Thursday 28 December 2017

धक्कादायक अनुभव नाशिकच्या नवरा बायको परिक्रमावासींचा, नर्मदे हर

अंतिम भाग

  अंतिम भाग


संध्याकाळी खाली नर्मदेवर स्नानास गेलो त्यादिवशी पाण्यात उतरताना मगरींचं भय वाटलं नाही. नर्मदेत मगरी आहेत हे गावात प्रवेश करतानाच पाटीवर लिहिलंय. रोज नर्मदेत उतरताना मी तिथल्या कोणालातरी मगरींबद्दल सुरक्षिततेबद्दल विचारयचोच. ते सांगायचे की या भागात वर्दळ असल्यानेइकडे मगरी नाही येत, दुसया तीरावर आहेत. त्यामुळे तरीही नदीत उतरताना थोडंसं कॉन्शियस असयचोच. रोजच्याप्रमाणे तो माणुस आला; त्यांना सांगीतलं उद्या परत चाललोय.

शेवटचा दिवस म्हणून त्या दिवशी घाटावर बराच वेळ बसलो. वर नेहमीप्रमाणे चढत्या क्रमांकाने आरती झाली.
मी आरतीला गेलोच नाही.
 आठ वाजता वर वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या समाधी मंदिरात गेलो.

प्रदक्षिणा घालताना खाली प्रवाहात सोडलेले दिवे दिसत होतेच.

मंदिरात पुजारी आणि त्यांच्या पत्नीसोबत एक नवरा बायको जोडपं बोलत होतं. मी पाच मिनीटं तिथे बसुन जेवायला जाणार होतो. पण कानावर पडणाऱ्या शब्दांवरून ते परिक्रमावासी आहेत कळलं आणि काहीतरी महत्वाचं सांगताहेत हे जाणवलं. एरवी मी कधीच कोणाशी स्वत:हुन बोलत नाही किंवा कोणी एकमेकांशी बोलत असताना त्यांच्यात स्वत:हुन मध्येच काही बोलत नाही. पण त्यावेळी त्यांचं बोलणं ऐकुन न राहवुन मी थोडं त्यांच्याकडे सरकुन बसलो आणि थोड्या वेळातच त्यांच्याशी बोलण्यात सामिल झालो.

पन्नास ते पंच्चावन त्या काकांचं वय असावं. परिक्रमेतील चालण्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावरील त्वचा रापलेली काळवंडलेली होती. एकंदर त्यांच्या शांतपणे बोलण्यावरूनच ते समंजस genuine वाटत होते. मी बोलण्यावरून बॉडी लँग्वेज वरून व्यक्ती फेक..खोटं बोलतेय की genuine याचा अंदाज प्रथम घेत असतोच. ते नाशिकचे होते पवार आडनाव होतं. शाळेत शिक्षक होते. आणि अत्यन्त समंजसपणे, शांतपणे सगळं सांगत होते.

 त्यांना अवघडलेलं वाटु नये म्हणुन, त्यांना कळणार नाही, अशा पद्धतीने  सेल कॅमने त्यांचं बोलणं शुट करू लागलो.

ते दोघे 2 महिन्यापूर्वी परिक्रमेला निघाले होते. त्याचीही एक गंमतीदार गोष्ट होती. मुळात पहिले फक्त ते काकाच परिक्रमा करणार होते. त्यांनी सांगितलं ''माझी खुप इच्छा होती की आम्ही दोघांनी सोबत परिक्रमा करावी. पण हिच्या गुडघेदुखीमुळे ही घराच्या बाहेरही पडत नाही; तर परिक्रमा कशी करणार! त्यामुळे ते काकाच ओंकारेश्वरहुन परिक्रमा सुरू करायला निघाले.

 त्यांची पत्नी मुलगी आणि त्यांचा जावई छोटा नातू हे त्यांना ओंकारेश्वर पर्यंत सोडायला आलेत. तिथुन दुसऱ्या दिवशी ते सुरु करणार होते. दुसऱ्या दिवशी ते परिक्रमेला जाऊ लागलेत, तेव्हा त्या काकू रडायला लागल्यात, की पुन्हा त्याना बघायला मिळेल का.
 त्या काकांनी म्हटलं चलतेस का तु? त्या काकु 'हो' म्हणल्या आणि अंगावरच्या कपडयनिशी निघाल्यात!

 दोन महिन्यांनी ते शुलपाणी च्या जंगलपर्यंत आलेत. जंगलाबाहेरून डांबरी रस्त्यानं न जाता पारंपरिक शुलपाणी झाडी मार्गाने निघाले. कमीत कमी आठ दिवस जंगलातून बाहेर पडायला लागणार. आत मोबाइल फोनला रेंज नसणार.. खायला प्यायला मिळेल की नाही माहिती नाही..कारण गाव नाही फक्त एखादी दुसरी झोपडी जंगलात मिळण्याची शक्यता  होती. सोबत अस्वल आणि इतर जंगली प्राणी त्यामुळे जंगलाच्या जिवंत बाहेर पडु की नाही याची शाश्वती नसल्याने त्यांनी शूलपाणीच्या जंगलात शिरण्यापूर्वी त्यांच्या मुलीला फोन केला आणि सर्व परिस्थिती समजावून सांगितली त्यामुळे त्यांची मुलगी आणि त्या काकू फोनवर रडू लागल्या.
त्यांनी नातवाशी  कदाचित शेवटचं बोलणं म्हणुन बोलुन घेतलं. आठ एक दिवसाने जिवंत बाहेर पडलो तर फोन करून सांगितलं नंतर ते जंगलात शिरलेत पाच सहा दिवस हाल होऊन त्यांना एक झोपडी दिसली.

