सनीडेज
अमिताभ बच्चन या वयातही काम करतात यावरून त्यांचं कौतुक केलं जातं. ते साहजिकच आहे. पण अशीच एक आणखी व्यक्ती आहे, जी त्यांच्या कामाबद्दल काहीसे अनसंग हिरो वाटते. त्यांच्या बॅटींगमुळे ते सुपरस्टार, जगविख्यात आहेत पण ते समालोचक म्हणून किती महान आहेत हे बरेचदा झाकोळलं जातं.
ते द ग्रेट सुनील मनोहर गावस्कर.
किती काम करतो हा माणूस! कोणतीही मालिका असो कुठेही दौरा असो, सुनील गावस्कर तिथे असतातच. चॅनल्सला ते हवे असतातच.
मागच्या वर्षी भारतात झालेल्या सर्व ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड मालिकांमध्ये ते स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करत होते. नंतर अडीच महिने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होते. तेथे सोनी टेन साठी समालोचन करत होते. त्यानंतर निदहास ट्रॉफीसाठी श्रीलंकेत नवोदित “डी स्पोर्ट्स” चॅनलसाठी समालोचन केलं. आता इंडियन लीग साठीही करतील. जुलैमध्ये अडीच महिन्यांचा इंग्लंड दौरा, डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे दीर्घ दौरे..नंतर इंग्लंडमध्ये वर्ल्डकपचा कुंभमेळा..हुश्श..
कोणीही कमेंरेटर हो..अननुभवी, तरुण, समवयस्क अनुभवी, सगळ्यांसोबत ते सुरेख मेळ साधतात.
भारतीय टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना वसीम अक्रमसोबत समालोचन करतात.
एरवी हुशार हर्षभोगले, अचूक परीक्षक समीक्षक संजय मांजरेकर, दिलखुलास मनाचा हसमुख व्ही व्ही एस लक्ष्मण , गोडबोल्या आकाश चोप्रा, मेन स्ट्रीम क्रिकेट मधून काहीसा बाहेर पडलेला अजय जडेजासोबत इरिटेटिंग नार्सिसिस्ट वीरेंद्र सेहवाग सोबत सगळ्यांशी जमवून आपल्या विनोदी शैलीत ,
पण गांभीर्याने समालोचन करतात.
टोनी ग्रेग, इयन चॅपल , जेफ्री बॉयकोट या, बोलताना कोणाचीही तमा न बाळगणाऱ्या त्रयीसोबत सुनील गावस्कर यांनी समालोचन केलंय.
वेळोवेळी भारताची बाजू मांडली, टीकाही केली.
ते एन्सयक्लोपिडिया आहेत क्रिकेटचे. कोणत्या मॅचमध्ये काय घडलं होतं, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीची, खेळाची माहिती.
समालोचन करताना स्वतः एकेकाळचे सर्वोत्तम बॅट्समन होते हे ते विसरून जातात, त्याचा कुठलाही अहंकार वा त्याची कुठलीही झलक ते त्यांच्या समालोचनात दिसू देत नाही.
साठ ओव्हर्स वनडे मॅचमध्ये ओपनिंगला येऊन तीसेक रन्स काढून नॉट आऊट राहणे या त्यांच्या एक मजेदार आणि टिकास्पद रेकॉर्डवरून तेच स्वतःची थट्टा उडवतात..त्यामुळे कोणी त्यांच्यावर टीका करू शकत नाही.
पिच रिपोर्ट बघावं तर सुनील गावस्कर यांचं. “पिच डॉक्टर” आहेत ते. पिचचा एक्सरे असतो त्यांच्याकडे.
एक 09/010 मधील ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये हैदराबाद ला वनडे मॅच असताना पिच रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या पिचवर मलाही बॅटिंग करायची इच्छा होते आहे. किमान पन्नास रन्स मी आजही काढू शकेल. पिचमध्ये भरपूर रन्स आहेत.
त्या मॅचमध्ये सातशेच्यावर रन्स निघालेत. सचिन तेंडुलकर ने दुसऱ्या इनिंगमध्ये 175 रन्स काढले. पण रवींद्र जडेजाच्या अत्यन्त मूर्ख अपरिपक्वतेमुळे तो स्वतः रन आऊट झाला. भारत अगदी तीन ते चार रन्सने मॅच हरला. त्यावेळी जडेजा आऊट झाल्यावर कमेंट्री करताना गावस्कर जसे चिडले होते तसं नंतर फार क्वचित दिसलेत. जडेजा त्याच्या चुकीमुळे रन आऊट होण्यापूर्वीच गावस्कर त्याच्या धावण्याच्या पद्धतीवरून टीका करत होते. पुढच्या क्षणाला तो तसाच आऊट झाला.
ती मॅच एक न विसरल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट निगडित दुःखी आठवणींपैकी आहे. प्रचंड मोठया टार्गेटचा पाठलाग करताना थोडक्यात भारत हरला होता.
सुनील गावस्कर कधी कटू शब्दात “ऑन एअर” कान उघडणी करतात. खरंतर करायचे. पण आता तो जमाना गेला. बीसीसीआयच्या दबावाखाली आता सर्वच समालोचक गुळमुळीत बोलतात. सर्वजण बीसीसीआयचे खालमाने चाकर आहेत. सुनील गावस्करसुद्धा त्याला आता पूर्णपणे अपवाद नाहीत हे खेदाने म्हणावे लागतं. पण किमान ते त्यांच्या कॉलम्समधून थोडीफार टीका करतात.
हेही नसे थोडके.
2016 च्या वर्ल्डकपमधील भारत बांग्लादेश मॅच दरम्यान बांग्लादेशींची स्तुती केल्यामुळे आणि भारतीय टीमवर काहीशी टीका केल्याने हर्ष भोगलेसरख्या अनुभवी निष्णात अँकरला स्टार स्पोर्टसने, बीसीसीआयचा छुपा पाठिंबा असल्यानेच चहातील माशी काढून टाकावी तसं त्याला काढून टाकले. #अमिताभबच्चनने काही गरज नसताना हर्ष भोगलेचं नाव न घेता टीका करत ट्विटरवरून टीवटीव केली होती.
असो तो एक स्वतंत्र वेगळा विषय आहे.
पण त्यामुळे एकंदरीतच आता गुळगुळीत , हातचं राखून , पाठ खाजवून देणारं समालोचन करण्याचा जमाना आहे.
टोनी ग्रेग, इयन चॅपल, जेफ्री बॉयकोट आणि तत्कालीन सुनिल गावस्कर तिखट आणि बेधडक समालोचकांचा काळ गेला.
सचिन तेंडुलकरला नियमितपणे त्याच्या चांगल्या वाईट काळात त्याची पाठराखण करून त्याला प्रोत्साहन देणाऱ्या सुनील गावस्करांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट मॅचेसमध्ये मायदेशात फास्ट बॉलरविरुद्ध सचिन तेंडुलकर ‘बोल्ड’ होताना बघितल्यावर सचिन आता जुना सचिन राहिला नाही. आता त्याने निवृत्तीचा विचार करायला हरकत नसावी. हे ऐकल्यावर प्रचंड धक्का बसला होता. एरवीही तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीत मायदेशात फास्ट बॉलवर आऊट व्हायचा. पण तेव्हाचं बोल्ड होणं आणि नंतरचं यातील फरक गावस्करांनी सांगितला होता.
त्यानंतर काही महिन्यांनी सचिनने प्रथम वनडे आणि नंतर टेस्टमधून निवृत्ती घेतली.
“मृत्यच्या काही क्षणापूर्वी मला धोनीचा वर्ल्डकप फायनलमध्ये मारलेला विनिंग सिक्सर बघायला आवडेल!” हे गावस्करांनी म्हटलेलं वाक्य प्रसिद्ध आहे.
पण त्यामागेही थोडी वेगळी पार्श्वभूमी आहे. असो.
सुनील गावस्कर यांच्या कमेंट्रीमुळे वाद फार उदभवले नाहीत. पण 98च्या काळात एका डे नाईट मॅचमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना कॅप्टन #मोहम्मदअजहरुद्दीन लवकर आऊट झाल्यावर परत येताना “देअर इज नो टूमारो…” असे गावस्कर बोलले. हे अजहरुद्दीनच्या कानी पडले. ( कसं ऐकू आलं याचं आश्चर्य वाटतं.) पण त्या वाक्यचा अजहरने अर्थ काढला की देअर इज नो टूमॉरो फॉर अजहरुद्दीन, म्हणजे अजहरला आता भविष्य नाही असं गावस्करांचं म्हणणं आहे.
