Showing posts with label श्रीनगरमधील नौहट्टा भागातील पुरातन जामिया मशीद रोमांचकारी प्रवास वर्णन. Show all posts
Showing posts with label श्रीनगरमधील नौहट्टा भागातील पुरातन जामिया मशीद रोमांचकारी प्रवास वर्णन. Show all posts

Thursday, 28 December 2017

श्रीनगर जामिया मशीद भाग 1

4  दिवसांपूर्वी श्रीनगर (काश्मीर) च्या #नौहट्टा भागात पोलिसांवर आतंकवादी ग्रेनेड हल्ला झाला. रोज मरे त्यास कोण रडे नुसार न्यूज चॅनल्सने खुप कव्हरेज दिलं नाही. पण नौहट्टा भाग ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्यात.

श्रीनगर म्हटलं की सर्वाना दल लेक , मुघल गार्डन्स , शंकराचार्य मंदिर आठवतं. टुरिस्टसना याच जागा बघायच्या असतात. काही जण "हजरत बाल"लाही जातात. पण नौहट्टा भागात कोणीही टुरिस्ट जात नाही. कोणतीही टुर कंपनी त्या भागात नेत नाही. ते शक्यही नाही. कारण तो अत्यंत कुप्रसिद्ध आणि धोकादायक भाग आहे.पण तिथे तेराव्या शतकातील पुरातन वास्तू कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे "जामा मशिद".

नौहट्टा , डाउन टाऊन हा श्रीनगरचा सर्वात जुना आणि गजबलेला भाग आहे. पण तो प्रचंड संवेदनशील भाग आहे .बहुतेक प्रत्येक शुक्रवारी तेथे जवानांवर दगडफेक होते.
कट्टर अलगाववाद्यांचा तो 'अड्डा' आहे.

लाल चौक हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो हे सगळयांना माहिती आहे. 015 सप्टेंबर ,मौन्टेनिअरिंग कोर्सवेळी तंबू मध्ये मुदस्सर आणि इमरान हे दोघे अनंतनाग चे मुलं होते .त्यांनी मैत्री झाल्यावर सांगितलं होतं की लाल चौकात के होतं ते प्रकटीकरण असतं जे नौहट्टा मध्ये ठरतं त्याचं."सरहद पार का संबंध नौहट्टा ,डाऊन टाऊन से होता है!"

पण या डाऊन टाऊन भागात वास्तूशिल्पाचा एक अप्रतिम नमुना असलेली जामा मशीद मला बघायची होती.
तिच्याबद्दल ,लाकडी बांधकामाबद्दल ,32 लाकडी खांबांबद्दल ,नाजूक काम जुना बजार याबद्दल बरंच वाचलं,ऐकलं होतं.

सोनमर्ग ला गिर्यारोहन बेसकॅम्प जवळच कावा ,मॅगीचं दुकान असलेल्या नियाजभाई ची सर्वांशी ओळख झाली होती. त्यालाही जामा मशिदीबद्दल विचरल्यावर त्यानेही तिची खूप स्तुती केली होती आणि श्रीनगरला गेल्यावर आवर्जून बघायला सांगितलं होतं. शिवाय तिथे जाणं सुरक्षित आहे हे सांगितलं. वॊह लोग टुरिस्ट को कुछ नही करते बोलला होता.
त्यामुळे ती मशिद बघायचीच होती.

सप्टेंबर 2015 मंगळवारी सोनमर्ग हुन श्रीनगर ला पोहोचलो .माहिनाभरानंतर निवांतपणे अंघोळ केल्यावर गजबलेलं शहर आणि लाल चौक बघितला.सगळीकडे उर्दू वर्तमानपत्रेच मिळत असल्याने इंग्लिश पेपर मिळवायला दुकान शोधत गल्ल्यांमध्ये फिरलो. सात दिवसांनी ईद असल्याने जागोजागी मोठमोठे बकरे विकायला होते.

लाल चौकात तेथे एक गोंदियाचा सैनिक होता. त्याला जामा मशिदिबद्दल विचारल्यावर त्याने तिथली परिस्थिती सांगितली.
दर शुक्रवारी मशिदीत धर्मगुरुंचे प्रवचन ,प्रार्थना आटोपली की तिथे ताबडतोब सैनिकांवर दगडफेक सुरु होतात. कधी मशिदीतून लाऊड स्पीकर वरून घोषणा दिल्या जातात. आत प्रार्थना सुरु झाली की तरुणांपासून, स्त्रिया, लहान मुले हातात काचेच्या बाटल्या, दगड, विटा घेऊन उभ्या राहतात.आणि संपल्यावर सैनिकांवर मारा सुरु होतो. हे एक ते दोन तास सुरु राहतं.
आता हे इतकं सवयीचं झालंय की दर शुक्रवारी जामा मशिदीत प्रवचन सुरु झालं की इकडे जवान ही सर्व स्वसंरक्षणासाठी तयार होतात.

एकंदर हे सगळं ऐकून दडपण वाढलं होतं. शिवाय तेव्हा नुकत्याच झालेल्या बीफ बंदीमुळे तिथलं वातावरण प्रचंड तापलं होतं. ईद चे दिवस होते त्यामुळे त्या भागात आणखी काही होइल का काहीही कल्पना नव्हती.पहिल्यांदाच काश्मीर ला गेलो होतो.

पण ती मशिद मला बघायचीच होती. दुसऱ्या दिवशी ठरवू जायचं कि नाही असा विचार करून प्रचंड थकल्यामुळे ,आणि महिना भर अंघोळ न केल्याने पुन्हा एकदा पाण्यात डुंबायला मी लाल चौकातीलच हॉटेलात परत गेलो.

-अभिजित दिलीप पानसे

नौहट्टा जामिया मशीद भाग 2

दुसऱ्या दिवशी दहा वाजता नौहट्टा भागात जाण्यापूर्वी काही खाण्यासाठी लाल चौकात गेलो. ऑटोही तिथूनच मिळणार होते.
सकाळचं वातावरण आल्हाददायक होतं.दुकाने उघडली होती. वाहनांची रहदारी सुरु होती. छोट्या भडक रंगांनी रंगवलेल्या बसेस तुडुंब भरून नौगाम रेल्वे स्टेशन कडे जात होत्या. रस्त्यावर चहा , चिकन पकोडे, कबाब विकणाऱ्या गाड्या लागल्या होत्या. रस्त्याच्या कडेला स्वेटर्स , जॅकेट्स ,शालीचे ढीग लावून चिल्लर विक्रेते उभे होते. एटीएम समोर लाईन लागली होती.श्रीनगरमध्ये "एसबीआय" चे एटीएम बघून सुखद धक्का बसला. संपूर्ण चौक, शहर गजबजलं होतं.

 या लाल चौकात " शुद्ध शाकाहारी वैष्णो ढाबा" म्हणून दोन सरदारांचं वरच्या मजल्यावर उपहार गृह आहे. ते 'गणपतीचे' दिवस होते त्यामुळे शुद्ध शाकाहारी खाण्यासाठी आदल्या दिवस प्रमाणे त्या वैष्णो ढाबा उपहार गृहात गेलो.

 दोन मूली आलू के पराठे आणि मग भर चहा संपवून लाकडी जिना उतरून खाली आलो. काश्मिरी चहा अहाहा !अगदी चविष्ट आणि भरपूर चहा देतात. वरती एक ते दीड तास होतो.
खाली आल्यावर काही क्षण जाणवलं नाही की समोरचे दुकाने बंद झाली आहे. पण लवकरच एक गोष्ट लक्षात आली की तासापूर्वी असलेली गर्दी ,रहदारी आता नाही.

 चौकात आलो तर दिसलं की सर्वच दुकाने बंद झाली आहेत.रस्त्यावरचे चिल्लर विक्रेते , खाण्याची दुकाने, गाड्या.. कोणीही, काहीही नव्हतं. सर्व रस्ते , संपूर्ण चौक रिकामा! सुनसान! केवळ ते एटीएम उघडं होतं.
एक दीड तासात हे कसं काय झालं आणि का झालं! प्रश्न पडला. अचानक ताण वाढला.

 एक रिकामा ऑटो दिसला. जवळ जाउन त्याला नौहट्टा ,जामा मशीदला चलतोस का विचारलं.तो म्हणाला आज जाऊ नका! बीफबंदीमुळे आत्ता बंद पुकारला आहे. आणि डाऊन टाऊन भागात तर कधीही दगडफेक सूरू होईल !
मी आर्मीसदृश्य कार्गो पॅण्ट घातली होती. माझ्या पॅण्टकडे बोट दाखवत म्हणला गलती से भी ये पॅण्ट पहन के मत जावो! उन लोगो का कुछ भरोसा नही वो आप पर भी हमला कर देंगे!
ते ऐकून दडपण आलं.

रस्त्यात पोलीसांची गर्दी दिसली.लोखंडी आवरणे असलेल्या ,वरच्या थोड्या उघड्या भागातून एक सैनिक हातात शस्त्र घेऊन उभा असलेला  गाड्या जमल्या होत्या.
शिरस्त्राण आणि शिल्ड ने स्व संरक्षणासाठी सुसज्ज  पोलीस जागोजागी उभे होते.

मला त्या ऑटोवाल्याने जरा अतिशयोक्ती करून सांगितलं वाटत होतं म्हणून एका पोलिसाला जामा मशिदीला जाण्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की आज बंद आहे वातवरण कधीही खूप बिघडू शकतं तेव्हा उद्या जा.आज मुळीच नको. पॅण्टबद्दल त्यानेही सूचना दिली. जेव्हा साक्षात पोलीसच हे म्हणतोय तेव्हा तिथल्या परिस्थितीची जाणीव झाली , जाण्याचं रद्द केलं. आणि परत हॉटेलला निघालो .

रस्त्यात एक पेपर विकणारा निघण्याच्या तयारीत होता त्याच्याकडे एकही इंग्लिश पेपर नव्हता सर्व उर्दू पेपरच होते. कमीत कमी फोटो बघू म्हणून चार रुपयांचा एक जास्तीत जास्त रंगीत फोटो असलेला पेपर घेतला आणि परत आलो.
पोहचेपर्यंत ताण खूप होता. रस्ते रिकामे होते. आयुष्यात पहिल्यांदा काश्मीरमधला बंद बघितला .गजबजलेलं शहर काही मिनिटात सुनसान होतं अनुभवलं!

हॉटेलमध्ये टीव्हीवरील जाहिरातींचा अनुभव मागे एका लेखात लिहिला आहेच.

दुपारी लाल चौकात "यासिन मलिक" निदर्शन करायला आला होता ,पोलिसांनी त्याला अटक केल्याचं हॉटेलला कळलं.

पोलीस आणि ऑटोवाल्याने लवकरात लवकर येथून निघण्याची सूचना आठवली आणि रात्रीच ठरवलं की शुक्रवारऐवजी दुसऱ्या दिवशीच म्हणजे गुरुवारी परत निघायचं.
 इतक्या संवेदनशील भागात ताणतणावात एक वास्तू बघायला जाण्याची काय गरज आहे विचार आला. शिवाय संचारबंदी लागुन अडकलो तर काय होईल विचार ही करवत नव्हता.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विखुरलेले कपडे सॅकमध्ये कोंबले.परत निघण्याची सर्व तयारी झाली.
 पण शेवटच्या क्षणी ठरवलं की तो भाग बघूनच येऊ!

पण एक मोठी अडचण होतीच. गिर्यारोहण कोर्सला जिन्सचं काहीच काम नसल्याने ट्रेक पॅण्टच आणले होते. जे महिनाभर माती ,चिखलाने भरल्याने  वापरण्याजोगे नव्हते.जे दोन आर्मी कलर चे कार्गो पॅण्टस् होते त्याबद्दल धोक्याची सूचना आधीच ऑटोवाल्याने आणि पोलीसाने दिलेली होती. शॉर्ट बर्म्युडा घालावा तर तिथली 'तौहीन' केली समजून माझ्याच मांड्यांवर एखाद्याने काचेची बाटली वगैरे फोडली तर !!