 दिसली त्यात एका तरुण संन्यासी राहत होता त्याने त्यांना 3 दिवस थांबवून घेतलं त्यांनाही तिथे थोडा आराम मिळाला, जेवायला मिळालं; ते काका सांगत होते.

 सुर्यास्तापूर्वीच ते जेवायचे..कारण एकदा सुर्य मावळला की झोपडीत अंधार. एक दिवस उशीर झाल्याने ते टेंभ्याच्या प्रकाशात जेवले होते. पण त्या काका काकुंचं मन लागत नव्हतं. ताण होता की तिकडे मुलीची स्थिती कशी झाली असेल. एकदा रात्री त्यांनी त्या संन्याश्याला बोलताना सांगितलं की त्यांची मुलगी त्यांच्यासाठी खुप टेन्शनमध्ये असेल. त्यामुळे त्यांचही मन थाऱ्यावर नाही.

ते संन्यासी म्हणाले की आता 2 दिवसांनी तुम्ही शुलपाणीमधुन बाहेर पडालच! तेव्हा घरी फोन करा!काळजी करू नका! तुमचा प्रवास आता सुखरूप होइल. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुढच्या प्रवासाला निघाले. तीन दिवसांनी शुलपाणी जंगलातुन बाहेर आलेत.

तेव्हा त्या काकु त्यांना म्हणाल्या की ''काय हो लोकांना शूलपाणीमध्ये कितीतरी अनुभव येतात म्हणतात. अश्वत्थामा वगैरे भेटतो म्हणे. आपल्याला तर काहीच अनुभव आला नाही!
 ''ते काका म्हणले की आपण जिवंत सुखरूप बाहेर आलो..त्या संन्याश्याने आपल्याला खाउ घातले हाच तर मोठा अनुभव आहे! चल पहिले .... ला (मुलीला) फोन कर!''

त्यांनी मोबाईलला रेंज मिळाल्याबरोबर त्यांच्या मुलीला फोन केला.आणि सांगितलं की ते सुखरूप आहेत. त्यांची मुलगी खुप टेन्शनमध्ये असणार हे माहिती होतंच. पण त्यांना ती फोनवर शांत आणि प्रसन्न वाटली.
ती म्हणाली की ''तुम्ही आलेत ना जंगलातुन बाहेर!मला दोन  दिवसापुर्वी तुम्ही ज्यांच्याकडे राहिले त्या महाराजांचा मला फोन आला होता त्यांनी कळवलं की तुम्ही त्यांच्याकडे राहिलात, आणि सुखरूप आहात!
आणि 3 दिवसांनी जंगलाबाहेर येउन फोन करतील.

ते काका काकु आश्चर्यचकीत झाले की त्या जंगलात रेंज नसताना त्यांनी फोन केला कुठुन? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काका काकुंनी त्या संन्यासी महाराजांना आपल्या मुलीचा मोबाईल नंबर तर दिलाच नव्हता! "आमचा मोबाईल तर कधीचाच आॅफ झाला होता त्यामुळे सॅकमधुन बाहेरही काढला नव्हता!!"
हे सांगताना त्यां काकुंना गहिवर दाटला होता.

दुसऱ्या दिवशी मी दहा वाजताच्या वडोदऱ्याच्या बसने निघणार होतो म्हणुन पहाटे साडेपाचला थंडीत उठलो कारण मला पुर्वेकडील दोन किमी दुर उंचावरील एका जागेवरून सुर्योदया बघायचा होता..
 मी थोड्याश्या माझ्या नेहमीच्या आवडीच्या पहाट आणि सुर्योदयापुर्वीच्या संधीप्रकाशात वेगाने निघालो. दोनेक किमी चालल्यावर एका उंच जागी पोहोचलो. तिथुन अगदी शाळेत चित्रकला विषयातील ठरलेलं चित्र जसं काढलं जायचं तसं दृश्य होतं.

 दुर अंतरावरील डोंगराआडुन नर्मदा दक्षिणेकडुन पश्चिमेकडे डावीकडे वळण घेत होती.तिच्या स्वत:च्या भल्या मोठ्या खडतर प्रवासातील हे शेवटचं वळण होतं. तिचीही शेवटची विश्रांतीची मंजील आता नजीक आली होती.समुद्र आता जवळ आला होता.लकरच काही अंतरानंतर तीही  समुद्रात स्वत:ला विसर्जीत करणार होती..तिथुन पुन्हा परतणे नाही.मोक्ष प्राप्ती!

त्या वळणाच्या पुर्वेकडे काही पर्वत होते.थोड्या वेळाने सुर्योदय झाला.सुर्य अगदी त्या दोन टेकडींच्या मधुन वर येत होता. शेजारी नदीचे वळण! अगदी शाळेतील चित्रकलेतील चित्र!
मला दिसलं की नर्मदेत एक जण नाव वल्हवत आहे. सुर्योदयाच्या केशरी आकाशाच्या पार्श्वभुमीवर ती शांतपणे चाललेली नाव! खुपच सुंदर डिव्हाइन दृश्य होतं ते.

अर्धा पाउण तासाने मी परत घाईत परत निघालो कारण तो सरदार सरोवरचा ब्लास्टिंगचा भाग होता. जागोजागी डेंजरचे बोर्ड्स लावले होते त्यावर ब्लास्ट्सचेे वेळ लिहिली होती. त्यात सकाळचीही वेळ होती.

सॅक पॅक करून दहा वाजता पुन्हा मंदिरात जाउन नमस्कार केला.नर्मदा मैय्याला पुन्हा बोलाव  म्हणुन प्रार्थना केली.आणि परत निघालो........

समाप्त.

-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment