Saturday, 23 December 2017

आपला तो अज्या दुसऱ्याचा तो जस्ट्या

12 may 2017

लहानपणी शाळेत पाचवी सहावीत बँड पथकात बासरीच्या कळपात मी होतो.दरवर्षी15 ऑगस्ट 26 जानेवारी च्या काही दिवस अगोदर बँड बासरीचा सराव होत असे. पण राष्ट्रगीत बासरीवर वाजवणं मला कधीच जमलं नाही. पण ते मी सरांना कधीच कळू दिलं नाही कारण इतर पोरांच्या बासरी वादनात मी फक्त तोंडात स्टीलची बासरी धरून न वाजवता छिद्रांची उघडझाप करीत असे.
स्वातंत्र्य ,प्रजासत्ताक दिन आला की सकाळी उठून शुभ्र अर्धी चड्डी आणि शर्ट घालून वर डोक्यावर स्कॉउट सारखी आडवी गोल नेवी ब्लु रंगाची टोपी तीत वर कोंबडीच्या पिसाला लाल गुलाबी रंग दिलेला तुरा घालून आमचं प्रथम झेंडावंदन आणि नंतर सगळ्यात समोर बँड बासरी पथकाच्या मागे इतर सर्व पोट्टे सोट्टे अशी प्रभात फेरी निघत असे. 

मला ते मार्चिंग चं बासरी वादन येत असूनही कंटाळा यायचा आणि राष्ट्रगीताप्रमाणेच संपूर्ण प्रभात फेरीत मी फक्त तोंडात बासरी ठेऊन इतरांच्या वादनात मिसळून फसफसा फक्त हवा सोडत असे पण कोणास कधी कळले नाही. गुरुजी जर मधेच समोर आले की स्वतःच्या नाकाच्या शेंड्याकडे बघत इतरांच्या वादनात स्वतःची बासरी सिंक करत माझी #म्युट बासरी अगदी तन्मयतेने राष्ट्रगीत ,व मार्चिंग संगीत वाजवण्याचा हुबेहूब अभिनय करत असे.

मुद्दा हा आहे की असेच लोक पुढे जाऊन "जस्टीन बिबर " होतात.

*AdventureOfTinTin-Justin*

#आपला_तो_अज्या_दुसऱ्याच_तो_जस्ट्या

No comments:

Post a Comment