Thursday 26 October 2017

गेला यम कुणीकडे!

परवा भाऊबीजेला..जिला "यम द्वितीया"  ही म्हणतात, सकाळपासून यम म्हणजे गॉड ऑफ डेथ गायब झाला होता. त्याच्या बहिणीने यमुनेने त्याला फॅमिली वॉट्सअप ग्रुप वर "हॅप्पी भाऊबीज यम ब्रो"  मेसेज टाकला. वडील सूर्यानेही कौतुकाने त्यावर मेसेज केला. पण यमाचा काहीही रिप्लाय नाही.
 तिने दुसऱ्या भावाला शनीला फोन केला. त्याने नेहमीप्रमाणे फोन उचलला नाहीच.
त्यालाही '' हे हॅपी भाऊबीज बिग ब्रो शनी!" मेसेज करून यमाबद्दल काही माहिती आहे का विचारलं. पण शनीने काही रिप्लाय केला नाही.

इंद्राने त्या संध्याकाळी खास रॉयल डान्स इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. पण यम हरवण्याची बातमी समजताच त्याने सर्व कार्यक्रम रद्द केलेत. आणि काळजीत पडला.
त्याच्या आज्ञेनुसार सगळे देवगण त्यांचे सबऑर्डीनेटस यमाला शोधू लागलेत.

इंद्राने यमाला शोधण्यासाठी देवगणांना यमाच्या मोठ्या टोलेजंगी राजवाडा बंगलोमध्ये शोधायला पाठवले.
आजवर इंद्र काय कोणीही यमाजी पंतांच्या रॉयल बंगलोला भेट दिली नव्हती. नियमितपणे यम आपल्या ऑफिसलाच येत असल्याने शिवाय कधीही रजा न घेत असल्याने कोणालाही त्यांच्या बंगलोमध्ये जाण्याची 'वेळ' आली नव्हती.
पण इतर देवांप्रमाणे यमाचाही लक्झरिअस टोलेजंग बंगला असेलच हे माहिती होतं.

"डेड एन्ड गल्लीत" यमाजीपंतांचं अगदी साधंसं छोटंसं घर होतं. घराच्या बाहेरील भिंतीवर नाव घराचं नाव होतं "रेस्ट इन पीस."
राहणीमान अगदी साधं असायचं त्यांचं.
घराबाहेर गोठ्यात यमाचा जाडा काळाभिन्न रेडा कडबा, गवत खाऊन झाल्याने रवंथ करीत बसला होता.

 यमुनेने संपूर्ण घर धुंडाळलं पण यमाजी पंत आपल्या सदनिकेत नव्हते.
तेवढ्यात यमुनेचा सेल वाजला.
त्यावर शनीचा बराच उशीरा मेसेजला रिप्लाय आला होता. यमुनाबाई मनात बोलल्या "तसाही हा शनी त्याच्या दिरंगाईसाठी प्रदिद्ध आहेच. प्रत्येक गोष्टीला उशिरा करतो. पण चला किमान रिप्लाय आला .
यमुनेने मेसेज वाचला, "यमुने मी माझ्या कामात व्यस्त असल्याने यमुने मला यमाबद्दल  काहीही माहिती नाही. त्यामुळे मी काहीही तुला सांगू शकत नाही!
आणि मला "हॅप्पी भाऊबीज..दिवाळी " सारखे  मेसेजेस मला पुन्हा पाठवू नका! या भावनिक अटॅचमेन्ट गोष्टीत मला रस नाही! तुम्ही लोक तुमचं काम करा मला माझं करू दे!
-तुझा ज्येष्ठ भ्राता शनी सूर्यवंशम!"

यमुनेला शनीच्या या अश्या रुक्ष रिप्लाय ची कल्पना होतीच तरीही तिला यावेळी जरा जास्तच वाईट वाटले.
शेवटी थोडी शोधाशोध करून यमुना आपल्या  उत्तराखंड ..दिल्ली..मथुरा आणि अलाहाबाद प्रयाग अश्या रूटने वाहायला परत गेली.

इकडे देवगण मात्र घाबरलेत जर यम कुठेतरी निघून गेला झाला तर कसं करायचं! आपल्या बॉसेस ला काय सांगायचं!
 त्यांनी 'विष्णूला' यम गायब झालाय सांगण्याचं ठरवलं. पण लक्षात आलं की विष्णू तर अजूनही निद्रेत आहेत. त्यांना उठायला अजून सात आठ दिवस बाकी आहेत. निद्रेतून जागे झालेत की प्रथम ते तुळसीसोबत विवाहाच्या तयारीला लागतील. तो येऊ घातलेला एक मोठा इव्हेंट आपल्याला मॅनेज करायचाय त्यात आता यमाचा इश्यू झालाय.

