Sunday 30 December 2018

"आईने मला जीवनावर प्रेम करायला शिकवले" - सचिन पिळगावकर"






“आईने मला जीवनावर प्रेम करायला शिकवले! ती माझं आराध्य आहे! तिच्यामुळे मी जीवनावर समरसून प्रेम करतो!” सचिन पिळगावकर म्हणालेत.

“सचिनचे वडील गेल्यावर त्याने शिक्षण पूर्ण न करता स्वतः घराची आर्थिक जबाबदारी स्वीकारली, संपूर्ण घराला स्वतःच्या मेहनतीने चालवले! 23 वर्षाचा मुलगा मनाने परिपक्व झाला होता!”
चेहऱ्यावर सात्विकता, स्पष्टपणे जाणवेल असं उत्साही, प्रफुल्लित व्यक्तिमत्व असलेल्या सचिन पिळगावकरांच्या आई
उत्साहाने, प्रेमाने सचिनजींबद्दल सांगत होत्या. सचिन पिळगावकरांचा नवा चित्रपट “लव यु जिंदगी” येतोय त्याबद्दल त्या बोलत होत्या. त्यांनी सचिनजींच्या व्यक्तिमत्त्वातील  प्रेक्षकांना, बाहेरील व्यक्तींना माहित नसलेले अनेक पैलू सहजपणे सांगितले. “हा माझा मार्ग एकला” चित्रपटासाठी बाळ सचिनला मिळालेला राष्ट्रीय अवॉर्ड, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना जवळ घेऊन स्वतःच्या जॅकेटवरील गुलाबाचं फूल काढून बाल सचिनच्या  शेरवानीत लावले तो क्षण त्यांच्या जीवनातील एक सर्वोत्तम क्षण होता असे त्या म्हणाल्यात. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच “लव यु जिंदगी”चा अनुभव देणारा तो क्षण होता.
सचिन लहानपणापासून त्यांच्याशी खूप जवळ होता. ते भावनिक नातं अजूनही तितकंच कायम आहे असे त्या म्हणाल्यात. तो माझी खूप काळजी घेतो, कधी मी बाहेरून आली असता माझ्यासाठी सँडविच किंवा इतर काही पदार्थ करतो. लहानपणीही मला कायम तो कामात मदत करायचा. भांडी घासून द्यायचा. त्याला नको म्हटलं तरीही , “हो फक्त इतकं करतो आणि खेळायला जातो!” म्हणायाचा. त्याला कळत असायचं आपली आई एकटी काम करतेय! सचिनजींच्या आई सचिनजींचे एकेक पैलू उलगडून सांगत होत्या.
सिनेमात करत असलेली प्रत्येक भूमिका सचिन आईला अजूनही सांगतात.
सचिन आजही इतके टवटवीत, प्रेमाने ओथंबून, संपूर्णपणे जीवन जगणारे कसे आहेत, त्यामागील रहस्य काय हे विचारल्यावर आई म्हणाल्यात “त्याच्यावर सगळ्यांनी केलेलं प्रेम! त्याला घरून प्रचंड प्रेम मिळालेलं आहे, कायम मिळतं. त्याला त्याच्या बायको सुप्रियाकडून, बहिणीकडून, मुलगी श्रियाकडून, प्रचंड प्रेम मिळालंय. त्याच्यावर त्याच्या प्रत्येक दिग्दर्शकाने प्रेम केलंय. यामुळे तो कायमच प्रेमाने ओथंबून असतो. म्हणूनच त्याचं जीवनावर प्रेम आहे. तो समरस होऊन जगतो. घरातसुद्धा प्रत्येक कामात पुढे असतो. त्याच्यात एक लहान मूल स्पष्टपणे वास करतं. आणि त्याने त्याला कायम जपलंय. या सगळ्या कारणामुळे तो सगळयांवर प्रेम करतो, सगळ्यांना मदत करतो.
आई पुढे म्हणाल्यात की सचिन घरांत खूप सुंदर नातेसंबंध , त्यांच्यातील प्रेम, खेळकरपणा टिकवून ठेवतो. तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो तितकंच त्याचं सुप्रियावरही प्रेम आहे! तितकंच प्रेम आणि जबरदस्त बॉंडिंग श्रियासोबतही त्याचं आहे! बहिणीसोबत तर त्याचं नातं विलक्षण सुंदर, प्रेमाचं आहे. तो कोणालाही नाराज करत नाही. त्याच्यामुळे घरातील संपूर्ण नाती एकजूट आहेत.