शेवटी सॅक पुन्हा पलंगावर उलटी करून सर्व कपडे काढून बुडाशी टाकलेली एक काळी ट्रेक पॅण्ट, जिने महिनाभर पाणी, माती ,धूळ  स्वतः मध्ये निमुटपणे शोषूनही आपला रंग काळाच ठेवला होता .म्हणून मला काळा रंग आवडतो. सर्व आळशींचा आवडता रंग .तिला परिधान करून वरती अगदी विरुद्ध रंगाचा आणि स्वच्छतेच्या बाबतीतही विरुद्ध असा स्वच्छ शुभ्र टी शर्ट घालून कॅमेरा आणि मोबाईल घेऊन बाहेर पडलो. पण डोक्यात एक विचार आला आणि दोन मिनिटासाठी पुन्हा परत आलो.

( शेवटचा भाग पुढे)

-अभिजित पानसे

श्रीनगरमधील जामिया मशीद, धक्कादायक रोमांचकारी प्रवास वर्णन

 नौहट्टा , जामिया मशीद, श्रीनगर अंतिम भाग

बाहेर काही पावलं गेल्यावर एक विचार आल्याने पुन्हा परत हॉटेल रूमवर आलो आणि सेल, कॅमेरा खोलीतच ठेवला. मशिदीच्या भागात काही आणीबाणीचा प्रसंग उदभवल्यास सेल आणि कॅमेरा ला काही होऊ नये हा उद्देश. स्वतःपेक्षा गॅजेट्सची काळजी ! मन, विचारांवर गॅजेट्सचं नियंत्रण ,बदलेली विचारसरणी ,जीवनशैलीचं ते उघड प्रमाण होतं.

लाल चौकात येऊन नौहट्टाचा ऑटो केला. रस्त्यात खेळाच्या साहित्याचं एक मोठं दुकान दिसलं.त्याच्या बाहेर शाहिद आफ्रिदीचं भलं मोठं होर्डिंग लागलं होतं.

थोड्याच वेळात ऑटोने झेलमचा पूल पार केला. छोटे छोटे घर..गल्ल्या ..'मोहल्ले' दिसू लागलेत. चित्रपटात काश्मीर दाखवताना जे लाकडी घरं दाखवतात तसे बिलकुलही प्रत्यक्षात नव्हतं. सर्वसामान्यप्रमाणे सिमेंटचे घर होते.उतरत्या टीनाच्या छपरचे घरे जास्तीत जास्त होती.प्रत्येकच छपराचा रंग गर्द हिरवा होता.खूप दाट लोकवस्ती होती. जवळपास प्रत्येकजण आबालवृद्ध काश्मिरी पेहरावावतच वावरताना दिसले. बाहेर स्त्रिया त्यामानाने फार कमी पण डोक्यावरून ठराविक पद्धतीने  ओढणी घेऊन पेहरावातच दिसत होत्या.
 रस्त्यावर जाडजूड बकरे , लोकरीने संपूर्णपणे आच्छादलेले मेंढे विकायला होते.

नौहट्टा चौकातून ऑटो गेला तेव्हा रस्त्यावर एके ठिकाणी फुटलेल्या काचेच्या बाटल्या दिसल्यात.ते बघून थोडं दडपण आलं. आदल्या दिवशी घडलेल्या गोंधळाची ती उरलेली निशाणी असेल का!
ऑटो वाल्याला त्या भागातील सुरक्षेबद्दल विचरल्यावर तो म्हणाला की काहीही काळजी ची गरज नाही .बिनदिक्कतपणे बघून या.

दरम्यान अजून दाट लोकवस्तीच्या भागातून जायला लागलो तसा थोडा ताण वाढू लागला .खूप मोठा बाजार होता. तिथेच ऑटो थांबला.त्याने थोडं चालत जायला सांगितलं. जवळच जामामशिद आहे म्हणला.

