Showing posts with label केदारनाथ प्रलय. Show all posts
Showing posts with label केदारनाथ प्रलय. Show all posts

Thursday, 6 December 2018

महादेव की कसम

दुसरा भाग


“ये कहानी थी मेरी..
लेकीन हमारा शरीर था जो हमे छोड चुका था!
लेकीन इस दिल मे आग अब भी बाकी थी!
हम उठ सकते थे! बोल सकते थे!
अबे कोई तो आवाज दे के रोख लो
आज भी ये लडकी हां बोल दे तो महादेव की कसम अब भी वापस आ जाये!
पर नही अब साला मूड नही
आखे मूंद लेने मे ही भलाई है!
पर उठेंगे कही उसी गंगा किनारे डमरू बजाने को उसी बनारस के गलियो में दौडने कों.. किसीं झोया के प्यार मे फिर से पड जाने को”

१३ जून २०१३ला डेहराडूनला पीवीआर चित्रपटगृहात ‘रांझना’ बघताना शेवटच्या या ओळी ऐकताना भावनिक झालो होतो. १७ जून त्या दिवशी हेच वाक्य मनाच्या पृष्ठभागावर येत होते. मी चिंब भिजलेलो , थंडीत एका ठिकाणी पडलो होतो. आजूबाजूला जंगल. लोकांचा आक्रांत कानी पडत होता. ग्लानीत जात होतो. कदाचित ती शेवटची वेळ असावी असं जाणवत होतं. डोळ्यासमोर सगळा भूतकाळ येत होता. तेवढ्यात एक  नेहमीचा आवाज ऐकू आला.  नोकियाच्या विंडो फोन चा तो आवाज होता.

ते पाच दिवस

“ओह शीट!  ओहह माय...गॉड!” मित्राची जोरदार किंचाळी ऐकू आली.
“ जितू ये देख क्या मिला है!” पुढच्या क्षणाला तो दबक्या आवाजात  दोन मोठ्या दगडांमध्ये झुडुपात बघत मला उद्देशून ओरडला. त्याला त्याच्या आवाजावर नियंत्रण ठेवणं जड गेलं.  मी तेव्हा आधीच वेगळ्या मनस्थितीत होतो, वरवर उत्साह आनंद दाखवत होतो पण आतून एक विचित्र अस्वस्थता अनुभवत होतो. त्यामागे कारण ही तसंच होतं. मी काही अंतरावर त्याच्या मागे होतो , सेलफोनने आजूबाजूचे फोटोज काढत होतो. त्याची दबक्या आवाजातील किंचाळी, हांक ऐकल्यावर मी तिकडे वळलो. त्याने जे दाखवलं , मला जे दिसलं ते डोळे विस्फारणारं होतं. पण मनात कुठेतरी त्याचा अंदाज होताच की कदाचित असलं काहीतरी दिसू शकेल.
तो एक मनुष्याचा हाडाचा सापळा होता. कवटी जागेवर आणि छातीच्या फांसळ्या  होत्या. शेजारी हाताचे हाडं विलग होऊन पडले होते. आम्ही तेव्हा ‘रामबाड्या’च्या जवळ नदी जवळून आडमार्गाने जाणाऱ्या जंगलातून जात होतो. रामाबाडा. केदारनाथपासून सात कीमी अलिकडील एक छोटं गाव. खरंतर रामबाडा हे गाव  आज अस्तित्वात नाही. पण पूर्वी होतं. १७ जून २०१३ पर्यंत तीनशे दुकांनाचं , शेकडो लोकांचं ते गाव होतं. आणि मी ते बघितलेलं होतं.
“वन्स अपॉन ए टाईम देअर वॉज ए रामबाडा हिअर” असं आज म्हणावं लागेल.  ज्याचं समूळ अस्तित्व नष्ट झालं ‘त्या’ दिवशी. मला ते बघताना प्रचंड गलबलून आलं, भावनांचा विचित्र आगडोंब उसळून आला , कानांत जोरजोरात किंकाळ्या, वेदनांनी भरलेले आवाज, हांका ऐकू येऊ लागल्या. माझा जीव गुदमरू लागला. मळमळायला लागलं. मी सरळ परत निघालो. आम्ही होतो तेथून केदारनाथ सात किमी होतं. गौरीकुंडापासून जवळपास आठ किमी दूर आम्ही आलो होतो. मी म्हणालो मी इथे थांबू शकत नाही! मला जायचे नाही केदारनाथला! मित्राला खूप आश्चर्य वाटलं. तो गोंधळला. कारण त्याला कारण माहिती नव्हतं. मी म्हंटलं की आय एम रिअली सॉरी बट आय कान्ट बी हिअर नाव!
लेट्स गो बॅक! तो विचारू लागला की अचानक काय झालं! एक हाडाचा सापळा दिसला म्हणून इतकं काय विचार करतोय नकारात्मक!

