Monday, 18 December 2017

वॉश रूम्सवरील सूचना फलक

मी कुठेही धाडकन दरवाजा उघडून आत जाऊ शकतो.अगदी अँग्री यंग मॅन स्टाईलने एन्ट्री नाही तरीही आत्मविश्वासाने सरळ ना घाबरता बिनदिक्कतपणे जाऊ शकतो.  पण एका जागी आत शिरायला मी दहा वेळा विचार करतो. तो म्हणजे मॉल, हॉटेल, मल्टिप्लेक्समधील मूत्रालये/ शौचालये!

"माईंड युअर स्टेप" तिथे लिहिलं असतं .मी फार फार गांभीर्याने घेतो ती सूचना.
इतर ठिकाणी, सार्वजनिक सरकारी मूत्रालये/ शौचालयांवर सगळ्या सूचना स्पष्ट असतात. 'सुलभ'पणे कोणालाही समजतात.
पुरुष/ GENTS , सोबत इथे दिशादर्शक मोठा बाण ही काढला असतो. शिवाय पुरुषाचा वर्तुळात चेहराही काढला असतो.
स्त्रिया , डोक्यावर पदर असलेलं चित्र असतं , दिशादर्शक बाण.
अगदी सगळं स्पष्ट, सुलभ सोप्पी!

 पण हे अतिशहाणे मॉल्स, मल्टिप्लेक्स, हॉटेलवाले अतिस्टाईलच्या मागे लागून असलं स्पष्ट सुलभीकरण करण्याऐवजी पुरुष वॉश रूम ला फक्त 'मिशी' तर कधी फक्त '#फुलपॅन्ट' चं चित्र असलेली पाटी लावतात. आणि त्याच्याच शेजारी असलेल्या स्त्रीयांच्या वॉशरूमला 'फ्रॉक' ची पाटी असते.

अश्यावेळी मी निसर्गाची कितीही जोरदार 'हाक' आलेली असेल तरीही प्रथम मी तिथे हाताची घडी करून ,वेळकाळानुसार आणि इमर्जन्सीनुसार हात पोट आळवुनही असु शकतात, उभा राहतो.
प्रथम शांतपणे समोरील संदिग्ध चित्रांचे ,पाट्यांचे अवलोकन करतो. त्याचे चिंतन  करतो. निष्कर्षाप्रति आणि निर्णयाप्रति पोहचतो. आणि मगच आपले पदकमल 'योग्य' त्याच दिशेने वळवून , तरीही खात्रीकरण्यासाठी हळूच दरवाजा उघडून आत बघतो. आत सम लिंगी (सम आणि लिंगी शब्दात अंतर आहे. सलग वाचू नये.)दिसलेत की निश्चिन्तपणे रुबाबात आत शिरतो . आणि सतत थोपवून धरलेल्या निसर्गाच्या हाकेला 'ओ' देतो.

राहुल गांधीं तर गुजराती मध्ये लिहिलेल्या पाट्या नाही समजू शकले म्हणून गोंधळ झाला! त्याचा इतका बाऊ कशाला करायचा!!

-अभिजीत पानसे

No comments:

Post a Comment