Thursday 28 December 2017

श्रीनगर जामिया मशीद भाग 1

4  दिवसांपूर्वी श्रीनगर (काश्मीर) च्या #नौहट्टा भागात पोलिसांवर आतंकवादी ग्रेनेड हल्ला झाला. रोज मरे त्यास कोण रडे नुसार न्यूज चॅनल्सने खुप कव्हरेज दिलं नाही. पण नौहट्टा भाग ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्यात.

श्रीनगर म्हटलं की सर्वाना दल लेक , मुघल गार्डन्स , शंकराचार्य मंदिर आठवतं. टुरिस्टसना याच जागा बघायच्या असतात. काही जण "हजरत बाल"लाही जातात. पण नौहट्टा भागात कोणीही टुरिस्ट जात नाही. कोणतीही टुर कंपनी त्या भागात नेत नाही. ते शक्यही नाही. कारण तो अत्यंत कुप्रसिद्ध आणि धोकादायक भाग आहे.पण तिथे तेराव्या शतकातील पुरातन वास्तू कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे "जामा मशिद".

नौहट्टा , डाउन टाऊन हा श्रीनगरचा सर्वात जुना आणि गजबलेला भाग आहे. पण तो प्रचंड संवेदनशील भाग आहे .बहुतेक प्रत्येक शुक्रवारी तेथे जवानांवर दगडफेक होते.
कट्टर अलगाववाद्यांचा तो 'अड्डा' आहे.

लाल चौक हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो हे सगळयांना माहिती आहे. 015 सप्टेंबर ,मौन्टेनिअरिंग कोर्सवेळी तंबू मध्ये मुदस्सर आणि इमरान हे दोघे अनंतनाग चे मुलं होते .त्यांनी मैत्री झाल्यावर सांगितलं होतं की लाल चौकात के होतं ते प्रकटीकरण असतं जे नौहट्टा मध्ये ठरतं त्याचं."सरहद पार का संबंध नौहट्टा ,डाऊन टाऊन से होता है!"

पण या डाऊन टाऊन भागात वास्तूशिल्पाचा एक अप्रतिम नमुना असलेली जामा मशीद मला बघायची होती.
तिच्याबद्दल ,लाकडी बांधकामाबद्दल ,32 लाकडी खांबांबद्दल ,नाजूक काम जुना बजार याबद्दल बरंच वाचलं,ऐकलं होतं.

सोनमर्ग ला गिर्यारोहन बेसकॅम्प जवळच कावा ,मॅगीचं दुकान असलेल्या नियाजभाई ची सर्वांशी ओळख झाली होती. त्यालाही जामा मशिदीबद्दल विचरल्यावर त्यानेही तिची खूप स्तुती केली होती आणि श्रीनगरला गेल्यावर आवर्जून बघायला सांगितलं होतं. शिवाय तिथे जाणं सुरक्षित आहे हे सांगितलं. वॊह लोग टुरिस्ट को कुछ नही करते बोलला होता.
त्यामुळे ती मशिद बघायचीच होती.

सप्टेंबर 2015 मंगळवारी सोनमर्ग हुन श्रीनगर ला पोहोचलो .माहिनाभरानंतर निवांतपणे अंघोळ केल्यावर गजबलेलं शहर आणि लाल चौक बघितला.सगळीकडे उर्दू वर्तमानपत्रेच मिळत असल्याने इंग्लिश पेपर मिळवायला दुकान शोधत गल्ल्यांमध्ये फिरलो. सात दिवसांनी ईद असल्याने जागोजागी मोठमोठे बकरे विकायला होते.

लाल चौकात तेथे एक गोंदियाचा सैनिक होता. त्याला जामा मशिदिबद्दल विचारल्यावर त्याने तिथली परिस्थिती सांगितली.
दर शुक्रवारी मशिदीत धर्मगुरुंचे प्रवचन ,प्रार्थना आटोपली की तिथे ताबडतोब सैनिकांवर दगडफेक सुरु होतात. कधी मशिदीतून लाऊड स्पीकर वरून घोषणा दिल्या जातात. आत प्रार्थना सुरु झाली की तरुणांपासून, स्त्रिया, लहान मुले हातात काचेच्या बाटल्या, दगड, विटा घेऊन उभ्या राहतात.आणि संपल्यावर सैनिकांवर मारा सुरु होतो. हे एक ते दोन तास सुरु राहतं.
आता हे इतकं सवयीचं झालंय की दर शुक्रवारी जामा मशिदीत प्रवचन सुरु झालं की इकडे जवान ही सर्व स्वसंरक्षणासाठी तयार होतात.

एकंदर हे सगळं ऐकून दडपण वाढलं होतं. शिवाय तेव्हा नुकत्याच झालेल्या बीफ बंदीमुळे तिथलं वातावरण प्रचंड तापलं होतं. ईद चे दिवस होते त्यामुळे त्या भागात आणखी काही होइल का काहीही कल्पना नव्हती.पहिल्यांदाच काश्मीर ला गेलो होतो.

पण ती मशिद मला बघायचीच होती. दुसऱ्या दिवशी ठरवू जायचं कि नाही असा विचार करून प्रचंड थकल्यामुळे ,आणि महिना भर अंघोळ न केल्याने पुन्हा एकदा पाण्यात डुंबायला मी लाल चौकातीलच हॉटेलात परत गेलो.

-अभिजित दिलीप पानसे

No comments:

Post a Comment