Thursday 25 May 2017

"बाधीत"


माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या पुढील गूढ घटनेमुळे, अनुभवामुळे कोणाच्याही व्याधीसंबंधित वा अतींद्रिय अदृश्य शक्तीच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या विश्वास / अविश्वासासंबंधित वा अनुभवांसंबंधित भावना दुखवल्यास तसा माझा उद्देश नव्हता असे समजावे..फक्त सोशिअल अवेरन्स साठी मी हा स्वतः अनुभवलेला अनुभव, घटना सांगतो आहे. घटना थोडी मोठी आहे.


'#अस्तू' चित्रपटात मोहन आगाशे तंद्रीत घर सोडून निघून जातात, त्याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपासून माझी एक मैत्रीण सतत तंद्रीत राहायची तिच्या घरच्यांना प्रथम हे लक्षात आलं नाही.पण दोन दिवसांपूर्वी घरातून दुपारी ती अचानक गायब झाली.सगळीकडे शोधाशोध सुरु झाली पण ती दिसली नाही. तिचा फोन घरीच होता.पोलिसात तक्रार करण्याचंही ठरवलं पण तरुण मुलीचं नाव खराब होऊ शकेल म्हणून काही तास वाट बघण्याचं ठरवलं.


घरच्यांनी तिच्या सर्व मित्रमैत्रिणींना फोन करणं सुरु केलं. आम्हाला कळल्यावर मी आणि माझा मित्र सुद्धा तिला शोधू लागलो. पण ती न सापडल्याने नक्की काय झालं जाणून घ्यायला काळजीत तिच्या घरी गेलो.


तिच्या घरच्यांनी जी माहिती सांगितली त्यावरून आम्ही विचारात पडलो. गेल्या काही दिवसांपासून ती सतत तंद्रीत जायची. जेवताना , टीव्ही ,लॅपटॉप कडे बघत स्वतःशीच हसायची. तिचं बोलण्यात काही विचित्र , अनाकलनीय शब्द यायचे. भाषा कळायची नाही. मला आठवलं की फोन वर आणि प्रत्यक्षातही ती असेच मधूनच काही विचित्र शब्द बोलायची. पण तिच्या आईने पुढे जी सहज माहिती सांगितली ती किती महत्वाची याची कल्पना नव्हती.


तिच्या आईने सांगितलं की ती वीसेक दिवसांपूर्वी दिवसभर शहराबाहेर पिकनिक आणि चित्रपट बघायला जातेय म्हणून गेली होती आणि रात्री नऊ वाजता घरी आली. तेव्हापासून ती विचित्र वागु ,असंबद्ध बोलू लागली सांगितलं.


काही जागा 'बाधित' असतात असे वृद्ध, अनुभवी लोक सांगतात ..पण माझा कधी विश्वास बसला नाही. मी तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि त्या दिवशी नक्की काय झालं होतं विचारलं. ती सांगू लागली , ते सर्व जण 28 एप्रिलला भर कडकडीत माध्यान्ही शहराबाहेरील तलावाकाठी पोहचले. तिथे खाणं झालं आणि संध्याकाळी चित्रपट बघून प्रत्येकजण आपापल्या घरी परत गेले.


मी तिला पुन्हा विचारलं नक्की आठवून सांग 'ती' सतत

तुमच्यासोबतच होती का..त्या दिवशी काही वेगळं घडलं होतं का!

तिच्या मैत्रिणीने आठवुन तपशीलपूर्वक सांगितलं की 'तिला' दुपारी एक फोन आला होता आणि आम्ही सर्व बसून गप्पा करत खात असताना ती फोन वर बोलत चालत तलावाकडे गेली. तिकडे झाडी होती .त्या निर्मनुष्य भागात त्या बाजुने एक पडकी इमारत होती. जवळ कठडा नसलेली विहीर होती.पण फोनवर बोलत ती त्या बाजूनं गेल्याने दृष्टीआड होऊन आम्हाला दिसू शकली नाही.


पंधरा मिनिटाने ती परत आली.मग आम्ही ग्रुप्स फोटोज , सेल्फीज काढलेत आणि परत निघालो. तिचं मात्र कशातच लक्ष नव्हतं. परत येताना आम्ही चित्रपट पहिला आणि घरी पोहचलो.

हे ऐकून मी विचारात पडलो.खरंच लोक म्हणतात की पडक्या इमारती, काही जागा या नकरात्मक शक्तीने भारीत असतात. हे सत्य असेल का?

एकंदर एक गोष्ट नक्की की जे काही तिच्यासोबत झालं होतं ते 'त्या ' दिवशी त्या पिकनिक मुळे झालं होतं.

तिच्या घरचे काळजीत होते.त्यांचे सतत फोन करणे सुरु होते. आम्ही दोघे पुन्हा तिला शोधायला बाहेर पडलो.


