Showing posts with label जगण्यातलं अध्यात्म. Show all posts
Showing posts with label जगण्यातलं अध्यात्म. Show all posts

Sunday, 9 September 2018

गणेश तत्व आणि मूर्ती

एका मैत्रिणीने आणि तिच्या मुलाने मिळून ही गणपती मूर्ती केली आहे. मागच्या वर्षीच्याच विसर्जित गणपतीच्या मूर्तीच्या मातीपासूनच त्यांनी केली. ही गोष्ट मला फार आवडली.

आपला गणपती आपल्याच घरात विसर्जित. बाहेरील नैसर्गिक जलस्रोतांना खराब करण्याचा अधिकार कोणाला नाही.

लहानपणी मुलांना घरी मोठ्या आकाराच्या गणपतीच्या मुर्ती आणण्याचं फार आकर्षण असतं. पूर्वी तर फार असायचं. शाळेतील मित्रांमध्ये तो प्रेस्टिज इश्यू असायचा.

वाहत्या पाण्यातच मूर्त्यांचं विसर्जन करायला हवं वगैरे.. या कट्टरवादी गोष्टी लॉजिकली कधीच पटल्या नाहीत. अगदी पर्यावरणसंबंधित गोष्टी थोडयावेळासाठी बाजूला ठेवल्या तरीही धार्मिक ‘टेक्निकल’ गोष्टींनुसारही पटत नाही.

मूर्तीला घरात आणून गणेश चतुर्थीला स्वतःच्या हृदयावर डावा हात ठेवून आणि गणेश ‘मूर्तीच्या’ हृदयाच्या जागी उजवा हात ठेवून प्राणप्रतिष्ठा केली जाते. (पिंडी ते ब्रह्मांडी हे इथे स्पष्टपणे कळतं.)  त्यानंतरच त्या गणेश मूर्तीमध्ये 'गणेशतत्व' प्रकट होऊन ती मूर्ती गणपतीचं रूप होते. असा भाव निर्माण होतो.

त्यामुळे गणेश तत्व, प्राण शक्ती ही मूर्तीचा आकार, रंग, मूर्ती आकर्षक की कमी आकर्षक या टेक्निकल गोष्टींना Irrespective असते. मग उपासनेच्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने मूर्ती छोटी की मोठी हा प्रश्नच राहत नाही.

कट्टर लोक वाहत्या पाण्यातच गणपती मूर्तीचं विसर्जन करायचं म्हणतात. तेही पटत नाही. एकतर  धार्मिक गोष्टी, घरचा गणपती ही वैयक्तिक बाब असते, नैसर्गिक जल स्रोत खराब करण्याचा अधिकार कोणालाच नाही.

पण भारतासारख्या कमी लोकसंख्या असलेल्या, शिस्तप्रिय, सामाजिक, पर्यावरण बांधिलकी असलेल्या ‘शांत’ देशात सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पणजोबाची मानतात. ते असो.
बंद’ असो की ‘चालू’ असो सगळं तोडफोड करायलाच हात शिवशिवतात.

गणपती मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन करणे धार्मिक टेक्निकल गोष्टीनुसारही पटत नाही.

कारण दीड, पाच, दहा दिवस गणपती पूजल्यावर शेवटच्या दिवशी अक्षता टाकून “#पुनरागमनायंचं’ म्हटल्यावर मूर्तीला हलवलं की त्यातून गणेशतत्व निघून जातं. निघून गेलं हाच समज , भाव असतो. मग पुन्हा गणपतीपासून ती गणपतीची मातीची ‘मूर्ती’ उरते. आता ती मातीची मूर्ती पाण्यात कशीही विसर्जित केली तरीही तिचा अपमान वगैरे होत नाही. वा मूर्तीला वाहत्या स्रोतात किंवा मोठ्या नैसर्गिक जलस्रोतांतच विसर्जित केली पाहिजे हा मुद्दाच संपतो. धार्मिक टेक्निकल गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी लॉजिकली पटत नाही. कारण मूर्तीत प्राणतत्व, गणेशतत्व त्यावेळी नसतंच.
विसर्जन 'गणपतीचं'  करत नसतो , गणेश 'मूर्तीचं' करत असतो.

मातीचा , मातीच्या मूर्तीचा फक्त ‘आधार’ घेऊन दहा दिवसांत ते चराचरात व्याप्त गणेश तत्व, ऊर्जा त्यात प्राणप्रतिष्ठेद्वारे ‘अॅक्टिव्हेट’ होते, त्यात संचारते , पुनरागमनायंचं म्हणून अक्षता टाकल्या की ती ऊर्जा मूर्तीतून निघून जाते.

बाजारात शेकडो गणपतीच्या मुर्त्या ठेवल्या असतात, त्यावेळी त्या मूर्त्याना कोणीही नमस्कार करत नाही. कारण त्यावेळी ती फक्त ‘मूर्ती’ असते. ‘गणपती’ नसतो.

विकत घेतानाही आपण गणपतीच्या ‘मुर्ती’चा भाव विचारतो, मूर्ती विकत घेतो. ‘गणपती’  विकत घेत नाही.

सार्वजनिक गणपतीच्या मोठ्या मूर्तींनाही रस्त्यावरून मंडपात  नेताना नमस्कार करत नाही, कारण त्यांची ‘प्राणप्रतिष्ठा’ झाली नसते.

मूर्ती, माती फक्त ‘कॅरिअरचं’ काम करत असते.  मग त्या मूर्तीतून गणपती बॉसच निघून गेलेत की उरते ती फक्त माती, मातीची मूर्ती. ती कुठेही विसर्जित करता येते. पण आजच्या काळात वाढती लोकसंख्या, कमी  आणि प्रदूषीत होत चाललेले जलस्रोत बघता घरातच मूर्तीचं विसर्जन करणं सर्वोत्तम उपाय. शिवाय ती माती कुंडीत टाकल्यास त्या पार्थिव गणपतीचा घरातच एकप्रकारे सहवास आहे ही भावनाही होऊ शकते.

या मैत्रणीने तर त्याच मातीची मूर्ती केली. हाही एक सुंदर भाव निर्माण करतो. Coz at d end its only about energy n feelings.

- Abhijeet Panse

Monday, 3 September 2018

कृष्ण triology of आध्यात्म.




कृष्ण म्हणजे रोमँस, कृष्ण म्हणजे सखा, प्रेमाचं प्रतीक, खोडकर हे जास्त प्राचिलीत आहे. पण कृष्णाची कर्तव्य कठोर भूमिका झाकोळते. कृष्ण हा अध्यात्माचं संपूर्ण इन्स्टिट्यूट आहे.
भक्तिमार्ग, कर्म मार्ग, ज्ञानमार्ग असे तीन आध्यात्मिक मार्ग जे म्हणतात, हे तिन्ही श्रीकृष्णापासून सुरू होतात, कृष्णात येउन मिसळतात.

ज्ञान मार्ग:- “मृत्य म्हणजे शरीर बदल फक्त..” “हे विश्व माझ्यात आहे मीच या विश्वात आहे..” हे त्याने अर्जुनाला सांगितलं.
अर्जुनाला रणांगणावर विराट दर्शन देऊन मी जे दिसतो ते शरीर म्हणजेच मी नाही, मी संपूर्ण विश्व आहे. जीवन आणि मृत्यू दोन्ही माझेच रूप आहेत. हे समजावून सांगून अर्जुनाला ‘ज्ञान’ दिलं.

कर्म मार्ग:- अर्जुन त्याच्या नातेवाईकांना मारण्यासाठी मानसिकरित्या दुबळा, इमोशनल झाला असता त्याला युद्ध करणे हेच तुझं कर्तव्य आहे. रिझल्ट डजंट मॅटर, सांगितलं. त्याला त्याच्या कर्माची जाणीव करून दिली.

भक्ती मार्ग:-  कृष्ण भक्तीबद्दल बोलण्याची काहीही गरज नाही. भक्तीमार्गाचा महास्रोत आहे तो. राधा, मीरा अनेक संत कृष्णभक्त प्रसिद्ध आहेत.
पण एक प्रसंग मला विशेष आवडतो कृष्ण चरित्रातील. उद्धव आणि राधेचा.

उद्धव हा महाज्ञानी होता. सत्य म्हणजे काय हे त्याला कळत असे. श्रीकृष्ण म्हणजे काय प्रकरण आहे हे त्याला ज्ञानाच्या अनुषंगाने कळलं होतं. श्रीकृष्ण हे निराकार ईश्वरी रूप आहे , शरीर नाही. हे ज्ञान त्याला होतं.

पण त्याच्यात भक्ती नव्हती. प्रेम नव्हते. भक्ती मार्गाला उद्धव कमी लेखात असे. सगुण रूप, नामस्मरण वगैरे हे अज्ञानी लोकांचं काम आहे असा त्याचा विश्वास होता.
 त्यामुळे त्याच्यात कोरड्या ज्ञानाचा अहंकार वाढला होता. श्रीकृष्णालाही त्याची कल्पना होती.

एकदा कृष्ण महालात म्लान चेहऱ्याने दुःखी होऊन बसला होता. उध्दवाने त्याला  कारण विचारलं असता, म्हणाला, की मला वृंदावनातील गोपींची, नंदची, राधेची आठवण येतेय. म्हणून मी दुःखी झालोय.

कृष्णाचं उत्तर ऐकून उद्धव आश्चर्यचकित झाला. कृष्ण जो साक्षात ईश्वर, त्याला मुळात कोणाची आठवण, ‘अटॅचमेंट” कशाला वाटायला हवी. कारण मूळ ज्ञान हे आहे की सर्वजण आत्मा, चैतन्य आहे. बाकी सगळी माया आहे. खोटं आहे.
भावना, प्रेम , विरह हे चूक अज्ञानी लोकांचं काम हे तो कृष्णाला सांगू लागतो.
उद्धव कृष्णाला समजावतो की तुम्हीच ईश्वर आहात, मग या मायेला का फसता आहात!?

ते ऐकून कृष्ण म्हणाला की धन्यवाद उद्धवा मला सत्याची  जाणीव करून दिल्याबद्दल. पण आता हेच ज्ञान तू वृंदावनात जाऊन गोपीकांनाही सांग. त्यांनाही सत्य कळू दे. डिटॅचमेंटचं महत्व समजू दे. तेही माझ्या विरहात तळमळत आहेत. त्यांना सत्य,  ज्ञान दे.

गावातील अडाणी, भोळ्या अज्ञानी गोपिकांना समजवून सांगणे काय कठीण म्हणून  उद्धव रथात बसून तोऱ्यात वृंदावनात जातो.

 वृंदावन जेथे भक्ती मातीमातीत, फुलात, पानात , हवेत ओथंबून वाहते. ( सध्या मात्र तेथे फक्त ढोंगीपणा, फसवेगिरी वाहते, धर्माच्या नावाने ब्लॅकमेलिंग चालते.) तेथे गेल्यापासून त्याला विचित्र अनुभव येऊ लागतात. त्याला त्रास होऊ लागतो.  कारण त्याच्याकडे कोरडं ज्ञान तर असतं पण कृष्णाच्या  ईश्वराच्या भक्तीचा , प्रेमाचा ओलावा नसतो.

वृंदावनात गोपिका कृष्ण विरहात तळमळत, दुःखी असतात. जेव्हा गोपिका कृष्णाबद्दल विचारतात, तो कसा आहे, तो आमची आठवण करतो का..
उद्धव त्यांना सांगतो तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही त्याला अजूनही तुमचा गोकुळातील कान्हा समजताहात. त्याला शरीर समजत आहात.
तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे. त्याला कोणता आकार नाही, शरीर नाही, नाम् नाही. तो अजन्मा आहे. त्यानेच सांगितलं तुम्हाला की त्याला विसरून जा. तो कधीच परत गोकुळात येणार नाही. त्याच्या मोहात अडकून, प्रेम, भक्ती, आसक्ती सोडून ज्ञानी व्हा.

हे सगळं (कोरडं) ज्ञान ऐकून त्या गावातील, साध्या गोपिका त्यालाच मूर्खात काढतात, “नको तुझं काही ज्ञान. तो आमचा कान्हाच आहे. आमच्या मनात त्याच्याविषयी अपार प्रेम आहे!”

गोपिका उद्धवाला राधेकडे घेऊन जातात. राधाही विरहात तळमळत , दुःखी बसली असते. सगळ्यात कृष्णाला शोधत असते. कृष्ण कधी येईल प्रत्येकाला विचारत असते. उद्धव राधेलाही तेच ज्ञानाच्या सत्य गोष्टी सांगतो. कृष्णाचं मूळ रूप समजावून सांगतो. परब्रह्म फक्त शरीरूपी दिसतंय  ते खोटं आहे. कृष्णाला मनुष्य शरीर समजून हे कृष्णाबद्दलचं ; त्याच्या लीला आठवून , प्रेम, आसक्ती, विरह मूर्खपणा आहे. तो सगळीकडे आहे तत्वरुपात. शरीराने फक्त मथुरेला आहे.

राधा म्हणते कृष्ण कायम आमच्या सोबत शरीर रूपानेही असतो. आमचं प्रेम हीच भक्ती आहे. तो मुळात कधीच आमच्यापासून दूर नसतो.
उद्धव त्यावर म्हणतो की कृष्ण शरीररुपाने जवळ असणं ही फक्त तुमची मनोकल्पना आहे. भास आहे विरहात तळमळणाऱ्या अज्ञानी व्यक्तीचा.

राधा उद्धवाला म्हणते “तू आमच्या कृष्ण प्रेमाला मनोकल्पना समजतोय! तुला बघायचंय कृष्ण आत्ताही इथेच आहे?”

