Showing posts with label हलकं फुलकं आजूबाजूचं. Show all posts
Showing posts with label हलकं फुलकं आजूबाजूचं. Show all posts

Tuesday, 17 July 2018

इमोजी मुद्रा दिन

मला वाटतं इमोटीकॉन्समध्येही स्त्रियांचा राखीव कोटा आहे.

यातील खास दोन इमोटीकॉन्स हे स्त्रियांकडुनच जास्त वापरले जातात.

एक दात विचकणारी मुद्रा.  गेले  दोन वर्षे तिचं फार मार्केट होतं. मला कधी कळलं नाही, अजूनही कळत नाही,  प्रत्येक वाक्यानंतर मुली त्या दात विचकणाऱ्या चेहऱ्याच्या इमोटीचं ‘संपूट’ का लावतात!

मला पूर्वी वाटायचं फक्त भारतीय मुलीनाच ही भीतीदायक दात विचकणाऱ्या स्मायलीची (?) बाधा झालीये का!

पण नाही तसे.

एक आयर्लंडची जुनी मैत्रीण, तिने दोन वर्षांपूर्वी फक्त माझ्या सांगण्यावरून तात्पुरतं वॉट्स अॅप डाउनलोड केलं होतं. आणि ही दात विचकणारी विकट हास्यमुद्रा मार्केटमध्ये तेव्हा आली . तेव्हा तीसुद्धा प्रत्येक वाक्यानंतर ती दातांवर दात ठेवलेली स्मायली पाठवू लागली. तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. कानामागून आली आणि दात विचकट तिखट झाली.

आता मात्र कोणी मला ते दात दाखवणारी मुद्रा पाठवली की म्हणतो , “गूड असेच दात रोज घासत जा!

लहान मुले ‘ई’ केल्यावर तसे दात दाखवतात बा!

पण दीड दोन वर्षे तिचं मार्केट चाललं पण त्यानंतर ‘ती’ आली तिने डोळे ‘वर’ करून बघितलं आणि ती जिंकली.

स्त्री वर्गात सगळ्यात तुफान चालणारी मुद्रा, इमोटीकॉन वर डोळे करणारी ‘#चेटकीण’ स्मायली. दिवस रात्रीस खेळ चाले हिचा.

दररोज ठराविक संख्येत डोळे वर केलेली ती चेटकीण स्मायली पाठवण्याचं काही मुलींचं व्रतच असतं बहुतेक. बुबुळे वर केलेली ती भयप्रद स्मायली वापरताना काय आनंद मिळतो कोण जाणे.

स्मायलींच्या दुकानात आता शेकडो भावमुद्रा आल्यात. मी मात्र सलमान खान , बाबी देवल प्रमाणे फक्त बेसिक दोनच मुद्रा वापरतो. वापरू शकतो. एकतर आनंदी चेहऱ्याचा स्मायली  नाहीतर रक्त-लाल संतापी चेहऱ्याचा #संतापली  .
एकतर उत्तर ध्रुव नाहीतर दक्षिण ध्रुव. बाकी इमोटीकॉन्सचे माईंड गेम्स मजला जमत नाही. इमोतीकॉन्सचे ते गेम्स कॉन्स लोकांनाच  जमतात बरें . ते सेक्रेड ईमोजी गेम्स अस्सल प्लेयर्सनाच जमू शकतात. असो तिकडे सेक्रेड गेम्सची वांधे झाले आहेत. कोर्टाने त्याला नाहीचा इमोजी दाखवलाय.

😒-😏 या दोन इमोटी राण्यांची जोडीची बाय डिफॉल्ट सेटिंग असते कित्येक जणांकडे.

आजकाल सगळयांना मान द्यावा लागतो. कनेक्टिव्हिटीला थ्रीजी, फोरजी , बिस्किटला पार्लेजी. स्पॉट ला जी- स्पॉट,म्हणून इमोटीकॉन्सला ‘#इमोजी’.

पण मला एक कळत नाही;  सर्व मिनरल वॉटर बॉटल्सला बिसलेरी म्हटल्या जातं तसं सर्व इमोटीकॉन्सना ‘स्मायली’ का म्हणतात!

अश्रूपात करणाऱ्या, दुःखी मुद्रा करणाऱ्या इमोजीना ‘#क्रायली’ का म्हणत नाही!!??

#EmoticonsDay

- Abhijeet Panse

Thursday, 22 March 2018

हीच ती वेळ हाच तो क्षण

'हीच ती वेळ हाच तो क्षण"

त्यालाही ती आवडायची. लवकरच तिलाही तो आवडु लागला होता. शेवटी मागच्यावर्षी त्याने तिला औपचारिकरित्या प्रपोज केलंच.
बरेच हिंदी चित्रपट बघितल्याने तिनेही गालावर दोन हात ठेवून सरप्राईजड झाल्यासारखं “ओह माय गॉड!” वाले भाव देऊन ‘हो’ म्हटलं होतं.
‘अशावेळी’ दोघांनाही किस करायचं होतं पण त्यांना प्रायव्हसी  मिळाली नव्हती.

आणि हेच त्याच्या महादुःखाचं कारण होतं. प्रायव्हसी न मिळणे!
वर्ष झालं पण दोघेही आपापल्या कामात, आणि मित्र आणि लोकांच्या गराड्यात !
 आजवर एकांत मिळाला नसल्याने दोघेही, विशेषतः तो फार वैतागला होता.

14 फेब्रुवारीलाच ती बऱ्याच महिन्यांसाठी शहराबाहेर जाणार होती. म्हणून दोघांनीही ठरवून तेरा फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे च्या आदल्या दिवशी सुटी घेऊन बाहेर भेटायचं ठरवलं.

 आज त्याने तिला ‘किस’ करण्याचा चंग बांधलाच होता! सोशिअल मीडिया अपडेट्सवरून आज “किस डे” आहे हे कळलं होतं.
वाह आज छान इंग्लिश मुहूर्तही आहे तर! तो स्वतःशीच खुष होता.
तिचीही ‘ना’ नसणारच होती.
“पण किस करणार कुठे?” हा प्रश्न त्याला नेहमीप्रमाणे सतावत होता.

संपूर्ण दिवस आज सोबत घालवायचा ठरवलं होतं.
त्याने क्लुप्ती लढवली, मुव्ही हॉलमध्ये तिला किस करता येईल म्हणून मुव्ही 'ऐकायचा' ठरवलं! त्याने दुपारी तिला तिच्या बिल्डिंगखालून तिला पिक अप केलं. वर फ्लॅटमध्ये तिच्या मैत्रिणी, फ्लॅटमेट्स असल्याने वर जाण्यात काहीच अर्थ नव्हता.

ती खाली आली. तीने नवा हेअरकट केला होता. कॅजुअल्समध्येही ती नेहमीप्रमाणे आकर्षक दिसत होती.
ते मॉलच्या पार्किंगमध्ये पोहचले. त्याने बाईक मुद्दाम बेसमेंटला पार्किंग भागात अगदी शेवटी एका मोठ्या पिलरच्या मागे लावली. तो सतत संधीच्या शोधात होताच.
ती चेहऱ्यावरील स्कार्फ काढत असताना त्याने आजूबाजूला  सगळीकडे दृष्टी फिरवली. कोणीही दिसलं नाही. हीच ती वेळ हाच तो क्षण! तो तिच्या जवळ गेला. तिलाही ते अगदी अनपेक्षित होतं. तो तिला किस करणार तर …
“कौन है उधर पिछे! इतना टाईम क्यू लग रहा है पार्किंग मे!”

“हा बस चाबी गिर गयी थी! जा ही रहे है!”

तिथल्या सिक्युरिटीगार्ड ने त्याचं “#मिशनचुंबन” काही पूर्ण होऊ दिलं नाही.
ती ही या सगळ्या मजेदार प्रकारामुळे हसत होती.

ते वरच्या मजल्यावर मुव्ही हॉलपाशी पोहचले. "हो हीच ती जागा! जी अजरामर होणार आठवणीत! प्रथम चुंबन स्थळ!"
कुठल्या तरी फ्लॉप मुव्हीचं तिकीट काढायचं त्याने ठरवलं होतंच.
पण सर्व चित्रपट याच आठवड्यात रिलीज झालेले.

“टू कॉर्नर सीट्स प्लिज !” त्याने काचेपलीकडील नेव्ही ब्ल्यू कॅप घातलेल्या मुलाला सांगितलं.
“सॉरी टॉपमोस्ट कॉर्नर सीट्स आर नॉट अवेलेबल!” ओन्ली एट मिडल सीट्स आर अवेलेबल!

अरेरे हे काय! ही संधीही जाते काय! बघू आत जाऊन तर!
पण काम-देवाचं नाव घेऊन त्याने उपलब्ध सीट्सपैकी दोन सीट्स बुक केल्यात.

आत संपूर्ण हॉल भरला होता. ते आपल्या सीट्स वर जाऊन बसलेत. हॉलमधील दिवे हळूहळू धूसर होत काळोखाची चादर पसरली. शेजारच्या आणि मागच्या जागेवर कोणीही नव्हतं. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. तिलाही झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ती मात्र नॉर्मल होती.

 तितक्यात एक घोळका आला. एक मोठं कुटुंब आलं. त्यात काही वृद्ध बायका माणसेही होती. ते त्यांच्या मागे पुढे रिकाम्या आसनावर जाऊन बसलेत.
त्याचा पुन्हा हिरमोड झाला.

पण तिचं अगदी निकटचं सानिध्य अनुभवताना तो रोमांचित झाला होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. बस आता वाट बघायची होती नेमक्या क्षणाची!
लोक चित्रपट बघण्यात गुंग असताना , हीच ती वेळ हाच तो क्षण , तो तिच्या अगदी निकट पोहचला. त्याने हळूच मागे वळून बघितलं तर मागे दोन म्हातारे भिंगाच्या चष्म्यातून एकटक समोर याच्याकडेच बघत होते.
तो एकदम शरमून बाजूला झाला.
संपूर्ण चित्रपट त्याने चरफडत त्या दोन मागच्या आजोबांसोबत आणि शेजारच्या सतत आवाज करणारया चिल्लर पार्टी मुलांसोबतच बघितला.

एकदाचा रटाळ चित्रपट सम्पला. दोघे बाहेर आलेत. मग मॉलमध्ये गप्पा, इकडे तिकडे फिरून झालं पण त्याला एकांत काही केल्या मिळत नव्हती. त्याचं लक्ष बाकी कश्यातच नव्हतं. तिची घरी परत जायची वेळ आली.
सगळ्यात वरच्या मजल्यावरून खाली जाताना येताना त्याच्या डोक्यात एक अजून अनप्रॅक्टिकल आयडिया सुचली. कॅप्सूल लिफ्ट ऐवजी त्याने नॉर्मल लिफ्टने खाली जायचं ठरवलं.

आह वाह संपूर्ण लिफ्ट रिकामी! आत ते दोघेच!
त्याने ‘G’ च्या लाल बटणावर दाब दिला. लिफ्ट खाली जाऊ लागली.

“बस साठ सेकंदस है तुम्हारे पास , इस साठ सेकन्ड्स में अगर तुमने किस कर लिया तो ये साठ सेकंदस जिंदगी भर तुमहें याद रहेंगे! “तो स्वतःला मनातल्या मनात बजावू लागला. ती मात्र त्याच्या या क्लुप्तीपासून अनभिज्ञ होती.
हीच ती वेळ हाच...
 त्याने तिला हळूच जवळ घेण्याचा प्रयत्न केला . तिने सरळ त्याला दूर केलं. “अरे काहीही काय सीसीटीव्ही कॅमेरा असतो लिफ्टमध्ये! ती विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात आठवत नाही का!

 ”हम्म.. त्यांचं त्या जाहिरातपासून सेटिंग जमलं ना..पण आपलं सेटिंग कधी जमणार!”
तो चरफडत स्वतःशीच बोलत दूर झाला.

ते बाईकवरून तिच्या बिल्डिंगजवळ पोहचले. तो प्रवासभर नाराज होता. खाली बिल्डींगपाशी अंधार होता. झाडे वृक्षांमुळे ते जरा आडोश्यात उभे राहिलेत. त्याला पुन्हा संधी मिळाल्याची, पुन्हा एकदा हाच तो क्षण हीच ती वेळ असल्याची भावना झाली. “वृक्षवल्ली खरंच सोयरे असतात तरुण लोकांचे नाही! !” त्याने कामदेवाचं स्मरण करून तिच्या जवळ गेला.
तेवढ्यात एक माणूस बाईक थांबवून तिथे फोन वर बोलत राहिला.

त्याची शेवटची आशाही धुळीस मिळाली.
“या देशात कोणी शांत चित्ताने एक किसही नाही करू शकत का!”

तिला तितक्यात एक फोन आला. तो नाराजीने तिला बाय म्हणत जाऊ लागला. त्याची नाराजी, दुःख तिला कळत होतं.
तिचं फोन वर एक मिनिट बोलणं झाल्यावर, चेहऱ्यावर आणि डोळ्यात खट्याळ भाव आणत म्हणाली, “आज फ्लॅटमेट्स बाहेर गेले आहेत ट्रिपला! आज रात्री कोणीही नसणार वर! तू आज रात्री राहू शकतोस! आत्ता मैत्रिणीचाच फोन होता!”

शेवटच्या क्षणाला मरणाऱ्याच्या तोंडी अमृत पडावं आणि तो पुन्हा टवटवीत व्हावा अशी त्याची अवस्था झाली.
त्याने हवेत जोरदार उडी मारली त्याने! उडी मारून हवेत मागे पायाला पाय लावण्याचा, स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला . पण जमले नाही. पायात पाय अडकून आपटायचा राहिला. पण आता त्याची कसलीच तक्रार नव्हती.
"मिशन चुंबन" आज शांतपणे, पूर्ण प्रायव्हसीमध्ये पूर्ण होणार होतं.

त्याला हॉलमध्ये बसवून ती तिच्या खोलीत गेली. आता त्याला घाईगडबड नव्हती संपूर्ण रात्र त्यांचीच होती! ती काही वेळाने बाहेर आली.
तिने गुडघ्यापर्यंत वन पिस घातलं होतं. केस ओलसर होते. हलकंसं लिपस्टिक लावलं होतं.
ती अत्यंत मादक दिसत होती.
त्याने तिला जवळ ओढलं. तिच्या मानेजवळील परफ्युमचा सुगंध त्याच्या गात्रा गात्रांना, संपूर्ण संवेदनांना पुलकित..जागृत करून गेला.

तो आणखी  तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा त्याने दोन्ही हाताने हलकंसा धरून तिला किस करण्यासाठी सावधान झाला! हो हो हीच ती वेळ हाच तो क्षण!

तिने त्याला दूर केलं.
“ यु गॉट प्रोटेक्शन नो?”

“भुकेला मागतो एक किस आणि देव देतो..” अशी त्याची मनातल्या मनात अवस्था झाली.

तो अगदी चेहऱ्यावर स्वतःबद्दल अभिमानाचे भाव आणून तिच्या दोन्ही खांद्याना दोन हाताने पकडत म्हणाला,
“ तु माझा हा मोबाईल बघितलास?  सहा महिने झालेत अजून त्याचं स्क्रीनकव्हर मी काढलं नाही! मी कधी हेल्मेटशिवाय गाडी चालवताना तुला दिसलो का?  नवी बाईक घेतली तेव्हा कित्येक दिवस तिचं कव्हर काढलं नव्हतं! मित्र त्याला काँडम कव्हर म्हणायचे..बाईकला व्हर्जिन बाईक म्हणायचे!  अगं प्रोटेक्शनशिवाय तर मी काहीच करत नाही! प्रोटेक्शन इज मस्ट!
रुबाबात पॅन्टच्या खिशातून त्याने प्रोटेक्शनचं पाकीट काढलं! तिला दाखवलं!

“ओह्हो”! ‘क्या बात है!”
तिनेच त्याला ओढून आपल्या खोलीत घेऊन गेली. त्याला बेडवर ढकललं. ती त्याच्या संपूर्णपणे जवळ आली..पुन्हा एकदा त्याच्या संवेदना जागृत झाल्यात..जोरदार उफाळून आल्यात..त्याला किस करण्यासाठी ती त्याच्या अगदी निकट आली.. बस्स हीच ती वेळ हाच तो क्षण!
ती त्याला किस करणार तितक्यात..
त्याने तिला थांबवलं..

“एक मिनिट! तू आज मला दुपारी भेटायच्या आधी काय खाल्लं होतं? तू जेवली होतीस का?”

“किती रे काळजी करतो माझी!
हो मी तेव्हा घरून फिश आणि चिकन करी खाऊन आले होते! आय एम फुल नाव!
त्याच्या ओठांवर बोट ठेऊन म्हणाली ,
“नाव डोन्ट टॉक ..जस्ट एन्जॉय धिस मोमेंट! वि हॅव ओन्ली वन नाईट फॉर अ लॉंग टाईम!”

त्याला किस करण्यासाठी त्याच्या चेहरा घट्ट तिने पकडला..कोणत्याही क्षणी त्याच्या आयुष्यातील त्याचं पाहिलं किस होणार होतं. दुष्काळ संपला होता. घनन घनन घन गिर जाये बदरा..पार्श्वसंगीत सुरू होतं.
आणि त्याने तिला त्याच क्षणी बाजूला केले . तो उठून बसला.

“काय तू आज चिकन खाल्लंस!
आज महाशिवरात्रीचा उपास आहे मला! मी तुला किस नाही करू शकत! माझा उपास मोडेल ना!
जातो मी! जय शंभो! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
बाय!

आणि तो तडक निघून गेला. तीला काही कळेनासं होऊन ती बघत राहिली!
 आज दुसऱ्यांदा शंकराने कामदेवाला भस्म केलं होतं.

समाप्त.

#किसडे #महाशिवरात्रीपेशल.
१३ फेब्रुवारी 018

-Abhijeet Panse

Wednesday, 21 March 2018

रात्री उशिरा आलेला प्रीती संदेश

तीन दिवसांपूर्वी रविवारी रात्री 12 च्या जवळपास ‘तिचा’ मेसेज आला!
माझ्या हृदयात लाडू फुटलेत.
“तुला एक विचारायचंय..माझा खूप गोंधळ होतोय. काही कळेनासं झालंय मला..शेवटी न राहवून तुलाच विचारावंसं वाटलं म्हणून इतक्या रात्री मेसेज करतेय! “

माझं हृदय बगीचा बगीचा झालं…
मनातल्या मनात मी “अगं हो प्रेमॉलॉजीच्या पहिल्या धड्यात प्रेमीरुग्णाचा प्रथम पायरीवर मानसिक गोंधळ उडतो हेच लक्षण सांगितलंय!
आहहा! फायनली, वो घडी आ गयी आ गयी!
फ्रेंझोन्ड च्या दुष्टचक्रातुन सुटका होऊन माझी गुढीपाडवा ‘लवशीप’ बम्पर लॉटरी लागली तर!

“अब हमे ये दोस्ती रिश्तेदारी में बदल देनी चाहीये!” हा विचार शेवटी ती करायला लागली तर!!!!
या सर्व विचारांच्या मैफिलीत,  वसंत ऋतूतील आंब्याच्या झाडाप्रमाणे मी ही मोहरून गेलो..

“हा! विचार ना!”
मी अगदी भावनांच्या आवेगावर पूर्णपणे संयम राखत मी त्या गावचाच नाही दाखवत इतकंच विचारलं.

“तू प्लिज हसण्यावारी लाईटली घेऊ नकोस..प्लिज कोणाला सांगू नको आपल्या बोलण्याबद्दल! मी खूप सिरीयस आहे याबाबत..खूप विचार केल्यावरही काही कळेना म्हणून तुला विचारतेय..! ”

“अगं गोडूले मीही खूप सिरिअस आहे अगदी आयसीयूत आहे. “आय सी यु एव्हरी डे!”
मनातल्या मनात असं कारंजं उचंबळून येत,
“हो हो विचार तू बिनधास्त!” मी फक्त असा एक वाक्यात रिप्लाय केला.

काही क्षण शांतता. “typing.. असं काही क्षण दिसत राहिलं.. त्यासोबत तीन डॉट्स नागमोडी लयीत खालून वर वरून खाली एकाच जागी जात होते..
इकडे माझ्या हृदयाचा भावनांचा ईसीजीचा ग्राफही तसाच वरखाली होत होता.
आहह जणू माझी पहिली प्रेम कहाणी नियती ‘Typing’ करत होती..

काही क्षण वाट बघून तिचा मेसेज आला. मी शरीराचे मोराप्रमाणे सहस्त्र नयन करून तो वाचला…आयुष्यातील पहिला “प्रीती संदेश” समजून..

