Saturday 28 April 2018

प्राजक्ताचं फुल , ऑक्टोबर.

शास्त्रीय संगीत ऐकणे.. अनुभवणे यासाठीही कानसेन व्हावं लागतं. तो दर्जा हवा असतो. हळूहळू भिनत जातं ते संगीत मनात.. इथे इतर गाण्यांप्रमाणे श्रोत्यांचे लाड केले जात नाहीत. सहज सोपं श्रोत्यांना आवडेल ते दिलं जात नाही.

हेच समांतर चित्रपट आणि मसाला चित्रपटासंबंधी असतं. मसाला, व्यावसायिक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे लाड केले जातात. त्यांना चमच्याने भरवलं जातं.
#ऑक्टोबर हा असाच शास्त्रीय संगीतासारखा सिनेमा आहे. हळुवार शांतपणे मुरत जाणारा..

सुजित सरकारचा मूव्ही बघणे म्हणजे एक अपरिहार्य गोष्ट असते. रोजच्या धांगडधिंगा चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळं , शांत, आर्त भावनांचं चलचित्र त्याच्यात बघायला मिळतं. बहुतेकवेळा ते सकारात्मक असतं.
हा सिनेमा ही संपूर्णपणे सकारात्मक.

एक छोटीशी कादंबरी, कुठलेही भावनक्षोभ करणारी आनंदपर्यवसायी तरल कलाकृती उलगडत जावी असा शांतपणे सिनेमा अलगडत जातो.

प्रेमात ‘पडल्यावर’ मग अडचणीत ‘पडणे’ , “गर्ल मिट्स ए बॉय” आणि व्हाइस वर्सा, यावरच आजवर सर्व प्रेम कहाण्यांचा रतीब घातला गेलाय. येथे मात्र पूर्णपणे वेगळा मामला आहे.
त्यामुळे पारंपरिक प्रेमकहाणी ही नाही.

एक कोणाचीही पत्रास न ठेवणारा, काळजी न करणारा सडाफटींग फक्त तिसऱ्या व्यक्तिमार्फत, मुलीने सहज त्याच्यासंबंधीत म्हटलेलं एक वाक्य ऐकतो. त्याचाच विचार करत राहतो. आणि हळुवारपणे प्रेमात पडत राहतो. ती प्रेमाची ऊर्जा तिच्या  मनापर्यंत ही पोहचते. आणि ती ही हळूहळू प्रेमात पडते. आणि ‘शांत’ होते.

“द अलकेमिस्ट”  मध्ये एक वाक्य आहे , व्यक्ती जेव्हा कुठली गोष्ट , धातू , वस्तू शुद्ध करण्याचा प्रयत्न करत जातो त्या दरम्यान त्या वस्तुबरोबर तो सुद्धा अंतर्बाह्य शुद्ध होत जातो. मानसिक दोष नष्ट होत जातात.
येथे या मुलाबरोबर  हेच होत जातं.

समांतर सिनेमा हा ‘मास’ला सुसह्य व्हावा यासाठी विनोदाची पेरणी गरजेनुसार करावी लागते. ती शुजित सरकारने केलीय. नाहीतर हा चित्रपट ‘जड’ झाला असता. पण कुठेकुठे विनोद पेरणीत तो थोडा वाहवत गेला हे ही खरं.

वरुण धवन ही डेव्हिड धवनने बॉलिवूडला दिलेली आजवरची सर्वोत्तम भेट आहे. ( तरीही जुडवा 2 साठी त्याला माफी नाहीच.) वरुण धवनला बघणे हीच मेजवानी असते. “एक था बदलापूर’ ते ‘ऑक्टोबर’ या दोन ध्रुवावरच्या भूमिका तो सहज करू शकतो.
ऑक्टोबरमधील भूमिका त्याच्यासाठी तशी “होम पिच”च म्हणावी लागेल.

नवी अभिनेत्री ..अभिनेत्री नाही म्हणता येणार, नव्या हिरोईन ला बघणंही डोळयांना मेजवानी आहे. विशेषतः तिचे ‘अधर’.

थोडे उघडलेले अधर हे मादक दिसतात, हे मान्य. पण आता ते ‘स्टीरिओटाइप’ झालंय. येथेही सरकार वाहवत गेलेय. त्यामुळे नंतर नंतर ते बघताना विनोदी वाटू लागतं.

शुजित सरकारच्या चित्रपटाचं संगीत, गाणी हे यूएसपी असतात. ऑक्टोबरमधीलही गाणे श्रवणीय आहेत.

एस सरकार बरेचदा नवे पण रंगमंचावरील सशक्त अभिनेत्यांना चित्रपटात घेतो. ‘कास्टिंग’ हे सुद्धा  त्याच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असतं.

