"बिघडा हुआ शेहजादा..ए ब्ल्यु आइड बॉय"
चित्रपटातील एक पात्र; बडे बाप की बिघडी हुई औलाद.. इतरांना तुच्छ लेखत आपल्याच तोऱ्यात राहणारा, मस्तावलेला , नुकताच विशीतला, जवानी का जोश असलेला , मग्रूर असा एक बिघडलेला नौजवान .. मात्र टक्केटोणपे खात काही काळाने हळूहळू परिपक्व होत खणखणीत नाणं बनत जातो.. हे वर्णन स्टुअर्ट ख्रिस ब्रॉड या इंग्लिश खेळाडूला अगदी लागू पडतं.
स्टुअर्ट ब्रॉड हा भारतीयांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याचं कारण युवराज सिंग.
युवीने सलग 6 सिक्सर्स ज्याच्या बॉलिंगवर हाणलेत तो हा स्टुअर्ट ब्रॉड. पूर्व पश्चिम नैऋत्य ईशान्य वायव्य साऱ्याच दिशेने, दिसेल त्या दिशेने युवराज सिंगने त्याला फोडला होता. त्यावेळी झालेला त्याचा हेल्पलेस, क्ल्युलेस चेहरा कोणी भारतीय क्रिकेट शौकीन, अशौकीन विसरणार नाहीत.
इंग्लिश खेळाडू ख्रिस ब्रॉड हे आयसीसीचे मॅच रेफ्री-सामनाधीकारी, त्यांचा मुलगा स्टुअर्ट ब्रॉड. निळ्या डोळ्यात कायम कनिंग भाव, लबाड हास्य. शिडशिडीत , जबरदस्त उंची, लहान पणापासून हातात क्रिकेटमधील पारंपरिक इंग्लिश सेक्सी #लालचेरी , ड्युक्स बॉल , त्यामुळे इंग्लिश वातावरणात ‘बॉलर’ होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले नसतील.
2010 मध्ये एका मॅचमध्ये स्टुअर्ट ब्रॉड मैदानावर बॉलला जोड्यांचे खिळे रुतवत असताना दिसला. पण सामनाधिकारी ख्रिस ब्रॉडचा मुलगा म्हणून त्या सामन्यातील सामनाधिकाऱ्याने त्याला काहीही दंड वा शिक्षा न करता सोडून दिलं. असा मीडियाचा सूर होता.
2011 च्या वर्ल्ड कप नंतर त्याच्यात परिपक्वता येत गेली. भारताने 2011 चा वर्ल्डकप जिंकला, त्यानंतर जून जुलैमध्ये इंग्लिश दौरा सुरू झाला. विश्वविजेत्या भारतीय टीमचे त्या दौऱ्यात अतिशय हाल झालेत. सर्व टेस्ट मॅचेस भारत हरला. त्यातही स्टुअर्ट ब्रॉडने महत्वाची भूमिका बजावली.
त्यानंतर 2014 जुलै ऑगस्ट दौऱ्यात एका मॅचमध्ये वरुण अॅरनच्या वेगवान बाऊन्सरवर शॉट मारताना, स्टुअर्ट ब्रॉडच्या हेल्मेटची ग्रिल तोडून नाकावर बॉल आदळला. नाकाचं हाड मोडलं. मॅच सोडून त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तेव्हा त्याचा फोटो घाबरवणारा होता. भारत ती टेस्ट मॅच हरला. मॅन ऑफ द मॅच हॉस्पिटलमध्ये भरती असलेला स्टुअर्ट ब्रॉडला गौरवण्यात आलं. कारण पहिल्या इंनिंगमध्ये त्याने सहा विकेटस घेतल्या होत्या. इतकंच नाही तर सर्जरीनंतर त्याने ट्विट केलं की रेडी फॉर फायनल मॅच. पुढची मॅच तो खेळला. चेहऱ्यावर जखमांचे निशाण दिसत होते.
टेस्टमध्ये तो फक्त बॉलनेच नाही तर बॅटनेही कायम भारताला त्रस्त करतो हा इतिहास आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अँड्र्यू सायमंड कायम भारताला त्रस्त करायचा. भारतीय टीमचं लक्ष विरुद्ध टीमच्या मोठ्या नावांवर असताना तो नेमका मोठी अडचण निर्माण करायचा तसाच स्टुअर्ट ब्रॉड भारतीय टीमसमोर अडचणी निर्माण करतो. भारताने विकेटस घेऊन पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना तो चांगली बॅटिंग करत भारतीय टीमच्या आशेवर पाणी फिरवतो. बिग फिश जिमी अँडरसनवर भारतीय बॅट्समन्सचं लक्ष असताना ब्रॉड विकेटस घेऊन जातो.
स्टुअर्ट ब्रॉडला भारतीय टीम मार देताना बघताना फार आनंद होतो. काही दिवसात इंग्लंड सोबत मॅचेस सुरू होताय. तेव्हा स्टुअर्ट ब्रॉडला #कोहलीअँडगॅंगने चांगलं ठोकावा ही इच्छा आहे.
लेकीन इस छोकरे में दम है! एक माजलेला , अपरिपक्व , ब्ल्यू आइड बॉय, बिघडा हुआ शहजादा ते इंग्लंड टीमचं एक प्रमुख अस्त्र हा प्रवास नक्कीच स्तुत्य आहे.
#StuartBroadBirthday
- Abhijeet Panse
No comments:
Post a Comment