Wednesday 21 March 2018

रात्री उशिरा आलेला प्रीती संदेश

तीन दिवसांपूर्वी रविवारी रात्री 12 च्या जवळपास ‘तिचा’ मेसेज आला!
माझ्या हृदयात लाडू फुटलेत.
“तुला एक विचारायचंय..माझा खूप गोंधळ होतोय. काही कळेनासं झालंय मला..शेवटी न राहवून तुलाच विचारावंसं वाटलं म्हणून इतक्या रात्री मेसेज करतेय! “

माझं हृदय बगीचा बगीचा झालं…
मनातल्या मनात मी “अगं हो प्रेमॉलॉजीच्या पहिल्या धड्यात प्रेमीरुग्णाचा प्रथम पायरीवर मानसिक गोंधळ उडतो हेच लक्षण सांगितलंय!
आहहा! फायनली, वो घडी आ गयी आ गयी!
फ्रेंझोन्ड च्या दुष्टचक्रातुन सुटका होऊन माझी गुढीपाडवा ‘लवशीप’ बम्पर लॉटरी लागली तर!

“अब हमे ये दोस्ती रिश्तेदारी में बदल देनी चाहीये!” हा विचार शेवटी ती करायला लागली तर!!!!
या सर्व विचारांच्या मैफिलीत,  वसंत ऋतूतील आंब्याच्या झाडाप्रमाणे मी ही मोहरून गेलो..

“हा! विचार ना!”
मी अगदी भावनांच्या आवेगावर पूर्णपणे संयम राखत मी त्या गावचाच नाही दाखवत इतकंच विचारलं.

“तू प्लिज हसण्यावारी लाईटली घेऊ नकोस..प्लिज कोणाला सांगू नको आपल्या बोलण्याबद्दल! मी खूप सिरीयस आहे याबाबत..खूप विचार केल्यावरही काही कळेना म्हणून तुला विचारतेय..! ”

“अगं गोडूले मीही खूप सिरिअस आहे अगदी आयसीयूत आहे. “आय सी यु एव्हरी डे!”
मनातल्या मनात असं कारंजं उचंबळून येत,
“हो हो विचार तू बिनधास्त!” मी फक्त असा एक वाक्यात रिप्लाय केला.

काही क्षण शांतता. “typing.. असं काही क्षण दिसत राहिलं.. त्यासोबत तीन डॉट्स नागमोडी लयीत खालून वर वरून खाली एकाच जागी जात होते..
इकडे माझ्या हृदयाचा भावनांचा ईसीजीचा ग्राफही तसाच वरखाली होत होता.
आहह जणू माझी पहिली प्रेम कहाणी नियती ‘Typing’ करत होती..

काही क्षण वाट बघून तिचा मेसेज आला. मी शरीराचे मोराप्रमाणे सहस्त्र नयन करून तो वाचला…आयुष्यातील पहिला “प्रीती संदेश” समजून..

“मला सांग आज फायनल मॅचमध्ये विजय शंकर 19.5 व्या म्हणजे लास्ट बट वन बॉलवर आऊट झाला ना! मग त्याच्या जागी नवा येणारा बॅट्समन का स्ट्राईक वर आला नाही , दिनेश कार्तिक कसा काय आला? तो तर विजय शंकर बॅटिंग करताना दुसऱ्या एंडला, नॉन स्ट्राईकला होता! मग शेवटचा बॉल ,दिनेश कार्तिक कसा काय खेळला?”

कोणीतरी निर्दयीपणे हृदयाचा झालेला हिरवागार बगीचा रपारप उपटून काढतंय असं मला झालं.

साला उगाच क्रिकेटवर अति लिहितोय!

शहर बचाते बचाते मोहल्ला जला डाला!

मरो ते क्रिकेट !

पण आता काय करणार होतो .
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी!
तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं होतं.
तिला क्रिकेटमधील एक नियम माहिती नव्हता.
तो एक महत्त्वाचा  नियम तिला समजावून सांगितला.

जेव्हा बॅट्समन कॅच आऊट होतो, तेव्हा बॉल हवेत असताना , कॅच पकडायच्या आत जर
दोन्ही बॅट्समन म्हणजे शॉट मारणारा  आणि नॉन स्ट्राईकवरील बॅट्समन एकमेकांनी खेळपट्टीच्यामध्ये क्रॉस केलं असेल किंवा नॉन स्ट्रायकर बॅट्समनने अर्धी खेळपट्टी पार केली असेल  तर तो नॉन स्ट्राईकला असणारा बॅट्समन स्ट्राईक येतो.
नवा येणारा बॅट्समन आऊट झालेल्या बॅट्समनच्या जागी स्ट्राईकला न खेळता नॉन स्ट्राईकला  जातो.

त्यामुळे आज विजय शंकरने उंच शॉट खेळून तो बाऊंडरीवर कॅच आऊट झाला खरा पण कॅच फिल्डरने पकडण्याच्या आत कार्तिकला अर्धी पिच क्रॉस करता आली. म्हणून दिनेश कार्तिक शेवटचा बॉल खेळू शकला!”


“ ओहहह असं होय का!
म्हणजे आज जर विजय शंकर किपरच्या हाती किंवा जवळच्या फिल्डरच्या हाती  कॅच देऊन आऊट झाला असता तर त्यावेळात दिनेश कार्तिकला पिचचा मध्य क्रॉस करताच नसता आला. मग शेवटचा बॉल नवा बॅट्समन खेळला असता! दिनेश कार्तिक खेळलाच नसता! आणि आपण फायनल जिंकलीच नसती! काय सांगतोस काय?!!!!
बरं झालं देवा त्याने आऊट होता होता दिनेश कार्तिकला स्ट्राईक मिळवून दिली!”

“हां किती हुश्शार गं ती बयो! बरोबर बोललीस! फक्त प्रेमॉलॉजीमध्ये ढ राहिलीस!” मी मनातल्या मनात चरफडत म्हणालो.
“जा कर आता पीएचडी त्या क्रिकेटमध्ये!”
मात्र माझं हे नैराश्य मनातल्या मनातच.

“बरं चल थंक्यु हं! झोपते मी आता! मला माझं उत्तर मिळालं!  नवीन वर्षाच्या शुभेच्छा! बाय! गुड नाईट स्वीट ड्रिम्स!”
पोरगी ऑफ लाईन गेलीसुद्धा.

इकडे नाझी अवस्था मात्र बांग्लादेश क्रिकेट टीमसारखीच झाली होती.
शेवटच्या क्षणापर्यंत मी अति आनंदात अतिआत्मविश्वासात नागीन डान्स करत होतो.
🐍 फूस…$$ फुस्स $$$ 🐍 फूस्स् फुसस फुसस $$$🐍  

पण शेवटी फुस्सस्सस्सस्सस्सस्ससस~~~~~~~~~नागोबा झोपला.

ओमफस स्वाहा!

-अभिजीत पानसे

No comments:

Post a Comment