडी धावताना कधी ही पडू शकते हे ही त्यांना जाणवलं.

जस्टीन बार्बर च्या एका दिवशीच्या कार्यक्रमावरून, तिकिटांचे दरावरून मी टीका केली , हे पैसे शेतकऱ्याना द्यावे वगैरे ठेवणीतले कार्ड वापरले पण दरवर्षी लाखो रुपये विदेशी खेळाडुना इथे दिले जातात , मी दरवर्षी तिकिटे काढून आयपीएल मॅचेस बघतो कारण या दोन टीम्समध्ये जाज्वल्य मराठी अभिमान आहे शिवाय या दोन्ही टीमचे खेळाडू पूर्णतः मराठी संस्कृतीमय झाले आहेत आणि सामाजिक कामात ते मदत करतात.
तेव्हा आज मी ज्या माझ्या आवडत्या टीमच्या विरुद्ध टीमच्या सपोर्टर्स ची खूप टिंगल टवाळी करणार!
कारण तो "माझ्या" शहराच्या इभ्रतीचा प्रश आहे!!!

मुंबई इंडियन्स आणि पुणे जायंट्स या टीम चा खरच माझ्या आवडत्या मुबई आणि पुणे शहराशी  संबंध आहे हा या त्रिकालाबाधित सत्यावर माझा डोळे मिटून विश्वास आहे.

माझ्या आवडत्या शहराचं नाव असलेल्या टीमला मी सपोर्ट करिनच शिवाय विरुद्ध टीम च्या समर्थकांची शाब्दिकरित्या खांडोळी खांडोळी करेन!!

आणि हो मी अत्यंत हुशार व्यक्ती आहे.

जय हायपीएल
जय मुम्बै
जय पुणे
जय श्रीकिरणरावपोलार्डेकर!! जय म्हाराष्ट्र

- अभिजित पानसे

No comments:

Post a Comment