Showing posts with label स्वास्थ्य अस्वास्थ्य. Show all posts
Showing posts with label स्वास्थ्य अस्वास्थ्य. Show all posts

Saturday, 8 September 2018

एलजीबीटीक्यू, 377,



   मागच्या वर्षी लोकप्रभामधील लेख वाचून  मुंबईतील एका मुलाचा  फोन आला होता. त्याने सांगितलं  लोकप्रभा ऑफिसमध्ये फोन करून माझा नंबर घेतला. त्याने सांगितलं की त्याने एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. तिला कुठलातरी अवॉर्डही मिळाला आहे. ती शॉर्टफिल्म,  LGBT ग्रुपमधून त्याने फेस्टिव्हलला पाठवली होती. शॉर्ट फिल्म समलैंगिकता या विषयावर केली आहे.
तो स्वतः LGBT ग्रुपमध्ये येतो.

सुरवातीला मला हा मित्राचा प्रॅंक वाटला. म्हणून तत्कालीन उपसंपादक चैताली जोशीला विचारून पक्कं केलं की खरंच त्याने फोन करून माझा नंबर घेतला होता.

त्याच्याशी बोलून खूप छान वाटलं होतं. सगळ्यात विशेष गोष्ट ही होती की त्याच्या आईने स्वतः त्याला ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात खूप मदत केली. शिवाय त्याच्या आईनेही त्यात काम करून एक बाजू मांडली आहे.

त्याचं नाव आठवत नाही. त्याचा नंबरही आता नाही. पण आज समलैंगिकता हा अपराध नाही हे 377 कलम सुप्रीम कोर्टाने रद्द करून ‘नैसर्गिक’ LGBTना खूप दिलासा दिला आहे. त्यामुळे आज त्याची आठवण झाली.

तो जिथे कुठे असेल त्याच्यासहित
सर्व नैसर्गिक लेस्बियन्स, गे, बायदेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स लोकांचे अभिनंदन.

आता त्यांना अटक होण्याची भीती राहणार नाही. .ते  उघडपणे समाजात वावरू शकतील शिवाय आपले नाते उघडपणे सांगू शकतील. फक्त याचा दुरुपयोग लैंगिक शोषणात होऊ नये ही आशा. कोर्टाने शिशुंसोबत आणि प्राण्यांसोबत केलेले लैंगिक व्यवहार हे अपराध ठरवले आहेत. हे अत्यंत योग्य.

सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक जजमेंट दिलंय. प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी भारताचा एक सकारात्मक अभिनंदनीय पुरोगामी निर्णय.

- Abhijeet Panse

Thursday, 12 July 2018

Rain iz falling chhamacham

Rain iz falling chha
macham

पावसाळा सुरू झाला आहे तेव्हा आमच्या आजवरच्या पावसाळ्यांच्या स्वानुभवांवरुन खालील विशेष काळजी प्रत्येकाने घ्यावी.

(1) पावसाळ्यात संडास बाथरूमच्या दरवाज्यांना सुज येते..ते फुगल्यामुळे नीट बंद होत नाहीत.तेव्हा आतमध्ये हिशेब चुकता करत बसले असताना जोरात नळ सुरू ठेवणे.नाहीतर फजितीचा बाका प्रसंग 'गुदरू' शकतो.
ही काळजी मुख्यत्वे  होस्टेलाईट्स जीवांसाठी.

(2) GF किंवा BF धारकांनी भर पावसात दुर कुठे एकांतात फिरायला जाणं टाळा.ओलेत्या वातावरणात #पाय_घसरण्याचा' संभव असतो.

 (3) उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायले तरी काही प्रश्न नसतो पण पावसाळ्यात थोडेही पाणी प्यायल्यास रात्री बेरात्री झोप मोड होउन सतत विसर्जनासाठी जावं लागतं.तेव्हा योग्य प्रमाणात (आणि गरम करून पाणी पिणे.ही एक टिपीकल पावसाळी काळजी असते.)

(4) उन्हाळ्यात देवदर्शनाला वगैरे बाहेर गेले असाल.तिथे तीर्थ प्रसाद हातावर घेतला की पुसला हात डोक्याला!!
ही सवय आता टाळा.पावसाळी कुंद हवेत केस वाळत नाहीत त्यामुळे तुमच्या चिकट केसांना मुंग्या,मुंगळे लागतील.

(5) बालकनी,किचन ते हाॅलपर्यंत कितिही दोऱ्या बांधुन कपड्यांचे तोरणं बांधली तरिही कुंद आर्द हवेत कपडे वाळत नाही.त्यातल्या त्यात सर्वसाधारण वरचे कपडे थोडा भाव खाउन निमुटपणे काही तासाने वाळतात तरी.पण ती शिष्ठ अंतर्वस्त्रे मात्र अशावेळी फार अॅटिट्युड दाखवतात.लवकर वाळत नाही.अशावेळी कोण्या बहाद्दराने तेच ओलसर अंर्तवस्त्र परिधान करून गेल्यास मग मात्र त्याची काही खाज....खैर नाही!!

(6) ''...खेलेंगे प्रेम गेम आॅन द रूफ इन द रेन''ही असली 'मीतगिरी' टिव्हीवरच बरी दिसते तुम्ही असली '#मस्ती' करायला गेलात तर रूफवरुन खाली पडुन तुमचं मणका मोडु शकतं.

(7) (पुन्हा एकदा) GF आणि BF धारकांनी पावसाळ्यात बागेत वा शहराबाहेर कुठे झाडा झुुडपांमागे कुठल्याही प्रकारच्या क्रीडेसाठी जाउ नये.बिळात पाणी गेल्याने साप,इंगळ्या, विंचु बाहेर अालेले असतात.त्यामुळे तुम्ही चंबाचुंबीत मग्न असताना एखादा सरपटणारा वा नांगीधारक जीव तुमच्या पायाचे 'चुंबन' नक्की घेउ शकतो.

(8) हेसुद्धा GF/BF धारकांसाठीच!
पावसाळी कुंद हवेत जिवाणु विषाणुंची संख्या आधीच वाढली असते.त्यामुळ कदाचीत दोघंही सर्दी पडश्याने त्रस्त असु शकाल.तेव्हा प्रणयक्रिडेत दोघांची मुखे एकमेकांजवळ आलेली असतानाच; शत्रुसोबत पण न होवो  असं पण नेमकी त्याक्षणी तिच्या किंवा त्याच्या फुफ्फुसात उदान वायुचा क्षोभ होउन तिला/त्याला जोरदार शिंक आलीच!तेव्हा भरलेल्या नाकातुन वायु त्याचा मार्ग काढणारच!शेवटी वायुच तो !उर्ध्वगत वा 'अधोगत';वायु आपल्या मार्गाने बाहेर पडतोच!
त्यामुळे  येथे उदान वायु जोराने उर्ध्वगत होउन सोबत नाकातील सर्व द्रवमय..सेमीसाॅलीड पदार्थ आपल्यासोबत वाहुन नेणारच! तेव्हा ''अशा चिंब वेळी तुझा हात हाती हवा''!
 म्हणण्याचा ऐवजी ''#अशा_चिंब_वेळी_नाकास_तुझ्या_रूमाल_हवा!!'' म्हणावं लागेल.
त्यामुळे अशी जीवघेणे खजिल करणारे पेचप्रसंग टाळण्यासाठी पावसाळ्यात प्रणय टाळावा.

(9) पावसाळ्यातील अत्यंत मोहक व फसव्या महत्वाच्या गोष्टीची काळजी घेणं म्हणजे ते पावसात #मिर्ची_भजी वा तत्सम बेसनाचे तळलेले पदार्थ फक्त फेसबुकवर फोटो टाकण्या पुरतेच आणि ''हॅपीनेस इज पावसात गरम मिर्ची भजी! वाह!!''
हे असले स्टेटसे फक्त लिहिण्या वाचण्यातच मजा असते.

 प्रत्यक्षात  पावसाळ्यात पचनसंस्था कमकुवत झाली असल्याने '#ढगाळ' वातावरणात मिर्ची भजे वगैरे खाल्ले असता '#ढाळ' लागुन विचारगृहाकडे सतत धाव घ्यावी लागते.आणि मग आत #ढर्रर्रर्रर्र.....#पर्रर्रर्र.......

असो.पावसाळ्यातील काळजी; ही ढगाळ वातावरण.. ढाळ ते..ढर्रर्र..पर्यंत येउन पोहचल्याने आता यावर आणखी काही बोलावं वाटत नाही.

''सो गप्पी मासे पाळा हिवताप टाळा हॅपी पावसाळा!!''

-Abhijeet Panse

Saturday, 23 December 2017

अल्पायुषी भव

World Health Day /आंतरराष्ट्रीय स्वास्थ्य दिन

"अल्पायुषी भव "


"आयुष्यमान भवं" हा आशीर्वाद ज्येष्ठांना नमस्कार केला की त्यांच्याकडून उत्स्फूर्तपणे दिला जातो. दीर्घायु होणे हे जणू आशीर्वाद , एक सकारत्मक गोष्ट आहे हे अंतर्मनात पक्के बसलेय.
पण हाच आशीर्वाद शाप ठरू पाहत असेल तर? किंवा आधीच हा आता आशीर्वाद न राहता शाप झाला असेल तर..

दीर्घायु असणे वेगळं आणि  'स्वस्थ 'असणे वेगळी गोष्ट. जर दीर्घायु होऊन शरीररूपी यंत्रच जर कुचकामी , कमकुवत, बिघडलेले असेल तर 'आयुष्यमान' होणे हा तर शापच ठरणार!
आणि आज तीच परिस्थिती होते आहे.

बरेचदा लोक म्हणतात आमचे पणजोबा ,आजोबा , वडील ..आजी यांना कधी चष्मा लागला नाही , शेवटपर्यंत त्यांचे दात चांगले होते..ते वरचेवर आजारी पडत नसत!!

पण आज तसे दृश्य दिसत नाही. त्या आधीच्या लोकांचे शरीर काही वेगळे नव्हते. फक्त तेव्हा परिस्थिती वेगळी होती.
पूर्वी लोकांना स्वच्छ प्राणवायू मिळायचा. शारीरिक हालचाली जास्त करत. भाजीपाला रसायनयुक्त नसत.दूधात भेसळ नसायची. इंटरनेट , गॅजेट्स , सोशिअल साईट्स च्या ते आहारी गेले नव्हते. त्यामुळे डोळे आणि मन दोन्ही तंदुरुस्त असत. त्यामुळे चष्मा लागायचा नाही. मन आनंदी असे.

आता मात्र तिशीत गुडघेदुखी सुरु होतेय. भाजीपाल्यासोबत कीटकनाशके ही तोंडीस लावला जातो.तेही नियमितपणे.
डॉक्टर जर फळे खायला सांगत असतील , किंवा उपवासाला फळे खात असतील तर फळ कुठे आता शुद्ध राहिलीत! कार्बोईड युक्त फळे पोटात ढाकलली जातात. केळाची चव पूर्वीसारखी राहिली नाही. पण तरीही रसायनाद्वारे पिकवलेली ती फळे खातो.

फेसबुक , वॉट्स अप आणि मोबाईल गॅजेट्स मुळे प्रत्येकाची दिनचर्या पूर्णपणे अबनॉर्मली नकारात्मकरित्या बदलली आहे. रात्री झोपी जाण्याची वेळ दोन ते तीन तासानी उशिरा झाली आहे.नीट आत्मनिरीक्षण केल्यास कळेल रात्रीची झोप आता गाढ लागत नाही. रात्री बेरात्री जाग येते ..आणि मग पुन्हा शेजारिच असलेला मोबाईल बघितला जातो. परिणामी हळूहळू श्यूगर, रक्तदाब , निद्रानाश चा त्रास कमी वयातच सुरु होतोय. चिडचिडेपणा , मानसिक अस्वास्थ्य , नैराश्य वाढतंय.

पण आता यापासून सुटका नाही. कारण एकदा सोशिअल साईट्स, इंटरनेट ची सवय लागली की या चक्रातून सुटका नसते.

भेसळयुक्त अन्न ,धान्य, भाजीपाला,फळे , गॅजेट्स चा अतिउपयोग यामुळे मृत्यू येत नाही पण शरीररूपी यंत्र मात्र आतल्या आत खंगत जातं. टेक्नॉलॉजीच्या आहारी गेल्याने ती आपला 'टोल' स्वास्थ्यावर हळूहळू घेते आहे.

 मागच्या वर्षी ब्रेड मध्ये घातक घटक मिळाले होते. तूप अशुद्ध मिळतं .म्हणजे ब्रेड आणि बटर सुद्धा आज भेसळयुक्त झालंय.
त्याआधी आबालवृद्धांचे आवडत्या मॅगी मध्ये शिसेचं प्रमाण 'जास्त' मिळालं होतं.म्हणजे मुळातच शरीराला घातक असलेले शिसे आम्ही जिभेच्या चोचल्यांसाठी खातो हे स्वीकारले होतेच पण 'प्रमाण 'जास्त वाढल्यामुळे मॅगीवर बंदी आली होती.

आज अश्या लवकर कमकुवत होत असलेल्या ,वेअर अँड टिअर होत असलेल्या शरीराने ' दीर्घायु 'होऊन बिछान्यावर खिळून मृत्यूची वाट बघत राहणे ही खरी तर शिक्षाच म्हणावी लागेल. "आयुष्यमान भव " हा शाप होऊ पाहतोय.

त्यामुळे वेळीच सावरलं नाही कटाक्षाने आपली दिनचर्या सकारात्मकरित्या सुधारली नाही तर आज विडंबन वाटत असलेले "अल्पायुषी भव " हे वाक्य उद्या खरंच ज्येष्ठ लोक आपल्या प्रिय लोकांना आशीर्वाद म्हणून देतील. कारण येत्या काळात आपल्या बिघडलेल्या दिनचर्येनुसार बिघडत्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यामुळे "आयुष्यमान भव"हा शाप ठरु पाहू शकतो. तेव्हा  वेळीच प्रत्येकाने सुधारायला हवं नाहीतर वाढदिवसाला ओवाळताना ,नमस्कार करताना प्रिय लोक "अल्पायुषी भव" हाच ' 'आशीर्वाद' दिला जाईल.

- अभिजीत पानसे.