''मी निवासी (अ)भारतीय''
परवा काॅलेजमध्ये फाइन न भरावा लागावा फक्त याकारणासाठीच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनाला गेलो.
नाहीतर घरीच 'नॅशनल हाॅलीडे ' मस्त बिछान्यात व टीव्हीसमोर एन्जॉय करण्याची इच्छा होती, असा मी अभारतीय.
पण सकाळी व्हाइट कुर्ता, ब्लु जिन्स घालून, इतरांना हाय... हॅलो करत रांगेत लागल्यावर जेंव्हा ध्वजारोहण झाले, तालबद्ध राष्ट्रगीत म्हटलं गेलं, तेंव्हा मात्र नकळत अंगावर रोमांच उठले. छाती ताठ झाली. माझ्यातील लयास जाऊ पाहणारे 'भारतीयत्व' पुन्हा उचंबळून आले.
'प्रोग्रॅम' संपला. सर्व फ्रेंड्सना बाय करून घरी आलो. वाटेत चौकातले सिग्नल्स
'समथिंग अँडव्हेंचरस' म्हणून तोडले, कायदे सहज धुडकावले, शेवटी मला भारतीय नियम कायद्यांशी काय देणं घेणं?
मी तर फक्त निवासी भारतीय, मनाने तर अभारतीयच.
थिएटरमध्ये मुव्ही बघायला जातो, मुव्ही सुरू व्हायच्या आधी 'राष्ट्रगीत' होतं. भल्या मोठ्या शुभ्र पडद्यावर राष्ट्रध्वज डौलाने हवेत फडकताना दिसतो. तेंव्हाही अशाच भावना उचंबळून येतात. अंगावर रोमांच दाटतात. शेवटची धुगधुगी लागलेले माझ्यातील 'भारतीयत्व ' तात्पुरती चेतना मिळून माझ्यातील अभारतीयत्वावर स्वार होते. मी तेंव्हा 'सेंटी' वगैरे होतो.
'काँर्नर सीटवर' बसलेली माझी गर्लफ्रेंड मला म्हणते, "हे, व्हाॅट हॅपन्ड? डोन्ट गेट सो सेन्टी अोके! .. कम आॅन.. गेट ओव्हर इट यार.. !".
मग मी पुन्हा ''ताळ्यावर'' येतो. असा मी एक निवासी भारतीय!
कामानिमित्त किंवा काही अपरिहार्यतेने भारताबाहेर स्थायिक झालेले एनआरआय 'नाॅन रेसिडेन्शियल इंडियन्स' तिथेही सातासमुद्रापार राहून आपले 'भारतीयत्व' जपण्याचा प्रयत्न करतात. मात्र मी व माझ्यासारखेच भारतात राहून फक्त भारताला क्षुद्र व तुच्छ लेखतात.
विदेशात असताना भारतभूमीच्या आठवणीन व्याकुळ होऊन सावरकरांनी म्हटले 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ' मी मात्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर बसुन पश्चिमेकडे डोळे लावून 'ने मजसी ने अमेरिकेला, सागरा प्राण तळमळला' असं आळवतो.
पण कधी मीच अंतर्मुख होतो, माझ्या बदलत्या मनोवृतीवर चिंतन करतो तेंव्हा पुन्हा एकदा माझं भारतीयत्व उचंबळतं. स्वतःचीच लाज वाटते, कधी तिरस्कारही वाटतो.
भारताबाहेर सेटल होण्याचं स्वप्न गैर नाहीच, पण स्वतःच्या देशाबद्दल, त्याच्या प्रश्नांबद्दल अलिप्तता ठेवण्याच्या माझ्या वृत्तीचा मात्र मलाच कधी कधी संताप येतो.
माझ्यासारखेच इतर 'निवासी अभारतीय ', आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट ज्ञान असलेले ब्राइट जेनरेशन असतीलही, पण आमच्यामध्ये आपण समाजाचं, या देशाचं काही देणं लागतो ही भावनाच नाही. असे वेल एज्युकेटेड, उच्च बुद्ध्यांक असलेले आम्ही 'महानिर्बुद्ध'... 'रेसिडेन्शियल नाॅन इंडियन्स '!
परवा काॅलेजमधला 'रिपब्लिक डे'चा प्रोग्रॅम संपवुन कट्ट्यावर थांबलो तर तिथला प्रसंग धक्कादायकच. अॅन आय ओपनर!
काही तरूण तरूणींचा घोळका जमलेला, त्यांच्यात चर्चात्मक वाद सुरू होता. एका पोनी टेल टॅटु काढलेल्या मुलाला राष्ट्रगीत अर्धवट येत होतं. पुढचं 'कडवं' कोणतं यावरून वाद!
सगळेजण कोल्ड्रिंक्सच्या घोटाबरोबर स्वतःचा 'अंदाज' व्यक्त करत होते. माझंच बरोबर म्हणून त्यावर 'बेटिंग' सुरू.
मीही मुद्दाम मनातल्या मनात पूर्ण राष्ट्रगीत आठवून पाहू लागलो, त्यांना मदत करावी म्हणून..
पण हे काय..? मला स्वतःलाच पूर्ण राष्ट्रगीत आठवत नव्हते ! मला माझीच चीड, तिरस्कार, लाज वाटू लागली.
शाळा सोडल्यापासून वर्षातून दोनवेळाच आमचा आणि राष्ट्रगीताचा संबंध येतो ना!
मला एकदम आठवलं, कॉलेजमध्ये रोज 'राष्ट्रगीत' म्हणणे कॉलेजने कम्पल्सरी केल्याबद्दल, त्याच्या विरोधात 'संप' पुकारण्यात मीच आघाडीवर होतो.