एका देवाने सुचवलं," देवाधिदेव महादेवांच्या कानी घालायचं का?"
तर इंद्र बोलला " नाही ! महादेव अश्या डोमेस्टिक गोष्टीत लक्ष घालत नाहीत! देवराष्ट्रावर वा पृथ्वीवर काही प्रचंड संकट, इमरंजन्सी आली तरच त्यांना हेल्प मागायची असते!
नाहीतर उगा आपल्यावरच त्यांची थर्ड आय ओपन व्हायची!

इंद्राने सगळ्यांना यमाच्या शोधास पाठवले.
सगळयांना काळजी वाटू लागली यमाची!
शेवटी यम हरवला कुठे?

बराच शोधानंतर एका देवगणाने इंद्राला त्याच्या 'गॉडाफोन' 33G कनेक्शनवरून फोन करून सांगितले की त्यांना यम एका निबिड अरण्यात एका तळाकाठी दगडावर बसलेला दिसला आहे.


घनदाट अरण्यात एका तळ्याकाठी पसरट दगडावर यम दोन पाय खाली करून बसला होता. सोन्याचा मुकुट खाली दगडावर आ वासलेल्या स्थितीत पडला होता.
दुरुनही त्याचा निरुत्साही निस्तेज नाराज चेहरा दिसत होता.
शून्यात नजर लावून म्लान चेहऱ्याने तळ्यात उमटणाऱ्या तरंगाकडे बघत होता.

यमाची दुःखी मुद्रा बघून समोरील तळ्यातून "जल महाभूत" उभं ठाकलं.
"यमराज हे काय बघतोय मी तुम्ही आज दुःखी मुद्रेत! तुमच्यासारखे रुबाबदार , कणखर व्यक्तिमत्त्व आज असं का मलूल झालंय?
कोणतं दुःख आहे तुमहाला?

यम एक दीर्घ उसासा टाकून जल महाभूताला अभिवादन करत बोलला, " संपूर्ण मानव जात माझा तिरस्कार करते! इतर सर्व देवगणाची पूजा होते, त्यांची स्तुती गायली जाते, स्तोत्रे म्हटली जातात! पण माझा मात्र सगळेच दुस्वास करतात!
 माझ्यासाठी नेहमीच राग, अस्वीकार्यता, असंतोष असतो! मी यामुळे खूप दुःखी आहे. माझा कुठेच जयजयकार होत नाही.
म्हणून मी जॉब सॅटिस्फॅक्शन नसल्याने इथे दूर येऊन बसलोय.
तुम्ही जीवन.. जल आहात! तुमच्यामुळे मात्र जीवननिर्मिती होते आणि माझ्यामुळे...पुढे भावना अनावर झाल्याने काहीही न बोलता निराशेने यम खाली दगडकडे बघत राहिला.

जल महाभूत यमाचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ जाऊन बोललं, "यमराज तुमच्या दुःखाचं कारण मला कळलं .
ऐका, तुम्ही म्हणता मी जीवनाचा कारक आहे .
पण तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. मी जीवन निर्मिती करतो तर तुम्ही त्या निर्मितीला योग्य आणि अत्यन्त आवश्यक असा पूर्णविराम देता.
'बदल' हे जसं शाश्वत सत्य आहे तसंच
प्रत्येक गोष्टीला 'शेवट' असणे हेही त्रिकालाबाधित सत्य आहे.
आणि या दोन्ही गोष्टीशी तुमचा जवळचा संबंध आहे.
तुम्ही मृत्यूचे कारक आहात .त्यामुळेच निर्मितीप्रक्रिया अविरत सुरू राहते. आणि निर्मितीमध्ये कालानुरूप योग्य अयोग्य ते बदल होत राहतात.
"Diversity in the unity" कायम राहते.

जल महाभुताचे ते बोलणे काळजीपूर्वक ऐकतानाच तिथे "वायू महाभूत " हजर झाले. यावेळी नैऋत्य मान्सून उशिरापर्यंत टिकल्याने वायू ला ही बराच ओव्हरटाईम करावा लागला होता. आता काही महिने तरी किमान हिवाळा उन्हाळा संपेपर्यंत मे महिनीच्या अखेरपर्यंत निवांत विश्रांती घ्यावी म्हणून तो आता निद्रावस्थेत जाणार होता. फेब्रुवारीत अवकाळी पाऊस , वादळ वारा निर्माण करायला वायूचे जुनीअर्स होतेच.

"आरं आरं यम भौ तुम्ही हिकडं कुणीकडं? तिकडं तुम्हास्नी देवलोक हुडकून ऱ्हायलेत ना!
वायू यमाच्या पायाला नमस्कार करत बोलला.

यमानेही वायूला कसेनुकसे हसून अभिवादन केले.
वायूने यमाला काय झालं म्हणून विचारलं. सर्व वृत्तांत कळल्यावर वायू बोलला, " यम देवा तुम्ही असे दुःखी कष्टी होऊ नका! तुम्ही आम्ही फकस्त आपापले कामं करतोय!आपल्याला त्या जगननियंता निसर्गाने अपॉईंट केलं हाय! जल देव ,मी ,अग्नी आणि तुम्ही स्वतः हे सर्व एकाच शिष्टीमचे भाग हाओत!
तुम्ही हात म्हणून आम्हला महत्व हाये.
 मान्सून महाराष्ट्रात लांबल्याने वायूने गावरान भाषा शिकली होती त्यातच तो बोलत होता.

'अग्नीचा' नामोच्चार झाल्याने तो ही तिथे यमशोधार्थ प्रकट झाला.
अग्नीला ही यमाची सर्व मानसिक स्थिती कळल्यावर तो बोलू लागला.
"यम देवा विध्वंसाबद्दल सगळ्यांचंच मन कलुषित आहे. सगळेजण विध्वंसाला घाबरतात, नाश होण्याला नावे ठेवतात. पण नष्ट होणे , कोणत्याही गोष्टीचे रूप  पालटणे हे महत्वाचे आहे.
मी सगळं काही नष्ट करू शकतो म्हणून पुन्हा उत्पत्ती होत राहते.
बघा ना स्वयंपाक घरात मी पदार्थांना त्यांच्या मूळ रूपाला नष्ट करतो आणीन स्वादिष्ट आणि पचवता येतील असं अन्न निर्माण करतो. तरीही लोक मृत्यूला, नाशाला वाईट समजतात."

 हे सगळं बोलणं सुरू असतानाच एरवी शांत सहनशील असलेलं पण क्वचितच कोपल्यावर मात्र हाहाकार उलथापालथ घडवणारं  पृथ्वीतत्व तिथे हजर होत बोलू लागलं,
"यमराज तुम्ही आहात म्हणून माझं पर्यायाने जीवसृष्टीचं अस्तित्व टिकून आहे. तुम्ही योग्य कर्म करीत आहात! जर मृत्यू नसता तर पृथ्वीवर जीवन माजलं असतं ! मी तरी किती भाजीपाला, झाडे , खनिजसंपत्ती उत्पन्न करणार! तुम्ही नसता तर लोक भुकेने तडफडत राहिले असते. पण मेले नसते! सर्व खनिज, खाद्य संपत्तीचा तुटवडा पडला असता! जीवन हे शाप ठरलं असतं!
तुम्ही संपावर जाण्याची आणि त्यानंतरच्या परिणामाची कल्पनाही करवू शकत नाही!
यमा, मृत्यू आहे म्हणून जीवनाची क्षणभंगुरता कायम आहे,तुम्ही आहात  म्हणून जीवनाचे मोल आहे. मृत्यू आहे म्हणून जीवनाचे महत्व आहे. तुम्ही आहात म्हणून पृथ्वी सुंदर आहे.

मगावसून सर्व संवाद ऐकत असलेलं सर्वच ठिकाणी कायम अस्तित्व "मैं समय हुं" फेम "आकाश तत्व" तेव्हा कुठल्याही रुपात अवतीर्ण न होता फक्त 'वाणी' रुपात बोललं,
"हे यमदेव सर्व जण मृत्यूला घाबरतात म्हणून तर अजूनही कुठंतरी सात्विकता टिकून आहे! फक्त गोडबोले शिक्षक नाही तर कडक, शिक्षा देणारे मास्तर ही गरजेचे असतातच!
जखम झाल्यावर फक्त फुंकर मारणाऱ्यांपेक्षा जबरस्तीने त्या जखमेचं ड्रेसिंग करणारा डॉक्टर महत्वचा असतो.

