Thursday 28 December 2017

नर्मदे हर "तुज आहे तुजपाशी..तिसरा भाग

गरूडेश्वर नर्मदेहर
प्रवास वर्णन तिसरा भाग

रात्रीच्या आरतीला मी हजर राहिलो.रात्रीच्या जेवणाची सशुल्क व्यवस्था असते हे वाचलं होतं.पण नंतर कळलं की फक्त दुपारीच महाप्रसाद असतो.रात्री फक्त परिक्रमावासींसाठीच जेवणाची व्यवस्था असते.

रात्री साडे नऊ वाजता त्या खेडेगावात मला खायला कुठे काय मिळणार होतं!!
2 अडीच किमी हायवेपर्यंत जाण्याचा कंटाळा आला होता. आणि तिथेही सर्व सामसुम झालंच असणार होतं!!

जवळपास काही मिळतं का शोधलं.एक म्हातारी  टेंभ्याच्या प्रकाशात खरमुरे कुरकुरे असलेलं काही समान आवरत आपली दुकानाची झोपडी मोठा निळा प्लास्टिकचा कापड टाकुन बंद करत होती.  तिच्याकडून मी 3 4 कुरकुरेचे पाकिटं घेउन परत आलो.

पोटातील ओरडणारे कावळे कावकाव करत एकमेकांवर तुटून  पडले होते.आपापल्या चोचींनी माझ्या जठरावर प्रहार करत होते.

मनात तेव्हा विचार आला की लोकं तर फार म्हणतात की नर्मदा माता तिच्या किनाऱ्यावर राहिलेल्याला कधी उपाशी ठेवत नाही.
रात्री एका व्यक्तीशी फोनवर बोललो तेव्हाही तिला मी हेच म्हणालो.

उपाशी पोटी रात्रभर झोप लागणं अशक्यच त्यामुळे वाचत बसलो.दर एक तासाने मंदिराच्या बाहेर एक तिथला कर्मचारी घंटा वाजवायचा. जितके वाजले असतील तितका घंटानाद करायचा.रात्रभर मी त घंटानाद ऐकलेत.खूप मस्त वाटायचं शांत गंभीर रात्री तो घंटानाद ऐकताना!

सकाळी सुर्योदयावेळी खाली घाटावर गेलो. गावातील बरेच लहान मुलं अंघोळीला पोहायला अाली होती.मी खाली किनाऱ्यावर उतरून प्रवाहाच्या काठाकाठाने बराच दुर चालत गेलो.किनाऱ्याकाठचा सूर्योदय पूर्णपणे अनुभवला.

पाण्याचे बदलणारे रंग बघितलेत. सूर्योदयापूर्वी च्या अंधुक प्रकाशात राखाडी दिसणार प्रवाह उदयासोबत केशरी होताना व जसजसा सूर्य वर येत गेला सूर्याचं सोनेरी प्रतिबिंब नर्मदेत दिसू लागलं. सूर्य सुद्धा प्रातःकाळी नर्मदा स्नान करायला नर्मदेत उतरला होता.त्याच्या तेजाने नर्मदा माई झळाळून निघाली होती.
(नर्मदा घाट, गरुडेश्वर, प्रातःकाळी)
मी परत घाटावर आलो. काही म्हातारे परिक्रमवासी घाटावर पायरीवर बसून त्यांची पूजा करत होते.त्यांचा तो नियमच असतो याबद्दल सौ प्रतिभाताई चितळे यांनी बरंच सांगितलं आहे.
त्या वृद्ध परिक्रमावासींनी सांगतीलं की ते मध्य प्रदेशातील एका खेड्याचे रहिवासअसुन 2 महिन्यापूर्वी परिक्रमेला निघालेय. त्यांच्यात एक म्हातारा होता त्यांची गुडघेदुखी प्रचंड होती इतकी होती तो एका वर्षापासुन उभाही राहू शकायचा नाही!! हे लोकं परिक्रमा ला निघालेत म्हणुन ह्यानेही म्हटलं मरायचं आहे आता तर पलंगावर झिझुन मारण्यापेक्षा नर्मदा किनाऱ्यावर मरू. म्हणुन हा यांच्यासोबत आला.हे तिघं जण त्याला घ्यायला तयार नव्हते.पण एकाच गावातील असल्याने नंतर कबुल झालेत.