लव यु जिंदगी चित्रपट बघितल्यावर काय वाटलं, चित्रपट कसा  वाटला विचारल्यावर त्या म्हणाल्या की आजवर त्यांनी सचिनचे कित्येक चित्रपट बघितले. लव यु जिंदगी सिनेमाही त्यांना तितकाच आवडला. चित्रपटातील दोन्ही पात्रे त्याने सुंदर साकारली आहे म्हणाल्यात.

आईच्या शेजारी बसलेली सचिन पिळगावकरांची धाकटी बहीण, त्यांनीही सचिनबद्दल त्या दोघ्या बहीण भावांच्या नात्याबद्दल सांगितलं. यांतून सचिनजींचे वेगळे पैलू कळले, त्यांच्यातील माणुसकी, समंजसपणा कळला.
तुमचं आणि सचिनजींचं नातं कसं आहे विचारलं असता त्या म्हणाल्या “वडील आणि मुलीप्रमाणे नातं आहे!” तेव्हा सचिनजींच्या आई म्हणाल्या, “देव आहे हिच्यासाठी तिचा भाऊ म्हणजे! पान हलत नाही भावशिवाय तिचं!”
त्यांच्या बहिणीनेही  सांगितलं की सचिन संपूर्णपणे फॅमिली मॅन आहे. कायम उत्साहात असतो. घरांत प्रत्येक गोष्टीत त्याचं लक्ष असतं. ती पर्फेक्ट करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्या हसत सांगू लागल्या की सचिनला काही गिफ्ट मिळालं की पहिले ते आईकडे आणून देतो जेणेकरून कोणी ते प्रथम उघडू नये, त्यालाच पहिल्यांदा बॉक्स उघडायचा असतो. अत्यंत गोड व्यक्ती आहे. जीवन समरसून जगतो. स्वतःवर प्रेम करतो. स्वतःच्या मनाला आवडेल तसं जगतो, तसे कपडे घालतो कारण त्याला त्यात आनंद मिळत असतो. आई त्याचं दैवत आहे! दोघेही एकमेकांसाठी भावनिकदृष्ट्या प्रचंड जवळ आहेत.

सचिनजींच्या बहिणीला त्यांच्या आयुष्यातील लव यु जिंदगी म्हणावसा, जाणीव करून देणारा क्षण विचारला असता, किंवा सर्वोत्तम क्षण जेव्हा आयुष्यावर प्रेम उफाळून आलं, विचारलं असता, त्या म्हणाल्या जीवनावर प्रेमापेक्षा आपल्या कुटुंबाचा अभिमान वाटावा असा एक क्षण त्यांना तीव्रतेने आठवतो. त्या म्हणाल्या त्यांना भावाचा आणि आईचा एक संवाद आठवतो. त्यावेळी त्या लहान होत्या त्यामुळे त्या संवादाची खोली त्यांना त्यावेळी तितकी कळली नाही पण काही काळाने मात्र आजतागायत त्याचं महत्व आणि कुटुंबाचा त्यांना अभिमान वाटतो. बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा सचिन यांचा आर्थिकदृष्ट्या काहीसा वाईट काळ सुरू होता, तेव्हा एका निर्मात्याने त्यांना चित्रपटातील भूमिकेसाठी त्या काळातील  एक मोठी रक्कम दिली होती. पण काही दिवसांनी त्या निर्मात्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तेव्हा खोलीत सचिन आईला म्हणत होते, “मला त्यांनी चित्रपटासाठी पैसे दिले आहेत. पण आज ते हयात नाही. त्यामुळे चित्रपटही आता तयार होणार नाही. म्हणून त्यांनी मला दिलेले पैसे त्यांच्या कुटुंबीयांना परत करायला हवेत. तुला काय वाटतं?”
आईने तात्काळ ‘हो’ म्हंटलं, आणि त्यांचे पैसे त्यांना परत करायला सांगितले.  या घटनेमुळे त्या म्हणाल्यात की मला खूप अभिमान वाटतो आमच्या कुटुंबाचा! आमच्या कुटुंबातील संस्कारांचा हा भाग आहे.

सचिन पिळगावकरांच्या बहिणीलाही “लव यु जिंदगी” चित्रपट खूप आवडला. त्या म्हणाल्या, मी जशी अपेक्षा केली होती त्याहून पटीने चित्रपट छान झाला आहे. त्यांनी दिग्दर्शक मनोज सावंत यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं. शिवाय लेखकांनी चित्रपट खूप चांगल्या प्रकारे लिहिलाय, संवादलेखन सुरेख जमलंय म्हणाल्यात.

