Tuesday 2 January 2018

आमच्या येथील माती दुर्गा मातेला चालते पण समाजाला नाही..!


"हमारे यहा की मिट्टी माँ दुर्गा को चलती है लेकिन समाज को नही.."

जसा जसा सूर्य पश्चिमेच्या क्षितीजाकडे कलु लागतो..सावळी सांज आकाशात  दिवा लावत जाते..हळुहळु आकाशातील तारेही विश्वाचं आळसावलेलं रूप पाहुन सुखावतात..सामान्यत: आपल्या पांढरपेशा समाजाचे दैनंदिन व्यवहार रात्रीच्या दहाच्या ठोक्याला निवृत्त होतात. परंतु शहरातील काही वस्तींमध्ये जशी जशी रात्र अधिकाधीक गहिरी होत जाते तसा तेथील व्यवहारांचा "लाल" रंग अधिक गडद होत जातो..

स्त्रीला दुर्गेचे आदिशक्तिचे रूप आपल्या समाजात मानले जाते. लक्ष्मी पार्वती..सौम्या रौद्रा..निरनिराळे रूपं देवी महात्म्यात सांगितलेय. समाजात जगताना स्त्रीचे अनेक रूप बघायला मिळतात.

पण फक्त उदरभरणासाठी जेव्हा स्त्रीला याच देवीच्या रूपाला रात्री रस्त्याच्या कडेला "उभं" राहावं लागतं. तेव्हा अंतर्मुख करणाऱ्या या दुर्गेच्या रूपाला "वारांगना" म्हणतात..आणी रात्रीच्या वाढत्या काळ्या रंगाबरोबर ज्या वस्तीचा "लाल" रंग चेहऱ्यावर लावलेल्या लालीसकट गडद होत जातो त्या भागाला म्हणतात रेड लाइट एरिआ!

जेव्हा व्यवसायाचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे भांडवल! परंतु जेव्हा उदर भरणासाठी कुठलंही भांडवलच मिळत नाही तेव्हा या वारांगनांना "स्व देहाचे" भांडवल करून त्यालाच व्यवसायाचे साधन करावे लागते.
जिथे व्हाइट कॉलर समाजासाठी रात्र ही निवृत्तीची वेळ असते तिथे या स्त्रियांसाठी  त्यांच्या  अर्थाजनाच्या दिवसाची सुरवात असते.
वाढत्या रात्रीच्या काळोखासोबत वर्षांनुवर्षे यांच्या जीवनातील काळोखही कायम आहे. त्याला शेवट नाही.

कोणी नाट्यकार "वसंतसेना" नामक पात्र रचुन वारांगनेला एक "उत्सव"मुर्ती ग्लॅमरस लूक देतो. परंतु प्रत्यक्शात मात्र या कमर्शिअल सेक्स वर्कर्सच्या आयुष्यात दु:ख वैषम्य गरिबी पिळवणुक रोगराई याशिवाय काहीच नसतं.

दोन वर्षापुर्वी आम्ही ४५ मित्र मैत्रिणी पुण्याला ट्रिपला गेलेलो असताना , उशीरा परताना बुधवार पेठेतील लक्ष्मी रोडवरील "लाल" माहोल पाहुन मी पुर्ण अंतर्मुख झालो. इतर मित्रांसाठी तो टेहाळणीचा उत्सुकतेचा विषय होता. पण माझं डोकं विचारांनी आक्रंदुन गेलं होतं. 'बारा' वर्षांपासुन 'साठ' वर्षांपर्यंत प्रत्येक वयोगटातील 'स्त्री' स्वदेहाचा लिलाव करत होती. उजेडात एरवी उथळ माथ्याने वावरणारे सुटाबुटातील तथाकथित शुभ्र कॉलर माणसे तिथे 'भाव' करत होते. वरवरून भडक वर्तवणुक करणाऱ्या या वारांगनांच्या डोळ्याच्या आड मात्र प्रचंड दु:ख जाणवलं. ज्या  समाजात स्त्रीला दुर्गेचे रूप समजले जाते त्या समाजात हाता तोंडाची गाठ पडण्यासाठी स्त्रीला देह विक्रय करावा लागतो हे आपल्या समाजाचे दुर्दैव्य.

