ऑगस्ट 2013 प्रवासवर्णनभाग3
डोंगरावर जंगलातील त्या गुहेकडे
माझं बसमध्ये नाही नाही हो हो सुरू असताना बसमधून बाहेर गावात सार्वजनिक गणपतीची तयारी सुरु झालेली दिसत होती.
माणगाव आल्याचं कंडक्टरने सांगितलं.मी खाली उतरलो.आजुबाजुला कुठेही घर नाही गाव नाही. फक्त सरळ मोकळा रस्ता होता.एका माणसाने सांगितलं की हा माणगाव फाटा आहे.गाव उजवीकडुन रस्त्याने ५किमी.
माझी दांडीयात्रा सुरू झाली.
आजुबाजुला धरणीने अप्रतीम हिरवीकंच शिफॉनची साडी..हिरवीपैठणी..हिरवी कांजीवरम साडी नेसलेली होती.
धरणीच पावसाळ्यातील हिरवा शालू हा लग्नातील मुलीच्या जांभळ्या शालू प्रमाणे आउटडेटेड झालंय आता.लग्नातला मुलीचा जांभळाशालू नामक महावस्त्र) आणि मुलाचा राखाडी रंगाचा सूट हे फक्त आयुष्यभर कपाटाची शान वाढवतात.
फक्त लग्नाचा अल्बम हे जालीम शस्त्र घरी पाहुणे आले की त्यांच्यावर निघत असतं.
सरळसोट छोटा डांबरी रस्ता आणि आजुबाजुला दृष्टी जाईल तिथे हिरवा रंग सांडला होता.डोळ्यांना खुप आनंद मिळत होता.दोन दिवसांपासुनचा थकवा पळुन गेला.
लहानपणी पायात काटा खोल रूतला की तो काढताना आई हिरव्या रंगाकडे म्हणजे बाहेर अंगणात झाडांकडे पाहायला लावायची.हिरवा रंगाकडे बघितलं की त्रास कमी होतो असं म्हणते.
पण खरंच आहे डोळ्यांना हिरवा रंग फार लाभकारी आणि आनंददायी.
आणि पांढरा रंग डोळ्यांना तितकाच त्रासदायी अपायकारक.सतत फक्त पांढराच रंग बघत राहिल्यास डोळ्यांची शक्ती कमी होते.
थोडं चालल्यावर आजूबाजूला काही उतरते कौलारू घरं दिसत होती .अंगणात गुलाबाची व पिवळी इतर वेगवेगळी फुलं.. ..वेल घरावर गेली होती.
मी कानात इअरप्लग्स अडकवून गाणे ऐकत चालू लागलो. मन्नाडे आणि भीमसेनजोशींचं माझं आवडत गाणं सुरु केलं "केतकी गुलाब जुही चंपक बन फूले...."
चालत चालत मंदिरापाशी येऊन पोहचलो.
प्रथम तिथे स्नान करून फ्रेश झालो.सुंदर शांत परिसर होता.येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी हिरव्यागार झाडीत राहायच्या खोल्या होत्या.एक दिवस आईबाबांसोबत गुरुचारित्र पारायणाला यावं ठरवलं.
ते टेम्ब्ये स्वामींच्या समाधीचे शतकीय वर्ष होतं.त्यामुळे कारंजा पासून गरुडेश्वर पर्यंत सगळीकडे उत्सव सुरु होते.आणि काहीही कल्पना नसताना मला इथे येता आलं.
वासुदेवानंदसरस्वती , गोंदवलेकर महाराज हे समाजात लोकांमध्ये राहिलेत.त्यांचे चरित्र वाचताना छान वाटतं.पुस्तकातुन आधी वर्णन वाचलेल्या ठिकाणी गेल्यावर ती जागा पाहताना वेगळाच आनंद वाटतो.
टेम्ब्ये स्वामींनी जन्मगाव नेहमीसाठी सोडण्यापुर्वी त्यांनी येथे दत्तमुर्ती स्थापित केली होती.त्यांचं जन्मस्थान आणि पुरातन कोंकणी पद्धतीच ग्रामदैवत यक्षिणी देवीचं मंदिर पाहुन आलो.त्या भागात छोटी चविष्ट केळी मिळतात ती खास घेतली .आणि आवारात फिरताना एकदम डोक्यात प्रकाश पडला की टेंब्ये स्वामी ध्यान करायचे ती माणगाव ची जंगलातील डोंगरावरची गुहा इथेच तर आहे!
पुण्यातील एका प्रसिद्ध प्रकाशनाने
टेंबे स्वामींचं संक्षिप्त चरित्र प्रकाशीत केलं होतं त्यात एक माणसाला ध्यान करताना त्या गुहेतील विलक्षण अनुभव विशद केला होता.
अश्या थ्रिलिंग जागेकडे मी साहजिकच जायचं ठरवलं.एकाला रस्ता विचारला त्याने मंदिरामागुन शेतातुन डोंगराकडे रस्ता जातो सांगितलं.