त्यावरून अजहरुद्दीनने फार आकांड तांडव केला होता.
नंतर गावस्करांनी स्पष्ट केले की त्यांनी देअर इज नो टूमॉरो म्हणजे ती मॅच हरल्यावरभारत एक दिवसांनंतर होणाऱ्या फायनलमध्ये पोहचू शकणार नव्हता. त्यामुळे आता भारतीय टीमला या सिरीजमध्ये भविष्य नाही असे म्हणायाचे होते.
सुनील गावस्करांचे क्रिकेट खेळताना विनोदबुद्धीचे किस्से प्रसिध्द आहेतच. पण समालोचन करतानाही ते या वयातही ते गंमतीदार शब्द तयार करतात.
हिंदी कमेंट्री करताना “डॉट बॉल”ला “#बिंदी_बॉल” म्हणतात. खराब टीमला ते मुंबईच्या भाषेतील ‘#पोपटवाडी’ टीम म्हणतात.
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भयंकर पिचवर भारतीय टीमने बॉलचे वार अंगावर झेलल्यावर दुसऱ्या दिवशी तीच खेळपट्टी पूर्णपणे झोपली होती. शांत झाली होती. तेव्हा लंचनंतर सुनील गावस्करांनी पिचजवळ जाऊन पूर्णपणे पालथे झोपून खेळपट्टीशी काहीतरी गमतीदार कुबुजले. ते एक फार गंमतीदार दृश्य होतं. पण सुनील गावस्करांनी ‘#मंतर’ मारल्याने झोपलेली पिच जागी झाली.
भारताने विजय मिळवला. अश्याप्रकारे याही वयात ते समालोचनाला अत्यन्त रसपूर्ण बनवतात.
पण सध्या गावस्करांचं वय झालंय हे कळतं. शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये शेवटच्या विकेट्स राहिल्यावर टी ब्रेक झाल्यावर ते म्हणाले होते की आता परत मी शंभर पायऱ्या चढून वर कमेंट्री बॉक्समध्ये जाणार नाही. कारण मॅच जिंकल्यावर पुन्हा इथे यावं लागेल. टी ब्रेक होऊन शेवटचे दोन विकेट्स जाईपर्यंत ते सीमारेषेबाहेर राहिलेत. त्यानंतर पुन्हा त्यांनी विजयानंतरचं एक्स्पर्ट ओपिनिअनचं सेगमेंट ग्राउंडमध्ये पूर्ण केलं.
भारतीय टीमचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा असताना पहाटे चार वाजता टीव्ही लावून, थंडीत ब्लॅंकेटमध्ये स्वतःला गुंडाळून डोळे मिटून अर्धवट झोपेत सुनील गावस्करांची कमेंट्री ऐकत राहणे ही एक मेजवानी असते.
या वयातही ते अत्यन्त रॉयल, हँडसम, गोड दिसतात. कधी आसामी टोपी घालून, कधी गंमतीदार पेहराव करून ते स्वतः समालोचन एन्जॉय करतात.
#कानपूरला मॅच असेल तर गावस्करांची इतर कमेन्टेटर्स खेचायचा प्रयत्न करतात. कारण सुनील गावस्करांचं ते सासर आहे. "कानपूरके दामाद" आहेत ते. पण तिथेही ते सगळयांवर भारी पडतात. स्वतःच त्यावरून गंमती करतात. कानपुरला कुठलं प्रसिध्द पानाचं दुकान, कुठे चांगली कचोरी समोसा मिळतं हे सांगतातच.
समालोचन करताना अनेकांची मिमिक्री करतात.
परवा बांग्लादेशला हरवल्यावर त्यांनीही “नागीन डान्स" केला.
सुनील गावस्कर यांना दीर्घायुष्य लाभून त्यांची कमेंट्री अनेक वर्षे ऐकायला मिळावी आणि हे "सनी डेज" असेच कायम राहावेत ही मनापासून इच्छा आहे.
हॅट्स ऑफ टू लिटल मास्टर सुनील मनोहर गावस्कर!
Take a bow great man!!
- अभिजीत पानसे
No comments:
Post a Comment