“मला सांग आज फायनल मॅचमध्ये विजय शंकर 19.5 व्या म्हणजे लास्ट बट वन बॉलवर आऊट झाला ना! मग त्याच्या जागी नवा येणारा बॅट्समन का स्ट्राईक वर आला नाही , दिनेश कार्तिक कसा काय आला? तो तर विजय शंकर बॅटिंग करताना दुसऱ्या एंडला, नॉन स्ट्राईकला होता! मग शेवटचा बॉल ,दिनेश कार्तिक कसा काय खेळला?”

कोणीतरी निर्दयीपणे हृदयाचा झालेला हिरवागार बगीचा रपारप उपटून काढतंय असं मला झालं.

साला उगाच क्रिकेटवर अति लिहितोय!

शहर बचाते बचाते मोहल्ला जला डाला!

मरो ते क्रिकेट !

पण आता काय करणार होतो .
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी!
तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं होतं.
तिला क्रिकेटमधील एक नियम माहिती नव्हता.
तो एक महत्त्वाचा  नियम तिला समजावून सांगितला.

जेव्हा बॅट्समन कॅच आऊट होतो, तेव्हा बॉल हवेत असताना , कॅच पकडायच्या आत जर
दोन्ही बॅट्समन म्हणजे शॉट मारणारा  आणि नॉन स्ट्राईकवरील बॅट्समन एकमेकांनी खेळपट्टीच्यामध्ये क्रॉस केलं असेल किंवा नॉन स्ट्रायकर बॅट्समनने अर्धी खेळपट्टी पार केली असेल  तर तो नॉन स्ट्राईकला असणारा बॅट्समन स्ट्राईक येतो.
नवा येणारा बॅट्समन आऊट झालेल्या बॅट्समनच्या जागी स्ट्राईकला न खेळता नॉन स्ट्राईकला  जातो.

त्यामुळे आज विजय शंकरने उंच शॉट खेळून तो बाऊंडरीवर कॅच आऊट झाला खरा पण कॅच फिल्डरने पकडण्याच्या आत कार्तिकला अर्धी पिच क्रॉस करता आली. म्हणून दिनेश कार्तिक शेवटचा बॉल खेळू शकला!”


“ ओहहह असं होय का!
म्हणजे आज जर विजय शंकर किपरच्या हाती किंवा जवळच्या फिल्डरच्या हाती  कॅच देऊन आऊट झाला असता तर त्यावेळात दिनेश कार्तिकला पिचचा मध्य क्रॉस करताच नसता आला. मग शेवटचा बॉल नवा बॅट्समन खेळला असता! दिनेश कार्तिक खेळलाच नसता! आणि आपण फायनल जिंकलीच नसती! काय सांगतोस काय?!!!!
बरं झालं देवा त्याने आऊट होता होता दिनेश कार्तिकला स्ट्राईक मिळवून दिली!”

“हां किती हुश्शार गं ती बयो! बरोबर बोललीस! फक्त प्रेमॉलॉजीमध्ये ढ राहिलीस!” मी मनातल्या मनात चरफडत म्हणालो.
“जा कर आता पीएचडी त्या क्रिकेटमध्ये!”
मात्र माझं हे नैराश्य मनातल्या मनातच.

“बरं चल थंक्यु हं! झोपते मी आता! मला माझं उत्तर मिळालं!  नवीन वर्षाच्या शुभेच्छा! बाय! गुड नाईट स्वीट ड्रिम्स!”
पोरगी ऑफ लाईन गेलीसुद्धा.

इकडे नाझी अवस्था मात्र बांग्लादेश क्रिकेट टीमसारखीच झाली होती.
शेवटच्या क्षणापर्यंत मी अति आनंदात अतिआत्मविश्वासात नागीन डान्स करत होतो.
🐍 फूस…$$ फुस्स $$$ 🐍 फूस्स् फुसस फुसस $$$🐍  

पण शेवटी फुस्सस्सस्सस्सस्सस्ससस~~~~~~~~~नागोबा झोपला.

ओमफस स्वाहा!

-अभिजीत पानसे

Tuesday, 27 February 2018

मराठी दिन

'सत्तावन' म्हणजे सेवंटी वन का??''
असं विचारणाऱ्या मराठी लहान मुलांकडे आणि काही तरूण तरूणींकडे मी दयार्द्र दृष्टीने पाहुन हसण्यावर नेतो.

भारतीय शब्दांचा उच्चार करताना इंग्रजांची जीभ वळत नव्हती म्हणुन त्यांनी मद्रासचं चेन्नई, कोलकाताचं कलकत्ता वगैरे आणि इतर अनेक शब्दांचं त्यांच्या 'सोयीसाठी 'रुपांतर केलं.
पण साहेब गेल्यावरही त्यांनी मागे टाकलेलं त्यांचं उष्टं खरकटं चिवडताना; 'अजिंठा- वेरूळ' लेण्यांना साधं बोलतानाही सतत Ajanta& Ellora म्हणण्यात गर्व बाळगणाऱ्या अर्ध्या हळकंडाने पिवळे होणाऱ्यांची कीव येते.

पण गंगा नदीला Ganges ,ग्यांजेस म्हटल्यावर मात्र तळपायाची आग मस्तकात जाते.

आणि जेव्हा कोणी मराठी व्यक्ती मुंबईला '#बाॅम्बे' म्हणतं तेव्हा मात्र त्याचा मानसीक रोग आता मर्यादेच्या पलीकडे गेला असुन त्याला उपचाराची नाही तर प्रार्थनेची गरज आहे असं खुशाल समजावे आणि त्याला त्याच्या प्राप्त अवस्थेत तसेच सोडुन द्यावे.

(त.टी-ह्यात इतर कुठल्याही भाषेबद्दल वा भाषिकांबद्दल  आकस राग दुर दुर नाही.
हे फक्त उथळ मराठी लोकांसाठीच.)
इंग्रजी,हिंदीसहित सर्व भाषांचा चाहता,सर्वांच्या 'मातृभाषेचा' आदर करणारा आणि मराठीवर प्रेम करणारा

-अभिजित पानसे

Sunday, 31 December 2017

आणि त्या क्षणी 2018 चा सूर्योदय झाला होता.





आणि 2018 चा सुर्योदय झाला होता..

आई-बाबांच्या विरोधाला न जुमानता मी काल थर्टीफर्स्टच्या पार्टीला मित्रांसोबत गेलो.
पण या ओल्ड जनरेशनला आमचं सेलिब्रेशन कळतच कुठे?

बाबांच्या हुकुमाप्रमाणे नाखुषीनेच रात्री लवकर घरी आलो व झोपलो.

पहाटेच्या सुमारास मला एक स्वप्न पडले...

मी घनघोर रात्री काळोखात....

नाही! कदाचीत तोही पहाटेचा काळोख असावा!!
एका अरण्यात मी एकटाच फिरत होतो.
मनात भितीचा लवलेशही नव्हता.
चंद्राच्या दुधाळ प्रकाशात मी आपल्याच मस्तीत धुंदीत रानवाटा पालथ्या घालत होतो. मनसोक्त एकटाच  हिंडत होतो.

आणि...तेवढ्यात

अचानक मागून एक खर्जातला पुरूषी आवाज आला!

''व्हेअर आर यु रोमिंग यंग मँन?''

मी दचकुन मागे वळलो.

थोड्या अंतरावरून एक  पांढुरकी आकृती माझ्या रोखानेच पुढे येत होती.

माझ्या पोटात भितीचा गोळा उठला.

ती आकृती माझ्या दृष्ट्रीपथात आली.

एक वय झालेला वृद्ध,जरीकाठी धोतर, शुभ्र कुर्ता,चेहऱ्यावर म्हातारपणीच्या सुरकुत्या पण, तरीही तेजस्वी मुखमंडल होतं.पिकलेले केस आयुष्यातील सर्व अनुभवांचे साक्षी होते.डोळ्यांमध्ये आयुष्याची आपली संपुर्ण कारकीर्द यशस्वी झाल्याचे अपूर्व समाधान झळकत होते.

मी स्वत:ला काही क्षण हरवुन बसलो.

''काय यंग मँन!!''
कुठे भटकतोय इकडे? नवीन वर्षाचे स्वागत करायचे सोडुन तू एकटा इकडे काय करतोय?''
जवळ येत त्यांनी प्रेमळपणे विचारले.

त्यांच्या प्रश्नाने मी एकदम भानावर आलो. मनातील मघाची भिती आता नाहिशी झाली होती. आणि नेहमीप्रमाणे मला पुन्हा तारूण्याच्या आणि इतर अभिमानाने घेरले. त्यामुळे मनात त्या वृद्धाबद्दल नाराजीचा भाव आला.
मनात म्हटलं मघ्येच हा म्हातारा कशाला भेटला? पण आश्चर्य वाटले. हा वृद्ध माणुस आमच्या पिढीसारखाच बोलतोय!

चल चालुया सोबत थोडा वेळ!'' तो वृद्ध म्हणाला आणि मी नाराजीनेच त्यांच्यासोबत निघालोसुद्धा.

मनात म्हटलं'' शिट यार हा म्हातारा मध्येच कशाला भेटला! फार बोअर करणार!आमची पिढी तुमची पिढी, न्यु यिअर की गुढीपाडवा..यावर लेक्चर देणार!

मी मुद्दामच खोटं हसत खोचकपणे विचारलं, "काय ओल्डी! इतक्या रात्री! जंगलात! भिती वगैरे नाही वाटत?''

मघाच्याच प्रसन्न मुद्रेने ते बोलले,'' अरे मित्रा रात्रीचंच जंगल बघण्यात मजा असते ना!
पहाटेच्या या गडद काळोखानंतरच सूर्योदय होतो ना! आणि आम्हा म्हाताऱ्यांना कसली भिती!
हे बोलतानाही त्यांच्या मुखावरील पुर्णत्वास जाणारं शांत स्मित कायम होतं.

मी उपहासाने पुन्हा म्हटलं,''हे ओल्डी मला वाटतं तुमच्या घरची सगळी मंडळी, नातवंडे सगळेजणं न्यु इअर सेलिब्रेशनमध्ये बिजी असतील! तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही इकडे रागारागाने किंवा दु:खाने फिरायला आलात की काय?''

ते मोकळे हसले, ''अरे बेटा मी निरपेक्ष आहे. मी कधीच कुणाकडुनही दुखावलो जात नाही!
आणि तुला कोणी सांगितलं मला हे न्यु यिअरचे सेलिब्रेशन आवडत नाही! हे आय एम अे मार्डन ग्रँडपा बेटा! अँड आय डोन्ट बिलीव्ह इन जनरेशन गॅप !'' आणि दिलखुलास हसलेत.