तेवढ्यात दुसरीतल्या शाळकरी मुलाने येऊन त्यांची 'चूक' दुरूस्त केली. त्याक्षणी तो सच्चा भारतीय शाळकरी मुलगा आमच्याहून लाख पटीने महान भारतीय होता!
भारतीय घटनेने मला दिलेला 'मतदानाचा' अधिकार म्हणजे माझ्या दृष्टीने केवळ वेळेचा अपव्यय! आयुष्यात मी कधी मतदान करणार नाही, पण कट्ट्यावर बसून इतरांसोबत "इस देश का कुछ नहीं हो सकता.. क्या रखा है इस देश में! "
असली वायफळ बडबड मात्र करणार.
रस्याने जाताना कुठला सार्वजनिक नळ चालू जरी दिसला तरी तो बंद करायचे कष्ट मी का घेऊ? मला काय त्याचे? माझ्या देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे? असा मी तिरस्करणीय, युजलेस 'रेसिडेंन्शियल नाॅन इंडियन'!
हां! भारत पाकिस्तानला तुडवत ट्वेंटी -20, वर्ल्डकप जिंकतो तेंव्हा..
पर्थवरील फास्टेस्ट पिचवर जेंव्हा माझी भारतीय टीम आस्टेलियाची मस्ती जिरवते तेंव्हा माझा सो काँल्ड 'इंडियनिजम' उगाच उचंबळून येतो.
काही दळभद्री विघ्नसंतोषी समाजकंटक कुठल्या मूर्तीचा अपमान करतात तेंव्हा दुकानांची तोडफोड करण्यात, जाळपोळ करण्यात, दगडफेक करण्यात मीच तर आघाडीवर असतो. त्या क्षणी मी माझ्या देशाच्या संपत्तीचे अतोनात नुकसान करतो. कुठल्या समजामुळे त्याच्या प्रक्षोभक भावनांनी पेटून माझी तारुण्याची उर्मी मी विध्वंसक कार्यात उपयोगी आणतो. ते समाजकंटक तिकडे आमच्या मूर्खपणावर हसत असतात. माझ्या अश्या विध्वंसक कृत्यामुळे देशाची 'अर्थव्यवस्था' कोसळते... जाळपोळीने हजारो निष्पाप जीव भरडले जातात, पण मी हातात तलवार घेऊन रस्यावर उतरत फक्त विध्वंसच करतो, असा मी पूर्णतः एक देशद्रोही अभारतीय!
ज्या देशात सेटल् व्हायच स्वप्न पाहतो, त्या देशातील नागरिक मात्र त्यांच्या देशाची प्रामाणिक असतात हे, मला का कळत नाही? ते त्यांच्या देशाच्या प्रतिमेबाबत नेहमीच जागरूक असतात. मात्र आम्ही इथे दारुच्या नशेत तर कधी पूर्ण जाणिवेत विदेशी महिलेचा, अतिथींचा बलात्कार करतो!
आणि जगभरात आमच्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे नाव खराब होते. देशातील कीड, भ्रष्टाचाराचे मूळ आम्हीच, असे निवासी अभारतीयच!
'वंदे मातरम् ' हे काही कुठले ईश्वरी गीत नाही किंवा कोण्या विशिष्ट धर्माचे स्तुती गीत नाही. ते माझ्या देशाचे गीत आहे, ज्या गीताने मला, आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते हे गीत! या गीताला मीच 'देशद्रोही', भारतात राहून अभारतीय असणारा विरोध करतो.
मी निवासी अभारतीय हीन दर्ज्याच्या राजकारणापोटी आतंकवाद्यांच्या फाशीला विरोध करतो.
सोशिअल मिडीयावरून थोर लोकांची फक्त जाती द्वेषावरुन गलिच्छ टीका करतो आणि समाजात देशात नकारात्मकताच पसरवतो.
मीच अमर ज्योतीला लाथाडतो.
माझ्या या अभारतीयत्वाच्या दर्गुर्णांची यादी अजुन फार मोठी आहे.
प्रस्तुत माझी प्रत्येक गोष्ट ही 'नकारात्मक' आहे, वाईट आहे पण, मला पूर्ण विश्वास आहे की हा नकारात्मक भावनांचा अंधार एका पातळीवर पोचून नक्कीच नष्ट होईल. स्वच्छ, सात्विक सूर्योदय होईल.
अभारतीयत्वाच्या समुद्राच्या पृष्ठभागावर तात्पुरतं, क्षणिक उचंबळून येणारं, काही क्षण तरंगणारं व क्षणात पुन्हा खोल विलीन होणार माझं भारतीयत्व कायम स्थिर होईल! मी पूर्ण भारतीय बनेन!
सैन्यात भरती होऊनच मी माझे 'भारतीयत्व' सिद्ध करण्याची गरज नाही ते मी माझ्या नैमित्तिक कार्यातूनही सिद्ध करू शकतो!
मला विश्वास आहे उद्या मी निवासी पूर्ण 'स्वयंसिद्ध भारतीय ' सच्चा कणखर भारतीय बनेनच! आणि उद्या मी हृदयापासून म्हणेन "भारत माता की जय..!" भारतीय प्रजासत्ताक चिरायु हो! हँपी रिपब्लिक डे..!
(28 जानेवरी 2008 लोकसत्ता.
काही वर्तमानीय गोष्टी वाढवल्या आहेत.)
-अभिजित पानसे
No comments:
Post a Comment