मी समोरच्या दगडुसेठ गणपतीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात कुठलेच भाव नव्हते. तो निर्विकार दृष्टीने समोर पाहात होता.
देव इतका अलिप्त कसा काय राहु शकतो? की फक्त देवच इतका अलिप्त..'अलुफ' राहु शकतो! कर्म आणि प्रारब्ध यात त्याची स्वत:ची काहीच भुमिका नसते का? असे शेकडो अनेक विचारांनी डोक्यात वादळ उठलं होतं. त्या वेळी प्रथमच त्या प्रसिद्ध गणपतीचं दर्शन घेत होतो पण कुठलाच आनंद होत नव्हता.

रात्रभर मी झोपू शकलो नाही. डोळ्यांसमोर रस्त्यावरच ते चित्र येत होतं. मनात शेकडो विचार येत होते. दुःख वाईट वाटत होतं. पाहिल्यादाच सुरक्षित घराच्या वातावरणातून बाहेर येऊन जगाची हि काळी लाल बाजू पहिली होती. मन वेदनांनी भरून गेलं होतं.

वर्षानवर्षे ह्या वारांगना गरिबीच्या घाणीच्या साम्राज्यात शरीराला झीजवत खितपत पडलेल्या असतात. जो पर्यंत शरीर तरूण आहे तो पर्यंत हाता तोंडाची गाठ पडते. समस्या व दु:ख अपमान यांच्या पाजविलाच पुजले असतात. पोलीसांचे हप्ते त्यांच्याकडुन होणारी पिळवणुक खोलीचे भाडे मधल्या दलालांची वसुली लैंगिक रोग यांच्या समस्यांना अंत नसतो.

भौगोलीक अंतरानुसार या समाजाची वस्ती आपल्या पांढरपेशा वस्तीपासुन फार दुर नसते. परंतु मुळ प्रवाहापासुन मात्र हा समाज पुर्णपणे कोसो मैल दुर आहे.
प्रत्येक मानव प्राण्याची मुलभूत  मानसिक गरजा म्हणजे प्रेम आदर काळजी..यापैकी कोणतीही गरज या स्त्रीयांची कधीच पुर्ण होत नाही.

स्त्रीचे मातृत्व हे तर विधात्याचेही आहे. प्रत्येक स्स्त्री ही मुळात अनंत काळची माता असतेच. छोटी मुलगीसुद्धा तिच्या बाहुलीला प्रेमाने थापटते..खाउ घालते. पण स्त्रीचे हे बेसिक इंस्टिक 'मातृत्व' सुद्धा या कमनशिबी वारांगनांना 'परवडत' नाही. कारण गर्भवासातील त्या महिन्यांमुळे व्यवसायावर परिणाम होतो. आणि जगायचे तर असते....
ह्या वारांगना "वोट बँक" नसल्याने कुठलिही राजकीय कृपा यांना मिळत नाही.

"मुलगी झाली हो..!" म्हणताना अजुनही काही पुरातन मनोवृत्तीचा उत्साह ओसरतो. जेथे आपल्या पांढरपेशांच्या समाजात "मुलाच्या" हव्यासापोटी स्त्रीभुणहत्या केली जाते. तेथे वारांगनांच्या वस्तीमध्ये मात्र "कन्या रत्नाचं" देवी रूपाचं सहर्ष मनापासुन स्वागत केलं जातं. तिथे एक "मुलगी" आपल्या "अम्माचा" आपल्या घराचा भार समर्थपणे वाहते.कारण तीच त्यांची "कुलदिपीका" असते. कदाचीत म्हणुनच या वारांगना आत्मिक पातळीवर देवीच्या अधीक जवळ वाटतात.

