गरूडेश्वर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची पुण्यतिथी
आज वासुदेवानंद सरस्वती महाराजांची पुण्यतिथी.
दत्त संप्रदायात वासुदेवानंद स्वामींचं स्थान किती महत्वाचं आहे हे महाराष्ट्रीय,गुजराती,कन्नड,तेलगु दत्त भक्तांना इ. सर्वांनाच माहिती आहे.
2013 मध्ये मी पहिल्यांदा टेंब्ये स्वामींचं मराठी संक्षिप्त चरित्र वाचलं होतं.तेव्हापासुन त्यांचं जन्मगाव असलेलं सावंतवाडीजवळ माणगावला आणि समाधीस्थान गरूडेश्वर येथे जाण्याची खुप इच्छा होती.
ते त्यांचं समाधीचं शंभरावं वर्ष होतं.गरूडेश्वर येथील संस्थानाने 11 कोटी मंत्रजप संकल्प केला होता.त्यामुळे सर्व दत्तक्षेत्री, कारंजा लाड,नृसिंह वाडी,पिठापुर....क्षेत्री रोजचा ''दिगंबरा...श्रीपादवल्लभ..चा जप सुरू होता.
त्यावर्षी काहीही कल्पना नसताना अचानक माणगावला जाता आलं होतं.पण त्याही पुर्वीपासुन #गरूडेश्वरला जाण्याची इच्छा खुप होती.
कारण गरुडेश्वर हे नर्मदा परिक्रमेतलं महत्वाचं तीर्थस्थान आहे.त्याबद्दल पुस्तकांमधुन कितीतरी वाचलं होतं.
पुढे कधी जमेल माहिती नव्हतं म्हणून त्या दिवशी रात्रीतुन ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं!ते डिसेंबर 2014 होतं.
सकाळी डेक्कन ने मुंबईला पोहचलो जो मित्र येणार होता त्याचं जमलं नाही. मग मी वडोदरा च वेटिंगचं तिकीट काढलं. ट्रेन रात्री उशीराची होती म्हणुन मग टिटवाळ्याचा गणपती आणि खुप दिवसांपासुन बघण्याची इच्छा असलेलं स्थापत्य शिल्पाचा अप्रतिम नमुना असलेलं अंबरनाथाचं शंकराचं मंदिर बघितलं.
रात्री कल्याणला ट्रेन मध्ये एका डब्यात शिरलो.संपूर्ण डबा संपूर्ण भरलेला होता. त्यामुळे मी आधीच दरवाज्यापाशी जाऊन बसलो.रात्र तेवढी काढायची होती.थोड्या वेळात एक पन्नाशीतला,पांढरा कुर्ता पायजमा घातलेला सर्व बाजुने सुटलेल्या देहाचा माणूसही शेजारी येऊन बसला.
तो त्याच्या साडीच्या व्यापराबद्दल, तसंच बांद्रा वरून जाणाऱ्या ट्रेन ने गेलो असतो तर जागा मिळाली असती वगैरे सांगत होता.मी फक्त ऐकण्याच्या भूमिकेत होतो.
मी एरवीही फार जास्त बोलण्याच्या बाबतीत दगड आहेच. त्यात त्या दिवशी तर दिवसभरामुळे खूप थकलो होतोच.त्यातल्या त्यात खाली स्थानापन्न झाल्याने व शौचालयाचे निकट सानिध्य असल्याने आधीच कसंतरी वाटत होतं.
तो माणूस मात्र बिनधास्तपणे आपल्या बॅगेची उशी करून पाय पसरून तिथेच खाली झोपला.
मला अश्या मोकळ्या लोकांचा हेवा वाटतो मला तर नवीन ठिकाणी मऊ गादीवरही झोप लागत नाही.
सेल मधलं चैतन्य संध्याकाळीच संपल्याने तो निर्विकल्प समाधीत गेला होता.अश्यावेळी मग माझ्यासाठी पाउलो कोयेल्हो Paulo Coelho नेहमीप्रमाणे धावून आला आणि अगणित वेळा पारायण करूनही दरवेळी नवं काहीतरी गवसणारं "द अलकेमिस्ट" पुस्तक काढलं.
