Tuesday 13 June 2017

आणि नव्या वर्षाचा सूर्योदय झाला होता.."

आणि 2017चा सुर्योदय झाला होता..*

आई-बाबांच्या विरोधाला न जुमानता मी काल थर्टीफर्स्टच्या पार्टीला मित्रांसोबत गेलो.
पण या ओल्ड जनरेशनला आमचं सेलिब्रेशन कळतच कुठे?

बाबांच्या हुकुमाप्रमाणे नाखुषीनेच रात्री लवकर घरी आलो व झोपलो.

पहाटेच्या सुमारास मला एक स्वप्न पडले...

मी घनघोर रात्री काळोखात....

नाही! कदाचीत तोही पहाटेचा काळोख असावा!!
एका अरण्यात मी एकटाच फिरत होतो.
मनात भितीचा लवलेशही नव्हता.
चंद्राच्या दुधाळ प्रकाशात मी आपल्याच मस्तीत धुंदीत रानवाटा पालथ्या घालत होतो.मनसोक्त एकटाच  हिंडत होतो.

आणि...तेवढ्यात

अचानक मागून एक खर्जातला पुरूषी आवाज आला!

''व्हेअर आर यु रोमिंग यंग मँन?''

मी दचकुन मागे वळलो.

थोड्या अंतरावरून एक  पांढुरकी आकृती माझ्या रोखानेच पुढे येत होती.

माझ्या पोटात भितीचा गोळा उठला.

ती आकृती माझ्या दृष्ट्रीपथात आली.

एक वय झालेला वृद्ध,जरीकाठी धोतर,शुभ्र कुर्ता,चेहऱ्यावर म्हातारपणीच्या सुरकुत्या पण, तरीही तेजस्वी मुखमंडल होतं.पिकलेले केस आयुष्यातील सर्व अनुभवांचे साक्षी होते.डोळ्यांमध्ये आयुष्याची आपली संपुर्ण कारकीर्द यशस्वी झाल्याचे अपूर्व समाधान झळकत होते.

मी स्वत:ला काही क्षण हरवुन बसलो.

''काय यंग मँन!!''
कुठे भटकतोय इकडे? नवीन वर्षाचे स्वागत करायचे सोडुन तू एकटा इकडे काय करतोय?''
जवळ येत त्यांनी प्रेमळपणे विचारले.

त्यांच्या प्रश्नाने मी एकदम भानावर आलो.मनातील मघाची भिती आता नाहिशी झाली होती.आणि नेहमीप्रमाणे मला पुन्हा तारूण्याच्या आणि इतर अभिमानाने घेरले.त्यामुळे मनात त्या वृद्धाबद्दल नाराजीचा भाव आला.
मनात म्हटलं मघ्येच हा म्हातारा कशाला भेटला?पण आश्चर्य वाटले.हा वृद्ध माणुस आमच्या पिढीसारखाच बोलतोय!

चल चालुया सोबत थोडा वेळ!''तो वृद्ध म्हणाला आणि मी नाराजीनेच त्यांच्यासोबत निघालोसुद्धा.

मनात म्हटलं'' शिट यार हा म्हातारा मध्येच कशाला भेटला!फार बोअर करणार!आमची पिढी तुमची पिढी, न्यु यिअर की गुढीपाडवा..यावर लेक्चर देणार!

मी मुद्दामच खोटं हसत खोचकपणे विचारलं,''काय ओल्डी! इतक्या रात्री!जंगलात!भिती वगैरे नाही वाटत?''

मघाच्याच प्रसन्न मुद्रेने ते बोलले,''अरे मित्रा रात्रीचंच जंगल बघण्यात मजा असते ना!
पहाटेच्या या गडद काळोखानंतरच सूर्योदय होतो ना! आणि आम्हा म्हाताऱ्यांना कसली भिती!
हे बोलतानाही त्यांच्या मुखावरील पुर्णत्वास जाणारं शांत स्मित कायम होतं.

मी उपहासाने पुन्हा म्हटलं,''हे ओल्डी मला वाटतं तुमच्या घरची सगळी मंडळी,नातवंडे सगळेजणं न्यु इअर सेलिब्रेशनमध्ये बिजी असतील!तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही इकडे रागारागाने किंवा दु:खाने फिरायला आलात की काय?''

ते मोकळे हसले,''अरे बेटा मी निरपेक्ष आहे.मी कधीच कुणाकडुनही दुखावलो जात नाही!
आणि तुला कोणी सांगितलं मला हे न्यु यिअरचे सेलिब्रेशन आवडत नाही! हे आय एम अे मार्डन ग्रँडपा बेटा!अँड आय डोन्ट बिलीव्ह इन जनरेशन gap!''आणि दिलखुलास हसलेत.

त्यांचं ते मोकळं स्वच्छ हास्य निष्पक्ष बोलणं ऐकुन माझी नाराजी कुठल्या कुठे पळुन गेली आणि मला माझ्याच वागणुकीची लाज वाटु लागली.

जंगलात कुठेही न थांबता आम्ही  भटकत होतो.त्या गडद शांततेत खाली पडलेल्या  झाडांच्या असंख्य वाळलेल्या पानांतुन चालताना होणारा आवाज कानाला सुखावत होता.

आमच्या गप्पा अगदी मस्त रंगल्या होत्या.

मला हे आजोबा अगदीतरूण विचारांचे वाटले.ते अगदी मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते.शब्दात अवजडता नव्हती.आम्ही अनेक विषयांवर गप्पा केल्या.
अगदी भारतीय मुलींची ऑलिंपिकस मधील चांगली कामगिरी,भारतीय क्रिकेट टीमचं यश, तर अगदी सर्जिकलस्ट्राईक ते डिमनीटायझेशन पर्यंत..शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या तर भारत पाकिस्तान संबंध..

पण त्यांच्या प्रत्येक उत्तरात,बोलण्यात मला तटस्थपणा,त्रयस्थपणा जाणवत होता.कुठलाही विचार मत ते थोपवत नव्हते.जणुकाही फक्त द्रष्ट्याच्या भुमिकेत होते.

शेवटी ते म्हणाले,''बेटा हा तर काळाचा महिमा आहे!वी आर बाउंड टु चेंज विथ द टाईम फाॅर बेटर!''

त्यांना नवीन वर्षाच्या त्यांच्या काही संकल्पांबद्दल विचारले असता म्हणाले,'' मी कधीच कोणताही संकल्प करत नसतो.फक्त त्या त्या क्षणात पूर्णपणे जगतो..राहतो.!
आणि कुणास ठाउक कदाचित पुढच्या वर्षी मी राहणार देखिल नाही!''

त्यांच्या या शेवटच्या वाक्याने माहित नाही का मला एकदम  गलबलुन आलं...असं कुठलं नातं आमच्यात निर्माण होत होतं!!

जंगलातुन फिरता फिरता आम्ही आता एका माळरानावर आलो.

''मग कसं गेलं वर्ष 2016?'' आजोबांनी विचारलं.

''खुप वाईट गेलं हो हे वर्ष! सगळीकडे अपयशी ठरलो!तसंही मला ज्योतिषांनी सांगितलच होतं की हे 2016वर्ष माझ्यासाठी वाईटच जाणार!

त्या आजोबांनी तडक उत्तर दिलं,''कुठलंही वर्ष कधीच कोणासाठीही वाईट नसतं!काळ काय कोण्या ज्योतिष्याच्या अंकांच्या आज्ञेत आहे काय?
काळावर कोणाचंही आधिपत्य नसतं!तो स्वत: त्याचा अनभिषिक्त सम्राट असतो!ज्योतिषी,अंकशास्त्री भलेही आपल्या अंकाची वजाबाकी-बेरीज,आराखडे काढुन वर्षफल सांगत असेल पण, 'कर्म तर तुमच्या हातात असतं ना!ते तुम्ही करता योग्य केलं का? करता का? ते योग्य केलं तर प्रत्येक वर्ष चांगलच जाणार!त्यामुळे वर्षाला वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे?
ते तर माझ्यासारखच निरपेक्ष असतं!''
शेवटलं वाक्य ते जरा मिश्कीलतेने हसुन म्हणाले.

पुन्हा पुढे म्हणाले ''न्यु ईअरचं सेलिब्रेशन आटोपल्यावर तुम्ही थोडं आत्मचिंतन करा!मी यावर्षी कोणत्या चुका केल्यात आणि निर्णय घ्या की,या पुन्हा होणार नाहीत!स्टाॅप ब्लेमिंग अदर्स अँन्ड बी रेडी टु टेक रिस्पाॅन्सिबिलिटीज आॅफ युअर ओन अॅक्शन्स!''

आम्हा चालतच होतो.ते आजोबा कुठेही न थांबता चालतच होते.समोर हिमाच्छदित पर्वत शिखरं चंद्राच्या प्रकाशात अस्पष्ट चमकत होती.नक्कीच  हिमालय असावा.खुप सुंदर दृश्य होतं.

 ते पुढे बोलु लागले,''मला तुमच्या पिढीवर पूर्ण विश्वास आहे!पण तुम्ही म्हणता मागचे वर्ष किती सहज निघुन गेले कळलेच नाही!
अरे कसं कळणार?
तुम्ही इतके सहज दिवस वाया घालवता!दिवसा दिवसांनीच वर्ष बनतं.दर वर्षी केलेले संकल्प सहज विसरता!पण काळ कधी थांबतो का!तुम्हाला कळतही नाही!मुठीतुन वाळु जशी अलगद निसटते, तसे दिवस जातात आणि शेवटी उरतात त्या कडु गोड आठवणी!

पण आम्हाला गेल्या वर्षाशी काही देणं घेणं नसतं उत्सुकता असते फक्त पुढील वर्षाच्या स्वागताची!
शेवटी मावळत्या सूर्याला कोण नमस्कार करतं?"

जवळुन एक अरूंद नदी खळखळाट करत वाहत होती.माझ्या डोक्यातही आता विचारांचा जबरदस्त प्रवाह वाहत होता.ते आजोबा नदीकडे बोट दाखवत म्हणाले,''आपणही या नदीसारखं वाहतं असावं!कारण जिथे पाणी साचतं तेथे शेवाळ साचतं!''

त्यांच्या प्रत्येक वाक्याने माझ्या मनात अनेक तरंग उमटत होते.प्रथमच मी एका योग्य दिशेने विचार करत होतो.

चंद्र पश्चिमेकडे कलत होता.एका छोट्या लाकडी पुलावरुन आम्ही नदी ओलांडुन पुढे गेलो होतो.कानावर खळखळाट अजुनही येत होता.बर्फाच्छदीत डोंगरंही आता  जवळ आली होती.

''मी त्या आजोबांना माझ्या दु:खाचं कारण सांगितलं.एका अत्यंत जवळच्या नातेवाईकाचा आणि काही जवळच्या नात्यांचा मृत्यु झालेल्याचं सांगितलं.

तेव्हा त्यांनी खाली गळुन पडलेल्या झाडांच्या पानांवरुन सृष्टीचा ''उत्पत्ती स्थिती आणि लय'' हा सिद्धांत समजाउन सांगितला.प्रत्येक  गोष्ट ही काळाच्या उदरात गडप होणारच! 'क्षणभंगुरत्व' एन्जाॅय करायला सांगितलं.वर्तमान क्षण हेच खरा जीवन असत सांगितलं.

पहाट आता संपत आली होती.तेजस्वी #शुक्रतारा पश्चिम क्षितीजाकडे कलला होता.

बऱ्याच वेळापासुन आम्ही एक शब्दही न बोलता चालत होतो.नदीचा खळखळाटहीआता ऐकु येत नव्हता.मी पुर्ण अंतर्मुख झालो होतो.डोक्यातील विचारांचे थैमान आता शांत होत होते.
त्या आजोबांच्या सोबतच्या प्रवासाच्या सुरवातीपासुन तर आतापर्यंत माझ्यात आमुलाग्र बदल होत होता.तारूण्याचा अवास्तवी अभिमान आणि इतर काही न्यूनगंड, पूर्वग्रह केव्हाच गळुन पडले होते.मला हे सगळं नवीन भासत होतं. त्या आजोबांबद्दल मला आता विलक्षण प्रेम वाटत होते.असं वाटत होतं हा प्रवास कधी संपुच नये.

समोर पुर्वेकडे एक विशाल दरी पसरली होती.
ते आजोबा अचानक त्या दिशेने चालु लागले.
माझी मुद्रा प्रश्नार्थक झाली.ते अगदी कड्याच्या टोकाजवळ उभे राहुन माझ्याकडे वळले व म्हणाले,
''बेटा आपला प्रवास येथपर्यंतच होता!तु आता परत जा!''

मला त्यांच्या विरहाची कल्पनाही सोसवत नव्हती आणि माझ्या भावनांचा बांध फुटला.अश्रुंचा प्रवाह पापण्यांचा अडसर झुगारत गालांवर ओघळला.

आणि मी माझ्या मनातील 'तो' प्रश्न त्यांना विचारला.

''आजोबा तुम्ही कोण आहात?''

त्यांनी मंद स्मित केलं व बोलले,''बेटा,तु अजुन मला ओळखलं नाहीस?
अरे मी आहे वर्ष 2016!आणि मला तर गेलच पाहिजे!
काही क्षणात सुर्योदय होणार आहे!नवीन वर्ष जन्माला येणार आहे!

हे सगळं अटळ असतानाही मी त्यांना ''न जाण्याबद्दल'' विनवु लागलो तेव्हा ते म्हणाले,''अरे मला विसरा..मी जातो आहे..पण मी तेव्हाही होतो आणि नंतरही राहील..!फक्त माझे  रूप आणि नाव बदलत राहतील..कारण मी तर अनादी..अनंत आहे..!
आणि बेटा,तुमच्या नवीन वर्षाच्या जल्लोषात मला आता जागा कुठे आहे? मी गेल्यावर माझी साधी आठवणही राहणार नाही.
म्हटलं ना सगळा काळाचा महिमा!

पण बेटा मला विसरा पण मी काय शिकवले ते विसरू नका..!

जा तु आता..तुम्हा सगळ्यांच्या सर्व कटु आठवणी मी घेउन जातोय!''

माझ्या डोळ्यातुन सतत अश्रु वाहत होते.मी त्यांना शेवटची एक विनंती केली त्यांना नमस्कार करू देण्याची!

त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवलं.त्यांनी माझ्या डोक्यावर वात्सल्याचा हात ठेवला.
मला आशिर्वाद मिळाला होता...प्रत्यक्ष काळाचा..!

क्षणभर सारं स्तब्ध वाटलं..

मी डोळे उघडले...
समोर कोणीच नव्हतं.
फक्त उरली होती जाणीव त्यांच्या स्पर्शाची!

मी पुन्हा गहिवरलो.
मला एकदम त्यांचे शब्द आठवले.
''आली जरी कष्ट दशा अपार
न टाकिसी धैर्य तथापि थोर
केला जरी पोत बळेच खाली
ज्वाळा तरी त्या वरती उफाळे''

 समोर दरीच्या मागे पर्वतापलिकडे केशरी लाल सूर्यबिंब उगवत होते...

माझ्या अश्रुंनी भरलेल्या डोळ्यातुन सोनेरी किरणे चमकत होती.

2017 चा सुर्योदय झाला होता....

_Abhijeet Panse


No comments:

Post a Comment