त्या क्षणाला श्रीकृष्ण राधेजवळ अवतीर्ण  होतो.
उद्धव आश्चर्यचकित होतो. तो कृष्णाला स्पर्श करून बघतो.  तो भास नसतो. कृष्णाचा स्पर्श तो अनुभवतो.
तो कृष्णाला पुन्हा पुन्हा स्पर्श करून भास नसल्याचं निश्चित करतो.
कृष्णाचा त्याला स्पर्श होत राहतो.
  कृष्ण आणि राधा त्याच्याकडे बघून स्मित करत असतात.

"कृष्णा तू मथुरेत शरीररूपाने असताना इथे कसा!" विचारल्यावर कृष्ण सांगतो, मी सांगितलं ना मी फक्त भक्तीने पकडल्या जातो. जेथे प्रेम , भक्ती तेथे मी असतोच. येतोच. कृष्ण अंतर्धान पावतो.

त्या क्षणाला उद्धवातील अहंकार संपतो. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.  त्याच्यात भक्ती प्रेम जागृत होतं. राधा गोपिकांबद्दल , त्यांच्या अपार कृष्णप्रेमाबद्दल आदर जागृत होतो. भक्तीची शक्ती कळते. उद्धव त्या क्षणापासून “राधे राधे” करत “राधे कृष्ण” म्हणत भक्तीत न्हाहून , नामस्मरण करतच पायी गोकुळातून मथुरेला येतो. शरीराची, कपड्यांची शुद्ध नसते. धुळीत मातीत माखलेला, मुखी “राधे कृष्ण” “राधे राधे” प्रेमाने, भक्तीत नामस्मरण सुरू असतं.
उध्दवतील अहंकार संपला असतो.

मुळात उद्धव , राधा- गोपी, अर्जुन हे सगळे आपापल्या मार्गावर योग्य असतात. उद्धव महाज्ञानी होता. पण माझाच योग्य मार्ग आणि इतरांचा अध्यात्मिक मार्ग चुकीचा हा अहंकार त्याच्यात होतो. त्यामुळे त्याला भक्ती मार्गाचंही श्रेष्ठत्व समजण्यासाठी हे सगळं घडवतो.
हेच आजच्या काळात धर्माबद्दल होतं आहे. माझाच धर्म श्रेष्ठ दुसऱ्याचा छोटा. आपल्या धर्माशी अतिलिप्त अनहेल्दी अटॅचमेंट होऊन इतरांचा राग. इथूनच थिंग्स स्टार्ट टू गो रॉंग.

“#योगमार्ग” हा ही एक स्वतंत्र वेगळा रस्ता. पूर्वी योगी या मार्गानेही ईश्वरी तत्व प्राप्त करून घ्यायला योगसाधना करायचे.
 “पिंडी ते ब्रह्मांडी” हे यांचं तत्व. हा मार्गही कृष्णापासून सुरू होतो, त्यातच मिळतो.
बालकृष्णाने लोणी खाल्लं म्हणून यशोदा कृष्णाला मुख उघडायला सांगते , तेव्हा त्याच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांड दर्शन तिला होतं.
जे बाहेर आहे तेच आत आहे, आतीलच बाहेर आहे. “पिंडी ते ब्रह्मांडी”.

ज्ञान, कर्म, भक्ती, योग सर्व अध्यात्मिक मार्ग यांचा संबंध आणि अधिष्ठान कृष्ण आहे. म्हणून तो खास आहे. संपूर्ण आहे.

कृष्णाच्या बाबतीत ‘#नामस्मरण’ हा शब्द मला विशेष आवडतो. या शब्दात सगळं काही येतं. ‘नाम’ म्हणजे भक्ती येते. ‘स्म’ म्हणजे अहं ब्रह्मास्मि, म्हणजे मीच ईश्वर आहे, हे ‘ज्ञान’ही येतं. ‘रण’ म्हणजे युद्धभूमी. जिथे कर्म योग सांगितला. प्रॅक्टिकल आयुष्यही ‘रण’.
कृष्ण हा म्हणून मला संपूर्ण वाटतो.

- Abhijeet Panse

Monday, 27 August 2018

शिवलिंग की shiva's ling

*शिवलिंग*

आऊटसोर्स्ड नावाच्या एका इंडो इंग्लिश मुव्हीमध्ये, त्यातील नायक भारतात आला असताना शंकराची पिंडी मंदिरात दिसते, तो आयेशा धारकर या अभिनेत्रीला विचारतो , हे काय आहे. ती त्याला सांगते “इट्स डॅट मेल पार्ट!” त्यानंतर बरंचसं एक्स्प्लेन करते की शिवाचं मेल पार्ट म्हणजे शिवलिंग, देवीची योनी यांपासून शिवलिंग बनतं. आणि त्याची पूजा केली जाते वगैरे.

ही संपूर्ण चुकीची माहिती, दृष्टिकोन आहे.  बाहेरीलच नाही तर कित्येक भारतीय लोकांनाही हेच वाटतं शिवलिंग हे  गुप्तांग आहे आणि त्याची पूजा केली जाते.

हा संपूर्ण गैरसमज आहे. शिवलिंग म्हणजे शिवाचं लिंग नाही.

'लिंग' हा संस्कृत शब्द आहे. बरेच संस्कृत आणि मराठी/हिंदी सारखे असतात. पण त्या शब्दांचे दोन वेगळे अर्थ  असतात. एक मूळ अर्थ, एक बोलीभाषेतील.

लिंग ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ 'प्रतीक' होतो. शिवलिंग हे शिवाचे प्रतीक म्हणून पुजले जाते. चिन्ह म्हणून संबोधले जाते.

अध्यात्मिक विश्वास असा आहे  की ही सृष्टी शिव शक्तीतून उत्पन्न झाली आहे म्हणून त्याचं रूप शिवलिंग. असा मूळ 'भाव' आहे.  पण उत्पन्न होण्याचा biological  reproductionशी सोयीस्कर अर्थ जोडून शिवलिंगाला गुप्तांग म्हणून संबोधित केल्या जाऊ लागलं. हीच माहिती सगळ्यांना खरी वाटते.

शिव लिंग हे 'ज्योती'च्या आकारावरून निर्माण झालंय. कुठंतरी ऐकलं, वाचलं होतं की पूर्वी ऋषी मुनी लोक दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करून त्याद्वारे सृष्टी, जीवन रहस्य मिळवण्याचे प्रयत्न करीत. ज्योतीवर ध्यान करीत.

जे खरेही वाटतं. कारण कुठल्याही गोष्टीवर लक्ष म्हणजे काँशिअस माईंड केंद्रित केल्यास सबकाँशिअस माईंड अंतर्मन अॅक्टिव्हेट होतं. तेव्हा अनेक विविध गोष्टी  ‘क्लिक’ होतात.

पाउलो कोएल्होच्या “द अॅल्केमिस्ट”मध्ये ही वाळवंटात अॅल्केमिस्ट त्या मुलाला सांगतो, वाळूच्या एका कणावरजरी पूर्ण लक्ष केंद्रित केलंस तरी तुला अनेक  गोष्टी कळतील.

वैश्विक दृष्टी ठेऊन विचार केला तर देशी विदेशी अनेक गोष्टीत साधर्म्य आढळतं. सिक्रेट पुस्तकातील पॉईंट्स, श्रीपादवल्लभ या मूळच्या तेलुगू पुस्तकातही दिसतात.

कारण सत्य हे सत्य असतंच. एक अधिक एक बरोबर दोन , हे भारतात ही होतील , उत्तर दक्षिण ध्रुवावरही होतील.

पूर्वी लोक दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करीत ईश्वर समजून, शिव समजून. पण ज्योती सतत हलत असल्याने त्यांनी शिव म्हणून ज्योती आकाराचं पार्थिव पिंड केली. त्यावर लक्ष केंद्रित करू लागले. तिथून शंकराची पूजा शिवलिंग म्हणजे शिवाचं ‘चिन्ह’ ‘प्रतीक’ म्हणून पूजलं जाऊ लागलं.  त्याचा शिवाच्या ‘लिंगाशी’   काहीही संबंध नाही. फक्त शब्दाचे अर्थ चुकीचे घेतले जातात.

पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग म्हणताना, संबोधताना यात ‘लिंग’ हे ‘गुप्तांग’ म्हणून घेतल्या जात नाही. ते प्रतीक वा चिन्ह म्हणून समजल्या जातं. तेच शिवलिंग संबंधित आहे.

योनी म्हणजे स्त्रीचं गुप्तांग म्हणून इथे अभिप्रेत नसतं. संस्कृतमध्ये निरनिराळ्या जीवसृष्टीला योनी म्हटलं जातं. मनुष्य योनी, वानर योनी, कुक्कुट योनी……

त्यामुळे शिवलिंग पूजा म्हणजे शिवाच्या गुप्तांग समजून पूजा केली जाते हा पूर्णपणे गैरसमज आहे. जो खूप जणांचा असतो. विदेशात ही हाच अर्थ घेतला जातो. कारण भारतात बहुतेकांना तेच वाटतं.

आसाममध्ये #कामाख्या मंदिरात योनी पूजा केली जाते. ती गुप्तांगाची पूजा आहे. तो विषय वेगळा हा वेगळा.

शिवलिंग म्हणजे निर् - आकार, निर्गुण शिवतत्वाची ‘मॅटर’ रुपात 'पूजा' करायला तयार केलेला एक आकार, जो दिव्याच्या ज्योतीवरून प्रेरित आहे.

 शिवलिंग हे ज्योतिर्मय आहे.
सत्यम शिवम् सुंदरम्!

- Abhijeet Panse

Saturday, 11 August 2018

सिद्धपूर, मातृश्राद्ध, गुजरात, सरस्वती नदी , साईड लोवर विंडो सीट

ख्रिश्चन लोकांत मृत्यूनंतर वा नंतर पुण्यतिथीला मेणबत्ती लावली जाते. फुलांचा गुच्छ ठेवला जातो, आवडीचा पदार्थ केला जातो. तसंच हिंदू धर्मात मृत्यूनंतर श्राद्ध केलं जातं. दोन्ही मध्ये ‘ग्रॅटिट्यूड’ कृतज्ञता, गेलेल्या पूर्वजांची आठवण हा भाव असतो. हिंदु धर्म पुनर्जन्म मानत असल्याने श्राद्ध हा विधी मानतात.  त्यामुळे श्रध्देने लोक श्राद्ध करतात.
गया हे बिहारमधील स्थान यासाठी प्रसिद्ध आहे.

मे महिन्यातील दुसऱ्या रविवारला “मदर्स डे” हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो. आषाढ अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, हा हिंदू संस्कृतीमधील मातृदिन मानला जातो.
त्या निमित्ताने.

गया या स्थानाला ‘पितृगया’ म्हंटलं जातं.
येथे सर्वसाधारणपणे सर्व पितरांचं श्राद्ध केलं जातं. पण गुजरातमधील ‘ सिद्धपुर’ नावाचं ऐतिहासिक ठिकाण हे खास मातृ श्राद्धासाठी ओळखलं जातं. या ठिकाणाला ‘मातृगया’ म्हणतात.
हिंदू संस्कृतीमध्ये मातेला विशिष्ट वेगळं स्थान दिलंय हेही यातून कळतं.

अहमदाबादपासून तीन तासांवर, राजस्थान- उदयपूरकडे जाणाऱ्या सुंदर, चार पदरी हायवेवर हे गाव आहे. मुंबईहुन दिल्लीला रेल्वेने  जातानाही हे सिध्दपुर स्थानक लागले होते. संपूर्ण गावात मुघलकालीन अवशेष आढळतात. येथे बिंदू सरोवर नावाचं छोटा तलाव आहे. पूर्वी या गावाजवळून ‘सरस्वती’ नदीचा प्रवाह वाहायचा. काळाच्या ओघात आणि मानवी चुकांमुळे नदी नष्ट झाली.

ऋग्वेदात या सिद्धपुरचा, मातृगयेचा , तेथे मातृ उपकराप्रित्यर्थ केले जाणाऱ्या श्राद्धाचा, स्थान महात्म्य,  सरस्वती नदीचाउल्लेख आढळतो असे तेथील लोक म्हणतात.
संपूर्ण भारतात फक्त विशेषतः मातेच्या श्राद्ध करण्यासाठी हे स्थान आहे. असं म्हटल्या जातं.
कार्तिक महिन्यात येथे मातृ श्राद्धाचे महत्व असते.
कपिल मुनींनी त्यांच्या मातेस या ठिकाणी सरस्वती किनारी  #सांख्य_दर्शन सांगितले तद्नंतर त्यांच्या मातेस मोक्षप्राप्ती झाली असे मानतात. परशुरामानेही रेणुकामातेप्रित्यर्थ मातृहत्या दोषपरिहारार्थ येथे मातृश्राद्ध केले होते म्हणतात.

सिध्दपुर हे मुघलकालीन गाव. गावात मध्ययुगीन भारताची , मुघलकालीन वास्तुकला अजूनही दिसून येते. गावात अनेक  ‘हवेली’ आहेत.
Archeological Survey of India ASI यांच्या अखत्यारीत येथील दोन वास्तू येतात. एक महादेवाचे रुद्र महालया मंदिर आणि एक जामी मशीद.
दोन्ही अप्रतिम वास्तू आहेत. सुंदर लाकडी नक्षीकाम असलेले स्थापत्य जागोजागी दिसते.

गुजरातमधील ‘स्मशाने’ हा एक स्वतंत्र विषय आहे. लोक संध्याकाळी फिरायला जातात येथील स्मशानभूमीत. इतके सुंदर , बागांनी, कारंजी यांनी सुशोभित केलेलं असतात.
सिध्दपुर येथील स्मशानाचे सुद्धा प्रयाग, वाराणसी , उज्जयिनी येथील स्मशानांचे जे महत्व मानले जाते तसे आहे .
असे हे खास मातृश्राद्धासाठी महत्व असलेले एकमेव स्थान. भारतातील एक आगळेवेगळे स्थान.

अहमदाबादहुन सिध्दपुरला जाताना मेहसाणा हे प्रसिद्ध शहरही लागतं. सिध्दपुरहुन काही किमी उत्तरेकडे पालमपूर हे  गुजरात आणि राजस्थान सीमेरेषेजवळील शहर लागतं. इथून पुढे अरावली पर्वतरांगाही दिसतात. माऊंट अबू हे स्थानही जवळच.

क्या रखा है घर में मे कुछ दिन तो गुजारो नदी किनारे परबतो में!

- अभिजित पानसे



Friday, 27 July 2018

कर माझे जुळती

चार एक वर्षांपूर्वी मी आणि एक मित्र पहिल्यांदाच जम्मूला फिरायला गेलो होतो. तावी नदीच्या पलीकडे अखनूर किल्ला, अमर महल बघायला जात असताना एका चौकात एक सैनिक वेशातील पुतळा दिसला. खाली नाव बघितलं “कॅप्टन विक्रम बत्रा” लिहिलं होतं. चौकाचं नाव होतं कॅप्टन विक्रम बात्रा चौक. तेव्हा मित्रानेच सांगितलं की हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. कारगिल युद्ध आणि त्यातील एकेक गोष्टी सांगितल्या. आणि विक्रम बत्रा यांनी म्हटलेलं वाक्य “ये दिल मांगे मोर” हे तेव्हा कळलं.

1999च्या उन्हाळ्याच्या शेवटी एकीकडे वर्ल्डकप सुरू असताना देशभरात वर्ल्डकप, क्रिकेटचा ‘माहोल’ होता. दुसरीकडे कारगिल घुसखोरीच्या बातम्या येत होत्या. पण कोणाला सुरुवातीला देणंघेणं नव्हतं.
जो तो फक्त वर्ल्डकपमध्ये बुडाला होता. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धापेक्षा भारताने पाकिस्तानला क्रिकेट मॅच मध्ये कसं हरवलं यातच मग्न होते.

जूनच्या शेवटी वर्ल्डकप संपला तेव्हा लोकांनी कारगिल युद्ध, पाकिस्तान या गोष्टींना गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली.
तोवर “कारगिल घुसखोरी” पासून  “कारगिल युद्ध” असा बातम्यांतही बदल झालेला होता. मग सगळ्यांना त्यातील गांभीर्य कळले.

शाळेत असताना तेव्हा काहीही संबंधही नव्हता या गोष्टींशी, यातील गांभीर्य कळलं नव्हतं. कसलं कारगिल, कुठे आहे ते नक्की. मुळात ‘घुसखोरी’ म्हणजे काय नक्की, हेच मला कळत नव्हतं, हे आठवतं.

नंतर देशभरात आवाहन सुरू झाले सैनिकांना मदतीसाठी आर्थिक  मदत करण्यासाठी.

जुलैमध्ये शाळा सुरू झाल्यावर  मित्र सुट्टी संपल्यावर परत शाळेत भेटल्यावर काही दिवसांपूर्वी भारत कोणाच्या चुकीने झिम्बाब्वेविरुद्ध हरला, वर्ल्डकपमधून बाहेर कसा गेला,  पाकिस्तानला काय हरवलं याच गप्पा होत होत्या.

शाळाशाळांमधून सैनिक मदतीसाठी मुलांना पाच रुपये, दहा रुपये ओळखीच्या लोकांकडून जमवायला सांगितलं होतं. आम्हीही मित्र हातात कागद पेन आणि  डबा घेऊन फिरलो होतो. आवडीने नाही तर शिक्षकांनी सांगितल्यामुळे. कोणी एक रुपया, दोन रूपये. पाच रूपये कोणी दिलेत तर फार आनंद व्हायचा. आम्हाला तेव्हा इतकंच कळत होतं की पाकिस्तानसोबत कारगिलला युद्ध, जे दूर कुठेतरी हिमालयात सुरू आहे, त्यासाठी सैनिकांना मदत म्हणून पैसे जमवायला सांगितले आहे.

कित्येक वर्षांनी जेव्हा कारगील युद्ध म्हणजे नक्की काय..कळलं तेव्हा त्यातील भयाण गांभीर्य आणि भारतीय सैनिकांनी केलेला प्राणत्याग आणि गाजवलेला पराक्रम याची जाणीव झाली. देशाला जोडणारा एकमेव राष्ट्रीय हायवेवर नियंत्रण राहिलं. पुन्हा काश्मीरचा काही भाग 1947 प्रमाणे पाकिस्तानकडे गेला नाही. देश अबाधित राहिला.
आज लेह लडाखला काश्मीरमधून जाता येतंय.
#पेंगॉंग लेकजवळ फोटो काढता येतंय. थ्री एडियट्सचा क्लायमॅक्स शूट करता येतोय.

तेव्हा मित्रासोबत कॅप्टन विक्रम बत्रा यांचा पुतळा, त्यांच्या नावाचा चौक, जम्मू शहरात त्यांच्या नावाने हॉस्पिटल बघून फार आनंद झाला.
तेव्हाही म्हटलं होतं की देशभरात त्याच त्या ठराविक नावांचे रोड, चौक नकोत. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचेही नाव सार्वजनिक स्थळांना, रस्त्यांना द्यायला हवेत.

पुण्यात #मेजरताथवडे उद्यान आहे. मला या उद्यानाचं नाव विशेष आवडतं. कारण त्याला शहीद सैनिकांचं नाव दिलेलं आहे.
मेजर प्रदीप ताथवडे हे 2000 मध्येआतंकवादयांविरुद्ध चकमकीत शहीद झाले होते.

बहुतेकवेळी राजकारण्यांचेच नाव देण्याऐवजी जास्तीत जास्त शहिद सैनिकांचे वा युद्धात पराक्रम गाजवलेल्या भारतीय योद्ध्यांचेही नावं द्यायला हवीत. असं वाटतं. कॅप्टन विक्रम बत्रांच्याच शब्दांत सांगायचे तर “ये दिल मांगे मोर!"

#कारगिलविजयदिवस

- Abhijeet Panse

Sunday, 22 July 2018

दिवे घाट आणि तो

* दिवेघाटातील सगळ्यात कठीण दिवस , नैसर्गिकरित्या तयार झालेली #चंद्रकोर आणि #रमजानमहिना! *

वारीचा आजचा तिसरा दिवस, संपूर्ण प्रवासातील सगळयात कठीण दिवस..मोठे अंतर.. घाटाचा प्रवास..एकादशीचा उपास..
पुण्याहून निघालेली माऊलींची पालखी दुसऱ्या दिवशी सासवडला बंधूंचे दर्शन घेणार असते.

पण उपाशी पोटी घाटाची चढण कसोटी बघणारी असते..
नवखा तरुण वारकरी ताणात असतो..
शरीरानेच वृद्ध अनुभवी वारकरी नवख्या तरुणाला #माऊलींवर विश्वास टाक म्हणतो, म्हातारा लहान नातीला खांद्यावर बसवून चालू लागतो, म्हाताऱ्या डोक्यावर तुळसी वृंदावन डोक्यावर घेऊन सगळ्यात समोर गेलेल्याही असतात..

तरुण नवखा वारकरी हे बघून ओशाळतो..फक्त #स्पिरिचुअलट्रेकिंग म्हणूनच आणि सोशल मीडियावर सतत चेक इन करणारा तो फोटोज टाकण्यासाठीच आलेला असतो..भक्ती वगैरे काही नसते..

लूक योग्य साजेसा यावा मिळावा म्हणून कपाळावर उभं गंध लावतो, कानात इअरफोन्स घालून मोठया आवाज वाढवून गाणे ऐकत अधून मधून मोबाईलने फोटो काढत, शूट करत चालू  लागतो..
स्वतःचं आधुनिकत्व दाखवत , इतर वारकर्यांनमध्ये मनाने  मिसळत नाही..तोंडाने माऊलीचं नाव घ्यायला लाज वाटत असते.

सूर्य ढगात लपंडाव करत असतो..घामाच्या धारा लागलेल्या असताना अचानक आभाळातून पर्जन्य धारा बरसू लागतात..

दिवेघाटात पालखी येते..शिस्तीने रस्त्याच्या एका बाजूने वारी जाऊ लागते..रस्त्यावरची पुण्याहून निघालेली, पुण्याकडे जाणारी वाहनातील लोकही कौतुकाने भक्तीने नमस्कार करतात..

घराच्या मागील गल्लीत जाण्यासाठीही गाडी काढणाऱ्या तरुणाची घाटात छाती फुलू लागते..
म्हातारे म्हातारी नाम घोषात, आजूबाजूची सृष्टी ..वारकरी नामघोषात मग्न असतात..

तरुण वारकऱ्याच्या तोंडीही नकळत नाम येऊ लागतं.
कानातील एअर प्लग्स काढून ठेवतो..
आजूबाजुला सृष्टी हिरवीगार झालेली असते..मोबाईलने अधून मधून वारीचेफोटो काढत , सुरकुत्यांचं जाळं पसरलेल्या एखादया जख्ख म्हाताऱ्या वारकऱ्या सोबत   सेल्फी काढत सोशल मीडियावर टाकत राहतो..
घाटात एकाठिकाणी सहज वरती जाऊन अंमळ  विश्रांती घ्यायला आणि "बेटर व्यू" साठी नुकत्याच घेतलेल्या डीएसएलआर ने फोटो काढायला जातो..

वरून जे दृश्य दिसतं त्यामुळे त्याच्या अंगावर शहारे येतात..वरून अंतरावरून बघतांना मानवी चंद्रकोर झालेली असते..वर #ताऱ्याप्रमाणे तळ्याचं टिम्ब ही दिसतं..मुलगा निसर्गाच्या, निर्गुण निराकार ईश्वराच्या दर्शनामुळे चाट पडतो..अष्टसात्विक भाव उचंबळून येतात..

सेल खिश्यात टाकतो आणि नाम गजरात स्वतःला हरवू  लागतो..
पांडुरंग..पांडुरंग..विठ्ठल विठ्ठल...

पालखी सासवडला पोहचते..तोवर तो वेगळा न राहता मनाने सर्व वरकाऱ्यांपैकी एक झालेला असतो.

-Abhijeet Panse

Sunday, 31 December 2017

आणि त्या क्षणी 2018 चा सूर्योदय झाला होता.





आणि 2018 चा सुर्योदय झाला होता..

आई-बाबांच्या विरोधाला न जुमानता मी काल थर्टीफर्स्टच्या पार्टीला मित्रांसोबत गेलो.
पण या ओल्ड जनरेशनला आमचं सेलिब्रेशन कळतच कुठे?

बाबांच्या हुकुमाप्रमाणे नाखुषीनेच रात्री लवकर घरी आलो व झोपलो.

पहाटेच्या सुमारास मला एक स्वप्न पडले...

मी घनघोर रात्री काळोखात....

नाही! कदाचीत तोही पहाटेचा काळोख असावा!!
एका अरण्यात मी एकटाच फिरत होतो.
मनात भितीचा लवलेशही नव्हता.
चंद्राच्या दुधाळ प्रकाशात मी आपल्याच मस्तीत धुंदीत रानवाटा पालथ्या घालत होतो. मनसोक्त एकटाच  हिंडत होतो.

आणि...तेवढ्यात

अचानक मागून एक खर्जातला पुरूषी आवाज आला!

''व्हेअर आर यु रोमिंग यंग मँन?''

मी दचकुन मागे वळलो.

थोड्या अंतरावरून एक  पांढुरकी आकृती माझ्या रोखानेच पुढे येत होती.

माझ्या पोटात भितीचा गोळा उठला.

ती आकृती माझ्या दृष्ट्रीपथात आली.

एक वय झालेला वृद्ध,जरीकाठी धोतर, शुभ्र कुर्ता,चेहऱ्यावर म्हातारपणीच्या सुरकुत्या पण, तरीही तेजस्वी मुखमंडल होतं.पिकलेले केस आयुष्यातील सर्व अनुभवांचे साक्षी होते.डोळ्यांमध्ये आयुष्याची आपली संपुर्ण कारकीर्द यशस्वी झाल्याचे अपूर्व समाधान झळकत होते.

मी स्वत:ला काही क्षण हरवुन बसलो.

''काय यंग मँन!!''
कुठे भटकतोय इकडे? नवीन वर्षाचे स्वागत करायचे सोडुन तू एकटा इकडे काय करतोय?''
जवळ येत त्यांनी प्रेमळपणे विचारले.

त्यांच्या प्रश्नाने मी एकदम भानावर आलो. मनातील मघाची भिती आता नाहिशी झाली होती. आणि नेहमीप्रमाणे मला पुन्हा तारूण्याच्या आणि इतर अभिमानाने घेरले. त्यामुळे मनात त्या वृद्धाबद्दल नाराजीचा भाव आला.
मनात म्हटलं मघ्येच हा म्हातारा कशाला भेटला? पण आश्चर्य वाटले. हा वृद्ध माणुस आमच्या पिढीसारखाच बोलतोय!

चल चालुया सोबत थोडा वेळ!'' तो वृद्ध म्हणाला आणि मी नाराजीनेच त्यांच्यासोबत निघालोसुद्धा.

मनात म्हटलं'' शिट यार हा म्हातारा मध्येच कशाला भेटला! फार बोअर करणार!आमची पिढी तुमची पिढी, न्यु यिअर की गुढीपाडवा..यावर लेक्चर देणार!

मी मुद्दामच खोटं हसत खोचकपणे विचारलं, "काय ओल्डी! इतक्या रात्री! जंगलात! भिती वगैरे नाही वाटत?''

मघाच्याच प्रसन्न मुद्रेने ते बोलले,'' अरे मित्रा रात्रीचंच जंगल बघण्यात मजा असते ना!
पहाटेच्या या गडद काळोखानंतरच सूर्योदय होतो ना! आणि आम्हा म्हाताऱ्यांना कसली भिती!
हे बोलतानाही त्यांच्या मुखावरील पुर्णत्वास जाणारं शांत स्मित कायम होतं.

मी उपहासाने पुन्हा म्हटलं,''हे ओल्डी मला वाटतं तुमच्या घरची सगळी मंडळी, नातवंडे सगळेजणं न्यु इअर सेलिब्रेशनमध्ये बिजी असतील! तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही इकडे रागारागाने किंवा दु:खाने फिरायला आलात की काय?''

ते मोकळे हसले, ''अरे बेटा मी निरपेक्ष आहे. मी कधीच कुणाकडुनही दुखावलो जात नाही!
आणि तुला कोणी सांगितलं मला हे न्यु यिअरचे सेलिब्रेशन आवडत नाही! हे आय एम अे मार्डन ग्रँडपा बेटा! अँड आय डोन्ट बिलीव्ह इन जनरेशन गॅप !'' आणि दिलखुलास हसलेत.

त्यांचं ते मोकळं स्वच्छ हास्य निष्पक्ष बोलणं ऐकुन माझी नाराजी कुठल्या कुठे पळुन गेली आणि मला माझ्याच वागणुकीची लाज वाटु लागली.

जंगलात कुठेही न थांबता आम्ही  भटकत होतो. त्या गडद शांततेत खाली पडलेल्या  झाडांच्या असंख्य वाळलेल्या पानांतुन चालताना होणारा आवाज कानाला सुखावत होता.

आमच्या गप्पा अगदी मस्त रंगल्या होत्या.

मला हे आजोबा अगदीतरूण विचारांचे वाटले. ते अगदी मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते. शब्दात अवजडता नव्हती. आम्ही अनेक विषयांवर गप्पा केल्या.
अगदी  017 मधील भारतीय क्रिकेट टीमचं यश, येणारा दक्षिण आफ्रिका दौरा ते पद्मावती चित्रपटाच्या वादापर्यंत,  पर्यंत..शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या तर भारत पाकिस्तान संबंध..उत्तर कोरिया ते अमेरीका..

पण त्यांच्या प्रत्येक उत्तरात,बोलण्यात मला तटस्थपणा, त्रयस्थपणा जाणवत होता.कुठलाही विचार मत ते थोपवत नव्हते.जणुकाही फक्त द्रष्ट्याच्या भुमिकेत होते.

शेवटी ते म्हणाले,''बेटा हा तर काळाचा महिमा आहे! वी आर बाउंड टु चेंज विथ द टाईम फाॅर बेटर!''

त्यांना नवीन वर्षाच्या त्यांच्या काही संकल्पांबद्दल विचारले असता म्हणाले,'' मी कधीच कोणताही संकल्प करत नसतो.फक्त त्या त्या क्षणात पूर्णपणे जगतो..राहतो.!
आणि कुणास ठाउक कदाचित पुढच्या वर्षी मी राहणार देखिल नाही!''

त्यांच्या या शेवटच्या वाक्याने माहित नाही का मला एकदम  गलबलुन आलं...असं कुठलं नातं आमच्यात निर्माण होत होतं!!

जंगलातुन फिरता फिरता आम्ही आता एका माळरानावर आलो.

''मग कसं गेलं वर्ष 2017?'' आजोबांनी विचारलं.

''खुप वाईट गेलं हो हे वर्ष! सगळीकडे अपयशी ठरलो!तसंही मला ज्योतिषांनी सांगितलच होतं की हे 2017 वर्ष माझ्यासाठी वाईटच जाणार!

त्या आजोबांनी तडक उत्तर दिलं,' "कुठलंही वर्ष कधीच कोणासाठीही वाईट नसतं!काळ काय कोण्या ज्योतिष्याच्या अंकांच्या आज्ञेत आहे काय?
काळावर कोणाचंही आधिपत्य नसतं! तो स्वत: त्याचा अनभिषिक्त सम्राट असतो! ज्योतिषी,अंकशास्त्री भलेही आपल्या अंकाची वजाबाकी-बेरीज,आराखडे काढुन वर्षफल सांगत असेल पण, 'कर्म तर तुमच्या हातात असतं ना!ते तुम्ही करता योग्य केलं का? करता का? ते योग्य केलं तर प्रत्येक वर्ष चांगलच जाणार! त्यामुळे वर्षाला चांगलं वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे?
ते तर माझ्यासारखच निरपेक्ष असतं!''
शेवटलं वाक्य ते जरा मिश्कीलतेने हसुन म्हणाले.

पुन्हा पुढे म्हणाले ''न्यु ईअरचं सेलिब्रेशन आटोपल्यावर तुम्ही थोडं आत्मचिंतन करा! मी यावर्षी कोणत्या चुका केल्यात आणि निर्णय घ्या की, या पुन्हा होणार नाहीत!स्टाॅप ब्लेमिंग अदर्स अँन्ड बी रेडी टु टेक रिस्पाॅन्सिबिलिटीज आॅफ युअर ओन अॅक्शन्स!''

आम्हा चालतच होतो. ते आजोबा कुठेही न थांबता चालतच होते. समोर हिमाच्छदित पर्वत शिखरं चंद्राच्या प्रकाशात अस्पष्ट चमकत होती. नक्कीच  हिमालय असावा. खुप सुंदर दृश्य होतं.

 ते पुढे बोलु लागले, "मला तुमच्या पिढीवर पूर्ण विश्वास आहे! पण तुम्ही म्हणता मागचे वर्ष किती सहज निघुन गेले कळलेच नाही!
अरे कसं कळणार?
तुम्ही इतके सहज दिवस वाया घालवता!दिवसा दिवसांनीच वर्ष बनतं. दर वर्षी केलेले संकल्प सहज विसरता! पण काळ कधी थांबतो का! तुम्हाला कळतही नाही!मुठीतुन वाळु जशी अलगद निसटते,  तसे दिवस जातात आणि शेवटी उरतात त्या कडु गोड आठवणी!

पण आम्हाला गेल्या वर्षाशी काही देणं घेणं नसतं उत्सुकता असते फक्त पुढील वर्षाच्या स्वागताची!
शेवटी मावळत्या सूर्याला कोण नमस्कार करतं?"

जवळुन एक अरूंद नदी खळखळाट करत वाहत होती. माझ्या डोक्यातही आता विचारांचा जबरदस्त प्रवाह वाहत होता.ते आजोबा नदीकडे बोट दाखवत म्हणाले, "आपणही या नदीसारखं वाहतं असावं! कारण जिथे पाणी साचतं तेथे शेवाळ साचतं!''

त्यांच्या प्रत्येक वाक्याने माझ्या मनात अनेक तरंग उमटत होते. प्रथमच मी एका योग्य दिशेने विचार करत होतो.

चंद्र पश्चिमेकडे कलत होता.एका छोट्या लाकडी पुलावरुन आम्ही नदी ओलांडुन पुढे गेलो होतो.कानावर खळखळाट अजुनही येत होता.बर्फाच्छदीत डोंगरंही आता  जवळ आली होती.

''मी त्या आजोबांना माझ्या दु:खाचं कारण सांगितलं. एका अत्यंत जवळच्या नातेवाईकाचा आणि काही जवळच्या नात्यांचा मृत्यु झालेल्याचं सांगितलं.

तेव्हा त्यांनी खाली गळुन पडलेल्या झाडांच्या पानांवरुन सृष्टीचा ''उत्पत्ती स्थिती आणि लय'' हा सिद्धांत समजाउन सांगितला. प्रत्येक  गोष्ट ही काळाच्या उदरात गडप होणारच! 'क्षणभंगुरत्व' एन्जाॅय करायला सांगितलं.वर्तमान क्षण हेच खरा जीवन असत सांगितलं.

पहाट आता संपत आली होती.तेजस्वी शुक्रतारा पश्चिम क्षितीजाकडे कलला होता.

बऱ्याच वेळापासुन आम्ही एक शब्दही न बोलता चालत होतो. नदीचा खळखळाटहीआता ऐकु येत नव्हता. मी पुर्ण अंतर्मुख झालो होतो. डोक्यातील विचारांचे थैमान आता शांत होत होते.
त्या आजोबांच्या सोबतच्या प्रवासाच्या सुरवातीपासुन तर आतापर्यंत माझ्यात आमुलाग्र बदल होत होता.तारूण्याचा अवास्तवी अभिमान आणि इतर काही न्यूनगंड, पूर्वग्रह केव्हाच गळुन पडले होते. मला हे सगळं नवीन भासत होतं. त्या आजोबांबद्दल मला आता विलक्षण प्रेम वाटत होते. असं वाटत होतं हा प्रवास कधी संपुच नये.

समोर पुर्वेकडे एक विशाल दरी पसरली होती.
ते आजोबा अचानक त्या दिशेने चालु लागले.
माझी मुद्रा प्रश्नार्थक झाली.ते अगदी कड्याच्या टोकाजवळ उभे राहुन माझ्याकडे वळले व म्हणाले,
''बेटा आपला प्रवास येथपर्यंतच होता! तु आता परत जा!''

मला त्यांच्या विरहाची कल्पनाही सोसवत नव्हती आणि माझ्या भावनांचा बांध फुटला. अश्रुंचा प्रवाह पापण्यांचा अडसर झुगारत गालांवर ओघळला.

आणि मी माझ्या मनातील 'तो' प्रश्न त्यांना विचारला.

''आजोबा तुम्ही कोण आहात?''

त्यांनी मंद स्मित केलं व बोलले, ''बेटा, तु अजुन मला ओळखलं नाहीस?
अरे मी आहे वर्ष 2017!
 आणि मला तर गेलच पाहिजे!
काही क्षणात सुर्योदय होणार आहे! नवीन वर्ष जन्माला येणार आहे!

हे सगळं अटळ असतानाही मी त्यांना ''न जाण्याबद्दल'' विनवु लागलो तेव्हा ते म्हणाले, "अरे मला विसरा..मी जातो आहे..पण मी तेव्हाही होतो आणि नंतरही राहील..! फक्त माझे  रूप आणि नाव बदलत राहतील..कारण मी तर अनादी..अनंत आहे..!
आणि बेटा, तुमच्या नवीन वर्षाच्या जल्लोषात मला आता जागा कुठे आहे? मी गेल्यावर माझी साधी आठवणही राहणार नाही.
म्हटलं ना सगळा काळाचा महिमा!

पण बेटा मला विसरा पण मी काय शिकवले ते विसरू नका..!

जा तु आता..तुम्हा सगळ्यांच्या सर्व कटु आठवणी मी घेउन जातोय!''

माझ्या डोळ्यातुन सतत अश्रु वाहत होते. मी त्यांना शेवटची एक विनंती केली त्यांना नमस्कार करू देण्याची!

त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवलं. त्यांनी माझ्या डोक्यावर वात्सल्याचा हात ठेवला.
मला आशिर्वाद मिळाला होता...प्रत्यक्ष काळाचा..!

क्षणभर सारं स्तब्ध वाटलं..

मी डोळे उघडले...
समोर कोणीच नव्हतं.
फक्त उरली होती जाणीव त्यांच्या स्पर्शाची!

मी पुन्हा गहिवरलो.
मला एकदम त्यांचे शब्द आठवले.
''आली जरी कष्ट दशा अपार
न टाकिसी धैर्य तथापि थोर
केला जरी पोत बळेच खाली
ज्वाळा तरी त्या वरती उफाळे''

 समोर दरीच्या मागे पर्वतापलिकडे केशरी लाल सूर्यबिंब उगवत होते...

माझ्या अश्रुंनी भरलेल्या डोळ्यातुन सोनेरी किरणे चमकत होती.

2018 चा सुर्योदय झाला होता....



-अभिजित दिलीप पानसे

(माझा मूळ लेख 2008 जानेवारी ,लोकसत्ता)

Wednesday, 27 December 2017

बाळासाहेबसाहेब गेलेत

एकदा गुरुचरित्र पारायण करावं अशी खूप इच्छा होती.म्हणून 2012 च्या दिवाळीत करण्याचं ठरवलं.
त्यापूर्वी काही वर्षांपूर्वी पाहिल्यांदा केलं  होतं.तेव्हा सात दिवस पूर्णपणे श्री दत्त गुरूंचा शाब्दिक, वाचिक, काल्पनिक, भावनिक सहवास लाभल्याने शेवटी ते निजगमनाला जातात तेव्हा मला खूप रडु आलं होतं. डोळ्यातून सतत अश्रूपात ..शब्द बोलले ..वाचले जात नव्हते.माझ्यासोबत असं नेहमी होतं. गजानन महाराजांचीही पोथी पूर्णपणे समरस होऊन वाचतानाही 19 व्या अध्यायात ते समाधी घेतात तेव्हाही गहिवरून येतंच.

 012 नोव्हेंबर मध्ये दिवाळीच्या दिवसात पारायण सुरू केल्यावर बाळासाहेब ठाकरेंना हॉस्पिटल ला ऍडमिट केल्याची बातमी आली.आणि नंतर रोजचे अपडेट्स न्यूज चॅनल वर येत होते.

बाळासाहेब ठाकरेंना काही होऊ शकतं याची कल्पनाही करवत नव्हती. ते बरे होऊन बाहेर येतील आणि पुन्हा त्यांच्या शैलीत दोन्ही हाताने "जय महाराष्ट्र" म्हणून लोकांना अभिवादन करतील ही शंभर टक्के खात्रीच होती.
पण हे हृदयाचा विश्वास होता.वीस दिवसंपूर्वी दसरामेळ्यावात व्हिडिओद्वारे त्यांनी केलेलं छोटेखानी भाषण, त्यांची शारिरीक अवस्था, आणि त्यांचे 'ते' शब्द ऐकता मन भरून आलं होतंच.ती अवस्था आठवताना बुद्धी काहीतरी कटू भविष्य सुचवत होती.

 मी रोज अध्याय वाचण्यापूर्वी आणि वाचून उठताना दररोज  बाळासाहेबांच्या तब्येतीसाठी मानापासून प्रार्थना करायचो.

17 तारखेला पारायणा चा शेवटचा दिवस होता.उशिरा बसल्याने दुपारचे साडे तीन वाजले होते. शेवटचे दोन अध्याय वाचायला बाकी होते.आणि देवघरातून मला माझ्या बाबांचे आईला सांगतांनाचे  शब्द ऐकू आलेत, " बाळासाहेब गेलेत गं!!"

 टीव्ही चा आवाज वाढलेला होता.सगळं कानावर पडत होतं. आणि अगदी शपथपुर्वक खरं सांगतोय की त्याचवेळी इकडे गुरुचरित्रात "श्री गुरु" आपला अवतार त्यागायला निजगमनाला निघाले होते.#शैलगमन.

माझ्या डोळ्याना  सतत अश्रुधारा लागल्या होत्या. समोरचे शब्द दिसत नव्हते.उच्चारणे तर अशक्यच झाले होते.आणि ते अश्रू ते दुःख फक्त बाळासाहेब ठाकरे  गेल्याबद्दल होतं.

मी कसंतरी शेवटचे दोन अद्याय वाचून ग्रंथ  पूर्ण करून उठलो.गुरुचारित्र पारायण केल्याचा कुठलाही आनंद मनात नव्हता.
ग्रंथाला नमस्कार करून त्यावर एक गुलाबाचं फुल ठेवलं.बाळासाहेबांसाठी पुढच्या प्रवासाला प्रार्थना केली.

विषण्ण अवस्थेत उठलो आणि पहिले घरची दिव्यांची सिरीज बंद केली.

बाळासाहेब ठाकरेंवर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला त्या दिवशी घरातील मोठी व्यक्ती गेल्याचं फिलिंग आलेलं असेल.

त्या दिवशी सतत "डॉक्टर नितु मांडके" यांची आठवण येत होती.

"बाळासाहेब ठाकरे" सारखं खणखणीत व्यक्तिमत्व, स्पष्ट विचार,आणि ते ही उघडपणे मांडणारा सर्वार्थाने लोकप्रीय हृदयसम्राट  "लोकनेता"  बघितला नाही.!!

श्री बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर नितु मांडके यांना कधी भेटू शकलो नाही व प्रत्यक्ष कधी बघितलं नाही याचं दुःख नेहमी मनात राहील.

-Abhijeet Panse


27 सप्टेंबर 2016

जेव्हा संपूर्ण जग निद्राधीन असतं तेव्हा स्थितप्रज्ञ जागा असतो
कुठे नेते राष्ट्रीय संवेदनशील मुद्यानवरूनही एकमेकांविरुद्ध राजकारण करीत एकमेकांवर चिखलफेक करीत असतात.
कुठे मोर्चे निघत असतात..
कोणी अतृप्त आत्मा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःची नवीन पार्टी काढतो.

कोणी पत्रकार हिरोईन खुर्चीवर बसताना तिचा स्कर्ट कधी वर जाईल आणि नेमके त्या क्षणांचे फोटो काढता येतील असल्या नीच कामात गुंतलेले असतात.

कोणी अँजेलिना सारख्या अबलेवर बॅड पुरुषाने कसा अन्याय केला यावर आंबट तुरट चर्चा करत असतात.

कुठे सुटलेल्या पोटाची ढोबळी मिर्ची ऎश्वर्या राय आता पुन्हा चवळीची शेंग कशी काय झाली यावर चोथा होईस्तोवर चर्वण सुरु असतं.

भारताने 500वी टेस्ट जिंकली त्याचा आनंद साजरा करणं सुरु असतं.

मूवी रिलीज व्हायच्या नेमक्या काही दिवस आधी  नट नटयाची लफडी बाहेर येतात वा वादग्रस्त विधानं करतात..

पण या सर्व प्रसिद्धीसाठी आसुसलेल्या गदारोळात शांतपणे आपलं कार्य करणारे नेहमी वाटतात ते #इस्रो आणि इंडियनआर्मी

#जेव्हा सर्व झोपलेले असतात तेव्हा #स्थितप्रज्ञ जागा असतो.

काल  इस्रोने आणखी एक उपग्रह अंतराळात पाठवण्याची अवघड मोहीम फत्ते केली!!

खरे स्थितप्र कर्मयोगी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO आणि  भारतीयसेना आहेत!

कुठल्या निरर्थक वादात अडकत नाहीत वा प्रसिद्धी साठी आसुसलेले नसतात.
शांतपणे आपले कार्य देशासाठी करत राहतात.खरे कर्मयोगी!!

जेव्हा सर्व देशवासी झोपलेले असतात तेव्हा #भारतीयसेना आणि ISRO हे स्थितप्रज्ञ जागे असतात.
Hats off to them!!

मानाचा मुजरा!!

-अभिजित दिलीप पानसे

Monday, 25 December 2017

स्वयं प्रकाशित हो, गौतम बुद्ध

बुद्ध पौर्णिमा
मे 2016

सर्वप्रकारची भौतीक समृद्धी असलेला एक राजपुत्र एका जर्जर वृद्धाला बघतो आणि त्याला 'प्रश्न' पडतो!

तोच बलाढ्य राजपुत्र रस्त्यात ''#अंत्ययात्रा'' बघतो.तेव्हा त्याला पुन्हा 'प्रश्न' पडतात.

आणि त्या प्रश्नावर 'कायम' राहुन विचार करताना जगातली 'नश्वरता' त्याला जाणवु लागते.
नैसर्गिक वैराग्य येउ लागतं..

मी कोण? कशाकरता?

मी म्हणजे प्रस्तुत शरीरच का?

मृत्यु म्हणजे नक्की काय?

यांची खरी उत्तरे..''अंतीम सत्य'' जाणुन घेण्यासाठी तो तरूण राजपुत्र,भावी बलाढ्य राजा सारंकाहीचं त्याग करून..'डिटॅच' होउन..निघुन जातो..

साधना करतो..

आणि ध्यानावस्थेत अश्वत्थ वृक्षाखाली ''ज्ञान'' प्राप्ती करतो..आणि सिद्धार्थाचा ''गौतम बुद्ध ''होतो.

ही गोष्टच..हा विचारच प्रचंड विचारात पाडणारा..अंर्तमुख करणारा आहे.

लहानपणी ही गोष्ट वाचताना अंगावर शहारे आले होते.

ज्यांना अशी प्रश्न पडतात..जे त्या प्रश्नांशी प्रामाणीक राहतात..ज्यांना प्रामाणिकपणे या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे हवी असतात ते गौतम बुद्धांना धर्मापलिकडे जाउन बघु शकतात.

राजा ययातीलाही सर्व उपभोग घेतल्यावर त्या भोगांची नश्वरता जाणवली.

नवनाथ भक्तीसारामध्येही एका चक्रवर्ती राजाचा आणि त्याच्या आईचा नश्वरतेवरील संवाद अंगावर शहारे आणणारा..अश्रु आणणारा आहे.

तुकाराम महाराजांनाही दुष्काळामुळे जीवनातील नश्वरता कळली..व्यवहारीक जगातला खोटेपणा समजुन आल्यावर डिटॅच होउन साधनेनंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली.

त्र्यंबकेश्वराच्या गुफेत बाल निवृत्तीने साधना केल्यावर ते निवृत्तीनाथ झाले.

सुरवंटही ही ध्यानावस्थेतील काळ घालवल्यावर त्याचं फुलपाखरू होतं.

जे प्रश्न राजपुत्र सिद्धार्थाला पडले ते बाल..तरूण नरेंद्रालाही पडलेत..ते भक्त प्रल्हादालाही पडलेत..

गौतम बुद्धांची आणि स्वामी विवेकानंदांची ध्यानावस्थेतील प्रतिकृतीत तर खुपच साम्य जाणवतं.

म्हणुन गौतम बुद्ध हे मला भावतात.ते ज्ञानाचे..साधनेचे..प्रामाणिक वैराग्याचे प्रतिक आहेत.

कोणत्याही धर्माचे प्रार्थनास्थळ; बुद्ध माॅनेस्ट्री असो वा कॅथलीक चर्च (जोवर ती 'प्रार्थना' स्थळेच असतात तोवर) तेथे शांती जाणवतेच.

''स्वयं दीप भव'' ही गौतम बुद्धांची शिकवण विशेष खुप भावते.



आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी, श्रीराम नवमी


फोटो, पुण्यातील पाताळेश्वर, PC-अभिजित पानसे
एप्रिल 2016


मला प्रामाणीकपणे नेहमी वाटतं की श्रीरामावर 'देवत्व' लादल्यामुळे त्यांच्यावरच फार अन्याय झाला आहे.
विशेषत: 'श्रीरामा'ला 'देव' म्हणुन प्रोजेक्ट केल्यामुळे त्याचे गुण, पराक्रम झाकोळल्या गेले आहेत.
''आपुलीच प्रतिमा(मुर्ती) होते आपुलीच वैरी....''

एकदा कोणाला देव म्हटलं,मुर्ती तयार केली की आपण मोकळे! आपली जबाबदारी संपली!मग हार,फुलं,अक्षताची उधळण करणं इतकच उरतं.

देवाने केलेले कृत्य ही 'लीला' म्हणुनच बघितली जातात. स्वत: श्रीरामांनी त्यांच्या आयष्यात कुठलिही लीला केली नाही.मर्यादा पुरूषोत्तम म्हणुन वागलेत.

पण त्यांच्या संयमी, नियमबद्ध जीवन, पराक्रमाचं श्रेय रामाला न मिळता त्यांच्यातील 'देवत्वालाच' मिळतं.

सर्व साधारणपणे रोजच्या आयुष्यात कसं वागावं..राहावं..ह्याचं उदाहरण म्हणुन कोणा ओळखीच्या व्यक्तीचं..सर्वसामान्य माणंसाचं उदाहरण म्हणुन दिलं जातं; देवाचं नाही. कारण तेच! तो तर 'देव' आहे  त्याला काय अशक्य! ही डजन्ट बिलाँग टु अस!

त्यामुळे त्या बिचाऱ्याला त्याच्या श्रेष्ठत्वाचं क्रेडिटही मिळत नाही. 'देवत्वाच्या' प्रखर वलयाखाली त्याचे मानवी सद्गुण झाकोळले जातात.

पण आजच्या काळात श्रीराम हा व्यक्ती म्हणुन प्रत्येक वेळी उपयोगी ठरू शकतो.

आजच्या समाजात #STD(Sexually transmitted diseases) चं प्रमाण किती वाढलय ह्याचा अंदाज घ्यायचा असेल तर कोणत्याही मोठ्या सरकारी दवाखान्यात सकाळी ओपीडी टायमिंगला जाउन बघावं.
AIDS च्या पेशंट्सच्या औषध वितरण खिडकीसमोर रांगा दिसतील.

आज संपुर्ण जगात AIDS एड्स आणि इतर लैंगिक रोग आणि लैंगिक विकृतीचं प्रमाण प्रचंड वाढलय. कारण मनाचा संयम..वैचारीक खोली..तत्वांची कमतरता..किंवा असलेल्या तत्वांशी आणि जोडीदाराशी एकनिष्ठ नसणे...

अँड धिस इज व्हेअर श्रीराम कम्स इन टु द अॅक्शन!!एकनिष्ठ,एक बाणी,एक वचनी चारित्र्यवान श्रीराम!

आज नात्यातील प्रामाणिकता हरवतेय.शारिरीक स्तरावरही आणि मानसीक पातळीवर तर नक्कीच प्रत्येक जण व्याभिचार करतोच!अॅडलटरी इज नाॅट नो लाॅँगर आउट आॅफ द इक्वेशन नाउ.

ज्या काळात बहुपत्नीत्व होतं..तथापी बहुपत्नित्व ही क्षत्रीयांची शान मानली जायची. स्वत:च्या वडिलांना बहुपत्नी असतानाही श्रीरामाने मात्र त्तव आणि प्रेमाखातर एकपत्नित्व स्विकारले.

टुडे एवरीवन एक्सपेक्ट अनटच्ड अँड वर्जिन वाईफ टु हॅव!
त्यासाठी लोकं सीतेच्या पातिव्रत्याचे उदाहरण वगैरे देतात की रावणाकडे सर्व श्रीमंती होती..विद्वत्ता होती इतका काळ रामापासुन दुर राहुनही  रावणाला ती शरण गेली नाही. अशीच बायको पाहिजे वगैरे...

पण सीतेसारखी पतिव्रता प्रामाणिक, निर्मळ स्त्रीची इच्छा ठेवताना स्वत: आपलं चारित्र्य श्रीरामाच्या जवळपासही आहे का हे अंतर्मुख होउन आम्ही पाहातो का??

लक्ष्मण तर मला श्रीरामापेक्षाही थोडासा उजवा वाटतो.सावत्र भाऊ वडिलांना दिलेल्या शब्दापोटी वनवासात जाताना तोही सावत्र भावाच्या प्रेमासाठी आपला  संसार सोडुन त्याच्यासोबत जातो.

अशोकवनातुन सितेने दिलेले दागिने जेव्हा हनुमान श्रीरामाला दाखवतो.तेव्हा लक्ष्मण फक्त सीतेच्या पायाच्या बोटातीलच अलंकार ओळखतो.लक्ष्मण कारण सांगतो की आजवर त्याने सीतेच्या मुखाकडे कधीच पाहिलं नाही फक्त तिच्या पायाच्या बोटांकडेच दृष्टी असायची.
असा भाऊ..असं चारित्र्य..आज या तिघांचीही आदर्श म्हणुन गरज आहे.
कदाचीत त्यामुळे लैंगिक रोग..नात्यातील वाढती अप्रामाणीकता..घटस्फोटाचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल.

देवाची मुर्ती ही आपल्या प्रवासातील माईलस्टोन..दिशादर्शक प्रमाणे असते.माईलस्टोन म्हणजे मंजील..डेस्टिनेशन नसतं.आपला पडाव त्याच्या समोर असतो.तसंच हळुहळु  'मुर्ती'च्या पलीकडे जाउन ईश्वर..श्रीरामतत्व भेटतं.
जगताना..आचरण करताना..

 घराजवळच एक राम मंदीर अाहे.रामनवमीला दरवर्षी रांगच रांग..झुंबड असते.वर्षभर पुन्हा त्या  तिघांकडे  कोणी पाहत नाही.
मी खास रामनवमीला कधीच दर्शनाला जात नाही. कारण वर्षभरात  कधी माझं थोबाड त्यांना न दाखवणारा मी फक्त आजच्या दिवशी गर्दीत रांगेत लागुन त्या तिघांना फुलं,अक्षता वाहताना माझा हात थरथरतो. हिंमत होत नाही.
आणि मुळात रामापुढे मला जाण्याची लाज वाटते.कारण श्रीरामाचा,लक्ष्मणाचा,सीता मातेचा एकही गुण माझ्यात नाही...

यापुढे कधी कणभर जरी' राम' जगु शकलो..किंवा जीवनात 'राम' आला तर जाईन दर्शनाला..तथापि तेव्हा 'मंदीरात' दर्शनाला जाण्याची गरजच उरणार नाही...

-अभिजित पानसे

Sunday, 24 December 2017

'ती' बिल्डिंग

25 डिसेंम्बर 015, नाताळ निमित्ताने.
दोन वर्षांपुर्वी चेन्नईमध्ये एप्रील महिन्यात मी आणि चिन्मयी नावाची माझी एक मैत्रिण संध्याकाळी Express Avenue mall मधुन मुव्ही बघुन बाहेर आलो.त्या दिवशी ''स्वामी समर्थ जयंती" होती.ती आणि तिचं संपूर्ण घरच स्वामी समर्थ भक्त असल्याने दिवसभर अधुन मधुन म्हणत होती आज नागपुरला असती तर मंदीरात जाता आला असतं.इथे चेन्नईत थोडीच असणारेय स्वामी महाराजांचं मंदीर!

सहज चालताना मला  E.A.Mall च्या मागे रस्त्यापलीकडेे एक परिचीत वास्तु दिसली.

मी तिला म्हटल ''स्वामी महाराजांच्या मंदीरात जायचंय ना तुला?''

''चल''!

चिन्मयीसुद्धा रोज ध्यान करत असल्याने Spirituality मध्ये रस असल्याने तीला मी करत असलेली कृती पटेल..पचेल याची मला कल्पना होती.

आम्ही रस्ता ओलांडुन 'त्या' शुभ्र वास्तु मध्ये आलो.ते एक छोटंसं 'चर्च' होतं.

आत कोणीच नव्हतं.कमालीची निरव शांतता होती.

फार क्वचित मी आजवर चर्चमध्ये गेलो असेल पण चर्चमधील ही शांतता गावातील वर्दळ नसलेल्या एखाद्या दगडी, हेमाडपंथी शंकराच्या मंदीरातील प्रमाणे वाटते.

शिव मंदीरातील आतील गाभाऱ्यात प्रवेश करताना, पिंडी जवळ बसताना जणु स्वत:च्या अंतरमनात प्रवेश केल्यासारखं वाटतं.
मग ती हरिश्चंद्रगडावरील मंदीरातील गूढ शांतता असु दे वा जंगली महाराजांच्या समाधीमागच्या पाताळेश्वराच्या पिंडीजवळ बसताना जाणवणारी असो.

चर्चमधील शांतता अगदी तितकी खोल नेणारी नाही वाटत पण ती निरवता आवडते.प्रसन्न वाटतं.
त्या संध्याकाळीही वाटलं.

मी चिन्मयीला म्हटलं ''या इथेही लोकं प्रार्थनेला येतात. त्यामुळे या वास्तुतही प्रार्थनाच झालीच आहे! मग ती कोणासाठी का असेना!
तु कल्पना कर की समोरची मूर्ती ही स्वामी सर्मथांची उभी मुर्ती आहे! आणि तोच मनात भाव ठेउन नमस्कार कर!''

आम्ही तेथील ताशीव लाकडी बाकड्यावर बसलो. आणि तिथे तिने ''श्री स्वामी सर्मथ जय जय स्वामी सर्मथ...''
असा थोडा वेळ जप केला.
मधुनच आम्हाला आमच्याच या कृतीवरून हसायला येत होतं.हसतही होतो.

मी कधीच कुठल्या चर्चमध्ये खास ठरवुन गेलो नाही.

पण मित्रांसोबत पहिल्यांदा गोव्याला गेलो असताना जुन्या गोव्यातील प्रसिद्ध प्रचंड मोठे cathedrals,
मँगलोरचं मोठं चर्च,म्हैसुरचं अवाढव्य चर्च असो माहीमच चर्च किंवा पुण्यातील कँप, कोंढव्यातील छोटंसं चर्च असो मी नेहमी समोरील येशूच्या मूर्तीला' दत्तगुरूंची मुर्ती आणि पुढ्यात जळत असलेली 'मेणबत्तीला' निरंजन म्हणुनच बघतो.

आणि सरळ दोन्ही हात जोडुन नमस्कार करतो.

उगाच इतरांचं पाहुन अंगावर स्वस्तिक (Cross) वगैरे काढत नाही.

मला नेहमी येशु आणि आपल्या ज्ञानेश्वर माउली  मध्ये साम्य जाणवतं.

मुस्लीम ,सुफी पंथात ईश्वराला प्रेयसी म्हणुन आळवलं जातं.त्यांची भक्तीगीतातही तोच भाव असतो.
तर ख्रिस्तिंमध्ये ''आकाशातील पिता''
म्हणुन आळवतात.

पण आपल्या हिंदु धर्मातच ईश्वराला ''माऊली'' आई समजुन पुजलं जातं.

येशु आणि ज्ञानेश्वर माऊलीत त्यांच्या जीवन पद्धतीवरून मला काही साम्य जाणवतं.

दोघांमधीलही दैवीपणा तत्कालीन समाज ओळखु शकला नाही.दोघांचाही तत्कालीन ठिसुळ मानसिकता असलेल्या hardcore fundamentalist समाजाने छळ केला.

आणि दोघांनीही त्याबद्दल मनात राग न धरता समाजाला माफ तर केलेच अधिक त्यांच्या भल्यासाठी  ईश्वराकडे प्रार्थनाही केली.

''Forgive them...they don't know  what they r doing..''असं काहीसं येशुंनी म्हटलं पण आमच्या ज्ञानेश्वरांनी तर सर्वांसाठी ईश्वराकडे ''पसायदान'' मागितलं.

'' जे खळाची व्यंकटी सांडो...''

खल व्यक्तींचा नाश होवो असे म्हटले नाही तर त्यांची ''खल प्रवृत्ती'' नष्ट होवो म्हटले.

''Autobiography of Yogi'' या जगविख्यात पुस्तकात योगानंदांनी कृष्णाचा आणि येशुचा सबंध, त्यांचे गुरू महाअवतार,दत्तगुरू व येशुंचा आंतर संबंध, भगवत्गीतेतील, व इतर धर्मग्रंथातील between the lines मधील अर्थ सांगितलाय.तोही वाचनीय आहे.

"The Apprenticed to the living Himalayan master" या पुस्तकातही ''श्री एम'' यांनी असेच काही सुवर्णमध्य विशद केले आहे.

तेव्हा नाताळ हा सुट्टी म्हणुनच एन्जोय करणाऱ्या,सहज चर्चमध्ये चक्कर टाकणाऱ्यांना, सर्वांना (पण एखाद्या प्रचारकाच्या प्रचाराला  भुलुन 'कन्व्हरटेड बदलेल्या' उथळ नाठाळ अशा 'नवं ख्रिस्ताना'' सोडुन) नाताळाच्या सर्वांना शुभेच्छा.

 कारण जे आधिच्याचे,एकाचे होउ शकले नाहीत ते नव्याचे दुसऱ्याचे तरी काय होणार!!!

शुभेच्छा.

श्री गुरूदेवदत्त.

- अभिजित  पानसे

Saturday, 23 December 2017

पेड यशोदा , मदर्स डे

14 मे2017

                     * पेड यशोदा*

एका यशस्वी स्त्री ,पुरुषामागे मागे प्रकाशझोतात न आलेली एक व्यक्ती असते. तसेच आजच्या काळात करिअर करणाऱ्या आईच्या यशामागे बऱ्याचदा एक स्त्री असते. लग्नानंतरही करिअर करणाऱ्या स्ट्रॉंग स्त्रियांसाठी ही स्त्री एक पेड यशोदाच असते. जी मुलाची सर्व काळजी घेते. खाऊ घालते शी सु करून घेतल्यापासून इतर खेळ प्रगतिकारक ऍक्टिव्हिटीज करून घेते. ही स्त्री म्हणजे पाळणाघर, डे केअर चालवणारी स्त्री.

आजच्या काळातील सुसंगत बदल, वा काढलेला उत्तम मार्ग  किंवा योग्य तडजोड म्हणजे पाळणाघर म्हणता येईल. यामुळे आजच्या आधुनिक आई ला पाळणाघरात आपलं मुल ठेऊन निर्धास्त होऊन बाहेर काम करता येतं.

प्रत्येकवेळी आजी आजोबांनीच नातवंडांना किंवा कोणी जवळच्या नातेवाईकांनी संभाळावं ही अपेक्षा का करावी! बरेचदा ते शक्य असतं व नसतं. त्याला इतर अनेक पैलू असतात.
म्हणून डे केअर हे सर्वोत्तम, सकारात्मक योग्य पर्याय असतो.

अनेक प्रोफेशनल डे केअर मध्ये तेथील सर्व कर्मचारी मावश्यांची नियमित वैद्यकीय चाचण्या करूनच त्याना घेतलं जातं. स्वच्छतेचे निकष पाळले जातात.
मुलांकडून अनेक चांगल्या गोष्टी करून घेतल्या जातात, शिकवल्या जातात.
इतर मुलांच्या सोबत राहताना लाजरे बुजरे मुलं धीट होतात. कित्येकदा तर आपल्या मुलांना वेवेगळ्या गोष्टी येतात बघून पालकही आश्चर्यचकित होतात. याचं श्रेय जातं पाळणाघराला. तिथे आईप्रमाणेच मुलांची काळजी घेतली जाते. यामुळे बरेचदा करिअर न करणारी आईसुद्धा आपल्या मुलाला चांगल्या डे केअर मध्ये सोडते.

पहिल्या दिवशी रडणारं मुल आणि क्वचित आईसुद्धा; पुढे तेच मुल डे केअरला आनंदाने जाऊ लागतं कारण तिथे नवीन मित्र झाले असतात.
समवयस्क सोबत खेळताना प्रगती होते.भाषा  ज्ञान, शब्दसंग्रह वाढतो.

व्यक्तिपरत्वे वेगवेगळे सकारात्मक नकारात्मक अनुभव लोकांना येऊ शकतात.

पूर्वीची दाई मा आज डे केअर, पाळणाघर झालंय.
आजच्या काळातील आईसाठी, स्त्रीसाठी पाळणाघर हे अत्यन्त उपयोगी आहे.

 जन्म देणारी देवकीच नाही तर ही पाळणाघरातील यशोदा ही तितकीच या मुलांसाठी महत्वाची असते त्यामुळे मातृदिनी यांच्यासाठीही कृतकृत्यभाव ठेवायला हवा.
आजच्या स्ट्रॉंग यशस्वी देवकीच्या मागे ही पेड यशोदा असते.

#मदर्सडे

- अभिजित पानसे

जंगल जंगल बात चली है, आंतरराष्ट्रीय अरण्य दिन

ज्याने अरण्याशी मैत्री केली त्याच्याशी अरण्यातील हिरव्या पानांची वस्त्र लपेटलेली झाडं संवाद साधतात..झाडांना कवटाळून राहणाऱ्या वेलीही बोलतात. अरण्य उपाशी ठेवत नाही. माकडं ,पोपट अर्धवट खाऊन फळं खाली टाकतात.पक्षांनी उष्टावलेली फळं मधुर असतात.

चालताना अरण्य नेहमी डोक्यावर हिरवं छत्र धरतं.जंगलात चालताना दमत नाही.पण वाटलंच तर जंगलातील कुठल्याही विशाल वृक्षाखाली अंग पसरावं.आजीच्या मायेनं अरण्य मांडीवर घेउन थोपटतं. फांद्यावरून पक्षी अंगाईगीत गातात. वारा कानात रुंजी घालत राहतो.जंगलात सहज निद्रा लागते.इथे कोणी झोपेतून उठवणार नाही.निवांत झोपी जावं!

पावसाळ्यातील  हिरव्या कंच, ओलसर, श्रीमंत अरण्याशी मैत्री करावी. शिशिरातील ,ग्रीष्मातील उतारवयात स्वतःहून आपली सारी संपत्ती, जायदाद धरेला अर्पित करून विरक्त झालेल्या  मौन धारण केलेल्या " आता उरलो फक्त समाजापूरता " वैचारिक बैठक असलेल्या पारदर्शक अरण्याशीही करावी.

ज्यांना तत्वज्ञान कळलं नाही ते फार वाचाळपणा करतात. तत्वज्ञ मात्र शांत असतो. आनंदात मग्न असतो.अरण्य म्हणूनच मौनात असतं. माणसे एकत्र आली की बडबड ,भांडणं, मत्सर सुरु होतात. जंगलात मात्र एकमेकांना खेटुनही मत्सर द्वेष नाही.जो तो आपल्या मस्तीत आपल्यानुसार वाढत असतो. जंगल खऱ्या अर्थाने '
लिबरल' असतं.

पण जंगल सहजासहजी मैत्री करत नाही.नवख्याशी कडक ,फटकून वागतं. रानभुल पाडतं. या भुलीला न फसणाऱ्याला जंगल मैत्रीने आलिंगन देतं.अरण्यातील वाऱ्याची बासरी, शेहनाई ,पक्षांचा कोरस ऐकायला अरण्याशी मैत्र जुळावं लागतं.

जंगल स्वतःच एक परिपूर्ण ऊर्जेची, अन्नाची साखळी आहे.
F- Food
R- Resources
E- Energy
S- Storage
T- Trees

21 march, #WorldForestDay

Friday, 22 December 2017

"पोरांनो वट पौर्णिमेवर निबंध लिहा"

तो- अगं माझी ती hole असलेली बनियन कुठे ठेवली आहे? दिसत नाहीये.

ती- थांब रे पहिले holy banyan tree ला #थ्रेड गुंडाळून येते. मग शोधुन देते.


सतत 'वटवट' करणाऱ्या..करणारे,  'सुतावरून' स्वर्ग गाठणाऱ्या..गाठणारे
'वडाची' साल पिंपळाला गुंडाळणारे ..गुंडाळणाऱ्या..
बाहेर कितीही वट असली तरी घरात 'वटणी' वर आलेले ..
नवऱ्याचा किती ही वीट आला तरी त्याला वीट फेकून न मारणाऱ्या..
बाहेरील दगडापेक्षा घरची वीट मऊ म्हणून एकमेकांसोबत अडजस्टमेंट करणारे ..

शेवटी कितीही वटवट केली तरी काही अडचण आल्यास एकमेकांचा 'आधारवड' होणाऱ्यांसाठी
वट पौर्णिमा. (च्या शुभेच्छा??)
जाऊ दे सर्वपित्री अवसेच्या शुभेच्छा दिल्या जातात तिथे पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्याच तर काय बिघडलं.
एकमेकांप्रती इच्छा शुभ असल्या की झालं.

-अभिजित पानसे

अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम

26 जून 2017, ईद निमित्ताने

मागच्या वर्षी स्नो स्कीइंग शिकायला पहलागम जवळील आरू या गावी गेलो होतो.पण त्या वर्षी बर्फ पडला नव्हता. फेब्रुवारी महिना संपायला आला होता पण त्या महिन्यात बर्फ पडला नव्हता. आमचे परतीचे दिवस जवळ आले होते .आम्ही सगळे आकाशाकडे दृष्टी लावून होतो पण आमच्यापेक्षाही अस्वस्थ काश्मिरी लोक होते.

 त्यांच्यासाठी बर्फ अत्यन्त महत्वाचा होता. त्यांच्या तेथील भौगोलिक जीवन चक्रासाठी , आणि प्रवासी आकर्षित होण्यासाठी. तरंच त्या पुस्तकातील पहाडी छोट्या गावाप्रमाणे सुंदर असलेल्या त्या गावातील आर्थिक व्यवहार नीट चालणार होते.

 आम्ही त्या लोकांना जवळपास रोजच विचारत असू "आज बरफ गिरेगी क्या?" त्यांचं उत्तर मला फार आवडायचं. मानवी मानसिकतेचं दर्शन करवायचं.
ते म्हणत हम तो अल्लाह से दुआ कर रहे है आप भी अपने भगवान से , राम, किशन, शंकरजिसे दुवा करो की बरफ गिरे!" अश्याच प्रकारचे काही वाक्य  तरुण पोरं, म्हातारे ,दुकानदार बरेच जणांकडुन ऐकलं.

तेव्हा वाटलं जेव्हा अडचण येते , संकटं येतात , मूळ आयुष्यावरच, घाला बसू लागतो तेव्हा सारा #कट्टरपणा दूर होतो.

 तेव्हा मी , माझं ,माझाच विश्वास , माझाच धर्म तेवढा श्रेष्ठ म्हणणाऱ्यांचा अंध अहंकार दूर होतो.मग तो कोणाही धर्माचा असो.
 दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग सारख्या अत्यंत कट्टर विघटनवादी जिल्हा परिसरातील, भारतद्वेषी भागातील ते लोक आपल्या #कम्फर्टझोन, स्वस्थ आयुष्यावर नैसर्गिक संकट येऊ पाहता कट्टरवाद तात्पुरता का होईना विसरून इतर शक्तीवरही स्वतः विश्वास ठेवू लागतात.

 संकटसमयी एक तर मनुष्यतील योद्धा किंवा भाबडेपणा जागृत होते. ते दुसऱ्यांचं उदाहरण होतं.

कित्येक हिंदूही मुलबाळ होत नाहीये म्हणून किंवा इतर काही अडचणीमुळे नामस्कारासाठी, नवसा बिवसासाठी पीर, दर्ग्यावर जातात.
अडचण लोकांमधील कट्टरता, अहंकार सोडायला लावून भाव, आणि माणुसकी जागृत करते.

थोडेसे विषयांतर, तेथिल तरुण पोरं सांगत लहानपणी घरासमोर बारा चौदा फूट बर्फ पडायचा आता काही वर्षांपासून फक्त 3 ते चार फूट बर्फच पडतो. ग्लोबल वॉर्मिंग चा परिणाम असा निसर्गात कळतो.
 ते असो. ग्लोबल वॉर्मिंग विषयाला आपण 'असो' या सदारातच टाकतो.

 सोनमर्गला उंचावरती ग्लेशिअमधून पाण्याचा प्रवाह वाहत एक छोटी नदी वाहते.तिथे त्या नदीच्या पलीकडील तीरावर एक छोटंसं मंदिर आहे.आजूबाजूला हिरवंगार कुरण, देवदार वृक्ष, उतरत्या छपराचं..कोंकणात उतरत्या छपराच कौलारू मंदिरं असतात अगदी तसंच छोटं उतरत्या टीनाचं ते मंदिर मी रोज बघायचो. पण जायला वेळ मिळत नव्हता. अप्रतिम फोटोजनिक जागा, मंदिर ते आहे.

एकदा अलीकडील तिरावरील कावा ,मॅगी च्या दुकानात असताना तेथील एक मध्यमवयीन चांगला माणूस ,नियाजभाई शी ओळख झाली होती तो ऑक्टोबर नंतर येथे कोणीच राहत नाही, कारण येथे मग जीवंत राहणं अशक्य असतं, बर्फ पडायला सुरुवात होते, त्यामुळे वरून पहाडी जंगलातील अस्वलं खाली येतात घोडे मारतात, माणसालाही सहज मारतात वगैरे सांगत असताना मी त्याला सहज एकदम विचारलं की पलीकडील ते मंदिर कोणाचं आहे. तेव्हा एक क्षणासाठी तो ओशाळला , बोलला ते मंदिर नाही मश्जीद आहे!

 कोणालाही ते मंदिरच वाटेल बाहेरून बघताना इतकं त्यात साम्य होतं.

तेव्हाही वाटलं मंदिर मशीद जर एकसारखी वाटू शकते तर मग यात नक्की फरक कोणता? कशाचा?
क्रूरता, द्वेष हेच यांना वेगळे करतात का!!??

या माणसानेच मला श्रीनगरमधील नौहट्ट भागातील प्रसिद्ध ऐहासिक , वास्तुकलेचा नमुना असलेल्या मशिदीला बिनदिक्कत जाऊ शकता येतं सांगितल्यावर मी तेथे थोडसं घाबरत गेलो होतो.

असो. जे मुस्लिम खरंच शांतिप्रिय आहेत, द्वेषी नाहीत , जे अब्दुल कलामांच्या मृत्यूमुळे हळहळतात, मेनन च्या शवयात्रेत भाग घेत नाहीत त्यांच्यासाठीच ईदीच्या शुभेच्छा.
आणि अशे काही आहेत त्यांना मी ओळखतो.
लहानपणी दरवर्षी शिरखुरमा खायला मुस्लिम मित्र मैत्रिणींकडे कडे आम्ही अनेक हिंदू मित्र जात असू.

-अभिजित पानसे

Thursday, 21 December 2017

एकमेकां साह्य करू; मुंबई स्पिरिट

30 ऑगस्ट 2017

विनोदी वृत्ती असणे वेगळे आणि कुठेही फिदीफिदी करणे वेगळे ..कोट्या करणे वेगळी गोष्टआणि फक्त आपल्या अजागळ व्यक्तिमत्वचे अवेळी काटे टोचणे वेगळी.
कधी, कुठे ,कोणावर, तर कधी स्वतःवर हसायचं याचं 'तारतम्य' असणे याला विनोदी 'बुद्धी' म्हणतात. जसा कॉमन सेन्स असणे कॉमन नसतो तसंच ही बुद्धीही असणे अनकॉमन आहे.
कुत्सितपणे बोलणे आणि कोणाच्या जीवावर, मालमत्तेची हानी होऊ घातलेल्या संकटावर, त्यातील त्यांनी दाखवलेल्या 'स्पिरिट' वर कुत्सितपणे हसणाऱ्यांची  दयाही येउ शकत नाही.

आपले फालतू शहरी पर्सनल स्कोर सेटल करण्यासाठी आयपीएल फायनल सारख्या टुकार गोष्टीवरुन कोट्या विनोद समजण्याजोगे पण स्वतः काठावर रिकामे बसून बुडणाऱ्यांवर हसणे, त्यांच्या #स्पिरीट ची टर उडवणाऱ्यांचं स्वतःचं स्पिरिट ..आत्मा किती अर्धमेला झालाय हे दिसून येतं.

इतरांच्या "सर्वायवल स्पिरिटवर" हसणाऱ्या अश्या अर्धमेलेल्या स्पिरीटांना स्पोर्टमन स्पिरिट म्हणजे कशाशी खातात कळणार नाही.

निसर्ग अत्यंत बेभरवशाचा असतो. उद्या हे लोक अश्या नैसर्गिक संकटात अडकले तर!
तरीही हे आकाशातील बापा यांना माफच कर जरी त्यांना माहिती आहे ते काय करत आहेत.

- Abhijeet Panse

इंटरनेट, निर्गुण रूप गणेशाचे


गणेश चतुर्थी
सप्टेंबर 09

सगुण आणि निर्गुण यात काय श्रेष्ठ ..सगुण भक्ती निर्गुण ईश्वर यावर कोणी वाद करत, प्रतिवाद, वितंडवाद करतं. गणपती या देवतेची मातीची मूर्ती स्थापन करून पूजा करताना सगुण उपासना केली जाते. चराचरात व्यापून उरलेलं गणेश'तत्वा'ची पूजा ही मूर्ती'द्वारे'  केली जाते. पण गणेश 'तत्व' हे निर्गुण आहे.

गणपती ही बुद्धीची, ज्ञानाची देवता मानली जाते.
पण ईश्वरी तत्व , संज्ञा जेव्हा आजच्या काळाशी, सुसंगत साद घालतात तेव्हा हे ईश्वरी तत्व जास्त '#रिलेटेबल' वाटू लागतात.

आजचा काळात "माहिती तंत्रज्ञानाचं " ही ज्ञान या नाण्याची एक महत्वाची बाजू.
माहिती तंत्रज्ञानाचं मुळ हे  इंटरनेट, आंतरजाल. .आणि साधन कम्प्युटर.

इंटरनेटचं हे गणपतीचं एक निर्गुण रूप वाटतं.
संपूर्ण माहितीचं आगार, कोष, भंडार हे इटंरनेट असतं.
आणि 'कम्प्युटर' हे त्याचं 'सगुण' रूप वाटतं. जसा ज्ञान रुपी निर्गुण गणपती आणि मूर्ती सगुण रूप.

 बस एक 'क्लीक' करायची गरज.
गणपतीचं वाहन मूषक. कम्प्युटरचं वाहन ही 'माउस'. हातात 'माउस' धरून हवं तिथे क्लिक केलं की त्या त्याबद्दलची माहिती , ज्ञान मिळत जातं.

ईश्वर..निसर्ग..ऊर्जा मुळात मार्ग दाखवत असते असं म्हणतात. बाकी प्रयत्न व्यक्तीला करावे लागतात. इथेही कंप्युटर फक्त मार्ग दाखवतो, अनेक मार्ग, माहिती पुरवतो. त्या महितीचा पाठपुरावा मात्र अभ्यासकाला करावा लागतो. माहिती आणि ज्ञानाचा पाठपुरावा व्यक्तीलाच करावा लागतो.

गणांचा ईश, गणांसोबत राहणारा गणपती, '#संगणक_गणेश".
अश्या या आजच्या काळातील गणेश रुपी ज्ञान रुपी  निर्गुण तत्वाची सगुण रुपी संगणकाद्वारे आराधना प्रत्येक जण रोज करत असतो.

-Abhijeet Panse

1 सप्टेंबर, 2007
लोकसत्ता.

(sweet .. innocent memories.)

एक सूर चराचर छायो

एक सुर चराचर छायो
सुर निरागस हो

  ''इक सुर चराचर छायो..सुनने वाला कोई न था...''
पंडित अभिषेकींचं हे गाणं  तीन वर्षापुर्वी एका जवळच्या व्यक्तीने चेन्नईवरून उशीरा रात्री फोनवर ऐकवलं आणि ते मन..बुद्धी..विचार;लौकीक अलैकीक..या द्वंद्वात्मक आवरणाला  भेदुन मनाला..आत्म्याला जे भिडलं ते नेहमीसाठीच...

''निर्गुण तत्वावरील'' ह्या गाण्यातील शेवटी ''सुनने वाला कोई ना था जब अलख निरंजन गायो..''हे ऐकताना अगदी ह्रदयातुन ''वाह~ह..'' निघतं.तिसऱ्याच जगात पोहचतो..बस डोळे मिटुन शांत राहावं वाटतं..

त्यानंतर पं.अभिषेकिंच्या आवाजातील मुळ शास्त्रीय गाणं मिळवलं.त्यानंतर आजवर अगणितवेळा ते गाणं मी ऐकलय..दरवेळी अंगावर रोमांच..डोळ्यात.....

या गाण्या संबंधी माझी एक ''शेवटची इच्छा'' आहे जी मी माझ्या जवळच्या व्यक्तिंना नेहमी सांगतो.

पण जेव्हा पहिल्यांदा ''कट्यार काळजात..'' पाहिला; तेव्हाही शेवटी'' अरूण किरणी...सूर निरागस हो..''ह्या वेळी रोमांच दाटुन ओक्साबोक्सी रडलो होतो..आत दडलेलं सारं बांध फुटल्यागत....

तीन वेळा थिएटरमध्ये जाउन पाहिला होता दरवेळी तीच अवस्था झाली..रोज रात्री ते गाणं ऐकुन झोपायचो..
याच भाबड्या इच्छेने..आशेनेे कदाचीत हळहळु का होइना कधीतरी माझेही सूर निरागस होतील..

सूर हेच माझं..प्रत्येकाचं..विश्वाचं मूळ रूप..PURE..PIOUS.. UNADULATERATED..मग का बिघडले असतील सुर माझे...

का बिघडतात सुर?

..पण सुरांची इनबिल्ट निरागसता खरच हरवु शकते का?

स्वर..म्हणजे मुळ रूप..ते तर षड् रिपुंपासुन अस्पर्शीत..

सूर..स्वर हे तर 'आकाश' तत्वाचं परिणित होय असं पदार्थ विज्ञान सांगतं.

दर्शन शास्त्र सांगतं विश्व निर्मितीचं रहस्य!
अव्यक्तातुन व्यक्त होण्याचं प्रकिया.

पंच तन्मात्रांपासुन पंच महाभुते निर्माण होउन संपुर्ण विश्व उत्पन्न होतं.

फक्त एकच तन्मात्रा असलेलं आकाश तत्व..अग्नी दोन तन्मात्रा..शेवटी पंच तन्मात्रायुक्त ''materialstic'' पृथ्वी तत्व..wordly desires निर्माण करणारं..लवकर स्पाॅइल होणारं..करणारं..

पण यात ईश्वरी निर्गुण तत्व आकाशाच..जे सर्वव्याप्त..तेच आत्मरूप..तेच ''सूर..''स्वर'' तोच ॐकार...

तो कसा बिघडेल?

''कट्यार....'' मध्ये झरीना महादेवला गायला सांगते तेव्हा नकार देत 'महादेव' म्हणतो ''स्वर सुद्धा शब्द आहेत.''

नाही स्वर म्हणजेच शब्द नाही!!!

स्वर तर 'परा' वाणीतुन प्रसवतो..

आणि शब्द तर ''वैखरी'' बोलते.

हाॅँ! स्वर शब्दाचं मुळ रूप..अव्यक्त..Inactivated state of word; perhaps the world too.

हे सुर जेव्हा मनाला स्पर्श करून वैखरीद्वारे बाहेर पडतात
तेव्हा शब्द बनतात.

हम्म्म...''मन'.

ते तर फार 'रिसेप्टिव्ह' असतं. स्पंजसारखं.
हेच ते मन सुरांची निरागसता संपवणारं..सुरांना बिघडवणारं..

युरेका!! युरेका!!!
उत्तर मिळालं!

या मनाच्या 'चेक नाक्याला' दुरस्त केला..काॅन्शिअस चा सिसिटीव्ही कॅमेरा तिथे बसवला..सद्विवेकबुद्धीचा सुपरवायझर तिथे नेमला तर मन सुधारेल आणि 'सुर'ही निरागस होतीलच!

कारण मन तर रिसेप्टिव्ह आहे!स्पंजसारखं..पाण्यासारखं.
त्याला जे नकारात्मक..सकारात्मक भाव..विचार..शब्दांचा संपर्क घडवु ते तो शोषतो...त्या रंगात रंगतं.

माझी शेवटची इच्छा हीच की 'औदुंबर'ला सुर्योदयावेळी घाटावर पायरीवर बसुन शांतपणे वाहत्या कृष्णा माईचा मंद स्वर कानी पडत राहावा..वर मंदीरात दत्तपादुकांची नुकतीच पुजा आरती आटोपली असावी..कापुर,धूप,ओल्या चंदनाच्या मंद सुगंधाची झुळुक येत असावी..''सुर निरागस हो..''
'कोणीतरी' गावं.अधुन मधुन वर मंदीरातुन सौम्य घंटानादाचं पार्श्वसंगीत कानी पडावं..आणि त्या क्षणाला (तरी) माझे सुर निरागस होउन शरीरातील सुररूपी 'चैतन्याने'' शरीराचा त्याग करावा..

किंवा

नर्मदा किनारी सुर्योदय  होत असावा..मी पद्मासनात ध्यान करत असावा..किमान त्या दिवशी तरी खोल ''ध्यान लागावं''..पलिकडच्या तिरावरीलएका खेड्यातील छोट्याश्या मंदीरात वाजणाऱ्या ढोलाचे स्वर दुरून कानावर पडत राहावे.. अभिषेकींचं ''इक सुर चराचर छायो..'' 'तिने' पुन्हा एकदा गावं..पुर्ण खोल श्वास घेउन मी दिर्घ शांत  #ओंकार म्हणावा आणि शेवटचा ' म् ' संपताच या देहाने शेवटचा श्वास घ्यावा..

सुर निरागस हो...........''

-अभिजित पानसे

Monday, 18 December 2017

मला कावळा शिवला

19-9-2017
सर्व पित्री अमावस्या


* मला कावळा शिवला *

 एरवी "ब्लॅक इज इन " म्हणत काळा रंग आवडता म्हणणारे, "ब्लॅक इज ए स्टेटमेंट" सांगणारे काळ्या कावळ्याला मात्र  झिडकारतात.
साधा भोळा(?) अहंकार नसलेला ,सर्व साधारण मध्यम वर्गीय घरातील सदस्याप्रमाणे आठवड्यातील दोन दिवस मांसाहार करतो , मिळेल ते खातो, कधी शिजवलेले अन्न कधी फक्त कच्चे धान्य , कच्चे मांस ग्रहण करतो. जेवणाचे अजिबात चोचले नाहीत.

 हो तो कधी भिंतीच्या काळ्या कपारीत , कोणाच्या जखमांवर चोचा मारतो.पण ती त्याची मूळ वृत्तीच म्हणा! माणसांमधील काक जमात काय कमी टोचा मारतात!

अश्या या कावळ्यासाठी आज माझे मन भरून आले आहे.
रेसिस्ट हिंदी चित्रपट सृष्टीनेही कावळ्यांना नेहमी दुय्यम वागणूक दिली.
गोऱ्या रंगाच्या कबुतरांना "कबुतर जा जा .." म्हणवत भाग्यश्री पटवर्धन सारख्या 'हिमालयीन' दगड अभिनेत्रीकडून टॉपलेस सल्लूला प्रेम पत्र पाठवुन शुभ्र कबुतराची संदेशवाहक म्हणून इमेज तयार केली.

 कावळा हा नैसर्गिक संदेशवाहक असताना फक्त रंगाच्या भेदभावामुळे त्याला डावलण्यात आले. ही माझी कडक तक्रार आहे.
काय हरकत होती "कौवे जा जा जा कौवे जा..पहिले प्यार की पहिली चिट्ठी .."

मिथुन चक्रवर्तीच्या चित्रपटात ही '' चढ गया उपर रे अटरिया पे लोटन कबुतर रे"  ऐवजी "चढ गया उपर रे अटरीया पे..कौवा रे!" असं का नाही!
रेसिस्ट समाज कुठला ! म्हणून इथे फेअर अँड लवली किलोने विकल्या जाते.

अन्यायग्रस्त कावळा मग या पंधरा दिवसात म्हणून तुम्हाला एटीट्युड दाखवतो.
हर कौवे के दिन आते है!

असो समाजाने दूर केलेल्या या कावळ्याला ज्ञानेश्वर माऊलीने मात्र त्याला प्रेमाने 'काऊ' म्हटले आहे. तुझ्या पायात सोन्याचे वाळे घालीन म्हटले.
 "..उड उड रे काऊ तुझे सोनेनी मढविन पाउ"

कावळ्यांना अतींद्रिय दृष्टी असते, ते पितरांना संदेश पोचवतात हा फक्त भारतातच समज आहे हा गैरसमज होय. गूढ सौंदर्य,लूक असलेली क्रिस्टिना स्टूवर्ट (twilight फेम) कुमार वयातील एक गूढ ,भयपट ,आत्म्यासंबंधित चित्रपट आहे .त्या सिनेम्यात तिला सतत कावळे दिसत असतात. अचानक घरात कावळे येत असतात. त्या चित्रपटाचं नाव 'मेसेंजर्स' आहे. त्या चित्रपटात कावळे आत्म्यांचे संदेश पोहचवतात, त्यांना अतींद्रिय दृष्टी असते हे दाखवले आहे.

अश्या या समाजाने डावललेल्या काक पक्ष्याचा माझा काही वर्षांपूर्वी जवळून संबंध आला होता. अगदी पहिल्या वर्गापासून कावळे चिमण्यांना तांदूळ टाकत असल्याने या डोमेस्टिक पक्ष्यांबद्दल इतर कोणत्याही पक्ष्यापेक्षा जास्त भावनिक जवळीक आहे.

एकदा अंगणातील कदाचित आंब्याच्या झाडावरील घरट्यात गर्भिणी कावळी ची बाळंतपण झाले. बाळ बाळंतीण सुखरूप होते. ओली बाळंतीण ताबडतोब अन्न शोधार्थ निघून गेली. काही दिवस झाले असावेत. नंतर काय झाले माहिती नाही. काही दिवसांनी एके दिवशी  एक पंख तुटलेलं एक कावळ्याचे पिल्लू अंगणात दिसू लागले. त्याला भरवायला त्याचे पालक यायचे. त्या पिल्लाला उडता येत नव्हते. मी रोज मूठभर तिन्ही वेळ तांदूळ त्यांना टाकायचो.

काही दिवसात ते पिल्लू थोडं मोठं झालं. माझी खोली घरात नसून लागूनच बाहेर स्वतंत्र होती. त्या पिल्लाला उडता येत नव्हते. पण तुरुतुरु चालत असे. काही दिवस  अंगणात  राहिल्याने कावळ्याची भीती चेपली असावी. त्यांनतर ते सरळ माझ्या खोलीत यायचे , पाऊस असताना , दुपारी पलंगाखाली येऊन बसायचे. संपूर्ण खोलीत तुरुतुरु फिरायचं. खोलीत फिरून झालं की स्वतःहून बाहेर जायचं. तर कधी हकलावं लागायचं. (Anurag Trivedi आठवतं का?)

सगळ्यांनी त्याला प्रथम विरोध केला. पण त्याची ती एक पंख नसलेली अवस्था बघता आणि माझी खोलीत शिरायला काहीच हरकत नसल्यामुळे मी त्याला बिनदिक्कतपणे आत येऊ द्यायचो.
काहीवेळा खुर्चीत बसून टेबलावर काही वाचत असताना, लक्ष नसताना पायाखालून ते जायचं तर त्याचा स्पर्श पायाला व्हायचा तेव्हा दचकायचो. अंगावर शहारे येऊन 'eeeee' वालं फीलिंग यायचं.
त्या दिवशी पहिल्यांदाच मला कावळा शिवला होता.

पण नंतर काही वेळा असाच त्याचा स्पर्श झाल्याने ते eee च्या भावना जरा कमी झाल्यात. आणि नियमितपणे मला  कावळा शिवायला लागला.

त्या कावळ्याला भेटायला अनेक कावळे येत. त्याला आंब्याच्या झाडावरून , गच्चीच्या , कंपाउंड भिंतीवरून बसून ते कावळे खाली अंगणातील  त्याच्याकडे लक्ष ठेवीत. सुरवातीला त्याचे पालक रोज त्याला खाऊ घालीत. पण नंतर त्यांना त्या पिल्लाचा घरातील वावर,रोजचे टाकले जाणारे  तांदूळ  बघून त्यांनाही ते माणसाळलेले बघून सुरक्षित आहे जाणवल्यावर त्यांचं रोजचं येणं कमी झालं.

इकडे त्याचा माझ्या खोलीत वावर अगदी सराईतपणे होऊ लागला. आम्ही दोघेही खोली शेअर करत होतो. संध्याकाळी फक्त ते स्वतःहून बाहेर निघून जायचं. किंवा हाकलायला लागायचं. कारण रात्री झोपेत आपल्या खोलीत एक कावळा सुद्धा आहे ही कल्पना पचवू शकत नव्हतो.सकाळी उठल्यावर पुन्हा काव काव करताना अंगणात दिसायचं .मी त्याला मूठभर तांदूळाची न्याहारी द्यायचो.

दोन महिन्यात तो पूर्ण वाढ झालेला एक कावळा झाला. त्याचं तुरुतुरु चालणं खोलीत येणं, संपूर्ण अंगणात फिरणं छान सुरू असायचं.
पण काही दिवसांनी तो म्लान वाटू लागला.तांदूळ, पोळीचा तुकडा खाईनासा झाला. शेवटी काहीही झालं तरी त्याला त्याचं नैसर्गिक कर्म करता येत नव्हतं. ज्यासाठी त्याचा जन्म झाला होता. त्याला उडता येत नव्हतं.
एक दिवस त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.
रोजचा दिसणारा , वावरणारा एक सदस्य नाहिसा झाला होता.
आजोबांनी त्या कावळ्याला दूर बाहेर नेऊन पुरून टाकले.

अश्या प्रकारे मला कावळा शिवण्याचा पिरेड सम्पला.

- अभिजित पानसे