श्रीदेवी असो वा माधुरी दीक्षित , यापैकी मला कोणीच आवडलं नाही. कारण या अभिनेत्री जेव्हा पूर्ण जोमात होत्या तेव्हा मी मुव्हीबाज व्हायचो होतो. टीव्हीवरील ढिश्यूम ढिश्यूम् मुविज फक्त आवडायच्या.
शाळेत पहिली हिरोईन आवडली ती जुही चावला.
आवडत्या जुही चावलाने गुलाब गॅंगमध्ये माधुरी दीक्षितला खाऊन, गिळून टाकताना बघताना फार आनंद झाला होता. आपली जुही अजूनही मस्त अभिनय करते हे बघून.
लहानपणी व्हीसीयारवर मिस्टर इंडिया बघितला. तेव्हा तो सगळ्यात आवडता चित्रपट होता. पण त्यालाही कारण “जादूची घड्याळ” होती. भोळा सांब अनिल कपूर होता. आणि जादूगार के लाल हातात घालायचा तसा अंगठ्या घालणारा मोगॅम्बो होता.
सलमान खानसोबतचा एक चित्रपट डीडी नॅशनलवर बघितला होता. ज्यात ती परी की काहीतरी असते. आणि छोट्या मुलाला मोठा सलमान खान करते. तेव्हा तो या जादूगिरीमुळे सिनेमा आवडला होता.
लहानपणी यात्रेत “खुदा गवाह” बघितला. तेव्हा निळ्या कपड्यात “तू ना जा मेरे बादशहा…” म्हणणारी श्रीदेवी बघितली..त्यावेळी ती प्रथम आवडली. मागे हिमालय..आजूबाजूला शुष्क प्रदेश.. धिप्पाड अमिताभ रुबाबात घोडा हाकतोय आणि श्रीदेवी उंचावरील ठिकाणावरून “एक वादे के लिये..एक वादा तोड दे..”
वाहह !
त्यानंतर खुदा गवाह अनेकदा बघितला. मग श्रीदेवीचा अभिनय समजत गेला. एक दाक्षिणात्य मुलगी अफगाणी वाटलीय हेच सगळ्यात महत्वाचे.. खुदा गवाहतील तिची एन्ट्री! अमिताभ सोबत तिची केमिस्ट्री ! तिचं स्ट्रॉंग कॅरॅक्टर! तू मुझे कबूल मैं तुझे…” हे लग्नाच्या रात्रीचं गाणं. तिचं नितळ सौंदर्य…
डबल रोल करताना दोन्हीही भूमिका अगदी वेगळ्या साकारल्याय..कुरळ्या केसांची अफगाणी..स्टेपकट मॉडर्न मुलगी.. त्यातील नागार्जुनसोबतचं '..तेरी वतन की कहानीया” लाल शिफॉन साडीतील तिचं सौंदर्य… श्रीदेवीने घोड्यावरील जे शॉट दिलेत, रुबाबदार ती जी दिसलीये त्याला तोड नाही. अमिताभला पूर्ण टक्कर दिलीये. शेवटच्या दृश्यात दोघे जेव्हा दोन घोड्यांवर जातात, तेव्हा जणू श्रीदेवी ही काही हिरोला फक्त कॉम्प्लिमेंट करणारी हिरोइन नाही तर स्वतन्त्र एक मोठी अभिनेत्री आहे. हेच जणू त्यातून तिने स्पष्टपणे सांगितलंय.
पुढे यशराज चोप्रा आणि शिफॉन साडी हे समीकरण श्रीदेवीपासूनच तयार होत गेलं. चांदनीतील तिचं ऋषी कपूरसोबतचं लाल शिफॉन साडीतील एक गाणं..नितळ सौंदर्य काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण त्यातील श्रीदेवी.
हात पाठीमागे नेऊन दोन खांदयांची मूव्हमेंट ..ही नव्वदीच्या काळातील हिंदी चित्रपटातील गाण्यातील खास ठरलेली कोरिओग्राफी, शैली श्रीदेवीनेच सुरू केली. दिव्या भारतीही ते हमखास करायचीच.
मिस्टर इंडिया पुढे अनेकदा बघितल्यावर ,” काटे नही कटते ये दिन..रात …” यातील ती जणू पिघळलेला नीलम, जलपरी ..!
तिचं फिरोजा शिफॉन साडीतील ओलेतं आरस्पानी सौंदर्य बघितलं. चित्रपटात गर्ल अॅट नेक्स्ट डोअर भूमिका असतानाही त्या गाण्यात ती पूर्णपणे मादक , अस्सल जातिवंत स्त्री सौंदर्याची सम्राज्ञी दिसली. कुठेही व्हल्गर “वॉना बी”..वा अट्टाहास त्यात वाटला नाही.
ते गाणं श्रीदेवीने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय.
फिरोज खानसोबत “हर किसिको नही मिलता..” कॅमिओ करताना ते गाणं ऑल टाईम हिट करून ठेवलंय.
“चालबाज” मध्ये तिने कुठेही “सीता और गीता”मधील हेमा मालिनीची आठवण येऊ दिली नाही. हे तर खरं शिव धनुष्य होतं. एका सुपरहिट चित्रपटाचा; सुपरहिट अभिनेत्रीने काम केलेल्या सिनेमाचा रिमेक..पण तिने हेही शिवधनुष्य पेलेलं. चालबाजमध्ये सनी देवल आणि रजनीकांत हे खरोखर सपोर्टिंग ऍक्टर्स वाटलेत.
हिरोंचे, व्हिलन्सचे डायलॉग्स , वन लायनर्स हिट होतात. पण चालबाजमधील श्रीदेवीने म्हटलेला ‘बलमा’ आजही प्रसिद्ध आहे.
'लाडला'मधील तिचा "यु अंडरस्टॅन्ड यु बेटर अंडरस्टँड" हा फेमस डायलॉग त्या काळात कित्येकांच्या तोंडी होता.
'नगीना' तिने आणि अमरीश पुरी दोघांनी मिळून हिट केला. 'निगाहे' ही लहानपणी आवडला होता.
त्यानंतर श्रीदेवी आवडली “आखरी रास्ता” या दाक्षिणात्य रिमेक चित्रपटात. त्यात तिचा नेहमीप्रमाणे गर्ल अॅट नेक्स्ट डोअर हाच रोल होता. पण त्यातील किडनॅप झाल्यानंतरचा तिचा अमिताभसोबतचा सीन आवडतो.
बऱ्याच वर्षांनी क्लिक झालं की आखरी रस्तामधील श्रीदेवीचा आवाज श्रीदेवीचा नसून 'रेखाचा' आहे.
त्या काळात श्रीदेवी की माधुरी या दोघींपैकी “#लेडी_अमिताभ” कोण? यावर नेहमी चर्चा व्हायची.
नंतर श्रीदेवीने काही सुमार चित्रपटही केलेत. डाकू वगैरे बनण्याचा त्या काळात ट्रेंड होताच.
“रूप की रानी चोरो का राजा” चित्रपटातील तिचा चायनीज जादूगार.. चिंचपोकली..डोंगरी वडाला...सीन आणि रस्त्यावरील अनिल कपूरसोबतचा विनोदी सीन फार आवडले होते. पण तो चित्रपट वाईट आपटला.
'सदमा' तिचा बघितला नाही. सदमा आणि "चौकट राजा" चित्रपट मी मुद्दाम लहानपणी बघितले नव्हते. कारण त्यातील दुःखाचा परिणाम माझ्या मनावर व्हायचा.
अनेक वर्षांनी श्रीदेवीला इंग्लिश विंग्लिशमध्ये बघितलं . त्याबद्दल काहीच बोलण्याची गरजच नाही. गौरी शिंदेने श्रीदेवीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. सेकंड इनिंगची सुरवात झकास झाली.
पण याच श्रीदेवीने 'पुली' नावाचा एक दक्षिणात्य चित्रपट एका नमुना दाक्षिणात्य ‘स्टार’ सोबत केला. श्रीदेवी आहे म्हणून बघायला गेलो होतो. पण इंग्लिश विंग्लिश करणारी हीच का ती श्रीदेवी असा प्रश्न तो थर्ड क्लास सिनेमा बघताना पडला. या वयात श्रीदेवी असा महामूर्खपणा करू शकते याचं आश्चर्य वाटलं . अर्ध्यातुन बाहेर आलो होतो.
पुढे 'मॉम' केला. त्यात नवाजुद्दीन आणि श्रीदेवीने मस्त काम केलं. चित्रपट 'लाऊड' न केल्याने आवडला.
लेडी अमिताभ कोण, यावर वाद करण्यात लोक गुंग असताना श्रीदेवी मात्र एकाहून एक भूमिका करत गेली.
शेवटी काय तर , ती आली..तिने बघितलं.. तिने शॉट दिला.. ती जिंकली..त्या सूत्रधार ’डायरेक्टर’ने “कट इट” म्हणून व्हेरी गूड शॉट म्हटलं..आणि तिने “पॅक अप” केलं.
-Abhijeet Panse
No comments:
Post a Comment