मला सोडून तो परत निघून गेला.आणि मी माझा' मोर्चा' त्या दाट बाजारातून,वस्तीतुन समोर वळवला.
 दुकानात , बाहेर उंबऱ्यावर अनेक म्हातारे , मध्यमवयीन ते तरुण मंडळी हुक्का ओढत बसले होते. मी चालताना प्रत्येकाची दृष्टी माझ्यावर होती.

डावीकडे दोन तीन दुकानात मुंडी नसलेले बाकी पूर्ण सोललेले बकरे टांगून ठेवलेले होते.तिथला इसम मात्र उघडया शरीराने हातातील कोयत्याने गुळगुळीत मोठ्या चपट्या लाकडावर मांसावर सपासप कोयता चालवत तुकडे करण्यात गुंग होता.

मोबाईल रिचार्जेसची ,मोबाइल्सची दुकानं होती. आपल्याकडे कमी प्रस्थ असलेली 'एअरसेल' सेल्युलर कंपनीची जाहीरातिचं , रिचार्जच्या दुकानाचं प्रमाण ठळकपणे जास्त होतं.
एक दोन क्रिकेटबॅट चे दुकान होते. एका दुकानाबाहेर दाढी नसलेल्या "इंझमाम उल हक"चा जुना फोटो होता.

सोनेरी दोऱ्याने ,चमकीने उर्दू अक्षरे लिहीलेल्या हिरव्या चादरी , वेगवेगळे खडे, माळा विकणारे दुकानं होती,मोरपिसाचे झाडू टांगले होते.
छोट्या छोट्या गल्लीत अनेक घरं होती. एका बोळीत छोटी मुले क्रिकेट खेळत होती.

 रस्त्यात पुन्हा एके ठिकाणी कडेला दगडं विटा,फुटलेले काच दिसलेत आणि आदल्या दिवशी घडलेला काय गोंधळ झाला असेल याची पुसटशी कल्पना आली. पुन्हा काही सेकंदासाठी हृदयाचे ठोके वाढलेत.
संपूर्ण भागात एकाही ठिकाणी हिंदी अक्षरात काहीही लिहिलेलं दिसलं नाही. सगळीकडे फक्त उर्दू पाट्या ,भिंतीवर उर्दू , दुकानाचे नावही त्याच भाषेत. क्वचितच कुठे इंग्लिश शब्द दिसलेत.

तेवढ्यात समोर मशिद दिसली. आत प्रवेश केला आणि धक्काच बसला! त्या अत्यंत गजबजलेल्या भागात इतकी सुंदर विशाल वास्तू असू शकते कोणि विचारही करू शकणार नाही! उतरत्या छपर, वरून निमुळत्या आकाराची ती वास्तु होती. युरोप मधील एखाद्या विद्यापीठाची वास्तू आणि परिसर शोभावा असं ते स्थापत्य होतं. समोर एक मोठं कारंज होतं. संपूर्ण परिसर योग्य निगा राखलेल्या गवताने हिरवागार होता. तो मोठा परिसर चालत जाऊन आत मशिदीत शिरलो.

 आतमध्ये  'ऊद'चा सुंगध दरवळत होता. उग्र ऊद असो वा सौम्य राळ , मला लहानपणापासून शेणाच्या गौरीवर उद, राळ टाकल्यावर दरवळणारा हा सुगंध प्रचंड आवडतो. गावात लहानपणी मित्रांसोबत तलावाजवळील टेकडीवरील दर्ग्यावर जायचो तिथे ऊद जळत असायचा .तेव्हापासून हा ऊदाचा गंध मनात बसलाय. खाली तलावा शेजारील शिवमंदिरात राळेचा सुवास दरवळायचा. घरातही देवी नवरात्रात राळ, ऊद जळतेच. त्यामुळे हा सुगंध अगदी मनात भरलेला आहे. तिथेही तोच सुगन्ध होता.

खाली हिरवे मुलायम गालिचे अंथरले होते. आत काहीजण साठ सत्तरीतले काश्मिरी जॅकेट घातलेले म्हातारे स्कल कॅप, घालून बसले होते. दोघांच्याही बोटात टपोरा फिरोजा होता. एक क्रीम रंगाची पठाणी घातलेला तरुण मुलगा हातातील शुभ्र मुलायम पिसांच्या झाडुने धूळ झटकल्यासारखा आतल्या वस्तू, खांबांवर झाडू मारत होता.

आतील लाकडी स्थापत्य अप्रतिम होतं. कलाकुसर सुंदर होती. सोनामर्गच्या कावा विकणाऱ्या नियाजने जामा मशिदीत बत्तीस खांब आहेत सांगितलं होतं. उभ्यानेच मी ते लाकडी नक्षीदार खांब मोजण्याचा दोनदा प्रयत्न केला पण दोन्हीवेळा काही खांब मोजताना सुटायचे नाहीतर तेच ते अधिकवेळा मोजले जायचे.

आतील लोक माझ्याकडे मधूनच एकटक बघताहेत मला जाणवत होतं. तिथे वावरताना मनावर दडपण होतेच. पण समोर एक दृश्य दिसले आणि मनावरील ताण पूर्णपणे गेला. एक सोनेरी चश्मा लावलेली मध्यमवयीन विदेशी स्त्री बाहेर मनापासून संपुर्ण वास्तूचे अवलोकन करत होती.ते बघून विचार आला ही विदेशी स्त्री जर बिनदिक्कतपणे या भागात येऊ शकते तर मला 'माझ्या' देशात फिरायला कसली भीती!

संपूर्ण परिसर बघून बाहेर आलो.नौहट्टा चौकात ऑटो करून हॉटेलला घाईत परत आलो. मळखाऊ काळ्या ट्रेक पॅण्टला पुन्हा सॅकमध्ये कोंबून आर्मी रंगाची स्वच्छ कार्गो घातली आणि श्रीनगर सोडण्यासाठी बाहेर पडलो.

श्रीनगर ते जम्मू बसेस होत्या ,पण तिथल्या लोकांनी #बनिहालपर्यंत जाणाऱ्या एक ट्रॅकच्या रेल्वेबद्दल सांगितल्यावर रेल्वेने जायचं  ठरवलंच.कारण जास्तीत जास्त लोकल वाहनांमधूनच जायचं होतं.त्याचं थ्रिल वेगळं असतं. बहुतेक लोकांना श्रीगनर खोऱ्यात रेल्वे आहे हे माहिती नाही.
नौगाम रेल्वे स्टेशन ला भडक रंगीत छोट्या लोकल बसमधून गेलो. तिथे एक पुरातन पडकी वास्तू होती .
एक तासाने रेल्वे आली .ही रेल्वे आपल्या रेल्वेतून वेगळी आहे.
दुपारी 4 वाजता भारतातील तेव्हाचा सर्वात लांब बोगदा पार करून बनिहाल या काश्मीर खोऱ्याच्या उंबरठ्यावरील गावात पोहचलो.

पण खरा पहाडी हिमालयातील घाटांचा भयंकर प्रवास आता सुरु होणार होता. हिमालयाची ती बाजू ओलांडून मैदानी भागात जायचं होतं. बनिहाल स्टेशनाच्या बाहेर जम्मूसाठी सुमो, इतर वाहने होती.

दुपारी 5 च्या सुमारास सुमो सुरु झाली. त्या अरुंद घाटात गाडीचालकाच्या अत्यंत रफ आणि अतिवेगाने चालवण्यामुळे कधीही अपघात होऊन खाली चिनाब, झेलममध्ये विसर्जित होऊ या दडपणात रात्री पावणे दोनला जम्मू ला येऊन पोहचलो.
 सुर्यास्ताअंतर बाहेर अंधार झाल्यावर खिडकीतून दिसणं बंद झाल्यावर गाडीतील काश्मिरी गाण्याच्या पार्श्वभूमीसोबत संपूर्ण प्रवासात काश्मीर वास्तव्यचे क्षण आठवत होते आणि एक प्रश्न भेडसावत होता. जामा मशिदीसारखे सुंदर वास्तू "प्रार्थनास्थळ " भयाचे, द्वेषाचे स्थळ का होतात??

(समाप्त)

-अभिजीत पानसे