मद्रास कॅफेमधून त्याने प्रकाश बिल्वडी या स्वतःची वेगळी शैली असलेल्या थिएटर अभिनेत्याला संधी दिली. त्यानंतर त्यांना इतर हिंदी चित्रपटात भूमिका मिळत गेल्यात. ऑक्टोबरमध्ये “गीतांजली राव” या हिंदी रंगभूमीवरील अभिनेत्रीला त्याने चित्रपटात आईची भूमिका दिली. ही अभिनेत्री पहिला चित्रपट करतेय अशी शंकाही येणार नाही. ही आहे हिंदी रंगभूमीची ताकद. हिंदी रंगभूमी खूप समृद्ध आहे. त्याला कारण “#पृथ्वीथियटर्स” सारख्या महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. असो . तो एक स्वतंत्र विषय.

एस सरकारचा चित्रपट म्हटला की “बेंगॉली फॅक्टर” असतोच असतो. चित्रपटात कुठंतरी बंगालचं वर्णन किंवा पात्र असतंच. या सिनेमात पात्र दाक्षिणात्य आणि दिल्लीचे, कथावस्तू दिल्लीत..त्यामुळे इथे बेंगॉली फॅक्टरसाठी जागा नसताना, मुख्य अभिनेत्रीचे नाव बंगाली ठेवले. त्या नावाबद्दल दोन वाक्यही सिनेमात टाकलेत. हे मजेदार वाटलं.

सिनेमाचा शेवट आणि कथा मात्र एका मराठी चित्रपटावरून घेतलेली वाटते. त्या सिनेमाच्या निर्मात्याने तसा दावाही केला आहे म्हणतात.

रवींदर सिंगच्या “I too had a love story” या कादंबरीच्या शेवटाशी मिळता जुळता शेवट सिनेमाचा आहे.

सुजित  सरकारच्या चित्रपटात एक विशेष गोष्ट असते , चित्रपटाच्या सुरवातीला आणि बहूतेकवेळी चित्रपट संपताना अत्यन्त सुंदर वाद्य संगीत असतं. ‘पिकू’च्या सुरवातीला आणि शेवटी ‘सरोद’ होतं. यावेळी आर्त ‘व्हायोलिन’ आहे.

'पारीजातक' हे अत्यन्त सुंदर, सुगंधी, नाजूक आणि अल्पायुषी फुल. मनाचं ठाव घेणारं फुल. थंडीच्या दिवसात प्रातःकाळी प्राजक्ताच्या झाडाखाली  फुलांचा सडा पडलेला असतो . एखादं फुल झाडावर दवबिंदूने न्हाहून निघालेल्या पानावर पहुडलं असतं. सूर्यप्रकाशात ते पान, दवबिंदू चमकत असतात.  खुप सुंदर दृश्य असतं ते. या सिनेमातील हा सिनेमा मराठीत असता तर नक्कीच याचं नाव पारिजात असतं. यातील मुख्य पात्र प्राजक्ताच्या फुलाप्रमाणेच आहे.
सिनेमा ही तसाच छोटा, पण मनाचा ठाव घेणारा.

हा चित्रपट खरंतर एकट्याने बघावा. समूहासोबत जाऊन, पॉपकॉर्न खात , अधूनमधून बोलत बघण्याचा हा सिनेमा नाही. शास्त्रीय संगीताची, वा वाद्यांची, मैफिलीची नशा हळूहळू मनाची पकड घेत जाते. तो आनंद अनुभवण्यासाठी मनाची लवचिकता फार महत्वाची असते. सतत लक्ष विचलित होत गेल्यास मैफल कंटाळवाणी वाटू शकते. तेच या सिनेमाबाबतीतही लागू.

-अभिजित पानसे

Saturday 7 April 2018

"कोणता झेंडा घेऊ हाती!", आयपीएल.

कोणता झेंडा घेऊ हाती

आयपीएलच्या वारीत मिळे ना ही वाट
साचले मोहाचे धुके घनदाट
आपलेच खेळाडू ..आपलीच माती तरी फ्रेंचाईजची खेळाडूंना भीती
बीसीसीया कोणता झेंडा घेऊ हाती!

आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताच त्यांचा देव होता
कुठे ऑप्पो कुठे विवा कुठे नोकिया स्टार छाती
वैरी कोणआहे इथे कोण साथी
बीसीसीया कोणता झेंडा घेऊ हाथी

आज स्पॉट फिक्सिंग उद्या मॅच फिक्सिंग
क्रिकेटचे इथे धिंडवडे निघती
खेळ रितंरितं बघूनी उमगलं, कुंपण इथं शेत खाती
दरवेळी भक्ताच्या कपाळी वेगळीच माती, झेंडे येगळे,
येगळ्या फ्रेंचाईजी
पैश्याचीच भक्ती टीआरपीचीच प्रीती #बीसी सीया कोणता झेंडा घेऊ हाती….

-अभिजित पानसे