Thursday 1 June 2017

1 जून 2006 ची ती थरारक पहाट

#1जुन_2006ची_ती_थरारक_पहाट''

     'पहाट' हा रात्रीच्या प्रहरातील शेवटचा आणि सर्वोत्तम प्रहर!निद्रादेवीचा परम्मोच्च आविष्कार या पहाटेच होतो.आबालवृद्धांपासुन प्राणी पक्षीही पहाटे साखरझोपेत असतात.
अगदी निद्रानाश असणाऱ्यांनाही ही पहाट आपली मोहिनी घालत त्यांना आपल्या कवेत घेत असते.

१जुन २००६ ची पहाट!!!!उन्हाळा निरोप घ्यायच्या मार्गी लागला होता.पावसाळा उंबरठ्यावर येउन ढगांचे दरवाजे ठोठावत होता.संपुर्ण

नागपुरकर महालवासी अशाच साखर  झोपेचा गोडवा चाखत होते.शाळा सुरू होणार म्हणुन काही मुलं हिरमुसलेली,तर काॅलेज सुरू होणार म्हणुन यंग पब्लिक आनंदात झोपली असावी..घरातील वृद्ध मंडळींचाही कदाचीत नुकताच डोळा लागलेला असणार!!

शुभ्र काॅलर लोकांसाठी रात्री जग संपुन जातं पण..पण काही काळ्या काळजाच्या नराधमांसाठी रात्रीचा काळा अंधारच त्यांच्या कुकर्मासाठी सर्वोत्तम पर्याय असतो.

अशा त्या 1 जुनच्या पहाटे सगळीकडे निरव शांतता असताना अचानक जोरदार आवाज करणाऱ्या फटाक्यांची सिरीज सुरू झाली!!त्या आवाजाने पहाटेच्या शांततेचा डोह ढवळला गेला...

'' मारो सालो को..! ''उधर से.....'' वहाॅ से कवर कर..!!''एक भी नही बचना चाहिए..!!''असे आवाज पाठोपाठ ऐकु येउ लागलेत..!!''

पुन्हा फटाक्यांचा प्रचंड आवाज!खाडकन् आम्ही सर्वच जागे झालो..कारण आवाज अगदी आमच्या घरासमोरून आणि अगदी जवळुन येत होता.
इतक्या रात्री असा भयकारक आवाज गोंधळ..धावपळ ऐकुन सर्वप्रथम सर्वच सुन्न!!
बरेचदा आयुष्यात अचानक अजाणतेपणी अनपेक्षित संकट,दु:ख वा आनंदाच्या परमोच्च बिंदुशी एकाएकी सामना झाला तर काही क्षण मनाला सुन्नावस्था प्राप्त होतेच!

सुन्नावस्थेतुन भानावर येण्याच्या संधीमार्गावर असतानाच आयुष्यात कधीही न ऐकलेली,उलट्या काळजाच्या माणसालाही मुळासकट हादरवुन टाकेल अशी आर्त,वेदनामय किंकाळी कानावर येउन आदळली!!!

 तोवर सारा अयाचीत मंदीरापासचा..नागपुर नाईट हायस्कुलजवळचा परिसर घरघरात जागा झाला होता.इकडे आमच्या सगळ्यांच्या मनात विचारांचे मोहोळ उठले होतं.

आणि तत्क्षणी 'ती' शंका माझ्या मनात डोकावली.

मी ट्युब लाईट लावायला उठलो.धावत जाउन बटन दाबुन नळी आणि विद्युतेतील अडथळा दुर केला.
क्षण दोन क्षणात ट्युब लाईट पेटला..आणि खरच माझ्या डोक्यातीलसुद्धा 'ट्युब लाईट' पेटली.
पुढे 'ती'च शंका खरी ठरली.

घड्याळाचे काटे 4:05 दाखवत होते.

पुन्हा लोखंडी बॅरॅकचे जोरजोरात आवाज..काचा फुटल्याचे..माणसांच्या ओरडण्याचे आवाज ऐकु येउ लागले!!

शेवटी मानवी मनच ते!बाहेर जे काही घडतय ते फार भयंकर आहे हे कळत असुनही मनात वेगळीच उत्कंठा मिश्रित भय अनुभवत होतो.मला बाहेरचं बघण्याची तिव्र इच्छा झाली!

आणि मी माझ्याच नकळत उठलो व समोरची खिडकी उघडुन बाहेर समोर चौकात चार रस्त्यावर बघु लागलो.

बाहेरील मिट्ट काळोखात हॅलोजनच्या दिव्याचा खांब स्थिर प्रकाश फेकत त्याच्या समोर घडत असलेल्या हिंसेचा साक्षिदार होता.बिचारा तोही त्याच्या ''उभ्या'' आयुष्यात  हे प्रथमच पाहात होता.