आणि  मृत्यूबद्दल सगळयांना गैरसमज आहे की मृत्यू हा वाईटच असतो. पण सत्य हे आहे की मृत्यू ही जीवनातली सर्वात सुंदर गोष्ट आहे फक्त तो स्वतःहून यायला हवा! हां मात्र स्वतः त्याला कवटाळण्याचा प्रयत्न केल्यास मात्र शिक्षा मिळते.
मृत्यू बद्दल गैरसमज आहे म्हणून तो दुःखाचा कारण समजल्या जातं. खरे तर ज्याचा मृत्यू होतो तो सुखी होतो त्याचे आप्त फक्त त्या व्यक्तीच्या 'वियोगाने' दुःखी होतात आणि मृत्यूला नावे ठेवतात.
या जगात मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. यमा तुमच्यासारखा प्रामाणिक मित्र नाही. तो कायमस्वरूपी तुमच्यासोबत असतोच! तो मिठी मारतोच."

यम द गॉड ऑफ डेथ, पाचही महाभूतांचे ते ज्ञानयुक्त कॉन्सलिंग ऐकून त्यांचा निरुत्साह , नैराश्य, तक्रारी दूर पळाल्यात. ते पाचही महाभूत त्यांचे सोबती होते. कारण मृत्यू झाल्यावर शरीराला कोणी 'अग्नीच्या' हवाली करतं, कोणी 'जमिनीत' पुरतं, कोणी 'नदीत' टाकतं, कोणी उघड्यावर पशु पक्ष्यांच्या हवाली करतं .

यमाजीपंत आता पूर्वीसारखे तेजस्वी दिसु लागलेत. मळभ दूर झालं. खाली पडलेला सोन्याचा मुकूट पुन्हा धारण केला. नुकत्याच ट्रिम केलेल्या भरदार मिशीला पिळ देताना मनात  विचार आला आता हे पारंपरिक मिशिवालं,  सोन्याचा हेल्मेट हे राकट रूप त्यागावं आणि स्मार्टफोन, सोशिअल मीडियाच्या काळात जरा मॉडर्न व्हावं.

तोवर त्यांचं पारंपरिक वाहन त्यांचा गुटगुटीत रेडा हजर झाला होता. आपल्या गॉडाफोन 33G कनेक्टिव्हिटी असलेल्या सिमकार्ड सेलवरून इंद्राला मेसेज टाकला, "आय एम कमिंग टू द ऑफिस! नो मोर ब्ल्यूज! हॅपी दिवाळी"

-अभिजीत पानसे

Saturday 21 October 2017

दृष्ट पोलॉकासुर आणि हिंस्त्र डोनाल्डासूराचा वीराद्वारे अंत




महान भारतीय वीराला जन्मदिनाच्या शुभेच्छा
"#दृष्ट_डोनाल्डासुर व #पोलॉकासुराचा #वीराद्वारे अंत"

तो १९९८ चा काळ होता.आमच्या #गोकुळात आम्ही #बालगोपी भयग्रस्त झालेलो होतो.
गोकुळावर #असुर_गोलंदाज वेगाने हल्ले करीत.

त्या काळी असुर गोलंदाजांना रोखण्याची पुरेशी योग्य कुमक गोकुळाकडे नव्हती.
सचिन तेंडुलकर नामक देवाचा अवतार आणि नुकतेच सैन्यात सामिल झालेले #ऋषीतुल्य_द्रविड आणि #क्षत्रिय_महाराजा गांगुली हातात फळीचे शस्त्र घेउन हल्ले परतवुन लावित.

त्याकाळी आफ्रिका नामक
"#क्रोनिये_कंसाच्या" राजवटीने सगळीकडे धुमाकुळ घातला होता.कारण त्यांच्याकडे दोन बलाढ्य राक्षस होते.
एक अलन डोन्लाडासुर आणि दुसरा शॉन पोलॉकासुर.

यातही #डोनाल्डासुर हा अत्यंत घातक चालाख निर्दयी होता आपल्या वेगवान गोलास्त्रामुळे त्याने आतंक माजवला होता.
पाच दिवसीय युद्धात तर शुभ्र वस्त्र परिधान करून; हातात जळतं लाल #गोलास्त्र घेत; सध्या कलीयुगातील तरूण युवती #ओठांचा_चंबू करून स्वतःचे छायाचित्र काढतात.त्याच प्रकारे हा डोनाल्डासूुर ओठांचा चंबू करत शत्रुवर काळ बनुन तुटून पडायचा!

१९९८ साली या #आफ्रिकेने आमच्या देशावर आमच्या गोकुळावर आक्रमण केले.या दोन्ही असुरांनी आग ओकली.आमचे अनेक रथी महारथी धारार्तिथी पडलेत.
गांगुली नामक डावकरी योद्ध्याने त्याच्या डाव्या बाजुला अनेक नेत्रदिपक फटके हाणत आफ्रिकेचा मारा परतवण्याचा प्रयत्नांची शर्थ केली.
पण गोकुळ युद्ध हरले.

वातावरणात भय होते.आम्ही गोप दु:खात भयात जगत होतो.

पुन्हा एकदा भारताचे आणि दक्षिण आफ्रिकेचे युद्ध रंगले.यावेळी तर युद्धभूमी साक्षात आफ्रिकेची भूमी होती.
परिस्थिती अत्यंत बिकट होती.
तेथिल भूमी अत्यंत टणक..वातावरणात बोचरा गारवा..हवेतच गोलास्त्र दोन्ही बाजुला आत बाहेर हलत.

आफ्रिकेकडे "#जॉन्टी_रोऱ्ड्स" नावाचा #गुरूत्वाकर्षणावर विजय मिळवलेला हवेत सुर मारणारा असुर होता.
आफ्रिका अजेय होती कारण त्यांचे "##क्षेत्ररक्षण" उच्च होते.

अथक प्रयत्नानंतर गोकुळाने अंतिम युद्धात प्रवेश केला आणि आफ्रिकेसोबत त्यांच्याच भूमीवर अंतीम युद्धास प्रारंभ झाला.
क्रोनिए कंसाने दोन्ही असुरांना आक्रमणास पाठवले.
"#दिवसरात्र"युद्ध चालले.
ऋषीतुल्य द्रविड..देवदुत तेंडुलकर  या रथी द्वयीने सोबत मिळुन डोनाल्डासुर व पोलॉकासुरावर हल्ला चढवला.विजय समिप आला होता.आफ्रिकेच्या भूमीवर इतिहास रचला जाणार हे दिसत असतानाच घात झाला!
घात झाला!
डोन्लाडासुराने युद्धाचे नियम मोडत तेंडुलकर आणि द्रविड वर गलिच्छ #वाक्बाणांचा वर्षाव केला.

हे काय प्रत्यक्ष #देवावतारी_सचिन व  #संतशिरोमणी_द्रविड त्यांच्यावर गलिच्छ वाक्बाणाचा वर्षाव! त्यांच्याशी धक्काबुक्कीचा प्रयत्न्!
त्यामुळे रथी द्वयींचे केंद्रित लक्ष विचलीत झाले. आणि शेवटल्या क्षणी आमचा देश युद्ध हारला.
#इतिहास रचता रचता
#इति ऱ्हास झाला.

आमच्या देशाला फितुरीचा शापच आहे!याच काळात पुन्हा हे स्पष्ट झाले!
आमच्या
देशाचा कप्तान आणि काही सहकाऱ्यांना "#फिक्सिंगच्या" फितुरीमुळ देशद्रोहामुळे तडीपार करण्यात आले.

गोकुळात भयाचं वातावरण होतं.त्या दोन डोन्लाडासुर पोलॉकासुरासमोर आम्हाला वाचवणारा कोणी वाली उरला नव्हता.
त्रेतायुगात  ऋषींवर आक्रमण करणाऱ्या राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी विश्वामित्र ऋषींनी "#ज्येष्ठ_तुझा_पुत्र_मला_देइ_दशरथा.."म्हणुन राक्षसांचा बंदोबस्त केला होता.

पण आता कोण करेल आमचं रक्षण???

आम्ही प्रार्थना करू लागलो.

संत देवीला आळवु लागलेत.

"#दार_उघड_बये_दार_उघड!

हे भवानी! हे महालक्ष्मी! हे सप्तशृंगनिवासिनी दार उघड!

दार उघड बये दार उघड!!

आणि देवीने दार उघडले!!

 एक आकाशवाणी झाली!

"कंस क्रोनिए..दृष्ट डोन्लाडासुर आणि प्रचंड पोलॉकासुरांचा अंत आता जवळ आला आहे!
या कंसासुरांचा नाश करण्यासाठी नजफगडामध्ये एका "वीराचा" वर्षांपर्वीच जन्म झाला आहे!"

 २००१ मध्ये "विरेंद्र सेहवाग" नावाचा एक अपारंपारीक युद्धशैली असलेला.."बेदरकार..
आक्रमक..#शठं_प्रति_शाठ्यं"वृत्ती असलेला योद्धा सैन्यात सामील झाला.

त्याने आफ्रिकेत जाउन पराक्रम गाजवला.शॉन पोलॉकासुराला बऱ्यापैकी नामोहरम केले.पण तरिही आम्हाला त्या वीरातील दैवी शक्तीचा साक्षात्कार पुर्णपणे झाला नव्हता.

२००२ मध्य़़े "champion trophyनामक  लघु  जागतीक युद्ध झाले.त्यात न भुतो न भविष्यति असा पराक्रम "वीरानेे" केला.अँलन डोन्लाडासुरावर आक्रमण करीत सलग ४ चौकास्त्र डागलेत.त्याची पळता भुई थोडी केली.

आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वास बसेना!
 वीराने डोन्लाडासुरावर आक्रमण करत आफ्रिकेचा पाडाव केला!
आणि तेव्हा आम्हाला देवीची झालेली आकाशवाणी आठवली!आम्हाला साक्षातकार झाला की हाच तो दैवी वीर!

डोन्लाडासुराचा अंत झाला होता.आकाशातुन विरावर  #पुष्पवृष्टी झाली!गोकुळातील प्रजा सुखी झाली.

तिथुन पुढे काही दिवसातच डोन्लाडासुराने संन्यास घेतला.

पुढे २००३ मध्ये जागतीक महायुद्ध झाले.आफ्रिकेच्या भूमीवर आमचा देश अद्वितीय खेळला!पण नेमक्या अंतीम युद्धात ऑस्ट्रेलिया नामक बलाढ्य देशाने भारताता पराभव केला.या लढाईतही हा एकटा विरेंद्र वीर शेवटपर्यंत अभिमन्यु सारखा लढला.

यानंतर पोलॉकासुरही युद्धातुन बाद झाला.

या प्रकारे या अहिरावण महिरावणांचा अंत झाला.

पुढे वायव्ये कडील "पापस्थानात" जाउन वीरानेे पराक्रम गाजवला.

अनेक वर्षांपासुन त्रस्त करणाऱ्या;
"#दुसरा" नामक अस्त्राचा सर्वप्रथम शोध लावणाऱ्या "सकलेन मुश्ताक" नामक दैत्याचा अंत केला!
शोएब अख्तर नामक वेगवान दैत्यालाही सळो की पळो करून सोडले.

#मायावी_मयासुर_मेंडीस जेव्हा जगात आतंक पसरवत होता तेव्हा याच विराने त्याच्या मायावी शक्तीचा नाश केला.

२०११ मध्ये पुन्हा एकदा #जागतीक_महायुद्ध जाहले.कुरूक्षेेत्र भारतभूमी  होती.
या जागतीक युद्धात वीराने वीरता गाजवली.प्रत्येक युद्धाच्या सुरवातीलाच चौकास्त्र डागलेत.लंकेसोबत झालेले अंतीम युद्ध देशाने जिंकले आणि विजय प्राप्त केले.देशाला विजय पत्र प्राप्त झाले.अश्वमेध पुर्ण झाला.
आकाशातुन यक्ष(Brands)..
किन्नर(news channels)..
इंद्रादी(BCCI BOARD)पुष्पवृष्टी करू लागलेत.

वीराने ज्यासाठी जन्म घेतला होता ते कार्य पुर्ण झाले.

रामालाही वनवास चुकला नाही..त्यामुळे कर्म सिद्धांताप्रमाणे या विरेंद्र वीरालाही पुढे परिस्थितीचे चटके सहन करावे लागले.

आता त्यांनी Sehwag international school नामक गुरूकुल स्थापन करून  सक्रिय युद्धातुन निवृत्ती घेतली.

आमच्या गोकुळाचे डोन्लाडासुर..पोलॉकासुर..मायावी मेंडीस मयासुरापासुन..दृष्ट यवनांपासुन तआमच्या गोकुळाच रक्शण करण्याबद्दल देशाला विजयी  करण्यासाठी आम्ही सर्व  विरेंद्र वीराचे नेहमीच आभारी राहू.
त्यांच्या जन्मदिनानिमित्त ह्या शब्दसुमनांच्या शुभेच्छा.

-Abhijeet Panse

Thursday 19 October 2017

लाईफबॉय है जहाँ..

दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर आलो तेव्हा दिवाळीत कोणीतरी पोस्ट केलं होतं की "मोती साबण हा जातीयवादी साबण आहे!"  तेव्हा असलं काही  वाचून मोठा धक्का बसला होता नंतर हळूहळू कळत गेलं की असले जातपात वरून इथे घातपात चं राजकारण केलं जातं.
तेव्हापासून काही साबण दिसलेत की काही भाव प्रकटतात. मी जातपात न मानणारा असल्याने त्याचं वेगळ्या प्रकारे वर्गीकरण करतो.