त्यांचं ते मोकळं स्वच्छ हास्य निष्पक्ष बोलणं ऐकुन माझी नाराजी कुठल्या कुठे पळुन गेली आणि मला माझ्याच वागणुकीची लाज वाटु लागली.

जंगलात कुठेही न थांबता आम्ही  भटकत होतो. त्या गडद शांततेत खाली पडलेल्या  झाडांच्या असंख्य वाळलेल्या पानांतुन चालताना होणारा आवाज कानाला सुखावत होता.

आमच्या गप्पा अगदी मस्त रंगल्या होत्या.

मला हे आजोबा अगदीतरूण विचारांचे वाटले. ते अगदी मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते. शब्दात अवजडता नव्हती. आम्ही अनेक विषयांवर गप्पा केल्या.
अगदी  017 मधील भारतीय क्रिकेट टीमचं यश, येणारा दक्षिण आफ्रिका दौरा ते पद्मावती चित्रपटाच्या वादापर्यंत,  पर्यंत..शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या तर भारत पाकिस्तान संबंध..उत्तर कोरिया ते अमेरीका..

पण त्यांच्या प्रत्येक उत्तरात,बोलण्यात मला तटस्थपणा, त्रयस्थपणा जाणवत होता.कुठलाही विचार मत ते थोपवत नव्हते.जणुकाही फक्त द्रष्ट्याच्या भुमिकेत होते.

शेवटी ते म्हणाले,''बेटा हा तर काळाचा महिमा आहे! वी आर बाउंड टु चेंज विथ द टाईम फाॅर बेटर!''

त्यांना नवीन वर्षाच्या त्यांच्या काही संकल्पांबद्दल विचारले असता म्हणाले,'' मी कधीच कोणताही संकल्प करत नसतो.फक्त त्या त्या क्षणात पूर्णपणे जगतो..राहतो.!
आणि कुणास ठाउक कदाचित पुढच्या वर्षी मी राहणार देखिल नाही!''

त्यांच्या या शेवटच्या वाक्याने माहित नाही का मला एकदम  गलबलुन आलं...असं कुठलं नातं आमच्यात निर्माण होत होतं!!

जंगलातुन फिरता फिरता आम्ही आता एका माळरानावर आलो.

''मग कसं गेलं वर्ष 2017?'' आजोबांनी विचारलं.

''खुप वाईट गेलं हो हे वर्ष! सगळीकडे अपयशी ठरलो!तसंही मला ज्योतिषांनी सांगितलच होतं की हे 2017 वर्ष माझ्यासाठी वाईटच जाणार!

त्या आजोबांनी तडक उत्तर दिलं,' "कुठलंही वर्ष कधीच कोणासाठीही वाईट नसतं!काळ काय कोण्या ज्योतिष्याच्या अंकांच्या आज्ञेत आहे काय?
काळावर कोणाचंही आधिपत्य नसतं! तो स्वत: त्याचा अनभिषिक्त सम्राट असतो! ज्योतिषी,अंकशास्त्री भलेही आपल्या अंकाची वजाबाकी-बेरीज,आराखडे काढुन वर्षफल सांगत असेल पण, 'कर्म तर तुमच्या हातात असतं ना!ते तुम्ही करता योग्य केलं का? करता का? ते योग्य केलं तर प्रत्येक वर्ष चांगलच जाणार! त्यामुळे वर्षाला चांगलं वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे?
ते तर माझ्यासारखच निरपेक्ष असतं!''
शेवटलं वाक्य ते जरा मिश्कीलतेने हसुन म्हणाले.

पुन्हा पुढे म्हणाले ''न्यु ईअरचं सेलिब्रेशन आटोपल्यावर तुम्ही थोडं आत्मचिंतन करा! मी यावर्षी कोणत्या चुका केल्यात आणि निर्णय घ्या की, या पुन्हा होणार नाहीत!स्टाॅप ब्लेमिंग अदर्स अँन्ड बी रेडी टु टेक रिस्पाॅन्सिबिलिटीज आॅफ युअर ओन अॅक्शन्स!''

आम्हा चालतच होतो. ते आजोबा कुठेही न थांबता चालतच होते. समोर हिमाच्छदित पर्वत शिखरं चंद्राच्या प्रकाशात अस्पष्ट चमकत होती. नक्कीच  हिमालय असावा. खुप सुंदर दृश्य होतं.

 ते पुढे बोलु लागले, "मला तुमच्या पिढीवर पूर्ण विश्वास आहे! पण तुम्ही म्हणता मागचे वर्ष किती सहज निघुन गेले कळलेच नाही!
अरे कसं कळणार?
तुम्ही इतके सहज दिवस वाया घालवता!दिवसा दिवसांनीच वर्ष बनतं. दर वर्षी केलेले संकल्प सहज विसरता! पण काळ कधी थांबतो का! तुम्हाला कळतही नाही!मुठीतुन वाळु जशी अलगद निसटते,  तसे दिवस जातात आणि शेवटी उरतात त्या कडु गोड आठवणी!

पण आम्हाला गेल्या वर्षाशी काही देणं घेणं नसतं उत्सुकता असते फक्त पुढील वर्षाच्या स्वागताची!
शेवटी मावळत्या सूर्याला कोण नमस्कार करतं?"

जवळुन एक अरूंद नदी खळखळाट करत वाहत होती. माझ्या डोक्यातही आता विचारांचा जबरदस्त प्रवाह वाहत होता.ते आजोबा नदीकडे बोट दाखवत म्हणाले, "आपणही या नदीसारखं वाहतं असावं! कारण जिथे पाणी साचतं तेथे शेवाळ साचतं!''

त्यांच्या प्रत्येक वाक्याने माझ्या मनात अनेक तरंग उमटत होते. प्रथमच मी एका योग्य दिशेने विचार करत होतो.

चंद्र पश्चिमेकडे कलत होता.एका छोट्या लाकडी पुलावरुन आम्ही नदी ओलांडुन पुढे गेलो होतो.कानावर खळखळाट अजुनही येत होता.बर्फाच्छदीत डोंगरंही आता  जवळ आली होती.

''मी त्या आजोबांना माझ्या दु:खाचं कारण सांगितलं. एका अत्यंत जवळच्या नातेवाईकाचा आणि काही जवळच्या नात्यांचा मृत्यु झालेल्याचं सांगितलं.

तेव्हा त्यांनी खाली गळुन पडलेल्या झाडांच्या पानांवरुन सृष्टीचा ''उत्पत्ती स्थिती आणि लय'' हा सिद्धांत समजाउन सांगितला. प्रत्येक  गोष्ट ही काळाच्या उदरात गडप होणारच! 'क्षणभंगुरत्व' एन्जाॅय करायला सांगितलं.वर्तमान क्षण हेच खरा जीवन असत सांगितलं.

पहाट आता संपत आली होती.तेजस्वी शुक्रतारा पश्चिम क्षितीजाकडे कलला होता.

बऱ्याच वेळापासुन आम्ही एक शब्दही न बोलता चालत होतो. नदीचा खळखळाटहीआता ऐकु येत नव्हता. मी पुर्ण अंतर्मुख झालो होतो. डोक्यातील विचारांचे थैमान आता शांत होत होते.
त्या आजोबांच्या सोबतच्या प्रवासाच्या सुरवातीपासुन तर आतापर्यंत माझ्यात आमुलाग्र बदल होत होता.तारूण्याचा अवास्तवी अभिमान आणि इतर काही न्यूनगंड, पूर्वग्रह केव्हाच गळुन पडले होते. मला हे सगळं नवीन भासत होतं. त्या आजोबांबद्दल मला आता विलक्षण प्रेम वाटत होते. असं वाटत होतं हा प्रवास कधी संपुच नये.

समोर पुर्वेकडे एक विशाल दरी पसरली होती.
ते आजोबा अचानक त्या दिशेने चालु लागले.
माझी मुद्रा प्रश्नार्थक झाली.ते अगदी कड्याच्या टोकाजवळ उभे राहुन माझ्याकडे वळले व म्हणाले,
''बेटा आपला प्रवास येथपर्यंतच होता! तु आता परत जा!''

मला त्यांच्या विरहाची कल्पनाही सोसवत नव्हती आणि माझ्या भावनांचा बांध फुटला. अश्रुंचा प्रवाह पापण्यांचा अडसर झुगारत गालांवर ओघळला.

आणि मी माझ्या मनातील 'तो' प्रश्न त्यांना विचारला.

''आजोबा तुम्ही कोण आहात?''

त्यांनी मंद स्मित केलं व बोलले, ''बेटा, तु अजुन मला ओळखलं नाहीस?
अरे मी आहे वर्ष 2017!
 आणि मला तर गेलच पाहिजे!
काही क्षणात सुर्योदय होणार आहे! नवीन वर्ष जन्माला येणार आहे!

हे सगळं अटळ असतानाही मी त्यांना ''न जाण्याबद्दल'' विनवु लागलो तेव्हा ते म्हणाले, "अरे मला विसरा..मी जातो आहे..पण मी तेव्हाही होतो आणि नंतरही राहील..! फक्त माझे  रूप आणि नाव बदलत राहतील..कारण मी तर अनादी..अनंत आहे..!
आणि बेटा, तुमच्या नवीन वर्षाच्या जल्लोषात मला आता जागा कुठे आहे? मी गेल्यावर माझी साधी आठवणही राहणार नाही.
म्हटलं ना सगळा काळाचा महिमा!

पण बेटा मला विसरा पण मी काय शिकवले ते विसरू नका..!

जा तु आता..तुम्हा सगळ्यांच्या सर्व कटु आठवणी मी घेउन जातोय!''

माझ्या डोळ्यातुन सतत अश्रु वाहत होते. मी त्यांना शेवटची एक विनंती केली त्यांना नमस्कार करू देण्याची!

त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवलं. त्यांनी माझ्या डोक्यावर वात्सल्याचा हात ठेवला.
मला आशिर्वाद मिळाला होता...प्रत्यक्ष काळाचा..!

क्षणभर सारं स्तब्ध वाटलं..

मी डोळे उघडले...
समोर कोणीच नव्हतं.
फक्त उरली होती जाणीव त्यांच्या स्पर्शाची!

मी पुन्हा गहिवरलो.
मला एकदम त्यांचे शब्द आठवले.
''आली जरी कष्ट दशा अपार
न टाकिसी धैर्य तथापि थोर
केला जरी पोत बळेच खाली
ज्वाळा तरी त्या वरती उफाळे''

 समोर दरीच्या मागे पर्वतापलिकडे केशरी लाल सूर्यबिंब उगवत होते...

माझ्या अश्रुंनी भरलेल्या डोळ्यातुन सोनेरी किरणे चमकत होती.

2018 चा सुर्योदय झाला होता....



-अभिजित दिलीप पानसे

(माझा मूळ लेख 2008 जानेवारी ,लोकसत्ता)

Wednesday, 27 December 2017

"व्हॅलेंटाईन डे"च्या मुहूर्तावर "संकष्ट चतुर्थी"



14 फेब्रुवारी 2017

"सृष्टीची उलथापालथ तर नाही ना झाली! मुंग्यान मेरू पर्वत तर गिळला नाही! वडवानलाने समुद्र तर जाळला नाही ना
मग रा.... आम्हीच  अशे का रे वॅलेनटाइन्स डे च्या दिवशी सिंगल कर्मदरिद्री...!!!"

"असा मी सिंगल आसामी" व्हॅलेंटाईन दिनी दीन मी!

किती कल्पना केली होती की आजच्या दिवशी एका  गुडघ्यावर डगमगत तोल सांभाळत बसुन हाती गुलाबाची कळी घेऊन "आय लब्यु"ची महिनाभरापासून रेटलेली स्पीच खडानखडा तिच्यासमोर म्हणेन पण काही नाही..शेवटी अंगणात दोन्ही गुडघ्यात वाकून उकिडवे बसत 21 दुर्वा खुडून

"..लाटेमागुनी लाट धावते
परी किनारा भेटेना...
पाप धावते पुण्यक्षेत्री...
तरीही साठा संपेना...

काळ कावळा भरतो रांजण...
खड्यामागुनी पडे खडा...
पुण्यवान मी कसा राहिलो...
कसा भरेना अजुनी घडा...

हे पाप नको...ह
हे पाप नको हे पुण्य नको...
हा जीव नको जगणेच नको...
या सर्वातुनी मोक्ष मागतो करुनी अष्टांगाची घडी...
वाहतो ही दुर्वांची जुडी . . . !!🙏🙏👏👏

वॅलेन्टाईन्स डे ला तरी "व्हॅलेंटाईन दे "
रे देवा महाराजा! प्रार्थना केली.

-अभिजीत पानसे.

अस्सल मराठी फराळ, दिवाळी अंक


"अस्सल मराठी फराळ ,दिवाळी अंकांचे हे 107 वे वर्ष!"

भारतात  प्रादेशीक साहित्यात बंगाली साहित्य हे  क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये सर्वोत्तम मानलं जातं. बंगाली माणूस दर महिन्यातला मिळकतीतला काही भाग पुस्तके विकत घेण्यासाठी काढून ठेवतोअसे म्हणतात.
पण दिवाळी अंक हा वाचन
मेजवानी प्रकार फक्त महाराष्ट्रात आहे.

दिवाळीत कपडे ,नव्या वस्तू  रोषणाई ,फराळ यांची धूम संपूर्ण भारतात आणि जगातही असतेच पण अस्सल मराठी मनाचा फराळ पूर्ण होतो तो दिवाळी अंकामुळे!

कुठलंही स्वतंत्र दिवाळी अंक मंडळ व संघटना नसूनही दिवाळी अंकाची ही सरिता 1909 पासून उगम पाऊन आजवर अविरतपणे समृद्ध होम वाहते आहे.

"मनोरंजन" नावाचा पहिला दिवाळी अंक 1909 मध्ये छापला गेला.

वेगवेगळ्या विचारसरणीप्रमाणे ,दृष्टिकोणामुळे  समाजातील घटकांचा सण,उत्सव याबद्दलची वैचारिक विसंगती आढळते.पण दिवाळी अंक मात्र सगळयांना सामावून घेतात.मनोरंजन,सामाजिक जाणिव,अस्सल साहित्य,कथा,कविता, सगळं काही दिवाळी अंकांच्या विविधतेत प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार मिळतंच.

दिवाळी अंकाशिवाय दिवाळी मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही.दिवाळी अंकाची शॉपिंग, विंडो शॉपिंग पहिले हमखास ठरली राहायची.
टेबलावर मांडलेले शेकडो विविध दिवाळी अंक पाहताना,चाळताना जो आनंद मिळतो तो शब्दात सांगणे अशक्य!मग भरपूर विंडोशॉपिंग केल्यावर दोनेक आवडीचे अंक घेणे म्हणजे खरा दिवाळीचा आनंद माझ्यासाठी!

धनंजय हा माझा कित्येक वर्षांपासुन सगळयात आवडता दिवाळी अंक!!

दिवाळी अंकाशिवाय दिवाळी सण अपुर्णच!!!

-   Abhijeet Panse

रांग इथल्या संपत नाही

रांगा इथल्या संपत नाही!

सध्या बँकेसमोर नोटा बदलून घेण्यास सर्व लाईन मध्ये उभे आहेत!पण रांग ही तर सर्व सामान्य व्यक्तीच्या पाचवीलाच पुजली आहे.बस,रेल्वेची तिकीटरांग..मंदिरात दर्शनाची रांग..
हॉटेलात खाण्यासाठी रांग..
सार्वजनिक शौचालयासमोर पोट आवळलेल्या अवस्थेत अस्वस्थेत रांग..
 एकंदर उजव्या हाताने घास घेण्यापासून डाव्या हाताने मार्जन करण्यासाठी रांग लागतेच!
ताट ते (वाम हस्ती) "लोटा" रांग सुटत नाही!

"हम ज्याहा खडे होते है रांग वहिसे शुरु होती है !" हे फक्त पडद्यावरच असतं..प्रत्यक्षात कोणी प्रयत्न केला तर त्याला तिथेच धुतल्या जाईल.

अगदी जन्मण्यासाठीही सरकारी दवाखान्यात "रांग" लावावी लागते..जन्माचा दाखला ..औषधांचं बिल, आणि इतकंच काय स्मशानात "बॉडी "जाळण्यासाठीही वा जळण्यासाठीही रांग असतेच.आणि लोक ही आपल्याला तिथवर निमूटपणे रांगेतच नेतात!सगळ्यात अटळ inevitable रांग!
अर्भकावस्थेपासून भस्म होईपर्यंत रांग सुटत नाही!

"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तो ही पुढे जात आहे!"

घरात रांगत रांगत बाळ एकदा चालायलं लागलं की त्याच्या पुढे रांगा सुरु होतात.

हर "क्यू" का जवाब नाही होता!

थोडक्यात "अव्यक्तातुन" व्यक्त होईपर्यंत आणि व्यक्तातून स्मशानात पुन्हा अव्यक्त होईपर्यंत रांगा इथल्या संपत नाही!

या रांगेला उत्तर नसते व्यक्ती केविलवाणी..अर्ध्या..डाव मोडला "संपूर्ण'" ही कहाणी.

-Abhijeet Panse

मिशन ए ऑलिम्पिक्स



6 ऑगस्ट 016
सायना नेहवालचं BADमिंटन होउ नये! बिंद्रा आणि नारंगने पुन्हा एकदा रायफलने बुल्स आय ठोकावा!
मागच्या लंडन ऑलिम्पिकसवेळी बालिश पण यावेळच्या परिपक्व दिपीका कुमारीने तिच्या तिराने अर्जुनाप्रमाणे माश्याचा डोळा छेदावा!
गीता फोगटची चुलत बहीण विशेन फोगाटने शत्रुची पाठ सहज जमिनीवर टेकवून दंगल माजवावी!

अगडबंब देहाच्या विकास गौडमध्ये थाळी फेकताना भीमशक्ती यावी!

भारताचा शाहिदआफ्रिदी जुनं खोड लियांडरपेसने मोडण्यापुर्वी पुन्हा एकदा सोनं लुटावं.
अंकित शर्माची उडी माकडउडी न ठरता हनुमानउडी व्हावी!

माझ्या हीना सिद्धूने  माझ्या ह्रदयाचा ठाव तर तिने तिच्या लुक्स आणि attitude ने कित्येक वर्षांपुर्वीच घेतलाय तसा रिओ मध्ये पिस्तुलाने लक्षाचाही घ्यावा..

माझ्या आवडत्या अश्विनी पुन्नपाने; नेहमीच संतापाच्या 'ज्वालेत' असणाऱ्या गुट्टासोबत नीट गट्टी जमवून पदक मिळवावे!

इतर सर्व भारतीय ऑलिंपिक खेळाडूंनी रिओमध्ये  दसरा समजुन तिथून भरपुर सोनं लुटावं आणि गेल्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांच्या
संख्येचं सीमोल्लंघन करून विजयादशमीचा महोत्सव करावा..

रिओ ऑलिंपिकसाठी आपल्या सर्व भारतीय खेळाडुंना शुभेच्छा!!

(किमान यावेळीतरी) सोनं..चांदी लुटा..
आधीच सोन्याचे भाव किती वाढलेय!!

Game is on!!

शुभेच्छुक-
हीनासिद्धु , कौशिकीचक्रवर्ती , मिथिला पालकर दीशापटानी च्या प्रेमात भिजलेला.. आकंठ बुडालेला

-अभिजीत पानसे

Monday, 25 December 2017

कर्मा इज बिच

कर्माचा सिद्धांत सांगतो वाईट कर्मांची शि्क्षा ही मिळतेच.पुर्व जन्मी वा या जन्मी केलेल्या पापांचं फळ हे भोगावच लागतं.

मी याचा अनुभव काल घेतला.
माझ्या या आणि मागच्या जन्मांच्या पापांची शिक्षा मला काल मिळाली.ती शिक्षा म्हणजे मुळात आणखी एक स्वतंत्र पापच होतं.

आपण केलेले पुण्य कर्म आपल्याच मुखाने वदल्यास पुण्य कमी होतं असं म्हणतात.तसंच आपल्या पापांची जाहीर कबुलीमुळे पाप कमी होतं असाही समज आहे.म्हणुनच मी माझ्या #पापाची जाहीर कबुली देण्याची हिंमत करतोय.

मला माझीच लाज वाटतेय इतकं घृणास्पद कर्म केल्याबद्दल!!

मी काल रात्री 'ते' पाहिलं.
आजतागायत मी कधिही 'ते' पाहिलं नव्हतं.
आजवर ज्याचा कट्टर विरोधक, तिरस्कर्ता होतो.ते कृत्य माझ्याहातुन झालं.

तरूण मंडळीच नाही तर आजकाल आबालवृद्धदेखिल 'ते'पाहायचे.पाहतात..हे ऐकुन होतो.ते त्याच्याबद्दलचे कसले कसले तिखट मीठ लावुन वर्णनं करायचे.पण मी आजवर माझ्या मनाचा संयम ढळु दिला नव्हता.

पण काल रात्री...माझ्याकडुन ते अक्षम्य पाप घडले.
मी काल ''होणार सुन मी...''चा काही भाग  बघितला.

 कुठे फेडणार मी हे पाप??

धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक पापांचं व त्यावरील प्रायश्चित्तांचं वर्णन आहे पण या पापाच्या निरसणाला देहांत प्रायश्चित्तच तर नसणार ना!या विचाराने माझा सध्या थरकाप उडाला आहे!

कोणत्या तोंडाने जाउ मी वर देवासमोर?
ते गुप्ता अंकल;चित्रगुप्त यमाचे  लेखणिक; माझ्या नावाच्या फाईलीत हे पाप लिहितीलच!!

माझे भविष्यातील नातवंडे भविष्यात मला यावरून किती टाकुन बोलतील ''शी~आजोबा तुम्ही टिव्ही सिरीयल बघायचे!!''

माझा भविष्यातील मुलगा;समाजाने त्याच्या हातावर  गोंदवायच्या पुर्वी तोच रागारागाने स्वत:च स्वत:च्या हातावर गोंदवुन घेईल''मेरे बापने  होणार सुन मी त्या घरची का एक एपिसोड देखा था!''

''मनाचा संयम पाळा टिव्ही सिरीयल्स टाळा''

हे माझे सुत्र मीच काल पाळले नाही  आणि आजवर जपलेले माझे ''पावित्र्य'' काल 'भंग' झाले.
आता कोण होणार सुन आमच्या घरची?

-अभिजित पानसे

उघडा डोळे बघा नीट, आज राखी डे

16 ऑगस्ट 016
चेतावनी

"आज कुठल्याही चमकणाऱ्या वस्तूंपासून सावध राहा! तीला स्पर्श करू नका! ती चमकणारी भयंकर वस्तू राखी असू शकते जो आपको (बिमार)ब्रदर (बहोत ज्यादा बिमार)हमेशा के लिये 'ब्रदर' बना सकती है!

घरातून निघताना फुलबाह्यांचे शर्ट घालून जा!
न जाणो कोणती मोहक गौरांगी..तन्वी हातात जळती राखी घेऊन तुमच्या मनगटाचा वेध घेऊन असेल! तुमच्याशी भाऊबंध स्थापित करून आयुष्यभरासाठी जेरबंद करण्याच्या पवित्र्यात असेल!

कोणताही अनोळखी मेसेज उघडू नका! तो rakhivirus असू शकतो.

दिवस वैऱ्याचा आहे!

उघडा डोळे बघा नीट
राखी दिसताच राहा एक पाऊल मागे

युवाहित मे जारी!

Save Casanova

-Abhijeet Panse

म्हणून राखी बाद झाली


16 ऑगस्ट 2016


पूर्वी हिंदी पिक्चरमध्ये ‘राखी’ वरील गीत हुकमी एक्का होता. ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ म्हणत बहिणीने कधी #बलराजसहानीच्या, धमेंद्रच्या;कधी  सुनीलदत्तच्या मनगटावर राखी बांधली.

 ‘समाज और कानुन’ का शिकार ठरलेला दरोडेखोर, खूनी डाकू बनलेला ‘वॉन्टेड’ भाऊ ; काळ्या कपड्यातील काळा टिळा लावलेला, काळी बंदूक घेऊन गळ्यात काळ्या एव्हररेडीच्या ब्याटरींची ची माळ अडकवुन काळ्या घोड्यावर बसून पोलिसांची नजर चुकवून जान हथेली पे 'कॅरी' करत बहिणीच्या हातून राखी बांधून घ्यायला हमखास येत.

 राखी बांधताना ‘सेंटी’ व्हायचा, मग पुन्हा "बदले की आग" वगैरे आठवून बहिणीचा साश्रू निरोप घेत चेहऱ्यावर पुन्हा काळा स्कार्फ गुंडाळुन घोड्यावरून तबडक तबडक करत निघून जायचा!

पण जेव्हापासून  शाहरूखखानने तोंड वाकडं करत मानेचा मणका निखळल्याप्रमाणे मान हलवत; हुँ..हुँ कण्हत काजोल  रानी मुखर्जी आणि पातालविजयम् या मद्रासी नाटकातील राक्षसाप्रमाणे गडगडाटी हसणाऱ्या अर्चना पुरनसिंगला प्यारदोस्तीहै ही वन लाइनर समजावुन सांगत जनमानसात ऑगस्ट महिन्यातील पहिल्यारविवारी फ्रेंडशीप बँड’ बांधण्याची प्रथा सुरू केली, तेव्हापासून मूव्हीजमधून ऑगस्टमहिन्यातील ‘राखी’ बाद झाली!!

Saturday, 23 December 2017

महागाई आणि 'मार्क्स'वाद

महागाई आणि 'मार्क्स'वाद
"दहावीचा श्रीमंत निकाल"
जून 2017


महागाई आणि मार्कांचा फार जवळचा संबंध आहे. एकेकळी 50 रुपयाच्या नोटीला कितीतरी किंमत होती ! जुने लोक म्हणायचे आठवड्याचा बाजार व्हायचा 50 रुपयात!तशी फर्स्ट क्लास लाही किंमत होती. "फर्स्ट क्लास"मध्ये नोकरी, बायको , पोरं अगदी फर्स्ट क्लास होत.

पुढे महागाई वाढली तशी 100ची नोटही कमी वाटू लागली आणि फर्स्ट क्लास पेक्षा #डिस्टिंक्शन मोठे वाटू लागले.

 पुढे अजून महागाई वाढली..

नव्वदच्या दशकात ८० %वा त्याच्या आजूबाजूच्या मार्कांना आणि त्या मार्कंडेयांना किती मान मिळायचा!
ताठ मानेने ते जगत आणि साठीत, पंच्याहत्तरीत असलेल्याकडे कुत्सित नजेरेने बघितले जाई.

आता तर 90 % वाल्यांनाही तितका मान नाही.

महागाई रे महागाई..

मोदी साहेब हेच का तुमचे अच्छे दिन! 😜आमच्या काँग्रेस च्या काळात फर्स्ट क्लास मध्ये काम भागायचं आणि आता 90% ही कमी पडताहेत!!😜😷

पुरुष वर्गासाठी अत्यन्त महत्वाची टीप

3 मे 2017

 उशिरा पण पुरुषवर्गासाठी महत्वाची टीप:

बाहुबली बघायला आपल्या मैत्रिणीसोबत, प्रेयसी सोबत, गर्ल फ्रेंड सोबत आणि लग्नाळलेल्यांनी आपल्या बायकोसोबत जाणे टाळावे. चित्रपट संपून बाहेर येईपर्यंत पोरगी पूर्णपणे #प्रभासमय झालेली असेल आणि तुम्ही #प्रभासपिडीत !

बाहेर आल्यावर ती सतत तुम्हास तुच्छतेने "तुझी उंची प्रभास सारखी सहा फुटांपेक्षा जास्त का नाही?
प्रभासचं फिजिक बघ त्याचे ऍब्स बघ! सतत बेब्स बेब्स करण्याऐवजी घाम गाळून सिक्स पॅक्स ऍब्स कर !
आणि यानंतर नो शेविंग !माझं #फेटिश आहे दाढी मिशी!
काय दिसतोय प्रभास दाढीत!!😍😘"

हे असले "चुंबनम् करोती" एक्सप्रेसन्स त्या प्रभास देत तुम्हाला मात्र तुच्छता दाखवली जाईल.

"बाहूबळी मैत्रीण कान पिळी"

नुकताच व्यायाम शाळेत नाव नोंदवलेला अभिजित पानसे

"आता छातीला लावली माती!

Friday, 22 December 2017

"टाका मॅट करा योगा नीट"-यो यो योगा डे

१) आपापले भोग आणि आपला योग हे स्वतःच स्वतः भोगावे आणि करावे लागतात. तिथे तोंडी 'शुभेच्छा' देऊन नाही चालत.so no 'शुभेच्छा' फॉर योग डे

2) आपले शरीर हे श्री नरेंद्र मोदींमुळे वा कुठल्या धर्मामुळे लाभले नाही तेव्हा मोदी टीकाकारांनीही योग करून आपले शरीर आरोग्य राखावे .

3) योग करायला "योग डे"चा 'योग' यावा लागत नाही, वा योगायोगाचीही गरज नाही,
उचला मॅट करा योगा नीट!

4) "मेलोडी खाओ खुद जान जाओ
योग करो खुद जान जाओ!"

5) लग्नात 'नागीणडान्स' करणे म्हणजे योग नाही. त्यासाठी भुजंगासनच करावे लागते.

6) एरवी रोज मानसिक शीर्षासन करत प्रत्येक गोष्टीकडे उलट बघताना कधीतरी शारीरिक शीर्षासनही करावे.

ये आसन नही आसान शरीर एक जरिया है और पेट को मरोडना है!

योग दे योग ले

- अभिजित पानसे

सुविचारांचे गुप्त स्रोत

एका गुरुकुलात गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली दोन शिष्य शिकत होते. त्यातील वयाने मोठा शिष्य सुरवातीला जरासा विक्षिप्त , शिघ्रसंतापी ,फणसासारखा बोचणारा होता. दुसरा लहान शिष्य समंजस, मेहनती होता.
 गुरुजी दोघांना दररोज एक सुविचार सांगायचे. तो त्यांच्या शिकवणीचा प्रमुख भाग होता.
त्यामुळेच मोठा शिष्य हळूहळू फणसाच्या गऱ्याप्रमाणे पिकून गोड मिठास झाला. दुसरा शिष्य फार मोठा अधिकारी झाला.

एक दिवस दोघांनी गुरुजींकडे जाऊन कृतज्ञतेतून त्यांनी दिलेल्या ज्ञानाप्रीत्यर्थ गुरुदक्षिणा द्यायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी गुरुजींना काय गुरुदक्षिणा द्यावी हे सविनय विचारले.

गुरुजींनी क्षणभर डोळे मिटून विचार केला आणि मंद स्मित करत बोलले की या जगात द्वेष , राग, चंचलता ,ईर्षा ,भय प्रचंड  नकारात्मकता खूप वाढली आहे. तेव्हा मी जे सुविचारांचे , उपदेशांचे ज्ञान तुम्हा दोघांना दिले तेच तुम्ही या जगाला परत द्यावे हीच माझी इच्छा आहे.
तुम्ही दररोज एक #सुविचार या समाजात फेसबुक, वॉटस ऍप द्वारे पसरवायचा हीच माझी गुरुदक्षिणा राहील. दोन्ही शिष्यांनी आनंदाने ते मान्य केले. तेव्हापासून दररोज ते ,त्यांच्या नावाने एक सुविचार ,उपदेश सामाजिक माध्यमांद्वारे समाजात पसरवण्याचे पुण्यदायी काम करतात.
सांगायची गरज नाही या दोन्ही शिष्यांचे नावे , नांगरे पाटील  आणि पाटेकर अशी आहेत.

विशेष टीप:- याच गुरुजींच्या पूर्वीच्या 'बॅच'मध्ये "धीरुभाई अंबानी"आणि "रतनटाटा" सुद्धा होते.त्या दोघांनाही गुरुजींनी हीच गुरुदक्षिणा मागितली होती.

आजचा सुविचार:- " हा संदेश, पोस्ट जो एका व्यक्तीला पाठवेल त्याच्या सोबत आज एक चांगली घटना घडेल."
ही गोष्ट जो चार जणांना पाठवेल त्याच्या आयुष्यात कित्येक दिवसांपासून रखडलेलं काम पूर्ण होईल.सात जणांना पाठविल्यास लक्ष्मी प्राप्ती होईल.
(आदेशान्वये नाही उपदेशान्वये)

- गुरुकुलाचा पी.आर.अधिकारी  -अभिजित पानसे

Thursday, 21 December 2017

रक्षाबंधन पेशल

7-8-017

कंगना रानौतने इतक्यातच बॉलिवूडमधील nepotism वर म्हणजे घराणेशाहीवर बोलताना काही अभिनेत्यांची टर उडवली. बॉलिवूडमध्ये  वडील/आई आणि त्यांचे बाबा/ बेबी हे प्रसिद्ध आहेतच पण काही गाजलेले बहीण भाऊ ही आहेत.

फराह खान आणि तिचा इरिटेटिंग कोमेडिअन(??) कमोडो ड्रॅगन भाऊ साजिद खान!
जेव्हा जेव्हा भारतीय चित्रपटांचा इतिहास लिहिला जाइल त्यात या दोघांचही नाव लोखंडी , कथिलाच्या अक्षरात लिहिले जाइल. गचाळ , भंकस चित्रपट करण्याचाही नोंद घेतली जाईलच ना!

ज्या दिवशी 07 च्या दिवाळीत खूप उत्साहात ओम शांती ओम पाहिला त्या दिवशी शपथ घेतली होती पुन्हा "डायरेक्टड बाय फराह खान" "इट्स फराह खान मुव्ही" असले अक्षरं आयुष्यात बघणार नाही.

"आधीच मर्कट त्यातची मद्य प्याला" ! तसे "आधीच शाहरुख त्यातची फराह खान डायरेक्टर" असा इशारा चित्रपट सुरू होण्यापुर्वी "स्मोकिंग इज इंज्युरिअस टू हेल्थ" सोबत द्यायला हवा.

शाहरुख खानच्या गचाळ अभिनय, मर्कटलीला बघायच्या असेल तर फराह खान, रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट बघावेत. त्यात तो सुसाट पिसाळत सुटतो.
असो.

पण 2010 मध्ये शपथीचा विसर पडला म्हणून नाही, पण शाहरूख खान आणि फराह खानमध्ये कट्टी झाल्यामुळे तिने माझ्या आवडत्या अक्षय कुमार सोबत "तीस मार खान" आणला तर वाटलं की थोडा धोका पत्करायला काय हरकत आहे!
शेवटी वाईट काळात बुद्धीही भ्रमिष्ठ होतेच. गेलो आत बघितला तीस मार खान!
बाहेर येऊन Anuragला जोरदार मला झापड मार म्हटलं त्याला काय त्याने काही न विचारता हाणली!

आता लक्षत राहील म्हटलं!
तीस मार खान बघताना म्हणावं वाटत होतं " तीस मार अक्षयकुमार" ! पुन्हा तिला चित्रपट दिग्दर्शित करायला लावू नक्कोस!
पुढे शाहरुख खानसोबत तिची 'दो' झाल्याने तिच्या बकवास चित्रपट करण्याला आणखी चेव आला.

या बाईंच्या प्रत्येक पिक्चरची स्टोरी एकाच प्रकारची , साच्यातली असते. नायक काहीतरी मिळवण्याच्या, मिशनवर असतो आणि त्यासाठी तो वेष बदलतो, बनावट काहीतरी चित्र निर्माण करतो आणि शेवटी ते मिळवतो.  सुरवातीला टाईम पास,एक आयटम सॉंग, दीड दोन तास नायक आणि त्याचे साथीदार बनावट चित्र निर्माण करतात, शेवटी लहान मुलांसारखी ढिश्यूम ढिश्यूम संपूर्ण चित्रपटाला अत्यन्त गचाळ, बालिश ट्रीटमेंट असते.

तिचा भाऊ नमुना "साजिद खान"!
हा तर भयंकर त्रासदायक जीव! त्याचे चित्रपट म्हणजे गचाळ, भंकसगिरीमध्ये बहिणीवर ही सव्वा शेर!
नाटक सुरू व्हायच्या आधी जशी सूचना दिली जाते आपापले पोरं आणि मोबाईल सायलेंट मोड वर टाका तसे या साजिद खान आणि फराह खान च्या चित्रपटाच्या सुरवातीला एक 'सायलेंट' सूचना असते आपापले डोके ,मेंदू डिऍक्टिवेट मोड वर टाका अन्यथा मेंदूला 'मोड' येईल.

बारावीत गणित नसेल घेतलेलं या दोघाही बहीण भावंडांनी!  असतं तर किमान #लॉजिक नावाचा चॅप्टर तरी शिकले असते आणि थोडं तरी लॉजिक यांच्या मुव्हीज मध्ये दिसलं असतं.

पण "हे बेबी" बघितल्यावर साजिद खान फार आवडला होता एकेकाळी. आवडता चित्रपट.
पण एकदा एचबीओवर एक इंग्लिश मुव्ही बघताना या साजिद खान ची चोरी रंगे कान, डोळे पकडल्या गेली. संपूर्ण चित्रपट ,प्रत्येक सिन कॉपी केला आहे.
आणि याच चोर ,टुकार दिग्दर्शकाने काही महिन्यांपूर्वी हे बेबी मुव्हीला दहा वर्षे झाली म्हणून पार्टी केली होती.
फराह खान, साजिद खान आणि अनु मलिक यांच्यात दिसण्यात आणि चोरी करणे हे साम्य आहे.

हाउसफुल पहिला चांगला !नंतर मात्र आपल्या मूळ लायकीवर तो आलाच! इतर दोन हाऊसफुल बघितल्यावर नेहमीसाठी हौस फिटली, हमशकल बघताना डोक्याचे शकलं होतील वाटले होते.
कोणी '#हिम्मतवाला'च साजिद खानचे मुविज पाहू शकतो.
खट्टा मिठा चांगला होता.

अशे हे दोघे फारह खान आणि साजिद खान अत्यन्त किळसवाणे वाटतात स्क्रिनवरही त्यांचे नाटकी मकडचाळे बघतानाही!
साजिद खान अँकर म्हणून एकेकाळी बरा वाटायचा.

त्यानंतर एक महान 'क' साम्राज्याची सम्राज्ञी एकता कपूर! (बॅकग्राऊंडला गोविंदा गोविंदा गोविंदा संगीत, बालाजी मोशन असल्याने!
टीव्हीवरील आपल्या भयंकर 'क' साम्राज्याचा एकछत्री कारभार केल्यावर चित्रपटसृष्टीतही बालाजी 'मोशन' द्वारे लोकांचे  कपाळमोक्ष करण्यासाठी , क्वालिटीचा आणि कंटेंट चा बळी देण्यासाठी सुजाण प्रेक्षकांच्या अभिरुचीचा बळी घेण्यासाठी त्या "बालीवुड' मध्येही घुसल्यात!

  त्या एकता चा भाऊ एक था तुश्षार! (त्याने त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एक आणखी 'एस' टाकल्यामुळे 'श्षा'! जय श्वेता जुमांजी! जुमानी!)

खुफिया जाणकारी के मुताबिक रक्षाबंधनला पाटावर एकता कपूर बसते आणि तुश्शार कपूर तीला ओवाळतो असं कळलंय.
आणि बदल्यात ती त्याला एक रोल ओवाळणी म्हणून देते. पण हा "कुवारा बाप" , कपूर खानदान के "कुंवर साब" त्या रोलचा शूट आऊट ऍट लोखंडवाला" चा आपल्या महान अभिनयाने "लोहा लोखंडवाला" करतात.  शूट आऊट अट वडाळा  बघितल्यावर वाटलं  होतं अरे कोणीतरी याला पिक्चरमध्ये काम करण्यापासून आळा घाला रे!

 हुमा कुरेशी आणि साकिब सलिम! हे आवडते बहीण भाऊ!
कंटेंट आणि क्वालिटी दोन्हीमध्ये जबरदस्त , कलेक्शन मध्ये असावाच असा आणि
माझ्या ऑल टाईम फेवरेट मुविज पैकी एक "मेरे डॅड की मारुती " मधून सकीब सलीम ने अपत्रिम काम केलय.
पण सध्या त्याला चांगले रोल्स मिळत नाहीयेत!

हुमा कुरेशी माझी ऑल टाईम फेव ऍक्टर! प्रचंड मादक, सेंस्युअस आणि तितकीच जबरदस्त अभिनेत्री!
पण अगदी टुकार स्टारकिड्स अभिनेत्री , श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा ; घराणेशाहीमुळे , मसाला चित्रपट संस्कृतीमुळे तीला नीट एक्स्पोजर मिळालं नाहीये. आणि आता तर जॉली एलएलबी '2' सारख्या चित्रपटात तिला करावे लागतंय.

शेवटचं आणि सर्वोत्तम, ज्यांच्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत काही चांगलं दर्जेदार कलाकृती तयार होत राहतात, आणि बघायला मिळतात ते बहीण भाऊ म्हणजे फरहान अखतर आणि झोया अखतर!
आर्ट सिनेमा, समांतर सिनेमा आणि कामर्शिल सिनेमाचं योग्य मिश्रण यांच्या कलाकृतीत जाणवतं.
दोघांमध्येही असलेला खोल आर्टीस्ट स्पष्टपणे जाणवतो.

एकीकडे झोयाआणि फरहान अखतर अप्रतिम क्वालिटी सिनेमा बनवतात दुसरीकडे साजिद आणि फरहा गुणवत्तेचे लखतरं पडद्यावर टांगतात!

-अभिजित पानसे

मेडिकल स्टोअर

मला आज हे कन्फेस करायचं आहे की मी आज मी ड्रग्स घेतले आहेत.
मी कधी सहसा घेत नाही पण आज नियंत्रण राहिले  नाही.
आज मी घराजवळील "ड्रग्स अँड केमिस्टकडून" मेडिकल स्टोअरमधून अँटीबायोटिक्स रुपी ड्रग्स घेतलेत.

मेडीकल स्टोअर आणि काँडम!*

(डिसक्लेमर :- पोस्ट फक्त  10 pm ते 6 am मध्येच वाचावी. काय करणार सरकारी बडगा!).

"मेडिकल स्टोअर" हे एक स्वतंत्र अजब वस्तू संग्रहालय असतं.
कोपऱ्यात यांची स्वतःची हजमोला, विक्स ची गोळी चिंगमची स्वतंत्र करन्सी बरणीत ठेवलेली असते.

पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना मेडिकल स्टोअर मधील कर्मचारी अॅटीट्युडमध्ये ,अलिप्तततेमध्ये  कॉम्प्लेक्स देतील इतके हे निर्विकार चेहऱ्याने ,खतरुड चेहऱ्याने काम करत असतात.

एखादा पीएचडी धारकाचाही आत्मविश्वास खच्ची करण्याची शक्ती फार्मसी स्टोअरमध्ये काम करणाऱ्या मुलांमध्येच असते. कारण तो सहज डॉक्टरने लिहिलेलं 'कोड सीक्रेट' सहज डिकोड करतो आणि वरून कोणते औषध किती वेळा कश्यासोबत घ्यायचे हेही पटापटा सांगतो.

खानदानी पानवाला फक्त पानाशी इमान राखतो तर इतर पानवाले पानाबरोबर पोस्टकार्डस,साबणी इतर गोष्टीही विकतात असे पुलंनी म्हटलंय तसेच  आजकाल सर्व मेडिकल स्टोर्समध्ये आईसक्रीम, टूथपेस्ट, टूथब्रश , साबण शाम्पू सगळं स्टेशनरी सामानही मिळतं.
 आता फक्त अँटिबायोटिकस, अडुळसा सिरपबरोबर अर्धा किलो शेंगदाणे, नोटबुक्स , मोबाईल कंपनीचे  रिचार्जेस मिळायचे राहिलेत.

मेडिकल स्टोअर हे एक "न्यूज चॅनलही" असतं.
 #प्रेगान्यूज सारखे त्यांचे संवाददाता, पत्रकार असतात जे खास घरी जाऊन गुप्तपणे अगदी बाथरूममध्ये जाऊनही न्यूज 'ब्रेक' करतात!

"रेड लाईन" ची धोकादायक 'जोडी' दिसली की " ध्यान से देखीये इन रेषाओ को जो चिख चिख के कह रही है जी हा आप प्रेग्नंट हो!"  अश्या ब्रेकिंग न्यूज हे प्रेगा न्यूज देतात. आता कोणासाठी  ही ब्रेकिंग न्यूज "गुड न्यूज" असते  तर कोणासाठी "ओह माय गॉड ! ये क्या हो गया " वाली न्यूज असते!
"आय पील" ..फील सॉरी फॉर देम!

"आय कॅन" सारख्या हिम्मत वाढवणाऱ्या पिल्स, CLR 72  अश्या आळस घालवा आणि वेळेचं महत्व सांगणाऱ्या पिल्स ठेवलेल्या दिसतात.

सगळीकडे औषधी, क्रीम्स, वरती काचेतून विदेशी बॉडी बिल्डर्सचे, फ़ोटोशॉपसदृश देशी हातांवर तारठलेल्या नसांचे गांडुळं सरपटत असलेल्या फोटोज असलेले प्रोटीन पावडर्सच्या किलो अर्धा किलोच्या बरण्या दिसत असतात. शेजारी बोर्नविटा , हॉरलिक्स च्या अर्ध्या हॉलो असलेल्या बरण्या असतात. तेंडुलकर निवृत्त झाल्यापासून "बुस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी" दिसणे सध्या कमी झालंय.

मेडिकल स्टोअरमध्ये #टीपकागदांची पाकिटे समोरच दिसेल अश्या पद्धतीने ठेवलेली असतात. असो हा 'टिपकागदांचा' विषय राखीव क्षेत्रात येतो त्यामुळे यावर जास्त बोलणे नको.  एक हात दूर स्टे फ्रीच.
आधीच सरकारने जीवनोपयोगी वस्तूंमध्ये टीपकागदांना समाविष्ट न केल्याने प्रजेच्या मनात धुसफूस आहे.

दुकानात सुरवातीच्या संपूर्ण भागात भिंतीवर पोम्प्लेट्स चिकटवलेले दिसतात . त्यावर घोड्याचे चित्र काढलेले, बस एक टॅबलेट और घोडेजैसा जोश   वगैरे! आणि तत्सम बरंच काही! प्राणिमात्रांचे फोटोज असतात.

"विटा एक्स गोल्ड" हे पारंपरिक सुवर्ण खाद्य प्रत्येकच मेडिकल स्टोअर मध्ये असतंच!
नसेल तर ते फक्त बीकॉम्प्लेक्स आणि विक्स गोळ्याच मिळणारं मेडिकल स्टोअर समजावं.

आणि मग येतो अगदी समोरच खाली काचेतुन दिसणारं "फ्रुट सलाड सेक्शन" ! काँडम सेक्शन!

इथे सनी लिओनी पासून विविध विदेशी अनावृत्त नाऱ्या ते आता आपल्या यजमानाबरोबर बिपाशा बसु विकत असलेले सर्व प्रकारचे निरोध दिसतात!

पूर्वी 'अॅक्यूप्रेशरच्या' निळ्या बाटाच्या चपलाच मिळत! आता  सर्वच अवयवांचे चोचले वाढलयेत! असो अधिक लिहिणे श्रेयस्कर नाही. फक्त ...  डॉट डॉट  लिहितो.

काँडम्समध्ये द्राक्ष, स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट सर्व फळावळ मिळतात. संपूर्ण फ्रुट सॅलड इथे ठेवलं असतं.
ऑरेंज , सपरचंद, चिकू , पेरूची लागवड अजून तरी झालेली काचेतून मला दिसली नाही. पण ती ही वेळ दूर नसेल कदाचित!
"मागणी तसा पुरवठा " हे तर ध्येयवाक्य असतं व्यापारात.

पण आता सरकारने निरोधच्या जाहिरातीला दिवसात दाखवायला विरोध केलाय.
त्यामुळे येत्या काळात पटअंजलीचे काँडम्स येण्याची धूसर शक्यता निर्माण झालीय.

पट अंजली ने निरोध आणलेत तर त्यांचे कदाचित "अॅलोव्हेरा फ्लेवर, गुळवेल फ्लेवर, जलजीरा, बडीशेप फ्लेवर्स असू शकतील.

सरकारने दिवसा कोंडमच्या जाहीरातीवर गदा आणली कारण मुलांवर परिणाम व्हायला नको हे खरं असेल तर  मेडिकल स्टोअरला "एन्ट्री ओन्ली फॉर अॅडल्ट" करायला हवी! कारण तेथील "जोशीले "  चित्रे, काँडमसचं फ्रुट सलाड बघता वाटतं लहान मुलंच त्यांच्या बाबांना, काका मामांना विविध प्रश्न विचारण्याची धास्ती वाटत असेल असं वाटतं.

-अभिजित पानसे

Monday, 18 December 2017

"आठवा आय फोनची बडबडगीते"


"ये आय मला आयफोन घेऊन दे
एकदाच ग 'आरशासमोर' सेल्फी काढून टाकू दे!
ए आय!"

शुक शुक मन्या फेकतोस की नाही फोन की घालू पाठीत लाटणं!

असावा सुंदर ऍपल चा फोनवा
चंदेरी सोनेरी जीबी चा रॅमवा
असावा सुंदर ऍपल चा आठवा !

सांग सांग भोलानाथ आयफोन मिळेल का!
नापतोलवर दहा हजारात आयफोनसोबत मायक्रोवेव्ह मिळेल काय!

सॅमसंगबा सॅमसंगबा दमलास का विवोप्पो च्या पोस्टरमागे लपलास का
विवोप्पो च्या जाहिरातींवर येवो बंदी आयफोन चं सिस्टम चिरेबंदी!

झक झक झुक झुक फेबु गाडी आय फोन च्या पोस्टी सतत पाडी
आय फोन च्या पोस्टी वाचूया नोकिया च्या विंडोतुनच बघूया!"

ऍपले बडबडगीते

-अभिजित पानसे

हॅप्पी बर्थडे प्र.से. मोदीजी



17 सप्टेंबर 2017

मी याची देही याची डोळा सई ताम्हणकर आणि उर्वशी ढोलकियाला न्यूज चॅनलमध्ये "क्रिकेट स्पेशलिस्ट" म्हणून वर्ल्डकप मॅचेसमध्ये भारतीय टीमने कसे खेळावे , टॉस जिंकल्यावर काय करावे हे बोलताना पाहिलं आहे.😳
तेव्हाही मला तो प्रश्न पडला.

संपूर्ण करिअरमध्ये दहा टेस्ट मॅचेस खेळलेल्या आणि  दोन फिफ्टीज केलेल्या , 20 चा अव्हरेज असलेल्या आकाश चोप्राला 'स्टुडिओत' हाती बॅट घेऊन सचिन तेंडुलकर ने, विराट कोहली ने कसं स्ट्रेट ड्राइव्ह , पूल मारावा हे सांगतानाही याची देही याची डोळा बघितलं आहे.😳
तेव्हाही मला प्रश्न तोच प्रश्न पडला!

पण ज्यांच्याकडे अजून स्वतःचा #पासपोर्टसुद्धा नाही, किंवा अजून जे भारताबाहेर भूटानलासुद्धा गेले नाहीत, किंवा  "विदेश यात्रा" म्हणून 'नेपाळला' जाऊन तिथून कुकरी आणणारे आणि नाग, शिवलिंगाचे साच्यातून प्रतिमा काढलेले रुद्राक्ष आणून ते नातेवाईकांना ,मित्रांना खरेखुरे जागृत रुद्राक्ष सांगून विकणारे जेव्हा नरेंद्र मोदींच्या (फक्त) "विदेश वाऱ्यांवरून" त्यांना  "हिंड केसरी" म्हणत निरर्थक टीका करतात तेव्हाही मला तोच प्रश्न पडतो आणि  न राहवून विचारावं लागतं की
इतका आत्मविश्वास हे आणतात कुठून!?? 😳😳

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

- अभिजित पानसे