आम्ही जिना उतरत होतो तेव्हा माझ्या डोक्यात अचानक विजेसारखा एक विचार चमकून गेला. बरेचदा अंतर्मनातून एक साद येते आणि ती अचूक निघते हा अनुभव खूपदा येतो. मी पुन्हा वेगाने वर तिच्या घरात गेलो. तिच्या घरच्यांना विचारलं की तिचा लॅपटॉप कुठे आहे. आम्ही तिच्या खोलीत गेलो. आत गेल्या गेल्या मला जरा वेगळं काहीतरी जाणवलं. तिचा लॅपटॉप उघडला. नशीब त्याला पासवर्ड नव्हता!

आणि मला धक्का बसला. तिच्या लॅपटॉप मध्ये जे व्हिडीओज होते ते पाहून मला प्रचंड धक्का बसला. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता. ते सर्व व्हिडीओज गेल्या वीसेक दिवसात तिने डाउनलोड केले होते.


"ब्लु व्हेल" गेमबद्दल ऐकलं होतं पण तो इथपर्यंत पोहोचेल माहिती नव्हतं. मला थोडी शंका या ब्लु व्हेल गेमची होती की कदाचित ती या विळख्यात तर अडकली नव्हती ना!

पण नाही तसं काहीही नव्हतं. तिच्या लॅपटॉपमधील ते व्हिडीओज आणि बरेच फोटोज बघून मला धक्का बसला! त्याक्षणी मला एक नैसर्गिक इन्स्टिक्ट दाटून आलं. मी काही आडाखे मनाशी बांधू लागलो.

आणि तत्क्षणी घाईत मित्राला घेऊन बाहेर पडलो. कदाचित माझा अंदाज खरा होता. जे काही झालं ते त्या दिवशी घडलं होतं.

कदाचीत मला अंदाज होता ती तेव्हा कुठे असावी!


...


मला ती जागा दिसली. तिथे भव्य इमारत होती. आजवर फक्त पडक्या इमारती, निर्मनुष्य भागातील विहिरी, निर्मनुष्य जागा नकारत्मक शक्तींनी भारित असतात सांगितले, वाचले होते. पण मोठ्या शहरात आजूबाजूला लोकवस्ती,रहदारी अश्या गजबलेल्या ठिकाणीही काही जागा बाधित असू शकतात , लोकांना बाधा होऊ शकते याची तिळमात्र कल्पना त्या दिवसापर्यंत नव्हती. त्या दिवशीपर्यंत कितीतरी वेळा 'त्या' इमारतीजवळून गेलो होतो.बघितली होती. पण आज पाहिल्यांदा 'त्या' इमारतीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला होता. मनावर दडपण होते.

खरंच आत्मा, भूतबाधा या गोष्टी अस्तित्वात आहे का यांचं उत्तर मिळालं नव्हतं. पण त्या दिवशी पाहिल्यांदा तो अनुभव ,उत्तर मिळणार होतं.


आम्ही घाईत गाडी पार्क करून वेगाने त्या बिल्डिंगच्या आत शिरलो. वरच्या मजल्यावर गेलो. 'तो' दरवाजा फक्त लोटला होता. एक लांब श्वास घेऊन हिंमतीने , निग्रहाने आत शिरलो. आत अंधार होता. भर उन्हाळ्यातही त्या अंधारामुळे , दडपणामुळे , अनामिक भीतीमुळे आत शिरल्या थंड लहर अंगावरून गेली.


मोबाईलचा टॉर्च लावून तिला आम्ही शोधू लागलो. माझं अंतर्मन सांगत होतं की ती इथेच भेटणार. आणि त्याक्षणी माझं लक्ष वर गेलं..


तिथे 'ती 'बसली होती.


दृष्टी माझ्याकडे होती. चेहऱ्यावर जणू भक्ष मिळाल्याचं स्मित झळकत होतं. तिला बघून आनंद झाला. आम्ही तिच्याजवळ गेलो. आणि तोवर जी गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती ती तेव्हा कळली. तिची दृष्टी माझ्यावर रोखलेली नव्हती तर समोर होती.मी तिच्या शेजारी उभा राहिलो माझ्या जवळ मित्र उभा . तरी तिचं लक्ष नव्हतं. मी हळूच तिच्या खांद्याला हलवलं, नाव घेऊन बोललो ".... तू इथे एकटी काय करतेयेस!'आम्ही किती शोधतोय तुला!




ती तरीही स्थिर. दृष्टी समोर.

मी पुन्हा तिला थोडं हलवलं.

तिने गर्रकन माझ्याकडे मान फिरवली. मागून अधून मधून येणाऱ्या अस्पष्ट प्रकाशात तिचा चेहरा मी बघितला. एक क्षण तिच्या नजरेत काहीही भाव नव्हते. आणि दुसऱ्याच क्षणाला तिच्या नजरेत अंगार होता..जणू तिच्या आनंदात मी अडथळा आणला होता. पुढे जे घडलं ते मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.


ती माझ्या अंगावर त्वेषाने उसळून आली !माझा गळा दाबू लागली ! आणि जोरदार किंचाळून बोलली,

"भल्लालदेव मी तुला मारून टाकेन! माझ्या बाहुबलीला धोक्याने मारलंस! माझा महेंद्र बाहुबली येईल! मी तुला संपवणार ! मी तुला आता सोडणार नाही!"


हे तिचं रूप बघून मी गार पडलो! तिला तिच्या नावाने हाक मारू लागलो तशी ती ओरडली " मी ... नाही! मी देवसेना आहे! कुंतल राज्यची राजकन्या! अमरेंद्र बाहुबलीची बायको!" पुन्हा माझा गळा जोराने दाबू लागली!

माझा मित्र हे तिचं भयंकर रूप बघून घाबरून काही पावलं मागे सरला! तसं तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं.

मला सोडून त्याच्याकडे उसळत ओरडली " सेतुपती!! तू जिवंत कसा! मी तुझे बोटं कापलीत ! माझ्या अमरेंद्र बाहुबलीने तुझा गळा चिरला! तरीही तू जिवंत! ठार मारतेच तुला आज!" आणि एका बाजूला बघत कोणाला तरी हाक मारून बोलावू लागली " कटप्पा! कटप्पा!! लवकर ये! आणि तेलुगूत काहीतरी बोलू लागली "


आम्ही दोघेही तिचे ते रुप बघून थरथर कापू लागलो. तेवढ्यात कोणीतरी ओरडला. मला वाटलं ती ज्या कोण्या कटप्पाला बोलावतेय तो आला की काय!!

" ये बाहर जा के झगडा करो यार! हमको तो पिच्चर देखने दो! साला ब्लॅक मे तिकिटे खरिद के बाहुबली देखने आये है! "


आमच्यामुळे इतरांना बाहुबली सिनेमा बघताना अडचण होतेय, सगळे लोक आमच्याकडेच बघताहेत हे बघून मी ओशाळुन तिला जबरदस्तीने पण तिला सांभाळत सिनेमा हॉल च्या बाहेर घेऊन आलो. तिचं मात्र " मी देवसेना आहे मला सोड ,भल्लाळ सोड मला भल्लाळदेव! मी देवसेना आहे! मी तुला मारेन! "आणि पुन्हा पुन्हा कटप्पा कटप्पा म्हणत कोणाला तरी हाक मारत होती!


बाहेरच्या व्हरांड्यात आल्यावर तिला खांदे धरून हलवू लागलो ..शेवटी बॉटलच्या पाण्याने तिच्या चेहऱ्यावर हबकारे मारले. तशी ती थोडी भानावर आली. मी तिच्या दोन्ही कानात जोरजोराने फुंकर मारली ! "बाहुबली फट स्वाहा! " ती तरीही अस्वस्थ होतीच.

" बस बस झालं ..गेलं गेलं ..जे काही होतं ते गेलं..बस शांत हो ... आता! काही नाही ..काही नाही झालं!"

तिच्या पाठीला थोपटू लागलो.


ऑटोमध्ये बसवून तिला तिच्या घरी आणलं. रस्त्यात कुठेही तिला बाहुबलीचं पोस्टर दिसू नये म्हणून काळजी घेतली.


तिच्या लॅपटॉपमध्ये 'प्रभास' चे सर्व व्हिडीओज, इंटरव्युज, त्याचे सर्व जुने चित्रपट , बाहुबली संबंधित डाऊनलोड केलेले व्हिडीओज विडिओज बघितल्यावरच मला संशय आला होता. '#कॅप्शन' नसलेले तेलुगु , तामिळ सर्व व्हिडीओज ती काही दिवसांपासून बघत होती 29 एप्रिल ला शनिवारी ते पिकनिक ला गेले होते.बाहुबली 28 एप्रिल ला रिलीज झाला होता. त्यामुळे माझा संशय बळावला होता.


त्या दिवशी पिकनिकहुन आल्यावर बाहुबली त्यांनी बघितला आणि तिथूनच तिला '#प्रभासची ' बाधा झाली. सर्व चित्रपटगृहे सध्या प्रभास बाधित आहेत. बाहुबलीच्या भुताने पछाडलेले आहेत.

म्हणूनच घराजवळील एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये ती सापडेल माझा कयास होता. असो कुठल्या भागात, पडक्या इमारतीत, विहिरीत काही भुतं खेत नसतं ! असेल तरी ते बाहूबलीच्या या भुतासमोर काही नाही हे कळलय. सध्या घरातील पोरी बळींची काळजी घेणे गरजेचे आहे.

मला ओरडून विचारावं वाटत होतं त्या प्रभासला अरे अजून किती पोरींना आपल्या नादी लावशील रे!


असो सध्या तिला घरी ठेवलय. दरवाजे खिडक्या बंद ठेवल्या आहेत. टीव्हीवर वा कुठेही बाहुबली वा प्रभास दिसू नये याची काळजी घेतली जातेय.


आणि हो एक सांगायचं राहिलं जे मी तिच्या घरच्यांना सांगितलं नाही, की त्या दिवशी ती पिकनिकला गेली असताना माझाच तिला फोन आला होता. माझ्याशीच बोलत ती तिकडे चालत गेली होती.



-अभिजीत पानसे.

No comments:

Post a Comment