मी म्हणालो, की मी नाही सांगितली एक गोष्ट तुला इथे येण्यापूर्वी ! मला वाटलं होतं की मला काही अडचण येणार नाही पण मला खूप अस्वस्थ वाटतयं. मी परत जातो सोनप्रयागला. तुम्ही लोक जा केदारनाथला ! दर्शनाला! मला दर्शन ही घ्यायचं नाही! त्या शंकराचं तोंड ही बघायचं नाही! मी वेगळ्या कारणासाठी आलो होतो इथे! पण मला शक्य नाही वाटत आता!

तोवर बाकी दोघेजण आलेत. पलीकडील रस्त्यावरून आवाज दिला. आम्ही दगडातून ,गवतातुन चालत रस्त्यावर आलो. जवळपास कोणीही पोलीस किंवा इतर कोणी केदारनाथ संबंधित अधिकारी दिसला नाही. त्यांना त्या सापळ्याबद्दल सांगणं गरजेचं होतं. मी एकटा परत निघालो. दुपारचे अडीच वाजले होते. मला त्यांच्या ट्रिपचा मूड खराब करायचा नव्हता म्हणून मी त्यांना तुम्ही पूढे जायला सांगितलं. मी सोनप्रयागला वाट बघतो तुम्ही पुढे जा. दोन दिवसांनी किंवा उद्या या! मला गौरीकुंड गावीही थांबायचं नव्हतं. कारण ती जागा ही मला अस्वस्थ करित होती. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटत होतं की मी परत जाण्याबद्दल बोलतोय.
“ तुला ऍक्युट माऊंटन सिकनेसचा त्रास होतोय का! अनुरागने मला विचारलं. त्याला वाटत होतं की समुद्रसपाटीपासून जास्त उंचावर गेल्यास बऱ्याचदा श्वासोच्छ्वास करताना त्रास होऊ शकतो किंवा छातीमध्ये दुखणं, डोकं जड होणं असे तात्पुरते आजार, त्रास उदभवू शकतात. एक महत्वाचा ऍक्युट मोउंटन सिकनेस लक्षण म्हणजे मानसिकरित्या चिडचिडेपणा किंवा मूडीपणा निर्माण होतो. त्याला वाटलं मला असाच काही त्रास होतोय. पण मी कित्येकदा हिमालयात उंचावर गेलोय. कित्येकदा एकट्याने प्रवास केलाय, अमरनाथला प्रचंड ऍक्युट मोऊंटन सिकनेसचा त्रास झाला होता. पण रामबाडाला तसा काहीही त्रास मला होत नव्हता. मी पूर्णपणे शारीरिकरित्या तंदुरुस्त होतो. मला अस्वस्थता जाणवत होती ती मानसिक. आणि ती ही अत्यंत तीव्रतेने.

मी परत जात  असतानाच उद्वेगाने एका शिळेवर बसलो. डोकं हाताने दाबून धरलं. मित्र सोबत होते.
मी म्हणालो , “मी मागच्या वर्षी येथे आलो होतो! केदारनाथचा प्रलय मी स्वतः अनुभवला आहे! मी जिवंत राहिलो हे एक आश्चर्य आहे. त्या चार दिवसांत मी शेकडो लोकांना मरताना बघितलं. वाहून जाताना, चिखलात दबून मरताना, भुकेने तडफडून मरताना बघितलं!

त्या वेळी १९ जून २०१३ ला मी ठरवलं होतं मी पुन्हा या जागी येईल. मी केदारनाथला येईन या रुद्राला जाब विचारायला! काय चूक होती त्या हजारो भक्तांची , लोकांची जे त्या 4 दिवसांत मेलेत! केदारनाथच्या प्रलयात वाहून गेलेत! शंकरा का तू तुझा तिसरा डोळा उघडलास!