Wednesday, 27 December 2017

अस्सल देशी गुरुजी

24 जून 2016

विदेशातुन आयात केलेला..फक्त लॅॅपटाॅपवर काम करणारा..चेहऱ्यावरून माशीही उडत नसलेल्या..वा कोणी ''मिडल फिंगर'' दाखवणारा ''गोरा कोच'' न घेता भारतीय मातीतला..भारतातील सांप्रदायीक,भाषीक,प्रादेशीक विविधतेचा अनुभव असलेला तरूण भारतीय कोच बीसीसीआय ने निवडला हेच सर्व प्रथम खुप अभिनंदनीय!!

कारकिर्दीत सचिन, गांगुली,सेहवाग इ.महास्टार्समध्ये नेहमीच UNSUNG HERO राहिलेला अनिल कुंबळे!!

अनिल कुंबळे आता कोच जरी झाला तरी त्याला 'ते' किंवा 'सर' वगैरे संबोधीत न करता एकेरीनेच संबोधीत करावसं वाटतं.
कारण तो सर्वात पहिले;
आपल्या वेगवान फ्लिपरने भल्या भल्यांना बोल्ड वा एलबीडब्ल्यु करणारा,स्लिप मध्ये राहुल द्रविड वा लक्ष्मण ने कॅच घेतल्यावर खुषीत धावत टाळ्या मारणारा..बॅटिंगवेळी आपल्या लांब ढांगा टाकत पिच वर येउन थोड्या विचित्र गमतीशीर पद्धतीने स्टान्स घेउन बॅटिंग करणारा आपला जंबोच वाटतो!
त्यामुळे एकेरीच!!

 क्रिकेटमधील,कमिटमेंट आणि डेडिकेशनच्या नाण्याची एक बाजु राहुल द्रविड आहे हे तर सर्वमान्यच!पण या नाण्याची दुसरी बाजु #अनिल_कुंबळे''आहे हे 2001 च्या अॅँटिग्वाच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या दिवशी नक्की झालं.

 तोंडावर बाउंसर आदळल्यामुळे जबडा तुटलेला असताना ड्रेसिंग रूममध्ये बसुन अनिल कुंबळे ट्रिटमेंट घेत होता.भारताकडे त्याच्याशिवाय दुसरा स्पिनर नसल्यामुळे सचिन तेंडुलकर बाॅलिंग करत होता.
सचिनचा बाॅल स्पिन होतोय हे दिसल्यावर आणि भारताला  मॅच जिंकण्याची संधी असल्यामुळे, डाॅक्टरांकडुन जबरदस्तीने परवानगी घेतली आणि पेन किलर्स घेउन ,अक्षरश: हलत असलेल्या जबड्याला पट्टी बांधुन हा माणुस मैदानात उतरला.

डाॅक्टरने त्याला वाॅर्निंग दिली होती की काहीही झालं तरी कोणत्याही स्थितीत अपील करायचं नाही..एक शब्दही बोलायचं नाही..कोणाचाही धक्का लागु द्यायचा नाही.!!

अशा अवस्थेत बाॅलिंग करत स्थिरावलेल्या ब्रायन लाराला कुंबळेने आउट केले.काही वेळात कॅप्टन कार्ल हुपरलाही एलबीडब्ल्युमध्ये पकडलं होतंच.पण चुकीच्या अंपायरींगमुळे त्याला नाॅट आउट दिलं.
शेवटी कॅप्टन हुपरने मॅच ड्राॅ केली.
कुंबळे जबड्यावरील सर्जरीसाठी शांतपणे निघुन गेला.

पण त्या दिवशी जिंकला तो फक्त जंबो अनिल कुंबळे!खऱ्या अर्थाने मॅन आॅफ द मॅच!!
आॅफिशियल मॅन आॅफ द मॅच झालेल्या प्लेयरलासुद्धा अवार्ड घेताना त्यावेळी शरम वाटली असेल!
त्या दिवशी चा अनिल कुंबळेला ग्राउंडवर वा टिव्हीवर लाइव्ह पाहणारे नशीबवान आहेत!

टायटन कपमध्ये बॅँगलोरला घरच्या मैदानावर;
श्रीनाथ आणि अनिल कुंबळेनी आपापल्या आयांसमोर आॅस्ट्रेलियाविरूद्धची हरलेली मॅच जिंकुन दिली होती!!

 पाकिस्तानविरूद्ध शेवटच्या इंनिंगमध्ये घेतलेल्या दहा विकेट्स..

टीमचा कॅप्टन झाल्यावर इंग्लंडविरूद्ध ठोकलेलि सेंचुरी..

असे अनेक हायलाट्स या अनसंग हिरोचे आहेत.

आता कोच म्हणुन नवी इंनिंग सुरू झालीए.

एक माणूस म्हणूनही तो चांगला उदात्त विचारांचा आहे. घटस्फोटित महिलेशी त्याने प्रेमविवाह केला असून तिच्या मुलांसोबत तो राहतो.

जंबो कुंबळे ही इनिंगसुद्धा गाजवणार ही आशा करूया!

महत्वाची टीप- कोच बदलल्याचा सर्वात महत्वाचा  फायदा म्हणजे बीसीसीआयच्या हरकाम्या 'नारायण' असलेल्या
रवि शास्त्रीला कोच म्हणुन आता बघणार नाही.

तो पुन्हा आपलं माईकचं बोंडुक हाती धरणार!

-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment