Saturday, 27 May 2017

शिवाजी महाराज आणि विनायक सावरकर

शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यात नेहमी काही बाबतीत एक साधर्म्य आणि त्या संबंधित एक महत्वाचा फरक जाणवतो.
शिवाजी महाराज प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्र्यासाठी लढले.सावरकरही स्वातंत्र्यासाठी खऱ्या अर्थाने लढलेत.

महारांजांची "आग्र्याहून सुटका" ही बुद्धी,धैर्य, दक्षतेने परिपूर्ण होती तशीच सावरकरांची बोटीतून सुटका ,"मार्सेलिसची उडी" ही त्याच गुणांनी परिपूर्ण!

शिवाजी महाराजांनी तत्कालीन फारसी, तुर्की, अरबी शब्दांनी भेसळ झालेली मराठी भाषा शुद्ध केली.रघुनाथ हणमंते यांच्याकडून भाषा शुद्ध करून राज्यभाषा व्यवहार कोष निर्माण करून घेतला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही आंग्ल भाषेची सरमिसळ झालेली तत्कालीन मराठी भाषा शुद्ध करण्यासाठी पर्यायी मराठी शब्द दिलेत.'प्राचार्य' , अध्यापक, प्रपाठक, इ. मराठी शब्द सुचवलेत.

दोघेही महान द्रष्टे होते.शिवाजी महाराजांनी टोपीकरांबद्दल(इंग्रजांबद्दल) आधीच दक्षतेचा इशारा दिला होता.
सावरकरांनीही मुस्लिम लीग ची निर्मिती झाल्यावर तिचा मूळ उद्देश आणि परिणामाबद्दल सतर्क राहण्यास संगीतले होते.

पण या दोन्ही स्वातंत्र्यवीरांमध्ये फरक होता की शिवाजी महाराजांना नियती अनुकूल होती.खऱ्या अर्थाने त्यांचं यश ही श्रींची इच्छा होती.पण सावरकराना मात्र दैव सतत प्रतिकूलच राहिले.महाराजांकडे मनुष्यबळ होते प्रामाणिक साथीदार होते. सावरकराना मात्र दु:स्वासच अनुभवावा लागला.

महाराजांची आग्र्याहून सुटका यशस्वी झाली पण सावरकरांनी बोटीतून सुटका करून घेऊनही नियतीची साथ नसल्याने त्याना काही वेळातच पुन्हा अटक झाली.

खऱ्या अर्थाने सावरकरांना शिवाजी महाराज समजले होते म्हणूनच सावरकरांनी "हे हिंदुशक्तीसंभूत दिप्तीतम तेजा हे हिंदूनृसिंहाप्रभो शिवाजी राजा .."शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं.

शिवाजी महाराजांचे कर्तृत्व ,संघर्ष, यश यांना समाजाकडून ,देशाकडून स्वीकार्यता प्राप्त झाली आहे.सावरकर मात्र इथेही दुर्दैवी ठरलेत.आजही त्यांचा फक्त राजकीय कारणासाठी ,पूर्वग्रह दूषित ठेऊन, त्यांच्यावर फक्त अन्यायच केला गेलाय.त्यांचं चरित्र अजूनही समाजाकडुन "काळ्या पाण्याची" शिक्षा अनुभवत आहे.





-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment