Saturday, 30 December 2017

छोरा गंगा किनारे वाला

"छोरा गंगा किनारे वाला"

कॉलेजमध्ये माझ्या वर्गात सोलापूरचा नितीन नावाचा एक मुलगा होता. अभिनयाची खुप आवड. आणि त्याहूनही नजरेत स्पष्ट भरणारा त्याचा उत्साह. नाटक, स्किट्स म्हटले की नेहमीच सगळयांच्या समोर, आणि नाटक, अभिनय याच्याशी गंध नसलेल्यांनाही सोबत घेऊन स्वतः नाटक स्किट्स बसवणारा.उत्तम नेतृत्व गुण, लिखाण ही करायचा. पण तो सतत म्हणायचा किंवा त्याच्या मनात एक गोष्ट पक्की बसली होती की त्याचा चेहरा ,दिसणं हे चांगलं नाही.
 मी त्याला नेहमी म्हणायचो की दिसणं हे महत्त्वाचं नाहीच आहे !इथे टॅलेंट असणं महत्वाचं! पुढे तो इतर अगणित फक्त कॉलेजकालीन कलाकारांपैकी एक होत होत आपला इतरांप्रमाणे वेगळा करिअर मार्ग अवलंबवला. असे अनेक गुणी कलाकार पाण्याच्या बुडबुडयांप्रमाणे कॉलेजमधील काही काळ तयार होतात आणि पोटासाठी मग मुळ प्रवाहातील सुरक्षित करिअर करत आयुष्य घालवतात.
जे चूक नक्कीच नाही.
पण ज्या दिवशी मी यू ट्यूबवर एका कलाकाराला बघितलं मला खात्री पटली कि मी जे माझ्या मित्राला सांगायचो ते बरोबर होतं.कि दिसणं , लुक्स महत्वाचे नसतात. कौशल्य महत्वाचं.

अभिनय, दिग्दर्शन, लेखन यासंबंधीत असलेल्या मूळ प्रवाहापासून इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टी , टीव्ही कलाकार इत्यादी सर्व कालाकारांपैकी सगळ्यात जास्त माझ्या मनात आदर असेल, चाहता असेल तर या कलाकाराचा!
तो  म्हणजे "दीपक कुमार मिश्रा".

हे नाव आज परिचित नाही. चित्रपटसृष्टीतील स्टारडम , कळपगिरी, घराणेशाहीमुळे अनेक खरे हाडाचे कलाकार समोर येत नाहीत.
त्यांच्याबद्दल काहीतरी लिहिणे म्हणून हा लेखप्रपंच!

 पर्मनंट रूममेट्स बघितल्यावर ,बघताना आवडतो लक्षात राहतात ते सुमित व्यास आणि निधी सिंग. म्हणजे तानिया आणि मिकेश. पण या सगळ्यांमध्ये मनाला भावतो तो भाबडा बराचसा मूर्ख वाटणारा प्रॉपर्टी एजन्ट आणि कॅब ड्रायवर पुरुषोत्तम.
पहिल्या भागात त्यांची भूमिका सहज एक सहकलाकाराची वाटते. तो कुठल्याही दृष्टीने महत्वाचा कलाकार  वाटत नाही. पण पहिला संपूर्ण सिजन आणि दुसराही सिजन त्याने आपल्या सहज अभिनयाने मजा आणलीये. हा त्याचा सहज अभिनय इतका सहज , नैसर्गिक आहे की तो खरोखरच एक मूर्ख व्यक्ती वाटायला लागतो.
कुठलाही चित्रपट असो वा आवडती कलाकृती मी ती संपल्यावर दाखवली जाणारी नावे नेहमी बघतो. प्रत्येक नेटिसोड नंतर ''रिटन बाय आणि कधीतरी डिरेक्टेड बाय दीपक कुमार मिश्रा " दिसायचं.
मी सहज एकदा दीपक कुमार मिश्रा नावाची माहिती सर्वज्ञानी निर्गुण निराकार अश्या 'गुगलेश्वर' देवास विचारली तेव्हा दिसलं की पुरुषोत्तमची भूमिका करणाराच दीपक कुमार मिश्रा आहे आणि त्यानेच रूममेट्स ची कथा ,पठकथा लिहिली आहे. शिवाय इतर अनेक अव्वल दर्जाचे विडंबन व्हिडीओज लिहिलेत, दिग्दर्शन केलंय. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आणि माझ्या मनात त्याच्यविषयी फार आदर आणि कौतुक दाटलं. एक अतिशय सर्व साधारण रूप, विरळ केस , दातांमध्ये फट उंची अगदीच सरासरीपेक्षा कमी. पण हा कलाकार आपल्या  गुण, कौशल्यामुळे , निरीक्षणशक्तीमुळे इतकं अव्वल दर्जाचं काम करतो.

पण हा धक्का इथेच थांबला नाही. एक मोठा धक्का मिळण्याचं अजून बाकी होतं.
मी जेव्हा दिपककुमार मिश्राची माहिती गुगळेश्वराकडून मिळवत गेलो.तेव्हा अजून एक मोठा धक्का बसला. पदार्थ विज्ञानात शारिरीक फोर्स 'न्यूटन' मध्ये मोजतात. पण मानसिक धक्क्याचं परिमाण अजून कोणी शास्त्रज्ञाने किंवा मनोरोगतज्ञाने सांगितलं नाही.
नाहीतर मी नक्कीच त्या परिमाणासह धक्क्याचं स्वरूप सांगितलं असतं.
इथे मी न्यूटन, शास्त्रज्ञ हे शब्द का वापरले आहेत हे पुढे कळेलच.

आपल्याला ज्या गोष्टीत मनापासून आवड आहे त्यातच करिअर करावं , आपलं पॅशन असावं , आपल्या टर्म्स वर आयुष्य ,करिअर करणे वगैरे अनेक चित्रपटांमधून याचं उदात्तीकरण करून दाखवलंय.पण हे मूळ आयुष्यात जमणे म्हणजे शिवधनुष्य उचलणे होय. हा फार मोठा जुगार असतो. पण हा डाव खेळला दीपक मिश्राने. आणि तो जिंकतो आहे.
जी अत्यन्त धक्कादायक ,आश्चर्यकारक , कौतुकास्पद गोष्ट त्याच्याबद्दल कळली ती म्हणजे हा दीपक कुमार मिश्रा आयआयटी मुंबई मधून अभियंता झाला आहे. तो अमेरीके संबंधित एरोस्पेस रिसर्च आणि डेवलपमेंटचं काम करीत होता. गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती.

वाराणसी या शिवनगरीत त्याचा जन्म झाला. तिथे त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आणि बारावीनंतर आयआयटी मुंबईत त्याने कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर  प्रवेश मिळवला. उच्च प्रकारची नोकरीही मिळवली.
पण कॉलेजमध्ये असतानाच तो जहाल किडा त्याला चावलाच. एकदा की हा किडा चावला की मग याच्या संसर्गावर इलाज नसतो. या अभिनयाच्या , कलेच्या  किड्याला 'सुलेमानी किडा'ही म्हणतात. या सुलेमानी किड्याचं आणि दीपक शर्माचं जवळचं नातं आहे.

त्याने नोकरी सोडली आणि अभिनय ,दिग्दर्शन क्षेत्रात स्वतःला पडताळून पाहण्यास सज्ज झाला.अनेकांनी त्याला त्याच्याकडे चौकटीबद्ध चेहरा , शरीरयष्टी नसल्याचं सांगितलं. चूक करतोय सांगितलं. तरीही त्याने हिमतीने नोकरी सोडली. पण स्वतः त्यालाही त्याच्या दिसण्याबद्दल वास्तवाची कल्पना होती.त्यामुळे दीपक मिश्राने मागील दरवाज्यातून प्रवेश करण्याचं ठरवलं. कॉलेज काळात अनेक नाटकं लिहिली आणि दिग्दर्शित त्याने केली होती. राष्ट्रीय स्तरावरील नाट्यस्पर्धेत , कार्यशाळांमध्ये भाग घेतला होता. कौशल्यगुण तर प्रचंड होते गरज होती संधीची. लवकरच त्याला संधी मिळाली ओम शांती ओम या चित्रपटात सहदिग्दर्शन करण्याची.
पुढे हॅपी न्यू इअर चित्रपटमध्ये ही त्याने सहदिग्दर्शक म्हणून काम केले. अनुराग कश्यपने मात्र त्याच्यातील कौशल्य ओळखलं. त्याला पाठिंबा दिला.पुढे तो टीव्हीएफ या वेब सीरिज, व्हिडीओज निर्माती कंपनीचा अविभाज्य भाग बनला!

सुलेमानी किडा नावाचा त्याने स्वतः लिहिलेलाआणि दिग्दर्शित केलेला  एक चित्रपट आहे.

'लगे रहो शेट्टी भाई" या अप्रतिम अश्या विडंबन व्हिडीओ मध्ये त्याने 'न्यूटन' चा रोल केला आहे. लगे रहो मुन्नाभाईमध्ये दिलीप प्रभावळारांनी गांधीजीची जशी भूमिका केली त्याच धर्तीवर रोहित शेट्टीवरील हा विडंबन व्हिडीओ आहे ज्यात त्याने शास्त्रज्ञ न्यूटनची अप्रतिम जबरदस्त विडंबनात्मक भूमिका केली आहे.
"मेकिंग ऑफ ब्रेकिंग न्यूज" हा असाच एक न्यूज चॅनल्स वरील विडंबन व्हिडीओ. यात त्याने राज आर्यन नावाच्या पत्रकाराची भूमिका केली आहे. " अटॅक ऑफ झोंबहेन्स" या रक्षाबंधनावरील गंमतीशीर व्हिडिओत त्याने काम केलंय. हे सर्व व्हिडीओज आजवर  बघितलेले सर्वोत्तम, अप्रतिम विडंबन व्हिडीओज आहे हे मी खात्रीशीर सांगू शकतो.

थ्री इडिट्स मध्ये आमीर खान, माधवन, शर्मन जोशी ,करीना कपूर इत्यादी बडे कलाकार असतानाही ओमी वैद्य चतुर रामलिंगमच्या भूमिकेत भाव खाऊन गेला.त्याचप्रकारे रुममेट्स मध्ये सुमित व्यास आणि निधी सिंगच्या अवतीभोवती असलेल्या कहाणीमध्ये पुरुषोत्तम म्हणजे दीपककुमार शर्मा आवडून जातो.

गंगा किनारच्या या कलाकाराचे कौतुक करावे तितके कमी. कुठलाही न्यूनगंड न बाळगता स्वतःवरील विश्वास बुद्धीमत्ता, जबरदस्त निरीक्षण शक्ती, या भरोवश्यावर तो एक परिपूर्ण कलाकार झाला आहे.

No comments:

Post a Comment