मला खिडकीतुन काहीच दिसलं नाही.पण मर्कट मनच ते!जुमानतं कुठे!खिडकीतुन काहीच दिसत नाहीए म्हणुन बाहेर जाउन पाहायचं ठरवलं.

क्षणार्धात दरवाजा उघडला.क्षणभर माझा 'हॅम्लेट' झाला.''बाहेर जाउ की नाही जाउ''??

पण उत्सुकतेचा भयावर विजय झाला.दिलीप काका रागवुन रोखण्यापुर्वीच मी बाहेर  पोर्चमध्ये आलो.
समोर काही दिसत नाही म्हणुन मान वळवुन बघण्याचा प्रयत्न केला..

आणि आयुष्यात कधीही यापुर्वी बघितलं नाही,कधीही विसरणार नाही असं काही दिसलं.

उजवीकडुन नागपुर नाईट हायस्कुलच्या गल्लीतुन एक पोलीस समोर धावत आला.घराला लागुनच शेजाऱ्यांची कार बाहेर होती.त्या कारच्या मागे लपला.एक क्षण जात नाही तर त्या पोलीसाच्या मागुन अचानक दोन तीन साध्या कपड्यातील रायफलधारी माणसं जोराने धावत आली.

आणि त्या लपलेल्या पोलीसाला अगदी जवळ जाउन त्यांनी त्यांच्या रायफलने गोळ्या घातल्या!!

ठिणग्या पाडत ते लोह बाहेर पडत होतं.
पुन्हा एकदा आर्त किंकाळी!!

माझे डोळे खोबणीतुन बाहेर येतील की काय जोरजोरात धडधडणारं ह्रदय छाती फोडुन बाहेर येतं की काय,अशी आमची अवस्था झाली!वरून पोर्चमधुन मला खालचं ते सारं दिसत होतं.

आणि तत्क्षणी साध्या कपड्यातल्या त्या रायफलधारी माणसांनी माझ्याकडे वर पाहिलं..आमची नजरानजर झाली.

''अंदर जाव!....दरवाजे खिडकिया बंद कर दो..!!कोइ भी बाहर मत ना निकलो..!!'' प्रचंड जरब असलेल्या अधिकारवाणीने ते ओरडले.कारण आता संपुर्ण परिसर जागा झाला होता.

वेगाने मी आत आलो.आत घाबरलेल्या आजीचं आणि Rohiniचं रामरक्षा म्हणणं सुरू होतं.आम्ही सगळेच खुप घाबरले होतो.

डोक्यात निरनिराळ्या विचारांचं थैमान माजलं होतं.मी विसरूच शकत नव्हतो की एका पोलीसाला काही माणसांनी मारलय..त्यावरून बाहेर परिस्थिती किती भयानक असेल..आणि हे सर्व मी पाहताना त्या माणसांनी मला पाहिलय..खुप भिती वाटत होती.कोणत्याही क्षणाला ते येतील आणि धाडकन दार फोडतील ..आणि आम्हालाही मारतील असं वाटत होतं.

ती पहाट पुर्ण वेगळी होती.भयप्रद होती.नकोशी होती.
एक तास जवळपास बाहेर आवाज येत राहीला.सर्व जण जीव मुठीत घेउन होते.

सगळ्यांचे लक्ष आता सूर्य उजाडण्याकडे लागलं होतं.पण प्रत्येक क्षण तासाप्रमाणे भासत होता.अखेर तासाने आकाशात गुलाबी सोनेरी प्रकाश दिसु लागला.लोकं आता घरातुन खिडक्या उघडुन पाहु लागले होते.हळुहळु लोकं बाहेर पडु लागले होते.

रस्त्यावर गोळ्यांचा सडा आणि रक्ताचं थारोळं होतं.घराच्या अगदी समोर एक सैनिकी वेषातील तरूण रक्ताच्या थारोळ्यात मरून पडला होता.खुप पोलीस जमले होते.अशा अनपेक्षीत गदारोळात कोणीही टिव्ही लावणं शक्यच नव्हतं पण काकांनी सहज टिव्ही लावला आणि तेव्हा...

 आणि तेव्हा आम्हाला नक्की काय झालय ते समजलं.माझी ''ती''च शंका खरी ठरली होती.

आज तक वर ब्रेकिंग न्युज होती,'' नागपुर मे संघ बिल्डिंग पे आतंकवादीयो का बडा हमला!!''
''लष्करे तोएबा या जैशे मोहम्मद आॅर्गनायजेशन का हाथ होने का अनुमान!''

आदल्या दिवशीच आईकडच्या एका नातेवाईकांकडे मी गेलो होतो.काकांचं म्हणजे ''श्री दिलीप अलोणी'' यांचं घर अगदी महालात संघ बिल्डींगच्या अगदी जवळ नागपुर नाईट हायस्कुलच्या अगदी समोर आहे.