रात्रभर जागणं गरजेचंच होतं कारण पहाटेच बडोदा येणार होतं.झोप लागली तर सरळ अहमदाबादलाच पोहचलो असतो.
कोणीतरी खांद्या हलवत आहे जाणवलं आणि
आणि काही ''...छे...नथी..'' शब्द कानावर पडलेत. दोन तीन लोकं सामानासकट उभे होते.
बडोदा आलेलं होतं.
मला बसल्या बसल्याच बॅगेवर डोक टेकवल्या स्थितीत झोप लागली होती.
Paulo Coelho, आणि सँटियागो त्याच्या मेंढ्यांसकट शेजारीच खाली पडले होते. त्याला उचलुन बॅगेत भरला.उजवीकडचं पांढऱ्या कपड्यातलं अजस्त्र धूड दरवाजा अडवून झोपलेलंच होतं. त्यांनी त्यालाही गुजरागी हिंदीत उठवलं आणि रस्ता मोकळा झाला.थंडी भरपूर होती.
प्रथमच गुजरातमध्ये आलो होतो.
महाराष्ट्राशी जवळचा संबंध असलेलं सांस्कृतीक बडोदा शहर.#गायकवाड_राजेंचं शहर.
प्रेक्षणीय राजवाडा असलेलं...
तिथून बस स्टॅन्डला आलो.
गुजरातच्या डेव्हलपमेंट बद्दल खरी खोटी ऐकीव वाचिक माहितीच आजवर होती.ती पहिल्यांदा पाहत होतो.
बडोद्याच बस स्टँड हे ''बस स्टँड'' वाटतच नव्हतं.
स्वच्छ शुभ्र इमारत. ठिकठिकाणी मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, बसण्याची व्यवस्थाही वेगळीच होती.
आजवर पाहिलेलं सर्वोत्तम बस स्थानक हेच!
सगळ्यात जास्त आवडलेली आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे;
आपल्याकडे बसच्या जागेचं आरक्षण करण्याच्या दोन पद्धती असतात.एक ऑफिशयल आणि दुसरी बसच्या खिडकीतुन रूमाल किंवा बॅग टाकून संपुर्ण सीटचे आरक्षण करणे.
तिथे मात्र एक कर्मचारी खास लोकांच्या चढण्याच्या देखरेखीसाठी होता. बस लागे पर्यंत कोणालाही फलाटाच्या काठवरही येऊ देत नव्हता.ही गोष्ट विशेष आवडली.
साडेसहाला सरदार सरोवर डॅम ला जाणारी बस आली.
तिकडे बसचा दरवाजा बसच्या मधोमध होता.बस सुरू झाली आणि थोड्याच वेळात माझंही "म्हैस " मधल्या रत्नागिरी-मुंबई बसमधल्या प्रवास्यांसारखं नाही नाही नाही हो हो हो
सुरु झालं कारण रात्रभर झोप झाली नव्हतीच.
साडेदहाला अहमदाबाद हायवे वरील एका छोट्या गावी बस थांबली. तेच गरुडेश्वर होतं.
प्रथमच नर्मदा नदीचं जवळुन दर्शन..स्नान करणार होतो..टेंबे स्वामींचं..त्यांच्या जवळ नेहमी असलेली छोटी दत्त मुर्ती..यांचं दर्शन करणार होतो म्हणुन आनंदी होतो.
तिथल्या छोटेखानी संस्थानात पोहोचलो.मला राहायला एक साधी खोली मिळाली.खोलीत पाठीवरची सॅक टाकुन कधी स्मामींच्या समाधी दर्शनाला आणि नर्मदा किनारी जातो असे झाले.
त्या तीन दिवसातील तिथलं वातावरण,परिक्रमावासींच येणं जाणं..आणि नाशिकच्या पवार आडनाव असलेल्या शिक्षक असलेल्या परिक्रमावासी नवरा बायकोंनी सांगितलेला त्यांचा अनुभव कधीच विसरणार नाही.
-अभिजित पानसे
No comments:
Post a Comment