तो म्हातारा उभा न राहता अंग घासत एक महिना जसा जमेल तितकं अंतर पार केलं पुढे हळुहळु त्यांच्यात सुधारणा होऊ लागली.आता तो म्हातारा माणूस झपझप चालू शकतो हे त्या दोघांनी आणि नंतर त्यांनी स्वतः सांगतीलं.
या मागे काहीही रॅशनल कारण असेल पण तेव्हा विचार आला कि श्रद्धा पक्की असेल तर कसे अनुभव येतात लोकांना!! (त्यांचा फोटो खाली आहे.)


सकाळी सकाळी असं काही ऐकल्यावर फ्रेश मूड मध्ये वर खोलीत गेलो.माझी खोली मंदिर कॅम्पस च्या थोडी बाहेर होती अगदी साध्या टिनाच्या छप्पर असलेल्या 4 खोल्या होत्या.त्यातील एक.समोर छोटं अंगण त्यात मोठं कडूलिंबाचं झाड, समोर  एक मंदीर.
मी त्या मंदिरात तीन दिवस गेलोही नाही पण शंकराचं असावं वाटायचं कारण छोटा नंदी बाहेरून दिसायचा.

मी अंघोळ करून दत्त मंदिरात गेलो.याच दत्त मंदिरात टेम्ब्ये स्वामी च्या पूजेतील आणि तेव्हा त्यांच्या सतत सोबत असणारी अंगठयाच्या अाकाराइतकी दत्त मूर्ती ठेवली आहे.हीच मूर्ती एकदा  उमरेडला  वैनगंगेत पडली असता टेम्ब स्वामींनी शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता,
करूणात्रिपदी रचली होती.

परत निघायचा आदल्या दिवशी त्या मंदिराच्या प्रमुख
पूजाऱ्यांना विनंती केल्यावर त्यांनी त्या दत्त मूर्तीचं दर्शन करवलं होतं.
मी मग खाली स्वामींच्या समाधी मंदिरात गेलो डोक्यात विचार सुरू होतंच टेन्शन होतंच की रोज 3 रात्री मी काय खाणार!!
मेन रोड वरून थंड तेलकट कचोरी,फाफडा वगरे प्रकार मी रोज रात्री खाऊ शकणार नाही.

पारायणाचे अध्याय वाचुन उठलो तर समाधी मंदिरातील पुजाऱ्यांनी आवाज देऊन थांबवलं आणि सांगितलं आज  गिरनार के काश्मिरीबापु और उनके अहमदाबाद जामनगर से लोग गाडीसे परिक्रमा के लिये जाने वाले है! यहां तीन दिन के लिये रहने आने वाले है तो अगले तीन दिन रातको सभी परिक्रमावसी और यहां पारायण करने के लिये आए हुये सबको खाना के लिये बुलाया है! तो आप रोज उधर ही रात को खाना खाने जाना!!पहले वो नारेश्वरसे जाने वाले थे लेकिन सुबह ही फोन आया था की यहाॅ से परिक्रमा शुरू करने वाले है!''

मला खुप आनंद झाला पण अवघडलोही असं मी कुठेही जेवायला कसं  जाणार!मी तर सख्ख्या नातेवाईकांकडेही स्वत:हुन खायला न मागणारा आहे.

थोड्याच वेळात खूप सारे वाहनं येऊ लागलेत.

दिवसभर तिथे अधुन मधुन फटाके किंवा ब्लास्टिंगसारखे मोठे आवाज यायचे.नंतर कळलं की  सरदार सरोवर डॅमच्या बांधकामासाठी खडक फोडण्यासाठी ब्लास्टस होताहेत.

