Monday 5 June 2017

जैसा ज्याचा खेळ तैसा फळ देतो रे अंपायर

पु.ल.देशपांडेंनी म्हटलय की ''रोजचा  दारावर येणारा  पोस्टमन जर साध्या कपड्यात बाहेर भेटला तर त्याला ओळखणं कठीण असतं!''

मला हे वाक्य क्रिकेट अंपायर साठी तंतोतंत लागु पडतं असं वाटतं.
क्रिकेट अंपायर्सना फक्त त्यांच्या पांढरा किंवा लाल शर्ट,काळी पँट,आणि त्यांची गोल टोपी यातच आपण बघत असतो.

एकवेळ इंग्लंडच्या राणीचे हात उघडे दिसतील!पण अंपायर बोडख्या डोक्याचा दिसणार नाही!यांचं डोकं आणि एलिजाबेथ राणी आज्जीचे हात नेहमीच झाकलेले असतात.

उद्या जर न्युझिलंडचा अंपायर बिली बाउडन बर्म्युडा आणि हुड टीशर्ट घालुन घालुन नागपुरात हल्दीराममधुन संत्रा बर्फी घ्यायला आला..किंवा मुंबईत चौपाटीवर बर्फ का गोला खायला आला.. तर त्याला कोणी ओळखु शकेल का?

अंपायरचं ग्राउंडवरील अस्तित्व हे बाथरूमधील गिझरसारखं असतं.जोवर ते नीट काम करेनसं होत नाही तोवर त्याची कोणी दखल घेत नाही असं शिरीष कणेकरांनी म्हटलंय.

पुर्वी विकेट किपींगला थँकलेस जाॅब म्हटलं जायचं.पण धोनी,गिलख्रिस्ट आदि विभुतींनी कॅप्टन झाल्यावर या कामाला जरा ग्लॅमर आणलं.पण युगानुयुगे अंपायरींग मात्र थँकलेस जाॅबच राहिलाय.

घरातील तरूण नातवंडांनी अंथरूण..बिछाना झोपोतुन तसाच अस्ताव्यस्त टाकावा आणि वृद्ध आजोबांनी वेळोवेळी तो व्यवस्थित करावा तसे हे बिच्चारे अंपायर्स सतत खेळाडुंनी स्थानभ्रष्ट केलेले स्टम्स-बेल्स नीट लावत असतात.

कंबरेचं,मणक्यांचं दुखणं लागायची पर्वा न करता तासनतास एका जागी उभे राहतात.

हे अंपायर्स म्हणजे भव्य दिव्य..ऐतिहासीक वास्तुच्या पायरीचे दगड असतात.ह्या बिचाऱ्यांकडे कोणाचही खास लक्ष जात नाही.

पण तरिही काही अंपायर्स मनावर छाप सोडुनच जातात!

1996 च्या वर्ल्ड कप पासुन बालवयात क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याची तिव्र बाधा झाली.तेव्हापासुन प्रथम आवडलेले अंपायर म्हणजे ' श्रीयुत डेवीड शेफर्ड'.

गुबगुबीत शरीर.मान,गळा,गाल,हनुवटी एकमेकात मिसळलेले..हे डेविड शेफर्ड म्हणजे एक टेडी बेअरच होते!

नेल्सन स्कोअर झाला( म्हणजे 111,222 ....)की एक पाय वर गुडघ्यात दुमडुन खालच्या पायाने तीन छोट्या उड्या मारायचे!
आम्ही मित्र ह्या टेडी बेअरच्या उड्या पाहायची उत्सुकतेने वाट बघत असु.कॅमेरामनही आठवणीने ते दाखवायचा!

''बिली डाक्ट्रोव्ह''; दक्षिणेकडे रेल्वेने जाताना  आंध्रा,तेलंगणाचे टीसी जसे असतात तसे हे दिसायचे.

पु.ल.देशपांडेंच्या 'म्हैस'मधील
 ''डायव्हर कोनेे?'' जड आवाजात विचारणारे हवालदार साहेब कसे दिसत असतील तर या बिली डाॅक्ट्रोव्हसारखे असं मला वाटतं..जड भावनाशुन्य चेहरा..काळ्या सावळ्या चेहऱ्यावर जाड मिशी.....

''स्टिव्ह बकनर'' तर जगप्रसिद्ध अंपायर.
एकवेळ जावेद मियांदादचा चेतन शर्माला मारलेला 'त्या' सिक्सरबद्दल त्याला जुने क्रिकेट प्रेमी माफ करतील,
आफ्रिदीने एशिया कप फायनलमध्ये अश्विनच्या शेवटच्या  बाॅल  सिक्सर मारून जिंकल्याचं आम्ही विसरू..!!
पण या थेरड्या स्टिव्ह बकनरला माफी नाहीच!!

