Showing posts with label "यह कौन चित्रकार है" (निसर्ग चित्रण). Show all posts
Showing posts with label "यह कौन चित्रकार है" (निसर्ग चित्रण). Show all posts

Saturday, 11 August 2018

सिद्धपूर, मातृश्राद्ध, गुजरात, सरस्वती नदी , साईड लोवर विंडो सीट

ख्रिश्चन लोकांत मृत्यूनंतर वा नंतर पुण्यतिथीला मेणबत्ती लावली जाते. फुलांचा गुच्छ ठेवला जातो, आवडीचा पदार्थ केला जातो. तसंच हिंदू धर्मात मृत्यूनंतर श्राद्ध केलं जातं. दोन्ही मध्ये ‘ग्रॅटिट्यूड’ कृतज्ञता, गेलेल्या पूर्वजांची आठवण हा भाव असतो. हिंदु धर्म पुनर्जन्म मानत असल्याने श्राद्ध हा विधी मानतात.  त्यामुळे श्रध्देने लोक श्राद्ध करतात.
गया हे बिहारमधील स्थान यासाठी प्रसिद्ध आहे.

मे महिन्यातील दुसऱ्या रविवारला “मदर्स डे” हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो. आषाढ अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, हा हिंदू संस्कृतीमधील मातृदिन मानला जातो.
त्या निमित्ताने.

गया या स्थानाला ‘पितृगया’ म्हंटलं जातं.
येथे सर्वसाधारणपणे सर्व पितरांचं श्राद्ध केलं जातं. पण गुजरातमधील ‘ सिद्धपुर’ नावाचं ऐतिहासिक ठिकाण हे खास मातृ श्राद्धासाठी ओळखलं जातं. या ठिकाणाला ‘मातृगया’ म्हणतात.
हिंदू संस्कृतीमध्ये मातेला विशिष्ट वेगळं स्थान दिलंय हेही यातून कळतं.

अहमदाबादपासून तीन तासांवर, राजस्थान- उदयपूरकडे जाणाऱ्या सुंदर, चार पदरी हायवेवर हे गाव आहे. मुंबईहुन दिल्लीला रेल्वेने  जातानाही हे सिध्दपुर स्थानक लागले होते. संपूर्ण गावात मुघलकालीन अवशेष आढळतात. येथे बिंदू सरोवर नावाचं छोटा तलाव आहे. पूर्वी या गावाजवळून ‘सरस्वती’ नदीचा प्रवाह वाहायचा. काळाच्या ओघात आणि मानवी चुकांमुळे नदी नष्ट झाली.

ऋग्वेदात या सिद्धपुरचा, मातृगयेचा , तेथे मातृ उपकराप्रित्यर्थ केले जाणाऱ्या श्राद्धाचा, स्थान महात्म्य,  सरस्वती नदीचाउल्लेख आढळतो असे तेथील लोक म्हणतात.
संपूर्ण भारतात फक्त विशेषतः मातेच्या श्राद्ध करण्यासाठी हे स्थान आहे. असं म्हटल्या जातं.
कार्तिक महिन्यात येथे मातृ श्राद्धाचे महत्व असते.
कपिल मुनींनी त्यांच्या मातेस या ठिकाणी सरस्वती किनारी  #सांख्य_दर्शन सांगितले तद्नंतर त्यांच्या मातेस मोक्षप्राप्ती झाली असे मानतात. परशुरामानेही रेणुकामातेप्रित्यर्थ मातृहत्या दोषपरिहारार्थ येथे मातृश्राद्ध केले होते म्हणतात.

सिध्दपुर हे मुघलकालीन गाव. गावात मध्ययुगीन भारताची , मुघलकालीन वास्तुकला अजूनही दिसून येते. गावात अनेक  ‘हवेली’ आहेत.
Archeological Survey of India ASI यांच्या अखत्यारीत येथील दोन वास्तू येतात. एक महादेवाचे रुद्र महालया मंदिर आणि एक जामी मशीद.
दोन्ही अप्रतिम वास्तू आहेत. सुंदर लाकडी नक्षीकाम असलेले स्थापत्य जागोजागी दिसते.

गुजरातमधील ‘स्मशाने’ हा एक स्वतंत्र विषय आहे. लोक संध्याकाळी फिरायला जातात येथील स्मशानभूमीत. इतके सुंदर , बागांनी, कारंजी यांनी सुशोभित केलेलं असतात.
सिध्दपुर येथील स्मशानाचे सुद्धा प्रयाग, वाराणसी , उज्जयिनी येथील स्मशानांचे जे महत्व मानले जाते तसे आहे .
असे हे खास मातृश्राद्धासाठी महत्व असलेले एकमेव स्थान. भारतातील एक आगळेवेगळे स्थान.

अहमदाबादहुन सिध्दपुरला जाताना मेहसाणा हे प्रसिद्ध शहरही लागतं. सिध्दपुरहुन काही किमी उत्तरेकडे पालमपूर हे  गुजरात आणि राजस्थान सीमेरेषेजवळील शहर लागतं. इथून पुढे अरावली पर्वतरांगाही दिसतात. माऊंट अबू हे स्थानही जवळच.

क्या रखा है घर में मे कुछ दिन तो गुजारो नदी किनारे परबतो में!

- अभिजित पानसे



Sunday, 22 July 2018

दिवे घाट आणि तो

* दिवेघाटातील सगळ्यात कठीण दिवस , नैसर्गिकरित्या तयार झालेली #चंद्रकोर आणि #रमजानमहिना! *

वारीचा आजचा तिसरा दिवस, संपूर्ण प्रवासातील सगळयात कठीण दिवस..मोठे अंतर.. घाटाचा प्रवास..एकादशीचा उपास..
पुण्याहून निघालेली माऊलींची पालखी दुसऱ्या दिवशी सासवडला बंधूंचे दर्शन घेणार असते.

पण उपाशी पोटी घाटाची चढण कसोटी बघणारी असते..
नवखा तरुण वारकरी ताणात असतो..
शरीरानेच वृद्ध अनुभवी वारकरी नवख्या तरुणाला #माऊलींवर विश्वास टाक म्हणतो, म्हातारा लहान नातीला खांद्यावर बसवून चालू लागतो, म्हाताऱ्या डोक्यावर तुळसी वृंदावन डोक्यावर घेऊन सगळ्यात समोर गेलेल्याही असतात..

तरुण नवखा वारकरी हे बघून ओशाळतो..फक्त #स्पिरिचुअलट्रेकिंग म्हणूनच आणि सोशल मीडियावर सतत चेक इन करणारा तो फोटोज टाकण्यासाठीच आलेला असतो..भक्ती वगैरे काही नसते..

लूक योग्य साजेसा यावा मिळावा म्हणून कपाळावर उभं गंध लावतो, कानात इअरफोन्स घालून मोठया आवाज वाढवून गाणे ऐकत अधून मधून मोबाईलने फोटो काढत, शूट करत चालू  लागतो..
स्वतःचं आधुनिकत्व दाखवत , इतर वारकर्यांनमध्ये मनाने  मिसळत नाही..तोंडाने माऊलीचं नाव घ्यायला लाज वाटत असते.

सूर्य ढगात लपंडाव करत असतो..घामाच्या धारा लागलेल्या असताना अचानक आभाळातून पर्जन्य धारा बरसू लागतात..

दिवेघाटात पालखी येते..शिस्तीने रस्त्याच्या एका बाजूने वारी जाऊ लागते..रस्त्यावरची पुण्याहून निघालेली, पुण्याकडे जाणारी वाहनातील लोकही कौतुकाने भक्तीने नमस्कार करतात..

घराच्या मागील गल्लीत जाण्यासाठीही गाडी काढणाऱ्या तरुणाची घाटात छाती फुलू लागते..
म्हातारे म्हातारी नाम घोषात, आजूबाजूची सृष्टी ..वारकरी नामघोषात मग्न असतात..

तरुण वारकऱ्याच्या तोंडीही नकळत नाम येऊ लागतं.
कानातील एअर प्लग्स काढून ठेवतो..
आजूबाजुला सृष्टी हिरवीगार झालेली असते..मोबाईलने अधून मधून वारीचेफोटो काढत , सुरकुत्यांचं जाळं पसरलेल्या एखादया जख्ख म्हाताऱ्या वारकऱ्या सोबत   सेल्फी काढत सोशल मीडियावर टाकत राहतो..
घाटात एकाठिकाणी सहज वरती जाऊन अंमळ  विश्रांती घ्यायला आणि "बेटर व्यू" साठी नुकत्याच घेतलेल्या डीएसएलआर ने फोटो काढायला जातो..

वरून जे दृश्य दिसतं त्यामुळे त्याच्या अंगावर शहारे येतात..वरून अंतरावरून बघतांना मानवी चंद्रकोर झालेली असते..वर #ताऱ्याप्रमाणे तळ्याचं टिम्ब ही दिसतं..मुलगा निसर्गाच्या, निर्गुण निराकार ईश्वराच्या दर्शनामुळे चाट पडतो..अष्टसात्विक भाव उचंबळून येतात..

सेल खिश्यात टाकतो आणि नाम गजरात स्वतःला हरवू  लागतो..
पांडुरंग..पांडुरंग..विठ्ठल विठ्ठल...

पालखी सासवडला पोहचते..तोवर तो वेगळा न राहता मनाने सर्व वरकाऱ्यांपैकी एक झालेला असतो.

-Abhijeet Panse

Saturday, 28 April 2018

प्राजक्ताचं फुल , ऑक्टोबर.

शास्त्रीय संगीत ऐकणे.. अनुभवणे यासाठीही कानसेन व्हावं लागतं. तो दर्जा हवा असतो. हळूहळू भिनत जातं ते संगीत मनात.. इथे इतर गाण्यांप्रमाणे श्रोत्यांचे लाड केले जात नाहीत. सहज सोपं श्रोत्यांना आवडेल ते दिलं जात नाही.

हेच समांतर चित्रपट आणि मसाला चित्रपटासंबंधी असतं. मसाला, व्यावसायिक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे लाड केले जातात. त्यांना चमच्याने भरवलं जातं.
#ऑक्टोबर हा असाच शास्त्रीय संगीतासारखा सिनेमा आहे. हळुवार शांतपणे मुरत जाणारा..

सुजित सरकारचा मूव्ही बघणे म्हणजे एक अपरिहार्य गोष्ट असते. रोजच्या धांगडधिंगा चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळं , शांत, आर्त भावनांचं चलचित्र त्याच्यात बघायला मिळतं. बहुतेकवेळा ते सकारात्मक असतं.
हा सिनेमा ही संपूर्णपणे सकारात्मक.

एक छोटीशी कादंबरी, कुठलेही भावनक्षोभ करणारी आनंदपर्यवसायी तरल कलाकृती उलगडत जावी असा शांतपणे सिनेमा अलगडत जातो.

प्रेमात ‘पडल्यावर’ मग अडचणीत ‘पडणे’ , “गर्ल मिट्स ए बॉय” आणि व्हाइस वर्सा, यावरच आजवर सर्व प्रेम कहाण्यांचा रतीब घातला गेलाय. येथे मात्र पूर्णपणे वेगळा मामला आहे.
त्यामुळे पारंपरिक प्रेमकहाणी ही नाही.

एक कोणाचीही पत्रास न ठेवणारा, काळजी न करणारा सडाफटींग फक्त तिसऱ्या व्यक्तिमार्फत, मुलीने सहज त्याच्यासंबंधीत म्हटलेलं एक वाक्य ऐकतो. त्याचाच विचार करत राहतो. आणि हळुवारपणे प्रेमात पडत राहतो. ती प्रेमाची ऊर्जा तिच्या  मनापर्यंत ही पोहचते. आणि ती ही हळूहळू प्रेमात पडते. आणि ‘शांत’ होते.

“द अलकेमिस्ट”  मध्ये एक वाक्य आहे , व्यक्ती जेव्हा कुठली गोष्ट , धातू , वस्तू शुद्ध करण्याचा प्रयत्न करत जातो त्या दरम्यान त्या वस्तुबरोबर तो सुद्धा अंतर्बाह्य शुद्ध होत जातो. मानसिक दोष नष्ट होत जातात.
येथे या मुलाबरोबर  हेच होत जातं.

समांतर सिनेमा हा ‘मास’ला सुसह्य व्हावा यासाठी विनोदाची पेरणी गरजेनुसार करावी लागते. ती शुजित सरकारने केलीय. नाहीतर हा चित्रपट ‘जड’ झाला असता. पण कुठेकुठे विनोद पेरणीत तो थोडा वाहवत गेला हे ही खरं.

वरुण धवन ही डेव्हिड धवनने बॉलिवूडला दिलेली आजवरची सर्वोत्तम भेट आहे. ( तरीही जुडवा 2 साठी त्याला माफी नाहीच.) वरुण धवनला बघणे हीच मेजवानी असते. “एक था बदलापूर’ ते ‘ऑक्टोबर’ या दोन ध्रुवावरच्या भूमिका तो सहज करू शकतो.
ऑक्टोबरमधील भूमिका त्याच्यासाठी तशी “होम पिच”च म्हणावी लागेल.

नवी अभिनेत्री ..अभिनेत्री नाही म्हणता येणार, नव्या हिरोईन ला बघणंही डोळयांना मेजवानी आहे. विशेषतः तिचे ‘अधर’.

थोडे उघडलेले अधर हे मादक दिसतात, हे मान्य. पण आता ते ‘स्टीरिओटाइप’ झालंय. येथेही सरकार वाहवत गेलेय. त्यामुळे नंतर नंतर ते बघताना विनोदी वाटू लागतं.

शुजित सरकारच्या चित्रपटाचं संगीत, गाणी हे यूएसपी असतात. ऑक्टोबरमधीलही गाणे श्रवणीय आहेत.

एस सरकार बरेचदा नवे पण रंगमंचावरील सशक्त अभिनेत्यांना चित्रपटात घेतो. ‘कास्टिंग’ हे सुद्धा  त्याच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असतं.

मद्रास कॅफेमधून त्याने प्रकाश बिल्वडी या स्वतःची वेगळी शैली असलेल्या थिएटर अभिनेत्याला संधी दिली. त्यानंतर त्यांना इतर हिंदी चित्रपटात भूमिका मिळत गेल्यात. ऑक्टोबरमध्ये “गीतांजली राव” या हिंदी रंगभूमीवरील अभिनेत्रीला त्याने चित्रपटात आईची भूमिका दिली. ही अभिनेत्री पहिला चित्रपट करतेय अशी शंकाही येणार नाही. ही आहे हिंदी रंगभूमीची ताकद. हिंदी रंगभूमी खूप समृद्ध आहे. त्याला कारण “#पृथ्वीथियटर्स” सारख्या महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. असो . तो एक स्वतंत्र विषय.

एस सरकारचा चित्रपट म्हटला की “बेंगॉली फॅक्टर” असतोच असतो. चित्रपटात कुठंतरी बंगालचं वर्णन किंवा पात्र असतंच. या सिनेमात पात्र दाक्षिणात्य आणि दिल्लीचे, कथावस्तू दिल्लीत..त्यामुळे इथे बेंगॉली फॅक्टरसाठी जागा नसताना, मुख्य अभिनेत्रीचे नाव बंगाली ठेवले. त्या नावाबद्दल दोन वाक्यही सिनेमात टाकलेत. हे मजेदार वाटलं.

सिनेमाचा शेवट आणि कथा मात्र एका मराठी चित्रपटावरून घेतलेली वाटते. त्या सिनेमाच्या निर्मात्याने तसा दावाही केला आहे म्हणतात.

रवींदर सिंगच्या “I too had a love story” या कादंबरीच्या शेवटाशी मिळता जुळता शेवट सिनेमाचा आहे.

सुजित  सरकारच्या चित्रपटात एक विशेष गोष्ट असते , चित्रपटाच्या सुरवातीला आणि बहूतेकवेळी चित्रपट संपताना अत्यन्त सुंदर वाद्य संगीत असतं. ‘पिकू’च्या सुरवातीला आणि शेवटी ‘सरोद’ होतं. यावेळी आर्त ‘व्हायोलिन’ आहे.

'पारीजातक' हे अत्यन्त सुंदर, सुगंधी, नाजूक आणि अल्पायुषी फुल. मनाचं ठाव घेणारं फुल. थंडीच्या दिवसात प्रातःकाळी प्राजक्ताच्या झाडाखाली  फुलांचा सडा पडलेला असतो . एखादं फुल झाडावर दवबिंदूने न्हाहून निघालेल्या पानावर पहुडलं असतं. सूर्यप्रकाशात ते पान, दवबिंदू चमकत असतात.  खुप सुंदर दृश्य असतं ते. या सिनेमातील हा सिनेमा मराठीत असता तर नक्कीच याचं नाव पारिजात असतं. यातील मुख्य पात्र प्राजक्ताच्या फुलाप्रमाणेच आहे.
सिनेमा ही तसाच छोटा, पण मनाचा ठाव घेणारा.

हा चित्रपट खरंतर एकट्याने बघावा. समूहासोबत जाऊन, पॉपकॉर्न खात , अधूनमधून बोलत बघण्याचा हा सिनेमा नाही. शास्त्रीय संगीताची, वा वाद्यांची, मैफिलीची नशा हळूहळू मनाची पकड घेत जाते. तो आनंद अनुभवण्यासाठी मनाची लवचिकता फार महत्वाची असते. सतत लक्ष विचलित होत गेल्यास मैफल कंटाळवाणी वाटू शकते. तेच या सिनेमाबाबतीतही लागू.

-अभिजित पानसे

Monday, 25 December 2017

नर्मदा, गंगा ..संथ वाहते कृष्णामाई

(फोटो गरुडेश्वर, सूर्योदय)


नर्मदा जयंती
फेब्रुवारी 2016

नर्मदा जयंती निमित्त, रथसप्तमी

नद्या,समुद्र,पर्वत यांच्यावर माझं पुर्वीपासुन प्रेम आहे.

धार्मिक ग्रंथात पंच महानद्यांचा उल्लेख दिसतो.

काही नद्यांसाठी माझ्या वैयक्तिक वेगवेगळ्या भावना आहेत.पण या सगळ्यात मला 'नर्मदा माता' भावनीकरित्या सर्वात जास्त जवळची वाटते.

तशी प्रत्येकासाठी सगळ्यात महत्वाची आणि लोकप्रीय 'गंगा' नदीच!तीलासुद्धा मैया,माताच म्हणतात.पण मला ही करारी,तेजस्वी '#राजमाता' प्रकारातील वाटते.म्हणजे गंगा नदीमध्ये एक प्रकारचा ROYALNESS आहे.पर्यायाने तिच्यात थोडा गर्व,शिष्टपणाही जाणवतो.She swaggers throughout her journey with royalty.

''मी तर हिमालय कन्या!''..मला तुमच्या पृथ्वीवर आणण्यासाठी 'भगिरथ प्रयत्न' करावे लागलेत,साक्षात महादेवालाही मध्ये पडावं लागलं!''असा विचार ती करत असावी.म्हणुन थोडा Attitude आहे तिच्यात असं वाटतं.

हिचीच दुसरी बहीण 'यमुना'!ही तर गर्वीष्ठच वाटते!''माझ्या काठीतर साक्षात श्रीकृष्ण बागडला..असंख्य लीला केल्यात..रास केला..!''म्हणुन यमुनेतही खुप गर्विष्ठपणा जाणवतो.
माणसांनी हिच्यात स्नान केल्यावर त्यांची पापं बिपं नष्ट करण्यासारखी 'Basic' गोष्टी करायला तिला आवडत नसाव्यात कदाचीत.म्हणुनच सलग 'सात दिवस' यमुनेत स्नान करुन तिची मनधरणी केल्यावरच ती जराशी अनिच्छेनेच त्यांची पापे वगैरे नाहिशी करत असावी.आणि थोडं फार पुण्य प्रदान करत असावी.
साक्षात यमाचीच बहीण असल्याने तशी तापटतच!अशा या दोन्ही गंगा यमुना बहिणी,हिमालय कन्या,त्यातल्या त्यात 'पुर्ववाहिन्या' असल्याने तशा तोऱ्यातच असतात.वाटतात.

गोदावरी नदी म्हणजे White collar people's,मध्यमवर्गीयांची प्रतिनिधीत्व करणारी वाटते.जणु ''गरीबाची गंगा''!
दोघींच्याही अवतरणाची कथा..दंतकथा तशी सारखीच.पण गंगा झाली Royal celebrity आणि गोदाआक्का राहिली मध्यमवर्गीय!
उगाच कोणावर जीवापाड,out of the way जाउन प्रेम करणं नाही किंवा कोणाचा टोकाचा तिरस्कार करणं नाही.आपण बरं आपलं काम बरं.
निमुटपणे ती त्र्यंबकेश्वर ते राजमुंड्री आपला मार्गक्रमण करीत असते.

जुन्या काळातील घरातील शांत,प्रेमळ,समंजस,विचारी,
आध्यात्मीक बैठक असलेली,मंद स्मित करणारी,जणु काही आयुष्याचा सार गवसलाय,ज्ञान प्राप्ती झालीये त्यामुळे कोणाकडुनही कुठलीही अपेक्षा न ठेवणारी,सतत नामस्मरणात गुंग असणारी प्रेमळ आजी म्हणजे ''कृष्णा नदी''!

कृष्णा नदी म्हणजे शांत गरीब गायच!
म्हणुन ग.दी.मांनी लिहीलं आणि सुधीर फडकेंनी गायलं असावं ''संथ वाहते कृष्णामायी..''
मला तर ही माई पेक्षा आजीच योग्य वाटतं.

हां  पावसाळ्यात तिला पुर वगैरे येतो.पण तिही दत्तप्रभुंची इच्छा असावी.त्यांनाही स्वार्थी मनुष्याच्या पुजेचा,स्पर्शाचा वीट येत असावा म्हणुन ते नृसिंह वाडीला पावसाळ्यातील एक महिना स्वत:ला कृष्णा नदीत एकांतात ध्यानस्थ होत असावे.हा मान फक्त कृष्णा नदीलाच!

मला व्यक्तिश: कृष्णा नदीवर विशेष प्रेम आहे.कारण हीचा संबंध दत्तांशी,नृसिंह सरस्वती स्वामी महाराद,श्रीपादश्रीवल्लभांशी,
पर्यायाने संपुर्ण दत्त संप्रदायाशीच येतो.
कुरवपुरला हीच कृष्णा चारी बाजुने वेढुन टाकते.याच पवित्र ठिकाणी श्रीपादश्रीवल्लभांनी वास्तव्य केले आणि अवतार समाप्ती केली.

NRI i.e.Non Residential Indians जसे असतात;जन्म भारतात,तरूण इथे होतात आणि कारकीर्द दुसऱ्या देशात.तशा या कृष्णा आणि गोदावरी"Non residential Maharashtrians'' आहेत.जन्मतात महाराष्ट्रात,तरूणही इथे होतात पण कर्तुत्व,सेवा मात्र कर्नाटकात, आंध्रात देतात.तेथील धरणी सुजलाम सुफलाम करतात.

भीमा नदी म्हणजे मला ''डाॅन ब्रॅडमन''प्रमाणे वाटते.छोटं करीअर पण Impact प्रभाव मात्र युगानुयुगे राहणारा!
भीमा नदीचंही करीअर छोटंसच आहे पण अत्यंत प्रभावशाली.
भीमाशंकरला जन्मुन रायचुरजवळ कृष्णा नदीत स्वत:ला विलीन करुन स्व अस्तीत्वाचा, 'नावाचा' अहंकार टाकुन देते.पण या छोट्या प्रवासात ती स्वत:चा ठसा उमटवुन जाते.पंढरपुरला 'चंद्रभागा' नाव धारण प्र्रत्येक वारकऱ्यांच्या ह्रदयात चिरकाल स्थानापन्न होते.पांडुरंगाची भक्ती,सेवा करते.वारकरी वैष्णवांचा भक्तीसोहळा बघते.

आळंदीला भिमेच्याच काठी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्यामुळे ही माऊलीच्या विरहात स्वत:ला लवकरच कृष्णेत समर्पित करुन टाकते.
16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थदिपीका लिहीली आणि तारूण्यातच लवकरच समाधीस्थ झालेत.पण ज्ञानेश्वरी मात्र युगानुयुगे संजीवन आहे.राहणारेय.तशीच भीमा नदीसुद्धा चंद्रभागेच्या नावाने प्रत्येकाच्या ह्रदयात नेहमीसाठी विराजमान आहे.राहील.
गाणगापुरला हीच भीमा अमरजेचा हात हाती घेउन श्रीगुरूंचे पादप्रक्षालन करायला धावत येते.

तिकडे आणखी एक हिमालयकन्या 'ब्रम्हपुत्रा',जणु जन्मल्यापासुन राग,द्वेष,'बगावत' डोक्यात घेउन आलीए!त्यामुळे तिच्या बहिणींशी गंगा यमुनेशी तिचं पटत नसावं.
आदळआपट करीत,दरवर्षी पावसाळ्यात ईशान्येकडे उत्पात माजवते.कुठलच बंधन नसलेली,मानत नसलेलीही True Rebel आहे.

नद्या या देश,काल,सिमांच्या पलिकडे असतात..पण चिनाब,झेलम..सिंधु..या   Identity Crisis मध्ये अडकलेल्या वाटतात...''आम्ही भारतीय आहोत की पाकिस्तानी..की फक्त बहता पानी?''

पण आता मात्र त्या identity crisis,उद्वेग यांच्या पलिकडे जाउन आता त्यांच्यात सतत एक विष्ण्णता..दु:ख..गुदमरणं..स्मशान शांतता जाणवते ..कित्येक वर्षांपासुन आजुबाजुला फक्त किंकाळ्या..राग द्वेष..रक्त..असंतोष अनुभवतायेत..

प्रवासात अनेक छोट्या मोठ्या नाव नसलेल्या नद्या दिसतात.त्यांना पाहुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावेळी स्टेडियममध्ये सिमारेषेअलिकडील आलेला बाॅल फेकण्यासाठी असलेली क्रिकेट खेळणारी छोट्या मुलांची आठवण येते.

त्या मुलांच्या डोळ्यातही स्वप्ने असतात की एक दिवस आपणही समोर सिमारेषेपलिकडे खेळु.. आपलंही एक दिवस नाव होइल.

तश्याच या छोट्या नद्यांचेही स्वप्न असतात की एक  दिवस  आपणही प्रमुख मोठ्या नद्या होउ..आपलंही नाव होइल..आपणही स्वत:मध्ये अनेक इतर  छोट्या नद्यांना सामाउन घेउ.

पण या सगळ्यात जवळची वाटणारी, मातृत्वाचा साक्षात्कार करुन देणारी अशी ''नर्मदा माताच''!
गरीब आदिवासींवर प्रेम करणारी..साधं low profile जीवन जगणारी..जंगल,पहाडातुन वाहणारी..गरीब,साध्या आदिवासींची नर्मदा मैय्या!
परिक्रमावासीला उपाशी न झोपु देणारी..वेळपरत्वे दर्शन देउन खडतर परिक्रमेत 'अनुभव' देणारी..संकटे हरणारी..आणि फक्त तिच्या दर्शनानेही पुण्य प्राप्त करुन देणारी माझी सर्वात आवडती नर्मदा माताच!
म्हणुनच कदाचीत शिवशंकरही तिच्या पात्रातील प्रत्येक दगडात वास करतात.कारण तेही नर्मदेसारखेच साधे low profile जगणारे,easily accessible असलेले आहेत.

म्हणुनच प्रत्येक नर्मदा परिक्रमावासी म्हणत असावे ''नर्मदे हर''..नर्मदे हर..नर्मदे हर हर....

(माघ शु.सप्तमी,नर्मदा जयंती)

(फोटो गरूडेश्वर;सुर्योदय)
-Abhijeet Panse

पर्वत पर्व

(फोटो, सोनमर्ग ग्लेशियर, -अभिजित पानसे)



चवथीत आणि सातवीतील शिष्यवृत्तीच्या परीक्षेमुळे पर्वताचा संबंध नग, अचल,गिरी अश्या समानार्थी शब्दांपुरताच आला होता.

पण गोष्टींच्या पुस्तकातुन, शंकराच्या गोष्टीतुन, किल्लयांच्या पुस्तकातुन हिमालयाची..सह्याद्रीची छापील ओळख झाली.आणि
हळुहळु पर्वत, डोंगर,टेकड्या या समकुटुंबीयांवरील;
नद्या,समुद्र यांच्यावरील प्रेम रूजलं आणि वाढतच गेलं.

शाळेच्या एका सहलीमुळे सर्वप्रथम प्रत्यक्षात याची देही याची डोळा दर्शन झालं ते ब्रह्मगिरीचं.
डिसेंबरच्या थंडीत; त्र्यंबकेश्वराच्या कोरीव दगडी शिल्प,कळसाच्या पार्श्वभागी धुक्यात अर्धा दडलेला काळ्याकभिन्न डोंगर उठुन दिसत होता.ते दृश्य नेहमीसाठी ह्रदयावर कोरल्या गेलं.

ह्याच ब्रह्मगिरी ज्ञानेश्वर,निवृत्ती मुक्ताई, सोपान ही बालके माता पितासोबत प्रदक्षिणा घालताना;
जंगलातील एका वाघामुळे; ''ये मी तुझीच वाट पाहात होतो'' म्हणत स्वागत करणाऱ्या गहिनीनाथांसोबत बालक निवृत्तीची पहिली भेट डोंगराच्या एका गुहेत झाली होती.

याच ब्रह्मगिरीच्या गुहेत गहिनीनाथांकडुन नाथ संप्रदायाची दिक्षा घेउन काही वर्षांनी बाहेर आल्यावर बालक निवृत्तीचे निवृत्तीनाथ झाले होते.

पुढे ज्ञानेश्वर माउलींनी बंधु निवृत्तीनाथांनाच गुरू केल्यावर ज्ञानेश्वरी रचुन भक्ती संप्रदाय जनमानसात रूजवला.

ह्या सगळ्या घटनांना ब्रह्मगिरी कारणीभुत..साक्षी होता.

क्षणात हे सगळं तेव्हा आठवलं.

महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ले प्रेमी..गिरी प्रेमींच्या आयुष्यातील अविभाज्य भाग म्हणजे रांगडा सह्याद्री!!

नगाधीराज हिमालय आपल्या महाराष्ट्रापासुन अंतराने फार दुर पण त्याची विशालता,अतिभव्यता मोहिनी घालते.

हिमालय आणि आपला सह्याद्रीमध्ये एक साम्य आहे.
दोन्ही ठिकाणी ''शिव'' नांदलाय..नांदतो.

हिमालयात शिव शंकर तर संपुर्ण सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात..जंगलात शिव छत्रपती बागडलाय..खेळलाय..लढलाय

दोन्ही पर्वतांवरील दगड,माती ही 'शिवमय' आहे.

 पावसाळ्यात हा पर्वत,डोंगर जलाभिषेक होत असलेला,गंगा धारण केलेला शंकर वाटतो.

हिवाळ्यात धुक्याची शुभ्र शाल पांघरलेला ध्यानस्थ वृद्ध संन्यासी वाटतो.

उन्हाळ्यात उघडा बोडका सूर्य त्राटक करणारा कडवा योगी वाटतो.

मी नेहमी म्हणतो every young person must do some escapades to remember those in later mediocre part of life.
तारूण्यातील रग ही जिरवलीच पाहिजे.

पण ती उर्ध्व/अधोगामी उर्जा योग्य मार्गाने प्रवाहीत झाली नाही तर नियम धुडकावणं.. गाड्या जोराने हाकणं..मुलींची छेड काढणं..बलात्कार अशी अधोगामी कृत्ये होतात.

तारूण्याची खऱ्या अर्थाने रग जिरते ती व्यायाम..पर्वतारोहण..पर्वतावरील गड किल्ले सर केल्याने.

हिमालयातील शिखरं हाडाच्या कडव्या गिर्यारोहकाला सतत साद घालत असतात.

येथे डोळ्यांवर सन ग्लासेस हे '#कूल' दिसण्यासाठी नाही तर ती गरज म्हणुन घालावे लागतात.येथे चेहऱ्याची त्वचा रापते..केसाच्या झिंज्या होतात..शरीर धुळीनं माखतं..प्रत्येक स्नायु दुखायला लागतात..श्वास घेताना फुफ्फुसं गळ्यापर्यंत येतात.

पण तरीही पर्वतप्रेमी चालत राहतो.आणि जेव्हा शिखर गाठतो तेव्हाचा आनंद..मानसीक शांती अवर्णणीय असते.ती फक्त अनुभवताच येउ शकते.
खालचं सारं खुजं दिसतं.

हेच पर्वत कधी अंर्तमुख करतात.कधी आयुष्याला नवी दिशा देतात.कधी प्रश्न पाडतात..तर कधी अनेक न सोडवता आलेल्या प्रश्नांची उत्तरेही देतात.

पर्वत एकांत..शांतता..तसेच समुहाची team spirit ही जगायला शिकवतात.

पर्वतावरील सुर्योदय,सुर्यास्त जुन्या आठवणी जागवतात; नव्या आठवणी देतात.

आपल्या देशात नदी, पर्वत,समुद्र यांच्यापासुन मिळणाऱ्या भौगोलीक,जैविक फायद्यामुळे कृतज्ञेने त्यांना पुजनीय मानतात.

म्हणुन श्रीकृष्णानेही करंगळीवर गोवर्धन धारण करीत गोकुळाचं रक्षण केलं होतं.इंद्राची पुजा सोडुन पर्वताची पुजा करायला सांगितलं.

सह्याद्रीचं सौंदर्य..हिमालयाची भव्यता..गिरनारची गूढता..कैलासची दिव्यता..आयुष्यात एकदातरी अनुभवावीच.

पर्वतांचं व्यसन एकदा जडलं की..नाही '#व्यसन' हा योग्य शब्द नाही वाटत!तो एक नकारात्मक उर्जा प्रसवणारा शब्द वाटतो.

'Passion' is the word for it.

एकदा पर्वत हे pasion झालं की चुकीची व्यसनं दुर होतात..
पेन्शन घेणारी व्यक्तीही च्यवन ऋषी होतात.

तीन दिवसापुर्वी world mountain day झाला.पण पर्वत,नद्या,समुद्र यांवर बोलायला,लिहायला, वाचायला कुठलाही दिवस छानच!

स्वत: स्थिर असलेले हे पर्वत मात्र त्यांचे स्वत:चे वा जीवनाचे  शिखर प्राप्त करेपर्यंत आपल्याला जणु सतत सांगत राहतात
चरैवती.. चरैवती..चरवैति..
चालत राहा..चालत राहा.......

-अभिजित दिलीप पानसे

चिमणी दिसेल का!

चिऊचं घर मेणाचं..काऊचं घर शेणाचं..काऊ चं घर वाहून गेलं..चिऊ चं घर टिकलं..

तेव्हा पावसात वादळात वाचलेलंचिऊचं घर आज मात्र नामशेष ..नष्ट होऊ पाहतेय.

उद्या बाळाला भरवताना आई "एक घास चिऊचा .." म्हणायचा ऐवजी म्हणेल " एक घास कबुतराचा..!

"चिऊ चिऊताई दाणा खा पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा!"

चिऊ ताई जी भुर्रर्र उडाली ..उडवून लावली ती आता काही नं परत येण्यासाठीच बहुतेक...

#Sparrowday

Saturday, 23 December 2017

जंगल जंगल बात चली है, आंतरराष्ट्रीय अरण्य दिन

ज्याने अरण्याशी मैत्री केली त्याच्याशी अरण्यातील हिरव्या पानांची वस्त्र लपेटलेली झाडं संवाद साधतात..झाडांना कवटाळून राहणाऱ्या वेलीही बोलतात. अरण्य उपाशी ठेवत नाही. माकडं ,पोपट अर्धवट खाऊन फळं खाली टाकतात.पक्षांनी उष्टावलेली फळं मधुर असतात.

चालताना अरण्य नेहमी डोक्यावर हिरवं छत्र धरतं.जंगलात चालताना दमत नाही.पण वाटलंच तर जंगलातील कुठल्याही विशाल वृक्षाखाली अंग पसरावं.आजीच्या मायेनं अरण्य मांडीवर घेउन थोपटतं. फांद्यावरून पक्षी अंगाईगीत गातात. वारा कानात रुंजी घालत राहतो.जंगलात सहज निद्रा लागते.इथे कोणी झोपेतून उठवणार नाही.निवांत झोपी जावं!

पावसाळ्यातील  हिरव्या कंच, ओलसर, श्रीमंत अरण्याशी मैत्री करावी. शिशिरातील ,ग्रीष्मातील उतारवयात स्वतःहून आपली सारी संपत्ती, जायदाद धरेला अर्पित करून विरक्त झालेल्या  मौन धारण केलेल्या " आता उरलो फक्त समाजापूरता " वैचारिक बैठक असलेल्या पारदर्शक अरण्याशीही करावी.

ज्यांना तत्वज्ञान कळलं नाही ते फार वाचाळपणा करतात. तत्वज्ञ मात्र शांत असतो. आनंदात मग्न असतो.अरण्य म्हणूनच मौनात असतं. माणसे एकत्र आली की बडबड ,भांडणं, मत्सर सुरु होतात. जंगलात मात्र एकमेकांना खेटुनही मत्सर द्वेष नाही.जो तो आपल्या मस्तीत आपल्यानुसार वाढत असतो. जंगल खऱ्या अर्थाने '
लिबरल' असतं.

पण जंगल सहजासहजी मैत्री करत नाही.नवख्याशी कडक ,फटकून वागतं. रानभुल पाडतं. या भुलीला न फसणाऱ्याला जंगल मैत्रीने आलिंगन देतं.अरण्यातील वाऱ्याची बासरी, शेहनाई ,पक्षांचा कोरस ऐकायला अरण्याशी मैत्र जुळावं लागतं.

जंगल स्वतःच एक परिपूर्ण ऊर्जेची, अन्नाची साखळी आहे.
F- Food
R- Resources
E- Energy
S- Storage
T- Trees

21 march, #WorldForestDay

Tuesday, 13 June 2017

आणि नव्या वर्षाचा सूर्योदय झाला होता.."

आणि 2017चा सुर्योदय झाला होता..*

आई-बाबांच्या विरोधाला न जुमानता मी काल थर्टीफर्स्टच्या पार्टीला मित्रांसोबत गेलो.
पण या ओल्ड जनरेशनला आमचं सेलिब्रेशन कळतच कुठे?

बाबांच्या हुकुमाप्रमाणे नाखुषीनेच रात्री लवकर घरी आलो व झोपलो.

पहाटेच्या सुमारास मला एक स्वप्न पडले...

मी घनघोर रात्री काळोखात....

नाही! कदाचीत तोही पहाटेचा काळोख असावा!!
एका अरण्यात मी एकटाच फिरत होतो.
मनात भितीचा लवलेशही नव्हता.
चंद्राच्या दुधाळ प्रकाशात मी आपल्याच मस्तीत धुंदीत रानवाटा पालथ्या घालत होतो.मनसोक्त एकटाच  हिंडत होतो.

आणि...तेवढ्यात

अचानक मागून एक खर्जातला पुरूषी आवाज आला!

''व्हेअर आर यु रोमिंग यंग मँन?''

मी दचकुन मागे वळलो.

थोड्या अंतरावरून एक  पांढुरकी आकृती माझ्या रोखानेच पुढे येत होती.

माझ्या पोटात भितीचा गोळा उठला.

ती आकृती माझ्या दृष्ट्रीपथात आली.

एक वय झालेला वृद्ध,जरीकाठी धोतर,शुभ्र कुर्ता,चेहऱ्यावर म्हातारपणीच्या सुरकुत्या पण, तरीही तेजस्वी मुखमंडल होतं.पिकलेले केस आयुष्यातील सर्व अनुभवांचे साक्षी होते.डोळ्यांमध्ये आयुष्याची आपली संपुर्ण कारकीर्द यशस्वी झाल्याचे अपूर्व समाधान झळकत होते.

मी स्वत:ला काही क्षण हरवुन बसलो.

''काय यंग मँन!!''
कुठे भटकतोय इकडे? नवीन वर्षाचे स्वागत करायचे सोडुन तू एकटा इकडे काय करतोय?''
जवळ येत त्यांनी प्रेमळपणे विचारले.

त्यांच्या प्रश्नाने मी एकदम भानावर आलो.मनातील मघाची भिती आता नाहिशी झाली होती.आणि नेहमीप्रमाणे मला पुन्हा तारूण्याच्या आणि इतर अभिमानाने घेरले.त्यामुळे मनात त्या वृद्धाबद्दल नाराजीचा भाव आला.
मनात म्हटलं मघ्येच हा म्हातारा कशाला भेटला?पण आश्चर्य वाटले.हा वृद्ध माणुस आमच्या पिढीसारखाच बोलतोय!

चल चालुया सोबत थोडा वेळ!''तो वृद्ध म्हणाला आणि मी नाराजीनेच त्यांच्यासोबत निघालोसुद्धा.

मनात म्हटलं'' शिट यार हा म्हातारा मध्येच कशाला भेटला!फार बोअर करणार!आमची पिढी तुमची पिढी, न्यु यिअर की गुढीपाडवा..यावर लेक्चर देणार!

मी मुद्दामच खोटं हसत खोचकपणे विचारलं,''काय ओल्डी! इतक्या रात्री!जंगलात!भिती वगैरे नाही वाटत?''

मघाच्याच प्रसन्न मुद्रेने ते बोलले,''अरे मित्रा रात्रीचंच जंगल बघण्यात मजा असते ना!
पहाटेच्या या गडद काळोखानंतरच सूर्योदय होतो ना! आणि आम्हा म्हाताऱ्यांना कसली भिती!
हे बोलतानाही त्यांच्या मुखावरील पुर्णत्वास जाणारं शांत स्मित कायम होतं.

मी उपहासाने पुन्हा म्हटलं,''हे ओल्डी मला वाटतं तुमच्या घरची सगळी मंडळी,नातवंडे सगळेजणं न्यु इअर सेलिब्रेशनमध्ये बिजी असतील!तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही इकडे रागारागाने किंवा दु:खाने फिरायला आलात की काय?''

ते मोकळे हसले,''अरे बेटा मी निरपेक्ष आहे.मी कधीच कुणाकडुनही दुखावलो जात नाही!
आणि तुला कोणी सांगितलं मला हे न्यु यिअरचे सेलिब्रेशन आवडत नाही! हे आय एम अे मार्डन ग्रँडपा बेटा!अँड आय डोन्ट बिलीव्ह इन जनरेशन gap!''आणि दिलखुलास हसलेत.

त्यांचं ते मोकळं स्वच्छ हास्य निष्पक्ष बोलणं ऐकुन माझी नाराजी कुठल्या कुठे पळुन गेली आणि मला माझ्याच वागणुकीची लाज वाटु लागली.

जंगलात कुठेही न थांबता आम्ही  भटकत होतो.त्या गडद शांततेत खाली पडलेल्या  झाडांच्या असंख्य वाळलेल्या पानांतुन चालताना होणारा आवाज कानाला सुखावत होता.

आमच्या गप्पा अगदी मस्त रंगल्या होत्या.

मला हे आजोबा अगदीतरूण विचारांचे वाटले.ते अगदी मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते.शब्दात अवजडता नव्हती.आम्ही अनेक विषयांवर गप्पा केल्या.
अगदी भारतीय मुलींची ऑलिंपिकस मधील चांगली कामगिरी,भारतीय क्रिकेट टीमचं यश, तर अगदी सर्जिकलस्ट्राईक ते डिमनीटायझेशन पर्यंत..शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या तर भारत पाकिस्तान संबंध..

पण त्यांच्या प्रत्येक उत्तरात,बोलण्यात मला तटस्थपणा,त्रयस्थपणा जाणवत होता.कुठलाही विचार मत ते थोपवत नव्हते.जणुकाही फक्त द्रष्ट्याच्या भुमिकेत होते.

शेवटी ते म्हणाले,''बेटा हा तर काळाचा महिमा आहे!वी आर बाउंड टु चेंज विथ द टाईम फाॅर बेटर!''

त्यांना नवीन वर्षाच्या त्यांच्या काही संकल्पांबद्दल विचारले असता म्हणाले,'' मी कधीच कोणताही संकल्प करत नसतो.फक्त त्या त्या क्षणात पूर्णपणे जगतो..राहतो.!
आणि कुणास ठाउक कदाचित पुढच्या वर्षी मी राहणार देखिल नाही!''

त्यांच्या या शेवटच्या वाक्याने माहित नाही का मला एकदम  गलबलुन आलं...असं कुठलं नातं आमच्यात निर्माण होत होतं!!

जंगलातुन फिरता फिरता आम्ही आता एका माळरानावर आलो.

''मग कसं गेलं वर्ष 2016?'' आजोबांनी विचारलं.

''खुप वाईट गेलं हो हे वर्ष! सगळीकडे अपयशी ठरलो!तसंही मला ज्योतिषांनी सांगितलच होतं की हे 2016वर्ष माझ्यासाठी वाईटच जाणार!

त्या आजोबांनी तडक उत्तर दिलं,''कुठलंही वर्ष कधीच कोणासाठीही वाईट नसतं!काळ काय कोण्या ज्योतिष्याच्या अंकांच्या आज्ञेत आहे काय?
काळावर कोणाचंही आधिपत्य नसतं!तो स्वत: त्याचा अनभिषिक्त सम्राट असतो!ज्योतिषी,अंकशास्त्री भलेही आपल्या अंकाची वजाबाकी-बेरीज,आराखडे काढुन वर्षफल सांगत असेल पण, 'कर्म तर तुमच्या हातात असतं ना!ते तुम्ही करता योग्य केलं का? करता का? ते योग्य केलं तर प्रत्येक वर्ष चांगलच जाणार!त्यामुळे वर्षाला वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे?
ते तर माझ्यासारखच निरपेक्ष असतं!''
शेवटलं वाक्य ते जरा मिश्कीलतेने हसुन म्हणाले.

पुन्हा पुढे म्हणाले ''न्यु ईअरचं सेलिब्रेशन आटोपल्यावर तुम्ही थोडं आत्मचिंतन करा!मी यावर्षी कोणत्या चुका केल्यात आणि निर्णय घ्या की,या पुन्हा होणार नाहीत!स्टाॅप ब्लेमिंग अदर्स अँन्ड बी रेडी टु टेक रिस्पाॅन्सिबिलिटीज आॅफ युअर ओन अॅक्शन्स!''

आम्हा चालतच होतो.ते आजोबा कुठेही न थांबता चालतच होते.समोर हिमाच्छदित पर्वत शिखरं चंद्राच्या प्रकाशात अस्पष्ट चमकत होती.नक्कीच  हिमालय असावा.खुप सुंदर दृश्य होतं.

 ते पुढे बोलु लागले,''मला तुमच्या पिढीवर पूर्ण विश्वास आहे!पण तुम्ही म्हणता मागचे वर्ष किती सहज निघुन गेले कळलेच नाही!
अरे कसं कळणार?
तुम्ही इतके सहज दिवस वाया घालवता!दिवसा दिवसांनीच वर्ष बनतं.दर वर्षी केलेले संकल्प सहज विसरता!पण काळ कधी थांबतो का!तुम्हाला कळतही नाही!मुठीतुन वाळु जशी अलगद निसटते, तसे दिवस जातात आणि शेवटी उरतात त्या कडु गोड आठवणी!

पण आम्हाला गेल्या वर्षाशी काही देणं घेणं नसतं उत्सुकता असते फक्त पुढील वर्षाच्या स्वागताची!
शेवटी मावळत्या सूर्याला कोण नमस्कार करतं?"

जवळुन एक अरूंद नदी खळखळाट करत वाहत होती.माझ्या डोक्यातही आता विचारांचा जबरदस्त प्रवाह वाहत होता.ते आजोबा नदीकडे बोट दाखवत म्हणाले,''आपणही या नदीसारखं वाहतं असावं!कारण जिथे पाणी साचतं तेथे शेवाळ साचतं!''

त्यांच्या प्रत्येक वाक्याने माझ्या मनात अनेक तरंग उमटत होते.प्रथमच मी एका योग्य दिशेने विचार करत होतो.

चंद्र पश्चिमेकडे कलत होता.एका छोट्या लाकडी पुलावरुन आम्ही नदी ओलांडुन पुढे गेलो होतो.कानावर खळखळाट अजुनही येत होता.बर्फाच्छदीत डोंगरंही आता  जवळ आली होती.

''मी त्या आजोबांना माझ्या दु:खाचं कारण सांगितलं.एका अत्यंत जवळच्या नातेवाईकाचा आणि काही जवळच्या नात्यांचा मृत्यु झालेल्याचं सांगितलं.

तेव्हा त्यांनी खाली गळुन पडलेल्या झाडांच्या पानांवरुन सृष्टीचा ''उत्पत्ती स्थिती आणि लय'' हा सिद्धांत समजाउन सांगितला.प्रत्येक  गोष्ट ही काळाच्या उदरात गडप होणारच! 'क्षणभंगुरत्व' एन्जाॅय करायला सांगितलं.वर्तमान क्षण हेच खरा जीवन असत सांगितलं.

पहाट आता संपत आली होती.तेजस्वी #शुक्रतारा पश्चिम क्षितीजाकडे कलला होता.

बऱ्याच वेळापासुन आम्ही एक शब्दही न बोलता चालत होतो.नदीचा खळखळाटहीआता ऐकु येत नव्हता.मी पुर्ण अंतर्मुख झालो होतो.डोक्यातील विचारांचे थैमान आता शांत होत होते.
त्या आजोबांच्या सोबतच्या प्रवासाच्या सुरवातीपासुन तर आतापर्यंत माझ्यात आमुलाग्र बदल होत होता.तारूण्याचा अवास्तवी अभिमान आणि इतर काही न्यूनगंड, पूर्वग्रह केव्हाच गळुन पडले होते.मला हे सगळं नवीन भासत होतं. त्या आजोबांबद्दल मला आता विलक्षण प्रेम वाटत होते.असं वाटत होतं हा प्रवास कधी संपुच नये.

समोर पुर्वेकडे एक विशाल दरी पसरली होती.
ते आजोबा अचानक त्या दिशेने चालु लागले.
माझी मुद्रा प्रश्नार्थक झाली.ते अगदी कड्याच्या टोकाजवळ उभे राहुन माझ्याकडे वळले व म्हणाले,
''बेटा आपला प्रवास येथपर्यंतच होता!तु आता परत जा!''

मला त्यांच्या विरहाची कल्पनाही सोसवत नव्हती आणि माझ्या भावनांचा बांध फुटला.अश्रुंचा प्रवाह पापण्यांचा अडसर झुगारत गालांवर ओघळला.

आणि मी माझ्या मनातील 'तो' प्रश्न त्यांना विचारला.

''आजोबा तुम्ही कोण आहात?''

त्यांनी मंद स्मित केलं व बोलले,''बेटा,तु अजुन मला ओळखलं नाहीस?
अरे मी आहे वर्ष 2016!आणि मला तर गेलच पाहिजे!
काही क्षणात सुर्योदय होणार आहे!नवीन वर्ष जन्माला येणार आहे!

हे सगळं अटळ असतानाही मी त्यांना ''न जाण्याबद्दल'' विनवु लागलो तेव्हा ते म्हणाले,''अरे मला विसरा..मी जातो आहे..पण मी तेव्हाही होतो आणि नंतरही राहील..!फक्त माझे  रूप आणि नाव बदलत राहतील..कारण मी तर अनादी..अनंत आहे..!
आणि बेटा,तुमच्या नवीन वर्षाच्या जल्लोषात मला आता जागा कुठे आहे? मी गेल्यावर माझी साधी आठवणही राहणार नाही.
म्हटलं ना सगळा काळाचा महिमा!

पण बेटा मला विसरा पण मी काय शिकवले ते विसरू नका..!

जा तु आता..तुम्हा सगळ्यांच्या सर्व कटु आठवणी मी घेउन जातोय!''

माझ्या डोळ्यातुन सतत अश्रु वाहत होते.मी त्यांना शेवटची एक विनंती केली त्यांना नमस्कार करू देण्याची!

त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवलं.त्यांनी माझ्या डोक्यावर वात्सल्याचा हात ठेवला.
मला आशिर्वाद मिळाला होता...प्रत्यक्ष काळाचा..!

क्षणभर सारं स्तब्ध वाटलं..

मी डोळे उघडले...
समोर कोणीच नव्हतं.
फक्त उरली होती जाणीव त्यांच्या स्पर्शाची!

मी पुन्हा गहिवरलो.
मला एकदम त्यांचे शब्द आठवले.
''आली जरी कष्ट दशा अपार
न टाकिसी धैर्य तथापि थोर
केला जरी पोत बळेच खाली
ज्वाळा तरी त्या वरती उफाळे''

 समोर दरीच्या मागे पर्वतापलिकडे केशरी लाल सूर्यबिंब उगवत होते...

माझ्या अश्रुंनी भरलेल्या डोळ्यातुन सोनेरी किरणे चमकत होती.

2017 चा सुर्योदय झाला होता....

_Abhijeet Panse