संध्याकाळी पुन्हा सुर्यास्ता समयी तो माणूस आला.नर्मदेत दिवे सोडले मग वर आरतीला गेलो तेव्हा तिथे बरेच लोक होते. आरतीनंतर अनेकांनी जेवायला चलण्याचा आग्रह केला.
मी गेलो राजस्थानी जेवण्याचा थाट होता.दाल_बाटी,पोळ्या इतर भाज्या,गुळाचा खडा,ताक,नंतर मसाला दूध.असं अत्यंत चविष्ट अन्न होतं.विचार केला काल उपाशी रात्री झोपलो आणि आज हा थाट आणि एकदम मला माझंच आदल्या रात्रीचं वाक्य आठवलं की लोक तर फार म्हणतात नर्मदा मैय्या कोणाला उपाशी ठेवत नाही. अंगावर रोमांच दाटले.पुढचे तीन रात्री रोज वेगवेगळे चविष्ट पक्वान्न खाल्लेत.मी ज्या जिवशी सकाळी परत निघालो त्याच दिवशी तेही निुघुन गेलेत.

''गरुडेश्वर हे एक पूर्ण पॅकेजच आहे''असंच मी नेहमी म्हणतो. ते प्रमुख नर्मदास्थान आहे ते वासुदेवानंद सरस्वतींचं समधीस्थान आहे.प्रमुख दत्तक्षेत्रही आहे तसंच तिथे मुळात गरुडेश्वर आणि इतर दोन पुरातन शिव मंदीरेही आहेत. त्यामुळेच त्या स्थानाचं नाव गरुडेश्वर आहे.
जसं शेगाव चं मूळ नाव शिवगाव होतं कारण तेथील मोटेंचं  पुरातन शिव मंदिर. पुढे #गजानन_महाराज तिथे आल्यानंतर त्यांच्यामुळे शेगाव ओळखल्या जाऊ लागलं.तसेच गरुडेश्वर हे  नाव व पहिली ओळख मुळात तिथल्या तीन शिवमंदिरांमुळे.पुढे वासुदेवानंद सरस्वती स्वामीनी तिथे समाधी घेतल्याने त्यांच्यामुळे गरूडेश्वर ओळखु जाऊ लागलं. मी ते तीन मंदिर शोधायचं ठरवलं 1 गरुडेश्वर 2 नर्मदेश्वर 3 कपालेश्वर.

यातील नर्मदेश्वर घाटावर खाली जातानाच डावीकडे पायऱ्यांना लागुनच आहे ते मी रोजच बघायचो.

गरूडेश्वराचं मंदीर विचारत 2 किमी दुर पायवाटेने गेलो.मंदीराच्या बाहेर नर्मदेतील बाणलिंगे ठेवली होती.आता उरलं होतं फक्त करोटेश्वर. लोकांना विचारल्यावर म्हणायचे ते मंदीर गावातच दत्त मंदिरापाशी आहे.मला खुप शोधुनही काही सापडलं नाही.

शेवटी खोलीत परत आलो.पलंगावर लेटलो होतो.आणि डोक्यात एकदम एक विचार विजेसारखा चमकुन गेला.मी वेगाने दरवाजा उघडुन बाहेर आलो आणि अंगणातील त्या समोरच्या मंदिराकडे गेलो.वर बघितलं कमानीवर नाव लिहिलं होतं ''करोटेश्वर''.

चार दिवस मी त्या मंदिरापासुन पाच पावलांवर राहत होतो पण मी लक्ष दिलं नाही.खरंच बरेचदा प्रश्नांची उत्तरे..शोधत असलेल्या गोष्टी..हवा असलेला खजिना आपल्या जवळपासच असतो पण आपण "द अॅल्केमिस्ट" मधील 'सँतियागो' सारखं तो दुरवर शोधत राहतो.


No comments:

Post a Comment