आणि त्या बोळीतच दहशतवाद्यांविरूद्ध धुमश्चक्री झाली होती.संघ बिल्डिंगकडे जाणाऱ्या अत्यंत अरूंद गल्लीत आणखी दोन सैनिकी वेषातील तरूण मरून पडले होते.
एक कार रस्त्यात पोलीसांनी लावलेल्या बॅरेक्समध्ये अडकली होती.

आतापर्यंत प्रत्येकाला आतंकवाद्यांनी पोलीसांना मारले आहे असेच वाटत होते.नंतर हळुहळु माहिती मिळत गेली तेव्हा कळलं आतंकवादी पोलीसाच्या गणवेशात आले होते.आणि ठार झालेले तिघेही आतंकवादीच होते.शुर पोलीसांनी हल्ला निकामी केला होता.

झाले असे होते की दहशतवादी लाल दिव्याच्या कारमधुन दवळपास सहा किलो आरडीक्स, ग्रेनेड्स आणि एके56 रायफली घेउन बडकस चौकातुन संघ बिल्डिंगकडे जात असताना रात्र गस्तीच्या पोलीसांना दिसले.पण त्यांच्या एकंदर गाडी चालवण्यावरून पोलीसांना संशय आला.
पण लाल दिव्याची गाडी म्हणुन प्रथम काहीही न करता ते गती हळु ठेवत पाठलाग करत राहिले.

पाठलाग होतोय हे लक्षात येताच आतंकवाद्यांनी गाडी बडकस चौकाच्या समोरून जाणाऱ्या संघ बिल्डिंगकडे जाणाऱ्या अत्यंत अरूंद गल्लीत घातली.आणि पोलीसांचा संशय पक्का झाला.व त्यांना थांबण्यास सांगितले.
संघ बिल्डिंगजवळ येताच वळण्यासाठी दहशतगर्द्यांनी नागपुर नाइट हायस्कुलच्या अरूंद गल्लीत टाकली पण तिथे आधीपासुनच पोलीसांनी  बॅरॅक्स लावुन रस्त्याचे टोक बंद केले होते.

अडकलोय हे कळताच दहशतवाद्यांनी कारमधुनच गोळीबार सुरू केला व त्यातील एक आतंकवादी उतरून बॅरॅक्स काढु लागला.पण पोलीसांनी तुफान गोळीबार करत टिपले.

तर दुसरा पळुन नाईट हायस्कुल समोरील कारमागे लपला.पोलीसांनी त्यालाही जवळुन गोळ्या मारल्या व संपवला.हेच दृश्य मी पाहिले होते.

एका आतंकवाद्याने ग्रेनेड फेकण्यासाठी पीन तोंडाने काढतानाच त्याच्या गालातुन गोळी आरपार गेली.व सुदैवाने तो हॅण्डग्रेनेड फुटला नाही.शुर पोलीसांनी तीनही दहशतवाद्यांना संपवुन मोठी कामगिरी केली होती.
आरडीक्स चा साठा पाहता संघ बिल्डींगसकट आम्हीही त्या दिवशी जमीनदोस्त झालो असतो.

एव्हाना आमच्या घरासमोर लोकांचा पुर आला होता.त्यातल्या त्यात आमची गच्ची अगदी सगळं बघण्यासाठी योग्य असल्याने ओळखी अनोळखी लोकांनी गच्च भरली होती.
सगळ्यांसाठी मग चिवडा,चहा सुरू होता.सोबत संघबिल्डिंग हल्ल्यावरच्या गप्पा चवीला!

हाहा म्हणता बातमी दगभर पसरली.सकाळपासुन फोन खणखणत होता.आम्ही मुलं  Ajit..रोहिणी कधी बाहेर जाउन कधी गच्चीवरून,जिन्यातुन तर केव्हा घरात बसुनच टिव्हीवर घराबाहेरचं 'लाइव्ह' दृश्य बघत होतो.

आम्ही काही जणं मुद्दाम कॅमेरासमोर येण्याचा प्रयत्न करत होतो.एका वाहिनीवर आमची थोबाडं  झळकली होती.

पोलीसांचा गराडा,श्वान पथकं,बाॅम्ब निकामी पथकं,सगळे हजर होते.पोलीस प्रत्येक बुलेट,हातबाॅम्ब भोवती पांढऱ्या रंगाने गोल करत होते.चित्रपटात पाहिलेलं प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहत होतो.

आज 1जून आहे.वर्षे उलटलीत पण त्या आठवणी व तो थरार अजुनही आठवतो.फक्त आता त्यावर गंमती केल्या जातात इतकच.शेवटी मनुष्य स्वभावच तो.

(पूर्व प्रसिद्धी 1जून 2009, लोकसत्ता)

लोकमत

-Abhijeet Panse



No comments:

Post a Comment