Friday 16 June 2017

'सरकारने आता या वारीवर बंदी आणायला हवी"

''सरकारने आता या वारीवर बंदी आणायला हवी''

"सरकारने आता या वारीवर बंदी आणायला हवी''!
"दुसऱ्याच्या गावात जाऊन त्यांच्या गावात घाण का करावी''?
 ''श्रद्धा ही अंतर्वस्राइतकी वैयक्तिक गोष्ट असावी तिचं वारीद्वारे प्रदर्शन करण्याची काय गरज''?
 ''वारकऱ्यांनी पंढरपुरला जाउन स्वत:ची उर्जा वाया घालवण्यापेक्षा गावात तलावे विहिरी बांधावीत..श्रमदान करावं.'' वगैरे..

दरवर्षी पावसाळ्यात अचानक बेडकांचं पीक निघतं आणि जिकडे तिकडे त्यांचं #डराॅव_डराॅव सुरु होतं त्याप्रकारे दरवर्षी वारी आली की या #कुपमंडुकांचं त्याविरोधात सोशियल मिडियावर घरात लोळत आणि न्युज चॅनल्सवर असलं डराँव डराँव सुरू होतं.

सगळयात गंमतीची गोष्ट म्हणजे ह्या बेडकांपैकी कोणीही स्वतः पंढरपुरात पैदा झालं नसतं वा पंढरपुरात राहत नसतं अस्सल मुंबईकर मुंबई च्या कधीही वाईट म्हणणार नाही मुंबईला नावं ठेवणारे बाहेरचेच असतात हे #पुलं.नी म्हटलंय. त्याचप्रकारे मुळचा पंढरपुरकर वारीच्या नावाने बोटं मोडीत नाही. आमच्या गावात येऊन आमच गाव खराब का करता असा जाब वारकऱ्याला विचारत नाही.आषाढी कार्तिकी वारी बंद व्हावी अशी इच्छा करत नाही.

एरवी वर्षभर आपण आपलं घर रोजच नीट,स्वच्छ व्यवस्थित ठेवतोच.पण वर्षातुन एकदा,दोनदा घरी पाहुणे आलेत,सोबत लहान मुलं असलीत तर ते दोन तीन दिवस घरात पसारा होतोच.चादरी चुरगळतात..घरात अन्नपदार्थ विखुरणं..दंगामस्तीने व्हाॅल्युम वाढतो..रोजचा दिनक्रम,घराची शिस्त,काटेकोरपणा,यांना दोनदिवस सुट्टी मिळते.एरवी रोजची शिस्त आणि शांतताही या उत्साहात व उत्सवात विरघळुन जात संपुर्ण घर #चार्ज्ड_अप होतं.घरातील माणसांसकट निर्जीव भिंतीसुद्धा हे उत्साहाची स्पंदने शोषुन रिफ्रेश होतात.

अशावेळी घरातील पाहुण्यांमुळे लोकांची संख्या वाढल्याने होणारा पसारा, काही कराव्या लागणाऱ्या तडजोडी ह्यांचं काहीही वैषम्य वाटत नाही. पाहुणे गेले की आपलंच घर असल्याने आनंदाने पुन्हा घर नीट आवरलं जात. रोजचा दिनक्रम सुरु होतो.  पाहुण्यांना ''पुन्हा पुढच्या वर्षी या..येत रहा अधुन मधुन'' म्हटलंच जातं.

त्याचप्रकारे या वारीच्या काळात संपूर्ण पंढरपूर चैतन्यमय झालेलं असतं. जिकडे तिकडे #नामाचा_गजर, कुठे कीर्तने, प्रवचने सुरु असतात.
#ग्रासरूट_लेवल वर हार,फुले, प्रसाद,खाद्यपदार्थ,लाॅजिंग बोर्डिंग पासुन  तर लाॅकर्स, जोडे चपला ठेवण्यापर्यंत व्यवसाय चालतो.त्यामुळे #वारी ही पंढरपुरच्या 'सिस्टमचा' अविभाज्य भाग आहे.

पंढरपूरचा रहिवासी पंढरपूरच्या वारीला स्वतःच्या गावची शान समजतात.कारण वारीमुळेच जागतीक पातळीवर गावाचं नाव गेलं आहे.गावात दुसरं नवीन मोठं  बस स्टँन्ड तयार झालय, प्रमुख रेल्वेने जोडल्या गेलंय.. इंजिनिअरिंग काॅलेज आलं आहे.महाराष्ट्रातील सर्वोत्तम इंजि. काॅलेजेस पैकी पंढरपुरचं इंजिनिअरिंग काॅलेज एक आहे.
पंढरपुर गाव न राहता ते सुखसोयींनीयुक्त शहर झालं आहे. ग्रास रूट ते लार्जर स्केल वारीचा प्रभाव प्रचंड आहे.

पंढरपुरकर वारकऱ्यांचं  मनापासून स्वागत करतो. गावाला आपलं घर मानतो.पर्यायाने, नैसर्गिक न्यायाने कुठेहीे लोकसंख्या वाढल्याने  कचरा, अस्वच्छता होणारच हे त्याने स्वीकारलेलंच असतं.
शेवटी घर असो व गाव, पाहुणे आलेत किंवा काही दिवसांसाठी लोकसंख्या वाढली तर तडजोडी या कराव्याच लागतात. आणि साधा भोळा #मराठीमाणूस आनंदाने या तडजोडी करतो.

हां आता घरात पाहुणे आल्यावर ज्यांच्या कपाळावर आठ्या पडतात, "किती पोळ्या खाल?" असं जे विचारतात, ज्यांना घरात पाहुणे आलेले आवडत नाहीत.
मी, माझं घर, माझं कुटुंब आणि रोजचा दिनक्रम इतकंच ज्यांचं आयुष्य आहे त्यांना, ह्या  संकोचित वृत्तीच्या कुपमंडुकाना स्वतःला विचारवंत म्हणवून घेण्याचा आटापिटा करणारे, सोशियल अवेरनेसच्या #अर्ध्या_हळकुंडाने_पिवळी  होणारी , उथळ पाण्याला खळखळाट असणारी मंडळीच वारी बद्दल बरळतात.

वारकऱ्यांना श्रमदानाचा सल्ला देणाऱ्यांनी स्वत: आयुष्यात किती #श्रमदान केलं असतं? किती तलावं बांधलेत?किती विहिरी खणल्यात?

मुळात वारीबद्दल नकारात्मक बोलण्याचा अधिकार पंढरपुरात न राहणाऱ्या, स्वत:च्या कातडीला उन्ह,पाउस थंडीची थोडीही बाधा न होउ देता घरात बसुन फुकटचे प्रबोधन करणाऱ्यांना नाहीच!तो हक्क फक्त पंढरपुरात राहणाऱ्याला, वारीचे फायदे तोटे,वारीमुळे होणाऱ्या अस्वच्छतेची झळ पोहचणाऱ्या सामान्य नागरीकालाच आहे!
पण बोंबा ठोकताच उपरेच!!

वारीच्या काळात लोकं शहरात,नदीवर,कचरा,घाण  करतात.पण कुठलिही यात्रा म्हटली की लोकसंख्येमुळे हे होणारच!ही तर नैसर्गीक गोष्ट.
हजयात्रेत यापुर्वी तंबुमध्ये आग लागुन शेकडो लोकं मृत्युमुखी पडले आहेत.हज यात्रेबद्दल कोणीही हे ढोंगी विचारी बोलताना दिसत नाही.

सूर्यनारायणाचं कर्क संक्रमण होऊन दक्षिणायण सुरू  झालं.. काळे मेघ भरून आलेले पाहताच मोर पिसारा फुलवून नाचु लागला.. आषाढातील पर्जन्यधरा कोसळू लागल्या..पक्ष्याने पेरते व्हा म्हणण्यास सुरवात केली.. नांगरलेल्या जमिनीस मातृत्व लाभले आणि प्रत्येक वारकरी चे डोळे त्याच्या आराध्य विठ्ठलकडे लागलेत.

 स्वतः #श्रीरामाने सागरात टाकलेला #दगड बुडाला पण त्याच्याच वानरभक्ताने दगडावर ''#राम'' लिहून टाकलेला दगड मात्र तरला ते म्हणतात ना रामपेक्षाही त्याच्या #नामात जास्त शक्ती आहे त्याचप्रकारे कदाचित पांडुरंगाचेही चैतन्य हे या वारीमुळे आणि या ''वारकऱ्यांमुळे'' कायम असावं व वाढत असावं.

दरवर्षी विठ्ठलाच्या पायी डोकं टेकवुन त्याचे डोळे लागतात पुढच्या वर्षीच्या वारी कडे.
वारकरी विठ्ठलाला ''#येतो_देवा_पुढच्या_वर्षी!'' म्हणत असताना त्या पांडुरंगाचेही डोळे लागत असेल पुढच्या वर्षीच्या वारीकडे! पांडुरंग ही भावनिक होऊन वारकऱ्याला म्हणत असावा
''ये लवकर पुढच्या वर्षी मी वाट बघतोय''!!

-अभिजीत पानसे



No comments:

Post a Comment