#पिअर्स:- वाहहह! हे ऑलटाईम फेव साबण! पण एकेकाळी जेव्हा नवं नवं हे साबण आलं होतं ,यावर फक्त स्त्रियांची मालकी होती. हळूहळू पियर्स फेमिनिस्ट साबण पुलिंगासाठी खुला होत गेला.
लहानपणी हमखास हा साबण डोळ्यात जाई आणि डोळ्यांची खूप आग होई. शिकेकाईचं पाणी डोळ्यात गेल्यावर जितकी आग होई तितकिच पियर्सचा फेस गेल्यानेही व्हायची! याची आरस्पानी ,पारदर्शी नीलमणी आवृत्ती अधिकच सुंदर! कित्येकदा हा साबण मला खावासा वाटतो.
हे पियर्स साबण आणि  Pierce Brosnan ब्रॉस्नन हे दोघेही फार आवडतात. 'पियर्स' ब्रॉसन च्या डोळेही निलमणी पियर्स साबणासारखेच वाटतात.

#लक्स :- हा मास साबण. साबणातला सलमान खान!अत्यन्त लोकप्रिय, सर्व  सामाजिक, आर्थिक स्तरापर्यंत पोहचलेला.
हॉटेल्समध्ये पनीर बटर मसाला किंवा दाल फ्राय जितकी विकली जाते तितक हे लक्स साबण दुकानातून विकलं जातं.
 साबणाचं नाव यादीत लिहिलं नसेल तर दुकानदार सरळ लक्स साबण गिऱ्हाईकाच्या झोळीत टाकतो.

हा जरी मास साबण असेल तरीही याची जाहिरात मात्र  चित्रपटसृष्टीतील त्या त्या काळातील उच्च नायिकाच करत असते.पण स्त्रियांचा लाडक्या शाहरुख खानने मात्र ती परंपरा खंडित केली.
शाहरुख खां ने बाथटब मध्ये पहडुन लक्स ची जाहिरात एके काळी केली होती. लक्सच्या जाहिरातीत झळकलेला  तो पहिला पुरुष होता.

#लिरील साबण:- अण्णा हजारेंच्या उपोषण इन्स्टिटय़ूटमध्ये जो कोणी ऍडमिशन घेतो त्याचं करिअर सेट होतं. अशी अण्णाचरणी श्रद्धा आहे.तसंच लिरील साबणाचंही.

 लिरील साबणाची जाहिरात केल्यावर कुठलीही फेस व्हॅल्यू नसलेली "प्रीटी झिंटा" चं नशीब फळफळलं. ती दिलसे सोल्जर बनली.
अरविंदा स्वामी केजरीवालांना कुठे होतं फेस व्हॅल्यू! लेकिन अण्णा के दर पे जो कोई आये खाली हात कभी ना जाये!
अशीच श्रद्धा लिरील साबणाबद्दल ही आहे मॉडेल्समध्ये! लिरील साबणाची जाहिरात केल्यावर बॉलिवूडचे दरवाजे उघडतात. असं म्हंटात.
ही लिरील साबण माझी खूप आवडती. तिचा लिंबू रंग बघून, सुगंध घेत लहानपणी तिचा दाताने तुकडा तोडून खायचीच इच्छा होई.

#संतूर:- हे साबण फक्त "ममा स्त्रीने" वापरायचं असतं असा संकेत आहे. आपल्या मुलीला आधीच सांगून ठेवायचं असतं की थोड्यावेळाने मला ममा, आईडी अशी हाक मारायची! आणि आपण इम्प्रेशन हाणायचं!
हे पिवळं साबण वापरताना आपल्या मुलाबाळाची मदत गरजेची असते.

जाहिरातील संतूर महिमा पाहून, काही लग्नाळलेले, संसाराळलेले, मुलंबाळं असलेले पुरुषही ,नव जॉगर्स, नव केस डायर्स, नव जीमर्स सडाफटींग दिसण्यासाठी लपून छपून  संतूर साबण वापरतात असं कानावर आलंय.

संतूर सुद्धा मास साबण .लक्स ला टक्कर देणारं.

#Doveडव :- स्त्रियांच्या पर्सपासून आणि आणि त्यांच्या डव साबणापासून पुरुषांनी दूरच राहावे अशी ताकीद आहे.
हे अस्सल फेमिनाईन साबण! स्त्रियांसाठी राखीव! डव ला पुरुषांचा स्पर्श वर्जित आहे म्हणतात.
 हे साबण म्हणजे मलाई! पुरुष हे साबण वापरत नाहीत पण डोव साबण वापरलेल्या मुलीच्या गालावर "वुगली वुगली वौश " करताना स्वर्गीय आनंदप्राप्ती  मात्र घेता येते.

#सिंथॉल:- हा अस्सल मॅसक्यूलिन साबण! पिळदार शरीर छातीवर केस वगैरे असलेला पुरुष सिंथॉल च्या फेसात छाती काखा घासतोय ! असा हा ताजातवाना फील देणारा स्ट्रॉंग गंध सुगंध असलेला साबण.

यानंतर #निविया हे स्त्रीलिंगी, #हिमालया हे उभयलिंगी साबण ही येतात.

#डेटॉलसोप :- एकदम उग्रवादी साबण! या साबणाने अंघोळ केल्यावर निर्जंतुक झाल्याचं फील येतंच.

#मेडिमिक्स :-  ध्यान से देखीये इस साबण को! ये आम घरोमे नही पाया जाता है!
साबणातील ही प्रजाती खास आहे. बाजारात ही सहजसहजी दृष्टीस ही येत नाही. फक्त हॉटेल्स मध्येच मेडिमिक्सची राजमलाई सारखी वडी मिळते. हे असं का, हे आजवर कळलं नाही. हॉटेल्सवाले या राजमलाई, किसमिबार मेडिमिक्स वड्यांची डिलिव्हरी घेताना लपून उशिरा रात्री वर्सोवासारख्या समुद्र किनारी , सर्व सामान्य जनतेच्या हाती लागू नये म्हणून खुफिया तरिकेसे "कोड वर्ड"  सांगून डिलिव्हरी घेत असतील का अशी एक गुरू शंका येते.

बाकी सर्व " हिरव्या रंगाच्या "साबणाचा  गन्ध हा एकसारखाच असतो. हमाम मे हमाम, मेडिमिक्स सारे ही एकसारखे!

यानंतर काही खास साबण येतात हे सामान्यतः कोण्या धार्मिक गुरू , योग गुरूंचं धार्मिकतेचं "स्टार्ट अप" नीट सुरू झालं की ते लोक आपापल्या साबणा बाजारात करतात.
यात मग प्रथम "गोमय साबण"  असतेच असते. गोमूत्र, गोशेण यांपासून तयार केलेल्या साबणाचे सेल लावतात.
संथ आसाराम बावानेही त्यांच्या चलतीच्या काळात अश्या साबणा विकल्या. आता योगगुरूही विकताहेत.

#लाईफबॉय:- झाले बहु होतील ही बहु पण यासारखा हाच!
जेव्हा जेव्हा साबणांचा इतिहास लिहिला जाईल या साबणाशिवाय त्या इतिहासाला पूर्ण फेस येणार नाही.
लाईफबॉय ! एकेकाळी देशाने सोन्याचा धूर निघताना पहिला आहे तसा या साबणाचा घराघरात, बंगला, घर, झोपडीत स्वतःचा फेस निघताना पहिला आहे. "घरोघरी लाईफबॉयच्या अंघोळी" होत.

साबण या स्त्रीप्रधान, स्त्री वर्चस्व असलेल्या क्षेत्रात जमिनीशी, सामान्य माणसाशी नाळ जुळलेला, फेसाळलेला हा पुरुषी साबण!
पण कशी नशिबाने थट्टा आज मांडली! काळच्या महिम्यात , जो एकवेळ स्थूलरुपात निर्वस्त्र स्त्री पुरुषांच्या  अंगाखांद्यावर फिरला..फेसाळला आज तो 'द्रवरुपात' फक्त टॉयलेट्समध्ये हस्तप्रक्षालनासाठी उपयोगी पडतोय!
"आता उरलो फक्त वामहस्त प्रक्षालनापूरता!"

शेवटी
#म्हैसूरसँडल :-  हा आहे साबणांमधील राजहंस! अस्सल खानदानी साबण!
या साबणाची जाहिरात होत नाही. लोकांना विकत घ्या म्हणून मागे लागत नाही. आपलं श्रेष्ठत्व आपली रॉयल्टी तो जपतो!
म्हैसूर सँडल सहजासहजी मिळत ही नाही.
मोती साबणाचं सर्वोत्तम पर्याय हाच!

अश्या प्रकारे फेसाळलेली साबण संहिता, साधं'सोप' महात्म्य  येथे संपले आहे.
बाकी आपल्याला साबण नसली तरी चालून जातं.वेळ पडल्यास आपण निरमा,व्हील, टाईडनेही आपली गेंड्यासारखी राठ जाड कातडी धुवू शकतो.


-Abhijeet Panse