तुम्ही हाफ म्याड आहात का? कोण नसतं म्हणा. पण ते जगजाहीर करायची इच्छा आहे का? एक सोपा मार्ग आहे घरातून निघायचं आणि हाफ गर्ल फ्रेंड बघायला जायचं.
प्रस्तुत लेखक आधीच जगजाहिररित्या म्याड आहेच. त्यामुळे आता काहीही फरक पडणार नाही.रेडा उन्हात कितीही फिरला तरी त्याची स्किन टॅन होत नाही.
ज्याने अब्बास मस्तान चा 'मशीन' थिएटर मध्ये जाऊन बघितला तो आता या सगळ्या चांगल्या वाईट हाफ वाईट सगळ्यांच्या पलीकडे गेला आहे समजावे.
तीन वर्षापूर्वीच लोकांनी नाकारलेल्या पुस्तकावर चित्रपट बनवायला जिगरा.. हिम्मत लागते! ते शौर्य दाखवले आहे सासू सुना उद्धारक क्..क्.. एकता कपुर आणि महान नृत्यज्ञानी नृत्यसमीक्षक नृत्य जजसाब , ट्विटरनिर्दालक साहित्यकार "छोटाचेतनभगत" यांनी!त्यामुळे राष्ट्रपतीहस्ते यावर्षीचा शौर्य पुरस्कार एकता कपूर आणि भगत यांना मिळण्याची शक्यता आहे.
हा चित्रपट चिंगम ..बूम बुम बुमर प्रमाणे पहिले दहा मिनिटे चांगला वाटतो नंतर बेचव रबर चावत बसावे लागतं.
भयंकर मूर्खपणाचा कळस म्हणजे ; लहान मुलीला आई बाबांनी गच्चीवर जायला मनाई केली म्हणून आई बाबांची सहज नजर चुकवुन गच्चीवर जावं अश्या प्रकारे या सिनेमात श्रद्धा कपूर म्हणजे रिया सहज फक्त एका सिक्युरिटी गार्ड ची नजर चुकवून #इंडियागेट च्या गच्चीवर जाऊन बसत असते. आणि तिच्या म्हणण्यानुसार, ती काय म्हणणार बिचारी तिचा वदविता छोटाचेतन भगत आहे ; ती नेहमीच इंडिया गेटच्या गच्चीवर जाऊन बसते. हे पाहिल्यावर ऐकल्यावर खुर्चीतून समोर कोसळायाचा बाकी होतो.
पण समोरच्या खुर्चीवरील जोडपं अंधारात चुंबन साधनेत मग्न असल्याने मी स्वतःला सावरलं.उगाच दुसऱ्यांच्या प्रणयाराधनेत अडथळा आणायला मी काय अँटी रोमिओ स्क्व्याडमध्ये थोडी आहे. मी फक्त दुःखी अंतःकरणाने डावीकडे माझ्या शेजारच्या रिकाम्या सीटकडे बघितलं आणि "गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी" म्हणत पुन्हा हाफ गर्लफ्रेंड चा अत्याचार सहन करीत बसलो. सांगणार कोणाला!
पुन्हा एक धक्का बाकीच होता. छोटा चेतनचा गेट्सशी काय राग आहे माहिती नाही इंडिया गेट प्रकरण बघितल्यावर तो "बिल गेट्स" या कुबेरावर वर घसरला आहे. एका सिन मध्ये बिल गेट्स बिहारमधील गावात येतो आणि अर्जुना रणतुंगा कपुर त्याच्यासमोर भाषण देतो.त्यात बिल गेट्स चा इतका वाईट फोटोशॉप केलाय की यापेक्षा तर इलेक्शनच्या टायमाला चांगले फोटोशॉप्स दिसतात! सतत बिल गेट्स चा फोटो शॉप्ड क्लोज अप दाखवलाय किमान दुरून तरी तो बसलेला दाखवला असता तर विश्वसनीय तरी वाटला असता.पण दिग्दर्शक मोहित सुरीने सुरी घेऊन प्रेक्षकांच्या मेंदूचा पार खिमा केलाय. इतका वर्षांचा भट कॅम्पचा(च) अनुभव असूनही मोहित सूरी अश्या हास्यस्पद चुका करत असेल तर यापेक्षा तर एकेकाळीचा धोनीचा पिठू बॉलर मोहित शर्मा चांगला मुवि बनवेल.
श्रद्धा कपूरचं बास्केटबॉल प्रेम हे फारच बॉलबोध दिसलंय. स्पोर्टमन असो वा स्पोर्टवुमन तो त्याच्या 'थाईज' वरून कळतो. इथे मात्र श्रद्धा कपूर दुरान्वये स्पोर्टगर्ल वाटत नाही. मात्र श्रद्धा कपूर #मादकेश्वरी दिसावी म्हणून खास डिझायनर शॉर्टस घालून 'मंडदर्शन' करीत दाखवली आहे. तेच काय ते जरा बरं .बाकी सिनेमा मात्र डोक्याची मंडई करतो.
मुविमध्ये शेवटी शेवटी अर्जुना रणतुंगा कपूर रियाला म्हणजे श्रद्धा क.ला शोधत असतो.तिच्या आठवणीत तळमळणाऱ्या अर्जुनाला बघून त्याचा मित्र त्याची ओळख मुद्दामून एका मुलीशी करून देतो ती असते #रियाचक्रवर्ती
ही ट्रिक ऐश्वर्या राय आणि त्याकाळी सद्विवेक हरवलेल्या विवेक ओबेरॉयच्या "क्यू हो गया ना (फ्लॉप)" मध्येही दाखवली होती. त्यात सदविवेक ओबेराय हा ऐश्वर्या राय म्हणजे त्या मुवितली 'दिया' साठी तळमळत असतो आणि
शेवटी "दिया मिर्झा" दाखवली होती.
दोन्ही मुवित कॉमन हे की दोन्ही फ्लॉप झालेत. म्हणजे हा होणार आहेच.
असो जुन्या आठवणी नको उगळाव्यात. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन ला जोडणाऱ्या पुलाखालून बरंच पाणी गेलंय. ऐश्वर्या राय चा बच्चनाभिषेक झाला. ती पर्मनंट "कांस उत्सवातली" पाहुणी असल्याने सध्या ती बार्बी डॉल बनून डौलात वावरतेय.
अर्जुन कपूरने मात्र आता आपल्या एकेकाळचा मेंटर सळमान खानच्या वहिनीवर .."मलायका अरोरावर" लक्ष केंद्रित करावे. लवकरच ती "अरबाजमुक्त स्त्री" होणार आहे.
असो,अश्या प्रकारे दोन मूर्ख स्टारकिड्स ची एक अत्यंत मूर्ख मुवि बघून आलो. कुठे तो "टू स्टेट्स " कुठे ही हाफ म्याड मुवि.
तरीही काही फूलटू बघायचंच असेल तर किशोरकुमार आणि मधुबालाचा ऑल टाइम हिट "हाफ तिकीट" बघा!!
-Abhijeet Panse
No comments:
Post a Comment