सुप्रिया पिळगावकरांना सचिनजींच्या जिंदादील स्वभावाच्या मागचं कारण विचारलं असता त्या म्हणाल्या तो आधीपासूनच तसा आहे. यात त्यांचं स्वतःचं काहीही योगदान नाही. उलट सचिनमुळे मलाच खूप शिकायला मिळतं, त्याचा  उत्साह बघता आपल्यातच उत्साह संचारतो.
नवरा म्हणून त्याने कायम स्वातंत्र्य दिलं. घरातील प्रत्येक सदस्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलंय म्हणाल्यात. त्यांनाही लव यु जिंदगी चित्रपटाबद्दल खूप उत्कंठा आहे म्हणाल्या.

सचिन पिळगावकर नेहमीप्रमाणे उत्साहात होते. बॅडमिंटन खेळायला जात असताना त्यांनाही चित्रपटसंबंधी काही प्रश्न विचारले.
हा चित्रपट करताना, अनिरुद्ध दातेची भूमिका साकारताना त्यांना काय वाटलं, अनिरुद्ध दाते आणि त्यांच्यात साम्य वाटलं का, भूमिका करताना वेगळी तयारी करावी लागली का विचारल्यावर सचिनजींनी निवांत सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत.
“अनिरुद्ध बाळकृष्ण दाते”चं पहिलं रूप साकारताना नक्कीच तयारी करावी लागली. त्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची असुरक्षितता आहे, अश्यावेळी त्याचं चालणं, हातवारे, बोलणं यावर मला काम करावं लागलं. पण ‘अनि’ ची भूमिका करताना मात्र मला काहीही वेगळी तयारी करावी लागली नाही कारण मी तसाच आहे, मी तसाच जीवनावर प्रचंड प्रेम करतो. दिलखुलास जगतो.
त्यांच्या आयुष्यातील लव यु जिंदगी क्षण कोणता विचारल्यावर त्यांनी अनेक क्षणांना उजळणी दिली. पहिला चित्रपट, मिळालेला पहिला नकार, नॅशनल अवॉर्ड, सुप्रियासोबत विवाह, श्रियाचा जन्म हे सारे त्यांचे लव यु जिंदगी क्षण म्हणजे जीवनावर प्रेम करायला लावणारे क्षण सांगितले.

लव यु जिंदगी चित्रपट त्यांच्या कारकिर्दीत, आयुष्यात एक महत्वाचा  चित्रपट नक्कीच असणार असे ते म्हणाले.
दिग्दर्शक मनोज सावंत यांचा पहिलाच चित्रपट आहे, तुमचा त्यांच्याशी कसा मेळ साधला गेला विचारलं असता, त्यांनी सांगितलं की ते मनोज सावंतला दहा वर्षांपासून ओळखतात. त्यांच्यात केमिस्ट्री बऱ्याच वर्षांपासून आहे. एकापेक्षा एक एक कार्यक्रमाचे मनोज सावंत दिग्दर्शक होते. मनोज सावंतबद्दल त्यांचं मत फार छान आहे हे जाणवलं. ते म्हणालेत, “मी मनोजला अधिकाराने काहीही सांगू शकतो पण ते ऑफ द सेट. सेटवर मी डिरेक्टर्स ऍक्टर असतो!”

मोठे कलाकार साधारणतः मोठया बॅनरचा चित्रपट करायला बघतात, लव यु जिंदगी चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडे हे पहिल्यांदाच चित्रपटाची निर्मिती करताहेत. तेव्हा या सिनेमाला तुम्ही कसे तयार झालात विचारल्यावर सचिन पिळगावकर म्हणालेत “प्रत्येक बॅनर हे कधीतरी नवखंच असतं. चित्रपट निर्मात्याची नियत काय आहे, तो कोणत्या भावनेने चित्रपट बनवतोय हे माझ्यासाठी महत्वाचं असतं. सचिन बामगुडे ही खूप चांगली व्यक्ती आहे. त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये उज्जवल भविष्य आहे!”

हा सिनेमा प्रेक्षकांनी का बघावा विचारलं असता सचिन पिळगावकर म्हणालेत, जो आयुष्यावर प्रेम करतो, ज्याला जीवनावर प्रेम करायचंय, काही करायचं राहून गेलं असं वाटतंय त्यांनी हा सिनेमा बघावा. जे जिंदादील लोक आहेत, जे स्वतःवर प्रेम करतात, ज्यांना स्वतःवर प्रेम करायचंय त्यांनी हा सिनेमा बघावा. ज्यांना स्वच्छ कौटुंबिक करमणूक हवी आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे.




- अभिजित पानसे