Showing posts with label विंडो सीट (प्रवासवर्णन). Show all posts
Showing posts with label विंडो सीट (प्रवासवर्णन). Show all posts

Sunday, 25 March 2018

ध्यानी मनी नसताना गोंदवले दर्शन

चार पाच वर्षांपूर्वी एकदा साताऱ्यावरून बीडला एसटीने जात होतो. दुपारी उशिरा सातारावरून निघालो होतो. संध्याकाळी बस एका गावी रोडवर थांबली होती. जवळपासच्या लोकांकडून ‘गोंदवले’ असं ऐकू आलं. खिडकीतून बाहेच्या व्यक्तीला कोणतं गाव आहे विचारल्यावर  “महाराजांचं गोंदवलं” असं म्हणाला.

मला तरीही त्याच्या उत्तरावरून कळत नव्हतं की मी ज्या गोंदवलेबद्दल ऐकलं होतं ते हेच का.

म्हणून मी “गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले हेच गाव का?” असा प्रश्न केला. पण माझ्या मूर्खपणाच्या विचित्र बोलण्यामुळे मीच ओशाळत हसलो. त्या माणसानेही हो हो तेच हे गोंदवले!” माझ्या बोलण्यावर हसत म्हणाला.

गाडी सुरू व्हायला एक मिनिटांचा अवकाश होता. त्या मिनिटात  मला आजवर ऐकलेलं गोंदवले, के. वि. बेलसरे यांनी लिहिलेलं गोंदवलेकर महारांजांचं चरित्र वाचलेलं आठवलं.

काय करावं काय करावं..बसल्या बसल्या उजवा गुढघा जागच्या जागी भरभर हलू लागला. चार दिवसांची एसटीची पास काढली होती. त्यामुळे तिकीटाचा प्रश्न नव्हता.  ड्रायव्हरने आत येऊन गाडी स्टार्ट केली.

जाऊ दे बघू काय होईल ते..विचार करून जय श्रीराम म्हंटलं आणि मी पटकन दरवाज्याकडे गेलो. कंडक्टर दार लावतच असताना मी त्यांना थांबवून बाहेर पडलो.

संध्याकाळ झाली होती. अंधार बऱ्यापैकी झालेला होता. पावसाळा नुकताच संपलेला.  आकाश स्वच्छ होतं. मी मंदिर विचारत विचारत गेलो.

आवारात खूप गर्दी होती. सगळीकडे लोक होते. मला तेथील काहीही माहिती नव्हतं. राहता येईल की नाही, व्यवस्था नसेल तर परत जायला पुन्हा बस मिळेल का..काहीही कळत नव्हतं.

तिथे एकाने चौकशी केंद्रात चौकशी करायला सांगितलं. राहायला खोली मिळेलही सांगितलं.

चौकशी केंद्रातील एका वृद्ध व्यक्तीने प्रेमाने विचारलं   “ “पोर्णिमेसाठी आलात का?”

मी , नाही सहज आलोय सांगितल्यावर ते म्हणाले , “आज पौर्णिमा आहे! इथे पौर्णिमेचं महत्व आहे. खास पौर्णिमेसाठी लोक दुरून येतात इथे! त्यामुळे आज गर्दी आहे.. म्हणून तुम्हाला खोली मिळणार नाही..पण कॉमन हॉलमध्ये  राहण्याची व्यवस्था होईल. रात्री महाप्रसाद घ्या..”

पावती घेऊन मी विचारत हॉलकडे निघालो. पहिले आकाशाकडे बघितलं , काळ्या आकाशात चंद्र पूर्ण कलांनी मस्तपैकी चमकत होता.

ओह खरंच पौर्णिमा आहे तर!

फार खुश झालो. मूड फ्रेश झाला. सूर्योदयाचं उगवतं केशरी बिंब, पौर्णिमेचा पूर्व क्षितिजावरून हळूहळू आकाशात वरती जाणारा संपूर्ण चंद्र मला  नेहमी खूप आवडतो.

राहण्याची सोयीचही टेन्शन गेलं होतं.

हॉलमध्ये बरेच लोक होते. बिनधास्तपणे सॅक हॉलमध्ये भिंतीला टेकवून बाहेर आलो.

समाधी मंदिरात गेलो.  सभागृह संपूर्ण भरलेलं होतं.  शुभ्र कुर्ता घातलेले बरेच लोक होते. सगळेजण शिस्तबद्ध बसलेले. कुठेही धावपळ , आवाज धक्काबुक्की नाही. मीही शेवटी जाऊन बसलो.

समोर कृष्णाची मूर्ती होती.

त्यांची रात्रीची उपासना सुरू होती.

त्यांनतर रात्रीची आरती झाली. आरतीनंतर खाली आत जाऊन समाधीचं दर्शन झालं.

कपूर, आणि धुपाचा सुगंध आत दरवळत होता. समई तेवत होती. तोवर फक्त फोटोत बघितलेलं मंदिर, काळ्या रंगाचं पादुका असलेलं स्थान,  त्यावरील हार, जवळ माळ, हे प्रत्यक्षात बघत होतो.

संपूर्ण वातावरणात एक स्पष्टपणे जाणवणारी सात्विकता भरली होती.

काही वेळ बाहेर थांबून रात्रीचा महाप्रसाद घ्यायला गेलो.

तिथेही खूप शिस्त दिसली.

शेवयाची खीर, मसाले भात, आमटी , भाजी पोळी असा  चविष्ट प्रसाद होता. जेवणानंतर आपापले ताट भांडी सूचनेनुसार त्या त्या पात्रातच टाकण्याची शिस्त होती.

जेवून बाहेर आलो तर घरून फोन आला. गोंदवलेला उतरून गेलो म्हणून सांगितलं.  राहण्याची व्यवस्था हॉलमध्ये झाली सांगितल्यावर बॅग कुठे आहे हे विचारल्यावर, तेव्हा माझ्या डोक्यात रकसॅकचा विचार आला.  मी म्हटलं हॉलमध्येच बाहेर ठेवली आहे. जागेवर आहे का कोणी नेली तर प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर मी नेहमीप्रमाणे बोललो की मी लोकांवर विश्वास टाकतो. त्यांनी तो निभवायचा का हा त्यांचा प्रश्न. मी माझ्या कर्माने. लोक त्यांच्या.

मी ताबडतोब हॉलकडे गेलो. माझी रकसॅक जागच्या जागी भिंतीला टेकून विश्रांती घेत होती.

मी ही थकलो होतो. त्या दिवशी सकाळी सज्जनगडला श्रीरामाचे दर्शन झालं होतं संध्याकाळी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महारांजाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून थोरले, धाकटे श्रीराम मंदिरात जाऊन आलो. तोवर फक्त के. वि. बेलसरेंच्या गोंदवलेकर महारांजाचं चरित्र पुस्तकातच  या सर्व जागांबद्दल वाचलं, फोटोज बघितले होते. कित्येकदा त्यांतील प्रसंग वाचताना, विशेषतः राम नवमीला तुकामाई चैतन्य त्यांच्या गुरूंनी गोंदवलेकर महाराजांना अशोक वनात दुपारी बारा वाजता दिलेला दीक्षा प्रसंग..अनेकवेळा अश्रूपात व्हायचा.

सकाळी आजूबाजूचा परिसर बघितला आणि आठ वाजता परत निघालो. काहीही कल्पना नसताना, ठरवलेलं नसताना अचानक गोंदवलेचं हे दर्शन कायम लक्षात राहिलं.

-अभिजित पानसे

Saturday, 30 December 2017

चलो दिल्ली (चलो बुलावा आया है भाग 1)

'चलो बुलावा आया है''
(वैष्णवी देवी प्रवास वर्णन) भाग1



"हाँ सीट अवेलेबल है!"असं तत्काळ रिजर्वेशनच्या खिडकीमागच्या एका रेल्वे कर्मचाराने रुक्षतेने म्हटले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

देवाच्या पुढ्यात दानपेटीत पैसे टाकावे इतक्या अदबीने मी टिकीटाचे पैसे खिडकीतून त्याच्या समोर ठेवले.

आणि त्याने दिल्लीचं  तिकीट माझ्या पुढ्यात भिरकावलं.

हे सरकारी कर्मचारी कागद पत्र..तिकीटांसारख्या तुच्छ गोष्टी आपल्यासारख्या तुच्छ लोकांच्या हाती वगैरे देत नसतात.भिरकवण्याचा त्यांना आदेशच असतो बहुदा किंवा तो त्यांच्या ट्रेनिंगचाच एक भाग असावा.

लागलेली लॉटरी कोणी जितक्यांदा तपासणार नाही तितक्यांदा मी ते तिकीट तपासलं.तारीख -वेळ -बर्थ- बोगी सगळं काही. तिकीटावरील कुठल्यातरी फोन कंपनीची जाहीरातही मी त्या आनंदात दोन तीनदा  वाचून काढली.
आनंदच तितका झाला होता ना!

सकाळी साडेनऊ वाजता झोपेत असताना दुर्लक्ष करूनही फोन सतत शहारू लागला तेव्हा इच्छा नसतानाही उचलल्यावर काही मिनीटाच्या Anurag सोबतच्या संवादानंतर मी ताडकन लाथेने सर्वांगावरील गरम ब्लँकेटचे आवरणे दुर करीत रेल्वे स्टेशन गाठले होते.आणि कुठल्याही एजंटाशिवाय स्वतः रांगेत लागुन शक्यता फारच कमी असताना दिल्लीचे टिकीट मिळवले होते.

आजवर उत्तरेकडे नाशिकच्या पलिकडे न गेलेलो मी आयुष्यात  पहिल्यांदाच देशाच्या राजधानीत पाऊल ठेवणार होतो!

पण फक्त हेच कारण नव्हतं त्या आनंदामागे.मी आधीच ठरवलं होतं अनुरागला दिल्लीला भेटायला गेलोच तर वैष्णोदेवीला जायचंच दर्शनाला! बरीच ओळखीची मंडळी जाऊन आली होती.

एरवीही मला कोणी ओळखी अनोळखी वैष्णो देवीला जाऊन आल्याचं भेटलं तर मी शरीराचे सहस्रकर्ण करून त्यांचं प्रवास वर्णन ऐकायचो.मनानेच शाब्दिक दर्शन घ्यायचो.पण आता प्रथमच याची देही याची डोळा दर्शनाची संधी आली होती.
लेकिन दिल्ली अभी दुर थी!!

दुसऱ्या दिवशी फलाट क्रमांक १ वर आलेल्या अग्नीरथाचं मी माप ओलांडलं आणि आमचा रथ उत्तरेकडे कूच करता झाला.

माझी आवडती साईड लोअर सीट मिळाल्याने आनंदात मी खिडकीतुन पळती झाडे पाहु लागलो.

थोड्याच वेळात भारताचे फुफ्फुसं असलेले मध्यप्रदेशचे जंगलं;पाठीमागे रेलुन खिडकीतुन येणारा वारा चेहऱ्यावर घेत डोळे बारीक करत;बघताना आजुबाजुच्या वातावरणापासुन अलुफ होत एका  Equilibrium मध्ये गेलो होतो.

संध्याकाळी पावणे सहाला रेल्वे होशंगाबाद नावाच्या स्टेशनावर थांबली आणि मला ह्या गावाचं नाव खूपदा ऐकल्या-वाचल्यासारखं जाणवू लागलं.
आणि एकदम डोक्यात प्रकाश पडला.

की 'नर्मदा परिक्रमेच्या' पुस्तकांमध्ये मी ह्या गावाबद्दल वाचलय.आणि बर्थवर आळसावलेलो पसरलेलो मी उत्साहाने सरसावून बसलो.

मनात एकदम उत्कट अष्टसात्विक भाव दाटून आले.

ज्या नर्मदा दर्शनासाठी मी तळमळत होतो परिक्रमेवरील पुस्तकं वाचल्यापासुन; त्या नर्मदा माईचं दर्शन काहीही कल्पना नसताना होणार या विचारानेच!!

 गाडीने स्टेशन सोडलं. पण कुठलंच चिन्ह दिसेना. मी समोर दृष्टी जाईल तितकं लांब पाहू लागलो.

आणि अचानक जलप्रवाह दुरून दिसू लागला.आणि हळूहळू नर्मदामाईच्या संपूर्ण विशाल पात्राला आमचा अग्निरथ वर पुलावरून ओलांडु लागला.

 '#नर्मदेहर' म्हणत मी शरीराचे सहस्रनयन करत नर्मदादर्शन करत होतो.

सूर्यास्तसमयीच्या केशरी सूर्याच्या साक्षीने खाली नर्मदेचा विशाल प्रवाह पश्चिमेकडे सागराच्या दिशेने वाहत होता.

खाली दूरवर हातात काठी घेतलेला एक वृद्ध नदीच्या तिराने चालताना दिसला. मला गो.नि.दांडेकरांची 'कोणा एकाची भ्रमणगाथा' आठवली.

नर्मदादर्शनाने खूप सुखावलेल्या माझ्या मनाला;आयुष्यात पुढे नर्मदा परिक्रमा करण्याच्या माझ्य  संकल्पाची मला आठवण झाली.

काहीवेळाने भोपाळ आलं. रात्री उशीरा कधीतरी ग्वाल्हेर येऊन गेलं.पहाटे जाग आली तर गाडी आग्रा स्टेशनात थांबलेली दिसली.मला एकदम औरंग्याचा दरबार तिथला मिर्झा राजे,आणि शिवाजी महाराजांनी दाखवलेला तेजस्वी बाणा आठवला.
The great Escape in the world म्हणुन गौरवण्यात यावं ती शिवाजी महाराजांची आग्रयातुन सुटका आठवली.त्यावेळी माझा
'हरी तात्या' झाला होता.

पहाटे पाचला मथुरेला गाडी थांबली. स्टेशन पूर्ण शांत होतं. श्रीकृष्णाच्या भूमीत आल्याचा खूप आनंद होत होता.

 फेब्रुवारीचा पहिला आठवडा असल्याने ब्लँकेटच्या स्वेटरच्या आवरणालाही भेदून थंडी पार हाडापर्यंत जात होती.

 हळूहळू झुंजुमुंजू लागलं. आणि दिल्ली शहराच्या खुणा दिसू लागल्या.
संपूर्ण रस्त्यावर दाट धुकं पसरलं होतं. दिल्लीनं नेहमीप्रमाणे दाट धुक्याची जाड शाल पांघरली होती.

देशातील सर्वात प्रदुषित शहर असलेलं शहर म्हणजे  आपल्या भौतिक प्रगतीची दुसरी काळी बाजू. त्यामुळे दिल्लीत एकवेळ नारळ आणि हापुस पिकेल पण दिल्लीतून आकाश कधीच निळं दिसणार नाही.

गाडी न्यु दिल्ली स्टेशनवर प्रवेशती झाली.आणि मी माझी सखी सोबतिण 'रक सॅक'ला अलगद उचलुन तिला पाठीवर घेत ' इंद्रप्रस्थाच्या'च्या भुमीवर पहिलं पाउल ठेवलं.
आणि जीवाची दिल्ली करण्यास सज्ज झालो...

-अभिजित पानसे

तिकीट हाती आले (चलो बुलावा आया है भाग 2)

*चलो बुलावा आया है
वैष्णवीदेवी प्रवास वर्णन भाग 2*

माझ्या सखीला-रक सॅकला उचलुन पाठीवर घेत दिल्लीच्या भुमीवर पहिलं पाउल ठेवलं.
आणि  ''जिवाची दिल्ली'' करण्यास सज्ज झालो.

अनुराग घ्यायला येणार होता. तो येईपर्यंत मी दिल्ली मेट्रो स्टेशनला पोहोचुन नेहमीप्रमाणे आजुबाजुचं निरीक्षण करू लागलाे. हे शहर अनेक गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे. हे बातम्यांमधून कळत असतं.
त्याचा संबंध आजुबाजुच्या वातावरणात दृश्यात काही मिळतो का हे शोधण्याचा बालिश प्रयत्न करू लागलो.

एकदाचा अनुराग आला.भेटण्याच्या आनंदात एकमेकांना अभक्ष शिव्यांचे आदान प्रदान..मिठ्या मारणाचा सोहळा पार पडला आणि आम्ही 'रोहिणीला' जायला निघालो.

मेट्रोच्या पहिल्याच भेटीत प्रेमात पडलो. पण लोक मात्र मख्ख चेहऱ्याने प्रवास करताना दिसलेत. यामानाने मुंबईची लोकल खूप जिवंत वाटते. मुंबई स्पिरीटच ते!
त्यावेळी फक्त दिल्ली कोलकात्यामध्येच मेट्रो ट्रेन होती.

फक्त फेब्रुवारी महिन्यातच राष्ट्रपती भवनातील गार्डन सामान्य नागरीकांसाठी खुलं असल्यामुळे अनुरागचा तिकडे जाण्याचा बेत होता.
पण हे गार्डन, उद्यानात जायचं म्हटलं की एरवीही माझ्या चेहऱ्यावर आठ्या उमटतात.म्हैसुरचं वृंदावन गार्डन असो वा काश्मीरचे मुघल उद्याने मला कंटाळाच येतो.

म्युझियम्स,किल्ले,लेणी,किंवा ऐतिहासीक वास्तु,मग ते सुस्थितीत असो वा भग्नावस्थेत,तेथे मी तासनतास एकटा रमु शकतो.वेगळ्याच विश्वात जातो.

त्यामुळे मी अनुरागपुढे पुराना किल्ला,लाल किल्ला कुतुब मिनारची यादी समोर ठेवली.

हे ऐकताच त्याने मला गच्चीवर नेलं आणि तिथे गेल्यावर मी जोरदार ओरडलोच..

कारण त्याच्या गच्चीवरुन समोर दुर कुतूब मिनार दिसत होता.

मी कितीतरी वेळ ते दृश्य पाहत राहिलो.

त्या दिवशी अनुरागसोबत कुतूब मिनार..लाल किल्ला..चांदनी चौक..लोटस टेंपल बघुन  आलो.आणि दुसऱ्या दिवशी जम्मूचं रिजर्वेशन तत्काळमध्ये करण्याचं ठरलं.

कोणाला हाताला सहा बोटं असतात,वर्तमानपत्रात कधी दुतोंडी साप वगैरे जन्माला आलेला दिसतो.

तसंच मला कधी कधी तिव्रतेने वाटतं की विधात्याने माझ्या पोटात मला दोन तीन जठरं का नाही दिलीत!!

अशीच भावना मला चांदनी चौकात पराठा गल्लीतुन आणि इतर भागात फिरताना झाली होती.

  सकाळ आली ती अनुरागच्या तब्येतीचं दुखणं घेऊन आली. त्यामुळे त्याचं येणं रद्द झालं.
 मला मात्र मनात एकटं जाण्याच्या विचारानं हुरहुर जाणवू लागली.

जम्मू काश्मीर म्हटल्यावर डोळ्यांसमोर आतंकवादी कारवायाच येऊ लागल्या. पण घरून निघतानाच मनाशी निश्चय केला होता वैष्णो देवीला जायचेच.

 सकाळी १० ते १२ पर्यंत सुरू असणाऱ्या तत्काळ साठी लोक पहाटेपासून रांगेत लागतात. आणि आम्ही दुपारी साडे अकरा वाजता स्टेशनला जायला घराचा उंबरठा ओलांडला.

१२ फलाटं ओलांडून पहाडगंज भागाकडील तत्काळचं ऑफीस खूप प्रयत्नांती एकदाचं सापडलं.

आत वेळ संपल्याने तिथे कोणतीच रांग नव्हती. आत पोहोंचल्यावर कळलं की मी xerox copy विसरलोय.

मग पहाडगंजचं जंग जंग पछाडल्यावर एकदाची xerox copy काढली.

 पुन्हा ऑफीसात आलो तर जवळचा पेन हरवलेला..!!

 मग कोणी पेन देता का हो पेन..या वेंधळ्या पेंद्याला पेन देता का विचारत
 शेवटी एकदाचा फॉर्म भरून झाल्यावर तो द्यावा तर 'लंच टाइम हो गया' म्हणत तो गिळायला निघून गेला.

तेव्हा निराशेने मी जायचचं रद्द केलं. आणि जवळच्या कॅनॉट प्लेसला जायला आम्ही निघणार होतो.

 पण थोड्याच वेळात तो अधिकारी आला आणि नकार ऐकण्यासाठीच मी खिडकीपाशी जाऊन भरलेला फॉर्म उदास मनाने आत ढकलला.

मनात म्हटलं आज जर तिकीट मिळालं नाही तर वैष्णो देवीचीच इच्छा नाही की मी दर्शनाला यावं. तसंही देवीची  इच्छा असली तरच जाता येतं असं म्हणतात.
 अशी स्वतःची खोटी अयशस्वी समजूत काढू लागलो.
आणि दुसऱ्या दिवशी परतीचं तिकीट काढायला लवकर येण्याचं ठरवलं.

आता रेल्वे अधिकारी दुपारी 2 वाजता फॉर्मवर 'तत्काळ' बघितल्यावर अंगावर खेकसणार याची खात्री होती.

 एवढ्यात त्या खिडकीच्या पलीकडुन अधिकाऱ्याच्या मुखातून तीन शब्दसुमनं सांडलीत आणि मी ती माझ्या कर्णांजलीत अलगद झेलली -'एकही बचा है!'

मला आश्चर्याचा मोठा धक्का होता तो धक्का!!

खिडकीतून एक गोंडस तिकीट बाहेर आलं.ते पाहून अनुरागलाही खूप आश्चर्य वाटलं! आणि मी आनंदाने  उद्गारलो "चलो बुलावा आया है माताने बुलाया है!"

(क्रमशः)

Wednesday, 27 December 2017

कोल्हापूरातील तो माणूस, कोंकण माणगाव रोमांचकारी प्रवास वर्णन भाग 1

आज वासुदेवानंदसरस्वती महाराजांची जयंती.
जन्मगाव माणगाव प्रवास वर्णन.
कोल्हापुरातील त्या माणसाचा अनुभव.

ऑगस्ट 2013

भाग पहिला



तीन चार वर्षांपुर्वी मी एका ओळखिच्या व्यक्तीला भेटायला पुण्याला जाण्यासाठी संध्याकाळी निघालो.ऑगस्ट..श्रावण संपायला आला होता. घरून निघताना एका न्युज चँनलवर "आपला गाव आपला गणपती" असं कोणता तरी प्रो सुरू होता. त्यात कोल्हापूरच्या एक दशभुजा गणपती मंदीराची माहिती दाखवत होते.

मला पुरातन वास्तु मंदीर बघायला फार आवडतात म्हणुन विचार केेला की कधी कोल्हापुुरला गेलो की शोधु हे मंदीर.

दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहचुन ; भेटुन रात्री परत निघालो.तेव्हा वाटलं की नृसिंह वाडीला दर्शन करून यावं. पास होताच.
तेव्हा कोल्हापुरला जाणाऱ्या जांभळ्या पांढऱ्या स्वच्छ आराम बस मध्ये बसलो.

वेळेचा अंदाज नीट न आल्याने रात्री २:३०AMला कोल्हापूर बस स्टँडला उतरलो. सर्वत्र सामसूम !!

बस स्थानकावर काही माणसं झोपली होती. पणआत समोरच एका खुर्चीवर एक पोलीस हवालदार बसले होते. तेही खुर्चीवर डुलक्या देत होते.माझी चाहुल लागल्याने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझं निरिक्षण केलं. काहीच बोलले नाहीत. मी इकडे तिकडे थोडं घुटमळलो.चार्टवर वाडीला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या बसेसचा वेळ पाहिला.

ते हवालदार अधुन मधुन माझ्याकडे मान वळवुन पाहताय हे माझ्या लक्षात येत होतं.

उगाच त्यांना काही संशयास्पद वाटु नये म्हणुन शेवटी मी त्यांच्या पुढ्यात रिकाम्या सिमेंटच्या बाकड्यावर येउन बसलो.इतर बाकावर काही माणसं ; कोणी अंगावर नेटकी चादर घेउन कोणी तसेच झोपले होते. अधुन मधुन; चावणारे डास उडवायला त्यांची हाताची हालचाल होत होती.

आत आल्यापासुन माझ्या कानावर सतत दुरवरचा बोलण्याचा गाण्याचा आवाज पडत होता.नक्कीच कुठेतरी मोठ्या आवाजात टिव्ही सुरू होता.

मी समोर येउन बसल्याने म्हणा किंवा खुर्चीत अवघडुन बसुन डुलक्या देण्याचा कंटाळा आला म्हणा ते हवालदार आता जागे झाले होते.

 त्यांना मंदिर कधी उघडतं वगैरे माहिती विचारली..

त्या आधीच्या वर्षीच नवरात्रात पहिल्यांदाच कोल्हापुरला आल्यावर पायीच शहर बघत मंदीरापर्यंत गेलो होतो आताही तसंच जावं ठरवलं आणि जाण्यास उठलो.

 त्या पोलिसांनी ताबडतोब मला मागून आवाज दिला विचारलं "कुठं चाल्ले? मंदिरकडं?"

मी हो म्हटल्यावर त्यानी अगदी स्पष्ट सांगीतलं "आता इतक्या रात्री जाऊ नका शहर आता सुरक्षित राहीलं नाही! तुम्हाला रस्त्यात कोणी पकडन आणि लुटू शकतं!उजाडल्यावर जावा!

असा स्पष्ट इशारा दिल्यावर मला वास्तवाची जाणीव झाली

मी काही मिनिटं तिथंच बसलो. मग सहज समोरच्या मोकळ्या भागात फिरावं म्हणून गेलो तर इतक्या वेळचा तो आवाज कुठून येतोय ते कळलं समोर एक पान टपरी होती; तिथे मोठ्या आवाजत टीव्ही सुरु होता.
घशाला कोरडही पडली होती. त्याच्याकडे पाण्याची बॉटल मिळेल म्हणून तिथे गेलो.

 मोठ्या आवाजात एक कुठलातरी सुमार  तेलुगू  पिक्चर सुरु होता. जोरजोरात नाटकी संवाद आणि अंगावर येणारे क्लोज अप्स  शॉट्स बॉटलने पाणी पिताना मी पाहत होतो.
त्या ठेल्यावर तीन चार अजून माणसे होती. दारूचा तिव्र भपकारा येत होता.

माझ्या उजव्या बाजूला एक उंच आडदांड इसम उभा होता

अर्धी बॉटल पाणी पिऊन बॉटल सॅक ला मागे अडकवली. घड्याळात 2: 55 झाले होते.

त्या ठेल्या वाल्याला मंदीर कधी उघडतं रस्ता कुठे वगैर मी हिंदीत प्रथम विचारलं.

त्याने शुद्ध मराठीतुन मला सांगितलं.
कुठून आलात वगैरे त्याने विचारलं.

त्या तेवढ्याच टपरीवर माणसांचा काय तो वावर होता .पण आंबलेलं शरीर आणि त्या कर्कश तेलुगू डायलॉग आणि किंकाळ्या मात्र तिथे उभं राहु देत नव्हत्या.

म्हणुन थोडं समोर रस्त्यावर पाय मोकळे करावे म्हणुन चालत गेलो.सगळीकडे चिडीचुप्प होतं.

आजुबाजुला अंगावर येणारी शांतता असली की मन अनेक विचारांनी अशांत होउन उठतं.

 तितक्यात मागुन एक माणुस आला म्हणला "चला मी अंबाबाईच्या मंदिरात सोडतो.."
मी नाही नको म्हटलं.तो म्हंटला "माझं घर त्याच रस्त्यावर आहे मी तुम्हाला सोडतो.."

मला आठवलं पानटपरीला माझ्या उजव्या बाजुला असलेला हाच तो माणुस. आता मी त्याला नीट पाहात होतो. सहा फुट वा त्याहुन थोडा नक्कीच उंच होता. डार्क रंग. दाट दाढी मिशी  होती. शरीराने प्रचंड आडदांड..डोक्यावर एकही केस नाही.

मी त्याला नाही म्हटलं.पण तो मला पुन्हा म्हटला की त्याचं घर त्याच रस्त्यावर आहे.

मला एकदम थोड्याच वेळापुर्वी त्या पोलीसाने दिलेला इशारा आठवला की हे शहर हा भाग सुरक्षीत नाही कोणीतरी तुम्हाला गाठेन आणि लुटू किवा इजा करू शकतं..."

माझा हँम्लेट झाला काय करावं?जाउ की जाउ नये?!

पण माझं अगदी स्पष्ट एक प्रिन्सिपल आहे . मी पुढच्या व्यक्तीवर बिनदिक्कत विश्वास टाकतो.तो त्याने मोडला तर तो व्यक्ती त्याच्या कर्माने मी माझ्या कर्माने! लॉ ऑफ कर्मा नेव्हर फेल्स!

मी त्याला हो म्हटलं. कारण पहाटेच मंदिर उघडल्यावर दर्शन झालं की वाडीला जायला मला भरपुर वेळ मिळणार होता.तसंच कित्येक वर्षांपासुनची #ज्योतीबाला जायची इच्छाही पुर्ण होउ शकेल. .हे तिन्हींचं इक्वेशन पुर्ण होणार होतं.म्हणुन मी त्याला हो म्हटलं.पण मन साशंक होतं. त्याच्याकडे पाहुन कोणीही त्याला कृर म्हटलं असतं.

त्याने त्याची तिथेच असलेली बाइक आणली ; मी मागे बसलो. आणि आम्ही मंदिराकडे  निघालो.

तो मला प्रश्न विचारून माहिती माझ्याबद्दल माहिती घेत होता..कधी कोल्हापुरला आले होते काय..कोणी इथे राहतं का वगैरे ..

हे सगळं शंकास्पद वाटल्याने मी मोघम उत्तर देत होतो. मुळात मी असं अनोळखी शहरात अनोळखी माणसासोबत उशीरा रात्री त्याच्यावर विश्वास टाकुन त्याच्या घरी जाण्याला कोणीही ऱ्याशनल व्यक्तीने मुर्खात काढलं असतं .

संपुर्ण रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.हँलोजनच्या दिव्यांचा प्रकाशात रिकाम्या मेन रोडच्या आजुबाजुचे बंद दुकाने दिसत होती.

मी नकारात्मक विचार करत होतो की हा माणुस जास्तीत जास्त काय करीन मोबाईल व जवळचे पैसे लुटू शकेल...

तेवढ्यात त्याने रस्त्यावर गाडी थांबवली.माझ्या मनातील विचारांना दुजोरा मिळणारी ती कृती होती.

तो म्हणला "तुम्ही पहिले माझ्या घरी चला..! अंघोळ करा फ्रेश व्हा..मग मी तुम्हाला  मंदिरात सोडतो.

मी हो म्हटलं.विश्वास टाकायचा ..बाकी लेट्स सी. हेच माझं प्रिन्सि.म्हणुन हो म्हटलं.पण मनावर नकारात्मक विचारांचं दडपण आलं होतं.

मी विचार करू लागलो हा काय करू शकतो.. मोबाईल वा जवळचे पैसे घेउ शकतो..बाकी वेळच आल्यास मी जीवावरती काही प्रसंग उद्भवल्यास मी याला प्रतिकार करत मारू शकतो का..वगैरे विचार करत होतो.

त्याने बाइक मेन रस्त्यावरून काढत छोट्या  रस्त्यांवरून गल्लीतुन नेउ लागला.
तो भाग प्रमुख गावापासुन बाहेर आहे. एका घरापाशी थांबवली. तेच त्याचं घर तो बोलला.

 घराच्या मागे अंधार असल्याने स्पष्ट दिसत नव्हत पण झाडी व शेत असं काहीतरी होतं.
मी शहरापासून दूर होतं हे नक्की.

आत सगळीकडे प्रचंड धूळ कचरा ..सिमेंट ..भग्न भिंती होत्या जागोजागी पांढरे कापड्यांनी वस्तू झाकल्या होत्या.
घरात इतर कोणीही नव्हतं.
मला ते विचित्र वाटलं.

तो म्हणाला घराचं रिनोवेशन सुरु आहे.

त्याने बसायला सांगीतलं आणि तो आत गेला.

मी पहिले रात्रीपासून मेलेला माझा सेल चार्जिंग ला लावला.

थोडयावेळाने तो बाहेर आला; त्याने माझ्यासाठी पाणी तापवून आणलं होतं

माझ्या मनावरचं आता दडपण नाहीस झालं होतं. अंघोळ आटोपून प्रवासातील कपडे बदलवले.फ्रेश वाटत होतं.

तो ही थोड्याचवेळात तयार झाला.

त्याचं आडनाव पवार होतं. पाहिलं नाव विसरलो.दोनेक वर्षांपासुन आठवतोय पण आजवर आठवलं नाही.

घरचे सर्वजण रिनोवेशनमुळे शेजारी दुसऱ्या घरात सध्या राहताहेत त्याने सांगितलं.

पावसाची एक छोटी सर आल्याने त्याने त्याची मोठी गाडी काढली आणि आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे निघालो.

पहाटेचे पाच वाजले होते.
तो गाडीत सांगत होता की तुम्ही पानटपरीवर मंदिराबद्दल विचारतानाच मला इच्छा झाली की तुम्हाला मंदिरात सोडावं !
तुम्ही इतक्या दुरून आमच्या गावात आलात तेही फक्त दर्शनाला ..आम्ही इथल्या इथे असून जात नाही!

त्याने त्याची इतर माहिती सांगितली.
नृसिंहवाडी बद्दल विचारलं असता म्हंटला तुम्ही नशीबवान आहात काल संध्याकाळीच मंदिर मोकळं झालंय कृष्णेच पूर ओसरला!

तुम्ही जाऊन या तिथेही!

त्याने एका मंदिरापाशी गाडी थाम्बवली.
तो म्हणाला चला पहले गणपतीचं दर्शन करू!

 हे आमच्या कोल्हापूरच महत्वाचं मंदिर आहे दशभुजा गणपती!

आत गेलो तर तीच मूर्ती! तेच मंदिर जे मी निघताना टीव्ही वर पाहिलं होतं! आणि विचार केला होता की कधी कोल्हापूर गेलो तर हे मंदिर शोधू!

माझ्या आनंदाला पारावर उरला नाही!
खरच काही गोष्टी.. ..संकेत ..संजोग हे #
'रॅशनली' समजत नाहीत.

तिथून महालक्ष्मी  मंदिरात आलो .नुकतंच पाऊस पडून गेल्याने खाली जमीन ओली होती ..थोड्या साचलेल्या पाण्यात मंदिराचं थोडं प्रतिबिंब दिसत होतं.
 सुखकारक गारवा जाणवत होता.

आत नुकतीच देवीची पूजा आटोपली होती.वातावरण एकदम प्रसन्न होतं. शेवटचा श्रावणी  शुक्रवार म्हणून बायकांची गर्दी होत होती.
दर्शन आटोपलं.

पुजारी त्याच्या ओळखीचे होते.
तो म्हणाला तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन घडवलं असतं पण सध्या त्याचा वाद सुरू आहे.

तिथून त्याने एका रेणुका  आणि दत्त मंदिरात नेलं. कोल्हापुरात दत्त महाराज दुपारी भोजनाला येतात ही जी श्रद्धा आहे ती या मंदिरासंबंधी आहे हे कळलं.

शेवटी सकाळी ७:३०ला परत त्याने मला स्टँडवर त्याच पानटपरीपाशी सोडलं.त्याचा नंबर घेतला.मनापासून धन्यवाद म्हणून मी  निरोप घेतला.

तिथून वाडील गेलो कृष्णामाईने दत्त महाराजांना स्नान घडवून ती परत वर्षभरासाठी आपल्या मार्गाने वाहण्यास गेली होती.

पलीकडच्या तीरावरील गावातील शंकराच्या मंदिरात जाऊन आलो येथीलच वेल तोडण्याची आणि चौसष्ठ योगिनिंची कथा गुरुचरित्र त सांगीतली आहे.

तेथील एका माणसाशी बोलताना तो म्हंटला की इथपर्यंत आला आहात तर टेम्ब्ये स्वामींच्या माणगाव ला जाऊन या नुकताच जयंती सोहळा आटोपला आहे तिथे!

मीही जायचं ठरवलं .

पण पुन्हा एकदा माणूसकीवर टाकलेला विश्वास ईश्वराने सार्थ ठरवला होता!
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणालाही त्याच्या बाह्य रुपावरून 'जज' करू नये हेही समजलं.
उस जरी डोंगा परी रस नव्हे डोंगा ही म्हण आणि त्या मुलाची गोष्ट आठवली.

मी माणगावला जाण्याची चौकशी करू लागलो.

(क्रमश:)

कोकण- कोल्हापूर-जोतिबा- सावंतवाडी-माणगाव -डोंगर जंगल गुफा रोमांचकारी प्रवास भाग 2

ऑगस्ट 013
प्रवासवर्णन भाग 2 सावंतवाडी,माणगाव

वाडीहुन दुपारी निघायला मला अंमळ उशीर झाला होता.जयसिंगपुरला  बसस्टँडवर बसची वाट बघत असताना एक छान दृश्य दिसलं.

      (सकाळचा चंपक लूक)

पाउस येत असल्याने सगळे लोक आत उभे असताना  बसेस बाहेर दूर थांबायच्या. एक मुसलमानी पेहरावातला पन्नास साठ वर्षाचा एक मुसलमान माणुस छत्री घेउन बाहेरच उभा होता. बस आली की की ती कुठे जातेय आणि तिकडे जाणारे कोणी आहेत का हे आतल्या लोकांना शुद्ध मराठीत हसतमुख मुद्रेने सांगायचा आणि विचारायचा.
 एका वृद्ध बाईंना मिरजेला जायचं होतं.बस आली की तो त्या बाईंना मिरजेची बस नाही म्हणुन सांगायचा. "येइलच आता!" त्यांना म्हणायचा.

हा माणूस मला फार आवडला.सर्व जण असे सद्भावाने राहिलेत तर समाज किती आनंदी आणि  सकारात्मक वातावरण निर्माण होईल असं वाटून गेलं.

थोड्याच वेळात मिरजेची बस आली त्याने त्या बाईंना बसपर्यंत छत्री देत  पोहचवले. त़्यानंतर सांगलीची बस आली.तो त्यात निघुन गेला.
काही लोकं त्यांच्या छोट्याश्या कृतीने लक्षात राहतात. मनाला वेगळा आनंद देउन जातात.

कोल्हापुरची बस उशीरा आल्याने मी दुपारी साडेपाचला कोल्हापुरला पोहचलो. उशीर झाल्याने ज्योतिबा रद्द करावं लागलं.
सावंतवाडीला जाण्याची चौकशी करू लागलो. तेव्हा माहिती मिळाली की सध्या सावंतवाडीची थेट बस नाही.६ वाजता कणकवलीची बस येइल.तिथुन सावंतवाडीची बस मिळू शकेल.
नाहीतर रात्री दहाला पणजीला जाणाऱ्या बसने थेट सावंतवाडीला जाता येईल.

पण पुन्हा रात्री अवेळी अनोळखी छोट्या गावी पोहचणं मला नकोच होतं.आणि मुळात तिथुन सावंतवाडी वा माणगावची बस मिळेल की नाही याची शाश्वती नव्हतीच. म्हणुन रात्रीच्या बसने जाण्याचा निर्णय घेतला.

 समोर बसेसचं येणं जाणं..सततच्या अनॉउंसमेन्ट्स सुरू होत्या..
महा. राज्य डेपोच्या लाल पांढऱ्या, हिरव्या पांढऱ्या बसेस मध्ये ऑड बसेस आऊट असलेल्या कर्नाटक सरकारच्या बसेसही येत जात होत्या.
कुठल्याही सीमालगत भागात गेल्यास अशी विविधता दिसतेच.
नाशिक बस स्थानकावर गुजरात राज्याच्या
बसेस दिसतात. सोलापूरला तर आंध्र, तेलंगाणा, कर्नाटक राज्याच्या बसेस साठी वेगळी स्थानकही प्रसंगी असतात.

पुढच्या मिनिटाला मला अनाउंसमेंट ऐकु आली ती ज्योतीबाला जाणाऱ्या बसची!!
आणि मी स्वत:ला रोखु शकलो नाही.

जाऊन येऊन जास्तीत जास्त दोन तासाचा प्रवास होता. माझ्याकडे साडेतीन तास होतेच.रिस्क घ्यायला हरकत नव्हती.

घेतलं ज्योतिबाचं नाव आणि घुसलो बसमध्ये! ज्योतिबाच्या नावानं चांग भलं

 बसने शहराबाहेर पडल्यावर एक टर्न घेतला तेव्हा पन्हाळा 16 किमी फलक दृष्टीस पडला.मला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाजीप्रभु देशपांडेंवर रचलेल्या पोवाड्यातील शब्द आठवलेत.

"श्री बाजी विव्हळ पडला! मागुति तत्क्षणी उठला! बेहोष वीर परि वदला!
तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्युला!!

अगदी लहानपणी DD10 वर "ज्योतीबाचा नवस" हा कोल्हापूर चित्रपटसृष्टीतला तत्कालीन स्टार 'सूर्यकांत' यांचा चित्रपट पाहिला होता. तेव्हा ज्योतिबाची पहिल्यांदा चलचित्र तोंडओळख झाली होती . त्या दिवशी दर्शनाचा योग आला होता.

भरभर पायऱ्या उतरून ज्योतिबाचं फक्त पाच सहा सेकंद दर्शन घेतलं आणि परत निघालो. अंधार झाला असल्याने डोंगराचं सौंदर्य बघता आलं नाही.

रात्री पणजीला जाणारी बस आली. कंडक्टरने सावंतवाडीला पहाटे तीन सव्वा तीनला पोहचणार सांगितलं.
शेवटी पुन्हा तेच झालं! मी कधीही न पाहिलेल्या गावात अवेळी पोहचणार होतो.

पण माझ्या शिवाय इतरही कोणी सावंतवाडीला उतरणारे असतीलच या विचाराने जरा बरं वाटलं!रात्री कणकवली आलं बरेच लोकं उतरलेत. आता थोड्या वेळाने सावंतवाडी येणार म्हणुन मी जागरूक होउन बसलो.

तीन वाजता सावंतवाडी आल्याचं कंडक्टरचा रात्रीचा जड आवाज ऐकु आला. मी सॅक पाठीघेउन उतरू लागलो.मागे वळुन पाहिलं तर माझ्या मागे कोणीच नव्हतं!
सावंतवाडीला उतरणारा मी एकटाच होतो. इतर सर्व डोकी मागे टेकून कोणी एकमेकांच्या खांद्यावर पडुन लवंडुन झोपली होती.

लोकांचे बरे गोव्याला जाण्याचे प्लँन्स यशस्वी होतात!!

खाली उतरल्याबरोबर बस पुढे ताबडतोब गोमंतकाकडे निघुन गेली.
आजुबाजुला सर्वत्र सामसूम! कोल्हापुर मोठं शहर असल्याने रात्री स्टँडवर काही लोकं होते पण इथे या गावी चिटपाखरूही नसणार हे पक्कच होतं.

आत स्टँडमध्ये गेलो. एक ट्यूब लाईट अस्पष्टसा आवाज करत प्रकाश फेकत होता. माझा अंदाज चुकला होता. मी आत एकटा नव्हतो. इथेही  सिमेंटच्या बर्थवर काही जणं झोपले होते. पण ती तीन चार काळी पांढरी भटकी कुत्री होती.

चिटपाखरूही नसणार हा अंदाज सपशेल चुकला होता साक्षात  तीन चार सस्तन प्राणी श्वान कंपनि सोबतीला होती. मी जरासा दुर जाउन बसलो.माझी चाहुल लागताच; आपल्या रात्रीच्या अड्ड्यावर कोण आलंय हे एक दोघांनी डोळे उघडुन मान वर करून माझ्याकडे बघुन घेतलं. पण मी त्यांना निरूपद्रवी.प्राणी वाटल्याने शेपुट थोडंसं हलवत पुन्हा मान खाली करून ते झोपी गेले.

कुत्रा हा माझा आवडता प्राणी. जगातील प्रत्येक अन् प्रत्येक नात्यात प्रेम हे टर्म्स अँड कंडिशन्स आर अपलाईड या क्लॉजने येतं. फक्त कुत्रा हाच याला अपवाद आहे. निस्वार्थपणे तो त्याच्या वा मालकाच्या शेवटापर्यंत प्रेम करतो.

कुत्रा ही शिवी कशी काय होउ शकते. ते तर बिरूद व्हायला हवं. माणूस कुत्र्यासारखा वागला तर फार उच्च स्तरावर जाईल.

मी तिथेच मान मागे रेलुन पेपर वाचत बसुन होतो. आमच्यामध्ये camaraderie निर्माण झाली होती.
एकमेकास कंपनि देउ अवघे झोपु समस्त!

 दोनेक तासांनी वर्तमानपत्रांचे गठ्ठे कलेक्ट करणारे विक्रेते येउ लागले. त्यांनी माणगावला जाणारी पहिली बस साडेसातला जवळच असलेल्या दुसऱ्या छोट्या बसस्टँडवरून मिळेल हे सांगितलं. उजाडु लागताच मी चक्कर टाकुन आलो.एक मोठा सुंदर तलाव दिसला .एकंदर सावंतवाडी हे खुपच लोभस स्वच्छ रस्त्यांचं शांत निसर्गसौंदर्याने नटलेलं अस्सल कोंकणी शहर वाटलं.

माणगावच्या बसमध्ये बसलो. बस छोट्या रस्त्यांवरून धावु लागली. अधुनमधुन लहान सहान खेडेगावांमधुन शाळेची छोटी मुलं उत्साहात आवाज करत आत चढत होती.खिडकीतुन आजुबाजुचं हिरवा निसर्ग बघता बघता; दोन दिवसांपासुन झोप न झाल्यामुळे थंड हवा चेहऱ्यावर आदळू लागताच माझं होय होय होय नाही नाही नाही सुरू झालं.

(क्रमश:)

पाम्पोर केशराचं ठिकाण, धुसमसणारं

पाम्पोर PAMPUR

12 सप्टेंबर 2016

आज काश्मिरमध्ये पांपोर येथे आतंकवाद्यांविरूद्ध मोहिम सुरू आहे.पांपोर नाव ऐकलं मन एक वर्ष मागे गेलं.जगात फक्त इराण ,स्वित्जर्लंड आणि भारताशिवाय एक दोन ठिकाणीच केशर Saffron तयार होतं.भारतात केसर फक्त काश्मिरला होतं हे बऱ्याच जणांना माहितिये.

पण केशर पुर्ण काश्मिरमध्ये नाही तर फक्त #पांपोर या खेडे गावीच उत्पादीत होतं.

काश्मिर खोऱ्यात ट्रेन चालते हे बऱ्याच जणांना माहिती नाही.कारण जम्मु नंतर आता उधमपुर हे उत्तर रेल्वचं शेवटचं स्थानक आहे.

 बनिहालहुन ट्रेनने भारतातील सर्वात लांब जवाहरबोगदा पार केला की आपण खोऱ्यात प्रवेश करतो. श्रीनगरच्या तेरा किमी अलिकडे पांपोर हे छोटंसं रेल्वे स्थानक लागतं.
हा फोटो मी माउंटेनियरिंगचा कोर्स करून परत येताना  ट्रेनच्या खिडकीतुन काढला होता.

हे अगदी छोटं गाव आहे.तेथिल केसराची शेती दिसते.ती बघताना वेगळ्याच देशात आल्याची भावना होते.
वर्षभरात फक्त दोन ते तीन महिने कालावधी असतो.अप्रतीम सुंदर असे छोटे जांभळे फुलं येतात.पोर्णिमेला रात्री फुले व परागकण, stigma चमकतात!!
त्या फुलांना वाळवुन त्यातुन केसराच्या काड्या मिळतात.

भारतातील एकमेव केसर उत्पादनाचं ठिकाण म्हणजे पांपोर!!
पण आतंकवादामुळे हे सुंदर केशराचं गाव आज  रक्ताने लाल होतंय.

चलो बुलवा है , भाग 3

#चलो_बुलावा_आया_है
#वैष्णवीदेवी_प्रवासवर्णन #भाग_तीन

खिडकीतुन एक गोंडस तिकीट बाहेर आलं.ते पाहुन #अनुरागलाही खुप आश्चर्य वाटलं!आणि मी आनंदाने ,उत्साहाने त्याच्या पोटावर जोरदार बुक्की मारण्याच्या पवित्र्यत उद्गारलो,''चलो बुलावा आया है माताने बुलाया है''!कारण तो सतत म्हणत होता की तुझं जाणं अशक्य आहे टिकिटच मिळणार नाहीये!आणि मीहि ते मनोमन स्वीकारलं होतं!

दिवसभर उत्साहात दिल्ली फिरलो. अक्षरधाम मंदीराला जाउन आलो.

रस्त्यात 'खेलग्राम' लागलं. तेव्हा सुरेशकलमाडींचे कांड आणि नंतर त्यांचा गझनीतील आमिर खान झालेला आठवला.

रात्री मात्र रोमांचाने..अति विचाराने..हुरहुरीमुळे..
थोड्याश्या भितीमुळे झोप येईना. विश्वास बसत नव्हता खरंच मी हिमालयाच्या जवळ जातोय..कारण तोवर मी नाशिकच्या पलीकडे कधी उत्तरेकडे गेलो नव्हतो.

संपुर्ण हिमालय फिरणे,
कैलासपर्वत बघणे,
मानस सरोवराच्या काठी पौर्णिमेची रात्र घालवणे आणि इजिप्तचे पिरॅमिड्स बघणे ह्या माझ्या लहानपणापासुनच्या स्वप्नांपैकी एका स्वप्नाच्या मी काहीसा जवळ जातोय याच आनंदात होतो!

 सकाळपासून काहीशा अस्वस्थतेतच उठल्यावर चलसंगणकावर (laptop)जम्मूच्या प्रसिद्ध 'रघुनाथ मंदिराची माहिती काढू लागलो असतानाच त्यावर आतापर्यंत त्या मंदिरावर झालेले आतंकी हल्ल्यांची त्यात मेलेल्या लोकांची माहिती दिसली!

हा कशाचा संकेत होता?
 मनावरचा ताण आणखीनच वाढला.

बॅगेत गरजेपुरतेच नेमके कपडे कोंबले पण अनुरागमुळे शेवटी मला निघायला उशीर झालाच!

 गाडी सुटेल की काय या ताणात 50 किमी दूर जुन्या दिल्ली स्टेशनाकडे निघालो मेट्रोमधून निघालो.

देव भलं करो बाप्पा त्या
मेट्रो वाल्यांचं!
 ''मत रो जब है मेट्रो'' हा किताब मी
''मेट्रोच्या नावानं चांग भलं'' म्हणत वाहिला.

अत्यंत वेगाने मी जुन्या दिल्लीच्या  गर्दी गोंधळात #धक्का(बुक्की नाही)देत आपल्या फलाटाकडे धावू लागलो.

 कारण मी जर धक्काबुक्की केली असती तर त्या दिल्लीच्या आडमुठ्या लोकांनी मला तिथेच उताणा पाडुन मला लाथा बुक्क्यांनी तुडवला असता.

खाली फलाटावर ' शालीमारएक्सप्रेस' नुकतीच स्नान करून  शुचिर्भूतावस्थेत उभी होती.
आणि मी हुश्श केलं.

मी पुन्हा एकदा आनंदात माझ्या बोगीचं माप ओलांडलं. बहुतेक मी वेळेत पोहचल्याचं पाहुन गाडीने एक जोरदार सुस्कारा टाकला आणि दुपारी ३:५०ला प्रस्थानाचा भोंगा वाजवला.

लवकरच  खिडकीबाहेर अनेक घरं..घरा बाहेर खाट टाकलेली..गाई म्हशी..भिंतींवर शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या..हुक्का ओढत बसलेले माणसं..बायकांचे ठराविक कपडे दिसताच #हरियाणातून चाललोय हे कळायला वेळ लागला नाही!

रात्री कधीतरी गुंगीत पठाणकोट  आल्याचं ऐकु आलं.1965 च्या युद्धात सर्वात जास्त झळ बसलेलं हे शहर म्हणुन आठवण झाली.

रात्रभर मी वरच्या बर्थवर मोठी बॅग सांभाळत देहाचं मटकुळं करून थंडीत कुडकुडत झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होतो.
बऱ्याच उशीरा रात्री कधीतरी झोप लागली होती.

 पहाटे सव्वा़पाचला "जम्मु आँ गया।"ची लोकांची बांग ऐकू आली! आणि मी रोमांचित झालो! तरिही काहीशा गुंगीतच जड डोक्याने उठलो.

पहाटेच्या काळोखात जम्मूच्या स्टेशनाबाहेर येताच 'कट्रा..कट्रा..' गाडीवाल्यांचे शब्द कानी पडताच माझ्यात उत्साह संचारला.
आणि 'तावी' नदीचे उगवत्या सूर्यासोबत दर्शन घेत गाडी पूर्ण भरल्यावरच एकदाची जम्मूबाहेर पडू लागली.

 आयुष्यात पहिल्यांदाच NH1 वरून जात होतो. मध्येच श्रीनगर..लेह ची पाटी दिसताच काळजात एक नाजुक कळ उमटली.

 थोड्या वेळाने हायवे सोडून गाडी डावीकडे कट्राला जाणाऱ्या कच्च्या घाटाच्या नागमोडी रस्त्यावरून जाउ लागली.

रस्त्यात असंख्य लाल तोंडाची माकडं रस्त्यावर दिसलीत.
आणि एक गोष्ट विलक्षण जाणवली की काही लोकं अगदी त्या गाडीचा कंडक्टरसुद्धा पाव,ब्रेड रस्ताभर माकडांसाठी टाकत होते.

 माकडांनाही याचा सराव असावा. कारण तेही प्रत्येक गाडीच्या खिडक्यांकडे  आशाळभुत नजरेने पाहायचे.दोन पायावर मध्येच उभे राहुन चालायचे.

मला त्या लोकांची ही गोष्ट फार आवडली.
त्यांच्या या कृतीमुळे माकडांचं गावात येण्यापासुन काही प्रमाणात तरी नक्कीच कमी होत असावं शिवाय त्यांना त्या निर्मनुष्य ठिकाणी अन्नही मिळत होतं.

मीही वापस जाताना माकडांसाठी ब्रेड घ्यायचं ठरवलं.

कटऱ्याला साडे नऊला पोहोंचलो.

एका मोठ्या राजघराण्यात आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख घालवण्यापेक्षा घराण्यातुन बाहेर पडुन कोणी छोटंसं का होइना स्वत:चं राज्य स्थापन करावं,स्वत:चं नाव, ओळख निर्माण करावी तसा  #हिमालयाचाच मुळचा कुटुंबीय असलेला #त्रिकुटपर्वत आपल्या उंच रांगासहित समोर ताठ बाण्याने उभा होता.
ते दृश्य पाहताच मला प्रचंड आनंद झाला.

मी त्याला नीट बघत होतोच तर पन्हाळ्याला सिद्दीजौहरने घातलेल्या पक्क्या वेढ्याप्रमाणे माझ्या अवतीभोवती हॉटेलच्या एजंट्सचा वेढा पडला!

बस्स…

आता वैष्णो देवी आणि माझ्यामध्ये तो प्रसिद्ध १५ किमीचा रस्ता आणि हा माझ्याभोवती पडलेला हा सिद्दी जौहरांचा वेढाच तेवढा होता.

देवीने मला अडथळे दूर करत इथपर्यंत आणलं होतं. त्यामुळे मी सुद्धा दर्शनासंबंधी एक कडक संकल्प केला.

 पण पुढे लोकांचं बोलणं ऐकून माझा 'तो' संकल्प मी पूर्ण करू शकेन की नाही ही दाट शंका दाटून आली.

-Abhijeet panse

अति उत्साहात एक कठीण संकल्प केला! चलो बुलावा आया है! वैष्णो देवी भाग 4

*चलो बुलवाआयहै प्रवासवर्णनभाग 4

अति उत्साहात एक कठीण संकल्प केला

मी पर्वत रांगा नीट बघत होतोच तर पन्हाळ्याला सिद्दी जौहरने घातलेल्या पक्क्या वेढ्याप्रमाणे माझ्या अवतीभोवती हॉटेलच्या एजंट्सचा वेढा पडला!

बस्स…

आता वैष्णो देवीच्या आणि माझ्यामध्ये तो प्रसिद्ध १५ किमीचा रस्ता आणि हा माझ्याभोवती पडलेला सिद्दी जौहरांचा वेढाच  होता.

देवीने मला अडथळे दूर करत इथपर्यंत आणलं होतं. त्यामुळे मी सुद्धा दर्शनासंबंधी एक कडक संकल्प केला. पण पुढे लोकांचं बोलणं ऐकून माझा 'तो' संकल्प मी पूर्ण करू शकेन का ही दाट शंका दाटून आली.

त्या हाॅटेल एजंट्सच्या च्या जबरदस्त वेढ्यात मी पुरता अडकला होतो.बाहेर पडायला रस्ताच सापडत नव्हता.आणि शेवटी मी गड हरलो.कारण माझा बाजीप्रभु माझ्या सोबत नव्हता.

एका एजंटने माझा पिच्छा शेवटपर्यंत पुरवला आणि तो मला घेउन अनेक गल्ली बोळाच्या भुलभुलैय्यातुन जात
एका सराया प्रकारातील(चाळ) जुन्या कोंदट लाॅजवर घेउन आला.

'अस्वच्छ' हा शब्दही मी म्हणु शकत नाही.कारण त्यातही  'स्वच्छ' हा शब्द येतो.
इतकी ती घाण  खोली होती.वर येतानाच खाली बेसमेंटला साचलेल्या पाण्यातुन रस्ता काढत आलो होतो.

बनारसमधल्या रस्त्यांवरील पांडे,चौरोसिया हलवायांच्या जिलेबी काढण्याच्या कढईवर आणि धोतरावर जसा काळा तवंग साचला असतो तसा त्या खोलीतील ओल्या गाद्यांवर साचला होता.

स्वच्छतागृहात तर आनंदी आनंदच होता. अपेक्षेनुसार नळाला पाणी नव्हतं.
स्वच्छतागृहात गेलेला प्राणी आणखी अस्वच्छ होउनच बाहेर येईल अशी परिस्थिती होती.

मी तिथे थांबण्यासही सरळ नकार दिला.पण अजुन हाॅटेल शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिथेच खाली आॅफिसमध्ये सॅक ठेवण्याचं ठरवलं.

 त्या उत्तरेकडील गावातील प्रचंड थंडीत खालुन कोमट पाणी आणुन स्नान करुन एकदाचा मी त्या कोंदट सरायामधुन बाहेर पडलो आणि स्वच्छ उबदार उन्हात बाहेर आलो.

पोटात पडलेला खोल खड्डा एका पंजाबी हाॅटेलातील कुलचा,छोले आणि वाडगाभर दह्याने काठोकाठ पुर्ण बुजवला.

त्याच हाॅटेलच्या एका स्टाफ प्रमुखाला;वर पोहचायला किती वेळ लागतो..कसा व किती रस्ता आहे वगैरे जुजबी माहिती विचारली असता तो सुरवातीला म्हणाला,''आप साउथ इंडियन हो ना?मै भी साउथसेही ही हु!''

ही अडचण मला नेहमी जाणवते.
 उत्तर भारतात मला  दक्षिणेकडला समजतात.तर तिकडे दक्षिणेत तामिळनाडुत उत्तर भारतीय म्हणुन नाक मुरडले जाते.

त्याने सांगितलं की आता चालणं सुरू केलं तर दुसऱ्या दिवशीच मी परत येऊ शकेल .वर 'भवन' पर्यंत म्हणजे गुहेपर्यंत जायला 8  तास लागतात वगैरे सांगितलं.
त्यामुळे आता झोपुन प्रवासाचा शीण घालवावा आणि रात्री चालायला सुरवात करावी असा मौलीक अनुभवी सल्लाही दिला.

दर्शनाची 'पर्ची' काढावी लागते हे कळल्याने मी जवळच असलेल्या पर्ची काउंटरला गेलो.तिथे एका गोड मुलीने ''नाम और कहा से आए'' वगैरे विचारत फोटो काढत मला पर्ची दिली.

आता मी पुर्णपणे सज्ज झालो होतो माता वैष्णवी देवी दर्शनाला!

दोन किमी चालत गेल्यावर एक मोठं संगमवरी कमान असलेल्या महाद्वारापाशी पोहचलो.इथुनच तपासणी झाली की लोकं चालणं सुरू करतात.

समोर शिखरावर थोडंफार बर्फ असलेल्या पर्वत रांगा दिसत होत्या.

मी सर्वप्रथम पायरीवर डोकं टेकवुन मनापासुन धन्यवाद केलं.

आणि मी माझा तो संकल्प केला.
मी स्पष्ट शब्दात म्हटलं की देवीचं दर्शन होइपर्यंत संपुर्ण पंधरा किमी मी कुठेही खाली बसणार नाही !
कुठेही कशावरही बसुन विश्रांती घेणार नाही.

मी खुपच आनंदात (अति)उत्साहात होतो त्यामुळेही कदाचीत असा संकल्प केला असेल.
पण आता संकल्प केला होता.

और एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो फिर एरवी मै वैसे सबकी सुनता हुं!लेकिन उस दिन किसीकी नही सुनी!खुद की भी नही!

सकाळी साडे अकराला मी चालणं सुरू केलं.जवळच घोड्यांचं काउंटर होतं.घोडा करण्यासाठी घोडेवाले मागे लागत होते.पण या घोड्याने आधीच संकल्प केला होता पायी जाण्याचा!!

आणि एरवीही मी घोड्यावरुन प्रवास करण्यासारखे पोचट प्रकार केले नसतेच!
पायाची रग जिरवायला याहुन चांगली संधी कधी मिळणार!

पण....अहंकाराचा बंगला कोसळतोच!
माझाही चालण्याच्या संकल्पाचा अहंकार देवीने मोडला!

पोटातील कुलचा..छोले..आणि उंटासारखं घशापर्यंत प्यायलेलं पाणी आता शिक्षा ठरू पाहत होतं.पोट टरारून फुगलेलं..वरून उन्ह..प्रवासात रात्री न झालेली झोप..चढा रस्ता..
मला मळमळायला लागलं..
जीव कासावीस व्हायला लागला.
अचानक कंबर,पाठ प्रचंड दुखायला लागली.
एक पाउलही टाकणं अशक्य झालं.

पोटातील छोले आणि इतर पदार्थात द्वंद्व युद्ध सुरू झालं होतं बहुतेक.चण्यांनी आपलं आकारमान वाढवुन अनधिकृतपणे पोटात जागा व्यापली असल्याने त्यांच्यात हाताघाईची लढाई सुरू होती.

आता ही लढाई अधोमार्गाला प्रेरित करते की उर्ध्व मार्गाने बाहेर येउन ते शहीद होतात याचा जालीम ताण मला येउ लागला.

माझ्या शरीररूपी टीमच्या विकेट्स भराभर पडु लागल्या!ओपनर्स,मिडल आॅर्डर तर कधीच कोसळली होती.

मी हळुहळु एकेक पाउल टाकत चालत राहिलो.खाली बसुन विश्रांती घ्यावी असं प्रकर्षाने वाटत होतं.तथाप ती गरज होती.
पण संकल्प केलेला...

पाठ,कंबर भयंकर दुखायला लागल्याने मधुनच कंबरेत वाकुन हात गुडघ्यावर ठेवत डोळे मिटुन काही क्षण श्वास घ्यायचो.
पुन्हा चालणं सुरू करायचो.
अद्याप दोन किमीही चाललो नसेल.

पण लवकरच डोळ्यांसमोर अंधार दाटु लागला..घामाने चिंब भिजलो.जॅकेट काढुन टाकलं.

आता तर एक पाउल टाकणंही अशक्य झाल होतं.कुठल्याही क्षणी मी खाली कोसळुन पडेल असं वाटु लागलं.आणि मग मात्र मी घाबरलो.

घरी न सांगता इथे इतक्या दुर आलो होतो.

जवळच रस्त्याच्या डाव्या बाजुला एक बकुळीच्या झाडाशी साधर्म्य असलेलं एक ठेंगणं झाड होतं.मी हळुवार पावलं टाकत तिथपर्यंत गेलो.आणि चक्कर येउन पडु नये म्हणुन त्याची एक जाडी फांदी डाव्या हाताने घट्ट पकडुन ठेवली.

तिथेच एक लोखंडी बाकडंही होतं.त्यावर बसण्याचा मोह मी प्रचंड प्रयत्नपुर्वक टाळत होतो.

त्या झाडाच्या सावलीत डोळे मिटुन हळु लांब श्वास घेत राहिलो....शरीर थरथरत होतं..

वर 15 किमी चालत जाणं आणि दर्शन आता एक अशक्यप्राय गोष्ट झाली होती..

-अभिजित पानसे

जय माता दी ,वैष्णो देवी प्रवास वर्णन भाग 5

प्रवासवर्णन अंतीमभाग

सर्वांग ठणकत असताना वैष्णवी देवी दर्शन झाल्यावर  दर्शन मी खाली बसणार तर भैरवनाथ शिखरला जायचं आठवल्याने तिकडे निघालो.हा खडा तीन किमी चा रस्ता सरळसोट ६ किमी रस्त्याच्या बरोबर आहे. संपुर्णपणे शरीर पिळवटुन टाकतो.

पोळ्यातील बैलासारखा नाकाने फुस फुस करत दम टाकत शेवटी एकदाचा शिखरावर जाउन पोहचलो!आणि जे अप्रतीम दृश्य दिसलं ते शब्दातीत होतं.

खाली कटरा गावातुन चालणं सुरू करताना वर उंचच उंच पर्वत शिखरे दिसतात ,ते या भैरवशिखरावर आल्यावर व्यक्तीच्या डोळ्यांच्या समांतर येतात.तिथुन संपुर्ण परिसर दृष्टीपथात येतो.पलिकडे काश्मिर खोऱ्याकडे जाणारे डोंगर..अलिकडे कटरा गाव..वाहणारी नदी.आजूबाजूला जंगल..जिकडे बघावं तिकडे पर्वत माळा..लोकांचे कँमेरे सरसावु लागतात.त्या अजस्त्र पर्वतमाळांना आपल्या प्रमाणेच क्षुद्र कँमेरात चित्रबंद करू पाहण्यासाठी!.

भैरवनाथाचं दर्शन घेतलं .दुपारचे साडे पाच वाजले होते. माझा संकल्प पुर्ण झाला होता.आणि मी माझ्या पायांना ,पाठीला,शरीराला,शरीराच्या आतील चैतन्याला धन्यवाद म्हणत जमिनीला कृतज्ञतेच्या भावनेतुन नमस्कार करून एकदाचा खाली बसलो.
हुश्श....!! खुप खुप बरं वाटलं.आराम मिळाला.

सुर्यास्त होउ लागला.नागमोडी वाहणारी नदी क्षितिजाला स्पर्शत होती तिथेच सुर्य ही विसावत होता.जणु भगव्या सुर्यबिंबातून नदी उगम पावतेय भासत होतं.

पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेण्यात मग्न होती.त्यामुळे काही क्षणात सुर्य दिसेनासा झाला.

या जागेवरून सूर्योदय ही खूप सुंदर असा विचार मनात आला.
 सुर्यास्त झाला तशी अचानक इतक्या वेगाने थंडी वाढली की सहन करणं अशक्य होउन बसलं.खाली वैष्णो देवीचं मंदीर लाईट्स ने उजाळुन उठलं होतं.तिथुन नमस्कार करुन मी पळत खाली निघालो.

उतरत्या रस्त्यावर सलग १८ किमी एका लयीत धावत खाली उतरलो.जेव्हा त्या गल्लीबोळातील हॉटेल शोधुन काढत बँग उचलुन बाहेर आलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते.फक्त दोन ते अडीच तासात मी न थांबता धावत पोहचलो होतो.

पुन्हा काही खाण्यासाठी परत त्याच हॉटेलला गेलो तो सकाळचाच दाक्षिणात्य मॅनेजर भेटला. त्याला वाटलं त्याने सांगितल्या प्रमाणे मी आता निघतोय वरती चालायला..
त्याला जेव्हा कळलं मी दर्शन करून परत ही आलोय तेव्हा खूप आश्चर्यचकित झाला.

बाहेर येऊन बघितलं तर अजून एक सुखद धक्का चौकात हरियाणा सरकारची कटरा ते दिल्ली बस लागलेली होती.पूर्ण बस रिकामी आणि स्वच्छ होती. सकाळी 10 ला पोहचलो होतो आणि रात्री 10 ला 30 किमी चालत दर्शन आटोपून परत ही निघालो होतो.

 मी निवांत पूर्ण सीटवर झोपलो.जाग आली ती सकाळी हालचाल जाणवल्याने.मी उठून बसलो तर बघितलं संपूर्ण बस सरदारजींनी भरलेली होती.
 काही लोक उभेही होते!पण कोणीही मला उठवलं नव्हतं.मला फार अवघडल्यासारखं वाटलं.बाहेर बघितलं, संपुर्ण रस्ता धुक्याने दिसेनासा झाला होता.स्वच्छ काळाशार NH1 वरून वेगाने बस आणि इतर गाड्या जात होत्या. अंबाला नुकतंच सोडलं होत.दुपारी 1 वाजता दिल्ली काश्मिरी गेट बस स्टॅन्डला बस थांबली .आणि पहिल्या वहिल्या उत्तरेकडील प्रवासाचा शेवट झाला.

त्याच्या पुढच्या वर्षी 13 फेब ला पुन्हा एकदा वैष्णो देवीला जाण्याचा योग आला. दोन दिवसांनी भारत पाकिस्तान वर्ल्डकप मॅच होती.यावेळी कटराला ओळख झालेल्या दिल्लीच्या 2 मुलींसोबत संपूर्ण ट्रेक झाला.मागच्या वेळी सकाळी चालत गेलो असल्याने यावेळी रात्री चालण्याच ठरवलं होतं.

उत्तरेकडील थंडी हुकूमशाहा असते तिच्यापुढे झुकावंच लागतं. हे पहिल्यांदा अनुभवलं.अंगावर तीन तीन जॅकेट्स असूनही ते बर्फासारखे थंड पडले होते.रात्रभर आम्ही चालत होतो.काही किमी तर संपुर्ण रस्त्यावर फक्त आम्ही तिघेच होतो!रात्री 2 वाजता मंदिरापशी पोचलो.

 यावेळी आश्चर्यचा मोठा सुखद धक्का बसला.मूळगुफेचा रस्ता उघडा केला होता. मला इतका प्रचंड आनंद झाला होता की मागच्या लोकांना की पुढे जाऊ दिलं आणि मी एका ठिकाणी उभा राहून संपूर्ण गुफा काहीवेळ न्याहाळत राहिलो!!खूप सुंदर पिवळ्या दगडाची गुफा आहे.खाली बर्फासारखं गार पाणी!वैष्णवी मातेचं दर्शन झालं!मागच्या वेळीची गुफेतून जाण्याची इच्छा यावेळी पूर्ण झाली होती.

बाहेर येऊन पाय जोड्यांमध्ये घालेपर्यत आपल्यला पाय आहेत याचा विसर पडला होता इतके थंडीने बधीर झाले होते!
काहीजागी उबेसाठी धगधगते निखारे मोठ्या भांड्यात ठेवले होते.लोक तिथे हात पाय शेकत होते.

आम्ही सकाळची वाट न बघता भैरवनाथ ला निघालो.गुफेतून दर्शन झाल्याने उत्साह संचारला होता.रस्त्यात  मुद्दामून त्या हरियाणवी ऍक्सेन्ट मध्ये गंमती सांगत आम्ही चाललो होतो. सोनम ही मूळची हरियाणाची असल्याने ऑनर किलिंग च्या खऱ्या गोष्टी सांगितल्या. हिंदी मुविज मराठी ऍक्टर्स..मुविज यावर ही मी बोललो.

त्यांना तीन चार मराठी वाक्य बोलायला लावलेच!!
मग सोडतो की काय!!!!

भैरवनाथ ला पहाटे पाच वाजता पोचलो! रस्त्यात बरेच ठिकाणी खूप बर्फ पडला होता!

 तिथेही निखाऱ्यांची सोय केली होती.जेथुन आधीच्या वर्षी सूर्यास्त बघितला होता.त्याच जागेवरून पलीकडच्या शिखराआडून पुढच्याच वर्षी 14 फेब्रुवारीला सुंदर सूर्योदय बघितला!
सूर्य पूर्व क्षितिजावर प्रकट होत होता.
सूर्याच्या केशरी किरणांनी संपुर्ण खोरं ..पर्वत शिखरे न्हाऊन निघाले होते..

(समाप्त)

Monday, 25 December 2017

निघाली टूर टूर

''निघाली टूर टूर''
(23 जानेवरी 2008, लोकसत्ता.)

हॅलो फ्रेंड्स!
नुकतच आॅटो एक्स्पो एक्जिबिशन संपलय,एक दोन 'नॅनुटल्या' बुक केल्यात की नाही!
आता लाख दिड लाखच्या बाईकवर टांग टाकण्यापेक्षा...नॅनोचचे सुकाणु हातात घेत इतरांना 'टाटा' म्हणत पिकनीकला जाणे सोयीस्कर!
शेवटी लाख मोलाचं 'रतन'..रत्न आहे ते!

आणि सध्या ट्रीप्स..टुर्सला जाण्याचा सिजनही सुरूच आहे!

हे फ्रेंड्स जानेवरी फेब्रुवारी म्हणजे शाळा..काॅलेजमध्ये ट्रिप्स..इंडस्ट्रियल टुर्सचा काळ असतो!!

शाळेत असताना ती टुमदार सहल असते,ज्युनिअर काॅलेजमध्ये ती ट्रीप..आणि प्रोफेशनल काॅलेजची पायरी ओलांडल्यावर  इंडस्ट्रियल टुर होतो.

शाळेच्या सहलीत खिडकीतुन पळती झाडे पाहण्यात तर काॅलेज टुरमध्ये 'कोणती'मुलगी कुठे बसलीए हे पाहण्यात आणि त्यानुसार आपली सीट ठरवण्यात रस असतो.

या सर्व सहली..टुर्स आयुष्यभरासाठी गोड,तिखट,आंबट,चिंबट आठवणींचा खजीनाच असतो.

आई बाबांच्या कृपेने मी शाळा काॅलेजमधील कोणतीच सहल..टूर चुकवला नाही!

आठवीत सहलीमध्ये वेरूळच्या लेण्या पाहताना;प्रथमच बर्म्युडा घातलेले फाॅरेर्नसच्या दर्शनाचा योग आल्याने त्या अजब प्रेक्षणीय प्राण्यांकडे पाहत त्यांच्याशी मराठीतुन इंग्रजीत बोलता बोलता कधी इतरांपासुन दुर जात मी व माझा मित्र अनिकेत आम्ही लेण्यांच्या बाहेर येउन भरकटलो कळलेच नाही.दुर्दैवाने त्यावेळी 'मोजणी' न झाल्यामुळे आम्हाला तेथेच टाकुन बस निघुन गेली होती.नशिबाने नंतर लक्षात आल्याने गहाळ झालेलो आम्ही सुस्थितीत सापडलो.आजही हा आमचा पराक्रम दरवर्षी शाळेत सहलीपुर्वी,''सहलीत घेण्याची काळजी'' या सदरात सांगितला जातो.

काॅलेजमध्ये टुरची तारीख जशी जशी जवळ येउ लागते तसा हालचालींना वेळ येउ लागतो.खास ठेवणीतले कपडे,जॅकेट्स,विंटर वेअर्स, डिओज...मुलींना इंम्प्रेस करण्याच्या क्लुप्त्या,ट्रिक्स योजल्या जातात..आणि ट्रीप दुसऱ्या दिवसावर येउन ठेपते.

ओवरएक्साइटेंटमेटमुळे रात्री झोप लागल्या लागत नाहीच.अलार्म किंचाळायायच्या आधीच बिछाना त्यागला असतो.पहाटे अंधारात स्वत:ला लोकरीत गुंडाळुन डिओचे, अत्तराचे फवारे  अंगावर उडवुन घमघमाटात काॅलेजला येउन पोहचतो.उगाचच त्यावेळी इतर अंथरूणात लोळत पडलेल्यांविषयी कुत्सितपणे दया वगैरे वाटते जणु काही आम्ही रोजच पहाटे फिरायला जातो.

कोणीतरी बसजवळ नारळ फोडतं..महाराज की जय होतं..आणि आमचा चार..सहा चाकी रथ धुराळा उडवत धावायला लागतो.

असो.ट्रीप म्हटली की,भसाड्या आवाजात गाणे आलेच,चटर फटर खाणे, धिंगामस्ती,शाॅपिंग या गोष्टी आल्याच..

पण..पण एका 'अटळ' गोष्टीचा आणि ट्रिप..टुर्सचा inevitable घनिष्ठ संबंध आहे..
होता..आणि राहील...!!!

या अटळ गोष्टीशिवाय जगातील कुठलीच सहल पुर्ण होउच शकत नाही!!

गेस वाॅट??
नाही कळलं??

ती न चुकवता येणारी गोष्ट म्हणजे '"उलट्या''...ओकाऱ्या..
VOMITING"!!!

या उलट्यां ओकाऱ्यांशिवाय कुठली सहल,टुर झाला असेल तर शपथ!!!!!

माझा पुर्वानुभव आणि समज असा होता की उलट्या,ओकाऱ्या हे कार्यक्षेत्र फक्त मुलींसाठीच राखीव!
आम्हा धडधाकट मुलांना असले त्रास नसतात म्हणुन त्याचा मला अवास्तवी अभिमान होता.

पण माझ्या या पुरूषी अभिमानाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या त्या दहावीतील चिखलदरा एकदिवसीय ट्रीपमध्ये!!

महाराष्ट्र मंडळ डेपोच्या ''स्वच्छ आणि सुगंधित'' बस ठरवुन आमची चिखलदऱ्याला सहल ठरली.
मी आणि माझा जिग्री दोस्त गौरव, आम्ही 'कंडक्टरची' सीट मिळवली!म्हणजे एकदम दाराजवळच!!

 त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे याची आम्हा बापड्यांना कुठे कल्पना होती!

सकाळी सकाळी आम्ही उत्साहात चिखलदऱ्याकडे निघालो.ट्रीप म्हटलं की 'चिवडा' हा खाद्यपदार्थ येथे चोवीस तास विनामुल्य मिळेल अशी स्थिती असते.

मुली नाजुक गोड आवाजात तर मुलं घसा फाटेल की स्वरयंत्राचा स्फोट होइल की काय अशा आवाजात गाणी म्हणत होती.नाचणे वगैरे दणक्यात सुरू होतेच.

गाऊन,नाचुन शरीराला शीण जाणवला की पोटात 'चिवडा' ढकलायचा!
कोणी चुकुनही भुकेचे नाव घेतले की,त्याच्या तोंडात चिवडाच कोंबायचा!वर्षभर कधीही एक शब्दही न बोलणारी मुलगी ट्रीपमध्ये ''चिवडा हवा का? ''विचारतेच.

बसच्या समोरील सीटपासुन तर शेवटपर्यंत चिवड्याचे दळणवळण होत सर्वांचे खाणे सुरू होते.

खाउन खाउन थकलेले काही रवंथ करत होते.
घशापर्यंत पाणी प्यायल्याने पोटातील पोह्यांसोबतच सर्वांची पोटे टरारुन फुगलेली!

मला कळत नाही सहलीची हवा मानवली म्हणुन की आणखी काय पण सगळ्यांना भुका लागुन जेवणाची 'धडाडी' दाखवली!!

चिखलदऱ्यापासुन एका तासाच्या अंतरावर सर्वांनी एका शेतात आपापल्या डब्यातील(टिपीकल) उकडलेल्या बटाट्याच्या भाजीवर ताव मारत वनभोजनाचा आस्वाद घेतला.कोणाचे ''आलु के पराठे'' कोणाचा मसाले भात....

मला स्पष्ट आठवते मनीष मेहरे नावाच्या एका मुलाने जेवणानंतर ' शेंगदाणे खरमुरे' विकत घेतले होते आणि ते त्याने एकट्यानेच खाल्ले!

दुपारचे साडे बारा वाजलेले.सर्वजण आता पेंगायला लागलेले होते आणि आमच्या बसने चिखलदऱ्याचा घाट चढण्यास प्रारंभ केला.

सगळे गुंगीत,तंद्रीत डोळे मिटुन निद्रेचा आस्वाद घेत होते.

आणि कुठून तरी 'अ ते ज्ञ' या बाराखडीत न लिहीता येणारा ''ओए~~क'' असा काहीसा  जोरदार आवाज माझ्या कानी पडला.

आवाज अगदी जवळुन आलेला वाटला!

म्हणुन मी डोळे किलकिले करुन प्रथम डावीकडे  शेजारच्या गौरवकडे पाहिलं; तर तो त्याच्या अर्धवट उघड्या तोंडातुन ब्रम्हांड दिसेल अशा स्थितीत गाढ झोपला होता.

त्याचक्षणी माझं लक्ष समोर गेलं..

एक मुलगी दारात येउन मोठ्ठाले आवाजात 'ओकत' होती.

हळुहळु पुर्ण बसला जाग आली आणि तसा प्रत्येक जण दारात येउन,हत्ती सोंडेतुन पाण्याचा फवारा उडवतो तसे पोटातील अपचित द्रवपदार्थाचे  फवारे उडवु लागले.तेही आमच्या अगदी निकट!

सरांनी भराभर सगळ्यांना 'उलटीच्या गोळ्या' आणि 'पाॅलिथीन्स प्लास्टिक चे पुडके' वाटप केले.

बस घाटाचा रस्ता जसजसा चढत होती तसतसे बसमध्ये आत आमच्या अगदी जवळ मानवी जठरातील द्रवपदार्थांचे फवारे उडत होते.
जो तो प्रत्येक जण, मुलगी मुलगा दारात येउन ''ओएक..ओए~~क...''असे आवाज करत स्वत:चे पोट 'साफ' करत होते.
आणि आम्ही त्या द्रवपदार्थांचे शिंतोडे आमच्या पायावर न उडवेत म्हणुन पाय सीटवरती जवळ घेउन हतबलपणे सारं काही पाहत होतो..ऐकत होतो..

एक दृश्य माझ्या डोळ्यासमोरून कधीच विस्मरणात जाणार नाही ते म्हणजे तो जाडा मनीष इतका एकसारखा उलट्या करत होता की त्याचं पातळ पाॅलिथिन बॅग काठोकाठ भरलं तरी त्याची रावणाच्या लघुशंकेसारखी  ओकारी काही केल्या संपेचना!
शेवटी 'ओवरफ्लो' होउन त्या  पित्तमिश्रित द्रवपदार्थांचं वजन न पेलुन त्याचं पाॅलिथिन फाटलं.आणि सर्वकाही त्याच्या मांडीवर........

मी आणि गौरव आमच्या 'फ्रंट  सिटवरून' समोर..मागे वळुन कोणाकोणाची विकेट पडतेय..सर्व निरीक्षण करत होतो.

गेल्या दीड तासात संपुर्ण बस 'भरली' होती.

60 मुलांमध्ये फक्त मी,गौरव,सरआणि दोन मुली सोडुन सगळ्यांची पोटं 'साफ' झाली होती.

आमच्या इच्छित ठिकाणी पोहचायला काही मिनिटांचाच अवकाश होता.घाट संपत आला होता.त्यामुळे मी व गौरव एकमेकांचा 'विल पाॅवर' वाढवत होतो.कारण प्रत्येकाचा फवारा..आवेग..यांचे आम्ही डोळ्यांनी,नाकांनी,कानांनी फक्त एक दोन फुटाच्या अंतरावरुन साक्षिदार होतो.

अशातच गौरवचा विल पाॅवर डगमगु लागला.त्याला प्रचंड मळुमळु लागलं.

त्याने घाईघाईत सरांकडुन गोळी घेतलीं.
'आॅ ~' करुन तोंडात घातली.आणि पाणी पिउन तिला गिळणारच!
तोच त्याच्या घशातुन एक जोरदार लोंढा आला आणि त्या गोळीसकट बाहेर पडुन खाली सांडला..

ती बिचारी पांढरी गोळी तिच्या इच्छित स्थळी पोहचायच्याऐवजी खाली त्या रंगीबेरंगी चिखलात निपचीत पडुन होती.

माझा मित्र गौरवसुद्धा, किल्ल्याचा एक सरदार धारार्तिथी पडला.
आता मीच एकटा किल्ला प्राणपणाने लढवत होतो..
स्वत:ची हिंमत वाढवत होतो.

शेवटी एकदाचं आम्ही चिखलदऱ्याला येउन पोहोचलो.

आत्मस्तुतीचा दोष पत्करुन सांगतो की मी अगदी स्वच्छ कोरड्या अवस्थेत पोहोचलो..जिंकलो..

बसच्या दरवाज्यात..पायऱ्यांवर पित्तमय दुर्गंधी  पिवळ्या हिरव्या पदार्थांचा चिखल  झाला होता.

एका धाब्यावर बस थांबवुन सरांनी पाणी मागवुन सर्व मुलांना बस धुवायला लावली.त्यातुन फक्त ज्यांचा बस भरवण्यात वाटा नव्हता त्यांनाच सुट होती.आणि माझा त्यात खारीचाही वाटा नसल्याने मी मस्तपैकी बाहेर बसुन होतो.

आणि तेव्हा आत बस धुण्याऱ्या मुलांपैकी एक मुलगा ओरडला की त्याला आत बसमध्ये एक पुर्ण अख्खा 'शेंगदाणा' सापडला!!

मला एकदम 'मनीष' आठवला!!

(कृपया हा लेख जेवताना,वा जेवणाच्या एका तासापुर्वी व नंतर वाचु नका.)

आजही गौरव मी आम्ही जुने मित्र भेटतो तर या 'अविस्मरणीय' सहलीबद्दल आठवुन प्रचंड हसतो.आणि आजही आम्हाला एका गोष्टीचे प्रचंड कुतूहल..प्रश्न पडतो की त्या मनिष मेहरेच्या फाटलेल्या पाॅलिथीन बॅगेतुन ''संपुर्ण शेंगदाणा'' कसा काय निघाला??

फ्रेंड्स काॅलेज टुर ही अशी एकमेव गोष्ट आहे ज्यामध्ये रोज काॅलेजमध्ये  मेकअप करून नटुन येणाऱ्या मुलींचं खरं रूपडं..तेलकट आंबलेले चेहरे..सुजलेले डोळे दिसुन येउ शकतं.

शिवाय प्रत्येकाच्या 'पचनशक्तीचा' अंदाजही कळतोच.
जिम मध्ये अॅब्स..बायसेप्स वगैरे बनवलेल्या मुलांचिही पचनसंस्था दुबळीअसु शकते हे ट्रिप्स..टुरमध्येच कळु शकतं.

रात्री पुर्णत: बंद ट्रॅवल गाडीत कोणाची तरी 'सनई'..'चौघडा'..कधी कोणी कितीही 'कंट्रोल' केलं तरी 'नगारा'ही वाजतो.
कोणाचे सायकलच्या चाकात पंपाने हवा भरल्यासारखे आवाज..

असाच कुठला ''हवा का झोका'' रात्री 'हवाबंद' बसचे 'हवामान' खराब करतं.

या काही अटळ कटुसत्य गोष्टी तर प्रत्येकाने काॅलेजची टुर एन्जाॅय करावी. आयुष्यभर या आठवणी सोबतीला राहतात.

आणि फक्त मित्रमैत्रिणिंसोबतच नाही तर आपल्या कुटुंबासोबतही,नातेवाईकांसोबतसुद्धा जमेल तेव्हा सहलीला जावेच.

पुर्वीपासुन प्रवासाचं महत्व 'चरैवति चरैवति..''करावे देशाटन..''सगळे सांगत आलेय.

एक नेहमी लक्षात ठेवावं फिरण्याने पायाचे स्नायुच नाही तर मनही मोकळं होतं.

म्हणुन ''चरैवति चरैवति..''

-अभिजित पानसे