आयुष्यातील सहस्त्रचंद्र दर्शनापर्यंत समंजस चांगला असलेला कोणी म्हातारा अचानक पत्रिकेतील बिघडलेल्या शुक्राची महादशा अंतर्दशा एकदम सुरू झाल्याप्रमाणे आचरट चाळे करायला लागावा तसा हा स्टिव्ह बकनर बरीच वर्षे  आदरणीय अंपायर होता पण कारकर्दिच्या शेवटच्या काही वर्षात याने प्रत्येक भारतीयाला..सचिनप्रेमींना दु:ख..वेदना दिल्यात.

त्याचा भारतीय टीमवर आणि विशेष तेंडुलकरवर राग उघडपणे दिसु लागला होता.त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे सचिनचे कित्येक शतकं हुकलीत आणि भारताने मॅच हारल्यात.(त्या कुप्रसिद्ध 08 जानेवरातील 'मंकी प्रकरण' झालेली  सिडनी टेस्ट मॅच सहित)

ह्या स्टिव्ह बकनर आणि ट्युब लाईट मध्ये नेहमी मला एक साधर्म्य जाणवायचं.
बाॅलरने अपील केलं म्हणजे ह्या ट्युब लाईटचं बटण दाबलं गेलं की हा काही सेकंद शुन्य नजरेने समोर पाहत राही मग प्रथम स्टार्टर चा लाईट जसा चालुबंद होतो तसा 2..3 वेळा हा मान वरखाली होकारार्थी हलवायचा आणि मग त्यानंतर ट्युब पेटावी तसा हात वर नेउन तर्जनी उर्ध्व करायचा..

काही बाॅलर याचा स्टार्टर लाईट उघडझाप करू लागला म्हणजे मान डोलु लागल्याबरोबरच आउट केल्याचा आनंद साजरा करायला लागायचे तर्जनी वर जाण्यापुर्वीच.

 असा हा सहा फुटी मख्ख चेहऱ्याचा
 'ब्लॅक माम्बा' बक(वास)नर.

आॅस्ट्रेलियाचे ''सायमन टफेल''. एकदम जंटलमन माणुस!आदरणीय,विश्वसनीय, अचुक निर्णय देणारा,ICC द्वारे सर्वोत्तम अंपायर चे अवार्डस जिंकणारा अंपायर..माझा सर्वात आवडता अंपायर..हे फारच लवकर निवृत्त झाले.ह्यांना मी अजुनही मिस करतो.

आपण भारतीय सायमन टाॅफेल सोबत एक महत्वाचा बाँड शेअर करतो तो म्हणजे 2007 &2011 दोन्ही जिंकलेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये हेच अंपायर होते.

 अंपायरकडुन प्रामाणिकता,नि:पक्षताच अपेक्षित असते.तेच त्यांचं काम असतं.पण कुंपणच शेत खायला लागल्यावर विश्वास कोणावर टाकणार!
''असद राउफ'' हा पाकड्या असाच एक थर्ड क्लास अंपायर!
पैसे खाउन चुकीचे निर्णय देणारा..ह्याचे विडीओजही लिक झाले होते.2वर्षापुर्वी ह्याला भारतात अटक होणार कळताच IPLच्या एका मॅच नंतर रात्रीतुन त्याच्या पापस्थानात शेपुट खाली करून पळुन गेला!

चिटींग पाकिस्तानच्या रक्तातच आहे!मग ते कोणतंही ग्राउंड असो.क्रिकेट ग्राउंड असो की बॅटल ग्राउंड!

लता मंगेशकर एकदा पाकिस्तानच्या कॅप्टन झहीर अब्बासला म्हणल्या होत्या की आम्ही तर अकरा जणं खेळतो पण तुम्ही तुमच्या देशात तेरा जणं मिळुन खेळता!11+ 2 अंपायर.

पण पाकिस्तानची प्रतिमा सुधारणारे 'अलीम दार' हे अंपायर!अत्यंत चांगले,अचुक अंपायर.

भारताविरुद्ध late nineties मधे खेळलेल्या प्लेयर्स पैकी अॅलन डोनाल्ड,डिवीवियर्स नंतर सर्वात जास्त राग मला यायचा तो श्रीलंकेचा कुमार धर्मसेनाचा.
हा भारताला बाॅलिंगने आणि प्रसंगी त्याच्या बॅटिंगने नेहमी त्रस्त करायचा.
पण आज एक चांगला अंपायर म्हणुन ओळख निर्माण करतोय.

अंपायरींगमध्ये थोडीफार गंमत,प्रेक्षणीयता आणली ती न्युझिलंडच्या ''बिली बाउडने''!
चौका,सिक्सर देतानाची त्याची वेगळी शैली..आउट देताना कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे नेहमीच वाकडं असणारं त्याचं बोट..असा हा दिलखुलास अंपायर!

 ''डॅरेल हार्पर'' आणि ''डॅरेल हेअर'' हे दोन आॅस्ट्रेलियन वागग्रस्त अंपायर! दोघेही भारतीय क्रिकेटद्वेषी.दोघांनिही वेळोवेळी तसे विधानंही केलीत.यातही डॅरेेल हेअर आशियाई टीम्सवर,बाॅलर्सवर जाम उखडलेला असायचा!
हरभजन सिंग,सकलेन मुश्ताक आणि द ग्रेट मुथ्थैया मुरलीधरनवर 'चकर्स' असल्याचा आरोप केला होता.

मुरलीधरनचा तर हा फार द्वेष करायचा!
मुरलीचे सलग 'नो बाॅल' देणारा हाच डॅरेल हेअर.ते प्रकरण इतकं पुढे गेलं होतं की श्रीलंकेतील ''तामिळी वाघांनी'' या हेअरला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काही मॅचेस चुकीच्या  अंपायरींगमुळेही गाजल्या आहेत.त्यातलीच एक ''मार्क बेन्सन'' आणि ''स्टिव बक(वास)नर'' यांच्या चुकीच्या अंपायरींगमुळे गाजलेली कुप्रसिद्ध सिडनीची मंकीगेट टेस्ट.

गांगुली विरूद्ध ड्राॅप्ड कॅच चे अपील झाल्यावर या बेशरम बेन्सनने थर्ड अंपायरला विचारण्या ऐवजी विरूद्ध टीमच्या कॅप्टनला विचारलं होतं पाँटिंग पंटरने साहजिक आउट असलेलं सांगितलं.संपुर्ण टेस्टमध्ये 10 च्या वर चुकीचे निर्णय दिले गेले परिणामी ड्राॅ होणारी टेस्ट शेवटच्या तीन ओवर्समध्ये मायकल क्लार्क सारख्या पार्ट टाईम बाॅलरसमोर

''मेरे दो अनमोल रतन एक है बेन्सन तो एक बकनर''
म्हणत पंटर पाॅँटिगने जिंकली होती!

''वेंकटराघवन'' नंतर मात्र एकही प्रसिद्ध भारतीय अंपायर झाला नाही.

 काळ बदलत गेला.. क्रिकेट मध्ये अॅडवान्स टेक्नाॅलाॅजी येत गेली आणि अंपायर आता फक्त हाता पायाच्या कवायतीपुरतेच राहिलेत.

 पु.ल.म्हणतात पोस्टमन जर प्रत्येक पत्रातील मजकुरात गुंतायला लागला तर त्याला दिवसभरात तीन पत्रेही टाकणं कठीण होउन जाईल.

पोस्टमन जसा अलिप्ततेने पत्र टाकत जातो तसे हे अंपायरसुद्धा हजारो लोकांच्या उपस्थितीत,श्वास रोखुन धरणाऱ्या,ह्रदयगती वाढवणाऱ्या,बंद पाडणाऱ्या सामन्यातही शांतपणे अलिप्ततेने आपलं कर्म करीत राहतात.
जिंकलेली टीम जल्लोषात असते..हरलेली निराशेत पण हे अंपायर्स फक्त अलिप्ततेने 'शेक हॅँड' करून निघुन जातात.

पंढरपुरातील पांडुरंग ''कटीवरी हात विटेवरी उभा'' स्थितीत सर्व काही चांगलं वाईट..होणारे बदल बघत असतो तसा हा अंपायर ''कटीमागे हात यष्टीमागे उभा'' पोजमध्ये सर्व काही लक्षपुर्वक बघत असतो.

गीतेत श्रीकृष्णाने म्हटलय की तो व्यक्तीच्या कर्मक्षेत्रात ढवळाढवळ करत नाही.फक्त अलिप्त द्रष्ट्रा राहतो.पण चांगल्या वाईट कर्माचे फळ मात्र देतोच.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
त्याचप्रकारे
''जैसा ज्याचा खेळ तैसा स्कोअर देतो रे अंपायर..''

-Abhijeet Panse


No comments:

Post a Comment