Tuesday 20 June 2017

वारीची चंद्रकोर, रमजान महिना, निर्गुण निराकार ईश्वर

* दिवेघाटातील सगळ्यात कठीण दिवस , नैसर्गिकरित्या तयार झालेली #चंद्रकोर आणि #रमजानमहिना! *


वारीचा आजचा तिसरा दिवस, संपूर्ण प्रवासातील सगळयात कठीण दिवस..मोठे अंतर.. घाटाचा प्रवास..एकादशीचा उपास..
पुण्याहून निघालेली माऊलींची पालखी दुसऱ्या दिवशी सासवडला बंधूंचे दर्शन घेणार असते.

पण उपाशी पोटी घाटाची चढण कसोटी बघणारी असते..
नवखा तरुण वारकरी ताणात असतो..
शरीरानेच वृद्ध अनुभवी वारकरी नवख्या तरुणाला #माऊलींवर विश्वास टाक म्हणतो, म्हातारा लहान नातीला खांद्यावर बसवून चालू लागतो, म्हाताऱ्या डोक्यावर तुळसी वृंदावन डोक्यावर घेऊन सगळ्यात समोर गेलेल्याही असतात..

तरुण नवखा वारकरी हे बघून ओशाळतो..फक्त #स्पिरिचुअलट्रेकिंग म्हणूनच आणि सोशल मीडियावर सतत चेक इन करणारा तो फोटोज टाकण्यासाठीच आलेला असतो..भक्ती वगैरे काही नसते..

लूक योग्य साजेसा यावा मिळावा म्हणून कपाळावर उभं गंध लावतो, कानात इअरफोन्स घालून मोठया आवाज वाढवून गाणे ऐकत अधून मधून मोबाईलने फोटो काढत, शूट करत चालू  लागतो..
स्वतःचं आधुनिकत्व दाखवत , इतर वारकर्यांनमध्ये मनाने  मिसळत नाही..तोंडाने माऊलीचं नाव घ्यायला लाज वाटत असते.

सूर्य ढगात लपंडाव करत असतो..घामाच्या धारा लागलेल्या असताना अचानक आभाळातून पर्जन्य धारा बरसू लागतात..

दिवेघाटात पालखी येते..शिस्तीने रस्त्याच्या एका बाजूने वारी जाऊ लागते..रस्त्यावरची पुण्याहून निघालेली, पुण्याकडे जाणारी वाहनातील लोकही कौतुकाने भक्तीने नमस्कार करतात..

घराच्या मागील गल्लीत जाण्यासाठीही गाडी काढणाऱ्या तरुणाची घाटात छाती फुलू लागते..
म्हातारे म्हातारी नाम घोषात, आजूबाजूची सृष्टी ..वारकरी नामघोषात मग्न असतात..

तरुण वारकऱ्याच्या तोंडीही नकळत नाम येऊ लागतं.
कानातील एअर प्लग्स काढून ठेवतो..
आजूबाजुला सृष्टी हिरवीगार झालेली असते..मोबाईलने अधून मधून वारीचेफोटो काढत , सुरकुत्यांचं जाळं पसरलेल्या एखादया जख्ख म्हाताऱ्या वारकऱ्या सोबत   सेल्फी काढत सोशल मीडियावर टाकत राहतो..
घाटात एकाठिकाणी सहज वरती जाऊन अंमळ  विश्रांती घ्यायला आणि "बेटर व्यू" साठी नुकत्याच घेतलेल्या डीएसएलआर ने फोटो काढायला जातो..

वरून जे दृश्य दिसतं त्यामुळे त्याच्या अंगावर शहारे येतात..वरून अंतरावरून बघतांना मानवी चंद्रकोर झालेली असते..वर #ताऱ्याप्रमाणे तळ्याचं टिम्ब ही दिसतं..मुलगा निसर्गाच्या, निर्गुण निराकार ईश्वराच्या दर्शनामुळे चाट पडतो..अष्टसात्विक भाव उचंबळून येतात..

सेल खिश्यात टाकतो आणि नाम गजरात स्वतःला हरवू  लागतो..
पांडुरंग..पांडुरंग..विठ्ठल विठ्ठल...

पालखी सासवडला पोहचते..तोवर तो वेगळा न राहता मनाने सर्व वरकाऱ्यांपैकी एक झालेला असतो.

-अभिजीत पानसे

No comments:

Post a Comment