हिरव्यागार शेतातुन छोटीशी अस्पष्ट पायवाटेने मी काही फोटोज काढत निघालो.पण जसं जसं मंदीराचा भाग मागे पडत गेला आजुबाजुला किर्रर्र जंगल ..एकही माणुस दिसत नव्हता.डोंगराच्या पायथ्याशी पोहचलो.वर जायला कुठलाही स्पष्ट रस्ता नव्हताच.
मनावर थोडं दडपण आलं होतंच.या भागाची काहीही माहिती नसताना इथे आलो होतो आणि आता एका पुस्तकात पाहिलेल्या गुहेच्या शोधात जंगलात शिरत होतो.
तसं बऱ्याच वर्षांपुर्वी मी असाच माहुरच्या वन्य प्राणी असलेल्या जंगलात फिरलो होतो तेव्हा तर जीवावर पुर्णपणे बेतलं होतं अगदी थोडक्यात वाचलो होतो.ती घटना मी भाऊ अनुरागला सोडुन आजवर कोणालाच सांगितली नाही.
ते सारं आठवत होतं.मी वर दगडातुन झाडातुन गवतातुन वर जात होतो.एकवेळ वाटल वाघ आला तर !पण मग म्हटलं ह्या!! सह्याद्रीच्या जंगलात वाघ राहिलाच कुठे !
अस्वल आलं तर!!हे तर अत्यंत भयंकर वाईट जनावर!!!ह्याच्या लेखी चुकीला काय कशालाच माफी नाही!
साप,अजगर दिसला तर!कोंकणातले साप महाविषारी हे नेहमीच वाचत ऐकत आलो होतो.दडपण वाढलं होतं.
पण तरिही ती गुहा पाहण्याची तीव्र इच्छा होतीच.
बऱ्यापैकी वर चढलो होतो.आणि पुढे जायचा रस्ताच दिसेना.रस्ता असा नव्हताच.पण तोवर एक अंदाज येत होता.आता काय करावं कळेना.मागे वळून पाहिलं उंचावरून आजुबाजुचा सर्व जंगलाने व्यापलेला परिसर दृष्टीस पडला!पावसाळा असल्याने सगळीकडे हिरवं घनदाट जंगल होतं.
एक बाल माकडांची टोळी जवळुन निघुन.गेल्या एक तासापासुन हे पहिलंच कुठल्याही प्राण्याचं अस्तित्व होतं.
मी निराश होउन परत जायचा विचार करत होतोच तेव्हा गवताने झाकलेल्या एका दगडावर लक्ष गेलं त्यावर केशरी रंगात गुहेकडे लिहुन बाण दाखवला होता.
मी योग्य रस्त्यावर होतो तर .पुढे जाताच स्टिलचे रेलिंग दिसलं.म्हणजे इथे लोक येतात तर!दडपण गेलं.
आणखी वर गेल्यावर थोड्याच वेळात गुहा दिसली.अगदी पुस्तकात होती तशीच!प्रचंड आनंद झाला!!
युरेका युरेका!!
गुहेच्या मुखापाशी आलो.पण आत जायची एकदम हिंमत होइना..आत काहीच दिसत नव्हतं.अंधार होता.
आत कोणता प्राणी ..वा साप वगैरे असेल का!
मुळात या भागाची काहीच माहिती नसल्यामुळे काही अंदाज येत नव्हता.पण इथवर आलोय ते असंच परत जाणार नाही.
हातातील बारकी काडी आत आपटुन थोडा आवाज करून आत कोणी आहे का याचा अंदाज घेतला.
काही क्षण थांबुन हळुच आत डोकावलं आणि आत शिरलो.
आत प्रशस्त स्वच्छ गुहा होती.आश्चर्य म्हणजे आत एक चटई आणि एक केरसुणी ही होती.म्हणजे येथे लोक नियमीतपणे येतात तर!मी एकदम निश्चिन्त झालो.
वरच्या भागात दगडी पादुका होत्या.
पंधरा वीस मिनिटे तिथे बसलो.जोरजोरात उत्साहात दिगंबरा दिगंबराचा..जप केला.गुहेचे फोटोज काढलेत.आणि परत निघालो.
खाली आलो तेव्हा मंदीरात सकाळी साडेअकराची आरती सुरू होती.ती संपल्यावर मस्तपैकी धरतीवरचं अमृत गुलाबीसर सोलकढी आणि भात पोटभर महाप्रसाद खाउन तृप्त झालो.
तिथुन लोकनाथतिर्थ महाराज या महान बंगाली योगींचे चरित्र पुस्तक विकत घेतले आणि परत बसने सावंतवाडीला आलो.
सावंतवाडीहुन संध्याकाळची पुण्याची बस होती.
समोर पाटीवर आरवली गावाची पाटी दिसली.मला हे नाव कुठेतरी वाचल्यासारखं वाटलं.आणि कोंकणातल्या भुतकथा आणि तिथले काही विचित्र मंदीरांच्या कथा नेहमीच वाचल्या होत्या. त्या गावचं #ते वेगळ्याच दंतगोष्टीसाठी प्रसिद्ध असलेलं वेताळाचं मंदीर आठवलं..विचार करू लागलो; जायचं का तिथेही!!!
-अभिजित दिलीप पानसे
No comments:
Post a Comment