Showing posts with label मंदिरांची मांदियाळी. Show all posts
Showing posts with label मंदिरांची मांदियाळी. Show all posts

Sunday, 9 September 2018

गणेश तत्व आणि मूर्ती

एका मैत्रिणीने आणि तिच्या मुलाने मिळून ही गणपती मूर्ती केली आहे. मागच्या वर्षीच्याच विसर्जित गणपतीच्या मूर्तीच्या मातीपासूनच त्यांनी केली. ही गोष्ट मला फार आवडली.

आपला गणपती आपल्याच घरात विसर्जित. बाहेरील नैसर्गिक जलस्रोतांना खराब करण्याचा अधिकार कोणाला नाही.

लहानपणी मुलांना घरी मोठ्या आकाराच्या गणपतीच्या मुर्ती आणण्याचं फार आकर्षण असतं. पूर्वी तर फार असायचं. शाळेतील मित्रांमध्ये तो प्रेस्टिज इश्यू असायचा.

वाहत्या पाण्यातच मूर्त्यांचं विसर्जन करायला हवं वगैरे.. या कट्टरवादी गोष्टी लॉजिकली कधीच पटल्या नाहीत. अगदी पर्यावरणसंबंधित गोष्टी थोडयावेळासाठी बाजूला ठेवल्या तरीही धार्मिक ‘टेक्निकल’ गोष्टींनुसारही पटत नाही.

मूर्तीला घरात आणून गणेश चतुर्थीला स्वतःच्या हृदयावर डावा हात ठेवून आणि गणेश ‘मूर्तीच्या’ हृदयाच्या जागी उजवा हात ठेवून प्राणप्रतिष्ठा केली जाते. (पिंडी ते ब्रह्मांडी हे इथे स्पष्टपणे कळतं.)  त्यानंतरच त्या गणेश मूर्तीमध्ये 'गणेशतत्व' प्रकट होऊन ती मूर्ती गणपतीचं रूप होते. असा भाव निर्माण होतो.

त्यामुळे गणेश तत्व, प्राण शक्ती ही मूर्तीचा आकार, रंग, मूर्ती आकर्षक की कमी आकर्षक या टेक्निकल गोष्टींना Irrespective असते. मग उपासनेच्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने मूर्ती छोटी की मोठी हा प्रश्नच राहत नाही.

कट्टर लोक वाहत्या पाण्यातच गणपती मूर्तीचं विसर्जन करायचं म्हणतात. तेही पटत नाही. एकतर  धार्मिक गोष्टी, घरचा गणपती ही वैयक्तिक बाब असते, नैसर्गिक जल स्रोत खराब करण्याचा अधिकार कोणालाच नाही.

पण भारतासारख्या कमी लोकसंख्या असलेल्या, शिस्तप्रिय, सामाजिक, पर्यावरण बांधिलकी असलेल्या ‘शांत’ देशात सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पणजोबाची मानतात. ते असो.
बंद’ असो की ‘चालू’ असो सगळं तोडफोड करायलाच हात शिवशिवतात.

गणपती मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन करणे धार्मिक टेक्निकल गोष्टीनुसारही पटत नाही.

कारण दीड, पाच, दहा दिवस गणपती पूजल्यावर शेवटच्या दिवशी अक्षता टाकून “#पुनरागमनायंचं’ म्हटल्यावर मूर्तीला हलवलं की त्यातून गणेशतत्व निघून जातं. निघून गेलं हाच समज , भाव असतो. मग पुन्हा गणपतीपासून ती गणपतीची मातीची ‘मूर्ती’ उरते. आता ती मातीची मूर्ती पाण्यात कशीही विसर्जित केली तरीही तिचा अपमान वगैरे होत नाही. वा मूर्तीला वाहत्या स्रोतात किंवा मोठ्या नैसर्गिक जलस्रोतांतच विसर्जित केली पाहिजे हा मुद्दाच संपतो. धार्मिक टेक्निकल गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी लॉजिकली पटत नाही. कारण मूर्तीत प्राणतत्व, गणेशतत्व त्यावेळी नसतंच.
विसर्जन 'गणपतीचं'  करत नसतो , गणेश 'मूर्तीचं' करत असतो.

मातीचा , मातीच्या मूर्तीचा फक्त ‘आधार’ घेऊन दहा दिवसांत ते चराचरात व्याप्त गणेश तत्व, ऊर्जा त्यात प्राणप्रतिष्ठेद्वारे ‘अॅक्टिव्हेट’ होते, त्यात संचारते , पुनरागमनायंचं म्हणून अक्षता टाकल्या की ती ऊर्जा मूर्तीतून निघून जाते.

बाजारात शेकडो गणपतीच्या मुर्त्या ठेवल्या असतात, त्यावेळी त्या मूर्त्याना कोणीही नमस्कार करत नाही. कारण त्यावेळी ती फक्त ‘मूर्ती’ असते. ‘गणपती’ नसतो.

विकत घेतानाही आपण गणपतीच्या ‘मुर्ती’चा भाव विचारतो, मूर्ती विकत घेतो. ‘गणपती’  विकत घेत नाही.

सार्वजनिक गणपतीच्या मोठ्या मूर्तींनाही रस्त्यावरून मंडपात  नेताना नमस्कार करत नाही, कारण त्यांची ‘प्राणप्रतिष्ठा’ झाली नसते.

मूर्ती, माती फक्त ‘कॅरिअरचं’ काम करत असते.  मग त्या मूर्तीतून गणपती बॉसच निघून गेलेत की उरते ती फक्त माती, मातीची मूर्ती. ती कुठेही विसर्जित करता येते. पण आजच्या काळात वाढती लोकसंख्या, कमी  आणि प्रदूषीत होत चाललेले जलस्रोत बघता घरातच मूर्तीचं विसर्जन करणं सर्वोत्तम उपाय. शिवाय ती माती कुंडीत टाकल्यास त्या पार्थिव गणपतीचा घरातच एकप्रकारे सहवास आहे ही भावनाही होऊ शकते.

या मैत्रणीने तर त्याच मातीची मूर्ती केली. हाही एक सुंदर भाव निर्माण करतो. Coz at d end its only about energy n feelings.

- Abhijeet Panse

Monday, 27 August 2018

शिवलिंग की shiva's ling

*शिवलिंग*

आऊटसोर्स्ड नावाच्या एका इंडो इंग्लिश मुव्हीमध्ये, त्यातील नायक भारतात आला असताना शंकराची पिंडी मंदिरात दिसते, तो आयेशा धारकर या अभिनेत्रीला विचारतो , हे काय आहे. ती त्याला सांगते “इट्स डॅट मेल पार्ट!” त्यानंतर बरंचसं एक्स्प्लेन करते की शिवाचं मेल पार्ट म्हणजे शिवलिंग, देवीची योनी यांपासून शिवलिंग बनतं. आणि त्याची पूजा केली जाते वगैरे.

ही संपूर्ण चुकीची माहिती, दृष्टिकोन आहे.  बाहेरीलच नाही तर कित्येक भारतीय लोकांनाही हेच वाटतं शिवलिंग हे  गुप्तांग आहे आणि त्याची पूजा केली जाते.

हा संपूर्ण गैरसमज आहे. शिवलिंग म्हणजे शिवाचं लिंग नाही.

'लिंग' हा संस्कृत शब्द आहे. बरेच संस्कृत आणि मराठी/हिंदी सारखे असतात. पण त्या शब्दांचे दोन वेगळे अर्थ  असतात. एक मूळ अर्थ, एक बोलीभाषेतील.

लिंग ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ 'प्रतीक' होतो. शिवलिंग हे शिवाचे प्रतीक म्हणून पुजले जाते. चिन्ह म्हणून संबोधले जाते.

अध्यात्मिक विश्वास असा आहे  की ही सृष्टी शिव शक्तीतून उत्पन्न झाली आहे म्हणून त्याचं रूप शिवलिंग. असा मूळ 'भाव' आहे.  पण उत्पन्न होण्याचा biological  reproductionशी सोयीस्कर अर्थ जोडून शिवलिंगाला गुप्तांग म्हणून संबोधित केल्या जाऊ लागलं. हीच माहिती सगळ्यांना खरी वाटते.

शिव लिंग हे 'ज्योती'च्या आकारावरून निर्माण झालंय. कुठंतरी ऐकलं, वाचलं होतं की पूर्वी ऋषी मुनी लोक दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करून त्याद्वारे सृष्टी, जीवन रहस्य मिळवण्याचे प्रयत्न करीत. ज्योतीवर ध्यान करीत.

जे खरेही वाटतं. कारण कुठल्याही गोष्टीवर लक्ष म्हणजे काँशिअस माईंड केंद्रित केल्यास सबकाँशिअस माईंड अंतर्मन अॅक्टिव्हेट होतं. तेव्हा अनेक विविध गोष्टी  ‘क्लिक’ होतात.

पाउलो कोएल्होच्या “द अॅल्केमिस्ट”मध्ये ही वाळवंटात अॅल्केमिस्ट त्या मुलाला सांगतो, वाळूच्या एका कणावरजरी पूर्ण लक्ष केंद्रित केलंस तरी तुला अनेक  गोष्टी कळतील.

वैश्विक दृष्टी ठेऊन विचार केला तर देशी विदेशी अनेक गोष्टीत साधर्म्य आढळतं. सिक्रेट पुस्तकातील पॉईंट्स, श्रीपादवल्लभ या मूळच्या तेलुगू पुस्तकातही दिसतात.

कारण सत्य हे सत्य असतंच. एक अधिक एक बरोबर दोन , हे भारतात ही होतील , उत्तर दक्षिण ध्रुवावरही होतील.

पूर्वी लोक दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करीत ईश्वर समजून, शिव समजून. पण ज्योती सतत हलत असल्याने त्यांनी शिव म्हणून ज्योती आकाराचं पार्थिव पिंड केली. त्यावर लक्ष केंद्रित करू लागले. तिथून शंकराची पूजा शिवलिंग म्हणजे शिवाचं ‘चिन्ह’ ‘प्रतीक’ म्हणून पूजलं जाऊ लागलं.  त्याचा शिवाच्या ‘लिंगाशी’   काहीही संबंध नाही. फक्त शब्दाचे अर्थ चुकीचे घेतले जातात.

पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग म्हणताना, संबोधताना यात ‘लिंग’ हे ‘गुप्तांग’ म्हणून घेतल्या जात नाही. ते प्रतीक वा चिन्ह म्हणून समजल्या जातं. तेच शिवलिंग संबंधित आहे.

योनी म्हणजे स्त्रीचं गुप्तांग म्हणून इथे अभिप्रेत नसतं. संस्कृतमध्ये निरनिराळ्या जीवसृष्टीला योनी म्हटलं जातं. मनुष्य योनी, वानर योनी, कुक्कुट योनी……

त्यामुळे शिवलिंग पूजा म्हणजे शिवाच्या गुप्तांग समजून पूजा केली जाते हा पूर्णपणे गैरसमज आहे. जो खूप जणांचा असतो. विदेशात ही हाच अर्थ घेतला जातो. कारण भारतात बहुतेकांना तेच वाटतं.

आसाममध्ये #कामाख्या मंदिरात योनी पूजा केली जाते. ती गुप्तांगाची पूजा आहे. तो विषय वेगळा हा वेगळा.

शिवलिंग म्हणजे निर् - आकार, निर्गुण शिवतत्वाची ‘मॅटर’ रुपात 'पूजा' करायला तयार केलेला एक आकार, जो दिव्याच्या ज्योतीवरून प्रेरित आहे.

 शिवलिंग हे ज्योतिर्मय आहे.
सत्यम शिवम् सुंदरम्!

- Abhijeet Panse

Wednesday, 27 December 2017

शेगाव मंदिर संस्थान, महाराष्ट्रातील सगळ्यात शिस्तबद्ध स्वच्छ मंदिर

देशातील शिस्तबद्ध ,स्वच्छतेबाबत विलक्षण आग्रही, नियमांची अंमलबजावणी आणि मनुष्यबळ याबाबतीत सर्वोत्तम असे देवस्थान कोणते असेल तर ते शेगावचे गजानन महाराजांचं स्थान.
कुठेही पैशाकरिता वखवखलेपणा नाही. विकतच्या दर्शनाचे वेगवेगळे 'पॅकेजेस' नाहीत.सर्वांसाठी एकच रांग.
दर एक ते दोन तासांनी सेवेकरी जीवणूनाशक स्प्रे ने मंदिर आवारातील सर्व भाग पुसतात आणि जमीन सारवतात.पण या मंदिराची, संस्थेची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे येथील उत्स्फूर्त सेवेकरी.volunteers. मनुष्यबळ.
स्वतःहून इथे सेवा द्यायला गावातील , परगावातील लोक येतात त्यातही वर्ष वर्ष वेटिंग लिस्ट असते.

पण शेगावला लोक गेले की प्रमुख समाधी मंदिर, पारायण गृह आणि आनंद सागर या ठिकाणीच 90% लोक जातात.
गजानन महाराजांसंबंधित आणखी 4 जागा शेगाव ला प्रमुख मंदिराच्या जवळच आहे याची बहुतेकांना कल्पना नसते.
पोथीत किंवा गोष्टीरूपी पुस्तकात या जागेंचा उल्केख आढळतो.

१ "मोटेंचं शिव मंदिर" :- हे शंकर आणि विष्णू मंदिर आहे.याचा जीर्णोद्धार संस्थानाने केला आहे.त्यामुळे आता हे मंदिर सुंदर स्थापत्याने परिपूर्ण आहे.
या मंदिराचे महत्व म्हणजे;
पोथीत उल्लेख आढळतो की गजानन महाराजांनी घोड्याच्या पायात झोपून त्याला शान्त केला , किर्तनकाराला समज दिली ती याच मंदिरात.
आत गेल्यावरच महाराजांचा अप्रतिम मूळ फोटो ,पादुका समोर दिसतात.शेजारी गाभाऱ्यात शिवपिंडी आणि बाजूला उजवीकडे विष्णू मूर्ती.
मंदिरात मूळ मंदिराचा फोटो ही आहे.
शेगाव चे मूळ नाव 'शिवगाव ' होते ते याच ग्रामदैवत शिवमंदिरावरून पडले होते.

2 "महाराजांचे प्रकट स्थळ" :-बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात.पण  पहिल्या अध्यायात गजानन महाराजांचे सर्व प्रथम दर्शन, भेट बंकटलालास होते त्याबद्दल वाचूनही बहुतेक लोक त्या जागी जात नाहीत वा ती जागा अजूनही गावात आहे यबद्दल अनभिज्ञ असतात. मोटेंच्या शिवमंदिरापासून मूळ रस्त्यावरून समोर जात उजवीकडे वळल्यावर
सरळ गेल्यास किंवा कोणाला प्रकट स्थळाबद्दल विचारल्यास तो रस्ता दाखवू शकतो.
थोड्याच अंतरावर ते प्रकट स्थळ येतं.
एक मस्त बहरलेला भलामोठा वटवृक्ष इथे आहे.समोर प्रकट स्थळाची जागा आणि त्याबद्दल माहिती आहे.शेजारीच एक मोठा हॉल आहे ज्यात चित्ररूपी चरित्र मांडले आहे.
काही वर्षांपासून संस्थानाने या जागेचं नीट बांधकाम केलंय. आता इथेही सेवेकरी असतात.
पण तरीही आधीची जागाच जास्त नैसर्गिक वाटायची.

3 "बंकटलालचा वाडा" :- प्रकट स्थळापासून मूळ रस्त्यावर येऊन पुढे जाताना कोणाही गावकऱ्याला विचारल्यास तो ही जागा दाखवेल.
इथे मूळ वाड्याच्या जागी एक सभागृह बांधले आहे.आत महाराजांचा  फोटॊ ,पादुका आणि बंकटलालाच्या वडिलांची हातात तराजू घेतलेली प्रीतिकृती आहे. पाचेक वर्षापर्यंत लागूनच पडक्या स्थितितला जुना वाडाही होता.लाकडाचे जुने नक्षीकाम स्पष्ट दिसायचे.आता तो संपुर्ण पाडून तिथे मोकळी जागा आहे.

4 "हनुमान, शीतला माता मंदिर" :- काही अंतरावरच हे मंदिर आहे .इथेच महाराजांनी ,पाटील बंधूंनी त्यांना उसाने मारल्यावर त्यानी हाताने उस पिळून मुलांना रस पाजला होता.

इथे या चवथ्या जागी पोचल्यावर काही पावलांवरच मंदिराचा मागचा भाग येतो.हे सुद्धा संस्थानाच्या अखत्यारीत असल्याने इथेही महाराजनचा फोटो, आणि सेवेकरी असतात. जुन्या मंदिराचा मूळ फोटो,येथील इतिहासाची माहिती दिली आहे.

5 एक जुने #शिवमंदिर-प्रमुख मंदिराजवळील महाप्रसाद गृहाकडे जाताना एक जुने शिव मंदिर आहे.हेमाडपंथी नसलेले पण  मोठ्या खांबांचे पुरातन आणि वेगळा 'फील' देणारे हे मंदिर आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहिती असल्याने इथे नेहमी शांतता आणि शांती असते.हे मंदिर संस्थानाच्या अखत्यारीत नाही.त्यामुळे  येथील स्थापत्य इतर चार स्थानांप्रमाणे नसल्याने येथे मूळ 'फ्लेवर' जाणवतो.

शेगाव ला जाणाऱयांनी किमान एकदा तरी या 5 जागांना भेट दिली तरीही संपूर्ण यात्रेला वेगळा 'टच' येईल.

गजाननार्पणमस्तु👏

-अभिजीत पानसे

कोल्हापूर, कोंकण- सिंधुदुर्ग- माणगाव डोंगरावरील जंगलातील गुफा दर्शन भाग 3


ऑगस्ट 2013 प्रवासवर्णनभाग3
डोंगरावर जंगलातील त्या गुहेकडे

माझं बसमध्ये नाही नाही हो हो सुरू असताना बसमधून बाहेर गावात सार्वजनिक  गणपतीची तयारी सुरु झालेली दिसत होती.
माणगाव आल्याचं कंडक्टरने सांगितलं.मी खाली उतरलो.आजुबाजुला कुठेही घर नाही गाव नाही. फक्त सरळ मोकळा रस्ता होता.एका माणसाने सांगितलं की हा माणगाव फाटा आहे.गाव उजवीकडुन रस्त्याने ५किमी.
माझी दांडीयात्रा सुरू झाली.

आजुबाजुला धरणीने अप्रतीम हिरवीकंच शिफॉनची साडी..हिरवीपैठणी..हिरवी कांजीवरम साडी नेसलेली होती.

धरणीच पावसाळ्यातील हिरवा शालू  हा लग्नातील मुलीच्या जांभळ्या शालू प्रमाणे आउटडेटेड झालंय आता.लग्नातला मुलीचा जांभळाशालू नामक महावस्त्र) आणि मुलाचा राखाडी रंगाचा सूट हे फक्त आयुष्यभर कपाटाची शान वाढवतात.
फक्त लग्नाचा अल्बम हे जालीम शस्त्र घरी पाहुणे आले की त्यांच्यावर निघत असतं.

सरळसोट छोटा डांबरी रस्ता आणि आजुबाजुला दृष्टी जाईल तिथे हिरवा रंग सांडला होता.डोळ्यांना खुप आनंद मिळत होता.दोन दिवसांपासुनचा थकवा पळुन गेला.
लहानपणी पायात काटा खोल रूतला की तो काढताना आई हिरव्या रंगाकडे म्हणजे बाहेर अंगणात  झाडांकडे पाहायला लावायची.हिरवा रंगाकडे बघितलं की त्रास कमी होतो असं म्हणते.

पण खरंच आहे डोळ्यांना हिरवा रंग फार लाभकारी आणि आनंददायी.
आणि पांढरा रंग डोळ्यांना तितकाच  त्रासदायी अपायकारक.सतत फक्त पांढराच रंग बघत राहिल्यास डोळ्यांची शक्ती कमी होते.

 थोडं चालल्यावर आजूबाजूला काही उतरते कौलारू घरं दिसत होती .अंगणात गुलाबाची व पिवळी इतर वेगवेगळी फुलं.. ..वेल घरावर गेली होती.

मी कानात इअरप्लग्स अडकवून गाणे ऐकत चालू लागलो. मन्नाडे आणि भीमसेनजोशींचं माझं आवडत गाणं सुरु केलं "केतकी गुलाब जुही चंपक बन फूले...."

चालत चालत मंदिरापाशी येऊन पोहचलो.
प्रथम तिथे स्नान करून फ्रेश झालो.सुंदर शांत परिसर होता.येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी हिरव्यागार झाडीत राहायच्या खोल्या होत्या.एक दिवस आईबाबांसोबत गुरुचारित्र पारायणाला यावं ठरवलं.

ते टेम्ब्ये स्वामींच्या समाधीचे शतकीय वर्ष होतं.त्यामुळे कारंजा पासून गरुडेश्वर पर्यंत सगळीकडे उत्सव सुरु होते.आणि काहीही कल्पना नसताना मला इथे येता आलं.

 वासुदेवानंदसरस्वती , गोंदवलेकर महाराज हे समाजात लोकांमध्ये राहिलेत.त्यांचे चरित्र वाचताना छान वाटतं.पुस्तकातुन आधी वर्णन वाचलेल्या ठिकाणी गेल्यावर ती जागा पाहताना वेगळाच आनंद वाटतो.

 टेम्ब्ये स्वामींनी जन्मगाव नेहमीसाठी सोडण्यापुर्वी त्यांनी येथे दत्तमुर्ती स्थापित केली होती.त्यांचं जन्मस्थान आणि पुरातन कोंकणी पद्धतीच ग्रामदैवत यक्षिणी देवीचं मंदिर पाहुन आलो.त्या भागात छोटी चविष्ट केळी मिळतात ती खास घेतली .आणि आवारात फिरताना एकदम डोक्यात प्रकाश पडला की  टेंब्ये स्वामी ध्यान करायचे ती माणगाव ची जंगलातील डोंगरावरची गुहा इथेच तर आहे!

पुण्यातील एका प्रसिद्ध प्रकाशनाने
‬ टेंबे स्वामींचं संक्षिप्त चरित्र प्रकाशीत केलं होतं त्यात एक माणसाला ध्यान करताना त्या गुहेतील विलक्षण अनुभव विशद केला होता.

अश्या थ्रिलिंग जागेकडे मी साहजिकच जायचं ठरवलं.एकाला रस्ता विचारला त्याने मंदिरामागुन शेतातुन डोंगराकडे रस्ता जातो सांगितलं.

हिरव्यागार शेतातुन छोटीशी अस्पष्ट पायवाटेने मी काही फोटोज काढत निघालो.पण जसं जसं मंदीराचा भाग मागे पडत गेला आजुबाजुला किर्रर्र जंगल ..एकही माणुस दिसत नव्हता.डोंगराच्या पायथ्याशी पोहचलो.वर जायला कुठलाही स्पष्ट रस्ता नव्हताच.
मनावर थोडं दडपण आलं होतंच.या भागाची काहीही माहिती नसताना इथे आलो होतो आणि आता एका पुस्तकात पाहिलेल्या गुहेच्या शोधात जंगलात शिरत होतो.

तसं बऱ्याच वर्षांपुर्वी मी असाच माहुरच्या वन्य प्राणी असलेल्या जंगलात फिरलो होतो तेव्हा तर जीवावर पुर्णपणे  बेतलं होतं अगदी थोडक्यात वाचलो होतो.ती घटना मी भाऊ अनुरागला सोडुन आजवर कोणालाच सांगितली नाही.

ते सारं आठवत होतं.मी वर दगडातुन झाडातुन गवतातुन वर जात होतो.एकवेळ वाटल वाघ आला तर !पण मग म्हटलं ह्या!! सह्याद्रीच्या जंगलात वाघ राहिलाच कुठे !
अस्वल आलं तर!!हे तर अत्यंत भयंकर वाईट जनावर!!!ह्याच्या लेखी चुकीला काय कशालाच माफी नाही!

साप,अजगर दिसला तर!कोंकणातले साप महाविषारी हे नेहमीच वाचत ऐकत आलो होतो.दडपण वाढलं होतं.
पण तरिही ती गुहा पाहण्याची तीव्र इच्छा होतीच.

बऱ्यापैकी वर चढलो होतो.आणि पुढे जायचा रस्ताच दिसेना.रस्ता असा नव्हताच.पण तोवर एक अंदाज येत होता.आता काय करावं कळेना.मागे वळून पाहिलं  उंचावरून आजुबाजुचा सर्व जंगलाने व्यापलेला परिसर दृष्टीस पडला!पावसाळा असल्याने सगळीकडे हिरवं घनदाट जंगल होतं.

एक बाल माकडांची टोळी जवळुन निघुन.गेल्या एक तासापासुन हे पहिलंच कुठल्याही प्राण्याचं अस्तित्व होतं.
मी निराश होउन परत जायचा विचार करत होतोच तेव्हा गवताने झाकलेल्या एका दगडावर लक्ष गेलं त्यावर केशरी रंगात गुहेकडे लिहुन बाण दाखवला होता.
मी योग्य रस्त्यावर होतो तर .पुढे जाताच स्टिलचे रेलिंग दिसलं.म्हणजे इथे लोक येतात तर!दडपण गेलं.

आणखी वर गेल्यावर थोड्याच वेळात गुहा दिसली.अगदी पुस्तकात होती तशीच!प्रचंड आनंद झाला!!
युरेका युरेका!!

गुहेच्या मुखापाशी आलो.पण आत जायची एकदम हिंमत होइना..आत काहीच दिसत नव्हतं.अंधार होता.

आत कोणता प्राणी ..वा साप वगैरे असेल का!
मुळात या भागाची काहीच माहिती नसल्यामुळे काही अंदाज येत नव्हता.पण इथवर आलोय ते असंच परत जाणार नाही.
हातातील बारकी काडी आत आपटुन थोडा आवाज करून आत कोणी आहे का याचा अंदाज घेतला.
काही क्षण थांबुन हळुच आत डोकावलं आणि आत शिरलो.

आत प्रशस्त स्वच्छ गुहा होती.आश्चर्य म्हणजे आत एक चटई आणि एक केरसुणी ही होती.म्हणजे येथे लोक नियमीतपणे येतात तर!मी एकदम निश्चिन्त झालो.

वरच्या भागात दगडी पादुका होत्या.
पंधरा वीस मिनिटे तिथे बसलो.जोरजोरात उत्साहात दिगंबरा दिगंबराचा..जप केला.गुहेचे फोटोज काढलेत.आणि परत निघालो.

खाली आलो तेव्हा मंदीरात सकाळी साडेअकराची आरती सुरू होती.ती संपल्यावर मस्तपैकी धरतीवरचं अमृत गुलाबीसर सोलकढी आणि भात पोटभर महाप्रसाद खाउन तृप्त झालो.

तिथुन लोकनाथतिर्थ महाराज या महान बंगाली योगींचे चरित्र पुस्तक विकत घेतले आणि परत बसने सावंतवाडीला आलो.

सावंतवाडीहुन संध्याकाळची पुण्याची बस होती.
समोर पाटीवर आरवली गावाची पाटी दिसली.मला हे नाव कुठेतरी वाचल्यासारखं वाटलं.आणि कोंकणातल्या भुतकथा आणि तिथले काही विचित्र मंदीरांच्या कथा नेहमीच वाचल्या होत्या. त्या गावचं #ते वेगळ्याच दंतगोष्टीसाठी प्रसिद्ध असलेलं वेताळाचं मंदीर आठवलं..विचार करू लागलो; जायचं का तिथेही!!!

-अभिजित दिलीप पानसे

कुतुब मिनारवरील गणपती

*कुतुब मिनार चा विध्वंसीत गणपती*
एक धक्कादायक अनुभव( किमान माझ्यासाठीतरी)

इतर देशावर आपलं राज्य स्थापन करताना तेथील सांस्कृतिक , धार्मिक वास्तू नष्ट करत जाण्याला कोणी चुकीचं समजतात तर काही त्याला प्रक्रियेचा भाग म्हणतात.

संपूर्ण भारतात डोळसपणाने पाहिलं तर दिसेल आणि लवचिक विचारांनी अवलोकन केलं तर हे स्वीकारावच लागेल की आक्रमकांनी आणि नंतर त्याच राज्यकर्त्यांनी या अनेक जागा हिंदू धार्मिक स्थळांना नष्ट करून तिथेच  वास्तू उभारण्यात आले आहे. त्यावर आपापल्या धर्मातील काही वचन कोरले.

पण अनेक वर्षे एकच रंग असलेल्या भिंतीला दुसरा रंग फासला तरी काही काळाने आधीचा मूळ रंग कुठून तरी पृष्ठभागावर येतो.

संपूर्ण देशात असे अनेक विध्वंसित वास्तु दिसतात. ते बघताना लोक कधी तटस्थपणे , कधी हळहळत बघतात.  पण कधी जगविख्यात वास्तू बघताना , खरेतर फक्त सेल्फीज, ग्रुप फोटोज काढताना कित्येक गोष्टीकडे, मूळ रंग बाहेर आलेला याकडे साफ दुर्लक्ष होतं. आणि अनावधानाने त्या आधीच्या इतिहासाची पायमल्ली, अपमान करत जातात. तुडवत जातात.

मी 'कुतुबमिनार' बघायला भावासोबत गेलो होतो.मिनार आणि कॅम्पसचा भाग जबरदस्त सुंदर वाटला. अक्षरश: फोटोग्राफी पॅराडाईझ!
मी तर पूर्णतः हरवून गेलो ते सारं बघताना आणि त्याचं कौतुक करताना!

तिथला सुप्रसिद्ध #लोहस्तंभ बघतांना समोर लक्ष गेलं तेव्हा एक दोन यंग मुलं बुटांना लागलेली माती जवळच्या कलाकुसरच्या पुरातन शिल्पकामातुन वेगळी झालेल्या एका शिळे ला पुसत होते.
हे फक्त आपल्याकडेच होउ शकतं.ते पाहुन मित्राला म्हणालो हे बघ ते **** काय करताय!

थोडया वेळात सर्व परिसर , कुटूंब मिनारची सुंदर वास्तुकला बघत तिथे पोहोचलो.आजूबाजूचं इतकं अप्रतिम काम आहे की खालील त्याच बांधकामापासुन वेगळ्या झालेल्या 'त्या' शिळे कडे कोणाचंही सहसा लक्ष जात नव्हतं.जात नाही.लोकं त्यावर बसत होते.त्यावर उभे राहुन फोटोज काढत होते.

मला तो भाग दिसला तसा प्रचंड आश्चर्याचा सुखद आणि दुःखद धक्का बसला!
कारण स्पष्टपणे त्यावर 'गणपती' कोरलेला दिसत होता!

पण माझा 'देऊळ' मधील औदुंबरावरील ओरखड्यांमध्ये दत्त बघणारा भाबडा गावकरी होऊ नये म्हणून मी अनुरागला ला जोरात आवाज दिला कारण त्याला असल्या गोष्टीत ,सोशिअल थिंग्स, पुरातन वास्तुकला, यात काहीही रस नसल्याने आणि त्याचा आस्तिकता वगैरे शी दूरदूर संबंध नसल्याने मी त्याला बोलावलं.
 तो एका जापनिज मुलीशी बोलण्यात मग्न होता.
तो आल्यावर त्याला दाखवलं तर तोही आश्चर्यचकित होउन उद्गारला " **  हा तर गणपती आहे!इथे कसा काय?"

मग मी आजुबाजुला नीट लक्षपुर्वक बघु लागलो तर आजुबाजुला कित्येक खांबांवर हिंदु मंदिरांवर असते तसं कार्विंग्स..कलाकुसर शिल्पकला दिसु लागली.

आणखी धक्का बसला त्याच खांबावर एक कंबरेवर हात असलेलं  पांडुरंगाचं शिल्प दिसलं.
पण दक्षिणेतला विठ्ठल इथे उत्तरेकडे कसा! हा प्रश्न पडला.तेव्हा क्लीक झालं की हे विठ्ठलाचं नाही तर नरसिंहाचं आहे.मांडीवर झिज झालेला हिरण्यकश्यपु दिसतो.

कारण पुर्वी मंदीरांमध्ये 'दशावतरांचे' शिल्प कोरलेले असायचे.

मला कुतुब मिनारासम्बंधीची ही बाजू बिलकुलही माहिती नव्हती.सर्वप्रमाणेच मीही या मिनारला मुघलांची कलासक्ती आणि देण समजयचो. किंबहूना ती आहेच. पण हा मिनार हिंदू वास्तू विध्वंसित करून निर्माण केला आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे तो मोठा धक्का होता.

नंतर माहिती शोधली तेव्हा कळलं कुतुबुद्दीन ऐबकने आणि त्याच्या नंतरच्या पिढीने;कुतूब मिनार आहे तेथिल २७ हिंदु आणि जैन मंदिरांचा विध्वंस केला आणि तिथे हा मिनार उभारला.

मुघल राज्यकर्त्यांचा हा विध्वंस किंवा स्ट्रेटजी संपुर्ण भारतात दिसते.अगदी नागपुरजवळील छोटंसं गणपतीचं ठिकाण आदासा तिथेही कित्येक मुर्ती धडापासुन खंडीत केलेल्या दिसतात.मथुरेतील राजस्थानी लाल दगडांचं अप्रतिम सहा मजली मंदीराचा औरंगजेबाने विध्वंस केला होता. जे आताही बघण्यासारखं आहे. त्यावरून आधी ते किती सुंदर असेल याची कल्पना करता येते.

हे फोटोज विद्वेष पसरवायला नाही तर खरा इतिहास आणि भारतीय पुरातन संपन्न वास्तुकला, लिगसी लोकांपर्यंत पोहचावी आणि समजावी यासाठी.

जेव्हा मी अनुरागला हे सगळं कुतूब मिनारासहित सांगितलं तेव्हा त्याच्यासारखा फक्त गॅजेटफ्रिक ही  आश्चर्यचकित होउन बोलला "साला माहिती नव्हतं बे हे !या नंतर कधी कोणासोबत कुतूब मिनारला आलो तर हे गणेश कार्विंग नक्की दाखवीन! **** इतर मित्रांनाही सांगतो!

भारतीय पुरातन वास्तुकला,ग्रंथालये हे खूप अद्वितीय होते.आक्रमकांनी, राज्यकर्त्यांनी त्याचा सतत फक्त देशभर विध्वंस केला. हे अश्यावेळी दिसून येतं. मग एकतर तटस्थपणे फक्त बघता येतं किंवा हळहळता येतं.

पण दुर्लक्ष केल्यामुळे , फोटोज मध्ये गुंग असल्यामुळे मात्र त्या शिळेवरील दुर्लक्षित गणपतीला मात्र लोक पायाने तुडवतात. बसतात, शु लेस बांधतात. याकडे तटस्थपणे बघायचं , हळहळ व्यक्त करायची की दुर्लक्ष करून समोर जायचं ही ज्याची त्याची विचार प्रक्रिया.

-अभिजित पानसे