Thursday, 21 December 2017

नॉट स्टार बट अॅन ऍक्टर

किशोर कदम आणि राजकुमार राव हे दोन अभिनेते मला मुळीच आवडत नाहीत. या दोन अभिनेत्यांचा मला खूप राग येतो. यांना बघणं मी टाळतोच . कारण हे लोक त्यांना बघणाऱ्याला त्यांच्यापासून नामानिराळे राहू देत नाहीत. हे खूप जालीम, धोकादायक अभिनेते आहेत. यांचा अभिनय, काम त्यांच्या वेदना ,त्रास संसर्गजन्य असतो.
 हे लोक स्वतः पडद्यावर एकटे न राहता बघणाऱ्याला हात धरून , त्यांच्या काळजाला हात घालून स्वतःकडे अक्षरशः ओढून आणतात आणि बघणारा प्रेक्षक मग फक्त त्यांचा वेदनांचा प्रवास एक तिऱ्हाईत म्हणून डिट्याच्ड राहून फारवेळ बघू शकत नाही. तो स्वतः त्यांच्या प्रवासाचा , त्यांच्या त्रासाचा, वेदनेचा साक्षी न राहता त्यांच्यासोबत ते जगू लागतो. त्यांच्यासोबत तळमळू लागतो.अस्वस्थ होत जातो.

"राजकुमार राव". याला नाही उंची !नाही लुक्स. व्यक्तिमत्वात आयुष्यमान खुराणा, धनुष्य सारखा कुठला "एक्स फॅक्टर" नाही.
रस्त्यावरील गर्दीतील वाटणारा , सामावून जाणार एक सर्वसामान्य चेहरा. कोणी मागे वळून बघणार नाही , लक्षात राहणार नाही असा अगदी सर्वसामान्य चेहरा.
पण हा माणूस जेव्हा पात्र साकारताना कॅमेरासमोर येतो तेव्हा तो पार बदलून जातो. अफाट होतो. विलक्षण अनुभव देतो.

लव सेक्स और धोखा, रागिनी एमएमएस सारख्या वेगळी वाट जोखणाऱ्या चित्रपटांमधून करिअर सुरू करून ,स्ट्रगल करित 'वासेपुर 2 ' मधील छोटासा पण प्रभावीत करणारा रोल , #ट्रॅप्ड मधील त्याचा अंगावर शहारे आणणारा अभिनय, शाहिद साठी राष्ट्रीय पुरस्कार . आणि आता बरेली की बर्फी मधून त्याने दाखवून दिलं की त्याच्याकडे कॉमिक टायमिंगही आहे आणि चांगल्या प्रतीचा कमर्शिअल सिनेमाही तो करू शकतो.

पण याच टॅलेंटेड आणि जाणकार अभिनेत्याने "बहन होगी तेरी " सारखा अत्यन्त निकृष्ठ सिनेमाही केलाय. असो आमिर खाननेही 'मेला' केला होता.

"डी डे" हा एक खूप आवडता सिनेमा. यात हुमा कुरेशीच्या नवऱ्याचं एक सिनेमात नसलेलं पात्र आहे, सिनेमात ती दोनदा काही सेकंद फक्त फोनवर तिच्या नवऱ्याशी बोलताना दाखवली आहे. मी माझ्या काही मित्र मैत्रिणींना आजवर हा अनेकदा प्रश्न विचारलाय की डी डे मध्ये हुमा कुरेशीच्या नवऱ्याचा आवाज कोणाचा आहे?
तो राजकुमार राव चा आवाज आहे.
जेव्हा थिएटरमध्ये तो मुव्ही बघत होतो, तेव्हाच क्लिक झालं अरे हा राजकुमार राव चा आवाज आहे.
या माणसाने इथपासून स्ट्रगल केलं.

भारतीय सिनेमाला समांतर सिनेमाचीही एक परंपरा आहे जी ओम पुरी आणि इतर तत्सम तत्कालीन अभिनेत्यांनी सांभाळली ,पुढे नेली. ती आता राजकुमार राव सारखे अभिनेते समोर नेताहेत.

आता वाट आहे 'न्यूटन' ची. आणि या सिनेमात तर त्याच्यासोबत "अंजली पाटील" आहे.
अंजली पाटील , हिचा तर मी चार वर्षांपासून ऑफिशियल फॅन आहे. प्रचंड टॅलेंट, प्रचंड सुंदर पाणीदार काळे डोळे त्यातून ओसंडून वाहणारं व्यक्तिमत्व ,अत्यन्त मादक ओठ,  सेंस्युअस आणि अभिनयात तर ती वाघीण आहे.

आणि आता हे दोघे एकसाथ म्हटल्यावर अप्रतिम रसायन तयार होणार याची खात्री वाटते.

ढिम्म , दगड स्टारकिड्स, निकृष्ट मसाला सिनेमे दक्षिणेकडील बटबटीत सिनेमे यांपासून खऱ्या अर्थाने चांगली , मेहनत करून काही क्रिएटिव्हिटी करून राजकुमार राव सारखे अभिनेते वाचवतात.त्यासाठी त्याला खरंच धन्यवाद.

राजकुमार रावच्या वाढदिवसानिमित्त.

- Abhijeet Panse

No comments:

Post a Comment