हाय सोसायटीतील पार्ट्यांमध्ये 'रूचीपालट' म्हणुन  wife/husbnd swapping प्रकार घडतात तेेव्हा मुळात खऱ्या वेश्या कोण हा प्रश्न पडतो.
  नृृत्यांगना प्रोतिमा बेदी जी गोव्याला कलंगुट बीचवर नग्नावस्थेेत मॉर्निंग वॉक घ्यायची(reff श्री प्रमोद नवलकराचं मासीक) ती आपल्या इंटरव्युहमध्ये म्हणली होती "जेव्हा माझी कार कामाठीपुऱ्याजवळील फोरास रोडवरून जाते तेव्हा माझ्यात एक वेश्या संचारते...त्या वेश्यावस्तीतील पान दुकानावरील पान खाण्याची व लोकांनी माझ्याकडे 'त्या' नजरेने पाहावे असे खुप वाटते!"

एक कादंबरी वाचण्यात आली होती; त्यात एका गोष्टीत समोरासमोरील घरांमध्ये एका घरात एक लग्न झालेली स्त्री आपल्या नवऱ्यासोबत राहात असते. तर समोरील घरात एक वारांगना. कालांतराने दोघेही मृत्युमुखी पडतात. पहिल्या घरंदाज स्त्रीला नरकप्राप्ती होते तर वारांगनेला स्वर्ग प्राप्ती. तेव्हा चित्रगुप्त सांगतो; पहिली लग्न झालेली स्त्री रोज रात्री समोरच्या वारांगनेला पाहुन "मत्सर" करायची तर वारांगना त्या पतिव्रतेला पाहुन रोज मनोमन नमस्कार करीत.

यावरून एक पटतं वेश्यावृत्ती ही एक मनोवृत्ती 'प्रवृत्ती' असते. मग ती स्त्रीची असो वा पुरूषाची. वेश्या बनायला "रेड लाइट" एरिआतच राहवे लागते असे नाही.

एकीकडे वारांगना उदर भरणासाठी;घऱ चालवण्यासाठी लज्जेचा त्याग करून "देहदान" करते.तर दुसरीकडे फक्त एन्जॉयमेंट म्हणुन वा उच्चभ्रु आयुष्य जगता यावे म्हणुन एक कॉलेज गर्ल कॉलगर्ल होते. वा जस्ट एन्जॉयमेंट म्हणुन स्वैराचार करतेे.

अल्ट्रा मॉडर्न समजणारे तरूण तरूणींचे फ्रेंड्स गृप "गृप सेक्स" पार्टीज फ्लँटमध्ये आयोजीत करतात.मग अशा समाजातील 'वेश्याप्रवृत्तीपेक्षा' त्या रेड लाइट एरिआमधील 'अधिकृत' वारांगना पटीने पवीत्र वाटतात.

दुर्गा देवीचा उत्सव नवरात्र सुरू आहे. दुर्गा देवीची मातीची मुर्ती तयार करताना त्या मातीत वारांगनांच्या वस्तीतील थोडी माती मिसळली जाते. पश्चिम बंगालमधील कुंभार वेश्यावस्तीतुन माती आणुन त्यापासुन दुर्गा देवीची मुर्ती तयार करतात. कारण Durga is an eternal mother of the universe & these commercial sex workers representing procreation. पण या वारांगनाचं म्हणनं असतं "हमारे यहॉं की मिट्टी मॉ दुर्गा को चलती है पर समाज को नही."

पायातील वाहणसुद्धा एअऱ कंडिशन्ड शोरूम्समधुन विकली जाते. पण ते म्हणतात ८३ लक्ष योनीनंतर मनुष्य देह प्राप्त होतो, तो मनुष्य देह मात्र रस्त्यावर कवडीमोलात विकला जातो. हे आपल्या समाजाचं विडंबन.

गौरांगप्रभुंनी पिंगळा नामक वेश्येचा उद्धार केला.परंतु या अहिल्यांचा उद्धार करण्यासाठी राम कधी येणार याचे उत्तर त्या दुर्गा देवीलाच माहित.

(१४ ऑक्टोबर 2007, लोकसत्ता)

-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment